बीस साल बाद

विकास's picture
विकास in काथ्याकूट
19 Aug 2008 - 1:17 am
गाभा: 

आज म्हणजे १८ ऑगस्ट २००८ ला पाकीस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदावरून परवेझ मुशारफची "सालंकृत" उचलबांगडी झाल्याचे वाचले आणि अचानक बरोब्बर वीस वर्षांपूर्वी (१७ ऑगस्ट, १९८८ साली) पाकीस्तानवरील झिया उल हक यांची विमान अपघातात (की घातपातात?) हत्या होऊन अशीच किंबहूना याहूनही अधीक गंभीर हुकूमशाही संपल्याचे आठवले....

जनरल झीया उल हक यांनी १९७७ मध्ये झुल्फिकार अली भूत्तोंना पदच्यूत करून सत्ता काबीज केली... नंतर काही काळातच त्यांनी भूत्तोंना मृत्यूदंडाची सजा देऊन ती आमलात देखील आणली. मग बराच काळ हुकूमशाही टिकली. अर्थातच तेंव्हा अमेरिकेस (रेगन आणि मोठा बूश) त्यांचे सरकार असणे सोयीचे होते. कारण अफगाणिस्तानात तेंव्हा तत्कालीन सोव्हीएट युनियनने आक्रमण करून शीत युद्धातील नवीन डाव मांडला होता. त्याला तोंड देताना बाजूच्या पाकीस्तानचा जर उपयोग करून घेयचा असेल तर तेथे हुकूमशहा असेल तरच ते शक्य होते. त्यातूनच सुरवातीस रशिया विरोधात अमेरिकेस मदत करणारा पण गल्फ युद्धानंतर नंबर १ चा शत्रू ओसामा बिन लेडन तयार झाला! झियांच्या काळात काश्मिर प्रश्न हळू हळू बोकाळू लागला. शीतयुद्धाचे राजकारण आणि भारताची असलेली सोव्हीएटशी घनिष्ठ मैत्री याचा त्या संदर्भात झाला तर तोटाच होत होता. (एक गोष्ट फक्त म्हणजे तो मुद्दा युएनच्या सुरक्षा समितीपुढे येऊन देण्यापासून रशिया कदाचीत नकाराधिकार वापरून मदत करत असेल इतकेच).

नंतर अर्थातच बेनझीरचा आवाज वाढला. "काश्मिर के बीना पाकीस्तान अधुरा है" अशी घोषणा त्यांनी पाकीस्तानी नागरीकांच्या गळी उतरवऊन भारत द्वेषात स्वतःचे स्थान बळकट केले. (त्याला वाजपेयींनी विरोधी पक्षात असताना "फक्त" काव्यात्मक उत्तर इतकेच दिले की "अगर काश्मिर के बीना पाकीस्तान अधुरा है, तो पाकीस्तान के विना हिंदूस्थान अधूरा है"). एकंदरीत पाकीस्तानी राजकारण हे भारतद्वेषावर आधारीत ठेवण्यात पाकीस्तानचे राजकारणी यशस्वी ठरत आले आहेत. तसे करत असताना प्रचंड भ्रष्टाचार केला आणि विकासाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. अर्थातच त्यामुळे नवाज शरीफ पंतप्रधान असताना आधीच्या २० +२ वर्षांनी मुशारफनी सत्ता काबीज केली आणि आणिबाणी जाहीर करत एकाधिकारशाही आणली. नेहमी प्रमाणेच जे होयचे होते तेच झाले. आधी भोळ्या सामान्य जनतेला आशेचा किरण दिसला की आता तरी परीस्थिती बदलेल. काही अंशी बदलली ही. पण काही झाले तरी एकाधिकारशाहीच राहीली. झियांच्या कारकिर्दीत तयार झालेल्या ओसामाचा फायदा किमान नकळत स्वतःचे स्थान बळकट ठेवायला अमेरिकेतील ९/११ नंतर मुशारफना झाला. पण सत्तेच्या संदर्भातील पाकीस्तानात चालू असलेल्या पुनरपी जननम पुनरपी मरणम च्या खेळात परत एकदा हुकूमशहा पराभूत झाला आणि आत्ता जे काही ऐकत/वाचत आहोत त्याप्रमाणे परत भ्रष्ट सरकार सत्तेवर येत आहे...

