माझी इटलीची भ्रमणगाथा - भाग ४ -सोरेंतो,काप्री-ब्लू ग्रोटो

अजया's picture
अजया in भटकंती
24 May 2015 - 10:54 pm

भाग १, भाग २, भाग ३

पॉम्पेहून परतताना सोरेंतो नावाच्या गावाला भेट आहे एव्हढाच पर्यटन संस्थेच्या माहितीपत्रकात उल्लेख होता.त्यामुळे,उगाचच प्रेक्षणिय स्थळांची नावं वाढवायला हे सोरेंतो टाकलंय असा माझा समज होता.पण बसने एक वळण घेतलं आणि अनपेक्षितपणे सोरेंतोचा देखणा देखावा समोर आला.मागे वेसुवियस पाठराखणीला.भुमध्य समुद्राचं निळंशार पाणी आणि समुद्रात घुसणारं बंदराचं टोक.जाताना लिंबाच्या आणि संत्र्याच्या मोठमोठ्या बागा लागत होत्या.संत्री तर रस्त्याच्या कडेलाही झाडांना लगडलेली होती.तीही भलीमोठी!ती कोणी पळवत कसं नाही असले (!) विचार आम्ही करत असताना आजुबाजुचं सुंदर गाव दाखवत बस मुख्य पार्किंगला येऊन थांबली.
.

.
.

