कृष्णबन- २

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in भटकंती
28 Jun 2015 - 1:40 pm

ह्याआधी:- कृष्णबन- १

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरच खोलीबाहेरच्या बाल्कनीत खुर्च्या टाकून कितीतरी वेळ समोरच्या त्या डोंगरमाळा निरखत राहिलो. उंच उंच घनदाट गर्द हिरवे सूचीपर्णी अरण्य लांबून अगदी काळेसावळे दिसत होते. आता अगदी पटलेच हे नाव कसे पडले ते! गर्द हिरव्या रंगात मिसळलेली सावली सारं रान सावळंकाळं करून टाकते आणि आकाशातून पाहताना तर ते अजूनच पटते.
.
आवरून मग नास्त्याच्या हॉलमध्ये आलो. रिटाआजी होतीच तिथे हवं नको पहायला आणि आजोबाही आले हातात कॉफीचा मोठ्ठा जग घेऊन.. म्युसली, दही,फळे, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेडचे, चीजचे प्रकार, अंडी,ज्यूस्, चहा, कॉफी असा साग्रसंगीत नास्ता चालू असताना तिला कुकु क्लॉककडे आणि धबधब्याकडे जायचा रस्ता विचारला. खाऊन होऊ दे तुमचं, मग निवांत बोलू, असं म्हणत ती दुसर्‍या टेबलावरच्या आजीआजोबांना कॉफी द्यायला गेली.

गाडी नका नेऊ, पार्किंगला तिकडे त्रासच असतो नेहमी, त्यात आणि आज शनिवार आहे.. ब्रेकफास्ट झाल्यावर आजीची टकळी सुरू झाली. आमच्याकडून एक फॉर्म भरून घेतला आणि त्याची कॉपी आम्हाला दिली आणि म्हणाली हे दाखवून आता तुम्ही ह्या एरियात बस, रेल्वेने फिरू शकता. वेगळं तिकिट काढायची जरूर नाही. हॉटेलच्या समोरच बसस्टॉप आहे तो एव्हाना पाहिला असेलच तुम्ही, पण एवढी सुंदर हवा आहे आज आणि धबधबा काही फार लांब नाही, मोठ्ठं कुकु क्लॉकही त्याच वाटेवर आहे. फार तर दोन किमी तर असेल आणि अग, रस्ता इतका छान आहे. सोपा , उताराचा रस्ता आहे. अगदी नाकासमोर सरळ जायचं, कुठ्ठे वळायचं नाही,काही नाही. अजिबात दमायला होत नाही. तुम्ही चालतच जा. येताना मात्र बसने या, तेव्हा दिवसभराचे दमले,कंटाळले असाल ना.. असं आम्हाला जवळजवळ फर्मावलंच तिने.
.

.

आजीची आज्ञा शिरसावंद्य मानून समोर दिसणार्‍या बसस्टॉपकडे दुर्लक्ष करुन आम्ही चालायला सुरूवात केली. रस्त्याच्या कडेने असणार्‍या घरांच्या अंगणातल्या झोपाळ्यावर कुणी आजोबा मंद झुलत पेपर वाचत बसलेले दिसले तर दुसर्‍या एखाद्या अंगणात कॉफीपान चालू होते. एकंदरीत गावाचा दिवस नुकताच सुरू होत होता. हवा खरंच छान होती. उबदार किरणं बरी वाटत होती, अटकर बांध्याचा, नाजूक वळणांच्या रस्त्याच्या दोबाजूला उंच चिनार, पाईन चवर्‍या ढाळत होते. मध्येच येणारे काळेपांढरे चुकार ढग सावली देऊन जात होते. वेलीवेलींवर गुलाब फुलले होते. वाहनांचा कोलाहल नव्हता, हॉर्न्सचे आवाज नव्हते, फूटपाथवर फेरीवाले नव्हते कि भाजीवाले नव्हते. त्या शांततेला आमच्याच गप्पांचा त्रास होत असावा.

.

