आठवणींच्या वहीतून

एक एकटा एकटाच's picture
एक एकटा एकटाच in जनातलं, मनातलं
25 Mar 2015 - 7:39 pm

स्थळ : दहावी अ चा वर्ग
वेळ: मधल्या सुट्टीनंतरची

त्या दिवशी शेवटचे चार पिरिअडर्स सायन्स-1 च्या प्रक्टिकल्सचे होते. दहावीला सायन्स-1 हां विषय विश्वासराव मेडम घ्यायच्या. वर्गात बेंचच्या पाच रांगा होत्या. प्रत्येक रांगेत जवळपास पंधराएक मुले बसायची. वर्गाबाहेर कधीही कुठेही जाताना मुले नेहमी ह्या बेंचच्या रांगाच्या हिशोबानेच निघायची. सगळ्यात पहिली दाराजवळची पहिली रांग, मग त्याच्या बाजूची ,मग त्याच्या बाजूची.
प्रक्टिकल्स म्हटले की आमच्यासाठी पर्वणीच असायची. मेडम तिकडे प्रयोगशाळेत बिझी असताना सगळा वर्ग 2 तासासाठी निवांत असायचा. प्रत्येकजण ह्या मोकळ्या वेळेचा उपयोग स्वत: च्या हिशोबाने स्वत:साठी वापरायचा. काहिजण क्लास चा उरलेला आभ्यास करायचे, कुणी सकाळची उरलेली आपली झोप टेली करत असायचे, तर कुठे शेवटच्या बेंचवर बुक क्रिकेट जोरात चालु असायचे. मुलींना मात्र कशाची काही पडलेली नसायची त्याआपल्या त्यांच्या कुजबुजीतून चाललेल्या त्याच्या प्रायव्हेट गोष्टी सगळ्या वर्गाला कश्या कळतील ह्याची पुरेपुर काळजी घेत असायच्या. आम्हाला मात्र ह्या अश्या फुटकळ गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता.
त्यावेळेस आमच्या चार पाच मित्रांचा बेंजो पार्टीचा ग्रुप होता. आम्ही वर्गात फ्री पिरिअडला त्यावेळच्या फेमस गाण्यावर बेंच वाजवयाचो. आमचा बेंजो मस्तच होता. आमच्यापैकी अंकुर जिथे बसायचा त्या बेंचचा रिदम चांगला होता एक थाप मारली की आवाज मस्त घुमायाचा. त्याचा डेस्क ही फ्लेट होता त्यामुळे त्यावर ती केमलीनची पत्र्याची कम्पासपेटी अगदी व्यवस्थित रहायची आणि अश्या प्रोपर बेसमुळे त्यावर बोटांची कतरी अशी काही वाजायाची की क्या बात है।।।।।
ह्या सगळ्यासोबत आमच्याकडे त्यावेळेस अजुन एक वाद्य होत त्याच स्पेसिफिक नाव नव्हतं पण होता फार गरजेचा आयटम. ह्याशिवाय आमचा बेंजो कधीच फेमस झाला नसता. एकदम झक्कास आयटम होता तो आणि बनावायलाही अगदी सोप्पा. एक करकटक बेंचच्या पुढच्या भागात रोवायचा मग त्याच्या वरच्या भागात शंकरपाळ्या करायच्या ज्या चकत्या असतात ना त्या टाकायच्या की झाला तयार. आता बेंचवर थाप पडली की त्या व्हायब्रेशनने त्या चकत्या झनझन वाजायाच्या.
गाणं कुठलाही असो त्या चकत्या न चुकता परफ़ेक्ट रिदमवर झनकायाच्या आणि गाणं फुल्ल बास विथ ट्रेबल सकट वाजायचं.
त्यादिवशीही आम्ही अंकुरच्या बेंचवर जमलो होतो. मी आणि अंकुर मेन वाजवणारे. पुढच्या बेंचवर चप्पा(शंशाक) आणि जाड्या (हेमंत) पाठमोरे बसले होते. तेव्हा अल्ताफ राजाचं "तुम तो ठहरे परदेसी....." हे गाणं सोल्लीड गाजत होत. रिक्षा म्हणू नका, पूजा म्हणु नका,
अगदी चहाच्या टपरीपासुन ते शेजार्यांच्या बाल्कनी पर्यंत सगळीकडे नुसतं हेच गाणं वाजत असायचं. सहाजीकच आमच्यावर ह्याचा प्रभाव पडला नसेल तर नवलंच. सुरुवातीची देवाची काही गाणी वाजवून झाल्यावर मागल्या बाकावरुन अल्ताफाच्या फेमस गाण्याची फरमाईश झाली. आम्हाला एकदम चेव चढला आणि का चढु नये. नेमका आजच आमच्या ओर्केस्ट्रामध्ये जाड्या पण होता. नुकत्याच झालेल्या त्याच्या (एकतर्फी) प्रेमभंगामुळे तो ही असली गाणी अतिशय मनापासून गायचा.
