मिपा संपादकीय - "...रे भय्या छूटे लगान!"

संपादक's picture
संपादक in विशेष
11 Aug 2008 - 7:38 am
संपादकीय

मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...

...रे भय्या छूटे लगान!

जगातल्या सगळ्याच समाजांचे स्वत:चे असे मानबिंदू, मिथके आणि प्रतीके असतात. काही परंपरेने दिलेली - काही त्या समाजाने स्वत: कळत-नकळत विकसित केलेली. या प्रतीकांमध्ये त्या समाजाच्या भूत-वर्तमान-भविष्याचा आरसा असतो. जोवर हे आरसे स्पंदनशील आणि प्रवाही असतात, तोवर त्या समाजाची अस्मिता अभंग असते. मला माहीत आहे, हिंदी चित्रपट या गोष्टीला जर मी या पंगतीत नेऊन बसवले, तर बहुतांश लोक तत्काळ मला वेड्यात काढतील. पण मी तो धोका नि:संदिग्धपणे पत्करणार आहे. उण्यापुऱ्या शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या, हॉलिवुड या नावासकट अनेक गोष्टींची भ्रष्ट नक्कल करणाऱ्या, नाचगाणी आणि झगमगाटात धन्यता मानणाऱ्या एका थिल्लर उद्योगाने कळत-नकळत इतके मोठे श्रेय मिळवण्याचे कारण काय असा प्रश्न अपरिहार्य आहे.

पण कारणे आहेत आणि ती महत्त्वाची आहेत.

विश्वीकरणाच्या महाप्रवाहात जगभरातले सगळे मनोरंजन उद्योग अमेरिकी चित्रपट उद्योगाने गिळंकृत केले. पण बॉलिवुड मात्र मृतप्राय झाले नाही. त्याच्या आर्थिक ताकदीला तर धक्का लागला नाहीच. पण खरे महत्त्वाचे म्हणजे त्याच्या गाभ्यात असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीला हा महाप्रवाह गिळंकृत करू शकला नाही. परकीय शैलीच्या स्वत्त्वहीन विनाकारण नकला अर्थातच बेसुमार झाल्या. पण या मातीची शैली असणाऱ्या दिग्दर्शकांचा एक प्रवाह सुदैवाने कायम जिवंत राहिला. मेलोड्रामा आणि नाचगाणी या उच्चभ्रू वर्गाने नाक मुरडलेल्या गोष्टी या प्रवाहाने आपले भूषण म्हणून मिरवल्या. शस्त्र म्हणून वापरल्या. ओळख म्हणून जिवंत ठेवल्या. प्रयोगशीलतेचे कुंपण होणारी एक चौकट या शैलीमुळे निर्माण झालीच, नाही असे नाही. पण वेळोवेळी ती गरजेप्रमाणे मोडून-घडवून घेत तिचा लवचीकपणा अभंग राखला गेला. यात कलावंतांचे श्रेय होते, तसेच आपली पसंती नि:संदिग्धपणे दाखवून देणाऱ्या भारतीय प्रेक्षकांचेही होते. बॉलिवुडने हॉलिवुडच्या वेगवान हाताळणीला, तांत्रिक झगमगाटाला आपलेसे केले, पचवले आणि चक्क एक ढेकर दिली.

अनेकानेक भाषा-बोली, रूढी-परंपरा, संस्कृती असणाऱ्या या विस्तीर्ण प्रदेशात संस्कृतीचे एक काहीसे बेगडी पण प्रातिनिधिक भावले उभे करण्याचे श्रेयही बॉलिवुडला जाते. मॉंग में सिंदूर आणि करवा चौथ या मूळच्या उत्तर भारतीय असलेल्या संज्ञा आता भारतभर ओळखल्या जातात त्याचे मूळ हिंदी चित्रपटांत आहे. आपल्याला आवडो वा न आवडो, हिंदी चित्रपट संगीत हा आपल्या विविधतेला एका सूत्रात ओवणारा एक मजबूत धागा झाला आहे. आपली स्वत:ची अशी परिभाषा निर्माण करणे हे एका सशक्त अस्तित्वाचे लक्षण असते. ज्यांची कुठलीही स्पष्टीकरणे द्यावी लागत नाहीत अशा स्वयंपूर्ण संकल्पना अशा परिभाषेतून निर्माण होतात. अनारकली, मदर इंडिया, गब्बरसिंग, मुगल-ए-आझम, देवदास यांसारख्या आता स्वयंभू झालेल्या व्यक्तिरेखा आणि नवे अन्वयार्थ लावण्यासाठी एखाद्या पौराणिक व्यक्तिरेखेसारखाच होणारा त्यांचा वापर नेमके हेच बलस्थान दर्शवतो. एखादी संस्कृती आपल्या आविष्कारासाठी जेव्हा परकीय प्रतिमांचा वापर करते, तेव्हा त्या वापरात तिच्या विनाशाची बीजे दडलेली असतात असे म्हटले जाते. कुठल्याही अभिनिवेशावाचून हा वापर सहजगत्या टाळणाऱ्या आणि स्वत:ची प्रतिमासृष्टी रचणाऱ्या हिंदी चित्रपटांनी त्यांच्याही नकळत आपली मुळे या जमिनीत घट्ट रुजवत नेली. आपल्याच दैवतांची मनमुराद खिल्ली उडवण्याची या भूमीची निरोगी परंपरा आत्मसात करत त्यांनी अनेकवार आपल्याला निर्भीडपणे आरसा दाखवला. देशीवादाचा तो एक देखणा आविष्कार होता, हे त्यांच्या कधी लक्षातही आले नसेल!

