झाडपण

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
21 Apr 2015 - 11:00 am

कधी खंत करी कधी ते एकटे झाड..
नक्की झाड वाकडे-तिकडे म्हणून वेगळे !
का गेंड्याच्या नाकावरच्या शिंगासारख्या टेकाड्-फोडावर आले म्हणून आगळे !
नक्की माहीत जरा जास्त्च तिरके उगवले होते ते जणू एअर इंडीयाचा महाराजा.
हे तिरके म्हणून कुणी सरळमार्गी त्याच्या जवळ येत नसे.
अगदी पायवाटही त्याचा अगदी सावलीचाही विटाळ नको म्हणून थोड्या अंतरावरून वळसा घालून उतरायची खालच्या वाडी-वस्तीत.
त्या झाडाला जर बोलता आले अस्ते तर तेही ओरडून म्हणाले असते मी तुमच्यातलाच आहे..

गर्द देवराईला, ओढ्याच्या पांदीला आणी पिंपळपाराच्या फांदीला पण.
मुकाट वरून बघायचे मी सगळ्या झाडांपाशी,झाडावर,झाडाखाली चैतन्यझरा सळसळताना...
शाळेचा कडूनिंबाला गोड पोरांचा किलकिलाट
पाराच्या पिंपळाला दिवेलागणीपर्यंत लगबगाट
आणी आंबराईत तर गोड्-गुलाबी कुजबूजाट
मग मीच असा का फक्त पक्ष्यांच्या वाटेवरचा एक क्षणमात्र थांबा बाकी शुकशुकाट

पलीकडच्या कोसभर अंतराच्या म्.रे.च्या दगड-कट्ट्याला जास्त भाग्य आहे कारण तो रोज नव्याने धावणारी रेल्वे बघतो , तर कधी हवशी ट्रेकर उतरल्यावरच तिथेच गप्पा टाकून ताजे-तवाने होतात.

