शरदातला स्वित्झर्लंड : ०२ : स्विस पर्यटनव्यवस्थापनाची झलक

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
27 Jun 2015 - 4:02 pm

===================================================================

शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)

माझे मिपावरचे इतर लेखन...

===================================================================

त्यानंतर मात्र काही गडबड न होता एमिरेट्स एअरलाईन्सने दुबईमार्गे शिशिरातल्या एका प्रसन्न गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास झ्युरिकच्या हॉटेलवर पोहोचलो.

हॉटेलवर पोहोचल्यावर सर्वप्रथम गरमागरम शॉवर घेऊन दोन तास ताणून दिली. साडेबाराच्या आसपास रिसेप्शनवर पोहोचून चौकश्या करायला सुरुवात केली. हॉटेल आणि महाविद्यालय झ्युरिकच्या टेक्नोपार्कमध्ये एकमेकाजवळच होते, किंबहुना ते तसे आहे हे पाहूनच हॉटेल नक्की केले होते. त्यामुळे आणि अभ्यासक्रम सुरू व्हायला अजून साडेतीन दिवस असल्याने ती काळजी नव्हती.

पोटात कावळे कोकलत होते, तेव्हा सर्वप्रथम पोटोबाची व्यवस्था विचारली. टेक्नोपार्कमध्येच साध्या कबाब-चिकन-चिनी खाद्यांपासून ते इटालियन गुर्मेपर्यंत अनेक रेस्तराँ आणि एक सुपरमार्केट असल्याची अमूल्य माहिती मिळाली आणि धन्य झालो! थोडक्यात रोजमर्राच्या गरजांसाठी धावपळ करण्याची गरज नसल्याने सर्व मोकळा वेळ भटकंतीत घालवायला मिळणार होता, अजून काय पाहिजे?

दुसरी महत्त्वाची चौकशी म्हणजे देशात हिंडाफिरायचे कसे ते. सर्वसाधारणपणे सर्व विकसित देशांत हॉटेलच्या लॉबीत नको तेवढी... आणि बऱ्याचदा गोंधळ निर्माण करू शकतील इतकी... पर्यटनासंबंधी पत्रके ठेवलेली असतात. नवख्या माणसाला त्यांच्या महापुरातून खरेच काय पाहण्यासारखे आहे आणि काय भरताड आहे हे कळणे कठीण होते. स्वागतकाने एका कोपऱ्यात भिंतीवर लावलेली काही पत्रके दाखवली आणि त्याबरोबरच, "पत्रके पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी इथूनच एक रेल्वेस्टेशन दूर असलेल्या झ्युरिक हौप्टबाsनहोफ (Zürich Hauptbahnhof) उर्फ झ्युरिकच्या मुख्य रेल्वे स्टेशनवर जाऊन पर्यटन केंद्रात माहिती घ्या" असे सांगितले. हे सगळे मला काटविण्यासाठी तो बोलतो आहे की काय असा संशय नक्कीच आला. इथपर्यंत पोटातल्या कावळ्यांचा गलबला बराच वाढला होता आणि रिसेप्शनवरही बरीच गर्दी होती. तेव्हा प्रथम पोटोबा मग टुरोबा असे म्हणत शेजारच्या रेस्तराँकडे होरा वळवला. टेक्नोपार्कमध्ये एका बाजूला अनेक (स्विस किंमतींच्या तुलनेने) मितव्ययी पण चटकदार रेस्तराँची रांग होती. गुर्मे रेस्तराँ त्यांच्यापासून थोडे हुच्च अंतर राखून आणि एकमेकापासूनही जरा दूर दूर होती. रांगेतले एक छानसे रेस्तराँ निवडून पोटोबा आटोपला आणि जवळच्या रेल्वे स्टेशनवरून हौप्टबाsनहोफकडे जाणारी रेल्वे पकडली. हौप्टबाsनहोफ पुढचाच थांबा असल्याने तिकडे जाणारी कोणतीही संथ अथवा वेगवान गाडी पकडली तरी चालेल हे रिसेप्शनवर समजले होते. कोणतीही समस्या न येता हौप्टबाsनहोफला पोहोचलो. झ्युरिक हौप्टबाsनहोफ हे स्वित्झर्लंडमधले सर्वात मोठे आणि युरोपमधल्या मोठ्या रेल्वेस्टेशन्सपैकी एक आहे. याच्या नावाचे लघुरूप "झ्युरिक HB" असे आहे.


