सफर तामिळनाडुची !- मदुराई (भाग ३)

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in भटकंती
23 May 2015 - 2:16 pm

भाग १ - प्रस्तावना
भाग २ - रामेश्वरम आणि धनुषकोडी

रामेश्वरमहुन परत आल्यावर खरं तर कुठेही जाण्याची परिस्थिती नव्हती.. पण मीनाक्षी अम्माच्या मंदिरातल्या घंटा वाजु लागल्या.. आणि पाय आपोआप तिकडे वळाले..

दोन वर्षांपुर्वी नवरा चैन्नईला आला होता तेव्हा का कोण जाणे त्याने "रामेश्वरमला जाऊन येतो" असा हेका धरला होता. मला तेव्हा तामिळनाडु.. तिथली मंदिरं ह्याबद्द्ल फारशी काहीच माहिती नव्हती.. धनुषकोडीबद्दल ऐकलं तेही तेव्हाच. थोडं गुगलुन पाहिल्यावर मी त्याला जाता जाता मग तंजावर आणि मदुराई तरी करच असा सल्ला दिला. कुरकुर करत साहेब मदुराईला गेले खरे.. आणि परत येताना मदुराईच्या प्रेमात पडुन आले..!

प्रामाणिकपणे सांगायचं तर आम्ही मदुराईला फार कमी वेळ दिला. आम्हाला फक्त मीनाक्षी मंदिर पहायचे होते. ते काय होईल २-४ तासात पाहुन म्हणुन आम्ही पुढचं वेळापत्रक आखलं. पण प्रत्यक्षात पुन्हा पुन्हा पहात रहावं.. वेळ काढुन निवांत फिरत रहावं.. दिवसा उजेडीच नाही तर रात्रीच्या वेळीसुद्धा जाऊन पहायलाच हवं असं हे मंदिर आहे..! इतकंच नाही तर तिथला राजमहाल सुद्धा अत्यंत मह्त्वाची वास्तु आहे. आम्ही इतका विचार केलाच नाही. एकतर गाडी चुकल्याने आमची वेळेची गणितं फसली. त्यामुळे रात्रीच्या वेळेस मंदिर फार पहायला मिळाले नाही. राजमहाल आम्ही पाहिलाही असता पण मीनाक्षी मंदिर पाहुन तेवढा वेळ आणि शक्ति उरलीच नाही..

अर्थातच धनुषकोडी आणि मदुराईला परत परत जायचा इरादा पक्का आहे.. तेव्हा राहिलेली सगळी कसर पुरी करणार हे नक्की!

आता मीनाक्षी मंदिराबद्दल थोडेसे..

मलयध्वज पांड्य राजा आणि त्याची पत्नी कांचनमलाई ह्यांना एका यज्ञातुन प्राप्त झालेली कन्या म्हणजे मीनाक्षी! हिला जन्मतः तीन स्तन असल्याने राजा चिंतेत पडला. पण मीनाक्षी जेव्हा तिच्या भावी वराला भेटेल तेव्हा हा स्तन गळुन पडेल अशी आकाशवाणी झाली. मीनाक्षी मोठी झाल्यावर पांड्य राज्यावर राज्य करु लागली. साम्राज्य स्थापन करण्यासाठी तिने युद्ध करुन ब्रह्मलोक, विष्णुलोक आणि इंद्रलोक जिंकला. कैलास जिंकण्यासाठी आल्यावर मात्र जेव्हा ती शिवाशी लढायाला आली तेव्हा शिवाचे रुप पाहुन पहिल्यांदाच तिच्या मनात लज्जा निर्माण झाली आणि तिचा तिसरा स्तन गळुन पडला. पुढे तिचा शिवाशी विवाह झाला. तोच हा सुंदरेश्वर! (द्राविडी लोक त्याला "छोक्कलिंगम" म्हणतात.)

मीनाक्षी मंदिर हे मुळ पांड्य राजाच्या काळात बांधले गेले असावे. पण ते मलिक काफुरच्या आक्रमणात जवळ जवळ नष्ट झाले. तिरुमल नायकाने हे मंदिर पुन्हा बांधुन घेतले. मीनाक्षी आणि सुंदरेश्वराची मुळ मुर्ती सोडता बाकी सर्व भाग सोळाव्या शतका नंतर बांधलेला आहे.

