‘माझी’ क्रिएटीव्हिटी

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in जनातलं, मनातलं
27 Apr 2015 - 7:27 am

काही दिवसांपूर्वी 'यु ट्युब'वर सफरचंदाचा हंस बनविण्याचा व्हिडियो पाहिला आणि ठरवले की आपण देखील सफरचंदाचा हंस बनवायचा. हिला (बायको) व त्याला (मुलगा) ती विडीयो क्लिप दाखवली आणि डीक्लेर केले की आज मी सफरचंदाचा हंस बनवणार. त्यावर आमची झालेली चर्चा आणि त्याचा परिणाम खाली देत आहे. पण त्या आधी त्या व्हीडीयोची लिंक देत आहे.

मी – “अगं, सफरचंद कुठे ठेवलीत ?”
ही – “किती वर्षे झाली आपल्या लग्नाला ? घरातच राहता ना ? आणि सफरचंदं कुठे ठेवतात ? फ्रीजमध्येच ना का कपाटात ?”
मी – “अगं फ्रीजमध्ये दिसत नाहीत म्हणून विचारले. आणि ‘प्रश्नाला प्रतिप्रश्न म्हणजे उत्तर’ हेच तुला शाळेत शिकवले वाटते ?”
ही – “हे बघा, माझी शाळा काढू नका, त्यापेक्षा सफरचंदच शोधा, नीट डोळे उघडे ठेऊन. फ्रीज मध्येच आहेत.”
मी – “अगं, अशी ही भाज्यांच्या खाली का कोण ठेवतं सफरचंदं, चांगली समोर दिसतील अशी का नाही ठेवत तू ?”
ही – “हो, हो, का नाही ? आता ज्वेलर्स मांडतात तशी रचते समोर सफरचंदं आणि सोडते त्यावर प्रकाश. टीचभर मेला तो फ्रीज, मी म्हणून तो नीट रचते, दुसरी असती तर फ्रीजचे नुसते गोडाऊन केले असते मग कळले असते. किती दिवस म्हणते आहे की एखादा मोठा फ्रीज घेऊ तर त्यावर हूं नाही की चूं नाही. अॅपलचा नवीन फोन घेतलात त्याच्या ऐवजी जर नवीन फ्रीज घेतला असता तर ती मेली अॅपल्स तरी नीट ठेवता आली असती त्यात.”
मी – “बरं, बरं, कळलं ते. पुढच्या वेळी अॅपलचे नवीन मॉडेल आले तरी तो न घेता नवीन फ्रीजच घेऊ. आणि चाकू कोठे आहेत ?”
ही - “चा कू’ ? आणि ते कशाला हवेत तुम्हाला ? त्या व्हिडियो क्लिपमध्ये तर सुऱ्या दाखवल्या आहेत ?”
मी – “अगं, तेच ते. सुऱ्या काय आणि चाकू काय, शेवटी कापण्यासाठी वापरायचे ते हत्यारच ना ?”
ही – “शी ! काय भाषा मेली ती तोंडात. चाकू काय, हत्यारं काय ? मग आता खाटकाचा सुरा मागा, कोळीणीचा कोयता मागा, वाल्याकोळ्याची कुऱ्हाड मागा, शेवटी कापण्यासाठीच वापरतात नं ती ‘हत्यारं’ ? ऋषीबेटा, दे तुझा पप्पांना एखादी सुरी काढून, जरा बोथटच दे हो, नाहीतर सफरचंदाच्या ऐवजी बोटच कापतील आणि मग त्यांना औषधपाणी करताना आपणच सफर होऊ.”
मी – “काही नाही होत सफर. ह्या सफरचंदाचे सुंदर स्वॉन बनवून त्याच्या पाठीवर बसवून नेतो तुम्हाला सफरीला !”
तो – “पप्पा, ही घ्या सुरी. फार धार आहे तिला तेव्हा जरा सांभाळून कापा, आणि ह्या घ्या दोन ‘स्पेसर’ म्हणून वापरायच्या सुऱ्या. त्यांच्या खाली नॅपकिन अंथरा म्हणजे अॅपल कापताना सरकणार नाही. थांबा, मीच देतो सगळी तयारी करून.”
