अठरा पावलांचा स्टार्ट (मराठी-दिन लघुकथा स्पर्धा)

आदूबाळ's picture
आदूबाळ in स्पर्धा
12 Feb 2015 - 6:06 pm

पोरं टीम पाडून तयार होती, पण जोशा कुठेच सापडत नव्हता. मधली सुट्टी निम्मी संपली होती. जोशा कॅप्टन. त्याच्याशिवाय खेळ चालू होऊ शकत नव्हता.

वेळ घालवायला मग पाँडीला शिव्या शिकवायचा नेहेमीचा टाईमपास चालू झाला. पाँडी याच वर्षी साऊथमधून कुठूनतरी शाळेत आला होता. त्याला मराठी कळत नसे, हिंदी जेमतेम. त्याच्या आईबापांनी मारे इंग्लिश मीडियम म्हणून घातलं, पण शिकवणं फक्त इंग्रजीत, बाकी सगळं मराठीत. कधीकधी शिकवणंसुद्धा. पाँडी गाळात. पोरांना हे पाहून उद्योग सुचलेच. कुणी हाक मारली की त्याला प्रतिसाद म्हणून मराठीत "भाडखाव" म्हणतात असं बग्गाने शिकवलं. कोणी "ए पाँडिये..." म्हणायचा अवकाश, पाँडी लगेच "भडकाव!" असं उत्तर देई. मराठीच्या भोसले मास्तरावर हा प्रयोग व्हायची पोरं वाट बघत होती.

दुरून इंडियन ऑईलची पिवळी कॅप दिसली. जोशा स्टाफरूम मधून बाहेर पडत होता. जोशा स्टाफरूममध्ये? मधल्या सुट्टीत? मॅटर गंभीर आहे, पोरांना समजलं.
"म्हातार्याने बोलावलं होतं" आपल्याभोवती सगळी पोरं गोळा झाल्यावर जोशाने खुलासा केला.

"म्हातारा" उर्फ मार्तंड जिवाजी उमरखेडकर उर्फ शाळेच्या क्रिकेट टीमचा कोच. हा काही शाळेत शिक्षक वगैरे नव्हता. कोणत्याशा बँकेतून रिटायर झाला होता. म्हातारवेळचा उद्योग म्हणून शाळेच्या टीमला क्रिकेट कोचिंग करत असे. रणजी खेळला होता शहात्तर साली. मधल्या सुट्टीत ग्राऊंडवर खेळणार्या पोरांकडे बारीक लक्ष ठेवून असे. त्यातला एखादा नजरेत भरला तर मिकी ट्रॉफीला खेळवे. थोडा मोठा पोरगा असला तर मथुरावाला किंवा अंडरफोर्टीन. म्हातार्‍याच्या नजरेत भरावं म्हणून पोरंही जीव लावून खेळत. पांढरे कपडे घालणं मोठा मान.

आठवीच्या पोरांमधून यंदा काशीकर – काशा – नक्की होता. जोशालाही संधी मिळणार दिसत होतं - गेल्या वर्षी मथुरावाला खेळलेला विकेटकीपर दिघे दहावीत गेला होता. जोशा बॅटिंगही बरी करायचा. दिघ्या त्यात औरंगजेब.

"ए! ऐका!" जोशा पारावर चढून ओरडला. सगळी पोरं भोवती गोळा झाली. "म्हातार्यानी बोलावलं होतं. आपल्या टीमला मथुरावालाच्या पोरांबरोबर मॅच घ्यायची आहे."

सेकंदभर शांतता. ही बातमी पोरांच्या सामूहिक कवटीत जिरायला वेळ गेला. मग गडबडगिल्ला उसळला.

"मथुरावालाच्या पोरांबरबर?!" नाकातला शेंबूड वर खेचत रामटेके.
"कधीय मॅच?" प्रॅक्टिकल बग्गा.
"टेनिसवरय की लेदरवर?" काख खाजवत सूर्या.
"सगळी पोरंयत का मथुरावालाची?" घारपुरे.
"अरे पण ती मोठी पोरंयत..." पेद्रट पेमगिरीकर.
"काशा आहे आपल्याकडे..." कोणीतरी आशावादी.
अगदी पाँडीलाही काहीतरी विचारायचं होतं.

ही मोठ्ठी गोष्ट होती. एखाद्या टीममधल्या एकदोघांना उचलणं म्हातार्याने पूर्वी केलं होतं, पण सगळ्याच्या सगळ्या टीमला मथुरावाला ट्रॉफीला खेळणार्या शाळेच्या टीमसोबत भिडवणं पूर्वी कधी ऐकलं नव्हतं. म्हणजे म्हातारा सांगू पहात होता, की नववी-दहावीच्या वर्गांतून सर्वोत्तम खेळाडू निवडून बनलेल्या शाळेच्या टीमच्या खालोखाल तुम्हीच! सगळ्या पोरांना हवेत तरंगायला झालं होतं.

"ऐका बे." जोशा सगळ्यांना थोपवत म्हणाला. "म्हातारा कुठेतरी चाल्लाय पंध्रा दिवसांसाठी. त्यात नेटस करून मथुरावालाची पोरं वैतागू नयेत म्हणून दोन फ्रेंडली ठेवल्यात. एक आपल्या सकाळच्या शाळेबरबर..."

एकदोन माना तुच्छतादर्शक हालल्या. सकाळच्या शाळेची टीम गू आहे यावर सगळ्यांचं एकमत होतं.

"...आणि एकासाठी शाळेतलीच टीम शोधत होता तो." जोशा क्षणभर थांबला. काहीतरी सांगायचं होतं ते गिळलं. "लेदरवर मॅचय. पुढच्या शनवारी सकाळी."

जोशाचा पॉज बग्गाच्या संशयखोर नजरेतून सुटला नव्हता. "धाव्वीची पण? दिघेबिघे?"

जोशाने साफ दुर्लक्ष केलं.

"तर पोराहो... प्रॅक्टिसला लागूया. दहा दिवस राहिलेत. आपली स्ट्राँगेस्ट टीम उतरली पायजे. चला! लेदरवर कोण कोण खेळलंय पूर्वी? जमदग्नी..."

पोरं झडझडून कामाला लागली. पारावर बैठक भरली, पण मधली सुट्टी संपत आली होती. पोरं पांगली.

बग्गाने जोशाला धरलं.
"काय गेमंय रे जोशा?"
"कसली गेम? चल्ल्...असलं काय नाय..." जोशाने झटकायचा प्रयत्न केला.

प्रशांत भागवत उर्फ बगावत उर्फ बग्गा तल्लख डोक्याचा अवली इन्सान होता. बापाच्या पेपरस्टॉलवरच्या रहस्यकथा वाचून वाचून त्याचं टाळकं त्याच दिशेने चाले.

