“माझी जडण घडण”

सुचिकांत's picture
सुचिकांत in जनातलं, मनातलं
2 Mar 2015 - 8:39 pm

माझे वडील इतिहास आणि गणिताचे शिक्षक आहेत. पण इंग्रजी व्याकरणावर सुद्धा त्यांची चांगली पकड आहे. मी शाळेत असताना त्यांनी माझ्याकडून active voice - passive voice, affirmative, negative हे सगळे प्रकार पक्के करून घेतले होते, आणि त्यांनी शिकवलेल्या इंग्रजीचा मला आयुष्यभर फायदा झाला.

अभियांत्रिकी डिप्लोमा झाल्यावर, माझ्याकडे नोकरी नव्हती. घरात किती दिवस बसून काढणार? काहीतरी करायला हवं म्हणून हात पाय मारायला सुरुवात केली. मोजून १७ ठिकाणी कॉलसेंटरच्या मुलाखती दिल्या. प्रत्येक ठिकाणी शेवटच्या HR मुलाखती पर्यंत गेलो, आणि HR ने हे सांगून मला नकार दिला कि, तुमच्या इंग्रजी भाषेवर मातृभाषेचा प्रभाव आहे. एकदा सेनापती बापट रस्त्यावरच्या JACC च्या कार्यालयात सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत जवळ जवळ ७-८ मुलाखतींच्या फेऱ्या पूर्ण केल्या आणि २ दिवसांनी निकाल आला कि, तुमच्या इंग्रजीवर मातृभाषेचा प्रभाव आहे. रडायचे बाकी होते आता. त्यांच्याबद्दल काहीच तक्रार नाही, असतील त्यांच्या काही अटी ज्या मी पूर्ण करू शकत नव्हतो. पण मी इंग्रजी जरा सुद्धा चुकीचा बोलत नव्हतो हे ही तेवढंच खरं. आणि माझ्या बरोबर नकार मिळणारे इंग्रजी माध्यमांचे सुद्धा होते बरका! म्हणजेच इंग्रजी माध्यमात शिकून सुद्धा फ़ायदा नाही, जर अशा आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर मध्ये नोकरी हवी असेल तर त्यासाठी पूर्णपणे वेगळा अभ्यास करावा लागतो. अर्थात ब्रिटीश उच्चार पद्धती, अमेरिकन उच्चार पद्धती वगैरे.

संभाजी पार्क जवळच्या Macdonalds मध्ये मुलाखत दिली. माझ्यासोबत अनेक मुले होती, वेगवेगळ्या केशभूषा केलेली आणि यो-ड्यूड या पद्धतीचे इंग्रजी बोलणारी. अगदी माझ्यासोबत त्यांना Inox मधल्या Macdonalds मध्ये नोकरी सुद्धा मिळाली. पहिल्या दिवशी आम्हा सर्वांना फरशा साफ करणे, बाथरूम साफ करणे अशी कामे देण्यात आली. अधून मधून मॅनेजर येउन पहायचे कि काम कसे चालले आहे, २-४ शब्द बोलायचे आणि निघून जायचे. पहिल्या दिवशी सकाळी मी माझ्या कामाला बाथरूम मधून सुरुवात केली आणि त्याच दिवशी संध्याकाळ पर्यंत मला काउंटर च्या आतमधून कॉल्ड-ड्रिंक भरून देण्यापर्यंत बढती सुद्धा मिळाली. ते सर्व यो-ड्यूडस संध्याकाळी सुद्धा बाथरूम साफ करत होते, आपल्या चुकीच्या इंग्रजीमध्ये फाड फाड बोलून आणि अर्थात कुरकुर करून सुद्धा. ७ च दिवसात मला माझ्या क्षेत्रातली नोकरी मिळाली, आणि मी MACD सोडले.