इथुन पुढे हे गाव पायी फिरायचं.समोर देखणे गुलाब फुललेला ताटवा,अप्रतिम हवा आणि सर्वत्र भरून राहिलेला लिंबाचा सुवास.परीकथेतल्या भटकंतीला निघाल्यासारख्या आम्ही दोघी निघालो.छोटंसं टुमदार गाव.छोटी छोटी स्मरणवस्तूंची दुकानं एका रस्त्याला तर मधल्या चौकात एक छानसा पुतळा.तिथे बसून आरामात खात पीत सुशेगाद बसलेले लोक. सगळं वातावरण उत्फुल्ल्,आनंदी.पर्यटकांचे घोळके ट्रॅममधून फिरत होते.त्या आनंदाचा आपल्याला आपोआप संसर्ग होतो! जवळच एका गल्लीतून येणार्‍या जाणार्‍या पर्यटकांची गर्दी दिसत होती.तिथे शिरलो.ही गल्ली बाजाराची निघाली.इथे लिंबापासून बनवलेल्या कँडीज्,साबण,इटालियन लेदरच्या पर्सेस आणि सगळ्यात जास्त दुकानं इथल्या फेमस लिमाँचेलोची.सगळीकडे खरेदीची धमाल चालली होती.
लिमाँचेलो विकणारे दुकानात बोलावून बोलावून तीची चव बघायला देत होते.इथे भुमध्यसमुद्री हवामानाने लिंबाची मोठ्या प्रमाणात पैदास होते.एकेक लिंबू भलंमोठं असतं आणि रसरशीत.त्या लिंबाची साल,साखर ,पाणी आणि वाइन यांची लिक्युअर म्हणजे लिमाँचेलो! चवीला अप्रतिम लागते.ते चॉकलेट आईस्क्रिमवर घालून खावं किंवा त्याची जिन,व्होडका बरोबर कॉकटेल्स बनवावी.लिंबाची चव आणि फ्लेवर बहार आणते!दोन तीन दुकानात चव घेण्यासाठी थोडी थोडी पिऊन आम्ही जास्तच आनंदी झालोय अशी शंका आल्यावर आम्ही आमची इटलीतली पहिली खरेदी लिमाँचेलोची केली!!परततानाच्या रस्त्यावरदेखील अशाच प्रकारची,ऑरेंज लिक्युअरची दुकानं होती पण आता अजून चव घेतल्यास पार्किंगपर्यंत, "बादलपे पाँव है "करत जाऊ असं वाटल्याने तिथुन तडक निघालो!! रस्त्यात एक लिंबाची बाग कम दुकान दिसलं म्हणून सहज डोकावलो आणि अलभ्य लाभ झाला! इथे ताज्या लिंबापासून बनवलेले लेमन जिलेटो मिळत होते.स्वर्गीय चव! असं आइस्क्रिम नंतर एकदाही मिळालं नाही. किंमतही माफक,दोन युरो फक्त.आईस्क्रिमचा अक्षरशः डोंगर रचला होता कोनवर! ते खाताना दमछाक झाली!
त्या चिमण्या,देखण्या गावाचा निरोप घेताना अगदी जीवावर आलं.गेल्या जन्मी काय केलं की आपण अशा गावात जन्माला येतो आणि काय दुष्टपणा केला की डोंबिवली जन्मी येतो असा गहन विचार करत्,डुलक्या खात नेपल्सला येऊन पोहोचलो.उद्या काप्री,ब्ल्यु ग्रोटोला जायचं होतं.पुलंची निळाई वाचल्यापासून कधीतरी हे नीलस्वप्न बघायचंच होतं.ते उद्यावर येऊन ठेपलं, या आनंदाचा भंग हॉटेलात परत जेवण म्हणून आलेल्या पिझ्झा,पास्त्याने केला!शेवटी पास्त्यावर चीली फ्लेक्सची पाव बरणी उपडी करून त्यावर ऑलिव्ह ऑइल टाकून त्याला खाणेबल करून तो जेवणाचा सोहळा संपवला!!
सकाळी लवकर उठून नेपल्सच्या धक्क्यावर काप्रीला जाणारी बोट पकडायची होती.धक्क्याच्या समोरच नेपल्सच्या किल्ल्यांपैकी एक आहे.
.
या परिसरात देखील अफ्रिकन लोक स्मरणवस्तू,छत्र्या घेऊन मागे लागत होते.खरेदीसाठी आलेली मंडळी कोणतीही जागा खरेदी केल्याशिवाय सोडायची नाही असा नियम केल्यासारखी तिथेही उत्साहने खरेदी करायला लागली!तेवढ्यात आमची बोट धक्क्याला लागली.हिंदी चिनी भाई भाई निष्कारण एकच धक्काबुक्की करत आत शिरले! आत गेल्या गेल्या मी आणि मैत्रीणीने खिडकीच्या एकामागे एक अशा जागा धरल्या.माझ्या बाजूची खिडकी माझ्या आयुष्यातल्या ठरलेल्या योगाप्रमाणे धूसर झालेली निघाली ,अर्थातच!!त्यामुळे मी आजूबाजूला बघत बसले.तेवढ्यात माझ्या शेजारी एक जोडपे येऊन बसले.ती तो फोनवर बोलत असताना ,तिच्याकडे बघत असताना त्याचे अनेक फोटो काढत होती.थोड्याच वेळात ते अती प्रेमात आले!मग माझी आजूबाजूला बघायची पंचाईत करून ते अगदीच रंगात आले.मग मी धूसर खिडकीतून बघायचा निष्फळ प्रयत्न करत वेळ काढायला लागले. मागच्या खिडकीतून आपल्याला समुद्राचा एक तुकडा दिसतोय असा शोध लागल्यावर उरलेला वेळ मी मान तिरपी करून भुमध्य समुद्राच्या त्या देखण्या रंगाकडे कौतूकाने बघत बसले. समोर हिरवे डोंगर दिसायला लागले.अनेक पडाव बांधलेलं अजून एक सुंदर गाव सामोरं आलं,काप्री!
.
इथे परत एका लाँचमध्ये बसून आम्ही ब्लू ग्रोटोकडे निघालो.समोर पांढरट छटेचा उंच पर्वत्,शांत निळाशार भुमध्य समुद्र,डोंगरात मधेमधे दिसणारी सुंदर घरं,असा तो नयनरम्य प्रवास.
समोर एक अर्धचंद्राकृती गूहा दिसायला लागल्यावर लाँच थांबली. इथे छोट्या होडीत उतरून गुहेत जावं लागतं कारण ग्रोटो म्हणजेच गुहेचं तोंड अगदीच लहान आहे.गुहेच्या तोंडावर साखळी बांधलेली असते.कुशल नावाडी लाटेचं अचूक टायमिंग साधून आपल्याला होडीत आडवं झोपायला सांगून होडी आत घालतात .आत गेल्यावर आपण उन्हातून गेल्याने प्रथम काहीच दिसत नाही.नंतर मात्र निळी भूल पडायला लागते.त्या पाण्याचा रंग अक्षरशः अद्भूत आहे! मोरपिशी छटेचं ते पाणी,वर उडवलं की चांदण्या पडल्यासारखं दिसतं.नावाडी एकामेकांना त्या अंधारात व्होलारे...करून साद घालत असतात.अचानक आपलं लक्ष आपण आलो त्या गुहेच्या तोंडाकडे जातं.तो अर्धगोल तेज:पुंज दिसत असतो.छतावर निळ्या पाण्याचं निळं कोंदण झगमगत असतं.अपूर्व अनुभव आहे तो बघण्याचा.मला शब्दात मांडताना शब्दच सापडंत नाहीयेत.
.