"बापाला चढाय शिकवू नको लुल्ली. शनवारी धाव्वीची पोरं कशी खेळणार? तीनपर्यंत चव्हाणसर सायन्स मॅथ्स चोदवतो त्यांना.. पुढे वेगळे क्लासबिस."

"बग्गा..."

"बरं ते सोड. म्हातार्याला आपलीच टीम कशी काय सापडली रे? म्हतारं आपल्याला खेळताना बघायला कधी आलं होतं? आपल्याकडे अझर जडेजा नी तेंडुलकरच भरलेत ना..."

"तुला काय करायचंय झाट्या" जोशा उचकला. "तू थोडीच खेळणारयस?" हे खरं होतं - बग्गा flat footed होता, त्यामुळे मैदानी खेळ खेळू शकत नसे. मधल्या सुट्टीत क्रिकेट खेळणं वेगळं, पण इतक्या महत्त्वाच्या मॅचला त्याला घेणं शक्यच नव्हतं.

"म्हणून काय झालं? कळायला नको तुम्ही कुठे पो टाकून आला ते?"

जोशा विचारात पडला. टीम ठरवतानाच गेम बाहेर पडणार होती. बग्गाचं नेटवर्क आख्ख्या शाळेत भारी होतं. असा माणूस आपल्या बाजूने असलेला बरा. शेवटी काशाही त्याचा मित्र होता. काशामुळेच म्हातार्‍याच्या डोळ्यांत ही टीम भरली होती. काय व्हायचा तो राडा होणारच होता, पण काशाला शक्य तितकं वाचवायचं जोशाने ठरवलं.

"चल बग्गा - पेप्सीकोला खाऊ..."

---xx---xx---

टीम ठरवायच्या आधीच बोभाटा झाला. मधली सुट्टी संपताच मथुरावालाची पोरं नेट्सला बाहेर पडली. दुरून बोलर नवा वाटत होता, पण आठवीच्या पोरांना अठरा पावलांचा तो तालबद्ध स्टार्ट चांगलाच परिचयाचा होता. समोरच्या गणिताकडे लक्ष देण्याच्या ऐवजी पोरं खिडकीतून बाहेर टकमक बघू लागली.

"मा......" कोणीतरी दबक्या आवाजात शिवी हासडली.

महत्त्वाच्या मॅचच्या दहा दिवस आधी टीमचा स्टार बोलर प्रतिपक्षाबरोबर सरावाला उतरतो, याचा अर्थ पोरांना उलगडून सांगायची गरज नव्हती. संतापाची एक सामूहिक लाट आठवीच्या वर्गावर पसरली. काशाच्या कुळाची उद्धारगत चालू झाली. दुपारपर्यंत टीमचं आशास्थान असलेला काशा पोरांच्या नजरेत एकाएकी दगलबाज, हरामी झाला.

"तू कसं अलाऊड केलंस? कॅप्टन ना तू?" पोरं जोशाला विचारत होती.
जनमताचा बदलता रेटा हताशपणे पहाणं सोडून जोशाच्या हाती फारसं काही उरलं नव्हतं.
"अबे, काशाचं सिलेक्शन आगोदरच झालं होतं. मॅच नंतर ठरली. म्हातार्‍यानेच काशाला त्यांच्याकडून खेळायला सांगितलंय." जोशा कळवळून सांगत होता, आणि पोरं आणखी भडकत होती.

पोरांची प्रतिक्रिया स्वाभाविक आहे हे जोशाला कळत होतं. आठवीची बॅटिंग तगडी होती. पेमगिरीकर आणि पुरोहितसारखे तंत्रशुद्ध खेळाडू, सूर्या आणि जमदग्नीसारखे पिंच हिटर्स तर होतेच; स्वतः जोशा बरी बॅटिंग करायचा. पण आठवीची बोलिंग मात्र काशा या एकखांबी तंबूवर पेलली होती. दुसरा पेस बोलर देशमुख स्टॅमिनात मार खायचा. चोरडिया बंधू स्पिनर्स होते, पण यथातथाच. बाकी पेमगिरीकर आणि सूर्याची कामचलाऊ फेकी.

काशा मात्र पेसचा अनभिषिक्त सम्राट होता. त्याच्याइतका बेक्कार पेस बॉलर मथुरावालाच काय, मथुरावालाच्या टीममध्येपण नव्हता. पेस बॉलिंगसाठी तुम्ही ताडमाड धिप्पाड पाहिजे असं नसतं. खांद्यात जोर पाहिजे. स्टॅमिना पाहिजे. मुख्य म्हणजे खांद्यावर डोकं पाहिजे. काशाकडे हे सगळं होतं, मुख्य म्हणजे डोकं. अठरा पावलांचा स्टार्ट घेऊन काशा रोरावत येई. डोकं झुकलेलं, समान अंतराची पावलं. स्टंपपाशी उडी मारून हातातून बॉल सुटे. जबरदस्त वेग. बॅट्समनला काही कळायच्या आत काठी. नाहीतर मागे जोशाकडे कत्ती.

पोरांच्या नेहेमीच्या भेगाळलेल्या टेनिस बॉलवरही काशाचा वेग धडकी भरवणारा असे. त्यातून ही मॅच लेदरवर होती, आणि तीही शाळेकडून मथुरावाला खेळणार्‍या टीमबरोबर. म्हणजे कोरा लेदर बॉल काशाच्या हातात मिळणार होता. त्या हत्याराने काशा समोरची अर्धी टीम गारद करू शकत होता!

आता गारद होण्याची पाळी आठवीच्या पोरांवरच आली होती. आठवीचा कोणीही बॅट्समन काशाच्या तोफखान्याला तोंड देऊ शकेलच याची खात्री देववत नव्हती.

आपल्याकडून जोशा या घटनेला जास्त महत्त्व देत नव्हता. टीमचं मनोधैर्य टिकवून ठेवणे हा एक भाग, पण काशाने दगाबाजी केल्यासारखं त्याला खरंच वाटत नव्हतं. त्याने हुशारी करून तोंडफाटक्या बग्गाला आपल्याकडे वळवून घेतल्याने हा जनक्षोभ दोनेक दिवसांत मावळेल असा त्याचा कयास होता.

तसं झालंही असतं, पण काशाची अकड नडली. त्याने जोशाचीच "मैं बेबस हूं" वाली लाईन जारी ठेवली असती तरी चाललं असतं. पण त्याच्याही डोक्यात हवा गेल्यासारखं झालं. आठवीच्या पोरांत मिसळणं त्याने एकाएकी बंद केलं. वर्गात असे तितकाच. शाळेत येता-जाताना, मधल्या सुट्टीत, तो मथुरावालाच्या टीमबरोबर राहू लागला. ती टीम एक स्वतंत्र यंत्र होतं. एकदा मथुरावालाच्या टीममध्ये गेलं, की आपण कोणीतरी स्पेशल असण्याची भावना बळावत असे. जुने मित्र सुटत, आणि टीम हेच सर्वस्व बनून जाई. संघभावना वाढावी म्हणून म्हाताराही त्याला प्रोत्साहन देत असे. काशाच्या बाबतीत हे इतक्या भर्र्कन झाल्याचं पोरांना खटकलं.