कलाविष्काराच्या व्यावसायिक अंगाला अनेकवार उच्चभ्रूंच्या उपहासाला सामोरे जावे लागते. हिंदी चित्रपटांच्या मुख्य प्रवाहाला हा उपहास कधीच चुकलेला नाही. पण खरे पाहता प्रयोगशील शाखा आणि व्यावसायिक अंगे ही अनेक अर्थांनी परस्परांच्या अस्तित्वाला पूरक असतात. उदाहरणादाखल एक किस्सा मुद्दामहून ऐकण्यासारखा आहे. अतुल कुलकर्णी हा मराठी रंगकर्मी दिल्लीच्या 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मध्ये असतानाची गोष्ट. ’अमुक एका नाटकाचा मंगळवारी दुपारी प्रयोग आहे’ असे काहीसे तो एका व्यावसायिक मराठी नाटकासंदर्भात म्हणाला. ते ऐकून एका अमराठी रंगकर्मीने बुचकळ्यात पडून त्याला विचारले, 'मंगळवारी दुपारी? आठवड्यातल्या मधल्याच वारी, तोही दुपारी? व्यावसायिक? कोण येते तो पाहायला?' त्यावर अतुलने त्याला प्रयासाने आणि अभिमानाने समजावून सांगितले की 'आमच्या व्यावसायिक रंगभूमीवर असे अधल्यामधल्या दिवशीही प्रयोग होतात आणि त्याचा खर्च परत मिळवून फायदाही मिळण्याइतके प्रेक्षक त्याला असतात.' ही व्यावसायिक रंगभूमीची सशक्त अवस्थाच नवनवीन प्रयोगांना बळ देत असते आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेऊन नवी परंपरा रचत जात असते, हे वास्तव आहे. नेमके हेच समीकरण हिंदी चित्रपटांच्या मुख्य प्रवाहालाही लागू होते. त्यांचे आर्थिक सामर्थ्य आणि त्यांची निर्विवाद लोकप्रियता ही त्यांच्या मजबूत पायाची महत्त्वाची कारणे आहेत. ती नसती, तर प्रयोगशील बंडखोरीचा गळा आवळला जाण्याला फारसा वेळ लागला नसता, हे आपल्याला समजून घेतले पाहिजे.

असे म्हटले जाते, की विश्वीकरणाच्या प्रवाहात जगभरातल्या सगळ्याच संस्कृतींचे सपाटीकरण होत जाईल. भाषा, कलाविष्कार, जीवनशैली या साऱ्या अंगांवर एकाच बलवान संस्कृतीची एकसुरी छाप उमटत जाईल. सगळे जग एकसारखे होत जाईल. हा अनेक संस्कृतींच्या अपरिहार्य मरणाचा कालखंड आहे.

अशा कालखंडात आपल्या 'निर्बुद्ध'हिंदी चित्रपटांचे आपण ऋणी असले पाहिजे. कारण त्यांनी नकळतच या गृहीतकाचा पराभव करून आपला स्वतंत्र आवाज बुलंद ठेवला आहे. अनेक क्षेत्रांनी त्यांचा हा धडा गिरवला, तर आपल्याला आपल्या मरत्या संस्कृतीच्या नावाने गळे काढण्याचे काहीच कारण उरणार नाही.

पाहुणी संपादक : मेघना भुस्कुटे.

प्रतिक्रिया

अनिल हटेला's picture

11 Aug 2008 - 7:53 am | अनिल हटेला

अशा कालखंडात आपल्या 'निर्बुद्ध'हिंदी चित्रपटांचे आपण ऋणी असले पाहिजे. कारण त्यांनी नकळतच या गृहीतकाचा पराभव करून आपला स्वतंत्र आवाज बुलंद ठेवला आहे.

एकदम मान्य !!

आपल्याला आवडो वा न आवडो, हिंदी चित्रपट संगीत हा आपल्या विविधतेला एका सूत्रात ओवणारा एक मजबूत धागा झाला आहे.