झ्युरिक हौप्टबाsनहोफ ०१

.


झ्युरिक हौप्टबाsनहोफ ०२

(झ्युरिक हौप्टबाsनहोफची वरची दोन प्रकाशचित्रे जालावरून साभार)

वर्तुळातला "i" ही माहितीकेंद्राची खूण शोधत शोधत सरकारी पर्यटक माहिती केंद्राला पोहोचलो. आतली व्यवस्था साधारण बँकेसारखी होती. प्रथम आपला क्रमांक मशीनवर काढून घ्या आणि वाट पाहत बसा अशी सूचना पाहून तसे केले. पाचेक मिनिटांत मला एलइडी बोर्डावर माझा व टेबल क्रमांक दिसला आणि आवाजी बोलावणे आले. सरकारी कार्यालय असून टेबलाच्या दुसऱ्या बाजूच्या माणसाने अर्धवट उठून सस्मित हस्तांदोलन केले आणि बसा म्हणाला! त्या धक्क्यातून सावरत नाही तर "मी काय मदत करू शकतो? " अशी विचारणा झाली.

मी त्याला खालील माहिती दिली:
१. मी तुझ्या देशात पहिल्यांदाच आलो आहे.
२. मला उद्यापासून तीन दिवस आणि नंतर काही काळाने दोन दिवस मोकळे आहेत.
३. या दिवसांत मला एकदा जिनिवाला जाऊन माझ्या मित्राला भेटायचे आहे.
४. बाकीच्या वेळात तुझा देश जितका बघता येईल तितका बघायचा आहे.
५. तेव्हा, तूच मला सांग की मी काय काय आणि कसे काय बघावे.

त्याने माझ्या पर्यटनासंबंधीच्या आवडीनिवडींबद्दल जुजुबी चौकशी केली. एवढ्या भांडवलावर, नंतरच्या साधारण तासाभरात, एक एक पर्याय पुढे ठेवून माझे मत घेऊन पुढे जात जात, माझा पाच दिवसांचा प्रवास कसा करावा, कोठे रहावे, काय पहावे, प्रत्येक ठिकाणी जास्त वेळ मिळाल्यास अजून काय पाहता येईल, पैशाचा अपव्यय कसा टाळावा, इत्यादी माहितीसकट सर्व वेळापत्रक ठरवून झाले आणि खालील कागदपत्रे हातात घेऊन मी बाहेर पडलो होतो !

१. पाच दिवसांच्या प्रवासाचा बारकाव्यांसकट खात्रीलायक आराखडा.

२. आराखड्यातल्या सर्व पर्यटन स्थळांची जरूर ती सर्व माहितीपत्रके : ही देताना प्रत्येक पत्रकावरच्या माहितीची चर्चा करून दिली गेली. यांचा दर ठिकाणी कोणतीही चौकशी न करता फिरण्यासाठी मला मोठा उपयोग झाला हे सांगण्याची गरज नाही. इतकेच नाही तर हे प्रवासवर्णन लिहितानाही त्यांचा उपयोग होत आहे हे त्यातील काहींचे या लेखमालेत वापरलेले स्कॅन्स पाहून तुमच्या ध्यानात येईलच.

३. माझ्या रेल्वे प्रवासाची संगणकावर छापलेली "वैयक्तिक वेळापत्रके" : हा प्रकार जगावेगळा होता! आजपर्यंत मी इतक्या खोलात जाऊन दिलेली सेवा इतरत्र पाहिली नाही. रेल्वे प्रवासाच्या दर भागाचे "माझ्या उपयोगाचे" वेगळे वेळापत्रक संगणकातून छापून दिले होते. असा सर्व गठ्ठा मिळाल्यावर मी "जर एखादी जागा मला आवडली आणि तेथे जास्त वेळ थांबलो तर मग माझी पुढची गाडी चुकेल ना. त्याचे काय? " असे खुसपट काढलेच! उत्तरादाखल त्याने हसत माझ्या हातातली वेळापत्रके परत घेतली; "नो प्रॉब्लेम, लेट्स डू समथिंग अबाऊट इट." असे म्हणत फाडून टाकली आणि दुसरे प्रिंटआऊट्स दिले... त्यांच्यात पहिल्या कॉलममध्ये माझ्या संमतीने बनलेले वेळापत्रक; दुसऱ्या कॉलममध्ये एक तासानंतर असलेल्या गाड्यांचे आणि तिसऱ्या कॉलममध्ये दोन तासानंतर असलेल्या गाड्यांचे वेळापत्रक होते !