याचाच परिणाम म्हणून की काय, पण काशाला अचानक बारीकसारीक अपघात होऊ लागले. मुतारीत एकाचा धक्का चुकून लागला आणि काशाचा पाय भरला. सरांची पाठ वळलेली असताना खडूचे तुकडे येऊन काशाच्या डोक्यात बसू लागले. काशा बाकावर बसायच्या एक क्षण आधी कोणीतरी चुकून अर्धं केळं फळीवर सारलं.

" त्याला काय त्रास देतायत पोरं..." जोशा बग्गाजवळ कुरकुरला.

"माजलाय फुकनीचा" बग्गाने निकाल दिला. "आणि तुला का पाणी सुटतंय रे? तू सोलुशन काढ यातून. कसे भिडणार आहोत आपण काशाला?"

यावर विचार करून जोशाचं डोकं पिकलं होतं.

"तूच सांग बग्गा. पेम्या आणि पुरोहित बेस्ट आहेत रे, पण काशाने त्यांना उखडला तर बँड वाजेल आपला. सूर्या आणि जमदग्नी काय टिकून खेळणारे नाहीत. मी जमवेन एकवेळ, पण खाली गाळ आहे रे मग..."

"ओपनर बेस्टेत आपले..."

“विचार कर - शनिवारी सकाळी मॅच. लेदर बॉल म्हणजे मॅटिंगची विकेट असणार. दमट ओली. काशा सहा बॉलमध्ये चार तरी खुळके काढेल..."

बग्गा पोटरी खाजवायला लागला. विचारमग्न असताना त्याच्या कोणत्या ना कोणत्या अवयवाला खाज सुटत असे. "म्हणजे तुला म्हणायचंय, की काशाच्या पहिल्या दोन ओव्हर काढल्या की पुढे टेन्शन नाही..."

"दोन खूप झाल्या. मी म्हणतो पहिली काढली बिनविकेटची तरी पुरे." जोशा म्हणाला. "दुसर्‍या बाजूने मोहसीनो बोलिंग करणारे. तो स्विंगवाला आहे, पेस नाही फारसा. ते ठीके."

बग्गाचे डोळे चमकले. "हात्तिच्या एवढंच ना? मग नाईट वॉचमन सारखा डे वॉचमन पाठवू. त्याने पहिली ओव्हर खेळून काढली तरी पुरे. दुसर्‍या बाजूला तू - मोहसीनोसाठी."

"बग्गुकल्या, ही ऐड्या माझ्या डोक्यात आली नसेल का? पण प्रॉब्लेम इथेचे ना. तुझा डे वॉचमन कोण मिळणार? पेम्या, पुरोहित अर्थातच नाही. जमदग्नी आणि सूर्याचा भरवसा नाही. राहिलं कोण? चोरडिया बंधू? हाड!"

"माझ्याकडे एक नाव आहे..."

बग्गाने ते नाव सुचवताच जोशा तीनताड उडाला.

"तो? अरे त्याचा काय संबंध? त्याला टेनिसवर खेळताना पाहिलं नाहीये कोणी. डायरेक्ट लेदरवर घ्यायचं?"

"त्याला काय होतंय?" बग्गा आत्मविश्वासाने म्हणाला. "चांगला गबदुल गोट्या आहे. बॅटनी नाही तर अंगानी बॉल अडवेल!"

"आणि रप्पकन बसलाबिसला तर? सेंटर फ्रेश?"

"तर त्याचं नशीब!" बग्गा खांदे उडवत म्हणाला. "आपल्याला काये? तसाही त्याचा इतर काही उपयोग नाही. पण चोरडियांना किंवा देशमुखाला बॉल बसला तर आपला एक बोलर जाईल..."

"काय हरामी आहेस तू बग्गा!"

"मला काय वाट्टेल ते म्हण, पण ही बेस्ट आयड्या आहे."

जोशा मान हलवत वर्गाकडे वळला. कितीही अप्पलपोटी कल्पना असली तरी त्यात दम होता.

"आणि अजून एक फायदा, जोशा..."

"आता काय?"

"स्लेजिंगचा परिणाम होणार नाही. त्याला मराठी कुठं येतं?!"

---xx---xx---

"पंधरा ओवर्सची मॅच आहे. मेन पिचवर खेळलाय कधी?" मोहसीनने विचारलं. मथुरावालाचा तो कॅप्टन होता. जोशाने नकारार्थी मान हलवली.

"हां...मंग तुम्हाला मेनपिच्चे रुल्स सांगाला पायजेत. मॅटिंग विकेट."

जोशाने मान डोलावली. हे माहीतच होतं. पुढे?

"कीपरच्या मागे जवळच माळीबुवाच्या क्वार्टर्स आहेत. त्यामुळे ओवरला साईड चेंज नाही."

"पण तिकडे फोर असणार ना?"

मोहसीनो हसला. "थर्डमॅनलाच कत्त्या मारा लेको तुम्ही. आहे रे आहे फोर तिकडे.”
"बरं."
"शाळेचे किट वापरा तुम्ही, पण प्रेमानं. म्हातारा स्ट्रिक्टे. दिघ्याने पॅड फाडलं तर त्याच्या बापाला भरून द्यायला लावलं." जोशाने मान डोलावली. "म्हातार्‍याने मॅचसाठी दोनच बॉल दिलेत. जास्त मस्ती करू नका बॉलबरोबर, समजलं?"

लेदरबॉलचं रेशनिंग होत असे. पॅडबीडचे तीन सेट शाळेने एकदाच आणून ठेवले होते, तेच अजून चालू होते. बॉल मात्र वापरून खराब होत. पॅक्स्टनचा एक बॉल ऐंशी-नव्वदला. अकाउंटंट तपस्वी कडकड करायचा. म्हणून म्हातारा लेदर बॉल केशरासारखे देत असे.

“अजून एक - राईटी बॅट्समनच्या ऑफला ओढा आहे. ओढ्यात बॉल मारायचा नाही."

या ओढ्याच्या पलिकडे एका कागदाच्या कारखान्याचं आवार सुरू होत असे. कारखाना अनेक वर्षं बंद होता, त्यामुळे ओढ्याच्या दोन्ही काठांना जंगलासारखं तयार झालं होतं. त्या आवारात संध्याकाळी हातभट्ट्या लागत. दिवसा आसपासचं टपोरी पब्लिक आयटम घेऊन बसलेलं असे. शाळेसाठी ओढा आणि परिसर "आऊट ऑफ बाऊंड्स" होता. अर्थात बग्गासारखे गचपणढवळे मुद्दाम तिथे जात असत, हा भाग वेगळा.

