म रा.वि.म.मं. मधील एक दिवस

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
26 May 2015 - 5:52 pm

नेहमी प्रमाणे लोकलचे धक्के खाउन स्टेशनवर उतरलो आणि हुश्श केले. बुधवार असल्यामुळे अजून दोन फक्त दोन दिवस रेटायचे आहेत त्यातच बॉस नामक प्राणी दोन दिवस गायब असणार आहे ह्या सुखद कल्पनेमध्ये डुलत डुलत घरी आलो. घरी येताना आजूबाजूचा परिसर थोडा वेगळा वाटला खूप काहीतरी मिसिंग असल्यासारखे वाटले नंतर लक्षात आले. वीज नामक गोष्ट जी नित्यानेमाने सगळ्या घरात आपली उपस्थिती लावत असते ती गायब आहे( हाय मेरी फुटी किस्मत !) आता मेणबत्ती शोधण्यापासून सुरुवात करावी लागणार ह्याची मानसिक तयारी केली. पण म. रा . वि. म. मं. ने एक सुखद धक्का दिला घरी पोचायच्या आत वीज आली(?). चला सुटलो म्हणत घरी पोचलो …. दाराला अडकवलेले विजेचे बिल मिळालं आणि दुसरा धक्का बसला. रु. ५७००/- फक्त. चुकून एक शून्य जास्त वाचले असावे अशी स्वतःची समजूत काढत मी ते बिल परत वाचले अगदी एकम दशम शतम सहत्र करत पण बिल जैसे थे होते तेव्हा खात्री पटली. खरच एवढे (??) बिल आले आहे.

आता पुढचा प्रश्न होता की बिल पडताळून पाहणे. जरा फ्रेश होऊन चहा घेतला म्हणजे डोक्याला तरतरी आली. मग सगळी मागची बिलं काढून चेक केली. सगळी सरासरी बघत एवढे बिल एका महिन्याचे येणे शक्य नव्हते. म्हणून लगेच म.रा.वि.म.मं. च्या ऑफीस मध्ये फोन लावला पलीकडून उत्तर आले नाही साहजिक आहे दिवस ढवळ्या वाजणारा फोन जिथे कोणी उचलत नाही तिथे ७.३० ला रात्री केलेला फोन कोण उचलणार ?? तो फोन ही बिचारा सामान्य माणसासारखा बोंबलून बोंबलून गप्प बसला.

नेहमी प्रमाणे दुसरा दिवस उजाडला ऑफीसमध्ये पोचल्या पोचल्या म. रा. वि. म. मं. च्या ऑफीस मध्ये फोन लावला सगळी साठा उत्तराची कहाणी वाचली आणि उत्तराची अपेक्षित वाट बघताना समोरून हॅलो…हॅलो… काहीही ऐकू येत नाहीये असे म्हणणारा आवाज मला मात्र स्पष्ट ऎकु आला. परत वरील गोष्टी न चिडता, अति शांतपणे करून पाहिल्या, झाला तर आपल्याच फायदा ना !! पण म. रा . वि. म. मं. च्या कर्मचार्यांना ते मान्य नव्हते तर.. आता म. रा.वि. म. मं. च्या ऑफीस वर स्वारी करण्यापलीकडे काही मार्ग शिल्लक नव्हता. मिशन होते म.रा.वि.म.मं. चे ऑफीस... लगेच उद्याच्या रजेचा अर्ज खरडला.

