कथा वडगावच्या लढाईची...

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जे न देखे रवी...
27 Jun 2015 - 1:38 pm

ॐ नमो जी गणपतये
वरदमूर्ती प्रमथपतये
आरंभी नमून तुम्हाला
उभा शाहीर कवन गाण्याला
नमन तुज मयुरवाहिनी
वीणाधारी बुद्धीदायीनी
शाहिरावर कृपा करुनी
वाणी वरदान दे त्याला
नमन असो कुलदैवताला
म्हाळसाकांताला, बानू भरताराला
जेजुरी गडी जो बैसला
मर्दुनी मणीमल्लाला
नमन पुढे आराध्य देवाना
संत माउलीना आणि सत्पुरुषांना
विठोबा, ज्ञानबा, तुकारामाला
चोखोबा, सावता, नामदेवाला
नमन माझे भवानी मातेला
अंबाबाई, यमाई, रेणुकेला
आदिशक्ती जगदंबेला
वरदायिनी मातृदेवतेला
नमन माझे शिवबाला
संभाजी, बाजी, शाहूला
देशाचा मान ज्यांनी राखला
स्वरुज्या स्थापुनी धर्म राखला
नमन माझे गुरुमाउलीला
मातापिता, बंधू भगिनींना
वाढवूनी ज्यांनी पोसला
शिकवूनी दिले समजाला
नमन असो मराठी मातीला
रियासतीला आणि स्वराज्याला
स्वातंत्र्याचा झेंडा उभारला
तोंड देऊन फिरंगी, यवनाला

गद्य :

ही पेशवाईच्या उत्तर भागातली कथा आहे. पानिपतावर लाख चुडा फुटला आणि महाराष्ट्र देश बुडाला, मराठेशाही फुटली अशी कुजबुज सर्वत्र सुरु झाली. पेशवे हे छत्रपतींचे प्रधान. नानासाहेबांनी स्वतःच हाय खाली आणि मरण जवळ केले. राघोबादादाचा दरारा मोठा. पण सत्तेची हाव त्यांनी धरली आणि मसलत बिघडू लागली. अशा वेळी माधवराव पेशव्याने घनघोर प्रयत्न केले. आप्तांचा, मातब्बर घराण्यांचा विरोध मोडून काढत निझाम, हैदराला नमवले. पण दुर्दैवाने ते अल्पायु ठरले. थेऊर मुक्कामी त्यांनी देह ठेवला. रमाबाईंनी सहगमन केले. राघोबाला मनात नसताना सुद्धा नारायणरावाला गादीवर बसवावे लागले पण सत्तेचा मोह काही सुटला नाही…

पद्य :

राघोबा पुरुष जरी भारी
अटकेपार गेलेला जरी
मोहाने मती सारी
गेली हो लयाला
लागी दुर्जन संगतीला…

गद्य :

भोजनावळी उठवाव्या, नाटकशाळा सांभाळाव्या, लाळघोट्या लोकांना जवळ करून कपट कारस्थाने करावीत, कारभार अस्थिर कसा करता येईल याचीच उठाठेव करावी, पेशव्याला पाण्यात पहावे, त्याला परागंदा करून गादीवर स्वतः बसण्याचे बेत आखावेत यातच त्याचे दिवस जाऊ लागले.

पद्य :

सत्तेची हाव मनी पुरती बसली
गारद्यांशी दोस्ती केली
तीन लाखाची सुपारी दिली
धरायाची चिठ्ठी बदलली
नारायण मारला कपटाने….

गद्य :

नारायणराव पेशवा मेला, त्याचा खून झाला, शनिवारवाड्यात ब्रह्महत्या, स्त्री हत्या, गो हत्या झाली अशी बातमी आली आणि पुण्याचा थरकाप उडाला…

पद्य :

पुण्यनगरीचे पुण्य आटले
घडू नये ते सारे घडले
लोक सारे हळहळले
परी दाबावे कुणी कुणाला….