म्हणले तर गेल्या दहा वर्षातील एकाधीकारशाही आणि वीस वर्षांपूर्वीची हुकूमशाही यात काही अंशी सकारात्मक फरक झाला. भूत्तो सहज फासावर चढवले जाऊ शकले पण नवाज शरीफच्या बाबतीत तसे करता आले नाही. थोडीफार आर्थिक परीस्थिती सुधारली. कदाचीत त्याचा परीणाम असेल पण जनता अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर येऊ शकली. आणि शेवटी मुशारफ हे एखाद्या अपघातामुळे सत्तेपासून लांब जायच्या ऐवजी मुकाट्याने पण धडधाकट असताना लांब जाऊ शकले. पुढे काय परीणाम होणार आहेत ते समजेलच.

एक राहून राहून वाटते की पाकीस्तानी जनतेस समजायला हवे की भारताचा द्वेष करत अंतर्गत अस्वस्थता ठेवून ना धड स्वतःचे भले होत आहे ना धड भारतीय उपखंडाचे. आज पाकीस्तानच्या सत्ताधार्‍यांच्या या अशाच आंधळ्या द्वेषाचा परीणाम म्हणून त्यांनी चीन ला काश्मिरचा काही भाग दिलाच पण इतर अनेक बाबतीत सार्वभौमत्वाशी चीन/अमेरिका/सौदी अरेबीया (मुशारफांचे नवीन घर) यांच्याशी तडजोड केली. आज हा देश एकीकडे चीन-अमेरीकेवर अवलंबून तर दुसरीकडे अतिरेक्यांशी संलग्न. यातील अमेरिकेचा टेकू काही कारणासाठी पण दुरावला ("गरज सरो वैद्य मरो" असे अमेरिकेचे परराष्ट्रधोरण असते) तर येथील अस्वस्थता वाढतच जाण्याची शक्यता जास्त वाटते.

आज अशी अवस्था आहे, ती पहाता कधी काळी "अखंड भारताची" स्वप्ने बघणार्‍यातील सुजाण पण, आता त्या कल्पनेच्या वाटेस,जातील असे वाटत नाही! आज "शेजारी" म्हणून मिळालेल्या या राजकीय भूभागाचा नजीकच्या काळात भारताला तोटा अधिकच संभवतो. त्याचा संबंध हा १९४७ साली ज्या कारणामुळे दोन राष्ट्रे निर्माण झाली त्याच्याशी नसून नंतर जे काही "चॉइसेस" राष्ट्रनिर्माण करण्यासाठी म्हणून पाकीस्तानने वापरले त्या "चॉईसेस" आणि त्यातून होणार्‍या "फलशृती"शी आहे.

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

19 Aug 2008 - 1:40 am | मुक्तसुनीत

लेखाचे टायमिंगदेखील अचूक आहे.

"नो न्यूज इज गुड न्यूज" असे इंग्रजीमधे म्हणतात. त्याचा अर्थ असा की, जर एखाद्या गोष्टीबद्दल बातमी येत नसेल तर त्या गोष्टीबद्दल आलबेल आहे असे समजायला हरकत नाही. पाकिस्तानमधल्या राज्यकर्त्यांना ही म्हण माहीत नसावी. ज्याठिकाणी सत्तेचे हस्तांतरण वारंवार रक्तरंजित किंवा रक्तविरहित बंडांमुळे होते , आजच्या राज्यकर्त्याला उद्या विरोधक म्हणून न रहाता, एकदम देशाबाहेर किंवा यमसदनास धाडण्यात येते, जेथे लोकशाही आणि हुकूमशाही यांचा आट्यापाट्या रंगलेला असतो ....हे समजून चालायला हरकत नाही की , कुठली एक राजकीय संस्था धड अस्तित्वात नाहीच. जे आहे ते म्हणजे कुतरझोंबड, संधीसाधूपणा, देशाचे लचके तोडत खाणे. आणि त्याला फोडणी हिरव्या धर्मांधतेची , पूर्वेकडे काश्मीर आणि पश्चिमेला तलिबान !

जिन्नांची धर्माधिष्ठित राष्ट्राची विचारसरणी आणि त्या विचारसरणीचे बाळ हे दोघे सपशेल उताणे पडले आहेत , पण म्हणून त्यानी इतराना सुखासुखी जगू दिले नाही !