ही नोकरी होती, online लॉटरी मध्ये. Inlott-E-Gaming चेन्नई च्या कंपनीमध्ये. त्यांची पुण्यात ज्या दुकानांमध्ये लॉटरी चालायची तिथल्या संगणक दुरुस्तीची नोकरी होती. तिथे खूप शिकलो. सायकलला मागे CPU बांधून पूर्ण पुण्यात संगणक दुरुस्ती करत फिरायचो. मी पुण्यातल्या सगळ्या चहाच्या टपरयांमध्ये चहा पिलेला आहे. पूर्वेकडे शिरूर, उत्तरेकडे मंचर, नारायणगाव, पश्चिमेकडे तळेगाव, आणि दक्षिणेकडे खेड शिवापूर सगळीकडे फिरून संगणक दुरुस्ती केली. लॉटरिची दुकाने शहरात सर्वत्र आहेत, अगदी बुधवार पेठेतल्या कुंटण खान्यांमध्येसुद्धा. ज्या वेळेस मला सर्व प्रथम तिथे जावे लागले तेव्हा खूप घाबरलो होतो, पोटात भीतीचा गोळा आला होता. ते दुकान सुधा अगदी "त्या" झाडाच्या खालीच होते. संगणक नादुरुस्त म्हणजे लोकांचा रोष. दुकानदाराचा रोष, कारण त्यांचा धंदा बुडायचा आणि लोकांची लॉटरी. संगणक दुरुस्त करताना पावडर, भडक लिपस्टिक लावलेल्या स्त्रिया आजू बाजूला येउन उभ्या रहायच्या, कधी कधी डोळ्यात डोळे घालून पहायच्या, घाम फुटायचा, पण काय करणार माझ्या क्षेत्रातला अनुभव मिळणे अत्यंत गरजेचे होते. ३-४ वेळा त्या भागातले कॉल केल्यावर भीती मेली. कामातले कौशल्य पाहून दुकानदार खुश व्हायचे, office मध्ये सांगायचे सुचिकांतलाच पाठवा दुरुस्तीसाठी.

काही दिवसांनी एक विचित्र प्रसंग घडला. वारजे पुलाजवळ काही लॉटरिची दुकाने होती. रिक्षामधून उतरलो, आणि ५० मीटर लांब असतानाच पाहिले कि पोलिसांनी त्या लॉटरीच्या दुकानांवर छापा टाकला होता, कारण त्या दुकानांमध्ये अनधिकृत लॉटरी तसेच मटका हा प्रकार सुद्धा चालायचा. स्वतःला भाग्यवान समजलो कि त्या वेळेस मी तिथे नव्हतो आणि सरळ घर गाठले. office मध्ये सांगून ठेवले परत मी काही तिथले call करणार नाही. नोकरीवरून काढले तरी बेहत्तर.

अगदी थोड्याच दिवसात "Wipro Technologies" मध्ये मुलाखत दिली, वाकडेवाडी रस्त्यावर कार्यालय आहे त्यांचे. तिथेसुद्धा HR फेरी पर्यंत पोहोचलो. HR ने काही प्रश्न विचारले त्यांना माझी काही उत्तरे :-
प्रश्न - तुम्हाला Wipro मध्ये काम करावेसे का वाटते?
उत्तर - विप्रो चे कर्मचारी सर्वात समाधानी कर्मचारी म्हणून ओळखले जातात (स्मित करून). मग रामायण कि विप्रो किती चांगली आहे वगैरे.
प्रश्न - तुमच्या biodata नुसार तुमच्या शिक्षणात खंड पडला आहे, कारण?
उत्तर - आमचा टेलरिंग चा धंदा आहे, वडिलांना मदत करत होतो. (११वि सायन्स ला नापास झालो होतो हे कशासाठी सांगू?)
माझी निवड झाली. मग ६ महिने टिच्चून काम केले. मला साईट मिळाली होती – IBM येरवडा. जबरदस्त मेहनत घेतली. वेळप्रसंगी डबल शिफ्ट मध्ये काम केले. हुशार/दिग्गज/माझ्यापेक्षा चांगलं इंग्रजी बोलणारे असून सुद्धा तिथे माझा प्रभाव पडला. कारण कुरकुर न करता, पूर्ण मन लाऊन मी काम करायचो. काही मुले office boy बरोबर नसेल तर CPU एका ठिकाणहून उचलून दुसरीकडे ठेवायची सुद्धा नाहीत. पण मी मात्र न लाजता ही सुद्धा कामे करायचो. बाकीच्यांना न जमलेल्या दुरुस्त्या मी केल्या त्यामुळे आपोआपच आपल्या कामाचा दरारा निर्माण झाला. मी एकमेव होतो ज्याने IBM चे कोलते-पाटील, मगरपट्यामध्ये ४०० संगणकांचे जाळे बनवताना सिंहाचा वाटा उचलला, त्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली. त्याचे फळ लवकरच मिळाले.