फाsरप्लानाऊसकुंफ्ट : पाच दिवसांच्या सर्व प्रवास-जोडप्रवासां(connections)ची पर्यटकाला देण्यासाठी छापलेली "वैयक्तिक वेळापत्रके"

वरच्या वेळापत्रकात एका ठिकाणी (एंगेलबर्ग) पहिली गाडी बदलून सात मिनिटात दुसऱ्या फलाटावरची दुसरी गाडी पकडायची होती. ते पाहून, अर्थातच माझ्या भारतीय अनुभव व मानसिकतेमुळे खालील संवाद घडला...

मी : मी इथे नवीन आहे. असे फलाट बदलून सात मिनिटांत मी दुसरी गाडी पकडू शकलो नाही तर घोळ होईल ना?

तो : सर काळजी करू नका. मी अश्याच गाड्या निवडल्यात, ज्या एकाच फलाटाच्या दोन बाजूंना उभ्या असतील. तुम्ही पहिलीतून उतरा आणि बेलाशक सरळ पलीकडच्या गाडीत चढा. दुसर्‍या गाडीबद्दल इतर काही खात्री करण्याची गरज नाही.

(इथे माझ्या कानात, "पाच क्रमांकाच्या फलाटावर येणारी गाडी नऊ क्रमांकाच्या फलाटावर येत आहे" किंवा "चार क्रमांकाच्या फलाटावरून सुटणारी गाडी दहा क्रमांकाच्या फलाटावरून सुटणार आहे." अश्या काहीश्या घोषणा ऐकू येत होत्या. पण, त्याच्या बोलण्यातला आत्मविश्वास पाहून मी माझ्या "कानातला आवाज" त्याला सांगण्याचा मोह मोठ्या प्रयासाने आवरला! )

पण, माझा संशय इतक्याने थोडाच निवळणार होता?..

मी : समजा पहिली गाडी थोडी उशीरा पोचली आणि दुसरी गाडी अगोदरच निघून गेलेली असली तर?

तो (मिश्किलपणे हसत) : धिस इज स्वित्झर्लंड, सर!

आता अजून जास्त शोभा व्हायला नको म्हणून मी विषय बदलला, हे सांगायला नकोच !

या संभाषणातला शब्द न् शब्द त्या सफरीत आणि पुढच्या भेटींत खरा ठरला आणि वेळेच्या काटेकोरपणाबद्दलच्या स्वित्झर्लंडच्या कीर्तीत अजिबात अतिशयोक्ती नाही याची पुन्हा पुन्हा खात्री पटत गेली.

.

४. पाच दिवसांचा "स्विस फ्लेक्सी पास" : "स्विस पास" ही पर्यटनव्यवस्थापन एका वेगळ्याच उच्च स्तरावर नेणारी गोष्ट आहे!!

(अ) हा पास "सर्व स्वित्झर्लंडभर" रेल्वे, बस, बोट, ट्रॅम, इत्यादी सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी त्याच्या मुदतीत कितीही वेळा वापरता येतो. एका शहरात अशी व्यवस्था पाहिली होती, पण सर्व देशाला या व्यवस्थेत बांधून ठेवणे हा कल्पनाशक्तीचा आणि व्यवस्थापनाचा अत्युत्तम आविष्कार आहे. या पासमुळे सर्व देशभर तिकिटाच्या रांगेत न उभे राहता एकाच ठिकाणी फिरत असल्यासारखे फिरता येते. एखाद्या जागेची सफर माझ्या मनाप्रमाणे कमी-जास्त वेळेत करण्यास आणि ऐनवेळी कार्यक्रम बदलण्यास हा पास किती उपयोगी ठरला हे पुढे येईलच.