दुसरे दिवशी सकाळी १० वाजता म. रा. वि. म. मं. च्या ऑफीस मध्ये पोचलो. बरीचशी मंडळी यायला अजून अवकाश होता असे समजले. तेवढ्यात वेळेचा सदुपयोग करत अमृतपान (चहापान उगाच नसते अर्थ काढायला नको म्हणून हा खुलासा) करून आलो. तोपर्यंत १०.३० झाले होते. म.रा.वि.म.मं.चा कर्मचारीगण मुंगीच्या पावलाने ऑफिस मध्ये शिरत होत(घरीं जाताना मात्र सगळे सश्याला ही लाजवतात हो). चौकशीच्या खिडकीमध्ये डोकावून माझी राम कहाणी सांगितली. त्या बाईनी "अजून वर्मा साहेब आले नाहीयेत हो…!!" असे त्रासिक आवाज कपाळावर जमेल तेवढ्या आठ्या चढवून काढला . मी ही बर म्हणत बाजूला जाऊन बसालो. एव्हाना ११. ३० होत आले तरी साहेबाचा पत्ता नव्हता. मग हळूच सरकारी सुरक्षा रक्षकाला विचारले त्यावर त्याने छान स्माईल दिले आणि म्हणाला "वर्मा साहेब आलेत तळमजल्याला हायेत जावा तिथं" तळमजला अलीबाबाच्या गुहेसारखच होता त्यात वर्मा नावाचे वेगवेगळ्या डीपार्टमेन्टचे ३ साहेब होते. आपले तारणहार शोधण्यास अर्धातास खर्ची घालावा लागला. तो पर्यंत घड्याळात १२ वाजून गेले होते. सध्याचे बिल मागचे बिल एकूण घरातील विजेची उपकरणे ह्याचा तपशीलवार अभ्यास केला आणि म्हणाले वरच्या मजल्यावर दत्ता क्लार्कना भेटा आणि प्रोब्लेम सांगा. मग परत आमची स्वारी पहिल्या मजल्यावर आली तिथे "दत्ता क्लार्क कुठे बसतात?" असे विचारले त्यावर "ह्याच ऑफिसमध्ये" असे सुंदर उत्त्तर आले. मग मात्र संयम सुटला आणि परत हीच गोष्ट थोडी आवाज चढवून विचारली आणि मात्रा लागू पडली आणि बरोबर उत्तर आले. मग दत्ता क्लार्कचा मिळालेला पत्ता शोधत तिथे पोचलो माझ्या आधीच बरेच जण दत्ता साहेब कामाला कधी सुरुवात करणार ह्याची वाट बघत होते. फायनली माझा नम्बर आला सगळी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार केल्यावर "तुमचे रीडिंग ह्या महिन्यात जास्त कसं पडलं हो?" असे मलाच विचारले. ह्यापुढे मी खरचं स्पीचलेस झालो. तरी आपले म्हंटले," म्हणूनच साहेब सुट्टी टाकून सकाळपासून आज इथं थांबलोय नं " त्यावर साहेब," बरं बरं… मीटर चेक करावं लागेल तसं ते बिल कमी व्हायचं नाई . १५०/- रु भरा तिथं म्हणजे माणसं येतीलं अन मीटर चेक करतील मग बघू नं बिलाचे काय करता येईल ते" "म्हणजे! मला आधी बिल भरावे लागेल?" इति मी. " हो नं मग मी काय सांगून राहिलो तुम्हाले " असे म्हणून तो माणूस उठला आणि लंच टाईम झाला म्हणून चालता पण झाला. आता मात्र डोक गरगरायला लागले होते. सगळे बजेट कोलमडणार होते पण आपण पैसे का भरायचे हाच एकच प्रश्न मनात येत होता. सध्या तरी सगळे ऐकण्य़ा शिवाय पर्याय नव्हता. मग मीही खाली जाऊन पोटात काहीतरी ढकलून आलो. लंचटाईम संपल्यावर रु १५०/- पण भरले. त्याची रीतसर पावती घेतली