मुशाफिर's picture

19 Aug 2008 - 2:17 am | मुशाफिर

>>एक राहून राहून वाटते की पाकीस्तानी जनतेस समजायला हवे की भारताचा द्वेष करत अंतर्गत अस्वस्थता ठेवून ना धड स्वतःचे भले होत आहे ना धड भारतीय उपखंडाचे.

मी आपल्या लेखातील मतान्शी बराचसा सहमत आहे. फक्त, आपल्या वरील विधानाबाबत माझा व्यक्तिगत अनुभव वेगळा आहे. किमान परदेशात असताना तरी भारताचा द्वेष करणारा पाकिस्तानी मला अजून भेटलेला नाही. ऊलट, जे पाकिस्तानी नागरिक भेटले त्याना भारताविषयी आपुलकी आणि जिव्हाळाच आहे, असा अनुभव आहे. तसेच, भारताविषयी (विशेषतः, आपल्या लोकशाहीविषयी) एकप्रकारची उत्सुकताही दिसून येते.

हे अनुभव व्यक्तिसापेक्ष आहेत त्यामुळे, हेच प्रातिनिधिक अनुभव आहेत असे म्हणू शकत नाही.

चतुरंग's picture

19 Aug 2008 - 2:31 am | चतुरंग

माझ्या बरोबर काम करणारे काही लोक हे पाकिस्तानी आहेत पण त्यांना भारताबद्दल फार आपुलकी आहे. तिथे घडणारे बदल, विशेषतः तिथली टिकून असलेली आणि विकसित लोकशाही, आय्.टी क्षेत्रात झालेली प्रगती, नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करण्याची तिथल्या युवकांची आकांक्षा ह्यांचे त्यांना एक जबरदस्त आकर्षण असते/आहे. आणि ते तसे बोलूनही दाखवतात. व्यक्तिशः त्यांना भारताबद्दल आकस नसतो. तसेच त्यांच्या देशात चाललेले घाणेरडे राजकारण, सत्तेचा रक्तरंजित खेळ(खंडोबा) ह्याबद्दलही त्यांची मान खाली जाते. त्या आघाडीवर आमच्या देशातल्या सामान्य लोकांनी सपशेल हार मानली आहे असे ते कबूल करतात. ते ऐकून आपल्यालाही वाईट वाटतेच! (आपल्याकडे घाणेरडे राजकारण आहे पण शेवटी लोकशाही आहे हा फार मोठा फरक आहे!)
(ह्या आधी 'ले गई दिल दुनिया जापानकी भाग १३' मधे सुद्धा जपानमधल्या पाकिस्तानी नागरिकाचा असा चांगला अनुभव वाचल्याचे स्मरते!)

चतुरंग

विकास's picture

19 Aug 2008 - 2:56 am | विकास

हे अनुभव व्यक्तिसापेक्ष आहेत त्यामुळे, हेच प्रातिनिधिक अनुभव आहेत असे म्हणू शकत नाही.

अगदी खरे आहे. मी पण म्हणून कुठली व्यक्ती भेटल्यास ती केवळ पाकीस्तानी आहे म्हणून तो शिक्का लावून मोकळा होत नाही.

मी आधीपण कधी तरी सांगितलेला हा अनुभवः मी बॉस्टनमध्ये विद्यार्थी होतो. दुसर्‍या एका शहरातील माझ्या एका भारतीय मित्राच्या वर्गात असलेल्या एका पाकीस्तानी मुलीचा १५-१६ वर्षाचा भाऊ बॉस्टनला येणार होता आणि कुठे रहायचे हा प्रश्न होता. आमचे अपार्टमेंट लहानच होते म्हणून आणि कुठेतरी वाटले की कोणा पाकीस्तानी अथवा भारतीय/बांगलादेशी मुसलमान मुलाबरोबर सोय करून दिली तर त्याला सुरवातीस गरज असलेला "कम्फर्ट" मिळेल. म्हणून माहीतील अशा सर्व प्रकारच्या व्यक्तींस विचारले पण सर्वांनी दुर्लक्ष केले. शेवटी तो आमच्या कडे १५-२० दिवस राहीला अतिशय व्यवस्थित आणि चांगला अनुभव त्याच्याकडून आला.

असे बरेच जण नवीन भारतीय विद्यार्थी आमच्याकडे रहायचे पण नंतर कोणी मुद्दामून संपर्क करून ओळख दाखवायचे नाहीत. पण हा त्याला अपवाद ठरला.

