विकीवरची माहिती खरी मानायची तर, मधुबनीची पाळंमुळं नेपाळ आणि बिहारच्या उत्तर भागातली. बिहारमध्ये मधुबनी नावाचा जिल्हा आहे , पण हिचं मूळ ते नेपाळच्या मधुबनी-जनकपुर नगरीतलं. जनक राजानं म्हणे सीतेच्या स्वयंवराच्या वेळेस नगर सुशोभित करायला सांगितलं आणि या भित्तीचित्रकलेचा उगम झाला. पूर्वी फक्त लग्नकार्याच्या वेळेस सीमीत असलेली ही कला मुख्यतः ब्राह्मण, कायस्थ व दुसाध (पास्वान) स्त्रियांकडून जोपासली गेली. नंतर मग विसाव्या शतकात भूकंपाच्या वेळेस विल्यम आर्चर नावाच्या एका ब्रिटिश अधिकार्याच्या नजरेस पडली. त्याने त्यावर एका भारतीय-नेपाळी मासिकामध्ये एक लेखही लिहिला. काही काळानंतर मग दुष्काळानंतर अर्थार्जनासाठी म्हणून या कलेला भिंतींवरून कागदांवर आणण्यात आलं.
मधुबनी चित्रे पाहता त्यात कृष्ण-राम-सीतेची, मासे, साप, सूर्य, पक्षी आणि झाडं-झुडूपं यांची चित्रं अधिक दिसतात. चित्रांना दिलेली बॉर्डर हेही एक गोड प्रकरणच आहे. हा एक नमुना-
तर, नवीन काहीतरी चित्रं काढण्याच्या खुमखुमीत मी पहिलंच चित्र हे निवडलं.
घरी ड्रॉईंगबुक होतं साधं. त्याच्याच एका पानावर तीन सूर्य अदमासे बसवले.
नंतर पहिल्या सूर्यावर प्रयोग करताना लक्षात आलं की एक चेहर्याची एक बाजू छान जमलीय पण नेमकी तशीच दुसरी बाजू काढणं अवघड आहे. थोडीशी पेन्सिल आणि बरंचसं खोडरबर वापरून एक सूर्यमुख काढलं आणि लक्षात आलं की या मापाचे तीन चेहरे या पानावर बसणार नाहीत. केलेली मेहनत फुकट न घालवता जर्राशी अॅडजस्टमेंट केली आणि कसेबसे तिन्ही सूर्य एका पानावर आले.
इंटरनेटवरची माहिती वाचून कुणीतरी पोस्टर कलर्स चांगले म्हटल्यावरून ते आणले होते. पण मला रंगकाम कितपत नीट जमेल याची खात्री नसल्याने स्केचपेन्स, मार्कर्स यांची मदत घेऊन आधी असं अर्धवट व नंतर घेतलेल्या चित्राबरहुकूम रंगकाम संपवलं.
नंतर मात्र आधीचं हिरवं चित्रच लै भारी होतं असं वाटत राहिलं.
पहिल्या चित्रानं तितका दगा न दिल्यानं आता जरा यूटयूबकडे मोहरा वळवला. तिथे भारती दयाल या मधुबनी शैलीतल्या प्रसिद्ध बाईंनी एक दहा-बारा मिनिटांच्या चित्रफितीत चित्र कसं काढायचं हे दाखवलंय.
मूळ मधुबनी चित्रं जरा ओबडधोबड असल्याने मला अगदी तशीच काढायची नव्हतीच. दयालबै हाती थेट मार्कर घेऊन सरसर चित्र काढत गेल्या आणि मी पेन्सिलीच्या मागे खोडरबर घेऊन परत एकदा चित्राक्षरं गिरवायला लागले. चित्र ९०% पूर्ण झालं आणि मास्तरीणबैंनी दगा दिला. हाती घेतलेलं चित्र सोडून त्यांनी दुसर्याच चित्राने शेवट केला. मग त्यांनी अर्धवट सोडलेलं चित्र आंतरजालावर खूप शोधलं पण ते नेहमीप्रमाणं मी हातातलं चित्र कसंबसं पूर्ण केल्यावरच सापडलं. या चित्रावर आपण लहानपणी चित्रात काढायचो तसे पार्श्वभूमीवर खवले होते. मी शक्य तितका कंटाळा टाळत त्यांना माझ्यापरीने नाजूक करायचा प्रयत्न केला होता. आणि मी पुढचं चित्र काढेपर्यंत मला माझ्या चित्रकारीचं लै कौतुक वाटलं होतं.