गद्य:

मातब्बर सरदारांनी मध्यस्थी केली. कशीबशी नारायणरावाची क्रिया झाली. नगरी शोकात बुडाली पण राघोबासारख्या निर्लज्जाला त्याचे काय?

पद्य :

राघोबा बसला गादीवरी
आनंदीस घेऊन बरोबरी
गारदी भोवती जशा घारी
गणिका भोवती नाच करती…

गद्य:

पुण्यातील अवस्था बाहेरच्या शत्रुना कळली तशी त्यांनी उचल खाल्ली. निझाम, हैदर नायकाने स्वराज्याचे लचके तोडणे सुरु केले. त्यामुळे राघोबाला त्यांच्यावर चालून जाणे भाग पडले…

पद्य :

यवने उत्पात मांडीला
दक्षिणेला मुलुख लुटला
राघोबाला चेव आला
सत्वर निघाला स्वारीला…

गद्य :

तेवढ्यात वाड्यात कुजबुज सुरु झाली. नारायणरावाची विधवा गंगुबाईला दिवस गेले. जो तो एकमेकाला विचारे, “कळले का, गंगुबाईला म्हणे डोहाळे लागले.” आणि आपण काय बोललो म्हणून चपापून गप्प होई. कारभाऱ्याना राघोबा नकोच होता. आता राज्याला वारस येणार म्हणाल्यावर त्यांनी उचल खाल्ली…

पद्य :

अंतपुरातून वार्ता पसरली
गंगुबाईची कूस उजवली
फडावर कारभारी मंडळी
खलबते करू लागली…
कारभारी करती धीर
नाना आणि बापू मुत्सद्दी थोर
संगे घेतले सरदार
बंड करून उठण्याला…

गद्य :

राघोबादादा पुण्याबाहेर असल्याने मंडळींचे फावले. त्यांनी हिकमतीने गंगुबाईला शनिवार\वाड्यातून सोडवले. रातोरात पालखी पळवली आणि गंगुबाई पुरंदर गडावर दाखल झाली…

पद्य :

राघोबा बेसावध सापडला
कारभाऱ्यानी जोर केला
वाड्यातून काढुनी गंगुबाईला
पळवले पुरंदर गडाला…

गद्य :

त्यानंतर वेळ न घालवता कारभाऱ्यानी गंगुबाईला दिवस गेल्याचे जाहीर केले आणि तिच्या पोटात वाढत असलेल्या गर्भाच्या नावे कारभार सुरु केला…

पद्य :

भावी वारसाचा डांगोरा पिटला
त्याच्या नावे कारभार केला
यथावकाश जन्म झाला
माधवराव नारायणाचा…

गद्य :

जन्माच्या चाळीसाव्या दिवशी त्या बालकालाच छत्रपतींनी पेशव्याची वस्त्रे दिली. सवाई माधवराव बाळाच्या नावे कारभारी कारभार करू लागले…

पद्य :

छत्रपतींशी संधान बांधले
बालकाला पेशवे केले
बारभाई पुढे ठाकले
कारभार करण्याला…
राघोबा मनी चरफडला
शेवटी तो एकटा पडला
घातले बहुत थैमानाला
तरी कोणी न जुमाने त्याला…

गद्य :

संतापलेल्या राघोबाने नागपूरकर भोसले, शिंदे, होळकरांना बरोबर घेऊन पुण्यावर स्वारी करायचे ठरवले. त्याने उत्तरेकडे परस्पर कूच केले…

पद्य :

कावेबाज राघोबा पलटला
उत्तरेला जाऊ लागला
सांगावा भोसले, शिंदे, होळकराला
पण कुठेच थारा नाही मिळाला…
लोभापायी मती गेली
इंग्रजांची संगत धरली
गर्भार आनंदी धारला टाकली
धाव घेई सुरतेला…
बहुत कपट आरंभले
दुष्मनाला सत्व विकले
राज्याला विकून खाल्ले
दास होई ताम्रांचा…

