पोरं टीम पाडून तयार होती, पण जोशा कुठेच सापडत नव्हता. मधली सुट्टी निम्मी संपली होती. जोशा कॅप्टन. त्याच्याशिवाय खेळ चालू होऊ शकत नव्हता.
वेळ घालवायला मग पाँडीला शिव्या शिकवायचा नेहेमीचा टाईमपास चालू झाला. पाँडी याच वर्षी साऊथमधून कुठूनतरी शाळेत आला होता. त्याला मराठी कळत नसे, हिंदी जेमतेम. त्याच्या आईबापांनी मारे इंग्लिश मीडियम म्हणून घातलं, पण शिकवणं फक्त इंग्रजीत, बाकी सगळं मराठीत. कधीकधी शिकवणंसुद्धा. पाँडी गाळात. पोरांना हे पाहून उद्योग सुचलेच. कुणी हाक मारली की त्याला प्रतिसाद म्हणून मराठीत "भाडखाव" म्हणतात असं बग्गाने शिकवलं. कोणी "ए पाँडिये..." म्हणायचा अवकाश, पाँडी लगेच "भडकाव!" असं उत्तर देई. मराठीच्या भोसले मास्तरावर हा प्रयोग व्हायची पोरं वाट बघत होती.
दुरून इंडियन ऑईलची पिवळी कॅप दिसली. जोशा स्टाफरूम मधून बाहेर पडत होता. जोशा स्टाफरूममध्ये? मधल्या सुट्टीत? मॅटर गंभीर आहे, पोरांना समजलं.
"म्हातार्याने बोलावलं होतं" आपल्याभोवती सगळी पोरं गोळा झाल्यावर जोशाने खुलासा केला.
"म्हातारा" उर्फ मार्तंड जिवाजी उमरखेडकर उर्फ शाळेच्या क्रिकेट टीमचा कोच. हा काही शाळेत शिक्षक वगैरे नव्हता. कोणत्याशा बँकेतून रिटायर झाला होता. म्हातारवेळचा उद्योग म्हणून शाळेच्या टीमला क्रिकेट कोचिंग करत असे. रणजी खेळला होता शहात्तर साली. मधल्या सुट्टीत ग्राऊंडवर खेळणार्या पोरांकडे बारीक लक्ष ठेवून असे. त्यातला एखादा नजरेत भरला तर मिकी ट्रॉफीला खेळवे. थोडा मोठा पोरगा असला तर मथुरावाला किंवा अंडरफोर्टीन. म्हातार्याच्या नजरेत भरावं म्हणून पोरंही जीव लावून खेळत. पांढरे कपडे घालणं मोठा मान.
आठवीच्या पोरांमधून यंदा काशीकर – काशा – नक्की होता. जोशालाही संधी मिळणार दिसत होतं - गेल्या वर्षी मथुरावाला खेळलेला विकेटकीपर दिघे दहावीत गेला होता. जोशा बॅटिंगही बरी करायचा. दिघ्या त्यात औरंगजेब.
"ए! ऐका!" जोशा पारावर चढून ओरडला. सगळी पोरं भोवती गोळा झाली. "म्हातार्यानी बोलावलं होतं. आपल्या टीमला मथुरावालाच्या पोरांबरोबर मॅच घ्यायची आहे."
सेकंदभर शांतता. ही बातमी पोरांच्या सामूहिक कवटीत जिरायला वेळ गेला. मग गडबडगिल्ला उसळला.
"मथुरावालाच्या पोरांबरबर?!" नाकातला शेंबूड वर खेचत रामटेके.
"कधीय मॅच?" प्रॅक्टिकल बग्गा.
"टेनिसवरय की लेदरवर?" काख खाजवत सूर्या.
"सगळी पोरंयत का मथुरावालाची?" घारपुरे.
"अरे पण ती मोठी पोरंयत..." पेद्रट पेमगिरीकर.
"काशा आहे आपल्याकडे..." कोणीतरी आशावादी.
अगदी पाँडीलाही काहीतरी विचारायचं होतं.
ही मोठ्ठी गोष्ट होती. एखाद्या टीममधल्या एकदोघांना उचलणं म्हातार्याने पूर्वी केलं होतं, पण सगळ्याच्या सगळ्या टीमला मथुरावाला ट्रॉफीला खेळणार्या शाळेच्या टीमसोबत भिडवणं पूर्वी कधी ऐकलं नव्हतं. म्हणजे म्हातारा सांगू पहात होता, की नववी-दहावीच्या वर्गांतून सर्वोत्तम खेळाडू निवडून बनलेल्या शाळेच्या टीमच्या खालोखाल तुम्हीच! सगळ्या पोरांना हवेत तरंगायला झालं होतं.
"ऐका बे." जोशा सगळ्यांना थोपवत म्हणाला. "म्हातारा कुठेतरी चाल्लाय पंध्रा दिवसांसाठी. त्यात नेटस करून मथुरावालाची पोरं वैतागू नयेत म्हणून दोन फ्रेंडली ठेवल्यात. एक आपल्या सकाळच्या शाळेबरबर..."
एकदोन माना तुच्छतादर्शक हालल्या. सकाळच्या शाळेची टीम गू आहे यावर सगळ्यांचं एकमत होतं.
"...आणि एकासाठी शाळेतलीच टीम शोधत होता तो." जोशा क्षणभर थांबला. काहीतरी सांगायचं होतं ते गिळलं. "लेदरवर मॅचय. पुढच्या शनवारी सकाळी."
जोशाचा पॉज बग्गाच्या संशयखोर नजरेतून सुटला नव्हता. "धाव्वीची पण? दिघेबिघे?"
जोशाने साफ दुर्लक्ष केलं.