अगदी खरये!
आज कुठलीही भावना मनात येताच ,
नकळत त्या मूड ला साजेसे गीत ओठावर येते.....

छान लेख लिहीलात ...

नेहेमी प्रमाणे अग्रलेख वाचुन तॄप्त झालो .......

धन्यवाद !!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

प्रकाश घाटपांडे's picture

11 Aug 2008 - 8:17 am | प्रकाश घाटपांडे

खरचं की आम्ही या दृष्टी ने हिंदी चित्रपटाकडे कधी पाहिलच नव्हत. एका नव्या मितीतुन लेख लिहिल्याबद्दल धन्यु!
प्रकाश घाटपांडे

सहज's picture

11 Aug 2008 - 11:42 am | सहज

प्रकाशकाका यांच्या सारखेच म्हणतो.

बॉलीवूडच्या अक्षरशा तोडीस तोड तेलगू+तामीळ चित्रपटसृष्टी आहे. त्यामुळे मी सरळसरळ याला भारतीय चित्रपट सृष्टी असे गृहीत धरतो केवळ बॉलीवूड नाही.

जगात १००+ देशात भारतीय वंशाचे लोक आहेत व त्यात इतर लोक जसे मिडलईस्ट, भारतीय उपखंड. ही अशी जबरदस्त बाजारपेठ असताना प्रत्येक देशात एका चॅनलवर फिल्म विकली गेली व रेव्हेन्यु फ्रॉम म्युझीक, डिव्हीडि, सीडी या "पाश्चात्य" तंत्रज्ञान, मार्केटिंग/प्रॉड्क्ट प्लेसमेंट आदी पाश्चात्य कॉपीकॅट धंदेतत्वामुळे, व सिनेमाप्रेमी/एडिक्ट भारतीयांमुळे, केबलटीव्ही /चॅनेल या पाश्चात्य प्रकारामुळे हे मिथक [खोटा सिक्का] आता "मानदंड" म्हणून मिरवते आहे ;-) ही वस्तुस्थिती. असो त्यात वाईट काही नाही, भारताला निर्यातीतुन परकीय चलन मिळतेय मस्तच!! गो बॉलीवूड!!!

पण मजा वाटली हे वाचायला. जसे हिंदी सिनेमा मधे नाही का उठ जा बेटे ले अपने बाप के खून का बदला म्हणाल्यावर १०० गोळ्या, १० बाँब शरीराने पचवललेला बेटा व्हीलनचा गळा घोटतो तसे तुम साले कमिने हॉलीवूडवालो के बुरी नजर से मेरे लाल, मेरा हिंदी सिनेमा नही मर सकता स्टाईल लेख वाचायला मजा आली.

बाय द वे नक्की बॉलीवूड्चे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून नक्की दुसरा कुठला उद्योग तस्साच फोफावेल. मला तर केवळ "शेती" दिसते आहे. जगाला जे खावेसे वाटते ते आपण पिकवून विकले तर आपला शाश्वत विकास नक्की. शेवटि वेळप्रसंगी लोक ५० इंच प्लासमा टिव्हीवर सिनेमा बघणार नाहीत पण त्यांना जेवायला तर रोज पाहीजे. कृषीप्रधान देशा जागा हो!

शिवाय हे विसरले जाउ नये की कित्येक काळ बॉलीवूड्चे अर्थकारण हे काळ्या पैशाने होत होते. काळा पैसा अपने आप को सफेद बनाही लेता है मेरे दोस्त!

विषय जरा वेगळ्या पद्धतीने साकारला गेला आहे पण हे बात कुछ हजम नही हुई. ;-)

एकलव्य's picture

11 Aug 2008 - 8:35 am | एकलव्य

मेघनाताई - लेख चांगला आहे आणि एकसुरीपणा नको हे आपले म्हणणे पटले.

पण मी तो धोका नि:संदिग्धपणे पत्करणार आहे.
हे आपण म्हटले आहे. त्यामुळे आपला रोख समजला आहे. त्याची काळजी नसावी. तरीही निष्कर्षाबद्दल क्षमस्व!

अशा कालखंडात आपल्या 'निर्बुद्ध'हिंदी चित्रपटांचे आपण ऋणी असले पाहिजे.
बिलकुल नाही!
आपण हे ऋण उपहासाने मानत असाल तर आणि तरच ठीक आहे. "बरेचसे" (सगळे नाही! अन्यथा आमच्या नावाने संस्कृतीरक्षकांची बोंबाबोंब सुरू) हिंदी चित्रपट हे अक्कल गहाण ठेवल्यासारखे किंवा समोरच्याला बिनडोक समजणारे असतात.