सुरुवातीची पेटीची ट्यून चप्पाने हुबेहूब तोंडाने वाजवल्यावर जाड्याने सुरुवात केली
" तुम तो ठहरे परदेसी.......
तुम तो ठहरे परदेसी
साथ क्या निभाओगे........."
अगदी समेवर अंकुरची केमलीनवर कतरी फिरली. चप्पा दोन्ही हातात दोन नाणी घेउन बेंचवर मस्त ठेका जमावत होता. बेंच वर मारलेल्या प्रत्येक थापेवर करकट मधली छिल्लर परफेक्ट जागेवर येत होती.अंकुर वर्गात बेंचच्या सगळ्यात शेवटच्या रांगेत बसायचा. प्रक्टिकल्ससाठी मधल्या रांगेतली मुले आत्ताच गेली होती. त्यामुळे आमच्याकडे अगदी निवांत वेळ होता. गाणं रंगात आलं होत.
" सुबह पहेली गाडीसे
सुबह पहेली गाडीसे
घरको लौट जाओगे....."
जाड्या अगदी जीव तोडून गात होता. पाठच्या बेंचवरच्या नल्लीच्या तोंडुन "वाह" अशी दाद मिळाली. जाड्या पुर्ण जोमात आला होता आणि आमचा बेंजो फुल्ल भरात.अंकुरची कतरी, बेंचवरची छिल्लर आणि जाड्याचा लागलेला स्वर्गीय आवाज ह्या सगळ्यानी मिळुन वातावरण अगदी भारावून गेल होत.अचानक मैफिलीचे आजूबाजूचे वातावरण एकदम शांत झाल आणि आम्हाला हे जाणवलं ते त्या शांततेत चिरकलेल्या जाड्याच्या आवाजाने. इतका वेळ बेंच वाजावण्यात गुंग असल्याने आमचं दरवाज्याकडे लक्ष्यच नव्हतं दरवाज्यामध्ये विश्वासराव कमरेवर हात ठेउन उभी होती. तिच्यासकट सगळा वर्ग आमच्याकडेच बघत होता. दोन क्षणाच्या सायलन्स नंतर विश्वासराव कडाडली
"अजिबात खोट बोलायच नाही मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलय तुम्हीच होता ते
हो हो तुम्हीच होता ते ......"
ती तणतणत आमच्याकडे आली
"खरं सांगा तूम्हीच वाजवत होता ना बेंच
मी पाहिलय ते अजिबात खोट बोलायच काम नाही"
विश्वासराव जाम तापली होती. आम्ही काय बोलणार सगळे परिस्थितीजन्य पुरावे आमच्या विरोधात होते. डायरेक्ट ओपन ऍण्ड शट ची केस होती. आम्ही मान खाली घालून उभे होतो
वर्गात आता फक्त बाहेर पडनार्या पावसाचाच काय तो आवाज होता बाक़ी सगळे चिडीचुप. "चला.... " पुन्हा विश्वासराव कडाडली
आम्ही गुमान तिच्या मागंन चालु लागलो. नाही म्हणायला वर्गातल्या सगळ्यांच्या नजारा आता आम्हाला दारापर्यंत सोडायला आल्या होत्या. आम्ही चौघेजण विश्वासरावच्या मागुन पहिला चप्पा मग जाड्या त्याच्यामागुन मी आणि सर्वात शेवटी अंकुर असे एका लाईनीत चालत होतो. बाई पहिल्या प्रयोगशाळेत गेल्या तिथे मुलांना काहीतरी करायला सांगुन पुन्हा आम्हाला कहिहि न सांगता चालु पडल्या.आम्ही गुमान त्यांच्यामागुन चालु लागलो पुन्हा सिक्वेंस सेम. बघनार्याला हां प्रसंग पहाताना बदकीन आणि तिची पिल्लं जेवल्यानंतर शतपावली करायला निघाली आहेत असच वाटलं असतं. अखेर ही दिंडी टिचररुमच्या इथे येउन थांबली.
"इथेच ओळीने पायाचे अंगठे धरुन उभे रहा"