तरी देखील अशाही व्यक्ती पाहील्या आहेत ज्या अत्यंत "सटली" गोड बोलून भारताचा अपप्रचार करत असतात. आपल्याच माणसांना गोड बोलून एका प्रकारे "ब्रेन वॉशिंग" करतात. अशा व्यक्ती मी येथील ऍकॅडेमिक्समधे पाहील्या आहेत. पण तो मुद्दा वेगळा आहे. हे केवळ अनुभव म्हणून लिहीत आहे.

जे मी पाकीस्तानी जनतेचे म्हणून लिहीले ते वाचण्यावरून आणि पहाण्यावरून लिहीत आहे. कार्गीलच्या वेळेस एकवेळ आपली माणसे युद्ध नको म्हणून (विशेष करून भाजप आघाडीचे राज्य म्हणून जास्तच) बोलायचे पण पाकीस्तानी जनतेने स्वदेशात अथवा परदेशात असे जाहीर पणे म्हणल्याचे ऐकीवात नाही आणि पाहीलेलेपण नाही.

रेवती's picture

19 Aug 2008 - 4:18 am | रेवती

मलाही आला आहे. माझी पाकीस्तानी मैत्रिण ही अतिषय सोज्वळ व मोकळ्या मनाची आहे. काटेकोर स्वच्छता हा तिचा मोठा गुण म्हणावा लागेल. आश्चर्याची बाब म्हणजे माझ्याकडे हळदीकुंकवासाठी आली होती व त्यामधे तीला काही गैर वाटले नाही. भारतदर्शनाला गेली असतानाचा पोलिसांचा अनुभव वाईट होता पण आम्हाला वाईट वाटू नये म्हणून तिने तो कितीतरी दिवस सांगितलाही नाही.

रेवती

प्रियाली's picture

19 Aug 2008 - 3:47 am | प्रियाली

लेख आवडला. धावता आढावा ओघवता झाला आहे.
वर विकास यांनी दिलेल्या प्रतिसादातील गोष्टी मीही अनुभवल्या आहेत.

गोड बोलणे म्हणजे मन शुद्ध असणे नव्हे याचा अनेकदा अनुभव आला आहे.

सुनील's picture

19 Aug 2008 - 11:30 am | सुनील

समयोचित लेख.

दोन जुळी भावंडे , जन्मतेवेळीच झालेल्या काही दैवगतीमूळे दोन भिन्न वातावरणात वाढतात. पुढे मोठे झाल्यावर त्यातील एक होतो सज्जन पोलीस अधिकारी आणि दुसरा एक खतरनाक गुंड! अशा आशयाच्या अनेक चित्रपटकथा आपण पाहिल्या आहेत.

ह्याच दृष्टीकोनातून भारत्-पाकिस्तानकडे पाहिले असता काय दिसते?

आता भारतात सर्वकाही आलबेल आहे आणि पाकिस्तान पूर्णपणे रसातळाला गेला आहे, असे अजिबात नाही. परंतु, सर्व माजी पंतप्रधान आणि राष्ट्रपती भारतातच सुखाने राहू शकतात. पाकिस्तानप्रमाणे त्यांना परागंदा (अन्य देशात वा "वरती") जावे लागत नाही! हा फार मोठा फरक आहे.

एकाचवेळी जन्माला आलेल्या ह्या दोन देशात हा फरक का, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडे त्यांच्या प्रसुतीपूर्व काळात जावे लागेल.

१५ ऑगस्ट १९४७ ला ब्रिटीश गेले. त्यांच्याकडे असलेल्या भूभागाचे त्यांनी दोन भाग गेले. एका भूभागाच्या चाव्या त्यांनी मुस्लीम लीगच्या हातात दिल्या तर दुसरीच्या चाव्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या हाती दिल्या. लीग आणि काँग्रेस यांची जडणघडण आणि तोपर्यंतची वाटचाल याचीच छाया त्यांनी हे दोन भूभाग कशाप्रकारे हाताळले त्यावर पडते.