कारण त्यांनी नकळतच या गृहीतकाचा पराभव करून आपला स्वतंत्र आवाज बुलंद ठेवला आहे. अनेक क्षेत्रांनी त्यांचा हा धडा गिरवला, तर आपल्याला आपल्या मरत्या संस्कृतीच्या नावाने गळे काढण्याचे काहीच कारण उरणार नाही.
संस्कृती जिवंत ठेवण्याच्या ह्या मार्गापेक्षा एक चांगली संस्कृती मरणपंथास गेली असे ऐकायला मिळालेले श्रेयस्कर. (लढता लढता मरण आले तरी चालेल. पण हा असला वारसा नको.)

(ऑस्करमध्ये धडकून आपटलेला) एकलव्य

अभिज्ञ's picture

11 Aug 2008 - 8:52 am | अभिज्ञ

वैश्विकरणाच्या आजच्या जमान्यात बोलिवूडचा भारतीय मानसावर असलेला प्रभाव,त्याने फडकवत ठेवलेला भारतीय मानसिकतेचा किंवा सांस्कृतिक झेंडा फक्त ह्याचाच परामर्श संपादिकेने घेतलेला दिसतो.
मेघनाताई , माफ करा,फारच थोडक्यात लिहिला आहेत किंवा अजून मोठा करता आला असता असे वाटते.
तसेच,
काहि मुद्दे आपण विचारात घेतलेले दिसत नाहित्,किंवा त्यांबद्दलहि लिहावयास हवे होते.
. बॉलिवूड प्रमाणेच दक्षिणेत टॉलिवूड, कॉलिवूड ह्यांचेहि योगदान नाकारता येत नाहि.
. बहुतांश बॉलिवूड पट हे हॉलिवूडपटांवरून प्रेरित असतात,
त्यात नाच गाण्याचा देशी मसाला घालून ते आपल्या पुढे आणले जातात हे हि तितकेच सत्य आहे.
. नाहि म्हंटले तरी ,भारतीय मानसात ह्या हॉलिवूड चित्रपटांविषयी सुप्त आ़कर्षण हे असतेच/आहेच.
.चित्रनिर्मितीचा दर्जा पासून सादरीकरण,त्यातली विषयातील वैविधता,नावीन्याचे प्रयोग ह्या सर्वच प्रकारात हॉलिवूड
हे बॉलिवूडपेक्षा कितीतरी पटिने सरस आहे.
. वैश्विकरणाच्या ह्या जमान्यात, जर टिकून रहायचे असेल तर बॉलिवूडला फार मोठा पल्ला गाठायचा आहे.
. ज्या अनुषंगाने ह्या बॉलिवूडने भारतीय मानसात एक मानबिंदु स्थापित केला आहे, वा प्रभाव आहे, परंतु त्याचा एकमेव
नकारात्मक परिणाम म्हणजे मराठी चित्रपटसृष्टिची झालेली वाताहत. (जरी त्या करीता हे एकमेव कारण नसेल्,परंतु ह्याचे योगदान मोठे आहे आणी ते नाकारता येत नाहि.)

मुळात ह्या विषयाचा आवाका खुप मोठा आहे,तरिहि आपण त्यातल्या एकाच धाग्यावर लिहिलेले आढळते.
त्यामुळे लेख थोडासा पार्शिअल वाटतो.
असो,
भाषाशैली व संपादकीय सादरीकरण आवडले. त्याबद्दल अभिनंदन.

अभिज्ञ.

जनोबा रेगे's picture

11 Aug 2008 - 10:41 am | जनोबा रेगे

अजून मोठा करता आला असता असे वाटते.

सहमत
बॉलिवूड प्रमाणेच दक्षिणेत टॉलिवूड, कॉलिवूड ह्यांचेहि योगदान नाकारता येत नाहि

एकदम सहमत (श्रीनिवास स॑गीतमराव, कमल हासनला सलाम)
त्यात नाच गाण्याचा देशी मसाला घालून ते आपल्या पुढे आणले जातात हे हि तितकेच सत्य आहे.

पण तो मसाला जर परफेक्ट जमला तर तो चित्रपट मूळ इ॑ग्रजी चित्रपटापेक्षासुद्धा मनात घर करतो. उदा. रोमन हॉलिडे हा अत्युत्तम इ॑ग्रजी चित्रपट व 'चोरी चोरी' हाही क्लास हि॑दी चित्रपट. राज कपूर नर्गिस जोडीचा बेफाट अभिनय आणि श॑कर-जयकिशनच॑ भान हरपवणार॑ स॑गीत!
भुस्कुटेबाई॑नी हि॑दी चित्रपट स॑गितावर डिटेल लिहिणे अपेक्षित होते कारण त्या आघाडीवर हॉलिवूडपेक्षाही बॉलिवूड पुढे आहे आणि त्याने खर्‍या अर्थाने हि॑दूस्थानी स॑गिताची उज्वल पर॑परा राखली आहे.
अग्रलेख थोडा घाईत लिहिल्यासारखा वाटतो पण प्रयत्न चा॑गला केला आहे

सर्किट's picture

11 Aug 2008 - 9:09 am | सर्किट (not verified)

कृपया, बॉलीवूडचे सिनेमे ही माझ्या संस्कृतीची प्रतिके, अगदी कितीही लाभक्षम असली तरी, म्हणायला लावू नका.