गद्य :

त्यावेळी कलकत्याला हेस्टीन्ग गव्हर्नर होता. त्याने कंपनीची सत्ता वाढवायची संधी हेरली आणि दुटप्पी चाल खेळली…

पद्य :

हेस्टिंग ताम्र बंगालात
बहुत करी हिकमत
पुरंदरी करी तह
राघोबा ठेवला मुंबईला…

गद्य :

फाटलेले दिसले की लोक बोटे घालतात. वाघ पिंजऱ्यात सापडला की सगळे त्याला खडे मारतात. तशीच अवघड अवस्था राघोबाच्या या गद्दारीमुळे पेशवाईची झाली…

पद्य :

इंग्रजांनी डाव साधला
राघोबा बरोबर घेतला
ताम्र जाळिती कोकणाला
बोरघाट ओलांडून आला…

गद्य :

इंग्रजांनी घाट मोठा घातला. उत्तरेकडून कर्नल लेस्ली पुढे सरसावला. त्याला शिंदे, होळकर, बाळाजी गोविंद यांनी तिकडेच अडवून ठेवला. काल्पीच्या लढाईत इंग्रज पाण्याला मोताद झाले. कर्नल पार्कर, मेजर फुलटर्न, कॅप्टन अॅश, कॅप्टन मार्क्स, कॅप्टन क्रॉफर्ड तडफडून मेले. इकडे राघोबादादा आणि त्याचा दत्तक मुलगा अमृतराव ५०० इंग्रज आणि दोन हजार शिपाई घेऊन बोरघाट चढून आले. त्या सेनेमध्ये कर्नल इर्गर्टन, कार्नक, मॉस्टीन हे सेनापती होते. रस्त्यात मॉस्टीन आजारी पडला म्हणून मुंबईला परतला तो तिकडेच मेला. इकडे पेशव्यांच्या बाजूने राघोबाचा सामना करायला सेना गेली. तिच्यामध्ये महादजी शिंदे, तुकोजी होळकर, सरदार पानसे असे मातब्बर खासे होते. सरदार पानसेंच्या तोफखान्यात मस्यु नोंरेन्हा नावाचा नामांकित फिरंगी गोलंदाज पण होता. कार्ला इथे लढाई झाली तेव्हा तिच्यात कॅप्टन स्टुअर्ट आणि कॅप्टन के तोफगोळ्याने मारले गेले…

पद्य :

पानसे, शिंदे, होळकर सरदार
स्वराज्याच्या रक्षणा तत्पर
कूच करिती सत्वर
धावले खंडाळ्याला…
बहुत भारी मराठा जुझला
पानशांनी गोळा फेकला
भाजून काढिती ताम्राला
जागीच मारून लोळवला…
मराठ्यांचा पाहून जोर
इंग्रजांचा सुटला धीर
मनी ज्याच्या असे चोर
कसा होई तो बळजोर…
पांढरे निशाण दाखवले
वडगावी तहाला बसले
राघोबाला पकडून दिले
पळत सुटले मुंबईला…

गद्य :

असा पुण्यप्रताप मराठी माणसांनी केला. त्यांची कवने गाण्यास शाहिराचा डफ कडाडला…

पद्य :

मराठी माणूस बहु थोर
सहसा त्याचा सुटे ना धीर
समोर येता शिरजोर
क्षणभर न सोडे त्याला…
कोरस :
स्वातंत्र्याच्या रक्षणाला सारे येत पुढती
जात धर्म विसरून होई एक मराठी माती ||

इतिहास

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

27 Jun 2015 - 3:33 pm | विशाल कुलकर्णी

वाह.. जियो दादा जियो ! दंडवत स्वीकारा _/\_

एस's picture

27 Jun 2015 - 3:38 pm | एस

वाहवा!