रिटाआजीने सांगितल्याप्रमाणे सरळ सरळ उतरत गेलो आणि एका ठिकाणी तिठा आला. आता कुठे जायचे? कुठे कसली पाटीही दिसेना. आता कुठे जायचे? एका अंगणात एक काकू कुंडीतली माती सारखी करत होत्या.त्यांना ट्रिबेर्गचा रस्ता विचारला. अगदी हातातले खुरपं बाजूला ठेवून कुंपणाच्या दाराशी येऊन त्यांनी कसं जायचं ते व्यवस्थित सांगितलं. आणि अगदी थोड्याच अंतरावर ते पहिलं मोठ्ठं कुकुक्स उअर आहे अशीही माहिती दिली. शोनाखबाख तर ट्रिबेर्गच्याही पुढे आहे, मग घड्याळ कसं इतक्यात लवकर येईल? आमचा उडालेला गोंधळ समजून ती हसली आणि म्हणाली, ते वेगळं घड्याळ.. ते सध्याचं सगळ्यात मोठं कुकु क्लॉक पण पहिलं मोठ्ठं कुकु क्लॉक शोनाख मध्येच आहे. आता दिसेलच की तुम्हाला थोडं पुढे गेलात की.. हे इथे तर आहे.. आम्ही पुढे कूच केलं. आपल्याकडच्या गावातल्या 'हे इथेच तर आहे...' सांगण्यात आणि ह्या काकूंच्या सांगण्यात भाषा सोडली तर काsही फरक नव्हता.बराच वेळ चालत होतो. दोन किमी इथेच झाले असावेत आणि ट्रिबेर्ग अजून कितीतरी लांब होतं. आता मध्येच कुठे बसही घेण्याजोगा रस्ता नव्हता. सगळी पायवाट होती.

.

थोडावेळ असेच पायवाटेवरुन चालल्यावर डाव्या बाजूला एकदम पाटी दिसली. "Die erste weltgrößte Kuckucksuhr " आणि शेजारीच पाचसहा पायर्‍या होत्या.,खाली छोटंसं कुकु क्लॉक्सचं दुकान होतं आणि मोठ्ठ्या कुकु क्लॉककडे जायला बाणही केलेला दिसला. आम्ही कुकु क्लॉकच्या मागच्या बाजूला उभे होतो. त्या बागेतल्या काकूंनी सांगितलेलं ते हेच घड्याळ असणार.. तरीच रिटाआजी म्हणाली होती, धबधब्याच्या वाटेवरच कुकुक्सउअर आहे ते.. आता लिंक लागली. आम्ही ते घड्याळ पहायला खाली उतरलो. १६८० मध्ये ट्रिबेर्गमध्ये कुकु क्लॉकचा जन्म झाला आणि अलिकडच्या शोनाखमध्ये जगातलं पहिलं मोठ्ठं कुकुक्लॉक तर पलिकडच्या शोनाखबाखमध्ये सध्याचं सर्वात मोठ्ठं कुकु क्लॉक! दोन्ही गावांमधल्या घड्याळांच्या मोठेपणातली चुरसही तेथे समजली. योसेफ डोल्ड नावाच्या घड्याळजीने दोन वर्षे खपून हे मोठ्ठं घड्याळ बनवलं. घड्याळ कसलं ? ३.६ मी लांब, १ मी रुंद आणि ३.१० मी ऊंच असं लहानसं घरच आहे ते. समोर छानसं हिरवळीचं अंगण,त्यात डोलणारी गवतफुलं, कलात्मकतेने मांडलेल्या कुंड्या, खिडक्यातून मांडलेली फुलांची आरास.. काय आणि किती बघू असं वाटत होतं. आतमध्ये चक्क कुकु घड्याळांचं दुकान आहे. छोटासा पोटमाळाही आहे त्याला पण तिथे कुकु राहते. त्यामुळे वर जाता येत नाही.

.