धन्यवाद.

- सर्किट

विसोबा खेचर's picture

11 Aug 2008 - 9:14 am | विसोबा खेचर

बॉलिवुडने हॉलिवुडच्या वेगवान हाताळणीला, तांत्रिक झगमगाटाला आपलेसे केले, पचवले आणि चक्क एक ढेकर दिली.

वा! हे मात्र अगदी खरं! :)

आपल्याला आवडो वा न आवडो, हिंदी चित्रपट संगीत हा आपल्या विविधतेला एका सूत्रात ओवणारा एक मजबूत धागा झाला आहे.

नक्कीच! हिंदी चित्रपट संगीत हे बॉलिवुडच्या शिरपेचातलं असं मोरपीस आहे ज्याची सर हॉलिवुडच काय, परंतु जगातल्या कोणत्याच 'वुड'ला नाही! चित्रपटसंगीताच्या संदर्भात बोलायचं झालं तर आमच्या मदनमोहन सारखं जास्त नाही परंतु अवघं एखादं गाणं जगातल्या कोणत्याही 'वुड'ने बांधून दाखवावं!

ऑस्कर पुरस्कार जिथे संपतात तिथे आमच्या दिदीचं 'हम प्यारमे जलनेवालोको...' सारखं एखादं गाणं सुरू होतं!

अशा कालखंडात आपल्या 'निर्बुद्ध'हिंदी चित्रपटांचे आपण ऋणी असले पाहिजे. कारण त्यांनी नकळतच या गृहीतकाचा पराभव करून आपला स्वतंत्र आवाज बुलंद ठेवला आहे. अनेक क्षेत्रांनी त्यांचा हा धडा गिरवला, तर आपल्याला आपल्या मरत्या संस्कृतीच्या नावाने गळे काढण्याचे काहीच कारण उरणार नाही.

अगदी सहमत...

अभिनंदन मेघनाताई, सुंदर अग्रलेख...

आपला,
(हिंदी चित्रपटांचा प्रेमी) तात्या.

आनंदयात्री's picture

11 Aug 2008 - 9:44 am | आनंदयात्री

>>अशा कालखंडात आपल्या 'निर्बुद्ध'हिंदी चित्रपटांचे आपण ऋणी असले पाहिजे.

पटले. छान अग्रलेख मेघना !

मुक्तसुनीत's picture

11 Aug 2008 - 10:24 am | मुक्तसुनीत

सर्वप्रथम हे नमूद करायला हवे की, प्रस्तुत लेख हा एका अर्थाने विचारप्रवृत्त करणारा आहे. बर्‍याचदा लेख - अग्रलेख किंवा इतर - यातील मतप्रदर्शन हे पारंपारिक विचारसरणीला धक्का न देणारे असे असते. (माझ्या स्वतःच्या अग्रलेखाची आठवण येते.) त्या लेखांमधे सत्य असेल ; पण एकदम रूढ विचाराना धक्का देणारे असे काही त्यात नसते.

मेघनाबाईंच्या लेखाचे असे नाही. त्यांनी काही ठळक मुद्दे मांडले आहेत. त्याबाबत निश्चितच तीव्र मतभेद होणे लेखिकेने अभिप्रेत धरलेच असावे. (असा धोका त्या पत्करत आहेत असे त्या स्वतःच म्हणतात. ) त्यांच्या लेखातल्या या मूळ घोषवाक्याचा थोडासा परामर्श.

हिंदी चित्रपटांना लेखिका मिथकांचा दर्जा देते. मिथक चा अर्थ मी "myth" या अर्थाने घेतो. आता जी पारंपारिक मिथके आहेत त्यांचे स्थान हे धार्मिक entities पेक्षा वेगळे आहे . तत्कालीन समाज ज्या गोष्टींना श्रद्धेचे महत्त्व देतो , त्याला revere करतो , त्या गोष्टी धार्मिक होत. मिथकांचे तसे नाही. मिथके म्हणजे एका मूलभूत पातळीवर म्हणजे एखादी गोष्ट , कथा. इंग्रजी "मिथ " हा शब्द ज्या ग्रीक mythos या शब्दावरून आला त्याचा अर्थच मुळी "कथा". पारंपारिक प्रथेप्रमाणे , अनाकलनीय गोष्टीना अर्थ लावण्याकरता, जगभराच्या मनुष्यसमाजात वेळोवेळी मिथके प्रसृत होत आली आहेत. सृष्टीचा जन्म , तीत होणार्‍या विविध घटना या सार्‍यांचा अर्थ समजावून घेण्याकरता मिथके जन्माला आली. त्यातले देव , शूरवीर कथानायक वगैरे वगैरे प्रतिके अस्तित्वात आली. एका अर्थाने आपली ओळख पटवून घेण्याकरता मानव समाजाने मिथकांचा वापर केला आहे. मिथकांची शक्ती अशी की , अशा प्रकारच्या मिथकांवर विश्वास ठेवल्यामुळे नाझींनी एका आख्ख्या जमातीच्या कोट्यावधी माणसाना मारून टाकले.