कोंग्रेसच्या पुढारीवर्गात समाजाच्या सर्व स्थरातील लोक होते आणि मुख्य म्हणजे तीचा अनुयायीवर्ग हा खेडोपाड्यात तळागाळापर्यंत झिरपला होता (कोणाला आवडो नआवडो, पण ही वस्तुस्थिती होती). याउलट लीगचा सर्व पुठारीवर्ग हा जमिनदार-सरंजामदारांचा होता. सर्वसामान्य जनतेशी त्याची नाळ जुळली नव्हती. किंबहुना, १९४६ च्या प्रांतिक निवडणूकात, आज पाकिस्तानचा भाग असलेल्या मुस्लिमबहुल पंजाब आणि वायव्य सरहद्द प्रांतात तर काँग्रेसला बहुमत मिळाले होते.

दुसरे म्हणजे, "स्वतंत्र पाकिस्तान" ही एकमेव मागणी सोडली तर, (समजा पाकिस्तान मिळाले) तर पुढे काय, ह्याचा रोडमॅप त्यांच्या पुढे नव्हता. याउलट काँग्रेसने लोकशाही, घटनासमितीची स्थापना, भाषावार प्रांतरचना आदि गोष्टींचे निदान सुतोवाचतरी केले होते.

शेवटी तेच झाले. पाकिस्तान जन्माला येऊनदेखिल बरीच वर्षे १९३५ चा गवर्मेंट ऑफ इंडिया ऍक्टच कार्यरत राहिला. भारतात मात्र घटनासमिती आणि घटना लेखन समितींची स्थापना झाली. त्यात सर्व विचारधारेच्या लोकांचा समावेश होता. जनसंघाचे संस्थापक शामा प्रसाद मुखर्जी हे घटना समितीत होते तर (ज्यांनी आयुष्यभर काँग्रेसला विरोध केला) ते डॉ बाबासाहेब आंबेडकर हे घटनालेखन समितीचे अध्यक्ष होते. भारताची पहिली पावलेच अशी दमदार लोकशाही मार्गाने चालली गेली.

आज ह्या दोन देशात जो फरक दिसतो त्याची कारणे ह्या पहिल्या पावलात आहेत, हे नाकारता येऊ नये.

पुढे कॉंग्रेसलादेखिल आपल्या मूळ उद्दिष्टांचा विसर पडला आणि ती भ्रष्टाचाराच्या गाळात आधिकाधिक रुतत गेली, हे खरेच. परंतु निष्पक्ष न्यायव्यवस्था, स्वतंत्र निवडणूक आयोग ह्या आणि यासारख्या अनेक राजकीय संस्था येथे सुरुवातीपासूनच स्थापल्या गेल्या जे पाकिस्तानात कधी घडलेच नाही.

आजही (जिल्हा पातळीवरील कनिष्ठ) न्यायालांत भ्रष्टाचार असला तरी, उच्च आणि सर्वोच्च न्यायालय हे बव्हंशी भ्रष्टाचारमुक्त आहे, अशी सामान्य जनतेची भावना आहे. आपले लष्कर हे कारण नसताना बराकीबाहेर येणार नाही, राजकीय आकांक्षा बाळगणार नाही, याची खात्री आहे. दगड आणि विट हेच पर्याय उपलब्ध असले तरी वेळचेवेळी निवडणूका घेतल्या जातील याची हमी आहे. आपल्या शेजांर्‍यांकडे यापैकी काहीच नाही.

(अपरीपक्व का होईना, पण भारतीय लोकशाहीचा अभिमानी) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मनिष's picture

19 Aug 2008 - 11:39 am | मनिष

मूळ लेख आणि प्रतिसाद दोन्ही खूप आवडले!

- (अपरीपक्व का होईना, पण भारतीय लोकशाहीचा अभिमान असलेला अजून एक) मनिष

सहज's picture

19 Aug 2008 - 12:08 pm | सहज

हेच म्हणतो.

मूळ लेख व प्रतिसाद उत्तम.

आनंदयात्री's picture

19 Aug 2008 - 12:36 pm | आनंदयात्री

लेख अन सुनिलरावांची प्रतिक्रिया आवडली.
सुनिलराव प्रतिक्रियामात्र का असतात ? एखादा असा माहितीपुर्ण लेख टाकावा त्यांनी.