.
(जालावरून साभार)
हे निळं गारूड उतरायला जरा वेळंच लागला.परत लाँच काप्रीच्या धक्क्यावर घेऊन आली.इथे जिलेटो खाऊन आम्ही फुनिक्युलरने काप्री गावात पोहोचलो.किती देखणं असावं एखाद्या गावाने!समोर निळाशार समुद्र, समोर हिरवे डोंगर.डोंगरात चिमुकली परीकथेतली घरं.
.
.
इथे अप्रतिम ऑरेंज ज्युस घेऊन आम्ही गावाचा फेरफटका मारायला निघालो.हे गाव प्रवाळाच्या दगिन्यांसाठी प्रसिद्ध असल्याने अनेक दुकानांनी सजलेलं आहे.इथेही सोरेंतोसारखीच पण अजून छान वस्तूंची दुकानं होती. इथे आपल्या सानिका आणि मृणालिनीने रेकमेंड केल्याने सबकुछ लिंबू खरेदी केली! लेमन फ्लेवरचे साबण,चॉकलेट्स, परफ्युमपण! घेतल्याचा अजिबात पश्चात्ताप न झालेली ही खरेदी! गावात चढ उताराच्या रस्त्याने जात एका छोट्याश्या पण सुंदर हॉटेलात जेवायला आलो.हॉटेलात आजूबाजूला लिंबू संत्री लगडलेली झाडं.खांबांवर द्राक्षाच्या वेली ! इथेही परत सूप,पिझ्झा ,पास्ता आणि जिलेटो समोर आलं!पण निळाईचं गारूड आज ते जेवणही दाद घेऊन गेलं!
पुलंनी पाहिलेली निळाई मी पाहिलीच!!

माझी इटलीची भ्रमणगाथा - भाग ५-रोम

प्रतिक्रिया

मधुरा देशपांडे's picture

24 May 2015 - 11:07 pm | मधुरा देशपांडे

सॉल्लिड लिहिलंय. पण फोटु नीट दिसत नाहीयेत, "बादलपे पाँव है" सारखे दिसताहेत.
बाकी "स्मरणवस्तु" शब्द अफाट आवडल्या गेला आहे. :)

स्वप्नांची राणी's picture

24 May 2015 - 11:23 pm | स्वप्नांची राणी

तेरा दिवसात बारा गावं आणि ११ देश असं न केल्याबद्दल आधी अभिनंदन!!! खरच युरोपातले हे सगळेच देश असे निवांतपणीच आणि मन भरून पहावेत असे आहेत...मस्स्त्त लिहीलं आहेस तु!!

पण या भागातले सगळे फोटो त्या धूसर खिडकीतूनच काढलेत की काय?

Mrunalini's picture

24 May 2015 - 11:33 pm | Mrunalini

मस्त झालाय हाही भाग.
माझा इटली ट्रिप मधला सगळ्यात आवडता भाग होता तो हा ब्लु ग्रोत्तो. अप्रतिम आहे ते आणि केप्री गावही मस्त एकदम.

कविता१९७८'s picture

24 May 2015 - 11:54 pm | कविता१९७८

मस्तच

श्रीरंग_जोशी's picture

25 May 2015 - 2:16 am | श्रीरंग_जोशी

स्वर्गीय अनुभव वाटत आहे. वर्णनशैलीला दंडवत.

बरेच फोटो धूरकटल्यामुळे जरा रसभंग झाला.

जुइ's picture

25 May 2015 - 2:16 am | जुइ

फटू तेव्हढे खुपच धूसर आले आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2015 - 2:55 am | डॉ सुहास म्हात्रे

अद्भुत सफर ! यावेळचे वर्णन अजूनच जास्त खुसखुशीत आहे (हा लिमाँचेलोचा असर असेल काय ? :) )

मूळ फोटो न टाकता थंबनेल मोठ्या आकाराची करून टाकल्याने चित्रे बरीच पिक्सलेट झाली आहेत असे वाटते. जमल्यास मूळ मोठे फोटो टाकावे.