"करायची का सुर्वात?" मोहसीनोने टॉस जिंकला, आणि धूर्तपणे बोलिंग घेतली.

सगळी आठवी मॅच बघायला लोटली होती. शाळेची टीम आपले पांढरे कपडे घालून मैदानात उतरली. आठवीच्या टीमला पांढर्‍यांचा मान नव्हता - ते आपले नेहेमीच्या खाकी गणवेषातच खेळणार होते.

अँटी-काशा भावना शिगेला पोचली होती. पब्लिक मुक्तकंठाने काशाची आईबहीण काढत होतं.

"काशाच्या आप्पाचाsss" बग्गा घसा खरवडून ओरडत होता.
"ढोsssल" पोरं साथ देत होती.

"पहाट झाली, कोंबडा आरवला, सखू गेली पान्याला ... सखूला कोण भेटलं?" बग्गाचा सवाल.
"काशाsss" पोरं.

पुढे हा सवाल-जवाब काय वळणं घेतो ते काशाला ठाऊक होतं. त्याच्या मुठी संतापाने वळल्या होत्या.

"चिल, हिरो, चिल. गेममधे मार त्यांची." मोहसीनोने त्याला थोपटलं. "आपलीच बोलिंगे. हा घे बॉल." रेड चेरी आपल्या स्ट्राईक बोलरच्या हाती सोपवून, स्मित लपवत मोहसीनो वळला.

काशा स्ट्रेचिंग वगैरे करून तयार व्हायला लागला, आणि इकडे आठवीच्या टीमची सलामीची जोडी मैदानात निघाली. पॅड्स लावून अवघडत चालणारे दोघं पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. उंच, किडकिडीत जोशा पिवळ्या टोपीमुळे ओळखू येत होता. नेहेमीचे पेमगिरीकर आणि पुरोहित सोडून त्याने ओपनिंग करणं थोडं विचित्र वाटलं तरी समजण्याच्या पातळीवरचं होतं.

पण दुसरा... पोरं आ वासून पहात राहिली! ठेंगणी, काळी, जाडजूड आकृती. पाँडी!!

"काश्श्याच्या बैलाला..." बग्गाने ललकारी दिली. पण कोणी प्रतिसाद द्यायच्या मनस्थितीत नव्हतं.

पाँडी?!?!

मराठी येत नाही म्हणून ज्याच्याशी संवाद होऊ शकत नाही, ज्याला कधी कोणी खेळताना पाहिलं नाही, ते जाऊदे - तो लेफ्टी आहे की रायटी हेही कोणाला माहीत नाही, त्याला जोशा प्लेईंग एलेवनमध्ये घेतो, आणि एवढंच नाही, तर ओपनिंगला नेतो??

"भैसाटला कारे जोशा?" कोणीतरी ओरडलं.

"ए चूप फुकनीच्या..." बग्गाने त्याला परस्पर दाबलं.

"बग्गा अरे मरंल त्ये. समोर कोणे माहितीय ना?"

"जोशा कॅप्टने आपला. चुत्या म्हणून घेतलं का त्यानी पाँडीला?" बग्गा म्हणाला. "ए आवाज द्यारे पोराहो... पाँडी, पाँडी, पाँडी, पाँडी..."

हळूहळू पोरांनी आवाज उचलला. शाळेची टीम वळून पहायला लागली. काशाही थबकला. पाँडी?

स्वतः पाँडीला नेमकं काय वाटत होतं ते लांबून दिसत नव्हतं, पण त्याच्या देहबोलीवरून तो बर्‍यापैकी स्थिर वाटत होता. त्याने मिडल-लेग गार्ड घेतला. काशा रनप मोजायला लागला.

काशाच्या रनपच्या प्रत्येक पावलाबरोबर पोरं नॉर्मलला येत होती. पाँडीच्या बढतीचं आश्चर्य मावळून काशाची गद्दारी डोळ्यांत परत खुपायला लागली होती.

"अरे अच्चीत गच्ची, गच्चीत टाकी..." बग्गा बेभान होऊन ओरडला.

याही घोषणेचा शेवट काशाला माहीत होता - आपल्या आईच्या नेमक्या कोणत्या अवयवाची चर्चा उच्चारवात होणार आहे याची त्याला पुरेपूर कल्पना होती. कोणताही द्वेष मनावर चरा उठवून जातोच, पण स्वकीयांनी केलेला वार वर्मी जखम करून जातो.

सरसर ताप चढावा तसा त्याला त्वेष चढला. द्वेषाचा नाग फणा काढून उभा राहिला. समोरच्या बॅट्समनचं डोकं त्याला फोडायचं होतं, नामशेष करायचं होतं, रक्त ओकायला लावायचं होतं. त्याची पाँडीशी काही वैयक्तिक दुष्मनी नव्हती, किंबहुना या चिडवाचिडवीत पाँडीचा सहभाग नव्हताच. कसा असेल? पाँडीला मराठी तर यायला हवं. पण दुष्मनाचा दूत बनून पाँडी समोर ठाकला होता. काशा शिकारी झाला होता. लालेलाल गरगरीत टणक हत्यार हातात होतं. सावज समोर होतं. अठरा पावलांचा स्टार्ट घेऊन संपला होता.

आसमंत शांत शांत होत गेला. होणारे अपमान, मोहसीनोचं प्रोत्साहनपर ओरडणं, मिडॉनला उभ्या फील्डरचा संवादाचा प्रयत्न - सगळं सगळं ट्यूनआऊट झालं. अंपायरचा हात खाली येताच सव्यसाचीच्या एकाग्रतेने त्याने पहिलं पाऊल टाकलं.
---xx---xx---

पोरांचा श्वास अडकला. आतापर्यंत पाँडीची नक्की काय भूमिका आहे हे पोरांमध्ये पसरलं होतं. पण पाँडी पहिला बॉल तरी टिकेल का?

रोरावत आलेल्या काशाच्या हातातून लाल गोळा वेगाने सुटला. गुडलेंग्थवर टप्पा घेऊन डावखुर्‍या पाँडीच्या ऑफ स्टंपच्या दिशेने निघाला. पाँडीने बॅट चमकवली. बॅट नुसतीच हवेत फिरली, आणि "थप्प" आवाज झाला.

मागे कीपर दिघ्याच्या ग्लोव्जमध्ये बॉल होता. बॅटीचा स्पर्श न होता, ऑफस्टंपपासून बोटभर अंतरावरून बॉल गेला होता.