मुक्तसुनीत's picture

19 Aug 2008 - 4:50 pm | मुक्तसुनीत

आनंदयात्री जे म्हणतात , तेच अगदी शंभर टक्के म्हणतो. सुनील यांचे लिखाण मी उपक्रमावरही वाचलेले आहे. अतिशय मुद्देसूद , नेमके लिहितात. पण फार कमी लिहीतात, प्रतिक्रियात्मकच लिहीतात... सुनीलराव , फार वेळ " अंडर द रेडार" फ्लाय करताय बॉ ! ;-)

संदीप चित्रे's picture

20 Aug 2008 - 2:01 am | संदीप चित्रे

मूळ लेख आणि सुनीलरावांची प्रतिक्रिया दोन्ही आवडले ..
दोन्हीमधे अतिशय मुद्देसूदपणे विचार मांडले आहे.
अजून येऊ दे :)

विकास's picture

19 Aug 2008 - 5:07 pm | विकास

सर्व प्रथम विस्तृत प्रतिसाद एकदम मस्त आहे!

दोन जुळी भावंडे , जन्मतेवेळीच झालेल्या काही दैवगतीमूळे दोन भिन्न वातावरणात वाढतात. पुढे मोठे झाल्यावर त्यातील एक होतो सज्जन पोलीस अधिकारी आणि दुसरा एक खतरनाक गुंड! अशा आशयाच्या अनेक चित्रपटकथा आपण पाहिल्या आहेत.

अगदी चपखल उदाहरण!

आता भारतात सर्वकाही आलबेल आहे आणि पाकिस्तान पूर्णपणे रसातळाला गेला आहे, असे अजिबात नाही.

असे म्हणायचा माझा देखील उद्देश नव्हता.

दुसरे म्हणजे, "स्वतंत्र पाकिस्तान" ही एकमेव मागणी सोडली तर, (समजा पाकिस्तान मिळाले) तर पुढे काय, ह्याचा रोडमॅप त्यांच्या पुढे नव्हता. याउलट काँग्रेसने लोकशाही, घटनासमितीची स्थापना, भाषावार प्रांतरचना आदि गोष्टींचे निदान सुतोवाचतरी केले होते.

येथेच लक्षात येते की पाकीस्तान हा जीना/मुस्लीम लिगचा हट्ट म्हणून आणि काही अंशी नेहरू-गांधी त्या राजकारणात (आणि समजून घेयला) कमी पडले म्हणून तयार झाले खरे पण रूळावीना गाडी दिली,त्या गाडीचा उपयोग रू़ळ न करताच चालू केला. परीणामी सुरवातीपासूनच "डीरेल्ड". कालच "सरदार" पाहीला. खूप प्रभावी चित्रपट वाटला. (स्क्रिप्ट - विजय तेंडूलकर). त्यात गांधीच्या तोंडी वाक्य आहे की "जीना रामाप्रमाणेच चंद्राचा हट्ट करत आहेत".ते वाक्य आजही खरे वाटावे अशीच स्थिती आहे. पाकीस्तान हे आदर्श मुस्लीम राष्ट्र म्हणून चंद्राप्रमाणे दूरच आहे...

जनसंघाचे संस्थापक शामा प्रसाद मुखर्जी हे घटना समितीत होते तर (ज्यांनी आयुष्यभर काँग्रेसला विरोध केला) ते डॉ बाबासाहेब आंबेडकर हे घटनालेखन समितीचे अध्यक्ष होते....पुढे कॉंग्रेसलादेखिल आपल्या मूळ उद्दिष्टांचा विसर पडला आणि ती भ्रष्टाचाराच्या गाळात आधिकाधिक रुतत गेली, हे खरेच.

वास्तवीक पहाता काँग्रेस ही एक चळवळ होती, पक्ष नव्हता. गांधीजी म्हणूनच म्हणायचे की काँग्रेस स्वतंत्र भारतात विसर्जीत करा म्हणून.... आज दुर्दैवाने काँग्रेसच नाही तर सर्वच पक्षांमध्ये राजकारण आणि सत्तासंपादनासंदर्भात पक्षीय लोकशाही नाही. तो पायंडा भारताच्या जन्मापासून पडला नाही. माणूस कितीही आदर्श असला तरी एका व्यक्तीचे निर्णय मानण्या ऐवजी "एकत्रीत शहाणपण" अर्थात "कलेक्टीव्ह विजडम" वापरणे हे लोकशाहीचे तत्व असते. परीणामी सामान्य जनता लोकशाही काही अंशी पाळते, सैन्यदल १००% पाळते पण पक्षीय राजकारण आले की लोकशाही शून्य... अशा अवस्थेतून आपण जात आहोत. पण तो वेगळ्या चर्चेचा विषय होवू शकतो.