तासभरानंतर दत्ता साहेब उगवले परत समोर मला बघून इकडे तिकडे वेळ काढायला लागले शेवटी निर्लज्जासारखी मीच हाक मारली आणि "आता ह्याचे पुढे काय करू ?" असा सवाल केला. माझ्याकडे न बघता माझ्या हातातले बिल हिसकउन घेतले मीटर रीडिंग च्या ठिकाणी faulty असे लिहून ४३१ असा आकडा टाकला आणि म्हणाले जा आता वर्मा साहेबाना दाखवा. माझी वरात परत वर्मा साहेब शोधत हिंडायला लागली. एव्हाना पहिल्या मजल्यावर सगळ्यांना माझ्या प्रोब्लेम ठाऊक झाला होता त्यामुळे प्रत्येकजण मला वेगवेगळे सल्ले देत होता. ह्यावेळेस मला वर्मा साहेब दुसऱ्या मजल्यावर सापडले. म्हंटले सुटलो बुआ आता काही तरी सोक्षमोक्ष लागेल पण कसलं काय नि कसलं काय? त्यांनी फक्त पहिले आणि average रीडिंग आण म्हणाले आणि परत मला दत्ता बुआंकडे पिटाळले. परत तोच मख्ख चेहऱ्याने दत्ता साहेब बोलते झाले, " आधी सांगायचे नां average रीडिंग हवाय म्हणून.." मी म्हणालो "मला माहित नाही कोणी काही विचारले तर सांगत सांगत नाही आणि सांगितले तर ऐकत नाही ह्यावर मी काय करावे असे तुम्हाला वाटते?" मग त्याला माझी थोडी(च ?) दया आली आणि म्हणाला, "वर्मा साहेबाच्या हातात काही नाही हो…. आता हे त्यांना नेउन दाखवा आणि फक्त सही घ्या मग हे बिल राठोड साहेबाना दाखवा आणि बिलात सुट मिळते का ते बघा. तेच काय ते करू शकतात" दत्ता बुआंना मनापासून धन्यवाद देऊन वर्मा साहेबांची सही घेऊन राठोड नामक प्राण्याला शोधायला निघालो.

साहेबांची केबिन अगदी पटकन सापडली पण… ह्या पण ने परत घोळ घातला. साहेबच जागेवर नव्हता. परत वाट पाहणे नशिबात आले. जवळ जवळ तासाभाराने साहेब आले लाईनमनला अपघात झाल्यामुळे बाहेर जावे लागले असे आम्हास उद्देशून म्हणाले. (किती सुदैवी जीव होतो आम्ही तेव्हा तो साहेब आम्हाला स्पष्टीकरण देत होता) सुदैवाने त्या रांगेत मी प्रथम असल्यामुळे लगेच मी आत गेलो आणि पुन्हा एकदा आपली रामकहाणी सांगितली. बिल निट तपासून झाल्यावर मीटर चेकिंगचे पैसे भरले का विचारले आणि परत एकदा दत्ता क्लार्कला पाचारण करण्यात आले. (ह्यावेळी मात्र दत्ता साहेब किती फास्ट चालू शकतात आणि किती शांतपणे गोड बोलू शकतात हे मला समजले) १० मिनिटे कामासाठी खल, १० मिनिटे अवांतर चौकशी आणि बरीचशी आकडेमोड केल्यावर रु २३६०/- भरा असे सांगितले आणि वर मीटर चेक केले कि बघू काय करायचे ते असा शेरा आला.

सध्या तरी मी ते बिल ठेऊन दिले आहे कारण अजून माझ्याकडे काही दिवसांचा अवधी आहे पण ज्यांचे हातावर पोट आहे त्यांनी काय करावे? ज्यांची दर महिन्याला हातातोंडाशी गाठ पडते त्यांनी काय करावे? अशा वेळी सरकारी नियंत्रणा किती आणि कशी कुचकामी ठरत आहे हे दिसून येते. मीटर सदोष आहे हे कळण्यासाठी संपूर्ण दिवस खर्ची घालावा लागतो. सरकारी बाबू कसे वेळ काढतात आणि त्यामुळे रेंगाळणारी सरकारी कामे ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

ता. क. = मिपावर लेखनाचा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे कच्चा लिंबू समजून आउट झाल्यास राज्य घ्यायला लावू नये

समाजअनुभव

प्रतिक्रिया

लालगरूड's picture

26 May 2015 - 6:52 pm | लालगरूड

:)) आवडले

खेडूत's picture

26 May 2015 - 6:59 pm | खेडूत

छान अनुभव कथन ,
आतां शेवटी काय झाले - यातून कसे बाहेर आलात, प्रक्रिया कशी असते - ते प्रतिसादात लिहा.