पोरांनी निश्वास टाकला. आणि जल्लोष केला! पाँडीला फक्त एक ओव्हर खेळायची होती. काशाला दमवायचं होतं. त्याने एक चेंडू वाया घालवला होता. एक षष्ठमांश काम झालं होतं. आरडाओरडा शिगेला पोचला. "अच्चीत गच्ची" चं नवीन आवर्तन घोटवायला सुरुवात झाली.

काशा परत मार्ककडे निघाला. पहिल्या चेंडूने वाफ थोडी जिरली होती. आता तो खुन्याप्रमाणे विचार न करता बोलरप्रमाणे विचार करू लागला. अठरा पावलं चालून तो वळला. पाँडी बॅट आपटत तयार होता.

पाँडीचा मिडल-लेग गार्ड काशाच्या नजरेतून सुटला नव्हता. गुडलेंथवरून बॉल थोडासा जरी इनस्विंग झाला, आणि पाँडी पहिल्या बॉलप्रमाणे चकला, तर सरळ सरळ पायचीत होणार होता. लेग बिफोर! प्लम.

पण पाँडी पहिल्या बॉलवर चकला होता ते स्विंगला. वेगाला नव्हे. त्याची बॅट वेळेत खाली आली होती. आता पाँडीला वेग आणि स्विंग दोन्हीवर चकवायचं होतं. काशाने रनपची शेवटची उडी थोडी लवकर घेतली, आणि पाठ शक्य तितकी वाकवून चेंडूला वेग दिला.

पाठ वाकवायच्या भानगडीत बर्‍याचदा टप्प्यावर नियंत्रण रहात नाही. टप्पा थोडा अलिकडे पडतो. तसंच झालं. चेंडू गुडलेंग्थवर न पडता थोडा अलिकडे पडला. परत पाँडीने बॅटचा आडवा वार केला.

आणि चेंडू पट्ट्यात आला !!

बॅटीच्या बरोब्बर मध्यभागी बॉल बसल्यावर जो कर्णमधुर आवाज येतो, तो झाला. धक्क्याने पाँडीची बॅट हातातून सुटली आणि घरंगळत काशाच्या पायाशी आली. कोणालाही कळायच्या आत चेंडू मात्र सीमारेषेवरच्या डीप मिडविकेटच्या डोक्यावरून ओढ्यात दिसेनासा झाला!

काय घडलं, हे पोरांना समजायला क्षण लागला. अंपायरने दोन्ही हात वर केले, आणि पोरं फुटली! त्या ओरडण्याला काही ताळतंत्र, धरबंध नव्हता. झिंगलेल्या जंगली पशूसारखा तो समुदाय चीत्कारत होता, फूत्कारत होता. कोणाच्या जमेस नसलेल्या एका बाहेरच्याने कळपाशी दगाबाजी करणार्‍याला शासन केलं होतं!

इकडे पांढर्‍या कपड्यातल्या पोरांची पळापळ झाली. एक महत्त्वाचा बॉल ओढ्यापार झाला होता! तो लवकर सापडला नाही, तर त्याला बुडीत खाती नोंदवायला लागलं असतं. सगळे ओढ्याकडे पळायला लागले.

मोहसीनो जागेवर थांबला होता. मनात चलबिचल चालू होती. काशाच्या बोलिंगवर तो खूष होता. आताचा षट्कार बॅट्समनच्या कसबापेक्षा आंधळ्या पट्ट्यात नशीबाने साथ दिल्याने गेला होता. तरी तो काशाला झोंबला होताच. त्याच्या डोळ्यांत परत खून उतरत होता. अशा वेळी बॉलच्या शोधासाठी खेळ थांबवला तर काशाचा 'मोसम' जाणार.

बॉल महत्त्वाचाच, पण आपल्या टीममधला नवा बोलर जास्त महत्त्वाचा.

"ए.... वापस! पोजिशन्स!" मोहसीनो ओरडला. "अंपायर..."

अंपायरने दुसरा, शेवटचा बॉल काशाकडे दिला. पांढरे कपडे जागच्या जागी परतले. डीप मिडविकेटची नजर राहून राहून ओढ्याकडे वळत होती.

"अबे मार उसकी..." मार्ककडे झपाटल्यासारखा चालत जाणार्‍या काशाला मोहसीनो म्हणाला.

काशाचा चेहरा लालभडक झाला होता. कानात वाहत्या रक्ताची गूँ गूँ येत होती. तोंडातून थुंकी उडत होती. पाँडीचं काही खरं नाही, हे जोशाला कळून चुकलं.

सोसाटत काशा आला. परत शॉर्ट ऑफ द लेंग्थ चेंडू. परत पाँडीचा पट्टा.

पण यावेळी चेंडूचा वेग भयानक होता. पाँडीचा हात खाली यायच्या आधीच चेंडू रप्पकन बरगड्यांत बसला. बॅट उडाली. असह्य कळ बरगड्यांतून उठली, झणझणत सणसणत डोक्यापर्यंत गेली. पाँडी वेडावाकडा गुडघ्यावर कोसळला.

"हडसूमगने, बॉल हत्तला निन्नाऊन.” जमिनीवर हात टेकवत पाँडी भेसूर किंचाळला, “हुच्चसुळीमगा...मुकळी हाडत्यान निंद. कुंड्याग दम्म इद्दरं मूंद बा तुन्न्या, तोरसतिनि निनगे...."

पाँडी खाली कोसळल्यावर सगळ्यांच्या काळजात क्षणभर लकाकलं होतं. नॉनस्ट्रायकर एंडवरून जोशा पळत आला. "लगा क्या, पाँडी? ओके? ओके?"

पाँडीने "जा!" अशा अर्थाची खूण केली, आणि धडपडत उभा राहिला. परत गार्ड घेऊ लागला. जोशाने अगतिकपणे पाँडीकडे पाहिलं. तशीच नजर उचलून मोहसीनोकडे. मोहसीनोने खांदे उडवले. काशा मार्ककडे निघाला होता. पाँडी संतापाने बॅट आपटत तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होता. आणखी कानडी शिव्या असाव्यात.

पोरांचा गिल्ला बंद पडला होता. सगळे सरसावून बसले होते. त्यांच्या दृष्टीने पाँडीने जिंकली होती. काशासारख्या उगवत्या स्टार पेसरला बॉल हरवेपर्यंत झोडपला होता. बरगडीत बॉलचा रट्टा खाऊनही पठ्ठ्या उभा राहिला होता.

जोशाच्याही मनात हेच असावं. "नळ, पाँडी, नळ..." तो ओरडला.

नळ करणे म्हणजे बॉल बॅटला लागो किंवा न लागो - रन घेणे, स्ट्राईक बदलणे. ही पोरांची खास परिभाषा होती. पाँडीला आधीच समजावली होती. पाँडी जिंकला होता. आता त्याला नॉनस्ट्रायकरला सुरक्षित ठेवायला हवं होतं. पाँडीने नळ केल्यावर उरलेल्या दोन बॉलची आग झेलायला जोशा तयार होता.