असो. सर्व प्रतिसाद आणि वाचकांना मनःपूर्वक धन्यवाद!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2008 - 8:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विकासराव, मस्त लेख/आढावा आणि सुनीलरावांचा प्रतिसादही!

अवांतर: गेले २-३ दिवस एस.एस.गिल यांचं भाषांतरीत पुस्तक "भ्रष्टांगण" वाचत आहे. एस.एस.गिल भारतीय प्रशासन सेवेत ३५ वर्ष काम करत होते.
पुढे कॉंग्रेसलादेखिल आपल्या मूळ उद्दिष्टांचा विसर पडला आणि ती भ्रष्टाचाराच्या गाळात आधिकाधिक रुतत गेली, हे खरेच.
यात त्यांनी एवढी चीड येणारी उदाहरणं दिली आहेत की वाचतानाही मुठी आवळतात. करणाय्रांनी कसं केलं आणि समजून-उमजून काहींनी त्यांना कसा पाठींबा दिला एवढाच प्रश्न मला पडला.

डॉ.प्रसाद दाढे's picture

19 Aug 2008 - 5:07 pm | डॉ.प्रसाद दाढे

लष्कराची तटस्थता हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे असे मला वाटते. पाकीस्तानात लष्कराचा वरचष्मा सतत राहावा, लष्करी अधिकार्‍या॑ना मुलकी अधिकार्‍या॑पेक्षा कायम अधिक सोयी सवलती मिळाव्या व लष्कर हे मुलकी प्रशासनापेक्षा वरचढ राहावे म्हणून भारतद्वेष व भारताच्या आक्रमणाची भीती तिथे पसरवली जाते. सर्वसामान्य पाक नागरिका॑ना भारताचे सुप्त आकर्षण आहे तिरस्कार नाही पण राजकारणी व लष्कर मात्र त्या॑चे महत्व टिकावे यासाठी भारतद्वेषाने आ॑धळे झाले आहे.
सुदैवाने भारतात अजुनतरी सैन्य तटस्थ आहे. पण सध्या सर्व पक्षा॑नी आपल्या प्रिय भारताचे जे वाटोळे करायला घेतले आहे ते पाहून कधी कधी असे वाटते की स॑न्यस्त खड्ग बाहेर यावे

वरील काही प्रतिक्रिया वाचल्यावर मला आणखी काही मुद्दे मान्डावेसे वाटले.
>>आजही (जिल्हा पातळीवरील कनिष्ठ) न्यायालांत भ्रष्टाचार असला तरी, उच्च आणि सर्वोच्च न्यायालय हे बव्हंशी भ्रष्टाचारमुक्त आहे, अशी सामान्य जनतेची भावना आहे.

हे तितकस खर नाही! उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात चालणारा भ्रष्टाचार हा त्यान्च्याशी निगडीत असणार्या सर्वाना चान्गलाच परिचयाचा आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालय हे ही अपवादात्मकरित्या(च) भ्रष्टाचारमुक्त आहेत. न्यायाधीशानच्या राजकिय निष्ठा ह्या बर्याचदा नेमणूकान्चा आधार असतो. अगदी, न्यायालयिन चौकशी समित्यासुद्धा राजकिय नेमणूकाच असतात. सामान्य जनतेच म्हणाल, तर न्यायव्यवस्थेविषयी आपल्या देशातील शिकलेल्या लोकानाही न्यायव्यवस्थेची पूर्ण माहिती नसते, तेव्हा अशिक्षित लोकान्ची काय कथा? आणि महत्वाच म्हणजे, सर्वसाधारण लोकान्चा उच्च आणि सर्वोच्च न्यायालय ह्यान्च्याशी थेट सम्बन्ध फारच क्वचित येतो. तसेच, सामान्य माणस आपली मत वर्तमानपत्र वाचून किन्वा इतर माध्यमातून मिळणार्या माहितीतून बनवत असतात. आणि ही माहिती एकूण सन्खेच्या १% ही नसते. त्यामुळे, बरेच महत्वाचे मुद्दे जनतेपर्यन्त पोहोचतच नाहीत. अर्थात, ह्याला सम्पर्क माध्यमेही तेव्हढीच जबाबदार आहेत. पण, लेखाचा विषय पूर्णतः वेगळा असल्याने प्रतिक्रिया देताना अधिक विषयान्तर नको म्हणून टाळत आहे.