मी – “ऋषी, चल कर तो व्हिडीयो सुरु म्हणजे कोणतीही स्टेप चुकायला नको. आणि जरा तो ‘स्लो’च ठेव म्हणजे काही गडबडही व्हायला नको. सर्वात आधी सफरचंदाचे दोन तुकडे करायचे, हे केले सफाईदार दोन तुकडे, आता पुढे काय ?”
ही – “अहो, त्यात उभे तुकडे करायचे दाखवले आहे, तुम्ही त्याचे आडवे तुकडे केलेत की ? आता ते सफरचंद झाले बाद. घ्या आता दुसरे, आणि ठेवा हे तुमच्या डब्यासाठी.”
मी – “अगं हो, हो. जरा शांत बस ना थोडावेळ. एकतर हातात धारदार सुरी, त्यात हे गोल गरगरीत सफरचंद, सारखे निसटते, एक डोळा व्हिडीयो क्लिपकडे आणि दुसरा कापण्याकडे. त्यात तुझी अखंड-अविरत बडबड. शतावधानी माणसाचे अवधान देखील कमी पडेल. कापले अॅपल आडवे, मग काय झाले ? आकाश कोसळले की धरणी दुभंगली ? घेऊ दुसरे. त्यात काय ? चल ऋषी, आता व्हिडीयो तू बघ आणि सांग मला, आणि तू गं, जरा गप्प रहा देवासारखी. हं, हे बघ आता कापले ना नीट उभे ? आता पुढे काय करायचे ? हां, त्यातला एक भाग बाजूला ठेवायचा आणि सुरीच्या टोकाने त्यातील बिया, हंसाच्या डोळ्यासाठी बाजूला काढायच्या. ह्या बघा काढल्या बिया आणि ह्या ठेवल्या बाजूला. हं, ऋषी सांग पुढे. हा घेतला अर्धा भाग, आणि हे केले दोन तुकडे त्याचे पुन्हा, पुढे काय ?”
ही – “अहो, आता हे ही अॅपल ठेवा तुमच्या डब्यासाठी बाजूला. पुन्हा दोन तुकडे करायला कोणी सांगितले ? अहो आता त्याचे पंख बनवायचे होते, त्याचे दोन तुकडे केल्यावर तो उडणार कसा आणि आपण जाणार कसे सफरीला ? काही म्हणजे काही कळत नाही. ऋषी, घे ती सुरी काढून त्यांच्या हातातून, दातओठ खात माझ्याकडेच बघताहेत. आणि मला वाटते आता पुरे, त्या विडीयोची चांगली पारायणं करा पंधरा-वीस वेळा मग एखाद्या बटाट्यावर करा प्रयोग आणि मगच वळा अॅपलकडे. बटाटे बाद झाले तरी भाजीत घालता येतील, अॅपल खाऊन खाऊन खाणार किती माणूस ? आणि कित्ती महागलीत ती हल्ली. अहो, राहू द्या ते, ‘येऱ्या गबाळ्याचे काम नोहे ते, तेथे पाहिजे जातीचे’ आमच्या ‘हुजुरपागेत’ शिकवायचे आम्हाला.”
मी – “अगं, रोज करतो का ही कलाकुसर ? म्हंटलं, विडीयो क्लिप तर सोपी दिसतेय, दाखवू आपली क्रिएटीव्हिटी सगळ्यांना, तर तू ये मधे मधे बोंबलायला. पूर्वी राजे-महाराजे युद्धाला निघाले की त्यांच्या बायका स्व:ताच्या हाताने तलवारी बांधायच्या त्यांच्या कमरेला, केशराचे टिळे लावायच्या, आरती ओवाळायच्या आणि ते देखील युद्ध जिंकायच्या आधी. आणि तू दे बोथट सुरी नवर्याच्या हाती आणि बटाटे, अॅपलच्या जागी. कसले म्हणून कौतुक नाही नवर्याचे. कैकयी, युद्धात दशरथाच्या बाजूने लढायची म्हणे. नवर्याच्या रथाचे चाक मोडले तर स्वताच्या हाताने ते पेलले आणि युद्धात जय मिळवून दिला त्याला.. नाहीतर तू !”