"तर पोराहो... प्रॅक्टिसला लागूया. दहा दिवस राहिलेत. आपली स्ट्राँगेस्ट टीम उतरली पायजे. चला! लेदरवर कोण कोण खेळलंय पूर्वी? जमदग्नी..."
पोरं झडझडून कामाला लागली. पारावर बैठक भरली, पण मधली सुट्टी संपत आली होती. पोरं पांगली.
बग्गाने जोशाला धरलं.
"काय गेमंय रे जोशा?"
"कसली गेम? चल्ल्...असलं काय नाय..." जोशाने झटकायचा प्रयत्न केला.
प्रशांत भागवत उर्फ बगावत उर्फ बग्गा तल्लख डोक्याचा अवली इन्सान होता. बापाच्या पेपरस्टॉलवरच्या रहस्यकथा वाचून वाचून त्याचं टाळकं त्याच दिशेने चाले.
"बापाला चढाय शिकवू नको लुल्ली. शनवारी धाव्वीची पोरं कशी खेळणार? तीनपर्यंत चव्हाणसर सायन्स मॅथ्स चोदवतो त्यांना.. पुढे वेगळे क्लासबिस."
"बग्गा..."
"बरं ते सोड. म्हातार्याला आपलीच टीम कशी काय सापडली रे? म्हतारं आपल्याला खेळताना बघायला कधी आलं होतं? आपल्याकडे अझर जडेजा नी तेंडुलकरच भरलेत ना..."
"तुला काय करायचंय झाट्या" जोशा उचकला. "तू थोडीच खेळणारयस?" हे खरं होतं - बग्गा flat footed होता, त्यामुळे मैदानी खेळ खेळू शकत नसे. मधल्या सुट्टीत क्रिकेट खेळणं वेगळं, पण इतक्या महत्त्वाच्या मॅचला त्याला घेणं शक्यच नव्हतं.
"म्हणून काय झालं? कळायला नको तुम्ही कुठे पो टाकून आला ते?"
जोशा विचारात पडला. टीम ठरवतानाच गेम बाहेर पडणार होती. बग्गाचं नेटवर्क आख्ख्या शाळेत भारी होतं. असा माणूस आपल्या बाजूने असलेला बरा. शेवटी काशाही त्याचा मित्र होता. काशामुळेच म्हातार्याच्या डोळ्यांत ही टीम भरली होती. काय व्हायचा तो राडा होणारच होता, पण काशाला शक्य तितकं वाचवायचं जोशाने ठरवलं.
"चल बग्गा - पेप्सीकोला खाऊ..."
---xx---xx---
टीम ठरवायच्या आधीच बोभाटा झाला. मधली सुट्टी संपताच मथुरावालाची पोरं नेट्सला बाहेर पडली. दुरून बोलर नवा वाटत होता, पण आठवीच्या पोरांना अठरा पावलांचा तो तालबद्ध स्टार्ट चांगलाच परिचयाचा होता. समोरच्या गणिताकडे लक्ष देण्याच्या ऐवजी पोरं खिडकीतून बाहेर टकमक बघू लागली.
"मा......" कोणीतरी दबक्या आवाजात शिवी हासडली.
महत्त्वाच्या मॅचच्या दहा दिवस आधी टीमचा स्टार बोलर प्रतिपक्षाबरोबर सरावाला उतरतो, याचा अर्थ पोरांना उलगडून सांगायची गरज नव्हती. संतापाची एक सामूहिक लाट आठवीच्या वर्गावर पसरली. काशाच्या कुळाची उद्धारगत चालू झाली. दुपारपर्यंत टीमचं आशास्थान असलेला काशा पोरांच्या नजरेत एकाएकी दगलबाज, हरामी झाला.
"तू कसं अलाऊड केलंस? कॅप्टन ना तू?" पोरं जोशाला विचारत होती.
जनमताचा बदलता रेटा हताशपणे पहाणं सोडून जोशाच्या हाती फारसं काही उरलं नव्हतं.
"अबे, काशाचं सिलेक्शन आगोदरच झालं होतं. मॅच नंतर ठरली. म्हातार्यानेच काशाला त्यांच्याकडून खेळायला सांगितलंय." जोशा कळवळून सांगत होता, आणि पोरं आणखी भडकत होती.
पोरांची प्रतिक्रिया स्वाभाविक आहे हे जोशाला कळत होतं. आठवीची बॅटिंग तगडी होती. पेमगिरीकर आणि पुरोहितसारखे तंत्रशुद्ध खेळाडू, सूर्या आणि जमदग्नीसारखे पिंच हिटर्स तर होतेच; स्वतः जोशा बरी बॅटिंग करायचा. पण आठवीची बोलिंग मात्र काशा या एकखांबी तंबूवर पेलली होती. दुसरा पेस बोलर देशमुख स्टॅमिनात मार खायचा. चोरडिया बंधू स्पिनर्स होते, पण यथातथाच. बाकी पेमगिरीकर आणि सूर्याची कामचलाऊ फेकी.
काशा मात्र पेसचा अनभिषिक्त सम्राट होता. त्याच्याइतका बेक्कार पेस बॉलर मथुरावालाच काय, मथुरावालाच्या टीममध्येपण नव्हता. पेस बॉलिंगसाठी तुम्ही ताडमाड धिप्पाड पाहिजे असं नसतं. खांद्यात जोर पाहिजे. स्टॅमिना पाहिजे. मुख्य म्हणजे खांद्यावर डोकं पाहिजे. काशाकडे हे सगळं होतं, मुख्य म्हणजे डोकं. अठरा पावलांचा स्टार्ट घेऊन काशा रोरावत येई. डोकं झुकलेलं, समान अंतराची पावलं. स्टंपपाशी उडी मारून हातातून बॉल सुटे. जबरदस्त वेग. बॅट्समनला काही कळायच्या आत काठी. नाहीतर मागे जोशाकडे कत्ती.