(आ) स्विस रेल्वेच्या जाळ्याचे विभाग अनेक रेल्वे कंपन्यांच्या स्वतंत्र अथवा जोड मालकीचे आहेत. बस, बोट, ट्रॅम, इत्यादी इतर वाहतूक व्यवस्था अनेक स्थानिक कंपन्या, म्युनिसिपालिटी अथवा कँटोन (स्विस राज्य) यांच्या मालकीच्या आहेत. तरीसुद्धा हे सर्व वेगळ्या आकाराचे आणि वेगळ्या रंगाचे मणी ओवून एका देशव्यापी, एकसंध आणि आदर्श वाहतूक व्यवस्थेची माळ तयार करणार्‍या स्विस पास या एकाच गोष्टीमुळे मी माझ्या सर्व प्रवासात कल्पक स्विस व्यवस्थापनाचे अनेकदा आभार मानत आणि कौतुक करत राहिलो होतो... आणि आजही करतो आहे.

(इ) हा पास दाखवून, देशभर, खास पर्यटनव्यवस्थेकरीता असलेले रज्जूमार्ग (केबल कार / रोप वे), पर्वतांवर घेऊन जाणारी कॉगव्हिल रेल्वे, इत्यादींच्या तिकिटात ५०% सवलत मिळते.

(ई) स्विस पास ३, ४, ७, १५ दिवस अश्या काळांसाठी मिळतो. मात्र एकदा (छोट्या वा मोठ्या) प्रवासासाठी तो वापरला तर त्या दिवसात तो इतरत्र अजिबात वापरला नाही तरी तो एक दिवस बाद होतो. हा नियम प्रवासाचा आराखडा बनवताना लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

(उ) "स्विस फ्लेक्सी पास" हे स्विस पासचे एक खास रूप आहे. थोडी (साधारण १०%) जास्त किंमत असलेल्या या पासमधले दिवस सलगपणे वापरण्याची गरज नसते; तो महिन्याभरातल्या वेगवेगळ्या दिवसांना वापरता येतो.

(ए) माझ्या या प्रवासात मी स्विस पासाऐवजी स्वतंत्र तिकीटे काढून प्रवास केला असता तर तीन ते चार पट खर्च झाला असता !



पाच दिवसांचा स्विस फ्लेक्सी पास

.

अश्या अनपेक्षित तऱ्हेने केवळ तासाभरात दोन तुकड्यात करायच्या पाच दिवसांच्या पर्यटन कार्यक्रमाचे बारकाव्यांसकट खात्रीलायक व्यवस्थापन झाले... शिवाय प्रवासाच्या आराखड्यामध्ये काही अचानक बदल करायचे ठरवले तर ते करायला कुठल्याही दंडाशिवाय पूर्ण मोकळीक होती !

स्विस फ्लेक्सी पास हीच एक गोष्ट मी सरकारी माहिती केंद्रातून खरेदी केली होती, पण ती खरेदी मी आवश्यकता म्हणून नव्हे तर माझी सोय म्हणून केलेली होती ! इतर सर्व माहिती, मदत, कागदपत्रे, माझ्यासाठी खास प्रिंट केलेली वेळापत्रके आणि सस्मित सेवा विनाशुल्क होती! हे सगळे पृथ्वीवरच होत आहे ना याची खात्री पटवून घेण्यासाठी स्वतःला चिमटा काढण्याचा मोह वारंवार होत होता !

असा ठरला होता माझ्या प्रवासाचा मार्ग :

पहिली फेरी : ०. झ्युरिक --> (इंटरलाकनमार्गे) १. युंगफ्राऊयोख --> २. इंटरलाकन (वस्ती) --> ३. क्लाईनटिट्लीस --> ४. ल्युझर्न (वस्ती) --> (५. पिलाटस कुल्म*) --> ६. ऱ्हाईनफॉल --> ७. झ्युरिक.

दुसरी फेरी : झ्युरिक --> ८. जिनिवा --> झ्युरिक.