सानिकास्वप्निल's picture

25 May 2015 - 3:50 am | सानिकास्वप्निल

छान लिहिले आहे.
इटली सफर तुझ्या लेखनशैलीमुळे अजून रंगतदार होतेय.
:)

सोरेंतो हे शहराचं नाव आहे हे तुझ्यामुळे समजलं. नाहीतर पास्ता सोरेंतो म्हणजे काय हे हाटेलात गेल्यावर फअरसे लक्ष देता मागवलाही असेल पण प्रश्न पडला नव्हता. लिंबाळलेले प्रवासवर्णन आवडले. फोटू दुरुस्त झाल्यावर पाहीन.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 May 2015 - 5:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

खुप छान. फोटो परत अपलोड करा ना. :)

या एकाच दिवशी कॅमेराचे लेन्सचे शटर उघडेना!म्हणून मोबाईलवर काढावे लागलेले फोटो आहेत.त्यामुळे कदाचित नीट दिसत नाहीयेत.

फोटो धुरकट आलेत पण वर्णन मस्त एन्जॉय केलं ! +)

कविता१९७८'s picture

25 May 2015 - 12:45 pm | कविता१९७८

मस्तच गं अजया, वर्णन मस्तय, फोटो मोबाईलमधे पाहीले म्हणुन व्यवस्थित दिसले. खरंच स्वतः फिरल्याचा फील येतोय.

होता है होता है ! सुंदर सुंदर गाव ! वर्णनच इतके सुरेख आहे की आपण imagine करू शकतो नुसत वाचूनच :)

दिपक.कुवेत's picture

25 May 2015 - 1:53 pm | दिपक.कुवेत

ईतकं छान वर्णन आणि धुसर फोटो त्याचा भंग करतात...

कपिलमुनी's picture

25 May 2015 - 2:18 pm | कपिलमुनी

फोटूच तेवढा बघाच !

नूतन सावंत's picture

25 May 2015 - 2:25 pm | नूतन सावंत

अंमळ वेळच झाला ग प्रतिसाद टंकायला.मला जे म्हणायचेय ते वरच्या सगळ्यांनी म्हटलेच आहे.काप्रीवरून मात्र आफ्रिकेचा मी काप्री हे किशोरवयातलं गाणं आठवलं.नेहमीप्रमाणे पु.भा.प्र.

सविता००१'s picture

25 May 2015 - 3:16 pm | सविता००१

अप्रतिम

सर्व भाग वाचले ! सुरेख लेखन ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailer

स्नेहल महेश's picture

25 May 2015 - 4:05 pm | स्नेहल महेश

हा भाग पण मस्त
प्रवासवर्णन वाचून हेवा वाटतोय मला कधी अस जग फिरायला मिळणार

पिलीयन रायडर's picture

25 May 2015 - 5:39 pm | पिलीयन रायडर

अगदी हेच्च!!!!

मलाही कधी पहायला मिळणार हे सारं...

अजयाताई.. दिलंस की डोक्यात पिल्लु सोडुन..!
पुभाप्र बरं का...

सामान्य वाचक's picture

25 May 2015 - 5:14 pm | सामान्य वाचक

फार च सुन्दर वर्णन आणि फोटो

स्नेहानिकेत's picture

25 May 2015 - 5:38 pm | स्नेहानिकेत

हा पण भाग सुरेख अजया ताई.छान छान गावांची सफ़र घडतेय.

उमा @ मिपा's picture

25 May 2015 - 6:29 pm | उमा @ मिपा

छान गं! निवांतपणे वर्णन करतेयस ते सगळ्यात छान, घाई नाही, आखडतेपणा नाही, मनापासून सगळं सांगतेयस. फोटो काय गं, नाव टाकलं गावाचं की नेटवर पण मिळतात पण असं वर्णन वाचायला मिळणं ही पर्वणी.
लिमाँचेलो विकत घेतलंस का? उरलंय का काही?

अजून उघडलं नाहीये!नवर्याला भेट देणार आहे!!

उमा @ मिपा's picture

25 May 2015 - 6:39 pm | उमा @ मिपा

सही! मज्जा करा दोघंही. पण संपवू नका, आमच्यासाठी थोडंसं उरवून ठेव.