पोरांच्या नेहेमीच्या भेगाळलेल्या टेनिस बॉलवरही काशाचा वेग धडकी भरवणारा असे. त्यातून ही मॅच लेदरवर होती, आणि तीही शाळेकडून मथुरावाला खेळणार्या टीमबरोबर. म्हणजे कोरा लेदर बॉल काशाच्या हातात मिळणार होता. त्या हत्याराने काशा समोरची अर्धी टीम गारद करू शकत होता!
आता गारद होण्याची पाळी आठवीच्या पोरांवरच आली होती. आठवीचा कोणीही बॅट्समन काशाच्या तोफखान्याला तोंड देऊ शकेलच याची खात्री देववत नव्हती.
आपल्याकडून जोशा या घटनेला जास्त महत्त्व देत नव्हता. टीमचं मनोधैर्य टिकवून ठेवणे हा एक भाग, पण काशाने दगाबाजी केल्यासारखं त्याला खरंच वाटत नव्हतं. त्याने हुशारी करून तोंडफाटक्या बग्गाला आपल्याकडे वळवून घेतल्याने हा जनक्षोभ दोनेक दिवसांत मावळेल असा त्याचा कयास होता.
तसं झालंही असतं, पण काशाची अकड नडली. त्याने जोशाचीच "मैं बेबस हूं" वाली लाईन जारी ठेवली असती तरी चाललं असतं. पण त्याच्याही डोक्यात हवा गेल्यासारखं झालं. आठवीच्या पोरांत मिसळणं त्याने एकाएकी बंद केलं. वर्गात असे तितकाच. शाळेत येता-जाताना, मधल्या सुट्टीत, तो मथुरावालाच्या टीमबरोबर राहू लागला. ती टीम एक स्वतंत्र यंत्र होतं. एकदा मथुरावालाच्या टीममध्ये गेलं, की आपण कोणीतरी स्पेशल असण्याची भावना बळावत असे. जुने मित्र सुटत, आणि टीम हेच सर्वस्व बनून जाई. संघभावना वाढावी म्हणून म्हाताराही त्याला प्रोत्साहन देत असे. काशाच्या बाबतीत हे इतक्या भर्र्कन झाल्याचं पोरांना खटकलं.
याचाच परिणाम म्हणून की काय, पण काशाला अचानक बारीकसारीक अपघात होऊ लागले. मुतारीत एकाचा धक्का चुकून लागला आणि काशाचा पाय भरला. सरांची पाठ वळलेली असताना खडूचे तुकडे येऊन काशाच्या डोक्यात बसू लागले. काशा बाकावर बसायच्या एक क्षण आधी कोणीतरी चुकून अर्धं केळं फळीवर सारलं.
" त्याला काय त्रास देतायत पोरं..." जोशा बग्गाजवळ कुरकुरला.
"माजलाय फुकनीचा" बग्गाने निकाल दिला. "आणि तुला का पाणी सुटतंय रे? तू सोलुशन काढ यातून. कसे भिडणार आहोत आपण काशाला?"
यावर विचार करून जोशाचं डोकं पिकलं होतं.
"तूच सांग बग्गा. पेम्या आणि पुरोहित बेस्ट आहेत रे, पण काशाने त्यांना उखडला तर बँड वाजेल आपला. सूर्या आणि जमदग्नी काय टिकून खेळणारे नाहीत. मी जमवेन एकवेळ, पण खाली गाळ आहे रे मग..."
"ओपनर बेस्टेत आपले..."
“विचार कर - शनिवारी सकाळी मॅच. लेदर बॉल म्हणजे मॅटिंगची विकेट असणार. दमट ओली. काशा सहा बॉलमध्ये चार तरी खुळके काढेल..."
बग्गा पोटरी खाजवायला लागला. विचारमग्न असताना त्याच्या कोणत्या ना कोणत्या अवयवाला खाज सुटत असे. "म्हणजे तुला म्हणायचंय, की काशाच्या पहिल्या दोन ओव्हर काढल्या की पुढे टेन्शन नाही..."
"दोन खूप झाल्या. मी म्हणतो पहिली काढली बिनविकेटची तरी पुरे." जोशा म्हणाला. "दुसर्या बाजूने मोहसीनो बोलिंग करणारे. तो स्विंगवाला आहे, पेस नाही फारसा. ते ठीके."
बग्गाचे डोळे चमकले. "हात्तिच्या एवढंच ना? मग नाईट वॉचमन सारखा डे वॉचमन पाठवू. त्याने पहिली ओव्हर खेळून काढली तरी पुरे. दुसर्या बाजूला तू - मोहसीनोसाठी."
"बग्गुकल्या, ही ऐड्या माझ्या डोक्यात आली नसेल का? पण प्रॉब्लेम इथेचे ना. तुझा डे वॉचमन कोण मिळणार? पेम्या, पुरोहित अर्थातच नाही. जमदग्नी आणि सूर्याचा भरवसा नाही. राहिलं कोण? चोरडिया बंधू? हाड!"
"माझ्याकडे एक नाव आहे..."
बग्गाने ते नाव सुचवताच जोशा तीनताड उडाला.
"तो? अरे त्याचा काय संबंध? त्याला टेनिसवर खेळताना पाहिलं नाहीये कोणी. डायरेक्ट लेदरवर घ्यायचं?"
"त्याला काय होतंय?" बग्गा आत्मविश्वासाने म्हणाला. "चांगला गबदुल गोट्या आहे. बॅटनी नाही तर अंगानी बॉल अडवेल!"
"आणि रप्पकन बसलाबिसला तर? सेंटर फ्रेश?"
"तर त्याचं नशीब!" बग्गा खांदे उडवत म्हणाला. "आपल्याला काये? तसाही त्याचा इतर काही उपयोग नाही. पण चोरडियांना किंवा देशमुखाला बॉल बसला तर आपला एक बोलर जाईल..."
