शरदातला स्वित्झर्लंड : ०१ : पार्श्वभूमी

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
26 Jun 2015 - 12:52 am

===================================================================

शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)

माझे मिपावरचे इतर लेखन...

===================================================================

कामाच्या जागी जरा बऱ्यापैकी जम बसला आणि आपल्या वाट्याच्या कामावर ताबा आला की मग स्वतःसाठी बऱ्यापैकी मोकळा वेळ मिळतो. काही काळ (माझ्या आवडत्या) आळसात घालवला की मग तोच रिकामा वेळ खायला उठतो... आणि मी काहीतरी उपद्व्याप डोक्यावर घेऊन बसतो. अश्याच एका बेसावध क्षणी, मोकळा वेळ जाण्याचे उत्तम साधन म्हणून, मी एका पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. अनेक उत्तम अमेरिकन विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांतून घेतलेले अभ्यास-संच (मोड्युल्स), ब्रिटिश शिक्षणपद्धती आणि कामाच्या जागेपासून तुलनेने जवळ असलेल्या स्वित्झर्लंडमधले महाविद्यालय असा दुर्मिळ संगम जालाच्या संशोधनात आढळून आल्याने त्वरित फी भरून प्रवेश तर घेतला... आणि नंतर महिनाभर काय नसते लोढणे गळ्यात बांधून घेतले असा स्वतःच्या नावाने ठणाणाही केला ! मात्र काही काळ त्या नवीनं शिक्षणपद्धतीतून गेल्यावर या साहसाच्या मी मनापासून प्रेमात पडलो ते वेगळे. त्यासाठी उत्तम अभ्यासक्रम आणि उत्तम शिक्षणपद्धती ही जेवढी महत्त्वाची कारणे होती तेवढ्याच त्या निमित्ताने झालेल्या स्वित्झर्लंडच्या फेर्‍या हे पण महत्त्वाचे कारणही होते. असो. एका असावध क्षणी घेतलेल्या एका निर्णयामुळे मला स्वित्झर्लंडचे वर्षातल्या सर्व ऋतूंमधले सुंदर रूप पहायला मिळाले, हे ही नसे थोडके !

स्वित्झर्लंड हा देश एक बारमाही पर्यटक आकर्षण असले तरी त्याचे शरद ऋतूंमधले (Autumn / fall / पानगळी / ऑक्टोबर-नोव्हेंबर) रुपडे सर्वात आकर्षक असते यात दुमत नसावे. पानगळी (deciduous) वृक्षांची सर्व पाने शरद ऋतूत गळून पडतात आणि वसंत ऋतूत त्यांना नवी पालवी फुटते हे सर्वांना माहिती आहेच. तशी काही पानगळी झाडे उष्ण कटिबंधात (म्हणून आपल्या आजूबाजूला) असतात. पण समशीतोष्ण कटिबंधात (temperate zone) मुख्यतः पानगळी प्रकारची झाडे आहेत आणि मुख्य म्हणजे पाने गळून पडण्यापूर्वी त्यातल्या काही झाडांची पाने आपला हिरवा रंग बदलून पिवळा-नारिंगी-लाल रंगाची जी पखरण करतात, ती झाडांवर आणि जमिनीवरही पाहण्यासारखी असते. योगायोगाने माझी स्वित्झर्लंडची पहिली फेरी ऑक्टोबरमध्ये म्हणजे पानगळीच्या अथवा शिशिर ऋतूमध्ये जमून आली.

हातचे न राखता उधळलेल्या निसर्गसौंदर्यामुळे मी त्या देशाच्या प्रेमात पडलो हे जरी खरे असले तरी; तिथे दिसणार्‍या छोट्या छोट्या गोष्टींच्या बारकाव्याने केलेल्या व्यवस्थापनामुळे (आणि त्यामुळे झालेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या आनंददायक जीवनशैलीमुळे) काकणभर जास्तच प्रभावित झालो. फारच थोड्या गोष्टी मला प्रभावित करू शकतात असा माझा (गोड) समज आहे आणि माझ्या समीक्षकांचा दावा आहे. स्वित्झर्लंडमध्ये देशभर दिसणारे सर्वांगीण, काटेकोर, पण तरीही लोकाभिमुख (लोकांचा आनंद वाढविणारे) व्यवस्थापन ही एक गोष्ट त्या मोजक्या गोष्टींच्या यादीत बर्‍याच वरच्या स्तरावर आहे. त्यामुळे, सुंदर स्वित्झर्लंडचे अत्यंत आकर्षक पर्यटनस्थळात रूपांतर करणार्‍या या व्यवस्थापकीय उघड-गुपितांचा पुढे प्रसंगोचित आणि सढळ हाताने उल्लेख आला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