नोकरी. कॉम वर रेस्युमी ठेवला होता (2006). इंग्लंड मधून मला फोन आला. माझ्याकडे क्योसिरा कंपनीचा टाटा इंडिकॉमचा CDMA भ्रमणध्वनी होता. मी बोलल्यावर ३-४ सेकंदांनी तिकडून प्रतिसाद मिळायचा. पहिल्या फेरीत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालो. प्रत्यक्ष मुलाखतीसाठी गिगास्पेस मध्ये बोलावले. तिथे सुद्धा ज्यांनी मुलाखत घेतली ती ब्रिटीश व्यक्ती होती. त्यांनि सुद्धा विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य ती उत्तरे दिली. आणि मी त्यांच्या बरोबर काम करण्यात किती उत्सुक आहे हे माझ्या हावभावांमधून दाखवून दिले. मला ती नोकरी मिळाली आणि आज ९ वर्षांनी अजून ३ नोकऱ्या बदलून मी मॅनेजर पदावर कार्यरत आहे.

तात्पर्य - इथे माझे कौतुक करण्याचा हेतू अजिबात नाही तसेच मी खूप काही आयुष्यात मिळवलय असे सुद्धा नाही. अभिमान आहे तो फक्त मराठी शाळेमध्ये शिकल्याचा. मला माझ्या शाळांनी, आणि पालकांनी काही महत्वाच्या गोष्टी शिकवल्या. पक्कं इंग्रजी व्याकरण, कष्ट करण्याची तयारी, व्यवहारातील हुशारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, पडेल ते काम करण्याची तयारी - मराठी शाळेत असताना, सर्व प्रकारची कामे केली आहेत. शाळेत गेल्या गेल्या वर्ग स्वच्छ्य झाडून काढणे, फळ्यावर त्या दिवशीची तारीख टाकणे, जेवणाच्या मोठ्या सुट्टीनंतर पडलेले खरकटे केरसुणीने झाडून काढणे, शाळेतला कचरा गोळा करणे, वर्ग सजवणे, घंटा देणे, कार्यक्रमांच्या वेळेस दुकानातून किरकोळ गोष्टी विकत आणणे इ.

!अर्थात जीवन कसे जगावे याचे शिक्षण!

आज “पैसा फेक तमाशा देख” च्या जमान्यात जिथे प्रत्येक ठिकाणी वातानुकुलीत आहे, प्रत्येक ठिकाणी पैसा ओतून शिक्षणाशिवाय बाकी गोष्टींवर जास्त भर दिला जातो अशा वातावरणात मी शिकलो असतो तर मला नाही वाटत कि मी, कुंटणखान्यात जाउन संगणक दुरुस्ती केली असती किंवा सायकल वर फिरून नोकरी केली असती, किंवा MACD मध्ये आनंदाने बाथरूम साफ केले असते,

कथाअनुभव

प्रतिक्रिया

रामदास's picture

2 Mar 2015 - 9:22 pm | रामदास

आवडला.

आदूबाळ's picture

2 Mar 2015 - 9:28 pm | आदूबाळ

लेख आवडला.

श्रीरंग_जोशी's picture

2 Mar 2015 - 9:30 pm | श्रीरंग_जोशी

प्रांजळ आत्मकथन आवडले.