हा सगळा प्रकार साधारण फेब्रुवारीच्या आसपास चालू होता आणि मार्चमध्ये आजपर्यंत कधीही न पाहिलेल्या आणि प्रचंड हुषार अशी ख्याती असलेल्या एका आंतरजालीय मैत्रिणीला भेटायचा योग आला. साधारण वावरावरून तिला कला प्रकारात रस असेल असं वाटत होतं. त्यामुळं तिच्यासाठी एक मधुबनी फ्रेम बनवून न्यावी असं ठरवलं. या वेळेस पुन्हा एकदा भारती दयाल बाईंचंच चित्र घेतलं. ते आधीच्या चित्रासारखंच , फक्त थोडासा फरक असलेलं असं होतं. एका चित्रावरून काय चुका करायच्या नाहीत हे कळालं होतं. मध्येच कधीतरी केतकीनं पोस्टर कलर्सऐवजी अक्रिलिक कलर्स वापरायला सुचवलं होतं त्यामुळं रंगही बदलले होते. हे चित्र खूप मनापासून,अगदी नाजूकपणे कोरून काढलं आणि आता भेट म्हणून बाजारातून दुसरं काहीतरी आणून द्यावं की काय असं वाटेपर्यंत खूपच आवडलं. पण इतकाही हलकटपणा बरा नव्हे म्हणत काचेची ती फ्रेम मुंबई ते खडगपूर आणि खड्गपूर ते कोलकाता जीवापाड जपून नेल्याचं चीज झालं. :-)
घरी काचेच्या टेबलावर वस्तूंचे डाग पडतात म्हणून मोठ्या आकाराचे कोस्टर्स आणले होते. ते इकडेतिकडे पडलेले पाहावले नाहीत. म्हणून मग एका चॉकलेटबॉक्सचा बळी दिला. परंतु त्याचं झाकण मोठं तर डबा आकाराने थोडा लहान होता. मग त्याला सगळीकडून पांढरा कागद चिकटवून दोन्ही बॉक्सेसना एकत्र आणलं. आणि बाल वॉशिंग्टनच्या जोशात त्या बॉक्सलाही रंगवून टाकलं. जशी मानवी चेहरे आणि मागे खवले ही भारती दयालांची स्टाईल, तशीच असे पक्षी आणि झाडांची चित्रे ही विदुषिनी प्रसाद यांची खासियत.
ही अशा प्रकारची चित्रेही त्या काढतात. यांना पारंपारिक मधुबनी म्हणता यायचं नाही, पण अशा छापाची गणपती इत्यादींची चित्रे त्यांनी पुष्कळ काढली आहेत.
(हे मूळ चित्र खूप नाजूक आणि सुंदर आहे, मी त्याला ओबडधोबडपणाचं कोंदण दिलंय)
जाता जाता तोडलेले अकलेचे तारे:-
१. थोडा हलका हात सोडून मुक्तपणे आकार येऊ द्यावेत. मधुबनी ही लोककला असल्याने आणि त्यातही ही चित्रे थेट भिंतीवर काढली जात असल्याने तिथे खाडाखोड होत नसावी. सहज आलेले आकार थोडे अनियमित असले तरीही सुंदर दिसतात.
२. मु़ळात फक्त पारंपारिक रंग वापरले जातात. पण उपलब्धतेनुसार आणि प्रयोग अधिक काळ टिकावेत असं वाटत असेल तर अक्रिलिक रंग अधिक उत्तम.
३. चित्राच्या आरेखनास उठाव देण्यासाठी मार्कर किंवा पायलटचा काळा पॉईंट पेन वापरता येईल पण मोठे चित्र काढायचे असल्यास काळा रंगच वापरावा. मोठ्या चित्रात मार्करच्या काळेपणात कुळकुळीतपणा न दिसता ब्राऊन शेड दिसते.
४. नको तिथे शहाणपणा करून जिथे दोन्ही बाजूला समतोल साधायचा आहे असं चित्र नमनालाच न घेता इतर चित्रांपासून सुरूवात करावी.