>>सुदैवाने भारतात अजुनतरी सैन्य तटस्थ आहे. पण सध्या सर्व पक्षा॑नी आपल्या प्रिय भारताचे जे वाटोळे करायला घेतले आहे ते पाहून कधी कधी असे वाटते की स॑न्यस्त खड्ग बाहेर यावे

लष्कराची तटस्थता, ही पूर्णपणे त्याच्या रचनेशी निगडीत आहे. आपल्या तीनही दलान्चे प्रमूख हे एकाच पातळीवर असून ते केवळ राष्ट्रपतीनाच उत्तरादायी असतात. (बर्याचशा देशात भूदल प्रमूख हाच सर्वोच्च प्रमूख असतो. उदा. पाकिस्तान.)तसेच, प्रत्येक दलाचा कारभार हा स्वतन्त्र कमान्ड द्वारे चालविला जातो. ही रचना स्वातन्त्रप्राप्तिपासूनच करण्यात आली आहे. जरी आता तीनही दलान्चे एक कौन्सिल असले, तरी त्याच्या प्रमुखास सम्पूर्ण निर्यणाधिकार (Executive Powers) नाहीत. त्यामुळे, भारतीय लष्कर एकाचवेळी उठाव करण्याची शक्यता फारच कमी आहे. ह्याला अपवाद म्हणून आणिबाणीच्या वेळेचे उदाहरण देता येईल. त्यावेळी श्रीमती ईन्दिरा गान्धी यानी एका खाजगी बैठकीत लष्करप्रमुखाना देश ताब्यात घेण्याचा सल्ला दिला. पण, त्यावेळच्या लष्करप्रमुखानी त्यास स्पष्ट नकार दिला होता, असे एका निव्रुत्त लष्करी अधिकाराच्या लेखात वाचल्याचे स्मरते. आणिबाणीनन्तर, लष्कराची रचना अधिकच विघटित केली गेली असेही वाचले आहे.

लष्करातील भ्रष्टाचार हा तर आता सर्वश्रुतच आहे. त्या विषयी वेगळ लिहीत नाहि. पण, ती द्रुष्टिआडची स्रुष्टी असल्याने सामान्य जनतेला लष्कराविषयी (इतर कोणहि सरकारी सन्स्था/सेवे पेक्षा) जास्त विश्वास असावा. त्यामुळे, लष्कराच्या हाती देशाची सत्ता गेल्यास सारे काही सुधारेल, असे वाटत नाही. शेवटी, लष्करी सैनिक आणि अधिकारी ही देखील आपल्याच समाजातुन आलेली माणसे आहेत.

जॉर्ज ओर्वेल याने '१९८४' ह्या त्याच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, सम्पूर्ण सत्ता (माणसाला) भ्रष्ट करते (Absolute Power Corrupts).

तरिही, ईतर विकसनशील देशातील आजची परिस्थिती पाहता, ७०% निरक्षर लोकसन्ख्या असलेल्या आपल्या देशात लोकशाही टिकली हे अभिमानास्पद आहेच!

अवान्तरः ह्या प्रतिसादात वापरलेल्या इतर प्रतिक्रिया प्रातिनिधिक वाटल्यानेच लिहिल्या आहेत. त्यातील मताना माझा कोणताही विरोध नाही. नन्तर उगीचच 'कलगीतुरा' रन्गायला नको! :)

भास्कर केन्डे's picture

20 Aug 2008 - 12:50 am | भास्कर केन्डे

व्वा!!
श्री. विकासरावांनी मुद्देसूद मांडलेला चांगला चर्चाविषय, श्री. सुनिल यांचा वेधक प्रतिसाद, तसेच वाचकांचा योग्य प्रतिसाद... एकंदरीत पूर्ण चर्चा खूप चांगली झाली आहे.

श्री विकास यांचे आणखी एक (वर चर्चा न झालेले) निरिक्षण फार आवडले - "सत्तासंपादनासंदर्भात पक्षीय लोकशाही नाही".

आपला,
(वाचक) भास्कर
आम्ही येथे वसतो.

आवडले.

"बीस साल बाद" चित्रपटातील हे गाणे अतिशय असमर्पक वाटले ;-) पण मधूनच एखादी ओळ मुशर्रफ यांना लागू होते. "अपना कोई साथी ढूंढ लीजिए (हमें छोडके कोई और!!!)
http://www.youtube.com/watch?v=gn_9gIB3_Pc