मग माझी जागा अभद्र की मीच कुरूप याचा विचार करत तो झोपी गेला.
दिवस नेहमीसारखा उजाडला. याला लवकर येणार्या उन्हामूळे जाग येत असे. वाडी मात्र अजून निपचित असे, हळूहळू जागी होत असे.आळसावलेल्या अजगरासारखी.
चार पाच जणांचा घोळका त्याच्याच दिशेला येत होता अगदी त्याच्यावरच लक्ष आणी त्यालाच लक्ष्य केल्यासारखा.
आता अजून काय ? मागच्या वेळेचा प्रसंग ताजा झाला.
चार अडगी गुराखी ह्याच्याच फांद्या तोडाय्च्या का विचार करीत होते पण वाकड्या फांद्या आणि "फार काही उपेग न्हायी या झाडाचा, एक फांदी सरळ न्हायी या बेण्याची" या अनुमानाने माघारी फिरले होते.
आत्ता सुद्धा यांचे पाठीवर काही दिसतयं, करवत असेल का आण्खी काही जवळ आल्याशिवाय कळणार नाही.
ते नजरेच्या टप्प्यात आणि हा त्यांच्या पुढ्यात दोघांनी तिथेच बोर्ड लावला त्याला कुंचल्यात फटकारण्यासाठी.
एक मात्र चहूबाजून फिरत राहीला एखादं जनावर पाहाव तसं त्याला मध्ये ठेऊन जणू हा अंगावरच धावून जाणार होता.
गळ्यातल्या कॅमेर्याने ५-१० अँगल पकडल्यावर तोही पहिल्या दोघांपाशी जावून काही बोलू लागला.
चवथा मात्र अजून ही फार दूरून्च न्याहळत होता..आणि सारखा काही टिपत होता जसं काही हा एक पुरातन मंदीर असावा किंवा किल्ल्याचा भग्नावषेश. झाडाचे कुतुहलही ओसंडून गेले आणि पानांनी न कळत सळसळ केली फांद्याही उगाच हात वारे करू लागल्या.
ते चार्-पाच आले तसे निघून गेले हा असाच उभा अंधारात विचित्र आकार धरून सकाळची वाट पहात.
*****
सुमारे आठवड्यानी तोच टिपणवाला नवीन दोघांना घेऊन आला एक एक शबनमवाला दाढीधारी तर दुसरी फिक्क्या रंगाच्या पातळातली चष्मावाली.
आता त्याचे कुतुहला अगदी शिगेला पोहोचले.
टिपणवाला शबनमवाल्याला अगदी झाडाजवळ घेऊन आला.कसाबसा हाताशी येणारा झाडाचा बुंधा त्याच्या पुढे तर हात लावताच येणे अशक्य. जमीनीला पूर्ण तिरक्या फांद्या आणि खाली खोल उतार.शबनमवाल्याने कसाबसा हात लावला बुंध्याला आणि म्हणाला "बरचं जुन झाडं दिसतय तरी कमीतकमी २५-३० वर्ष जुनं" टिपण मंद हसला त्याने पण लावला हात झाड जरा शहारले का काय असे त्याला वाटले कदाचीत भास असेल अशी मनाची समजूत घातली.
चश्मावाली दुरूनच काही बाही खरडत होती हातातल्या वहीवर. आणि अगदी लहानग्यासारखी अभावितपणे पेंन्सील ओठांवर टेकवत होती. हा ताण झाडाला असह्य होता.पण नेहमी प्रमाणे वार्‍याने मदत केली आणी त्यानी बरोबर आणलेल्या फुपाट्याबरोबर झाड फुगडी घालू लागलं.
टीपणः "चला निघू यात उनं व्ह्यायच्या आत पोहोचलं पाहिजे गावात"
शबनमः "हा प्लॉट नक्की क्लीक होईलना सत्यव्रत"
टीपणः "खात्रीने काही काळजी करू नकोस"
चष्मा:"संपूर्ण गीत तुला याच्यावरच का हवे ते तरी सांग"
टीपणः "वेळ आल्यावर सांगेन आणि ती वेळ लवकरच येणार आहे तो पर्यंत थोडा धीर धर"
चष्मा:"विषय टाळायला (पाठीत गुद्दा देत)तुझ्या कडून शिकायला हवे"
शबनमः"आणि सुचायला ही (टाळीसाठी हात पुढे करीत)"
चष्मा: (मनात) (या सत्यव्रतला कायम जगावेगळं का करायच अस्ते कुणास ठाऊक ? कुठलीही मालिका पाणी
टाकून वाढवायला नकार्.आणि सासु-सुना-रडारड्-उमाळे-कट असं काहीच नको अस्तं कथेत. तरी कश्या चालतात कुणास ठाऊक. थोडासा चक्रमच आहे झालं. पण कसाही असला तरी सच्चा आणि आपल्याला .....)आणी उगाच लाजली
तिघे दृष्टीआड होईपर्यंतच काय पण नंतरही पार संध्या़काळी राघूंचा थवा येईपर्यंत झाडाचा विचार्-भुंगा झाला होता.
मध्ये चार-पाच दिवस भाकड गेले नाही तरी पुरेशी सावली नसल्याने कडक उन्हातही कुणी फिरकत नसेच या झाडापाशी.
********
आणि सकाळी ४-५ वाजताच मोठे मोठे स्टँड त्यावरती रिफ्ले़क्टर्स,दोन चार गाड्या, जनरेटर-धूडाचा हत्ती रथ आणि दोन वेगळ्या व्हॅन खाली उतारासमोरच्या पांढरीच्या माळापाशी थांबल्या. झाडापासून ते अंतर फारफार तर ३-४ विजेचे खांब इतकेच तर होते.