तिच्यामागुन गावभर हिडंण्याच्या शिक्षेपेक्षा ही ओणवं उभं रहायची शिक्षा केव्हाही परवडेबल होती. फ़क्त हेमंत जाड्याचाच काय तो प्रॉब्लेम होता. आम्ही सगळे गुपचुप ओणवे उभे होतो. आम्हाला झालेल्या शिक्षेबद्दल आम्हाला अजिबात काही वाटत नव्हतं. आम्हाला प्रोब्लेम होता तो फ़क्त शिक्षा नेमकी टिचररुमच्या समोर झाली होती हां. आता ही गोष्ट सगळ्या शिक्षकांना आणि पर्यायाने सगळ्या शाळेला कळणार होती. पण आता हां विचार करण्यात काहीच अर्थ नव्हता. थोडावेळ ओणवं उभ राहिल्यावर टाईमपास म्हणुन मी इकडे तिकडे पाहू लागलो. हेमंत जाड्याची अवस्था खरचं वाईट होती. एक तर ओणव उभ राहून पाठिलाही रग आली होती आणि त्यात पुन्हा पाउस समोरच्या कठड्यावर आपटुन सरळ आमच्या अंगावर येत होता.सगळं अंग भिजल होत. तेव्हढ्यात मला पेसेजच्या एण्डला हालचाल जाणवली. सुरुवातीला मला वाटल की कुणीतरी खालच्या वर्गातला मुलगा आम्हाला अश्या अवस्थेत पाहून मजा घेत असावा. नीट लक्ष्य देऊन पाहिल तर तो धीरज होता. आता हा आणि इकडे कशाला मरायला आला होता देव जाणे. तो हातवारे करून मला काहीतरी विचारत होता. मला पहिल्यांदा काहीच समझलच नाही नंतर कळल की तो मला "मी तिकडे येऊ का?" असं विचारत होता. त्याच्या अश्या विचारण्यानेच मला शॉट लागला. मी खुणेनेच त्याला "ये" अस सांगितल्यावर तो सरळ माझ्याजवळ येउन गुपचुप ओणवा उभा राहिला. आता हां लगोलग मला लागलेला दूसरा शॉट होता. मला काय कळतच नव्हत. असाच थोडावेळ गेल्यावर मला पैसेजच्या एण्ड्ला पुन्हा हालचाल जाणवली. आता तिकडे चप्पाची मैत्रीण उभी होती. आयला आता हीच काय? मी विचार करत असताना तिने खिश्यातुन रुमाल काढला आणि मला दाखवून तो चप्पाला त्याच भिजलेल डोक पुसायला द्यायची विनवणी करू लागली. मला त्याही परिस्थीतीत कपाळावर हात मारायचा मोह आवरता आला नाही. आयला प्रेम आंधळ असत मान्य आहे पण प्रेम येडछाप पण असत हे मला तेव्हा कळलं. कुणाचं काय तर कुणाचं काय. मघाशीच मला काहीही कारण नसताना धिरजने दोन सणसणीत शॉट दिलेले असल्याने माझ्यात आता नविन काही घेण्याची अजिबात ताकद नव्हती.आता काहीही झालं तरी तिकडे पहायच नहीं अस ठरवून डोळे गच्च मिटुन घेतले.
"चला निघा आता......." पाठिमागुन विश्वासरावाचा आवाज आला. आम्ही पडत्या फ़ळाची आज्ञा शिरसांवद मानून तडक कलटी मारली. मघाशी आम्हाला दाराशी सोडायला आलेल्या नजारा येताना आमच्या स्वागतासाठी देखिल दारावर हजर होत्या. आम्ही गुपचुप आमच्या जागेवर जाऊन बसलो. मनातल्या मनात त्या अल्ताफ राजाला आणि त्याच्या त्या गाण्याला यथेच्छ शिव्या दिल्या. ह्या सगळ्या प्रकारात एक कोडं मात्र सुटलं नव्हतं की धीरज आमच्या सोबत तिथे का ओणवा उभा होता?
शाळा सुटल्या सुटल्या मी धीरजला गाठला आणि विचारल
"काय रे? तू कशाला तिथे आला होतास?"
"कशाला म्हणजे? शिक्षा भोगायला"..धीरज
"अरे तेच विचारतोय कसली शिक्षा?" मी कुतुहलाने विचारल
"अरे मला अजित बोल्ला की आत्ताच विश्वासराव वर्गात येउन अटेंडन्स घेउन गेली. जे लोक प्रक्टिकल्सच्या वेळेत बाहेर फिरायला गेलेत त्यांना विश्वासराव टिचररुमकडे घेउन गेलीय तुम्ही सगळे गेलात आणि मी एकटाच राहिलो उगाच प्रकरण वाढायला नको म्हणून स्वत:हून आलो.... बरोबर केल ना मी?"
हे ऐकून मला काय बोलाव तेच कळेना.
उत्तरादाखल मी फ़क्त मान डोलावली. ह्याउपर तुम्हीच सांगा मी अजुन काय करू शकलो असतो.

