टोचणी

पथिक's picture
पथिक in जे न देखे रवी...
29 Jun 2015 - 2:57 pm

रात्री दहा वाजता ऑफिसातून घरी जाताना
रस्त्यात बसलेली एक म्हातारी दिसली
ती फुटपाथवर नं बसता रस्त्यातच एका कडेला
थंडीमध्ये स्ट्रीट लाईट च्या मंद केशरी प्रकाशात बसलेली होती
खरं तर ती एक भिकारीण होती
पण नेहमीप्रमाणे ते गृहीत धरून दुर्लक्ष करून जाता आलं नाही
कारण ती हात पसरून भिक मागत नव्हती
जाणाऱ्यां येणाऱ्यांना आवाज देत नव्हती
आपापल्या घरी चाललेल्या लोकांच्या गर्दीमध्ये
त्या रिकाम्या होत चाललेल्या रस्त्यावर
गुडघ्यावर हनुवटी टेकवून खाली जमिनीकडे बघत
ती बसली होती अगदी चुपचाप....
(शहराच्या सदसदविवेकबुद्धीला लागलेल्या टोचणी सारखी?)
आणि त्यामुळे
तिचं 'भिकारी'पण दृष्टीआड होऊन
आणि तिचं 'माणूस'पण प्रकाशित झालं होतं

कविता