कदाचित अतिरिक्त बिल तुमच्या पुढच्या बिलातून कमी केले असे दाखवतील - त्याचबरोबर नव्या मीटरचे पैसे तीन चार महिने हप्त्याने तुमच्याकडून वसूल करतील. किंबहुना त्यासाठीच हा जास्त बिलाचा खटाटोप असेल ! अन्यथा साहेब बसल्या जागी बिल कमी करू शकत असेल तर महानच म्हटला पाहिजे.

सेम प्रॅाब्लेम मला जुलै २०१४ ला आला साडेपाच हजार बिल आले .मी तक्रार करण्यास गेलो नाही.बिल लगेच भरून टाकले.पुढच्या महिन्यांत पंधराशे,नंतर हजार वगैरे आले तीबिलेही भरली.अॅाक्टोबरचे शुन्य आल्यावर मराकडे अर्ज घेऊन गेलो.आमच्या एअरिआचे भव्य दालन पाहून चाट पडलो.पुढेच असलेल्या रिसेप्शनिस्टने "काका काय काम आणलेत?"उत्तर देइपर्यंत एक तरूण एंजिनिअर लगबगिने विचारू लागला"काय करू तुमच्यासाठी?"बिल दाखवून आताचे शुन्य आले हे सांगितल्यावर "इथेच थांबा" सांगून बाजूच्या क्लार्क तरुणीला माझे बिल हिस्टरी चेक करायला सांगितली.तिने पाच मिनीटात अॅवरेज काढून जुलैपासूनची रकम क्रेडिटला टाकली देखील.माझ्या अर्जाच्या कॅापीवर शिक्का मारून दिला.दहा मिनीटात माझ्यासमोरच काम झाले.पुढच्या महिन्यात माझे मिटर बदलून टाकलेले आढळले.दहा महिन्यात क्रेडिट वळते झाले .हा माझा अनुभव मला अगत्याने द्यावासा वाटला तो तुमच्या लेखामुळे देता आला. बिल एअरिआ 4720-dombivli

चौथा कोनाडा's picture

26 May 2015 - 9:01 pm | चौथा कोनाडा

व्वा, फारच छान अनुभव ! असे काही अनुभवले की सुखद धक्क्याने गांगरुन जायला होते. काही सरकारी आस्थापनान्मध्ये नविन पिढी या बाबतीत कार्यतत्पर आहे ! अचछे दिन दूर नाहियत असे जाणवते.

एस's picture

26 May 2015 - 10:40 pm | एस

असाच चांगला अनुभव एका तरुण इंजिनिअरचा आला. आमचं अचानक वाढलेलं बिल त्याने लगेच अ‍ॅव्हरेज करून कमी करून दिलं. पण अर्थात अजूनही सरकारी खात्यांना बराच टप्पा गाठायचा आहे.

बबन ताम्बे's picture

27 May 2015 - 12:05 pm | बबन ताम्बे

कंजूसरावांनी बिनबोभाट आधी वाढीव बिल भरले आहे. ते पण सलग तीन महीने. एखाद्या जवळ नसतील एव्ह्ढे पैसे तर त्याने काय करायचे?
आतापर्यंत म.रा.वि.म., कॉरपोरेशन (रीसेल फ्लॅटच्या मिळकतकरावर स्वतःचे नाव लावणे , तसेच वीज मीटर वरचे नाव बदलणे) , दस्तऐवज नोंदणी विभाग ( वरचे पैसे द्यावेच लागतात),आर.टी.ओ, ट्राफिक पोलिस्/इन्स्पेक्टर, बी.एस.एन.एल. या सरकारी विभागांशी/लोकांशी संबंध आला. एकजात सगळे ........