"काय हरामी आहेस तू बग्गा!"
"मला काय वाट्टेल ते म्हण, पण ही बेस्ट आयड्या आहे."
जोशा मान हलवत वर्गाकडे वळला. कितीही अप्पलपोटी कल्पना असली तरी त्यात दम होता.
"आणि अजून एक फायदा, जोशा..."
"आता काय?"
"स्लेजिंगचा परिणाम होणार नाही. त्याला मराठी कुठं येतं?!"
---xx---xx---
"पंधरा ओवर्सची मॅच आहे. मेन पिचवर खेळलाय कधी?" मोहसीनने विचारलं. मथुरावालाचा तो कॅप्टन होता. जोशाने नकारार्थी मान हलवली.
"हां...मंग तुम्हाला मेनपिच्चे रुल्स सांगाला पायजेत. मॅटिंग विकेट."
जोशाने मान डोलावली. हे माहीतच होतं. पुढे?
"कीपरच्या मागे जवळच माळीबुवाच्या क्वार्टर्स आहेत. त्यामुळे ओवरला साईड चेंज नाही."
"पण तिकडे फोर असणार ना?"
मोहसीनो हसला. "थर्डमॅनलाच कत्त्या मारा लेको तुम्ही. आहे रे आहे फोर तिकडे.”
"बरं."
"शाळेचे किट वापरा तुम्ही, पण प्रेमानं. म्हातारा स्ट्रिक्टे. दिघ्याने पॅड फाडलं तर त्याच्या बापाला भरून द्यायला लावलं." जोशाने मान डोलावली. "म्हातार्याने मॅचसाठी दोनच बॉल दिलेत. जास्त मस्ती करू नका बॉलबरोबर, समजलं?"
लेदरबॉलचं रेशनिंग होत असे. पॅडबीडचे तीन सेट शाळेने एकदाच आणून ठेवले होते, तेच अजून चालू होते. बॉल मात्र वापरून खराब होत. पॅक्स्टनचा एक बॉल ऐंशी-नव्वदला. अकाउंटंट तपस्वी कडकड करायचा. म्हणून म्हातारा लेदर बॉल केशरासारखे देत असे.
“अजून एक - राईटी बॅट्समनच्या ऑफला ओढा आहे. ओढ्यात बॉल मारायचा नाही."
या ओढ्याच्या पलिकडे एका कागदाच्या कारखान्याचं आवार सुरू होत असे. कारखाना अनेक वर्षं बंद होता, त्यामुळे ओढ्याच्या दोन्ही काठांना जंगलासारखं तयार झालं होतं. त्या आवारात संध्याकाळी हातभट्ट्या लागत. दिवसा आसपासचं टपोरी पब्लिक आयटम घेऊन बसलेलं असे. शाळेसाठी ओढा आणि परिसर "आऊट ऑफ बाऊंड्स" होता. अर्थात बग्गासारखे गचपणढवळे मुद्दाम तिथे जात असत, हा भाग वेगळा.
"करायची का सुर्वात?" मोहसीनोने टॉस जिंकला, आणि धूर्तपणे बोलिंग घेतली.
सगळी आठवी मॅच बघायला लोटली होती. शाळेची टीम आपले पांढरे कपडे घालून मैदानात उतरली. आठवीच्या टीमला पांढर्यांचा मान नव्हता - ते आपले नेहेमीच्या खाकी गणवेषातच खेळणार होते.
अँटी-काशा भावना शिगेला पोचली होती. पब्लिक मुक्तकंठाने काशाची आईबहीण काढत होतं.
"काशाच्या आप्पाचाsss" बग्गा घसा खरवडून ओरडत होता.
"ढोsssल" पोरं साथ देत होती.
"पहाट झाली, कोंबडा आरवला, सखू गेली पान्याला ... सखूला कोण भेटलं?" बग्गाचा सवाल.
"काशाsss" पोरं.
पुढे हा सवाल-जवाब काय वळणं घेतो ते काशाला ठाऊक होतं. त्याच्या मुठी संतापाने वळल्या होत्या.
"चिल, हिरो, चिल. गेममधे मार त्यांची." मोहसीनोने त्याला थोपटलं. "आपलीच बोलिंगे. हा घे बॉल." रेड चेरी आपल्या स्ट्राईक बोलरच्या हाती सोपवून, स्मित लपवत मोहसीनो वळला.
काशा स्ट्रेचिंग वगैरे करून तयार व्हायला लागला, आणि इकडे आठवीच्या टीमची सलामीची जोडी मैदानात निघाली. पॅड्स लावून अवघडत चालणारे दोघं पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. उंच, किडकिडीत जोशा पिवळ्या टोपीमुळे ओळखू येत होता. नेहेमीचे पेमगिरीकर आणि पुरोहित सोडून त्याने ओपनिंग करणं थोडं विचित्र वाटलं तरी समजण्याच्या पातळीवरचं होतं.
पण दुसरा... पोरं आ वासून पहात राहिली! ठेंगणी, काळी, जाडजूड आकृती. पाँडी!!
"काश्श्याच्या बैलाला..." बग्गाने ललकारी दिली. पण कोणी प्रतिसाद द्यायच्या मनस्थितीत नव्हतं.
पाँडी?!?!
मराठी येत नाही म्हणून ज्याच्याशी संवाद होऊ शकत नाही, ज्याला कधी कोणी खेळताना पाहिलं नाही, ते जाऊदे - तो लेफ्टी आहे की रायटी हेही कोणाला माहीत नाही, त्याला जोशा प्लेईंग एलेवनमध्ये घेतो, आणि एवढंच नाही, तर ओपनिंगला नेतो??
"भैसाटला कारे जोशा?" कोणीतरी ओरडलं.