ही – “अहो तोंड आवरा, नसती उदाहरणे देऊ नका. मी ही बांधते तलवार तुमच्या कमरेला, भाला पाठीला आणि देते धनुष्य-बाण खांद्यावर. पण उपयोग काय मी म्हणते ह्या सगळ्यांचा ? परवा मेलं नखा एव्हढं झुरळ निघालं तर माझ्या आधी स्व:ताच चढून बसलात ना पलंगावर ? साधे अॅपल कापता येत नाही आणि कैकईची उदाहरणे द्यायला निघालेत. तिच्यामुळेच तर पुढचे रामायण घडलं हे विसरलात वाटतं? ऋषी बेटा, घे तिसरं अॅपल फ्रीज मधून आणि दे त्यांच्या हातात, अजून पाच आहेत म्हणावं आत. करा सगळ्यांचा नाश आणि मग खा बसून फ्रुटसलाड. मी चालले माझ्या कामाला. समोर उभी राहून बघते आहे मगासपासनं तर म्हणे कौतुक नाही. कौतुक नसते तर एक तरी अॅपल लागू दिलं असतं ह्याच्या हाताला ? आणि धारदार सुरी नको म्हटलं ते काळजीपोटीच ना ? आधीच मेला धांदरट स्वभाव, उगाच हात-बित कापला म्हणजे ते मेलं बदक केव्हढ्याला पडेल ?”
तो – “अगं मम्मी, बदक नव्हे, स्वॉन, हंस"
ही – “हो, हो कळतं मला, स्वॉन काय, बदक काय आणि बगळा काय, पक्षीच ना मेले ते शेवटी ?”
मी – “पुरे पुरे, कळला तुझा उत्साह. ऋषी बेटा, काढ एक बऱ्यापैकी अॅपल आणि तो विडीयो बघून तूच सांग पुढची कृती. आणि लगेच लगेच सांग, शंभू गवळ्या सारखा नुसता बघत नको राहूस.”
ती – “खबरदार माझ्या मुलाला ‘शंभू गवळी’ म्हंटले तर. स्व:ताचेच नीट लक्ष नाही, आणि दोष दुसऱ्यांवर. ही तुमच्या घराण्याची परंपराच आहे म्हंटलं.”
मी – “तरी मी म्हणत होतो अजून आमच्या घराण्याचा उद्धार कसा झाला नाही तो. तब्बल पंधरा मिनिटे झाली आणि अजून घराणे कसे नाही आले बोलण्यात ?
ती - “मी कशाला करू तुमच्या घराण्याचा उद्धार ? मी म्हणते आहे काय त्या मेल्या घराण्यात उद्धार करण्यासारखे ?”
मी - “ लग्न करताना दिसलं नव्हतं का घराणं ? आता आली आहेस ना त्याच मेल्या घराण्यात ? मग तोंड आवर जरा आणि मला बनवू दे स्वॉन. ऋषी बेटा, हो अगदी बरोबर कापलेस अॅपल. आता त्याच्या बिया बाजूला काढ त्याच्या डोळ्यांसाठी. आता त्याच्या पंखांसाठी उरलेले अॅपल घे. बरोबर, असेच पंख करायचे दाखवले आहेत. नीट लक्ष देऊन काप, कारण त्याच्यावरच त्याचे सौंदर्य अवलंबून आहे. झाले करून पंख ? किती झाले ? सहा? हरकत नाही, विडीयोमध्ये आठ दाखवले आहेत, शेवटी त्याला खरेखुरे उडायचे थोडेच आहे ? ते आता बाजूला ठेव. आता त्या दुसऱ्या अर्ध्या भागातून हंसाचे तोंड कोरायचे आहे. इथे खरी क्रिएटीव्हिटी आहे, हळू हळू काप, फार घाई करू नकोस नाहीतर चौथे अॅपल घ्यावे लागेल. छान, हंसाची चोच छान बाकदार आली आहे. आता त्या बिया दोन्ही बाजूला डोळे म्हणून लाव. लावल्यास ? आता त्या बेसच्या मधोमध खाच कर आणि त्यात ते तोंड बसव. हो, अगदी असेच. बघ, झाला ना आपला हंस तयार. सांगितले नव्हते अगदी सोपा आहे तो. आता त्याचे चांगेल दोन-चार फोटो काढ म्हणजे मी लावतो आमच्या ‘मिपावर’ आणि दाखवतो ‘माझी’ क्रिएटीव्हिटी.”