व्हिसा प्रकरण

माझ्या स्वित्झर्लंडच्या पहिल्या भेटीचा पहिला दिवस जरा गडबडीतच पक्का झाला. ठरवल्यापासून केवळ दोन आठवड्यात झ्युरिकला हजर व्हायचे होते. झ्युरिकला पोचल्यावर तीन दिवस आणि परतण्यापूर्वी दोन दिवस असे पाच दिवस अलाहिदा हातात होते. पहिलीच फेरी असल्याने आणि भटकंतीच्या तयारीला पुरेसा वेळ नसल्याने, हिंडण्या-फिरण्याचे काय करायचे ते तेथे पोचल्यावरच ठरवू असा विचार केला होता. मात्र, योगायोगाने ही भेट शरद ऋतूत जमून आल्याने कामाच्या पुढेमागे मिळालेल्या मोकळ्या वेळेचा पुरेपूर उपयोग करायचा एवढे मात्र नक्की केले होते.

त्या काळात स्वित्झर्लंड शेंगेन व्हिसा समूहात नव्हता. व्हिसासाठी त्या देशाच्या वकिलातीत जाऊन हाताचे ठसे देणे, फोटो काढणे असे सोपस्कार सुरू झालेले नव्हते. व्हिसा एक आठवड्यात हातात येईल असे व्हिसा एजंटने सांगितले. त्यामुळे, आंतरजालावरून निर्धास्तपणे विमानाचे तिकीट, हॉटेल वगैरे राखीव केले आणि इतर तयारी करत व्हिसाची वाट पाहत बसलो.

निघण्याच्या साधारण एक आठवडा अगोदर एक फोन आला. पलिकडचा माणूस म्हणाला "मी स्विस वकिलातीतून बोलतोय." व्हिसा काढणे मला नवीनं नव्हते, पण कोणत्याही वकिलातीतून फोन येणे हे पहिल्यांदाच झाले होते. तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला. प्रथम व्हिसा करिता अर्ज दाखल केलेला माणुस मीच आहे हे अनेक प्रश्न विचारून झाल्यावर पलिकडून धाडकन प्रश्न आला, "तुमचे अगोदरचे शिक्षण आणि आताचे पद पाहता तुम्हाला अजून एका पदव्युत्तर शिक्षणाची गरज काय ?" प्रश्न इतका अनपेक्षित होता की, पहिल्यांदा त्याला काय म्हणायचे आहे हेच मला समजले नाही. त्याला परत एकदा बोल म्हणालो तर त्याने तेच शब्द परत म्हटले. "याला हे विचारण्याचे कारण काय ?" हे मनात येऊन, 'आता माझी सटकली'. पण व्हिसा सेक्शनच्या माणसाशी बोलतो आहे आणि जाणे आठवड्यावर आले होते. तेव्हा आवाज शक्य तेवढा ताब्यात ठेवत विचारले, "मी कोणतेही शिक्षण आता घेईन किंवा अजून दहा वर्षांनी घेईन. जर मला आणि माझ्या विद्यापीठाला काही समस्या नाही तर मग तुम्हाला काय समस्या आहे हे मला कळले नाही." अशीच अजून थोडी 'चर्चा' झाल्यावर पलिकडून सांगितले गेले, "असं करा. तुम्ही आज उद्या फोन करून माझ्या वरिष्ठ अधिकार्‍याशी बोला. तोच काय तो निर्णय देईल."