"ए चूप फुकनीच्या..." बग्गाने त्याला परस्पर दाबलं.
"बग्गा अरे मरंल त्ये. समोर कोणे माहितीय ना?"
"जोशा कॅप्टने आपला. चुत्या म्हणून घेतलं का त्यानी पाँडीला?" बग्गा म्हणाला. "ए आवाज द्यारे पोराहो... पाँडी, पाँडी, पाँडी, पाँडी..."
हळूहळू पोरांनी आवाज उचलला. शाळेची टीम वळून पहायला लागली. काशाही थबकला. पाँडी?
स्वतः पाँडीला नेमकं काय वाटत होतं ते लांबून दिसत नव्हतं, पण त्याच्या देहबोलीवरून तो बर्यापैकी स्थिर वाटत होता. त्याने मिडल-लेग गार्ड घेतला. काशा रनप मोजायला लागला.
काशाच्या रनपच्या प्रत्येक पावलाबरोबर पोरं नॉर्मलला येत होती. पाँडीच्या बढतीचं आश्चर्य मावळून काशाची गद्दारी डोळ्यांत परत खुपायला लागली होती.
"अरे अच्चीत गच्ची, गच्चीत टाकी..." बग्गा बेभान होऊन ओरडला.
याही घोषणेचा शेवट काशाला माहीत होता - आपल्या आईच्या नेमक्या कोणत्या अवयवाची चर्चा उच्चारवात होणार आहे याची त्याला पुरेपूर कल्पना होती. कोणताही द्वेष मनावर चरा उठवून जातोच, पण स्वकीयांनी केलेला वार वर्मी जखम करून जातो.
सरसर ताप चढावा तसा त्याला त्वेष चढला. द्वेषाचा नाग फणा काढून उभा राहिला. समोरच्या बॅट्समनचं डोकं त्याला फोडायचं होतं, नामशेष करायचं होतं, रक्त ओकायला लावायचं होतं. त्याची पाँडीशी काही वैयक्तिक दुष्मनी नव्हती, किंबहुना या चिडवाचिडवीत पाँडीचा सहभाग नव्हताच. कसा असेल? पाँडीला मराठी तर यायला हवं. पण दुष्मनाचा दूत बनून पाँडी समोर ठाकला होता. काशा शिकारी झाला होता. लालेलाल गरगरीत टणक हत्यार हातात होतं. सावज समोर होतं. अठरा पावलांचा स्टार्ट घेऊन संपला होता.
आसमंत शांत शांत होत गेला. होणारे अपमान, मोहसीनोचं प्रोत्साहनपर ओरडणं, मिडॉनला उभ्या फील्डरचा संवादाचा प्रयत्न - सगळं सगळं ट्यूनआऊट झालं. अंपायरचा हात खाली येताच सव्यसाचीच्या एकाग्रतेने त्याने पहिलं पाऊल टाकलं.
---xx---xx---
पोरांचा श्वास अडकला. आतापर्यंत पाँडीची नक्की काय भूमिका आहे हे पोरांमध्ये पसरलं होतं. पण पाँडी पहिला बॉल तरी टिकेल का?
रोरावत आलेल्या काशाच्या हातातून लाल गोळा वेगाने सुटला. गुडलेंग्थवर टप्पा घेऊन डावखुर्या पाँडीच्या ऑफ स्टंपच्या दिशेने निघाला. पाँडीने बॅट चमकवली. बॅट नुसतीच हवेत फिरली, आणि "थप्प" आवाज झाला.
मागे कीपर दिघ्याच्या ग्लोव्जमध्ये बॉल होता. बॅटीचा स्पर्श न होता, ऑफस्टंपपासून बोटभर अंतरावरून बॉल गेला होता.
पोरांनी निश्वास टाकला. आणि जल्लोष केला! पाँडीला फक्त एक ओव्हर खेळायची होती. काशाला दमवायचं होतं. त्याने एक चेंडू वाया घालवला होता. एक षष्ठमांश काम झालं होतं. आरडाओरडा शिगेला पोचला. "अच्चीत गच्ची" चं नवीन आवर्तन घोटवायला सुरुवात झाली.
काशा परत मार्ककडे निघाला. पहिल्या चेंडूने वाफ थोडी जिरली होती. आता तो खुन्याप्रमाणे विचार न करता बोलरप्रमाणे विचार करू लागला. अठरा पावलं चालून तो वळला. पाँडी बॅट आपटत तयार होता.
पाँडीचा मिडल-लेग गार्ड काशाच्या नजरेतून सुटला नव्हता. गुडलेंथवरून बॉल थोडासा जरी इनस्विंग झाला, आणि पाँडी पहिल्या बॉलप्रमाणे चकला, तर सरळ सरळ पायचीत होणार होता. लेग बिफोर! प्लम.
पण पाँडी पहिल्या बॉलवर चकला होता ते स्विंगला. वेगाला नव्हे. त्याची बॅट वेळेत खाली आली होती. आता पाँडीला वेग आणि स्विंग दोन्हीवर चकवायचं होतं. काशाने रनपची शेवटची उडी थोडी लवकर घेतली, आणि पाठ शक्य तितकी वाकवून चेंडूला वेग दिला.
पाठ वाकवायच्या भानगडीत बर्याचदा टप्प्यावर नियंत्रण रहात नाही. टप्पा थोडा अलिकडे पडतो. तसंच झालं. चेंडू गुडलेंग्थवर न पडता थोडा अलिकडे पडला. परत पाँडीने बॅटचा आडवा वार केला.
आणि चेंडू पट्ट्यात आला !!
बॅटीच्या बरोब्बर मध्यभागी बॉल बसल्यावर जो कर्णमधुर आवाज येतो, तो झाला. धक्क्याने पाँडीची बॅट हातातून सुटली आणि घरंगळत काशाच्या पायाशी आली. कोणालाही कळायच्या आत चेंडू मात्र सीमारेषेवरच्या डीप मिडविकेटच्या डोक्यावरून ओढ्यात दिसेनासा झाला!