ही बघा माझी क्रिएटीव्हिटी.

https://lh3.googleusercontent.com/-jVyClUOm_3o/VT13CvZ6M7E/AAAAAAAAAw4/2bij7_tpp8o/w205-h142-p/20150426

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

अजया's picture

27 Apr 2015 - 7:49 am | अजया

हाहा!मस्त जमलीये क्रिएटिव्हिटी!!

शब्दानुज's picture

27 Apr 2015 - 7:50 am | शब्दानुज

सुंदर लेख आणि हंससुद्धा...
आता पोपट करुन बघा...करताना होऊ नका म्हणजे झाल...

सौन्दर्य's picture

27 Apr 2015 - 7:20 pm | सौन्दर्य

खरं म्हणजे पोपटच झालो हो.

श्रीरंग_जोशी's picture

27 Apr 2015 - 7:52 am | श्रीरंग_जोशी

भन्नाट लिहिलंय.

फारच कल्पक बुवा तुम्ही. वरील लेखनाची व्हिडिओ नाही तर किमान ऑडिओ क्लिप युट्युबवर टाकल्यास लै प्रसिद्ध होईल :-) .

सौन्दर्य's picture

27 Apr 2015 - 8:05 am | सौन्दर्य

श्रीरंग, तुम्ही केलेल्या मार्गदर्शनानुसार लिंक आणि फोटो पोस्ट केला आहे. मदतीबद्दल खूप खूप आभार. मिपावर इतकी गुणी आणि विद्वान मंडळी आहेत की कोणत्याही विषयावर मदत मागितल्यावर मिळणार नाही असे होणारच नाही हा विश्वास आहे. सगळ्यांचे खूप खूप आभार.

श्रीरंग_जोशी's picture

27 Apr 2015 - 8:11 am | श्रीरंग_जोशी

खरं तर तुम्ही जो दुवा दिलाय तो हंस बनवण्याचा नाहीये. हंसाचा व्हिडिओ संपला की जो पुढचा सुरू होतो त्याचा दिला गेलाय.

योग्य दुवा हा आहे https://www.youtube.com/watch?v=uLXEiMIiF5E

युट्युबवर शेअर करताना एम्बेड करण्याचे कोड मिळते (व्हिडिओच्या खाली शेअर दुवा असतो). ते वापरल्यास तो खालीलप्रमाणे दाखवता येतो.

खरं म्हणजे मी दोन तीन वेळा लिंक पोस्ट करण्याचा प्रयत्न केला होता त्यातील एकच प्रयत्न सफल झाला (निदान मला तसं वाटलं) पण तो देखील चुकला हे आता कळले. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुढचा प्रयत्न करीन. आभार.

स्पंदना's picture

28 Apr 2015 - 9:07 am | स्पंदना

ती: म्हंटल नव्हतं? नाही समजायच तुम्हाला? बघावं तेंव्हा गबाळग्रंथी कारभार. ऋषीबाळा दे जरा करुन अपलोड मेला तो व्हिडिओ यांचा.

सौन्दर्य's picture

28 Apr 2015 - 7:14 pm | सौन्दर्य

म्हंजी आम्चा कार्भार मिपावर पसरला म्हनायचा की वो.

सौन्दर्य,क्रिअटिवटीआणि ललित आवडले.

@श्रीरंग_जोशी, मी एक पक्षाची ओडिओ क्लिप केली आहे =
http://vocaroo.com/i/s0k8gegewsGz
याचा ओडिओ प्लेअर कोड काय टाकायचा? शेअर ओप्शन आणि embed link कशी वापरायची w3schools चे html audio tag आणि object tag वाचून कोड लिहिला परंतू invalid audio हा मेसिज येतो.

श्रीरंग_जोशी's picture

27 Apr 2015 - 6:43 pm | श्रीरंग_जोशी

Audio recording software >>

कंजूसराव - क्लिप प्रत्यक्ष ऐकली. मंजूळ आहे किलबिलाट.

हे काही कारणाने चालत नसल्यास मला सुचणारे काही पर्याय...