यापूर्वीचे रिकामपणाचे उद्योग--
ग्लास पेंटिंग- http://www.misalpav.com/node/8020
बुकमार्क्स- http://www.misalpav.com/node/9487
पेपर क्विलींग- http://www.misalpav.com/node/14230
प्रतिक्रिया
19 May 2015 - 8:09 pm | विशाखा राऊत
किती मस्त आहेत ... :)
19 May 2015 - 8:19 pm | श्रीरंग_जोशी
वाह, काय कला आहे तुमच्या हातात. त्यास अभ्यासाची जोड मिळून अप्रतिम निर्मिती झाली आहे.
सादरीकरण मनापासून आडवले.
19 May 2015 - 8:37 pm | रेवती
वाह! मस्त जमलियेत चित्रे! मधुबनी हे नाव साडीचेही असते की काय ते नक्की आठवत नाही.
सूर्यांचे चित्र आणि शेवटचे दोन्ही मोर फार सुंदर आलेत.
19 May 2015 - 10:27 pm | मस्त कलंदर
पूर्ण साडीवर मधुबनी चित्रे असतात. भरगच्च काठपदर आणि मध्ये मध्ये बुट्ट्या. मला हवीय तशी एक साडी. इथे बघ..

19 May 2015 - 11:26 pm | रेवती
छानच आहे.
19 May 2015 - 8:45 pm | यशोधरा
सुर्रेख!
19 May 2015 - 8:52 pm | कंजूस
भारी आहे.आता चला ओडिशा -पिपली.
19 May 2015 - 8:58 pm | अजया
करुन बघतेच.जमलं तर इथे टाकते!बरा उद्योग लावुन दिलास हाताला आणि डोक्याला!!
19 May 2015 - 9:07 pm | किसन शिंदे
आवडता छंद अगदी आवर्जून जोपासत चित्रे काढल्याबद्दल कौतूक वाटले.
19 May 2015 - 9:28 pm | बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!!
19 May 2015 - 10:30 pm | अत्रुप्त आत्मा
शब्द संपले! फ़क्त ज्जोरादर टाळ्या!
20 May 2015 - 12:48 am | रुपी
सुंदर! या आधीचे सगळे उद्योगही आवडले.
20 May 2015 - 8:57 am | अमृत
तुमचे उद्योग आवडलेत! :-)
20 May 2015 - 9:47 am | कविता१९७८
मस्तच
20 May 2015 - 11:25 am | बबन ताम्बे
छान चित्रे. आवडली.
20 May 2015 - 12:30 pm | स्पा
खतरनाक _/\__
20 May 2015 - 2:18 pm | गणेशा
अप्रतिम .. निव्वळ अप्रतिम
20 May 2015 - 3:42 pm | चौकटराजा
मधुबनी शैली ही एक वेगळीच मस्त शैली आहे. रंगांचा ताजेपणा त्यात दिसतो. यात फक्त नैसर्गिक रंग वापरतात म्हणे.फार सुंदर रसरशीत रेखाटने व रंग यांचा मिलाफ म्हणजे मधुबनी. आपल्याला आपल्या चित्रछंदाबद्द्ल आदाब !
20 May 2015 - 10:18 pm | पैसा
मध्यंतरी वारली चित्रकलेची लाट आली होती. आता हे नवीन दिसतंय.
20 May 2015 - 10:53 pm | रुपी
मला तर वाटलं ती लाट अजूनही आहे.. जिकडे बघावं तिकडे लोक त्याचेच फोटो चढवत असतात, स्वतः केलं नसेल तर त्यांच्या नवर्याच्या वारली कलेचे.
हे फक्त निरीक्षण म्हणून. लोकांना कला येते आणि त्यासाठी ते वेळ देतात याचे मला खूप कौतुक आहे.
20 May 2015 - 10:22 pm | जुइ
खूप सुदंर दिसत आहेत चित्र!! नविनच प्रकार समजला हा.
21 May 2015 - 11:28 pm | शब्दबम्बाळ
धन्यवाद,नवीन काहीतरी समजलं!
प्रयत्न करून बघेन जमतंय का ते…
23 May 2015 - 5:28 pm | उमा @ मिपा
खूप सुंदर, सगळीच चित्रं!
मधुबनी चित्रं छानच असतात.
23 May 2015 - 6:09 pm | एक एकटा एकटाच
मस्त आहेत
सगळी चित्रे
23 May 2015 - 9:31 pm | के.पी.
खुपच सुंदर चित्र रेखाटली आहेत.
एका वेगळ्या प्रकाराची माहिती मिळाली.छानच!
23 May 2015 - 10:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मस्तं.
24 May 2015 - 6:10 pm | पॉइंट ब्लँक
भारीच एकदम :)