खटपट्या's picture

26 May 2015 - 7:06 pm | खटपट्या

पहील्याच प्रयत्नात चांगले लीहीले आहे. लेख आवडला. जास्त बिलाची चौकशी करण्यासाठी वेगळी खीडकी कींवा वेगळा लिपिक्/टेबल असावे.

४ वर्षापुर्वी असाच भयानक त्रास या प्राण्यांनी दिला होता,शेवटी त्यांच्या ज्युनियर इंजिनियरचा साग्रसंगित सत्कार करावा लागला,पहिल्यांदा माझ्या कडुन नंतर स्थानिक आमदारसाहेबांनी आणी शेवटी खात्यातला एक्झुकिटीव इंजिनियरने,त्यानंतर मात्र परत थोडाजरी काही प्रॉब्लेम आला की धावतपळत प्रश्न सोडवतात.

योगी९००'s picture

26 May 2015 - 7:42 pm | योगी९००

छान अनुभव कथन ...!!

तुम्ही अतिशय छान आणि मुद्देसूद लिहिले आहे. कित्येक सरकारी कार्यालयात असेच अनुभव येतात, आपण कितीही चिडलो, वैतागलो तरी कामे त्यांच्याच गतीने (?) होतात. आणि खरंच इतके पैसे एकत्र भरायला लागणे वाईटच.

हे सगळे रामायण केलेय आम्हीही. वैताग असतो. :(

चौथा कोनाडा's picture

26 May 2015 - 9:06 pm | चौथा कोनाडा

छान लिहिलेय. डोळ्यापुढे तंतोतंत उभे राहिले.

आमचेही अनुभव डोळ्यापुढे तरळुन गेले.
मराविमच्या वीजबील अन त्यातल्या दुरुस्त्या यांच्या अनुभुतीने मी अध्यात्मिक झालो तो कायमचाच !

पैसा's picture

26 May 2015 - 10:20 pm | पैसा

चांगलं लिहिलंत. बिल जास्त आलं की विलेक्ट्रिसिटी बोर्डात जाऊन बदलून आणणे हे आमच्याकडे नेहमीचंच आहे. केवळ तेवढ्यासाठी माझ्या नवर्‍याने व्ही आर एस घेतलीय अशी मला कधी कधी शंका येते! =))

उगा काहितरीच's picture

26 May 2015 - 11:47 pm | उगा काहितरीच

मराविम चा एक अतिशय बेकारा अनुभव आहे . पण इथे सभ्य भाषा वापरावी लागते त्यामुळे नाही लिहीता येणार.

मी जाऊंन चौकशी केली. तर आमच्या मालकानेच काहीतरी गड़बड़ केलेली. मीटर त्याचे नावाने कॉमन आहे. ३०० च्या आतच बिल असायचे. नवीन सेपरेट मीटर दया म्हणालो तर म्हणाले आधीचे बिल भरा.
शेवटी ३५०० हजार भरले. मागचे सेटलमेन्ट आणि नवीन मीटर चार्जेस.
वायरमनला ४०० दया म्हणाले. पावती फक्त १२०० ची.
काय करणार पटत नाही पण कुणाकुणाविरुद्ध भांडणाऱ्?

कंजूस's picture

27 May 2015 - 5:45 am | कंजूस

बिल जास्त
१) (५० टक्के )येण्याची कारणे आणि
२)अचानक अशक्य भरमसाठ येणयाची कारणे-

प्रकार एक-
-फ्रिझरमध्ये आइस्क्रिम वगैरे सेट करण्यासाठी सेटिंग वाढवलेले असते/असल्यास काम झाल्यावर एक दोन दिवसांनी कमी करायला विसरणे. खूप जाड बर्फाची लादी झालेली असते.