-अमोल परब

कथा

प्रतिक्रिया

ख्या: ख्या: ख्या: ख्या:!

लय भारी.

उत्तरादाखल मी फ़क्त मान डोलावली. ह्याउपर तुम्हीच सांगा मी अजुन काय करू शकलो असतो.

आम्हीपण फक्त मान डोलावली आहे. अजून काय करणार? ;-)

खेडूत's picture

25 Mar 2015 - 8:09 pm | खेडूत

@

बघनार्याला हां प्रसंग पहाताना बदकीन आणि तिची पिल्लं जेवल्यानंतर शतपावली करायला निघाली आहेत असच वाटलं असतं.

हा हा हा!

टवाळ कार्टा's picture

25 Mar 2015 - 8:10 pm | टवाळ कार्टा

हा हा हा...अस्ला बँजो माझ्यापण वर्गात होता =))

रुपी's picture

26 Mar 2015 - 1:00 am | रुपी

भारीच. फारच मस्त खुलवून सांगितला आहे प्रसंग!

बदकीण आणि तिची पिल्लं - तर खासच!

(मॅडम, फ्लॅट लिहिताना Shift + E वापरा.)

अप्रतीम....शाळेचे दिवस आठवले..

श्रीरंग_जोशी's picture

26 Mar 2015 - 8:59 am | श्रीरंग_जोशी

लेखनशैली लैच भारी. खूप हसवलं. हे वाक्य तर षटकारच.

बदकीन आणि तिची पिल्लं जेवल्यानंतर शतपावली करायला निघाली आहेत

बाकी या लेखामुळे शाळेतल्या शिक्षाही आठवल्या. तशी शिक्षा भोगायची वेळ माझ्यावर क्वचितच यायची. पण दहावीत असताना शाळेच्या शेवटच्या आठवड्यात उशिरा पोचण्यामुळे (पूर्वीही इशारे मिळाले होतेच) संपूर्ण मैदानभर बदकचालीने फेरी मारयाची शिक्षा भोगली होती. मांड्यांची पार वाट लागली होती पुढचे दोन दिवस.

विशाल कुलकर्णी's picture

26 Mar 2015 - 12:35 pm | विशाल कुलकर्णी

लै म्हंजी लैच :)

एक एकटा एकटाच's picture

26 Mar 2015 - 11:22 pm | एक एकटा एकटाच

सगळ्यांचे मनपुर्वक आभार

अभिजीत अवलिया's picture

27 Mar 2015 - 3:05 am | अभिजीत अवलिया

छान आठवण आहे. अशा गोष्टी नंतर आठवल्या की खूप हसू येते. शेवटी आयुष्य म्हणजे काय असते तर अशा अनेक सुंदर आठवणींचे पुस्तक.

एक एकटा एकटाच's picture

17 Aug 2015 - 11:42 pm | एक एकटा एकटाच

प्रचंड सहमत

ऋतुराज चित्रे's picture

18 Aug 2015 - 3:46 pm | ऋतुराज चित्रे

मजा आली वाचताना.

आम्हीही शाळेत असताना असले धंदे करायचो. बाकाच्या फटीत ब्लेड अडकवून बँजोचा आवाज काढायचो. रबरबँडचे एक टोक बाकाच्या कडेला अडकवून दुसरे टोक पेनात अडकवून पेन पुढे मागे हलवुन रबराला छेडून गिटारसारखा आवाज काढायचो. खडु बाकावर ठेवून पेनाने दाबुन घासल्यास व्हायोलिनसारखा आवाज निघायचा. हा आवाज फक्त शाईच्या पेनने घासल्यास यायचा, बॉल पेनने घासल्यास येत नसे.

एक एकटा एकटाच's picture

18 Aug 2015 - 7:31 pm | एक एकटा एकटाच

येस.......
ह्यापैकी फ़क्त खडुचा आयटम कधी ट्राय नाही केला.
बाक़ी सगळी वादय आमच्या बेंजोत होती.

भिंगरी's picture

18 Aug 2015 - 3:56 pm | भिंगरी

खुपच मस्त वात्रट आठवणी

तीरूपुत्र's picture

18 Aug 2015 - 7:54 pm | तीरूपुत्र

आम्ही पण असे काही मजेदार कामे केली आणि शिक्षकांनी शिक्षा पण केली होती.मधल्या बेंच वर बसलेल्या मुलांना बेदम मारत होतो.ते पुढे बघत असतील तर मागच्या मुलांनी मारायचे आणि मागे बघत असतील तर पुढच्या मुलांनी मारायचे.खूप मज्जा येत यायची.

तीरूपुत्र's picture

18 Aug 2015 - 7:58 pm | तीरूपुत्र

खूप मज्जा येत यायची >>> खूप मज्जा यायची.....

नीलमोहर's picture

19 Aug 2015 - 10:54 am | नीलमोहर

भारी !!