(* : पिलाटस कुल्म माझ्या मूळ प्रवासात नव्हते. पण स्विस पासच्या कृपेने ऐनवेळेस त्याची भटकंतीत भर टाकणे शक्य झाले, ही गोष्ट पुढे येईलच. )

.


शरद ऋतूमधल्या स्वित्झर्लंडच्या भटकंतीचा मार्ग

.

मायस्वित्झर्लंड.कॉम : स्विस पर्यटन खात्याचे अधिकृत संस्थळ
स्विस पासची माहिती व विक्री करणारे रेल्वेचे अधिकृत संस्थळ
भारतीय चलनात स्विस पासची विक्री करणारे एक संस्थळ

.

अश्या तर्‍हेने, स्वित्झर्लंडच्या सफरीसाठी आवश्यक त्या आयुधांनी सज्ज होऊन मी झ्युरिकमधली पहिली संध्याकाळ आनंदाने साजरी करण्यास निघालो.

आखीवरेखीव, बर्‍यापैकी गजबजलेले तरीही स्वच्छ, सुंदर, मोकळ्या-ढाकळ्या झ्युरिकचे प्रथमदर्शन मनाला भावलं. तिथेच माझ्या झ्युरिकबरोबरच्या प्रथमदर्शनी प्रेमप्रकरणाची सुरुवात झाली ! पण त्याच्याबद्दल नंतर कधीतरी. तास दोन तास झ्युरिकच्या पाय नेतील त्या रस्त्यावरून आणि गल्लीबोळांतून वाट फुटेल तसे हिंडत होतो...


झ्युरिक हौप्टबाsनहोफचा दर्शनी भाग ०१

.


झ्युरिक हौप्टबाsनहोफ ०२

.


झ्युरिक ०१

.


झ्युरिक ०२

.


झ्युरिक ०३

.


झ्युरिक ०४

.


झ्युरिक ०५

.

शेवटी, कालच्या प्रवासातल्या झोपेच्या अभावाचा प्रभाव सुरू झाला. एका रेस्तराँमध्ये काही खाऊन घेतलं, टेक्नोपार्ककडे जाणारी रेल्वे पकडली आणि हॉटेलवर परतलो. दुपारी उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल हॉटेलच्या स्वागतकाला धन्यवाद देऊन उद्यापासून पुढचे तीन दिवस फिरायला जाणार आहे असे सांगितले. मात्र परतण्याच्या दिवसापासून पुढचे आरक्षण कायम ठेवायला सांगितले. रूमवर गेलो आणि ताणून दिली.

(क्रमशः )

===================================================================

शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)

माझे मिपावरचे इतर लेखन...

===================================================================

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

27 Jun 2015 - 4:22 pm | मुक्त विहारि

आणि खिडकी पटकावतो....

आता शांत पणे लेख वाचतो.

(प्रवासी) मुवि

इतकं कसं सगळं व्यवस्थित,अाखीवरेखीव!ड्वाले पानावले ना!
पुभालटा!

झालीय
मी : समजा पहिली गाडी थोडी उशीरा पोचली तर दुसरी गाडी अगोदरच निघून गेलेली असली तर?

तो (मिश्किलपणे हसत) : धिस इज स्वित्झर्लंड, सर! ........वाह....याला म्हणतात नॅशनल प्राइड.....सुरेख...

-तो साला हम क्या करेगा .... रेल्वे क्या मै चलाता ?
-दुसरी गाडी निकल गई तो देख लेना ..कोई और आयेगी ...इतना तो चलता है साब ..
-देख बे तुमने टिकट खरीदा है रेल्वे नै ...दिमाग मत चाटो ...
-वो प्रिंटऔट का १०० रुपिया और उपरसे हमारा खर्चापानी ...जो तुम ठीक समझो...
-इतना मेहेनत किया मैने ...अभी जाके आना ..फुकट के लोग आजकल इतने घुमते है !!!
...और सुनो ...किसीको बोलना मत मैने इधर बैठके ये सब तुमको दिया ...मै इधारका हमाल है ..वो आदमी बिडी पिणे गया करके मै बैठ गया ...

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jun 2015 - 5:59 pm | अत्रुप्त आत्मा

फारच भारी हाय...