-गिजर एक दोन वर्षे जुना झाला आहे का? आतल्या भागात जाड क्षाराचा थर बसलेला असेल.

-इस्त्री आणि माइक्रोवेव अवनचा वापर वाढवला आहे का?
-वॅाशिंग मशिनमध्ये मोटर स्लो झाली आहे का?

-फ्रिजचा दरवाजा नीट लागत नाही का?

प्रकार दुसरा

-बिलाचे गणित साधे सरळ नाहियै .युनिटसचा वापर एक टप्पा ओलांडला की वेगळाच गुणाकार होत असतो.शंभर एकशेवीस युनिटस वापर झाला की बिल साडेसहाशे सातशेच्या आसपास दाखवते परंतू दोनशे युनिटसचे दोन हजार येते.नंतर पुढे पाचशेलापण गुणिले दहा पाच हजार येते. याचा अर्थ एकशेवीस दिडशे वापर आणि दोनशे येथे मोठा फरक(उडी) मारली जाते.

-काही मिटरसमध्ये अजुनही युनिटसचा वापर फिरणाय्रा दातेरी चक्राने होतो. ती चक्रे खराब होतात आणि एक दोन गियर जंप मारून मोठा आकडा दाखवतात(खोटा आकडा),यास इलेक्ट्रेक टेस्टिंग केल्यावर दोष लगेच दिसत नाही.पाच सहा महिन्यात एक दोन विचित्र वापर दाखवू लागले की खात्री होते।ही असली मिटरस बदलण्याचे काम जोरात सुरू आहे. आताची संपूर्ण electronic यंत्रे बसवत आहेत.

रोचक अनुभवकथन!पुढे काय झाले?

श्रीरंग_जोशी's picture

27 May 2015 - 8:07 am | श्रीरंग_जोशी

मराविम चे विभाजन होऊन महानिर्मिती, महापारेषणमहावितरण या कंपन्यांची निर्मिती झाली या गोष्टीला एक दशक उलटून गेले आहे. ग्राहक म्हणून आपला संबंध महावितरणबरोबर येतो.

मराविम वाचून मन जुन्या काळात गेलं...

सस्नेह's picture

27 May 2015 - 10:35 am | सस्नेह

तसेच लोकलच्या संदर्भावरून हा किस्सा मुंबई किंवा संलग्न भागात घडला असे वाटते. या भागात महावितरण नसून वेगवेगळ्या खाजगी कंपन्या वीज वितरण करतात.

प्रीत-मोहर's picture

27 May 2015 - 8:55 am | प्रीत-मोहर

छान लिहिताय शि बि आय. लिहिते रहो

पहील्या प्रयत्नात चांगले लीहीले आहे.आवडले!

फारच धावपळ केलीत हो अगदी विद्युतवेगाने…. चांगलंय ….

आता घरातली उपकरणे सांभाळून वापरा …. (नाहीतर हूक/ आकडा कसा टाकायचा ते शिकून घ्या !!)

mseb चे विभाजन झाल्यापासुन परिस्थीती बरीच सुधारली आहे.
कस्टमर केअर चांगले काम करते..
काही अडचण आल्यास टोलफ्री क्र.180023333435 वर कॉल केल्यास काम बर्यापैकी मार्गी लागते.
*मी mseb त काम करत नाही.

मदनबाण's picture

27 May 2015 - 11:02 am | मदनबाण

हा असाच त्रास अनुभवला हाय ! ही बाबु मंडळी लयं माजली आहेत ! एकेकाला कामचुकार करण्यात पीएचडी प्रदान करुन कायम स्वरुपी कामावरुन रजा देण्याची व्यवस्था शासनाने केली पाहिजेत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kehdoon Tumhen... :- DJ Aqeel

अनुप७१८१'s picture

27 May 2015 - 12:08 pm | अनुप७१८१

तो फोन ही बिचारा सामान्य माणसासारखा बोंबलून बोंबलून गप्प बसला.