तुमच्यापासून नक्कीच खूप काही शिकण्यासारखे आहे.

अवांतर - मी देखील सातवीपर्यंत पूर्ण मराठी व आठवी ते दहावी सेमी इंग्रजी माध्यमात शिकलो. तेव्हाच्या इंग्रजीच्या सरांच्या शिकवण्यामुळे आजदेखील बरोबर काम करणार्‍या अनेकांपेक्षा व्याकरणवापराच्या बाबतील उजवा ठरतो :-) .

बहुगुणी's picture

2 Mar 2015 - 9:34 pm | बहुगुणी

या क्षेत्रात धडपडून प्रगति करू पहाणार्‍यांना चांगला धडा आहे, हाती घेतलेल्या कार्यात पुढे जायचं असेल तर कोणत्याही अवांतर शारिरीक/ बौद्धिक कामाची लाज किंवा कमीपणा वाटायला नकोच.

मिपावर स्वागत! आणखी अनुभव असतील तेही लिहा.

प्रामाणिक प्रयत्नाने यशस्वी होणार्या माणसाचे साधेसरळ अात्मकथन वाचुन आनंद वाटला.

फारएन्ड's picture

2 Mar 2015 - 10:17 pm | फारएन्ड

लेख आवडला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

रेवती's picture

2 Mar 2015 - 10:22 pm | रेवती

लेखन आवडले.

टवाळ कार्टा's picture

2 Mar 2015 - 10:27 pm | टवाळ कार्टा

:)

एस's picture

2 Mar 2015 - 10:29 pm | एस

वाटचालीतील अडचणींबाबत बरंचसं सेम पिंच म्हणू शकतो, त्यामुळे लेख फारच आवडला. मिपावर स्वागत. आणि अजून एक सांगायचे झाले तर अशाच गरजू होतकरू मुलांना हेरून मदत करणे सुरू ठेवा.

खटपट्या's picture

3 Mar 2015 - 3:13 am | खटपट्या

+१

सुचिकांत's picture

2 Mar 2015 - 11:03 pm | सुचिकांत

मी मराठी शाळांकरिता काम करतो सध्या. कोणीही मोठी व्यक्ती मराठी शाळांबद्द्ल बोलायला तयार होत नाही! दुर्दैव,
त्यामुळे आपलीच काहीतरी खटपट. प्रामाणिकपणे सांगतो इथे फक्त मराठी शाळांची शिकवणूक म्हणूनच या लेखाकडे पाहावे.
तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

अशा अनुभवकथनांची खरंच गरज आहे. आमच्यासारख्या आजच्या प्रवाहाविरुद्ध पोहणार्‍यांसाठी तर असे अनुभव नक्कीच प्रेरणादायी असतात.

साधे सरळ आत्मकथन आवडले.

पलाश's picture

3 Mar 2015 - 8:08 pm | पलाश

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Mar 2015 - 11:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर प्रांजळ निवेदन !

निशिकान्त's picture

2 Mar 2015 - 11:38 pm | निशिकान्त

लेख छान लिहिलाय.

असंका's picture

2 Mar 2015 - 11:44 pm | असंका

सुरेख!

धन्यवाद!

सौन्दर्य's picture

3 Mar 2015 - 2:39 am | सौन्दर्य

खूप छान आणि मनमोकळे लिहिले आहेत तुम्ही. तुमची मराठी शाळा आणि शिक्षणाविषयीची आस्था भावली. स्वॅप्स नी म्हंटल्या प्रमाणे तुमच्यासारख्या मुलांना शोधून त्यांना मदत करा. ऑल द बेस्ट.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Mar 2015 - 2:46 am | निनाद मुक्काम प...

लेख आवडेश

नाखु's picture

3 Mar 2015 - 9:21 am | नाखु

तटस्थ निवेदन फार आवडले. याच प्रकारच्या प्रसंगातून अगदी शालेय वयात (माधुकरी मागून शिक्षण केले असल्याने)अनुभवल्याने लिखाण फार जवळचे वाटले.