मीनाक्षी मंदिर अत्यंत भव्य असुन त्याच्या सभोवताली तटबंदी आहे. चारी दिशांना गोपुरे आहेत. दक्षिणेकडील गोपुर सर्वात मोठे असुन, सर्वच गोपुरांवर देवदेवतांची शिल्पे आहेत. मंदिरात मीनाक्षीचे मंदिर, सुंदरेश्वराचे मंदिर, अनेक सभामंडप, जलाशय आणि लहान मोठी मंदिरे आहेत.

Meenaxi Mandir
* हे चित्र आंतरजालावरुन साभार

मंदिरात प्रवेश करताना चप्पल-बुट, कॅमेरा, इ वस्तु बाहेर जमा कराव्या लागतात. मंदिरात कॅमेरा नेता येत नाही पण १००/- भरुन मोबाईल कॅमेरा वापरा येतो. ह्या मंदिरात कपड्यांचेही नियम आहेत. संपुर्ण अंग झाकेल असे कपडे घालावे लागतात, गुडघ्यापासुन वर दुमडलेली अण्णा स्टाईल लुंगी चक्क चालत नाही. आता मध्ये फक्त हिंदुना प्रवेश आहे.

प्रवेशद्वार

Entry Murti Entry Murti

एका भल्यामोठ्या लाईन मध्ये उभे रहावे लागते.लाईन मधुन फिरता फिरता दिसणारा सभामंडप आणि खांबावर कोरलेली शिल्पे. रामेश्वरम प्रमाणेच इथेही छतावर पुष्कळ रंगकाम केले आहे.

sabha mandap

Coloring in Sabha Mandap

Coloring in Sabha Mandap

Murti

जागोजागी अशा रांगोळ्या रंगवल्या आहेत.

Rangoli

एका वाली आणि सुग्रीव ह्यांचे युद्ध चालु आहे आणि समोरच्या खांबावरुन राम बाण मारत आहे (लाईन मध्ये धक्का लागत असल्याने फोटो फार चांगला आला नाही.)

Ram

मंदिरात सर्वत्र असे खांब आहेत.

Pillars

मीनाक्षीचे दर्शन घ्यायला मात्र फार कसरत करावी लागते. एकतर रांगेत फार वेळ थांबावे लागते. मुख्य प्रवेशद्वारापाशीच १००/- माणशी देऊन फास्ट लाईन मध्ये लागता येते. आम्ही आधी ते तिकिट घेतले नाही. पण जशी जशी रांग पुढे जाऊ लागली तसं आपण फक्त बाहेरच्या सभा मंडपात आहोत, अजुन प्रत्यक्ष गाभार्‍या पर्यंत जायला किमान १ तास तरी लागेल असे लक्षात आले. मग दोनदा आम्ही ५०/- चे तिकिट घेऊन तेवढी लाईन भरकन पुढे सरकलो. (ते तिकिट आधीच घ्यायला हवे होते हा साक्षात्कार तेव्हा झाला!)

मंदिरात फक्त सभामंडपात फोटो घेता येतात, त्यामुळे एकदा तो सोडला की आत कितीही अप्रतिम कलाकुसर दिसली तरी फोटो घेता येत नाहीत. आम्ही फास्ट लाईनच्या तिकिटामुळे १० मिनिटात गाभार्‍यापाशी आलो. जिथे मीनाक्षीची मुर्ती आहे तो मंडप केवळ अवर्णनीय...

काळ्या दगडातुन घडवलेले मंदिर.. प्रकाशासाठी बांधलेले झरोके आणि त्यातुन येणारे सुर्यकिरण.. मंडपात योजलेला पिवळ्या रंगाचा प्रकाश.. गाभार्‍याभोवती पाणी फिरवण्यासाठी किल्ल्या भोवती जसे खंदक असतात तशी व्यवस्था.. गाभार्‍याच्या बाहेरच्या भिंतींवर सोडलेल्या पितळी समया.. त्यात मंद तेवणार्‍या वाती.. आणि त्यांच्या प्रकाशानी उजळेल्या देव देवतांच्या मुर्ती.. त्यांना नेसवलेली रेशमी वस्त्रे... केवळ अवर्णनीय...!!!

आणि ह्यावर कहर म्हणजे खुद्द मीनाक्षीची कमनीय मुर्ती... असं देवाच्या मुर्तीला "वाह! क्या बात है!" किंवा "ला ज वा ब!"
म्हणता येतं का ते माहित नाही.. पण त्या मुर्तीचे वर्णन करायला शब्द तोकडे आहेत. काय त्या चेहर्‍यावरचे भाव.. काय ती नजाकत.. काय ती उभं रहण्याची ढब..! हे शिल्प मी आजवर प्रत्यक्षात.. फोटोमध्ये.. कुठेही पाहिलेल्या शिल्पांमधले सर्वोत्कृष्ट शिल्प आहे.