नशिबाने त्याने फोन खाली ठेवण्याआधी माझ्या ध्यानात आले की माझ्याकडे वेळ फार कमी आहे. लगेच त्याला म्हणालो, "असं करा, आताच तुमच्या वरिष्ठ अधिकार्‍याकडे हा फोनकॉल ट्रन्सफर करून त्यांच्याशी माझे बोलणे करवा. आजपासून फक्त एका आठवड्यात मला महाविद्यालयात हजर व्हायचे आहे." माझा आवाज कडक झाला होता की आर्जवी हे आता आठवत नाही, पण त्याला माझे म्हणणे पटले आणि चार-पाच मिनिटांच्या असह्य प्रतीक्षेनंतर तिकडून एक जराश्या करड्या युरोपियन स्वरात आवाज आला. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्यानेही साधारण तेच अगोदरचे प्रश्न परत विचारले आणि मीही साधारण तशीच उत्तरे दिली. या वेळेस धक्का सरून जरा भानावर आल्याने आणि अंतिम निर्णय घेणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍याशी बोलत असल्याने माझा आवाज बराच व्यावसायिक झाला होता. शेवटी बोलता बोलता मी बोलून गेलो की, "व्हिसासाठी माझ्या संबंधीची सगळी कागदपत्रे तुमच्या समोर आहेतच. जर मी पर्यटक म्हणून अर्ज केला असता तर तो मान्य झाला असता असे तुमच्या संस्थळावरच्या माहितीवरून मला वाटले होते. तरीही मी प्रामाणिकपणे शिक्षण हे कारण देऊन अर्ज केला आहे. महाविद्यालयाच्या आमंत्रणाचे मूळ पत्रही जोडले आहे. आता तुमचा काय तो निर्णय मला शक्य तेवढ्या लवकर कळवा म्हणजे अभ्यासक्रमासाठी येता येणार आहे की नाही ते मला महाविद्यालयाला वेळेत कळविणे शक्य येईल." शेवटी "विचार करून काय ते कळवतो" असा मला 'हँगिंग गार्डनमध्ये' ठेवणारा निर्णय मिळून आमचे संभाषण संपले.

अर्थातच, पुढचे दोन दिवस अत्यंत विचित्र मन:स्थितीत गेले. आतापर्यंत व्हिसाचा असा काही अडथळा होऊ शकेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. सगळा बेत रद्द करण्याची मनाची तयारी झाली होती आणि इतर कुठल्या देशातल्या महाविद्यालयांचा पर्याय आहे ते पाहून झाले होते. त्यामुळे दुसर्‍या दिवशी संध्याकाळी जेव्हा व्हिसा एजन्सीचा फोन आला तेव्हा त्यात फारसा रस उरला नव्हता. पलिकडून "सर, तुमचा व्हिसा आला आहे. कधीही तुमच्या सोयीने पासपोर्ट घेऊन जा." असे शब्द ऐकले आणि त्याला परत एकदा सांग असे म्हणावे लागले ! त्वरीत एजंसीत जावून पासपोर्ट हातात घेऊन व्हिसा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आणि मगच सुटकेचा निःश्वास सोडला.

त्यानंतर मात्र काही गडबड न होता एमिरेट्स एअरलाईन्सने दुबईमार्गे शिशिरातल्या एका प्रसन्न गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास झ्युरिकच्या हॉटेलवर पोहोचलो.

===================================================================

झ्युरिककडे जाताना केलेल्या प्रवासातली काही प्रकाशचित्रे...


दुबई सिटी सेंटर मॉल ०१

.


दुबई सिटी सेंटर मॉल ०२

.


दुबई सिटी सेंटर मॉल ०३

.


दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ०१

.


दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ०२

.


दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ०३

.


दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ०४

.

(क्रमशः )

===================================================================

शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)

माझे मिपावरचे इतर लेखन...

===================================================================

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

26 Jun 2015 - 2:20 am | पद्मावति

वाह! सुरुवात फारच छान झाली आहे.
Switzerland चे शरद ऋतूमधील रूप जाणण्याची उत्सुकता लागली आहे.
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.

मुक्त विहारि's picture

26 Jun 2015 - 6:46 am | मुक्त विहारि

माझी सीट राखून ठेवा...

पुढल्या भागांची उत्सुकता वाढलीये!पुभालटा!

प्रचेतस's picture

26 Jun 2015 - 9:11 am | प्रचेतस

एकदम सुरेख.
पुन्हा एका अतिशय रम्य ठिकाणाची मेजवानी मिळणार.

श्रीरंग_जोशी's picture

26 Jun 2015 - 9:22 am | श्रीरंग_जोशी

एका नव्या स्थलवर्णन मालिकेची रोचक सुरुवात आवडली. नवं शिकत राहण्याची वृत्ती भावली.

एकुणच आजकाल मिपावर युरोपियन स्थलवर्णने छाउन जात आहेत.

उत्तर अमेरिकेत मोठ्या संख्येने मिपाकर राहत असूनही तेथील स्थलवर्णने मात्र अभावानेच येतात याची खंत वाटते...

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2015 - 5:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तर अमेरिकेत मोठ्या संख्येने मिपाकर राहत असूनही तेथील स्थलवर्णने मात्र अभावानेच येतात याची खंत वाटते...