मानसशास्त्रासारख्या ज्ञानशाखेला मिथकांमुळे एक वेगळे परिमाण लाभले. युंग नावाच्या मानसशास्त्रज्ञाने तर असा मोठा सिद्धांत मांडला की, वेगवेगळ्या समाजाचे एक "सामूहिक अबोध मन" (collective subconscious) असते. या सामूहिक मनाची स्वतःची अशी काही प्रतिके असतात, ती प्रतीके म्हणजे मिथकातून मांडलेल्या गोष्टी : सावल्या , आत्मा , ज्ञानमार्गावरील प्रवास ही काही अशा प्रतीकांची उदाहरणे.

या सार्‍याच्या पार्श्वभूमीवर आपण लेखिकेचे मत आजमावून पाहू. बॉलीवूडचे आयुष्य साधारण ७ दशकांचे असे धरू. एक उदाहरण घ्यायचे तर "हिरो"ची जी प्रतिमा दशकामागून अनेक दशके बॉलीवूड प्रसृत करत आले आहे , त्यात समाजमनाचे प्रतिबिंब पडले आहे हे विधान करणे अतिशयोक्ती ठरेल. अमिताभ बच्चनचे सत्तरीच्या दशकातले चित्रपट हा एक सन्माननीय अपवाद. "अँग्री यंग म्यान" या प्रतिमेचा इतिहास सर्वज्ञात आहे. पण एरवी मेनस्ट्रीम व्यावसायिक चित्रपटात अखिल समाजाला आपली काही एक ओळख लागत असेल यावर विश्वास ठेवणे कठीण वाटते. खुद्द अमिताभ बच्चन हा नट सुद्धा "एंग्री यंग म्यान" या भूमिकेतून लवकरच निसटला आणि लोकरंजनाच्या मागे लागला.

जागतिकीकरणामधे अमेरिकन चित्रपटानी जगभरच्या इतर चित्रपटांना गिळंकृत केले नि बॉलीवूड तेव्हढे टिकून राहिले या विधानात सुद्धा निश्चितच खोट आहे. मेघनाबाईंना फ्रेंच , इटालियन, इराणी, जपानी चित्रपट परंपरांचा विसर पडला काय ? का त्यांना तद्दन पैशाच्याच संदर्भात बोलायचे आहे ? तसे असल्यास "बॉलीवूड" हे "हॉलीवूड" ला टक्कर द्यायला उभे आहे याचा विचार करता येईल. पण बॉलीवूड सारख्या तद्दन बाजारू (आणि क्रमाक्रमाने निर्बुद्ध होत चाललेल्या) दुनियेत जे काही आदरास पात्र आहे त्याचा नि "बिग बक्स" चा अर्थाअर्थी संबंध नाही असे मला वाटते. हां , इथे मग जो मतभेद आहे तो वैयक्तिक आहे हे मी मान्य करतो. पण क्षमा करा , अक्षयकुमार आणि सैफ अली खान आणि सलमान खान हे लोक आणि त्यांचे चित्रपट कदाचित हॉलीवूडमधल्या काही (काहीच फक्त !!) चित्रपटांइतका धंदा करत असतील ; पण केवळ म्हणून कुणी त्यांना मिथके नि "जायंट किलर" म्हणू नये. हे लोक आणि त्यांचे चित्रपट निर्बुद्ध होत. (माझे मत ....! ) शाहारुख नि आमीर खान हे चांगले नट प्रचंड पैसा ओढणारे चित्रपट निर्माण करतात हे खरे आहे. पण "लगान" एखादाच. लक्षात घ्या की मी "मिथिक प्रपोर्शन्स्च्या " संदर्भात हे बोलतो आहे.

असो. शक्यतो पूर्वग्रह टाळून प्रतिसाद लिहीला आहे. लेखाची भाषा खरोख्रच फार सुंदर आहे. मेघना बाईंच्या भाषेचा सौंदर्याचाच एक नमुना म्हणजे हा लेख. असेच चर्चा घडविणारे , विचारांस उद्युक्त करणारे लेख त्यांच्याकडून येत राहोत.

मनिष's picture

11 Aug 2008 - 1:27 pm | मनिष

मुक्तसुनीत यांचा प्रतिसाद आवडला आणि पटला. बॉलिवूड हे 'लार्जर दॅन लाईफ' असे माध्यम असल्याने, तसेच त्याची पोहोच लांबवर असल्याने ते प्रभावशाली आहे हे मान्य, पण बाकीचे अनुमान आणि बॉलिवूडशी संबंध फारसा पटला नाही.