मधुरा देशपांडे's picture

27 Jun 2015 - 7:08 pm | मधुरा देशपांडे

शब्दाशब्दाशी सहमत. ही फक्त पोच. वेळ मिळताच सविस्तर प्रतिसाद देईन.
पुभाप्र

टवाळ कार्टा's picture

27 Jun 2015 - 7:22 pm | टवाळ कार्टा

दू दू दू

यशोधरा's picture

27 Jun 2015 - 7:32 pm | यशोधरा

मस्त सुरुवात झाली!
शंका - कुशंका लईच आवडल्या! =))

खटपट्या's picture

27 Jun 2015 - 7:44 pm | खटपट्या

वाचतोय...

निखळ आनंद देणारी सफर पुन्हा सुरु झाली तर... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांन्स... ;) :- Kuch Kuch Locha Hai

सुधीर कांदळकर's picture

28 Jun 2015 - 12:03 pm | सुधीर कांदळकर

लेखदेखील नेटका, सुरेख, आखीवरेखीव.

धन्यवाद, पुभाप्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jun 2015 - 12:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुक्त विहारि, अजया, पद्मावति, अत्रुप्त, मधुरा देशपांडे, टवाळ कार्टा, यशोधरा, खटपट्या, मदनबाण आणि सुधीर कांदळकर : अनेक धन्यवाद !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Jun 2015 - 1:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं लिहिताय. :)
एवढी कमी गर्दी बघुन लगेचं जावसं वाटतय!

स्वच्छंदी_मनोज's picture

29 Jun 2015 - 3:38 pm | स्वच्छंदी_मनोज

डॉक साहेब मस्त लिहीताय.
लिहीलेल्या शब्दाशब्दाशी सहमत. कामाच्या निमित्ताने झ्युरीकला काही महीने राहील्याने झ्युरीकबद्दल खास प्रेम आहे. मी राहत असलेल्या ओर्लीकोन-क्लोटन इथून Zurich HBf जरी लांब असले तरी पास असल्याने, चिरिमिरी खरेदीसाठी पण Hbf ला जायचो :). तसेच झ्युरीक विमानतळावरची दुकाने रात्री १० पर्यंत चालू (रवीवारी पण) असल्याने रात्रीपर्यंत विमानतळ भागात भटकायचे आणी कोऑप किंवा मिग्रोस मधून खरेदी करायची असा प्लॅन असायचा.

लवकर पुढचा भाग टाका.

स्वाती दिनेश's picture

29 Jun 2015 - 4:38 pm | स्वाती दिनेश

वाचते आहे,
स्वाती

प्रचेतस's picture

29 Jun 2015 - 4:45 pm | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच सुंदर आणि तपशीलवार वर्णन.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Jun 2015 - 1:10 am | निनाद मुक्काम प...

जर्मनीतून स्विस च्या वेशीवर जाण्याचा बेत होता हौसेने आंजा वरून तिकीट बुक केली ती सुद्धा बान म्हणजे येथील लोकल व पुढे युरो ट्रेन ची सलग्न
कधी नव्हे ती बाण ५ मनिटे उशिरा आली व माझी युरो ट्रेन चुकली
पुढे कस्टमर सर्विस ला झालेला प्रकार सांगितला
तिने माझे तिकीट पाहून ती बान ५ मिनिटे खरच उशिरा आली का ही संगणकावरून खात्री करून घेतली व एक तासाने पुढच्या युरो ट्रेन ची तिकिटे फुकट दिली
तेव्हा पासून स्टेशन १० मिनिटे आधी जाऊन बसायचे मी ठरवले च्यायला एक मिनिटे थांबत नाहीत . बस वाले तर एक मिनिटे आधी येतात , सुरवातीला हे वेळेचे प्रकरण खूप जड गेले

तुमची लिहिण्याची शैली आवडली

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jun 2015 - 11:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

केवळ ट्रेनच नाही तर झ्युरिकमधल्या ट्रॅम्ससुद्धा त्यांच्या प्रत्येक थांब्यावर लिहीलेल्या वेळेवरच येताना बघितल्या आहेत ! हे जर मी स्वत: अनेक वेळा अनुभवले नसते तर विश्वास बसला नसता.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jul 2015 - 12:01 am | डॉ सुहास म्हात्रे

कॅप्टन जॅक स्पॅरो, स्वच्छंदी_मनोज, स्वाती दिनेश आणि निनाद मुक्काम प... : अनेक धन्यवाद !