अप्रतिम वाक्य् !!!

महावितरणच्या ऑफिसबाहेर सध्या मोठे दगड दिसत नाहीत. कारण काय असावं बरं?

अजुन राहिलाच गेलो नव्हतो आणि ४-५ युनिटचे बिल हजार रुपयाच्या वर आलेले.
असेच इकडे तिकडे चकरा मारुन कमी करुन घेतले.
नीट माहिती सांगितल्यास ३० टक्के टिडीएस अधिक सरचार्ज लागेल ह्या भितीने बहुतेक एकाच वेळी सर्व माहिती देत नाहीत.
१० मिनिटाच्या कामाला दिड तास लावलेला.

शि बि आय's picture

27 May 2015 - 4:39 pm | शि बि आय

धन्यवाद मंडळी !

अजूनही हातात बिल घेऊन बसलो आहे
कधी बिलाकडे पाहत तर कधी पाकिटाकडे पाहत
रोजचा दिवस ढकलतो आहे
जमेल तेवढा बिल भरायला लेट करून
म. रा. वि. म. मं. वरचे उट्ट काढत आहे !!!

मुक्त विहारि's picture

27 May 2015 - 10:43 pm | मुक्त विहारि

जास्त वाट न बघता, आधी बिल भरलेत तर उत्तम.

माझे घडलेले उदाहरण चर्चेसाठीच दिले आहे .नशिबाने लवकरच साथ दिली आणि जास्ती रकमेची बिले येत राहिली नाहीत. शुन्य वापरही लवकरच छापून आला .माझे आठ हजार अडकले पण निर्णय लवकर झाला.
१) बिलाची रकम कमी करण्याचा अधिकार कोणत्याच कर्मचाय्रास नसतो;
२)एखाद्या आमदार सोडा नगरसेवकालाही वजन टाकायला सांगण्याएवढी माझी वरपर्यंत ओळख नाही.शिवाय टाकलेले वजन नंतर तो नेता परत उचलायला येण्यायोग्य माझ्याकडे काही नाही.त्यामुळे गपचुप बिले भरून टाकली होती.

जयन्त बा शिम्पि's picture

28 May 2015 - 5:55 am | जयन्त बा शिम्पि

लेख वाचला , पन "शि बी आय " म्हंजे " Central Bureau of India " की " Central Bank of India " हे नाही समजले ब्बा !!
मी स्वत: म रा वि मं त " कनिष्ठ अभियंता " या पदावर धुळे येथे , देवपुर भागात , पंचवटी युनिट ला काम करीत असतांना घडलेला किस्सा . मी कार्यालयात साधारणपणे घरातील कोठले उपकरण , किती तास वापरले , तर किती युनिट वीज वापरल्याची मीटरवर नोंद होते , याचा एक तक्ता , सर्वांना ठळकपणे दिसेल अशा रितीने लावून ठेवलेला होता. उदाहरणार्थ ४० वॅट ची ट्युब नळी २५ तास सुरु ठेवली तर , १००० वॅट म्हणजे १ युनिट ची मीटरवर नोंद व्हावयास हवी. मी एका वीजग्राहकास , मीटर बन्द असल्याने ,२०० यूनिटचे सरासरी बिल , मागील वीज वापरण्याच्या नोंदी पाहून लावले होते. त्या दिवशी , मी अर्धा तास कार्यालयात उशीरा पोहोचलो. तक्रारदार वीजग्राहक, माझ्याही अगोदर येवून बसले होते. बसल्या बसल्या , ग्राहकाने , त्याच्या घरातील उपकरणांचा वापर व तास यांचा गुणाकार करुन , एका महिन्यास फक्त ९० युनिट चा वापर काढून , कागदावर तयार ठेवला होता.ग्राहक शेतकी महाविद्यालयात प्राध्यापक या पदावर काम करीत होते
माझ्यासमोर त्यांनी कागद सरकविला , आणि ' त्या ' ( म्हणजे तक्त्याच्या हिशोबाने ) नुसार बिल कमी करुन देण्याची मागणी करु लागले, त्यांनी नेमकी कोणती चुक केली होती , हे माझ्या चटकन लक्षात आले. मी सरळ पेन काढला आणि
९० गुणिले २ = १८० युनिट्स असे उत्तर काढून , कागद त्यांना परत दिला. त्यांचा " वासलेला ' ऑ ' , मिटायच्या आत मी म्हटले , " अहो महाशय , हे बिल दोन महिन्यांचे आहे, म्हणून १८० युनीट्स ची सरासरी लावली आहे , ती काही फारशी जास्त नाही, भरुन टाका बील " , पण माझे वाक्य संपण्यापुर्वीच वीज ग्राहकाने कार्यालय सोडले होते ,