शाहिर! तोडलंत! खूप आवडला पोवाडा.

पैसा's picture

27 Jun 2015 - 3:41 pm | पैसा

खूप दिवसांनी असं काही वाचायला मिळालं! मस्त!

विकास's picture

27 Jun 2015 - 3:44 pm | विकास

मस्तच! पोवाडा आणि गद्य रुपांतर दोन्ही आवडले. सध्या जास्त चर्चिला न जाणारा इतिहास ताजा केल्याबद्दल धन्यवाद!

विवेकपटाईत's picture

27 Jun 2015 - 3:57 pm | विवेकपटाईत

मस्त पोवाडा, आवडला. अन्ग्रेजानी रचित इतिहास पुस्तकात केवळ पराजित राजांचा गौरव गान केल्या जातो. आणि विजेता भारतीयां हेतुपरस्पर वगळल्या गेले. स्वतंत्रते नंतर ही इतिहासात आपण बदल केला नाही. आज ही शाळेत आपण पोरस, महाराणा प्रताप यांची गाथा वाचतो. (एक हल्दी घाटीचे युद्ध, त्यात ही पराभव - दोन्ही पक्षाच्या सेनेचे बलाबल ही जवळपास समान होते) पण महान योद्ध बाजीराव पेशवा बाबत एक ही शब्द नाही.

पाषाणभेद's picture

28 Jun 2015 - 11:48 pm | पाषाणभेद

विवेकसाहेब बरोबर बोलत आहात. कालपरवाच भाचीचे सीबीएसी चे सातवीचे इतिहासाचे पुस्तक बघितले. भारताच्या अभ्यासक्रमात शिवाजीमहाराजांचे व् मराठी सत्तेचा नाम्मोलेखही नाही.

मस्त लिहिलय...पोवाडा आवडला

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jun 2015 - 5:59 pm | अत्रुप्त आत्मा

टाळ्या............

टवाळ कार्टा's picture

27 Jun 2015 - 7:35 pm | टवाळ कार्टा

भारी म्हणजे भारीच

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jun 2015 - 9:19 pm | कैलासवासी सोन्याबापु

पोवाड़े ऐकून छाताड़ी भट्टी पेटत नाही असा माणुस मराठी नाय असू शकत!!! आग लावलीत राव दादा तुम्ही

आदूबाळ's picture

27 Jun 2015 - 9:45 pm | आदूबाळ

वा ये बात!

सांगे वडिलांची कीर्ती... असलं तरी आमच्या पूर्वजांचा गौरवपूर्ण उल्लेख वाचून लय भारी वाटलं. बहुत आभार...

प्रसन्न केसकर's picture

28 Jun 2015 - 12:38 pm | प्रसन्न केसकर

कौतुकाबाबत सार्‍यांचे धन्यवाद!

मराठी साम्राज्याचा, हो साम्राज्याचाच कारण पेशवाईच्या उत्तरार्धापर्यंत ते भारताच्या बहुसंख्य भागात पोहोचलेले होते, इतिहास पाहिला तर राष्ट्रिय पातळीवर मराठा याचा अर्थ केवळ पेशवे किंवा कोणत्याही एका जातीचे लोक असा लावता येत नाही तर महाराष्ट्रातून भारतभर पसरलेले वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक असा लावावा लागतो. पेशवे, त्यांचे अन्य सरदार, नागपुरकर भोसले, शिन्दे, होळकर हे सगळे मराठाच.