सामान्य वाचक's picture

3 Mar 2015 - 9:52 am | सामान्य वाचक

थोरा मोठ्यान च्या चरित्रान पेक्षा आपल्यामधल्या कुणी लिहिलेले जास्त कळते, समजते, पटते
पुढच्या आयुष्या साठी शुभेच्छा

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Mar 2015 - 10:04 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

खुप छान सुचिकांत. मिपावर स्वागत.

सविता००१'s picture

3 Mar 2015 - 10:17 am | सविता००१

सुंदर लिहिलंय. आवडलं.

मंजूताई's picture

3 Mar 2015 - 10:56 am | मंजूताई

प्रांजळ आत्मकथन आवडलं!

राही's picture

3 Mar 2015 - 11:43 am | राही

प्रांजळ, प्रामाणिक आणि पारदर्शी.
आवडलंच.

पगला गजोधर's picture

3 Mar 2015 - 12:18 pm | पगला गजोधर

छान… आवडलं … इनस्पीरेशनल … टु थम्बस अप ….

सुप्रिया's picture

3 Mar 2015 - 12:59 pm | सुप्रिया

प्रांजळ आत्मकथन आवडले. इनस्पीरेशनल आहे.

अतिप्रांजळ आणि जबराट आत्मकथन. मान गये.

सानिकास्वप्निल's picture

3 Mar 2015 - 6:00 pm | सानिकास्वप्निल

सुरेख लिहिले आहे.
आवडले.

नगरीनिरंजन's picture

3 Mar 2015 - 7:26 pm | नगरीनिरंजन

प्रेरणादायक!

कविता१९७८'s picture

3 Mar 2015 - 8:20 pm | कविता१९७८

मस्त

खटासि खट's picture

3 Mar 2015 - 11:35 pm | खटासि खट

वा वा ! हे मस्तच !!

अर्धवटराव's picture

4 Mar 2015 - 12:06 am | अर्धवटराव

३० -३५ वर्षापुर्वी जन्मलेल्या बहुतेक मध्यमवर्गीय मराठी मुलांना असा अनुभव थोडाफार तरी आला असेल.
इंग्रजी भाषा एक ज्ञानभाषा म्हणुन शिकणं गरजेचं आहेच. आजच्या काळात गरज भासल्यास अमेरीकन एक्सेण्ट एक स्कील म्हणुन शिकता येते व मग कुठलीच अडचण येत नाहि.

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2015 - 2:48 pm | पिलीयन रायडर

छान लिहीलय! आवडलं!!

सस्नेह's picture

4 Mar 2015 - 5:24 pm | सस्नेह

प्रांजळ कथनशैली छान. पण मराठी शाळेत शिकल्यामुळे हलकी कामे करू शकलात इंग्रजी शाळेत शिकल्यावर ती करू शकलो नसतो, हा दृष्टीकोन पटला नाही.

सुचिकांत's picture

4 Mar 2015 - 10:09 pm | सुचिकांत

नाव न घेता नुसत्या वर्णावरून ओळखलत?

नाव न घेता नुसत्या वर्णनावरून ओळखलत?

नाव न घेता नुसत्या वर्णनावरून ओळखलत?

सौंदाळा's picture

4 Mar 2015 - 5:48 pm | सौंदाळा

छान लिहिले आहे.
खुप कठीण परिस्थितीवर मात करुन वर आल्यामुळे अभिनंदन.
कॉल सेंटरचे माहिती नाही पण माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (पुण्यात तरी) इंग्लिशचे इतके स्तोम वाटत नाही.
जनरली मिटिंग्ज सोडल्या तर हिंदी, हिंग्लिश, मराठी वापरली जाते.
मुलाखती दरम्यान्सुद्धा इंग्लिशचे ज्ञान बघण्यापेक्षा टेक्निकल स्किल्सच जास्त तपासली जातात.