बाबा पाटील's picture

28 May 2015 - 1:27 pm | बाबा पाटील

तुम्हाला काय वाटतय तुमचे अभियंते आणी वायरमन/लाइनमन खुपच प्रामाणिकपणे काम करतात ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 May 2015 - 2:32 pm | राजेंद्र मेहेंदळे

मागच्या महीन्यात एमेसीबीचा कोणतरी लाईनमन आला आणि आमचे वीज कनेक्शन कापुन गेला.आम्हाला पत्ताच नाही.गुरुवार असल्याने मला वाटले नेहमीप्रमाणे दुपारनंतर लाईट येतील.संध्याकाळ झाली तरी लाईटचा पत्ता नाही. आणि शेजारी पाजारी विचारले तर म्हणे आज दिवसभर लाईट आहेत की....
मग ऑनलाईन तक्रार केली, ई मेल टाकला, कॉल सेंटरला फोन केला. तर म्हणे तुमचे बिल थकले आहे. मी त्याला परोपरीने सांगितले की बाबा तुमचीच वेबसाईट म्हणतेय की बिल बाकी नाही.मी वेळोवेळी बिल भरतोच पण कधीकधी सहाएक महीन्याचे अ‍ॅडव्हान्स पण भरतो.
मग तो म्हणे की तुमच्या वॉर्डातील ऑफिसमध्ये विचारा.मग बायकोची सटकली आणि ती वॉर्ड ऑफिसमध्ये भांडायला गेली. तिथे तो लाईनमन भेटला. त्याला सगळी कहाणी ऐकवली आणि काय.........
तो म्हणे की अहो मी चौथ्या मजल्यावरचे कनेक्शन कापायला आलो होतो..चुकुन तुमचे कापले.आता येउन नीट करुन देतो.
म्हणजे चुकी ह्या XXX ची आणि दिवसभर त्रास आम्ही सोसला. आता बोला.

शि बि आय's picture

28 May 2015 - 4:51 pm | शि बि आय

लेख वाचला , पन "शि बी आय " म्हंजे " Central Bureau of India " की " Central Bank of India " हे नाही समजले ब्बा !!

ह्यापैकी कोणाचेच एवढे सुदैव नाही की आम्ही तिथे सेवा पुरवावी. असो…
मु.वि. आणि कंजूस ह्याच्या सांगण्यानुसार शनिवारी बिल भरणे हा कार्यक्रम योजला आहे.

जयन्त बा शिम्पि's picture

29 May 2015 - 12:42 am | जयन्त बा शिम्पि

बाबा पाटील, माझ्या ' मुर्दाड ' या शिर्षकामध्ये मी जी घटना लिहिली आहे , त्यात मी स्पष्ट्पणे लिहिले आहे कि ' वरकमाइ '
ही वीज मंडळात असतेच , फक्त सगळेच तसे नसतात एव्हढे लक्षात असु द्या