काय घडलं, हे पोरांना समजायला क्षण लागला. अंपायरने दोन्ही हात वर केले, आणि पोरं फुटली! त्या ओरडण्याला काही ताळतंत्र, धरबंध नव्हता. झिंगलेल्या जंगली पशूसारखा तो समुदाय चीत्कारत होता, फूत्कारत होता. कोणाच्या जमेस नसलेल्या एका बाहेरच्याने कळपाशी दगाबाजी करणार्याला शासन केलं होतं!
इकडे पांढर्या कपड्यातल्या पोरांची पळापळ झाली. एक महत्त्वाचा बॉल ओढ्यापार झाला होता! तो लवकर सापडला नाही, तर त्याला बुडीत खाती नोंदवायला लागलं असतं. सगळे ओढ्याकडे पळायला लागले.
मोहसीनो जागेवर थांबला होता. मनात चलबिचल चालू होती. काशाच्या बोलिंगवर तो खूष होता. आताचा षट्कार बॅट्समनच्या कसबापेक्षा आंधळ्या पट्ट्यात नशीबाने साथ दिल्याने गेला होता. तरी तो काशाला झोंबला होताच. त्याच्या डोळ्यांत परत खून उतरत होता. अशा वेळी बॉलच्या शोधासाठी खेळ थांबवला तर काशाचा 'मोसम' जाणार.
बॉल महत्त्वाचाच, पण आपल्या टीममधला नवा बोलर जास्त महत्त्वाचा.
"ए.... वापस! पोजिशन्स!" मोहसीनो ओरडला. "अंपायर..."
अंपायरने दुसरा, शेवटचा बॉल काशाकडे दिला. पांढरे कपडे जागच्या जागी परतले. डीप मिडविकेटची नजर राहून राहून ओढ्याकडे वळत होती.
"अबे मार उसकी..." मार्ककडे झपाटल्यासारखा चालत जाणार्या काशाला मोहसीनो म्हणाला.
काशाचा चेहरा लालभडक झाला होता. कानात वाहत्या रक्ताची गूँ गूँ येत होती. तोंडातून थुंकी उडत होती. पाँडीचं काही खरं नाही, हे जोशाला कळून चुकलं.
सोसाटत काशा आला. परत शॉर्ट ऑफ द लेंग्थ चेंडू. परत पाँडीचा पट्टा.
पण यावेळी चेंडूचा वेग भयानक होता. पाँडीचा हात खाली यायच्या आधीच चेंडू रप्पकन बरगड्यांत बसला. बॅट उडाली. असह्य कळ बरगड्यांतून उठली, झणझणत सणसणत डोक्यापर्यंत गेली. पाँडी वेडावाकडा गुडघ्यावर कोसळला.
"हडसूमगने, बॉल हत्तला निन्नाऊन.” जमिनीवर हात टेकवत पाँडी भेसूर किंचाळला, “हुच्चसुळीमगा...मुकळी हाडत्यान निंद. कुंड्याग दम्म इद्दरं मूंद बा तुन्न्या, तोरसतिनि निनगे...."
पाँडी खाली कोसळल्यावर सगळ्यांच्या काळजात क्षणभर लकाकलं होतं. नॉनस्ट्रायकर एंडवरून जोशा पळत आला. "लगा क्या, पाँडी? ओके? ओके?"
पाँडीने "जा!" अशा अर्थाची खूण केली, आणि धडपडत उभा राहिला. परत गार्ड घेऊ लागला. जोशाने अगतिकपणे पाँडीकडे पाहिलं. तशीच नजर उचलून मोहसीनोकडे. मोहसीनोने खांदे उडवले. काशा मार्ककडे निघाला होता. पाँडी संतापाने बॅट आपटत तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होता. आणखी कानडी शिव्या असाव्यात.
पोरांचा गिल्ला बंद पडला होता. सगळे सरसावून बसले होते. त्यांच्या दृष्टीने पाँडीने जिंकली होती. काशासारख्या उगवत्या स्टार पेसरला बॉल हरवेपर्यंत झोडपला होता. बरगडीत बॉलचा रट्टा खाऊनही पठ्ठ्या उभा राहिला होता.
जोशाच्याही मनात हेच असावं. "नळ, पाँडी, नळ..." तो ओरडला.
नळ करणे म्हणजे बॉल बॅटला लागो किंवा न लागो - रन घेणे, स्ट्राईक बदलणे. ही पोरांची खास परिभाषा होती. पाँडीला आधीच समजावली होती. पाँडी जिंकला होता. आता त्याला नॉनस्ट्रायकरला सुरक्षित ठेवायला हवं होतं. पाँडीने नळ केल्यावर उरलेल्या दोन बॉलची आग झेलायला जोशा तयार होता.
पाँडीचं लक्ष होतं की नाही कुणास ठाऊक. जोरजोरात बॅट ठोकणं चालू होतं.
काशा वळला.
अर्ध्या रनपवर येता येता त्याने पाँडीकडे पाहिलं. बॅट परजत पाँडी डाऊन द विकेट येत होता! चालत!
पेस बोलरसाठी यापेक्षा मोठा अपमान दुसरा नसतो. डाऊन द विकेट येणारा जणू सांगत असतो - तुझ्या वेगाला मी घाबरत नाही रे! पन्नास पाहिलेत तुझ्यासारखे.
काशाने ब्लॉकहोलकडे चेंडू सोडला. बॅट आणि पायाच्या अंगठ्यांमधल्या या जागेत अचूक पडलेला चेंडू बर्याचदा स्टंप्स अस्ताव्यस्त करून जातो. यॉर्कर!