सत्यव्रत पुढे येऊन कॅमेर्याचा अँगल लावून पुन्हा पुन्हा तपासून पहत होता. बाकीच्यांचे काम त्यांच्या पद्धतीने चालू होते कुठेही गोंधळ नाही की गडबड नाही प्रत्येकाच्या हातात सूचना-कागद रेखाटनासह होताच.
सुर्योदयाची वेळ पकडणे हेच ध्येय आहे हे प्रत्येकाच्य लगबगीवरून आणि हालचालीवरून झाडाने तत्काळ ओळखले.
शॉट मनासारखा झाला,सत्यव्रतने लॅपटॉपवर दोन्-तीन्दा पाहीलाही आणि त्याला पसंत पडला.
सर्व मांडामांड करायला जितका वेळ लागला त्यापेक्षा जरा जास्तच वेळ लागला आवरायला आता वेळ होती सकाळच्या न्याहारीची+चहा पानाची.
त्यापूर्वी सत्यव्रतने ध्वनीमुद्रीत केलेले शीर्षक गीत लावायला सांगीतले. आज चष्मावाली गुलाबी पंजाबी ड्रेसमध्ये होती तीने मदतनीसाला सूचना दिली आणि त्या उजाड जागेवर शीर्षक गीताचे स्वर उदबत्तेच्या सुगंधासारखे पसरू लागले.
अल्पोपहार आटपल्यावर सत्यव्रत झाडाच्या बुंध्याजवळ जाऊन उभा राहीला.आणि एक घट्ट आलिंगन दिले त्या हातात येणार्या बुंध्याला ( झाडालाही कळेना की आतून उचंबळून का येतेय ते) पण काहीतरी वेगळे अश्ब्द असे नक्की वाटत होते कदाचीत दोघांनाही.
सत्यव्रतने सगळ्यांना बाजूच्या जागेत बोलावले आता तो थोडासा बुंध्याच्या बेचकीच्या व्यासपीठासमान जागेत आणि हे सारे समोर बसलेले.
"हे झाड म्हणजे जगाने कितीही नाकरले अव्हेरले तरी जगण्याची दुर्दम्य इच्छा शक्ती कशी असते त्याचे जीवंत उदाहरण आहे. सर्वात जास्त ऊन्-पाऊस झेलणारे आणि अवघड जागी उभे राहूनही जगणारे.तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष झाडासारखे तर झाड. नाही मित्रांनो खालची आंबराई बघा लोक तीची निगा राखतात कॉतुक करतात.अगदी पिंपळाला,वडालाही मान आहे पूजा आहे.पण हे कुणी लावलेलं नाही आणी मालकीचं तर त्याहून नाही. सरळ अस्तं तर केंव्हाच सरपण किंवा अवजारासाठी कामी आलं अस्तं.पण हे त्याही कामाच नाही हेच बरं.झाडपणाच्या तत्वाशी तडजोड न करता ते उभं आहे पक्ष्यांच्या थांब्यासाठी मुंग्याना खायल्या देण्याकरताच फळ देण्यासाठी आणि पावसात मुळाखालच्या मातीला घट्ट धरून ठेवण्या साठी कारण पायवाटेवर पहीली शाळाच आहे.तिरके उगवण त्याच्या हातात नव्हतं पण सरळ वागण त्याच्या हातात आहे आणि ते झाड्पण तो निभावतोय म्हणूनच मी त्याला माझ्या या मालिकेच्या शिर्षकगीतात घेतलयं मालीकेची सुरुवात यानेच होईल अगदी नामावलीसुद्धा यावरच्.कारण मी ही एक असं झाड आहे रूढार्थाने टाकून दिलेल्या व्यवस्थेचं माझं कुळं मला माहीत नाही माझं मूळ माहीत नाही मी झाडपण निभावतोय फक्त."
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि झाडाच्या नकळत दोन्-चार पानांची आसवं ओघळली कारण त्याचे लक्ष होते चष्म्या आडच्या आणि कुणी पहात नाही ना अश्या रितीने थोपवलेल्या डबडबलेल्या डोळ्यांकडे !
झाड आज प्रसन्न्पणे झोपी गेल आता ते एकटे नव्हतेच या जगात, त्याचा सहोदर होता माणसांच्या जंगलात.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

एस's picture

21 Apr 2015 - 11:18 pm | एस

ते सदोहर ऐवजी सहोदर करा. बाकी छानच.

(बदल केल्यामुळे प्रतिसाद संपादित)

मास्टरमाईन्ड's picture

21 Apr 2015 - 2:03 pm | मास्टरमाईन्ड

छान लिहिलंय

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Apr 2015 - 2:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

छान :)

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2015 - 2:45 pm | अत्रुप्त आत्मा

सुंदर अभिव्यक्ति!

पॉइंट ब्लँक's picture

21 Apr 2015 - 4:54 pm | पॉइंट ब्लँक

मस्त. :)

अजया's picture

21 Apr 2015 - 4:56 pm | अजया

मस्त लिहिलंय!

नीलमोहर's picture

21 Apr 2015 - 8:03 pm | नीलमोहर

छानच की ओ !!
'झाडपण' शब्द खूप आवडला..

यशोधरा's picture

21 Apr 2015 - 8:49 pm | यशोधरा

आवडलं.