ती मुर्ती मनोहारी म्हणावी की ज्या पद्धतीने तिचा साज शॄंगार केला तो जास्त मोहक म्हणावा..! फक्त दिव्यांच्या प्रकाशात उजळेलेली मुर्ती, तिला नेसवलेली रेशमी वस्त्र, तिला घातलेले फुलांचे हार, तिच्या समोर ओवाळला जाणारी पंचारती आणि हे सगळे सोहळे जिच्यासाठी ती मीनाक्षी अम्मा! कितीही पाहिलं तरी मन भरत नाही...

तिथेच फतकल मारुन बसावं आणि अम्माकडे पहात रहावं असं वाटलं तरी ते तसं करु देत नाहीत, हाकलतातच.. नाईलाजानी बाहेर आलो. पुढे सुंदरेश्वराचेही दर्शन घेतले.

बाहेरच्या सभामंडपात एकाहुन एक अप्रतिम मुर्ती आहेत. पण मीनाक्षीच्या मुर्ती पुढे मला आता काय लिहावे ते सुचत नाही म्हणुन फक्त फोटो देते.

Khandoba mhalasa

Natraj

Natraj 2

Murti 3 Murti 4

nandi murti

murti 8 Murti 9

murti 10

anant narayan

Murti 5

Murti 6

Murti 7

murti 11 murti 12

Ganapati

Vijaystambh

विष्णु मीनाक्षी आणि शिवाचे लग्न लावुन देताना

Marriage

रामेश्वरम इतका भव्य नसले तरी इथेही मोठे मोठे कॉरिडॉर आहेत

Corridor

कोणत्याही बाजुने पाहिलं तरी आपल्याचकडे तोंड केलेले शिवलिंग

Shivaling

करंगळीवर गोवर्धन उचलणारा कृष्ण आणि मोरावर बसलेली सरस्वती

Krushna Sarswati

मंदिराचा परिसर

parisar

parisar

parisar

parisar

गोपुरे

Gopur

गोपुरांवरील शिल्पे

Shilpa 1 Shilpa 2

Shilpa 3 Shilpa 4

Shilpa 5 Shilpa 6

मंदिरात "सहस्त्रसभामंडप" म्हणुन ९८५ खांबावर तोललेला सभा मंडप आहे. तिथे आता मंदिर कला संग्रहालय आहे.
मंदिरातुन बाहेर पडल्यावर साड्यांची अनेक दुकाने आहेत. मदुराईमध्येही चांगल्या साड्या मिळतात. मदुराईअचा दालवडा जागतिक दर्जाचा खतरनाक चविष्ट पदार्थ आहे. सकाळी नाश्त्याला इथल्या इडल्या, वेगवेगळ्या प्रकारचे वडे आणि कॉफी!!! पोळ्यांच्या विरहात आम्ही मदुराई रेसिडेन्सी नावाच्या महागड्या हॉटेलच्या रेस्टॉरंट मध्ये ५०/- ला एक ह्या प्रमाणे वाईट्ट तंदुरी रोट्या खाल्ल्या. चेट्टिनाड नावाने एक भाजी घेतली ती ही बेचव पाण्यात तरंगणार्‍या भाज्या अशी निघाली. पण मंडळींचे मॉरल टिकवायला त्यांना भात सोडून काहीतरी खाउ घालणं आवश्यक होतं!!

मदुराईचा राजमहाल सुद्धा अगदी आवर्जुन बघावी अशी वास्तु आहे पण दुर्दैवाने आम्ही ती पाहु शकलो नाही. संध्याकाळच्या तामिळनाडू स्टेट ट्रान्स्पोर्टच्या गाडीने कोईंबतोर गाठले.

देव देव करुन झालं होतं.. आता कांचीपुरम साड्या खुणावत होत्या!!! धार्मिक वातावरणातुन मंडळी भौतिक जगात परतली होती.. मोजुन मापुन ठरवलेल्या बजेट टुरच्या बजेट्ला पार होत्याच नव्हतं करुन टाकणारा दिवस आलेला होता!

मंडळी कोइंबतोरच्या लक्ष्मी रोडवर येऊन धडकली होती.....!