पण पाँडी अजून एक पाऊल पुढे आला होता. डावा गुडघा टेकून यॉर्करची हवा काढली, फुलटॉस घेतला. परत तशीच आडवी कुर्हाड फिरली. परत तसाच आवाज...
सगळे ओढ्याकडे पळाले. मोहसीनोसुद्धा. पोरंदेखील.
पिचवर फक्त दोघेच राहिले. अजूनही तोंडातल्या तोंडात बरळणारा, खुनशी पाँडी. आणि आपल्या यॉर्करच्या चिंध्या अवाक होऊन बघणारा काशा. एकमेकांच्या नजरेत नजर घालून. जेता आणि जित.
काशाची नजर झुकली. खांदे पडले. पाँडीकडे वळून न पहाता, हळूहळू तोही ओढ्याच्या दिशेने गेला. गेलेली इज्जत ओढ्यात हुडकायला.
मॅच संपलीच. दोन्ही बॉल हरवले होते. पोरं पांगली. पाहिलेल्या चमत्काराची चर्चा करत घरोघर गेली.
पांढरे कपडे मात्र रेंगाळले. स्कोअररला मोहसीनोने कोपर्यात घेतलं. काशा दूर उभा होता, वाळीत टाकल्यासारखा. कोणी त्याच्याकडे बघतही नव्हतं.
---xx---xx---
परतल्यावर म्हातार्याने स्कोरशीट मागितलं. पांढर्या कपड्यांनी आठवीच्या टीमला बारा ओव्हर्समध्ये बेचाळीस रन्सला उखडलं होतं. त्यापैकी चौतीस रन्स काशाच्या तीन ओव्हर्समध्ये गेल्या होत्या. पांढर्या कपड्यांनी बेचाळीसचं टार्गेट आठ ओव्हर्समध्येच गाठलं होतं. त्यात काशाची अवघी एक रन दिसत होती.
अठरा पावलांचा स्टार्ट पांढर्या कपड्यात घेतला गेला नाही. कधीच.
प्रतिक्रिया
13 Feb 2015 - 6:20 pm | चुकलामाकला
जबरी! शाळेचे दिवस आणि भाषा आठवली. अजूनही कथेचा प्रभाव उतरला नाही. अगदी मनापासून सांगतो,सध्याच्या फेमस मराठी कथाकारांच्या तोंडात मारील अशी कथा! -/\-
14 Feb 2015 - 3:05 am | संपत
मस्त, खूप आवडली गोष्ट
14 Feb 2015 - 4:45 pm | hitesh
हल्ली शाळकरे मुले अशा भाषेत बोलतात ?
15 Feb 2015 - 5:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
आम खाओ...पेड मत गिनो!
16 Feb 2015 - 1:36 pm | ब़जरबट्टू
८ वीची मुले ही भाषा वापरतात हे वापरुन वाईट वाटून घ्यावे, का आपण जरा जास्तच "सुशिक्षीत"होतो याची लाज वाटावी हे समजत नाहीये...
दुसरे त्यांच्या वयाच्या मानाने फार टेक्निकल टर्म वापरल्यात असे वाटतेय..
( ५ - १२ वी.. हास्टेलवीर...) बजरु..
15 Feb 2015 - 7:00 am | भडकमकर मास्तर
भारी कथा ...
15 Feb 2015 - 8:31 am | श्रीरंग_जोशी
शालेय व महाविद्यालयीन क्रिकेटचे बरेच क्षण डोळ्यासमोर तराळून गेले.
15 Feb 2015 - 5:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
जब्राट....शाळेच्या ग्राउंडवर जाउन आलो अलगद वाचताना. :)
गेले ते दिवस...राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी.
16 Feb 2015 - 10:44 am | सविता००१
सॉलिड कथा
खूप मस्त
16 Feb 2015 - 11:17 am | मृत्युन्जय
कथा लयच आवडली.
17 Feb 2015 - 1:20 pm | रंगासेठ
शाळेच्या वेळच्या मॅचेस आठवल्या.. शाळेत आणि शाळेबाहेर मधील मॅचेस मधली मजा आणि खुन्नस केवळ अवर्णनियच.
कथा आवडली.
18 Feb 2015 - 2:57 pm | सस्नेह
करंट पार्श्वभूमीवरची कथा छान रंगवली आहे.
18 Feb 2015 - 7:20 pm | आदिजोशी
एकच शब्द, भन्नाट. बेफाट पेस, अत्यंत प्रभावी सादरी करण आणि वाचकाला प्रेक्षकांमधे उभं असल्याचा अनुभव देणारं लिखाण. भन्नाट लिहिलंय भावा.
18 Feb 2015 - 10:10 pm | पैसा
अप्रतिम वातावरणनिर्मिती!
18 Feb 2015 - 10:13 pm | मधुरा देशपांडे
जबरदस्त कथा. खूप आवडली.
19 Feb 2015 - 12:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मैदानावर असल्याचा फील आला आणि खेळाडुंचं राजकारणही अगदी मनभर पोहचलं. काशा विरुद्ध पाँडी हा मुख्य विषय अतिशय सुंदर वर्णनाने अगदी फिट पोहचलाय. भाषा, शब्द, शिव्या, अगदी परफेक्ट. आणि माझ्या दृष्टीने कथा इथेच संपली-
''काशाची नजर झुकली. खांदे पडले. पाँडीकडे वळून न पहाता, हळूहळू तोही ओढ्याच्या दिशेने गेला. गेलेली इज्जत ओढ्यात हुडकायला.''
पण मजा आली. अशा उत्तम कथांनी स्पर्धांनी मिपावर रंगत आणली आहे हे मात्र खरं. अभिनंद्न आणि आभार.
-दिलीप बिरुटे
21 Feb 2015 - 6:49 pm | खेडूत
कथा खूप आवडली !