पाँडीचं लक्ष होतं की नाही कुणास ठाऊक. जोरजोरात बॅट ठोकणं चालू होतं.

काशा वळला.

अर्ध्या रनपवर येता येता त्याने पाँडीकडे पाहिलं. बॅट परजत पाँडी डाऊन द विकेट येत होता! चालत!

पेस बोलरसाठी यापेक्षा मोठा अपमान दुसरा नसतो. डाऊन द विकेट येणारा जणू सांगत असतो - तुझ्या वेगाला मी घाबरत नाही रे! पन्नास पाहिलेत तुझ्यासारखे.

काशाने ब्लॉकहोलकडे चेंडू सोडला. बॅट आणि पायाच्या अंगठ्यांमधल्या या जागेत अचूक पडलेला चेंडू बर्‍याचदा स्टंप्स अस्ताव्यस्त करून जातो. यॉर्कर!

पण पाँडी अजून एक पाऊल पुढे आला होता. डावा गुडघा टेकून यॉर्करची हवा काढली, फुलटॉस घेतला. परत तशीच आडवी कुर्‍हाड फिरली. परत तसाच आवाज...

सगळे ओढ्याकडे पळाले. मोहसीनोसुद्धा. पोरंदेखील.

पिचवर फक्त दोघेच राहिले. अजूनही तोंडातल्या तोंडात बरळणारा, खुनशी पाँडी. आणि आपल्या यॉर्करच्या चिंध्या अवाक होऊन बघणारा काशा. एकमेकांच्या नजरेत नजर घालून. जेता आणि जित.

काशाची नजर झुकली. खांदे पडले. पाँडीकडे वळून न पहाता, हळूहळू तोही ओढ्याच्या दिशेने गेला. गेलेली इज्जत ओढ्यात हुडकायला.

मॅच संपलीच. दोन्ही बॉल हरवले होते. पोरं पांगली. पाहिलेल्या चमत्काराची चर्चा करत घरोघर गेली.

पांढरे कपडे मात्र रेंगाळले. स्कोअररला मोहसीनोने कोपर्‍यात घेतलं. काशा दूर उभा होता, वाळीत टाकल्यासारखा. कोणी त्याच्याकडे बघतही नव्हतं.

---xx---xx---

परतल्यावर म्हातार्‍याने स्कोरशीट मागितलं. पांढर्‍या कपड्यांनी आठवीच्या टीमला बारा ओव्हर्समध्ये बेचाळीस रन्सला उखडलं होतं. त्यापैकी चौतीस रन्स काशाच्या तीन ओव्हर्समध्ये गेल्या होत्या. पांढर्‍या कपड्यांनी बेचाळीसचं टार्गेट आठ ओव्हर्समध्येच गाठलं होतं. त्यात काशाची अवघी एक रन दिसत होती.

अठरा पावलांचा स्टार्ट पांढर्‍या कपड्यात घेतला गेला नाही. कधीच.

प्रतिक्रिया

शब्दमर्यादेपेक्षा चिक्कार जास्त मोठी कथा झाली आहे. मुद्दामहून काटछाट करून काही अर्धकच्चं देण्यापेक्षा आहे तशीच प्रकाशित करत आहे. स्पर्धेसाठी घ्यायची की नाही हा निर्णय अर्थातच संपादकांचा आहे.

कथेच्या काही भागांत यसवायजी आणि बॅटमॅन यांच्या भाषिक कौशल्याची अत्यंत मदत झाली. त्याबद्दल त्यांचा बहुत आभारी आहे.

-------------------

बहुगुणींच्या कथेवरच्या प्रतिसादात नगरीनिरंजन यांनी म्हटल्याप्रमाणे कथेला आवडली / आवडली नाही वगैरे प्रतिक्रिया आवर्जून द्यावी. त्याही पलिकडे - विशेषतः या कथेच्या बाबतीत - आणखी सविस्तर प्रतिसाद दिलात तर खूप आनंद होईल. तो का, हे मी नंतरच्या प्रतिसादात लिहीनच.

बाबा पाटील's picture

13 Feb 2015 - 11:53 am | बाबा पाटील

कथा अक्षरशा: मैदानात नेवुन उभे करते.फक्त दोनच गोष्टी खटकतात्,ते स्वतः खेळल्यामुळे व अजुन खेळत आहे म्हणुन, १) काशा सारख्या १८ पावलाचा स्टार्ट घेवुन येणार्‍या पेसरचा लेदर बॉल जर रप्पकन कोवळ्या पोराच्या पोटात बसला तर ते पोरग परत उठन असंभव वाटत निदान अर्धा एक तास तरी.दुसर शेवट जो केलाय तो,एव्हडे फेरफार स्कोअर कार्ड मध्ये ते पण शाळेच्या, बापजणी शक्य नाही.जिंकणारी टीम सातव्या आसमान वर असते, आणी असल्या खुन्नसच्या मॅचमध्ये,च्यायला पोर पंच आणी स्कोअरर नाही तर मुख्याध्यापकाचे पण ....डे लावतील,शाळेतली खुन्नस सगळ्यात खतरनाक्,भारत पाकच्या मॅचपेक्षाही.

बाबा पाटील यांच्याशी सहमत...

बाकी कथा आवडली हेवेसांनल...

mayu4u's picture

10 Dec 2016 - 12:47 pm | mayu4u

---xx---xx--- नंतरच्या २ ओळी अनावश्यक वाटल्या!

कपिलमुनी's picture

12 Feb 2015 - 6:30 pm | कपिलमुनी

मस्त शाळेच्या मोकळ्या ग्रांउडचा वातावरण उभा राहिला .
आंतरशालेय मधे आमची साधी मराठी शाळा आणि काँन्वेटची चकाचक पोर ( आणि चीयर करायला पोरी ).

प्रत्येकाची वेगळी बॅट , शूज ईई . हे सगळा त्या पांढर्या कपड्यांची टीम वाचताना आठवला..

कथा सुंदर आहे . सर्व मॅच डोळ्यासमोर उभी राहिली.

अनुप ढेरे's picture

12 Feb 2015 - 6:38 pm | अनुप ढेरे

वाह.... मस्तं रंगवलिये म्याच.