.
'घड्याळातले ऐका टोले.. ' म्हणत, बाहेर येणार्‍या कुकूला पाहून, कॅमेर्‍यात बंद करून नाइलाजाने तेथून पुढे निघालो. पुढे काही वेळ चालल्यानंतर एकदाची 'ट्रिबेर्ग' अशी पाटी दिसली. चला आलो आता गावात.. आता धबधबा कुठे विचारायचं आणि शोनाखबाखला कसं जायचं तेही.. पण पाय आणि पोट दोन्ही बोलायला लागले होते. त्यामुळे कार्टोफेल सुपं म्हणजे बटाट्याचे सूप आणि केझं स्पेटझलं ही चीज आणि न्यूडल्सची जर्मन खासियत खाण्यासाठी एका उपाहारगृहात शिरलो.

.

.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

28 Jun 2015 - 1:45 pm | यशोधरा

मी पैली.
आता वाचते.

मस्त आहे गं कुकू क्लाॅक.ती उतरत्या छपराची आजुबाजूला हिरवळ असणारी घरं पण किती सुंदर!

मधुरा देशपांडे's picture

28 Jun 2015 - 5:43 pm | मधुरा देशपांडे

मस्त. आता शोनाख आणि शोनाखबाख दोन्ही ठिकाणी जाणे आले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jun 2015 - 6:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

कुकुक्लॉक लै भारी. सूपचा फोटो पाहून भूक खवळली :)

एखाद्या दुर्गम खेड्यात राहूनही अशी कलात्मकता आणि कसब दाखविणार्‍यांचे मला नेहमीच आसुयापूर्ण कौतूक वाटत आले आहे !

असल्या निसर्गात आणि वरून चौथ्या चित्रात असलेल्या घरासारख्या घरात (काही काळ तरी) रहायचे स्वप्न आहे !

आता घरी असलेले कुकु क्लॉक भितींवर लावणे आले.

पद्मावति's picture

29 Jun 2015 - 12:19 pm | पद्मावति

स्वाती, हा लेख वाचून आत्ता उठून कृष्णबन( काय सुंदर नाव दिलं आहेस) बघायला जावसं वाटत आहे.

उमा @ मिपा's picture

29 Jun 2015 - 12:43 pm | उमा @ मिपा

डोंगराचं, सकाळचं वर्णन वाचताना मस्त वाटलं, अशी सुरम्य सकाळ, अहाहा! खूप छान वर्णन, सुरेख फोटो.
रीटाआज्जी गोड.

सर्वसाक्षी's picture

29 Jun 2015 - 1:06 pm | सर्वसाक्षी

हाही भाग मस्त. तुम्हा दोघांची हॉटेल निवड अफलातून! उगाच कलकलाटात राहण्यापेक्षा असे निवांत ठिकाण उत्तम.
जर्मनीत कार्टोफेल हा शब्द ऐकुन गंमत वाटली. रशियन भाषेतही बटाट्याला कर्तोफ्येल व कार्तोश्का असे म्हणतात.

नंदन's picture

30 Jun 2015 - 4:49 am | नंदन

द. अमेरिकेतून बटाटा युरोपात आल्यावर ह्या नवीन भाजीला (ज्या भाषांनी पोटॅटो/पताता/बटाटा ह्या मूळ शब्दाच्या आवृत्त्या स्वीकारल्या नाहीत, त्यांच्यात) 'जमिनीतून येणारं फळ' या अर्थाची नावं पडली.

उदा. फ्रेंचमध्ये बटाटा म्हणजे pomme de terre, शब्दशः धरतीचे सफरचंद!
जर्मन/रशियन/एस्टोनियनमध्ये हेच लॅटिन territuberum -> tartufo -> kartoffel/kartul अशा प्रवासातून दिसून येतं.

सूड's picture

29 Jun 2015 - 2:19 pm | सूड

सुंदर!!

मंजूताई's picture

29 Jun 2015 - 3:01 pm | मंजूताई

दोन्ही बाग वाचले. प्रचि व लेख अप्रतिम! कृष्णबन नावही अगदी सार्थ!

नंदन's picture

30 Jun 2015 - 4:50 am | नंदन

टुमदार परिसराचे रंगतदार वर्णन! पु. भा. प्र.

कविता१९७८'s picture

30 Jun 2015 - 8:14 am | कविता१९७८

मस्तच , सुरेख वर्णन