रम्य बालपण आठवलं ….
शालेय जीवनात क्रिकेटच नव्हे तर प्रत्येक बाबतीतली खुन्नस- केवळ अवर्णनीय. ती मस्त उतरलीय.
कथा समोर घडत असल्यागत झालीय. लिहीत रहा !
25 Feb 2015 - 5:07 pm | प्रचेतस
भन्नाट झालीय कथा.
25 Feb 2015 - 10:15 pm | गणामास्तर
**बाज कथा. .शाळेचे ग्राउंड्च आले एकदम डोळ्यासमोर.
26 Feb 2015 - 7:08 am | अर्धवटराव
एकच कमेण्ट... वन ऑफ द मोस्ट फेव्हरेट कथा झालीये माझ्या करता.
गविंच्या अक्ख्या केळकर सिरीजची मजा या एका कथेत अवतरली आहे.
जबरदस्त.
2 Mar 2015 - 10:48 am | क्रेझी
तुफान वर्णन! अगदी ग्राउंडवर उभा राहून मॅच बघत आहे असं वाटलं, मस्त कथा! पाँडीच्या दुस-या फटक्याने जणू माझीच टीम जिंकली असा आनंद मला झाला :) मस्त कथा, आवडेश!
9 Mar 2015 - 6:35 pm | आदूबाळ
सर्व वाचकांचे, आणि आवर्जून प्रतिसाद देणार्यांचे आभार. वाचकांची आणि प्रतिसादांची संख्या हाच खरा पुरस्कार आहे.
आधीच्या प्रतिसादात हे म्हणालो होतो:
ते अशासाठी:
काही दिवसांपूर्वी वॉट्सअॅप वर एक व्हीडियो फिरत होता. एका प्रेमी युगुलाला काही स्वघोषित संस्कृतीसंरक्षक पकडतात आणि बेदम बुकलतात. त्यातला एक नखशिखान्त पांढरे कपडे घातलेला गुंड त्या मुलीला रानटी पद्धतीने मारतो. मी अक्षरशः अवाक झालो. एवढी हिंसा, एवढं क्रौर्य सहसा एखाद्या अॅडल्टमध्ये अभिव्यक्ती स्वरूपात बघायला मिळत नाही.
याचा अर्थ ते नसतंच, असं समजण्याइतका मी भाबडा नाही. हिंसा, क्रौर्य, भय वगैरे आदिम भावना दाबणं, आणि आपला इस्त्री केलेला भागच जगापुढे दाखवणं आपण जसजसे प्रौढ होत जातो तसतसे शिकत जातो. त्याआधी - टीनएजमध्ये - या भावना असंस्कारित टोकदार स्वरूपात दिसतात. त्याचं पर्यवसान कायम मारामारीत, शारिरिक हिंसेतच होईल असं नव्हे. हिंसेचे इतरही प्रकार असतातच की.
मग विचार आपसूक माझ्या टीनेजकडे, शाळेकडे वळले. मी शाळेच्या क्रिकेट संघाच्या फ्रिंजेसवर दोनेक वर्षं होतो. ते वातावरण आठवलं. त्या सगळ्या अर्धवट विचारांतून ही कथा सुचत गेली.
लौकिकार्थाने कथेला नायक नाही. सगळेच कमीअधिक प्रमाणात क्रूर, हिंसक आहेत. पाँडीला मराठी शब्द म्हणून शिव्या शिकवणारे त्याचे सो कॉल्ड मित्र, हुच्चभ्रू झाल्यावर मित्रांना सोयिस्कर विसरणारा काशा, काशाच्या दगाबाजीने पेटून उठलेले बुलीईंग करणारे त्याचे मित्र, "ग्रेटर गुड" साठी निरपराधाला बळी द्यायची आयडिया काढणारा बग्गा, स्वार्थापोटी त्याला मूक संमती देणारा जोशा, आपली इज्जत बचावण्यासाठी स्कोरकार्डमध्ये झोल करणारा मोहसीन, असे अनेक हिंसक प्रकार सुचले. यापुढे बॉलचा हत्यारासारखा वापर करू पहाणारा काशा आणि सूडबुद्धीने कानडीतून शिव्यागाळी करणारा पाँडीच काय ते फिके वाटायला लागले!
बर्याच वाचकांना कथा आपल्या बालपणाची आठवण करून देणारी वाटली. ही हिंसक बालक्रौर्याची भावना पकडू शकलो याचा आनंद मोठा आहे.
पुनश्च धन्यवाद!
9 Dec 2016 - 11:25 am | महासंग्राम
आदूबाळ, जबरदस्त झालीये कथा, पॉंडी, काशा चा चित्र उभं केलंय, वाचतांना डोळ्यसमोर मॅच सुरु आहे असं वाटलं. मुख्य म्हणजे क्रिकेट मधले बारकावे सुंदर रितीने टिपले आहे.
9 Dec 2016 - 2:34 pm | हकु
सुंदर वर्णन!
कथेने अगदी खिळवून ठेवलं. अगदी जसं च्या तसं कथानक डोळ्यासमोर घडतंय असं वाटत होतं. जाम मजा आली वाचताना.
9 Dec 2016 - 4:53 pm | सानझरी
ब्येष्ट कथा!!!!!!
9 Dec 2016 - 4:56 pm | कैलासवासी सोन्याबापु
परत एकदा पॉंडी अन अच्चीत गच्ची वाचून बेक्कार हसलो आबा!! एकदम महालोळबंध
10 Dec 2016 - 12:55 pm | mayu4u
जबरी कथा! शाळेच्या सगळ्या म्याची आणि धिंगाणा आठवला!
रच्याकने: अच्चीत गच्ची सगळ्या शाळांमध्ये कॉमन बघा!
10 Dec 2016 - 8:57 pm | यशोधरा
जबर्या झालीये कथा!