असेच अमेरिकन सर्वसामर्थ्यवान मिडियाला आपले थम्स-अप अजूनही बंद करता आले नाही, केलॉग्स अजूनही भारतातला मोठ्या शहरातील बहुसंख्यांचा सकाळचा मुख्या नाश्ता नाही. कारण आपल्या खाण्याच्या सवयी आणि ही वैविध्यपुर्ण संस्कृती इतकी पोकळ (अजूनतरी) झालेली नाही.

विसोबा खेचर's picture

11 Aug 2008 - 1:33 pm | विसोबा खेचर

केलॉग्स अजूनही भारतातला मोठ्या शहरातील बहुसंख्यांचा सकाळचा मुख्या नाश्ता नाही. कारण आपल्या खाण्याच्या सवयी आणि ही वैविध्यपुर्ण संस्कृती इतकी पोकळ (अजूनतरी) झालेली नाही.

अगदी खरं! केलॉग्स आणि तत्सम पदर्थ जिथे संपतात तिथे सोबत फोडणीची मिची अन् लोण्याचा गोळा असलेली आमची न्याहरीची पानगी सुरू होते! :)

आपला,
(अभिमानी भारतीय) तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Aug 2008 - 2:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अमेरिकन सर्वसामर्थ्यवान मिडियाला आपले थम्स-अप अजूनही बंद करता आले नाही,
नाहीच! कारण ते आता एका अमेरीकन कंपनीचं प्रॉडक्ट आहे!

भडकमकर मास्तर's picture

11 Aug 2008 - 2:59 pm | भडकमकर मास्तर

आपले थम्स-अप

कसले आपले अन काय !!!!______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनिष's picture

11 Aug 2008 - 3:02 pm | मनिष

पण त्यांना "कोक" फेमस करायचे होते, त्याला जगभर ब्रॅंड एक्विटी आहे! त्यांनीच स्वतःचे (आधी पारले चे असलेले) "गोल्ड स्पॉट" बंद केलेच ना? फँटासाठी? सांगयचे हे ही, कंपनी विकत घेतली तरी त्यांचा ब्रॅंड आपल्या ब्रॅंड ला रेप्लेस नाही करू शकला...त्यांचे मार्केटींगचे बजेट लक्षात घेता, ही खूप मोठी गोष्ट आहे!

पिवळा डांबिस's picture

12 Aug 2008 - 1:09 am | पिवळा डांबिस

मुक्तसुनीतांच्या अभिप्रायाशी सहमत
-पिडां
(स्वगतः वा! हे बरंय! लेख प्रकाशित झाला की फक्त थोडा काळ कळ काढायची! मग मुसुचा अभिप्राय आला की त्याच्या पाठीवरून मिपाची सैर करायला मिळत्येय!!!:))

स्वाती दिनेश's picture

11 Aug 2008 - 11:55 am | स्वाती दिनेश

मेघना,
तुझा अग्रलेख आवडला.(थोडा अजून मोठा करता आला असता,असे वाटते.)
स्वाती

विसुनाना's picture

11 Aug 2008 - 11:57 am | विसुनाना

अग्रलेखातील विचार ठीक असले तरी -

मुक्तसुनीत आणि इतरांनी म्हटल्याप्रमाणे -
फ्रेंच , इटालियन, इराणी, जपानी आणि चिनी ('कुंग फू' पट इ.इ.) चित्रपटांचा या विचारांत समावेश नाही.

बॉलीवूडनिर्मित एकूण चित्रपटांपैकी १०-१५ टक्के सोडले तर (आजकाल तर १%) पटकथा-संवाद, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही निकषांवर बाकीचे चित्रपट तद्दन ठरतात.

तद्वत बॉलीवूडनिर्मित एकूण गीतांपैकी १०-१५ टक्के गीते सोडली तर (आजकाल तर १%) शब्द, सूर आणि लय या तिन्ही निकषांवर बाकीची गाणी तद्दन ठरतात.

हे चित्रपट चालतात ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे असे म्हणावे तर आपली संस्कृतीच तद्दन आहे असे म्हणावे लागेल.

आजकाल तर हॉलिवूड चित्रांच्या डीव्हीडी पाहून त्यातल्या कथा जशाच्या तशा उचलणे, प्रसंग संवादासकट घुसवणे हे तर मराठी चित्रपटांपर्यंत पोचले आहे. ('अगंबाई, अरेच्या' = "व्हॉट विमेन थिन्क!") जागतिक सपाटीकरणाच्या रेट्यात "मल्हार बारी, मोतियानं द्यावी भरून" हे (शाहिर साबळ्यांचं ) अस्सल लोकगीत हॉलिवूडच्या कथेत गुंफून निर्माण झालेला चित्रपट आपल्या संस्कृतीचं प्रतिक, मिथक अथवा मानबिंदू म्हणून आपण मान्य करावा असं मला तरी वाटत नाही.