टवाळ कार्टा's picture

12 Feb 2015 - 7:13 pm | टवाळ कार्टा

सईच्च हाये...बाकी "ती अर्धवट वाक्ये बरेच दिवस वापरायला मिळाली नाहियेत"....मिपाकरांची पण म्याच भरवायची का..मिपा (मुख्य) पुणे, मिपा (उर्वरीत) पुणे, मिपा मुंबै,मिपा ठाणे, मिपा (मध्यवर्ती) डोंबोली, मिपा उर्वरीत :)

उपास's picture

12 Feb 2015 - 7:18 pm | उपास

शब्दच नाहीत..
अत्युच्च वातावरण निर्मिती आणि सुसाट वेग कथेचा.. लंपन आठवला सुरुवातीला पण नंतर 'शाळा'मार्गे पुढे घेऊन गेली कथा.. स्वतः एक (चाळीशीतला) पेस बॉलर असल्याने आणि नुकतीच एक टुरणामेंट खेळल्याने असेल पण कथा भिडलीच..
खेड्यापाड्यात सुद्धा क्रिकेटवर जीव का ओवाळून टाकतात हे नक्कीच समजतय कथेतून..

लॉरी टांगटूंगकर's picture

12 Feb 2015 - 7:21 pm | लॉरी टांगटूंगकर

बेष्ट!!!!!!!!! मजा आली !!!
ग्राऊंडवर पोहोचलेलो.

नगरीनिरंजन's picture

12 Feb 2015 - 7:25 pm | नगरीनिरंजन

कथेचा वेग आणि त्यातलं नाट्य आवडलं. शीर्षक वाचले तेव्हाच दुभत्या गायीचे दूध काढायला लेखक बसला आहे असे वाटून थोडे हसू आले होते; पण गाय दुभती असली तरी भरपूर दूध मिळणे शेवटी दूध काढणार्‍यावरही अवलंबून असतेच.
पाँडीचे सरप्राईज एलिमेंट जबरदस्त आणि पात्रही चांगले उभे केले. त्यामानाने काशा डोळ्यासमोर उभा राहिला नाही आणि त्याचा दरारा कमी जाणवल्याने पराभवही मनाला फार लागला नाही.
कथेचा वेग, भाषा आणि लालित्यमात्र एक नंबर. स्पर्धेत घेतील न घेतील, पण उत्कृष्ट कथा आहे हे नक्की.

नगरीनिरंजन's picture

12 Feb 2015 - 7:46 pm | नगरीनिरंजन

कथेतल्या नाट्याविषयी:
कथा सुरु झाल्यानंतर जोशावरुन काशाकडे फोकस जायला वेळ लागला तरी काशा हे कथेतील मुख्य पात्र आहे हे चांगले मनावर ठसले आणि पाँडीचा बळीचा बकरा करणार हे कळल्यावर काहीतरी सरप्राईज असणार हेही तेव्हा लक्षात आले.
त्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष झुंजीबद्दल उत्कंठा निर्माण झाली. पाँडीचा उल्लेख व वर्णन आधी जास्त चांगल्या पद्धतीने आल्यामुळे पाँडीबद्दल जास्त ओळखभावना मनात निर्माण झालेली होती आणि पुढे दुसर्‍याच चेंडूवर त्याने षट्कार ठोकल्यावर आणि "शेवटच्या" चेंडूचा उल्लेख आल्यावर पाँडी पुन्हा ठोकणार आणि तोच या झुंजीचा विजेता हे कळले. काशाच्या मनोवस्थेतल्या रागाचे वर्णन चांगले आले आहे पण त्याची घालमेल नीट पोचत नाही.
त्यामुळे पाँडी हा लै भारी बॅट्समन असल्याने की निव्वळ त्या घालमेलीने काशाचा तेजोभंग झाला हे गुलदस्त्यातच राहते. झुंज काशा-पाँडीची होती की काशा आणि त्याच्या नशिबाची होती याचे नवल वाटत राहते. (कदाचित तमिळमध्ये काशा काय बोलला त्याचा अर्थ कळला असता तर वेगळी भावना आली असती मनात).

नगरीनिरंजन's picture

12 Feb 2015 - 7:49 pm | नगरीनिरंजन

*तमिळमध्ये पॉंडी काय बोलला असे लिहायचे होते.

यसवायजी's picture

12 Feb 2015 - 9:44 pm | यसवायजी

इच्छुकांना कानडी भाषांतर व्यनितुन कळवन्यात येईल. ;)

कानडीचे मराठी भाषांतर.

लॉरी टांगटूंगकर's picture

12 Feb 2015 - 10:18 pm | लॉरी टांगटूंगकर

कळवणे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Feb 2015 - 11:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

भाषांतर व्य.नि. करणे.

सॅगी's picture

13 Feb 2015 - 3:13 pm | सॅगी

भाषांतर व्यनि करा प्लीज... :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Feb 2015 - 4:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

आमालाबी !

नगरीनिरंजन's picture

12 Feb 2015 - 10:20 pm | नगरीनिरंजन

मी इच्छुक आहे. आगाऊ धन्यवाद.

टवाळ कार्टा's picture

12 Feb 2015 - 10:28 pm | टवाळ कार्टा

भाषांतर कळवाच पण ती "अर्धवट सोडलेली वाक्येसुध्धा" कळवा ;)

टवाळ कार्टा's picture

13 Feb 2015 - 3:30 pm | टवाळ कार्टा

हे पण पाठवा की :)

ते आपण मणातल्या मणात ठरवा की 'अता'

राजाभाउ's picture

12 Feb 2015 - 7:32 pm | राजाभाउ

सहीच !
मी स्वता: ग्राउंड वर होतो असे वाटतय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Feb 2015 - 7:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त ! शाळेतल्या मॅचा, टीममध्ये सिलेक्ट झालेल्यांची मग्रूरी आणि बघ्यांचा जल्लोश... सगळे डोळ्यासमोर उभे राहिले ! *good*

मस्त कथा.जमून आलाय मॅचचा माहौल.आवडली.

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Feb 2015 - 8:18 pm | कैलासवासी सोन्याबापु

भाई आपण कोण?कुठे राहता?व्यवसाय?मला काही काही माहिती नाही पण आज जर समोर आलात अंन "मीच १८ पावलाचा" लेखक सांगितले तर मी तुम्हास उचलून खांद्यावर घेईन !!! कारण बापाचा पेपर स्टॉल नसला तरी अंन फ्लैट फूट नसलो तरीही मी माझ्या टीम चा बग्गा होतो!! हे वाक्यनवाक्य मी जगलोय :)

बाकी "रप्पकन बसलाबिसला तर? सेंटर फ्रेश?" ठ्ठों ठ्ठों ठ्ठों

मित्रहो's picture

12 Feb 2015 - 8:21 pm | मित्रहो

कथेतला थरार विशेष आवडला. बाकी ते कानडी काही कळले नाही. कथा मोठी असूनही पूर्ण कथा वाचताना कंटाळा येत नाही.मला तर हा चार चेंडूंचा थरार वाटला.

असंका's picture

12 Feb 2015 - 9:20 pm | असंका

जबरदस्त थरारक कथा....!

शाळकरी मुलांची गोष्ट पण एवढी रंगतदार करता येते !!