वेगवेगळ्या जाती धर्माचे हे लोक एकत्र आल्यामुळेच मराठी साम्राज्य प्रस्थापित झाले. ही एकीकरणाची प्रक्रिया अगदी शिवछत्रपतींच्या काळापासून सुरु होती आणि त्याचे फळ म्हणून मराठी साम्राज्य भारतातील सर्वात प्रबळ ठरले. अर्थात या साम्राज्यात अनेक दोष होते. जुनाट दृष्टीकोन, बुरसटलेले विचार, शासक आणि त्यांच्या हस्तकांची विलासी वृत्ती, न्याय-अन्यायाच्या तत्कालीन संकल्पना, जनतेच्या कल्याणाकडे होत गेलेले दुर्लक्ष अशा अनेक गोष्टींमुळे हे साम्राज्य काही दशकांमध्ये कमकुवत होऊ लागले होते. त्याचमुळे इंग्रजांना भारतात आपले पाय रोवणे सोपे गेले.

सन १७५७ मध्ये इंग्रजांनी प्लासीची लढाई जिंकली तेव्हा आज ना उद्या ते भारताचा ताबा घेणार हे स्पष्ट झाले होते. त्यांच्या या घुसखोरीला पायबंद घालण्याची क्षमता तेव्हा फक्त मराठी साम्राज्यात होती. त्यामुळे प्लासीच्या लढाईपासूनच मराठी साम्राज्य आणि इंग्रज एकमेकांच्या सामोरे ठाकलेले होते. अशा वेळी मराठी साम्राज्याचा पाडाव झाल्यास आपलीही धडगत नाही हे निझाम, हैदर यांनाही उमजून चुकलेले होते.

बादशहाचा एक वंशज इंग्रजांच्या कच्छपी लागलेला, ठिकठिकाणच्या राजे-सरदारांनी स्वत:चा बचाव करून घेण्यासाठी इंग्रजांचे लांगूलचालन सुरु केलेले, अशा परिस्थितीत पेशवाईत जेव्हा दुफळी माजली आणि त्यातून नारायणराव पेशव्याचा खून झाला तेव्हा बारभाई पुढे आले आणि त्यांनी विस्कटलेली घडी सावरण्याचा प्रयत्न केला. अर्थात ते काही सर्वगुणसंपन्न पुरुष नव्हते. त्यांच्यातही अनेक दोष होते. पण त्यांच्या पुढाकारामुळे शिंदे-होळकर यांच्यासारखे फुटू पहाणारे सरदार पुन्हा एकत्र झाले हे नाकारता येत नाही.

या एकीमुळेच पुढे जेव्हा वडगावची लढाई झाली तेव्हा जात, धर्म, एकमेकांमधील वाद विसरून मराठी साम्राज्याचे सरदार एकत्र आले आणि त्यांनी इंग्रजांचा पाडाव केला. त्या लढाईमध्ये मराठ्यांचे संख्याबळ अधिक असले तरी इंग्रज अधिक शिस्तबद्ध होते, त्यांच्याकडे आधुनिक युद्धसामग्री होती, त्यांच्यामध्ये भारत जिंकण्याच्या पोटी आलेली जिद्द होती, राघोबादादा त्यांना मिळालेले असल्याने काही प्रमाणात त्यांच्या चढाईला नैतिक समर्थन मिळू शकत होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समोर उभ्या ठाकलेल्या मराठी सैन्याचा खरा नायक, सवाई माधवराव पेशवा बाल्यावस्थेत होता हे इथे विचारात घ्यावे लागते.

हे सगळे विचारात घेतले तर वडगांवची लढाई हा मराठी सैन्याने घडवून आणलेला एक महान चमत्कार होता असेच वाटते. या लढाईमध्ये मराठी सैन्याने आम्ही अद्यापही सर्वश्रेष्ठ आहोत हे सिद्ध केले. आणि त्याच विजयामुळे पेशवाई आणि मराठी साम्राज्य अजून काही दशके तरले.

अर्थात या लढाईनंतर मराठी लोकांमधील जुन्याच दोषांनी पुन्हा डोके वर काढले, त्यामुळे मराठी साम्राज्याचे विघटन अधिकच वेगाने झाले हे देखील तेवढेच खरे आहे. वडगावच्या लढाईमध्ये जी एकी दाखवली तशी एकी नंतरही दाखवली असती, त्यासाठी दुसऱ्या बाजीरावाने पुढाकार घेतला असता तरी कदाचित इंग्रजांचे भारतावर राज्य प्रस्थापित होणे अधिकच अवघड गेले असते. परंतु तसे तेव्हा तर झालेच नाही पण त्यानंतर देखील कधीच झाले नाही हे मराठेशाहीचे दुर्दैव.