क्रमशः

(तळटीप:- हा भाग लिहीताना मीनाक्षी मंदिराच्या माहितीसाठी मराठी विश्वकोश-खंड १२ तसेच विकिपिडिया वापरलेला आहे. )

प्रतिक्रिया

इतके दिवस ज्या सौधिंडियन टेंपलाचं आकर्षण आहे त्याला मिनाक्षी मंदिर म्हणातात हे आज समजलं. सुरेखच आहे. रंगीत गोपुरे खास दाक्षिणात्य स्टाईलची! फोटू आवडले. आता साड्याखरेदीपाशी आपण पोहोचलोय म्हणून उत्सुकता आहे. होऊ दे खर्च, तमिळनाडू आहे घरचं!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 May 2015 - 4:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फोटो आणि माहिती जब्राट. पुभाप्र.

उमा @ मिपा's picture

23 May 2015 - 5:09 pm | उमा @ मिपा

फोटो आवडले आणि वर्णन तर सुरेखच! मीनाक्षी मूर्तीचं वर्णन खास!
अमुक पैसे भरले की पटकन दर्शन हा प्रकार पटत नाही पण हे असंच आहे कितीतरी ठिकाणी.
खरेदीचा शौक नाही पण तू केलेलं खरेदीचं वर्णन वाचण्याची उत्सुकता आहे.

सिरुसेरि's picture

23 May 2015 - 5:16 pm | सिरुसेरि

साउथ मध्ये व्हेज संगीथा ( संगीता) , सर्वाना भवन , दिंडीगुल थलप्पाकुट्टी ही रेस्टॉरंटस प्रसिद्ध असुन त्यांच्या बरेच ठिकाणी शाखाही आहेत ( देश परदेशात ). येथे बरयाच ठिकाणी 'जिगरठंडा' नावाचे काहिसे फालुदासारखे असणारे आईस्क्रीम/मिल्कशेक मिळते. त्यामुळे शक्यतो प्रवासात खाण्याचे हाल होत नाहीत . या सुंदर मंदीराचे फोटो बघुन थिरुवायुर , त्यागराजा इत्यादी मंदीरांचीही आठवण झाली.

स्रुजा's picture

23 May 2015 - 7:14 pm | स्रुजा

सुंदर फोटो आणि वर्णन पण. अधाशासारखा हा ही भाग वाचुन काढला. चल आता साड्या खरेदी दाखव लवकर.

विलासराव's picture

23 May 2015 - 7:53 pm | विलासराव

ऑक्टोबरला मदुराइला जायचा योग आहे.
आल्यावर फोटो टाकतो.

तीन वर्षापूर्वी गेलेले मदुराईला.अजिबात गर्दी नव्हती.दरवाजाबाहेर एक हत्ती सोंडेने आशीर्वाद देत होता!अतिशय सुंदर निवांत दर्शन घेऊन मंदिर फिरलो होतो.आमच्या हाॅटेल अगदी मंदिराजवळ होते.रजवळच सौदिंडियन थाळीचे तिथले स्पेशल हाॅटेल होते.नाव आठवत नाही.मस्त जेवलो होतो.मंदिराबाहेर मदुराई टेंपल बाॅर्डरच्या साड्या घेतल्या होत्या. मंदिरात शीव पार्वतीचे लग्न झाल्याची आख्यायिका आहे.तो कल्याण मंडप.तिथे ते पाणीग्रहणाचे सुंदर शिल्प आहे.त्यातल्या पार्वतीच्या चेहेर्यावरचे भाव बघण्यासारखे आहेत!मूर्तीकला आवडणार्याला पर्वणीच आहे हे मंदिर!
मस्त फोटो.नादमय खांबांना विसरली आहेस का?त्या सहस्त्र खांबांमधुन सुंदर नाद निर्माण होतो.पण गाईड सोबत हवा,कोणते ते दाखवायला.

गोपुर आणि मुर्तीही खासच. जवळजवळ १३ वर्षापुर्वी गेले होते, तुझे प्रवासवर्णन वाचुन परत जावेसे वाटु लागले आहे.

नूतन सावंत's picture

23 May 2015 - 9:13 pm | नूतन सावंत

पिरा,लय झ्याक चाललंय ग .तिन्ही भाग बसल्या बैठकीला वाचून काढले.सलगतेमुळे तुझासोबतच असल्यासारखं वाटतंय. खरेदीला तुझ्यासोबत आहेच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 May 2015 - 9:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लेख वर आणतोय,

टवाळ कार्टा's picture

23 May 2015 - 11:00 pm | टवाळ कार्टा

अप्रतिम

अतिसुंदर. फक्त इतकेच म्हणतो कारण बाकी शब्द नाहीत.