खंत काय करताय, शेठ ? तुम्हीच प्राईम मुव्हर बनून सुरुवात करा ! मग इतरांनाही स्फुरण चढेलच की ! हाकानाका. :)

(आमची उत्तर अमेरिकेची सफर खूsssपच जुनी झाली आहे. त्यावेळी डिजिटल कॅमेरेही नव्हते त्यामुळे ते कागदी फोटो आता तांबूस झाले आहेत :) :( )

श्रीरंग_जोशी's picture

26 Jun 2015 - 6:00 pm | श्रीरंग_जोशी

अमेरिकेतली प्रवासवर्णनं लिहिण्याचा प्रयत्न करणार आहेच.

तुमचे इकडच्या जुन्या सहलींबाबतचे हे विचार पूर्वीही वाचले आहे. पुन्हा भेट द्या अमेरिकेला. ही भूमी कदाचित तेव्हाच्या तुलनेत आता गरीब झाल्याचे जाणवेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2015 - 6:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

इच्छा आहे. बघुया कसं जमतं ते.

ही भूमी कदाचित तेव्हाच्या तुलनेत आता गरीब झाल्याचे जाणवेल.
:)

विशाल कुलकर्णी's picture

26 Jun 2015 - 9:27 am | विशाल कुलकर्णी

झकास्स, पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

स्नेहल महेश's picture

26 Jun 2015 - 11:45 am | स्नेहल महेश

पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

मधुरा देशपांडे's picture

26 Jun 2015 - 12:52 pm | मधुरा देशपांडे

आधीच जिव्हाळ्याचा आवडीचा देश म्हणजे स्वित्झर्लंड, पुन्हा शरदातला, आणि तुमच्या सोबत. काय सगळं जुळुन आलंय. मेजवानी आहे आता. पुभाप्र.

यसवायजी's picture

26 Jun 2015 - 2:00 pm | यसवायजी

हजर.

आकाश कंदील's picture

26 Jun 2015 - 3:11 pm | आकाश कंदील

पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे. सुरवात तर झक्कास झाली आहे.

प्रमोद देर्देकर's picture

26 Jun 2015 - 3:32 pm | प्रमोद देर्देकर

आवडलं. आता पुढिल भाग लवकर येवु देत.

अविनाश पांढरकर's picture

26 Jun 2015 - 4:45 pm | अविनाश पांढरकर

पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

पैसा's picture

26 Jun 2015 - 5:29 pm | पैसा

मजा आहे आता! चलो स्विट्झर्लंड!

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jun 2015 - 9:34 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2015 - 5:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

पद्मावति, मुक्त विहारि, अजया, प्रचेतस, श्रीरंग_जोशी, विशाल कुलकर्णी, स्नेहल महेश, मधुरा देशपांडे, यसवायजी, आकाश कंदील, प्रमोद देर्देकर, अविनाश पांढरकर आणि पैसा : अनेक धन्यवाद !

स्वाती दिनेश's picture

26 Jun 2015 - 5:45 pm | स्वाती दिनेश

स्वीसला कितीही वेळा आणि कोणत्याही ऋतुत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जायला तयारच असते.. सुरुवात तर छानच झाली आहे.
पुभाप्र.
स्वाती

कल्पनाच छान आहे! झाडांचे विविध रंगी रुप पाहायला उत्सुक.

चिगो's picture

26 Jun 2015 - 10:40 pm | चिगो

झकास सुरुवात.. पुभाप्र..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Jun 2015 - 10:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

झक्कास सुरुवात झालेली आहे डॉक. येउंद्या पुढचा लेख भरभर :)

सानिकास्वप्निल's picture

27 Jun 2015 - 1:21 am | सानिकास्वप्निल

वाह !! वाह!! स्वीस अगदी आवडता देश, युरोपात पाहिलेला पहिला देश त्यामुळे बर्‍याच आठवणी आहेत जपलेल्या.
सफरीची सुरुवात मस्तं झाली आहे, वाचतेय :)
पुभाप्र.

स्रुजा's picture

27 Jun 2015 - 1:25 am | स्रुजा

झकास ! हर तरफ युरोप का जलवा हे आज काल ..मस्त वाटतंय.

प्रभाकर पेठकर's picture

27 Jun 2015 - 11:08 am | प्रभाकर पेठकर

सुंदर वर्णन आणि आकर्षक छायाचित्रांची लयलूट.
स्वित्झर्लंड आता शरदात पाहणे आले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2015 - 12:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्वाती दिनेश, जुइ, चिगो, कॅप्टन जॅक स्पॅरो, सानिकास्वप्निल, स्रुजा आणि प्रभाकर पेठकर : आपले सहलीत स्वागत आहे !