श्रीरंग_जोशी's picture

4 Jul 2015 - 8:36 am | श्रीरंग_जोशी

पर्यटनाला चालना देण्यासाठी अशी माहिती केंद्रे खूपच उपयुक्त मार्ग असू शकतो. केवळ जाहिराती करून काही उपयोग नाही. भारतातल्या प्रसिद्ध पर्यटनस्थळी अगदी साध्या साध्या गोष्टींसाठी पर्यटकांकडून अव्वाच्या सव्वा किंमत मोजली जाते. मी स्वतः भोगले आहे. तर परदेशी पर्यटकांना लुबाडणे तर अधिकच सोपे असते.

स्विस पर्यटनखात्याची ही पद्धत भारताच्या बाबतीतही अनुकरणीय आहे असे वाटते. सरकारी पर्यटन विभागच नाही पण स्थानिक सेवादात्यांनी मिळून असे काही सहकारी तत्वावर चालवायला हवे.

प्रभाकर पेठकर's picture

7 Jul 2015 - 6:53 pm | प्रभाकर पेठकर

सुदैवाने माझा मस्कतमधला ट्रॅव्हल एजंट माझा मित्रच आहे. त्याने माझी लंडन-पॅरीस-स्विट्झर्लंड-जर्मनी-इटली अशी संपूर्ण ट्रिप आखून दिली होती. युरेलचा पास होता त्याचा सर्वत्र फायदा झाला. त्याने तारीखवार एक फाईलच बनवून दिली होती. कुठली गाडी पकडायची, ती कुठल्या प्लॅटफॉर्मवर येईल ती चुकली तर दुसरे ३-४ पर्याय, हॉटेल्सची बुकींग्ज, लोकल टुर्स इ.इ.इ. युरोपात प्रामाणिकपणा तर इतका अनुभवला की आपण अचंबित होतो. एखाद्या ठिकाणी आपण रेट कार्ड पाहून त्यानुसार युरोज तयार ठेवावे तर कौंटरवरचा माणूसच विचारतो 'युरेलचा पास आहे का?' आणि 'आहे' म्हंटल्यावर भरगोस डिस्काउंट देतो. वक्तशीरपणा तर वाखाणण्यापलीकडे कौतुकास्पद आहे. बर्लीनहून रात्री सुटलेली गाडी रोमला सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांनी पोहोचेल असे वेळापत्रकात असते आणि अहो आश्चर्य!! एवढे लांबचे अंतर कापून गाडी ठिक ८ वाजून ३३ मिनिटांनी रोमच्या स्थानकात शिरत असते.
सर्व युरोपभर गाड्यांचा वक्तशीरपणा, वेग, स्वच्छता आणि आरामदायी प्रवास आपल्याला अक्षरशः वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. आता युरोपातील एकेक देश पकडून २-३ आठवडे एकाच ठिकाणी मुक्काम ठोकून तो तो देश पाहयचा मानस आहे.
डॉक्टरसाहेब, तुम्ही आमचे पर्यटन गुरू आहात. तुम्ही लिहायचे आणि आम्ही तिथे तिथे जाऊन अनुभव घ्यायचा असा अलिखित नियमच होऊन गेला आहे. तुमचे प्रवास वर्णन अगदी तपशिलवार आणि रसाळ वर्णनाने भरलेले असते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jul 2015 - 8:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनेक धन्यवाद !

पर्यटनव्यवस्थापनाची भारतातली आणि युरोपातली व्याख्या यांच्या जमीनअस्मानाचा फरक आहे हे नि:संशय !

भारतातली अव्यवस्था जेवढी आळस किंवा अज्ञानाने होते त्यापेक्षा जास्त "काही हितसंबंध राखण्यासाठी केलेल्या अव्यवस्थेचे उत्तम व्यवस्थापन (वेल मॅनेज्ड मिसमॅनेजमेंट)" केल्याने होते असा माझा अंदाज आहे ! :(