बाकी दक्षिणेत तंदुरी रोट्या????? शान्तं पापम्!!!

पॉइंट ब्लँक's picture

24 May 2015 - 3:20 pm | पॉइंट ब्लँक

+१

मिनाक्षी मंदिरात एका खांबावर मुळ मिनाक्षीचे शिल्प आहे, ज्यात तिचे तीन स्तन दिसतात.
पिरा अबिर आणि साबा साबू त्यात वेगवेगळे इंटरेस्ट असणारे नवारा आणि दिर घेउनण्फिरण काही खायची गोष्ट नाही.
त्यातसुद्धा तू खुसखुशीत वर्णन करुन बहार आणते आहेस.

प्यारे१'s picture

24 May 2015 - 3:30 pm | प्यारे१

तीनही भाग एकदम नि गडबडीत वाचले. मस्त खुसखुशीत सफ़र सुरु आहे.
पु भा प्र

सविता००१'s picture

24 May 2015 - 5:17 pm | सविता००१

सुंदर लिहिते आहेस गं. अगदी खुमासदार. फोटो जबराट आलेत.
आता साड्या.......... :)

मस्त प्रवास वर्णन आणि फोटो पण .

कवितानागेश's picture

24 May 2015 - 8:51 pm | कवितानागेश

हे वर्णन वाचून पुन्हा एकदा मदुराई रामेश्वर, कन्याकुमारी ट्रिप करायची इच्छा होतेय...
ही ट्रिप २००८मध्ये फक्त मी आणि आईनी येणे जाणे, रहाणे, जेवण्, सगळे मिळून९००० रूपयात बसवली होती. :)

कवितानागेश's picture

24 May 2015 - 8:52 pm | कवितानागेश

शिवाय १ दिवस कोडाईकनाल पण त्यातच झाले.

बॅटमॅन's picture

25 May 2015 - 10:02 pm | बॅटमॅन

कोडाईकनाल म्हटले की भूछत्राची आठवण आल्याखेरीज रहात नाही. ह.घ्या. (हेही सांगावे लागणे अलीकडे गरजेचे झालेय.असो.)

सांगलीचा भडंग's picture

25 May 2015 - 2:24 am | सांगलीचा भडंग

मस्त प्रवास वर्णन नाष्टा पाणी कसे होते एकंदर . सौथ मध्ये जाऊन सौथ इन्डीअन खाण्याच्या अनुभव पण सांगा

अत्रुप्त आत्मा's picture

25 May 2015 - 6:22 am | अत्रुप्त आत्मा

मिनाक्षि .. सुंदरम च!

समांतर:- अजुन आगोबा कसा नै आला हिते???

सस्नेह's picture

25 May 2015 - 11:31 am | सस्नेह

खरच सुंदर आहे मीनाक्षी मंदिर.

सानिकास्वप्निल's picture

25 May 2015 - 4:38 pm | सानिकास्वप्निल

मीनाक्षी मंदिर, गोपुरांवरील शिल्पे, कोलम सगळेचं सुंदर!!
वर्णन ही मस्तं.

वाचतोय... पुढच्या भागाची वाट पाहतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailer

प्रचेतस's picture

25 May 2015 - 9:14 pm | प्रचेतस

जबराट झालाय हां भाग. काय ती गोपुरं.....निव्वळ उच्च!!!

स्नेहानिकेत's picture

25 May 2015 - 10:27 pm | स्नेहानिकेत

मस्तच !!!!!मीनाक्षी मंदिर तर अप्रतिम आहे..पुन्हा एकदा साउथची ट्रिप करण्याचा विचार मनात घोळु लागलाय

गणेशा's picture

26 May 2015 - 3:19 pm | गणेशा

अप्रतिम

सुकामेवा's picture

26 May 2015 - 4:29 pm | सुकामेवा

बघू कधी जमतय तिथे जायला ते......

आर्या१२३'s picture

28 Dec 2016 - 2:47 pm | आर्या१२३

गोपुर, मन्दिराची भव्यता, कलाकुसर डोळ्यात साठवावी अशी. आणी या सर्वाला साजेशे खुसखुशीत लेखन
फारच सुन्दर !

रातराणी's picture

31 Dec 2016 - 2:34 pm | रातराणी

खूपच आवडला हा भाग!