ही एकी कशी गरजेची आहे, हा प्रचंड आत्मविश्वास कसा विजय मिळवून देतो हाच वडगावच्या लढाईतून मिळालेला वस्तुपाठ आहे. वडगावच्या लढाईचा खरा नायक ज्याचे त्यानंतर देव्हारे माजले. जो नवसाला पावतो असे आपण काही शतके समजलो तो इस्टुर फाकडा नाही तर एतद्देशीयांची ही एकी आहे. अर्थात याचा अर्थ असा नाही की आपण इस्टुर फाकडाची समाधी पाडून टाकावी. त्याने काहीच साध्य होणार नाही. त्याहून गरजेचे आहे ते आपण आपला आत्मसन्मान जागा ठेवून आपल्या इतिहासाचे नव्याने मंथन करून त्यातील चुका सुधारण्याची.

पैसा's picture

28 Jun 2015 - 9:15 pm | पैसा

प्रतिसाद आवडला!

विशाल कुलकर्णी's picture

29 Jun 2015 - 10:43 am | विशाल कुलकर्णी

पोवाड्याइतकाच माहितीपुर्ण प्रतिसादही. आवडलाच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jun 2015 - 1:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर पोवाडा !

फारएन्ड's picture

28 Jun 2015 - 8:07 pm | फारएन्ड

जबरी आहे!

पाषाणभेद's picture

28 Jun 2015 - 9:11 pm | पाषाणभेद

शाहीर जबरदस्त पवाडा हाणलाय बगा. लई दिसांनी आक्षी रोमांच आलेत आंगावर. लय भारी वाटलं आप्ल्या मातीचा पवाडा ऐकून. भले बहाद्दर !!

फेटा उडवीला बगा. ह्ये.......

रातराणी's picture

28 Jun 2015 - 9:13 pm | रातराणी

मस्त!!जमलं तर ऑडियो रेकॉर्डिंग करून टाका. :)

पाषाणभेद's picture

28 Jun 2015 - 9:18 pm | पाषाणभेद

आन सांगायचं र्‍हायलंच बगा. ह्यो पवाडा हाय. तवा वरलं नाव जरा बदला म्हंतो. 'पवाडा वडगावच्या लढाईचा' आसं नाव ठ्येवा आन खाली
"असा पुण्यप्रताप मराठी माणसांनी केला अन त्यांची कवने गाण्यास शाहिर प्रसन्न लिवता झाला जी जी जी जी जी जी…"
आसं ल्ह्यिहा की!!!

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jun 2015 - 10:02 pm | अत्रुप्त आत्मा

कचकुन+++++१११११ टू भेदकपाषाण!

एस's picture

28 Jun 2015 - 11:35 pm | एस

दणकून +++++++++++११११११११

झकासराव's picture

29 Jun 2015 - 11:53 am | झकासराव

खणखणीत पहाडी आवाजात पोवाडा ऐकल्याची अनुभुती आली वाचताना. :)

एक एकटा एकटाच's picture

29 Jun 2015 - 12:44 pm | एक एकटा एकटाच

ख़ास अनुभव

आजवर पोवाडा ऐकला होता आज तुमच्यामुळे तो वाचायला ही मिळाला

ह्याबद्दल धन्यवाद्

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Jun 2015 - 2:36 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह बरेच दिवसानी प्रसन्नदा लिहीते झाले. छान पोवाडा प्रसन्नदादा.

मुक्त विहारि's picture

29 Jun 2015 - 2:43 pm | मुक्त विहारि

दोन्ही आवडले.