  • प्रत्यक्ष ऑडिओ क्लिपची फाइल (.wav / .wma / .mp3) गुगल ड्राइव्हसारख्या ठिकाणी पब्लिक अ‍ॅक्सेसने शेअर करणे. अन तिचा दुवा देताना target = "_blank" त्या कोडमध्ये लिहिणे. जेणेकरून क्ल्यायंटवरचे डिफॉल्ट ऑडिओ प्लेयर नव्या ब्राउझर टॅबमध्ये वापरले जाऊन क्लिप प्ले होईल.
  • संगणकावरील किंवा चतुरभ्रमणध्वनीवरूल मूव्हिमेकर अ‍ॅप वापरून एखादे चित्र वापरून (स्टॅटिक) व्हिडिओ फाइल बनवणे अन युट्युबद्वारे शेअर करणे.
खेडूत's picture

27 Apr 2015 - 10:36 am | खेडूत

छान ! :)

पॉइंट ब्लँक's picture

27 Apr 2015 - 11:21 am | पॉइंट ब्लँक

काय भारी लिहलय. हंसपन मस्त जमलाय!

कविता१९७८'s picture

27 Apr 2015 - 11:33 am | कविता१९७८

मस्तच

पैसा's picture

27 Apr 2015 - 11:39 am | पैसा

ऋषिचे अभिनंदन! मस्त हात चालतोय त्याचा!

लिखाण लै भारी! घरोघरी मातीच्याच चुली. हुजुरपागेतली चूल असेल तर जाळ जरा जास्त होईल एवढंच काय ते!

सौन्दर्य's picture

27 Apr 2015 - 7:14 pm | सौन्दर्य

"हुजुरपागेतली चूल असेल तर जाळ जरा जास्त होईल एवढंच काय ते!" वाक्य भलतेच आवडले. पत्नी हुजुरपागेत शिकली त्यामुळे तिला ह्या शाळेचा फार अभिमान आहे. बोलताना (येथे 'भांडताना' असे वाचावे) माहेरपेक्षा हुजूरपागा जास्त वेळा ऐकावी लागते.

श्रीरंग_जोशी's picture

27 Apr 2015 - 7:27 pm | श्रीरंग_जोशी

जरा अवांतर - हुजुरपागा या नावामागचा इतिहास कुणी सांगू शकेल काय? पागा म्हणजे घोड्यांशी संबंधित काहीतरी हे ठाऊक आहे.

प्रचेतस's picture

28 Apr 2015 - 8:56 am | प्रचेतस

पेशव्यांची घोड्यांची पागा त्या परिसरात होती.

श्रीरंग_जोशी's picture

28 Apr 2015 - 9:03 am | श्रीरंग_जोशी

उत्तराबद्दल धन्यवाद.

आमची शाळातर चक्क पागाच होती. त्यात आम्ही शिकायचो!! :))

आनन्दा's picture

27 Apr 2015 - 2:00 pm | आनन्दा

मस्त आहे.. स्वान झाला, आता श्वान जमतो का ते बघा.

साधा स्वान करायला घेतला तर तोंडाला फेस आला, नाही नाही ते ऐकून घ्यावे लागले. आता उगाच शिवधनुष्य पेलायला लावू नका. प्रतिसादाबद्दल आभार.

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Apr 2015 - 7:23 pm | राजेंद्र मेहेंदळे

तीनच सफरचंदात काम झाले म्हणायचे (मी ४-५ धारातीर्थी घातली होती..आणि कोणाच्या नकळत खाउन पण टाकली)

जुइ's picture

27 Apr 2015 - 7:35 pm | जुइ

छान दिसत आहे स्वान. लेखन शैली आवडली!!

स्पंदना's picture

28 Apr 2015 - 9:11 am | स्पंदना

तो राजहंस एक.....

भन्नाट लिखाण. आता कुणी तरी हेच्च डायलॉग कोल्हापूरी, सातारी, कोकणी आणि वैदर्भिय तालात लिहा.

सौन्दर्य's picture

28 Apr 2015 - 7:11 pm | सौन्दर्य

खरंच, हेच संभाषण इतर बोली भाषेतून वाचायला नक्कीच आवडेल.

बर्‍यापैकी बरा प्रयत्न!!

सौन्दर्य's picture

28 Apr 2015 - 7:18 pm | सौन्दर्य

मैत्रांनो, आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल आणि मदतीबद्दल खूप खूप आभार.

शिव कन्या's picture

28 Apr 2015 - 11:09 pm | शिव कन्या

खुसखुशीत!

स्वाती दिनेश's picture

28 Apr 2015 - 11:27 pm | स्वाती दिनेश

हंसाची कारागिरी आणि खुसखुशीत लेखन दोन्ही आवडले.
स्वाती