दुर्गविहारी's picture

25 May 2015 - 9:26 pm | दुर्गविहारी

सही

प्रचेतस's picture

26 May 2015 - 8:46 am | प्रचेतस

मस्तच चाललीय सफर.

मितान's picture

26 May 2015 - 10:09 am | मितान

भन्नाट सफर !
चारही भाग वाचताना तुझ्यासोबत फिरून आले.

ती निळाई खरंच वेड लावते.
इथल्यानंतर ग्रीसमध्ये निळायचं !!!! चल जाऊया.. :)

ग्रीस आहेच लिस्टीत!!चल जाऊ!

पैसा's picture

26 May 2015 - 11:53 am | पैसा

खूप छान लिहिलंस. मात्र इतक्या देखण्या देशात माफियांचा बुजबुजाट आहे हे विचित्रच!

सतीश कुडतरकर's picture

26 May 2015 - 12:18 pm | सतीश कुडतरकर

गेल्या जन्मी काय केलं की आपण अशा गावात जन्माला येतो आणि काय दुष्टपणा केला की डोंबिवली जन्मी येतो>>>>

निषेध निषेध निषेध निषेध!

डोंबिवली पूर्वेच्या कोन्क्रीटच्या जंगलासाठी तुमचं म्हणन रास्त आहे. पण १० वर्षांपूर्वीचा डोंबिवली पश्चिमेचा खाडीकिनारा खरोखरच अनुभवण्यासारखा होता. माणसाचा वावर कमी असल्याने भरपूर पक्षीजीवन होते. कोल्हे तर अजूनही आहेत, गेल्याच महिन्यात कोल्हा पाहिला.

बाकी लेखमालिकेबरोबर इटली फिरतोय.

अाम्ही पूर्वेचेच!पश्चिमेची ही अपूर्वाई माहित नाही!

त्रिवेणी's picture

26 May 2015 - 2:31 pm | त्रिवेणी

मस्त सफर चालली आहे.
आणि हे काय ग्रीस कुठे आल मध्येच भुतान ला जायच आहे ना.
आणि ग्रुप टुर बरोबरचे फायदे-तोटे ही लिही शेवटच्या भागात.

विभावरी's picture

26 May 2015 - 3:44 pm | विभावरी

खूप छान लिखाण ,फोटो पण .

स्वाती राजेश's picture

26 May 2015 - 6:34 pm | स्वाती राजेश

फोटो..न लिखाण सुद्धा सहज आणी सोपी भाषा वापरुन केलेस..

तुझ्या लिखाणाचा मला उपयोग होइल..इटली च्या ट्रीप ला..

सुधांशुनूलकर's picture

31 May 2015 - 8:15 pm | सुधांशुनूलकर

चारही भाग वाचले. खूप आवडले.
मस्त सफर.

प्रभाकर पेठकर's picture

9 Jun 2015 - 6:25 pm | प्रभाकर पेठकर

खुसखुशीत लेखनाचे अजब कसब आहे तुमच्या हाती. त्यामुळे अविश्रांत मेहनत करून एका बैठकीत ४ भाग वाचून काढले. अजिबात कंटाळा म्हणून नाही आला उलट पुढील प्रत्येक भागाची उत्कंठा लागून असायची. फोटोंमुळे ह्या भागाने जरा हिरमोड केला. आणि त्यातून मी पाहिलेला नसल्याने आता हा परिसर पाहण्यासाठी पुन्हा इटलीला जाणे आले.

दोन तीन दुकानात चव घेण्यासाठी थोडी थोडी पिऊन आम्ही जास्तच आनंदी झालोय अशी शंका आल्यावर


आनंदी आनंद गडे
चला जाऊ सोरेंतो कडे...

अजया!! चक्क चक्क परीराणीच्या देशात जाऊन आली आहेस!!

आता मात्र हे सोरेंतो रेड फ्लॅग झाल माझ्या आयुष्यात. जाणारच!

अजया चक्क चक्क प

यशोधरा's picture

6 Jul 2015 - 1:29 am | यशोधरा

काय दुष्टपणा केला की डोंबिवली जन्मी येतो >>> हीहाहा! ट्रीप खर्रच सार्थकी लागली!!

- सुष्ट (आणि म्हणूनच) पुण्यात जन्मलेली यशो