हायला भारीच गेम आहे. पहिल्या वेळेस कळलाच नव्हता.. दुसर्‍या वेळेस वाचताना कळला..

आतिवास's picture

12 Feb 2015 - 9:39 pm | आतिवास

जबरदस्त कथा!

शलभ's picture

12 Feb 2015 - 9:55 pm | शलभ

खूप आवडली.

मस्त हो आदुबाळ. परफेक्ट लाईन आणि लेंथ.

बहुगुणी's picture

12 Feb 2015 - 10:57 pm | बहुगुणी

परफेक्ट लाईन आणि लेंथ.
अगदी, अगदी!

एकदम शाळेचे दिवस डोळ्यासमोर उभे केलेत! आणि चार बॉल मधलं नाट्य जबरदस्त! कथा अर्थातच आवडली, कथाबीज मस्त फुलवलं आहे.

चैत्रबन's picture

12 Feb 2015 - 11:14 pm | चैत्रबन

वा वा...

अन्या दातार's picture

12 Feb 2015 - 11:34 pm | अन्या दातार

मस्त जमलीय कथा. :) आवडेश.

पिवळा डांबिस's picture

12 Feb 2015 - 11:49 pm | पिवळा डांबिस

उत्तम कथा! अगदी उत्कंठा वाढवणारे पहिले चार भाग एक से एक सरस!
मला अगदी रिचर्ड हेडलीच्या रन-अपची आठवण झाली!
आता एक कथा म्हणून आणि तुम्ही मागितलाय म्हणून कथेवर फीडबॅक देतो...
पहिले चार भाग मस्त पण शेवटचा पाचवा भाग अगदीच सुमार. एका ओव्हर मध्ये संपलेल्या मॅचचं 'बारा ओव्हर्समध्ये बेचाळीस रन्स आणि बेचाळीसचं टार्गेट आठ ओव्हर्समध्येच' याची गरज नव्हती. कोचला बनवण्यासाठी जरी हे निर्माण केलेलं असावं तरी ते असंभवनीय वाटतं. तिथे २२ प्लेअर्स, अंपायर्स आणि प्रेक्षक होते ना? कोच जर तुम्ही रंगवलाय इतका बेरकी असता तर त्याने फक्त स्कोअरकार्डवर विश्वास न ठेवता इतर उपस्थितांशीही बोलला असता की!

माझ्या मते,

पांढरे कपडे मात्र रेंगाळले. स्कोअररला मोहसीनोने कोपर्‍यात घेतलं. काशा दूर उभा होता, वाळीत टाकल्यासारखा. कोणी त्याच्याकडे बघतही नव्हतं....
अठरा पावलांचा स्टार्ट पांढर्‍या कपड्यात घेतला गेला नाही. कधीच.

इथेच कथा यशस्वीरित्या संपते. तो मधला पॅरा अनावश्यक आणि रसभंग करणारा वाटतो.
असो. चूभूद्या घ्या, राग नसावा.
तुमच्यात कथाकाराच जबरदस्त पोटेंशियल दिसतंय, अजून कथा लिहा!!!
हार्दिक शुभेच्छा...

mayu4u's picture

10 Dec 2016 - 12:50 pm | mayu4u

असेच म्हणतो!

कपिलमुनी's picture

13 Feb 2015 - 12:12 am | कपिलमुनी

स्कोअररला मोहसीनोने कोपर्‍यात घेतलं

काशाची गेम नक्की कुणी केली ??

आणि रप्पकन पोटात बॉल बसल्यावर पोरगा काय ओरडणार ? ^%^&**#@ असेच काहीतरी !

संदीप चित्रे's picture

13 Feb 2015 - 12:40 am | संदीप चित्रे

सगळी मॅच, आधीचं टेन्शन, एकंदर पोरांची खुन्नस सगळं एकदम बेष्ट..
पिडांशी सहमत... त्यांनी लिहिलाय तसा शेवट जास्त चांगला आहे.
बाकी व्यनि करतो :)

मुलींच्या शाळेत असण्याने हा थरार कधी अनुभवला नाही, पण ८वी ते १०च्या वयातली पोरं म्हणजे काळविटांच्या कळपाची भरती हे मात्र ठाउक आहे. काय काय भाषा असते मुलांची!

कथा अगदी रंगलीय. पिडां काका म्हणताहेत तस मला अजिबात वाटत नाही. संघ जिंकला तरी पर्सनल पर्फॉर्मन्स कसा फरक पाडतो हे सुद्धा दाखवलं आहे अस म्हणेन मी.

मस्त हो आदूबाळ, दूर ग्राउंड्वर खेळणारी पोरं काय खेळायची ते आज उलगडलं.

कथा आवडली..वातावरण जसेच्या तसे उभे राहिले डोळ्यासमोर..
हे जिवन अनुभवल्यामुळे भावल मनाला..

(शालेय लेगस्पीनर) जेपी

स्पा's picture

13 Feb 2015 - 11:30 am | स्पा

कथा आवडली

साला आमच्या क्रिकेट टीम ची आठवण झाली, सगळी पोर पांगली अता :(

टवाळ कार्टा's picture

13 Feb 2015 - 2:31 pm | टवाळ कार्टा

सगळी पोर पांगली अता

आत्मा घुसला का तुझ्यात =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Feb 2015 - 4:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्पांच झाड झपाटलं ?! ;)

टवाळ कार्टा's picture

13 Feb 2015 - 5:22 pm | टवाळ कार्टा

"तें" असेल ;)

चिनार's picture

13 Feb 2015 - 2:06 pm | चिनार

कथा इतकी भावली नाही . पण वर्णन आणि शैली जबरदस्त ! मजा आ गया !

लय जब्राट हो आदूबाळ साहेब. ग्रौंडात नेऊन उभं केलंत. चिक्कीबॉलने खेळायचे अन हास्पिटलाच्या संडासच्या खिडकीत छक्का मारून पळायचे दिवस आठवले अन डोळे भरून आले. गेले ते दिवस अन ते लोकही पांगलेच.

विजुभाऊ's picture

13 Feb 2015 - 2:35 pm | विजुभाऊ

ब्याट्या आग्दी सेम .....
आमी बी लैच दम्गा करायचो न्यू इम्ग्लिश स्कूलच्या ग्रौंडवर.
कधीकधी तर एकाच ग्राउंडवर सात आठ टीम एक्काच वेळेस मॅच खेळत असायच्या. इकडच्या टीमच्या स्लीप मधला खेळाडू तिकडच्या टीमच्या सिली पॉईंटला नायतर कव्हर सुद्धा असायचा

गौरी लेले's picture

13 Feb 2015 - 2:49 pm | गौरी लेले

सुंदर कथा !!

स्वाती२'s picture

13 Feb 2015 - 4:49 pm | स्वाती२

कथा आवडली!