प्रियाली's picture

11 Aug 2008 - 3:01 pm | प्रियाली

लेखाचा विषय ठीकच आहे.

जागतिक सपाटीकरणाच्या रेट्यात "मल्हार बारी, मोतियानं द्यावी भरून" हे (शाहिर साबळ्यांचं ) अस्सल लोकगीत हॉलिवूडच्या कथेत गुंफून निर्माण झालेला चित्रपट आपल्या संस्कृतीचं प्रतिक, मिथक अथवा मानबिंदू म्हणून आपण मान्य करावा असं मला तरी वाटत नाही.

अगदी! संस्कृतीचे मानबिंदू ठरवण्यास यापेक्षा बर्‍या अनेक गोष्टी आपल्याकडे असाव्यात.

अशा कालखंडात आपल्या 'निर्बुद्ध'हिंदी चित्रपटांचे आपण ऋणी असले पाहिजे.

असहमत! अशा प्रकारची ऋणं मान्य करण्यासाठी हिंदी चित्रपट बघताना जशी बुद्धी गहाण ठेवावी लागते तशीच बुद्धी गहाण ठेवावी लागेल.

विसोबा खेचर's picture

11 Aug 2008 - 12:26 pm | विसोबा खेचर

जगभरातल्या चित्रपटसृष्टीतलं अत्यंत युनिक व एकमेवाद्वितीय असं असलेलं हिंदी चित्रपटसंगीत किंवा भारतीय चित्रपटसंगीत ह्या मुद्द्यावर सर्वच प्रतिसादी मूग गिळून गप्प का आहेत ते समजत नाही! :)

कुणीतरी मला, फार नाही, किमान ५० तरी हॉलिवुड किंवा जगातल्या इतर चित्रपटांची यादी द्यावी ज्यात एकापेक्षा एक अशी अजरमर गाणी आहेत! माझीही यादी तयार आहे! :)

तात्या.

डॉ.प्रसाद दाढे's picture

11 Aug 2008 - 6:46 pm | डॉ.प्रसाद दाढे

मी आत्ताच लेख वाचला, चा॑गला आहे पण तात्या म्हणतात तसे हि॑दी चित्रपटस॑गीताची (अर्थातच जुन्या) सर हॉलिवुडच्या धि॑गाण्याशी करता येणे अशक्य आहे. जरी सलील, आर.डी इ म॑डळी॑नी पाश्चात्य सि॑फनीज वापरल्या असल्या तरी त्या अस्सल भारतीय मातीत घोळवल्या आहेत व कर्णमधूर स॑गीत दिले आहे.
(प॑चमदा॑चा प॑खा) प्रसाद.

अनिल हटेला's picture

11 Aug 2008 - 12:43 pm | अनिल हटेला

तात्या !!
अहो हा तर आपला बेस आहे हो !!!
आणी आपल्याकडे इम्पोर्टेड गोष्टीना फार डीमन्ड आहे !!

मग हॉलीवूड का असेना !!

आणी हिन्दी चित्रपट सॄष्टी बद्दल त्या सन्गीत बद्दल आम्ही पामरानीए काय बोलाव !!

जे सुखावत ते सन्गीत ...

आनी ते फक्त भारतात आपल्याकडे च मिळत........

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

साती's picture

11 Aug 2008 - 12:52 pm | साती

लेख आवडला. सगळ्याच मतांशी सहमत नसेन पण जागतिकीकरणाच्या लाटेत स्वतःचे वेगळेपण टिकवून धरणार्‍या बॉलिवूडचे कौतुक करावेच लागेल.
मुक्तसुनित यांचे विचार बहुतांश पटतात.

साती

वैशाली हसमनीस's picture

11 Aug 2008 - 1:02 pm | वैशाली हसमनीस

आपला लेख आवडला,भावला.काही मुद्दे सोडले तर आपल्या मतांशी मी सहमतआहे.इथे ,मलेशियात लोकांना इंडियाबद्दल फार माहिती नाही पण बॉलिवूड संबंधी खूप माहिती आहे्. हिंदी नट-नट्या माहीत आहेत.ते लोक हिंदी सिनेमांचे क्रेझी आहेत . हे आपल्या बॉलिवूडचे यशच म्हणावे लागेल.

अनिल हटेला's picture

11 Aug 2008 - 1:12 pm | अनिल हटेला

इकडे चायना मध्ये सुद्धा हिन्दी सॉन्ग्स फार प्रसीद्धा आहेत !!

आवारा हु एवर्ग्रीन आहे इकडे शिवाय आखे खुली हो या हो बन्द ....

मी बर्याच हनाच्या तोन्डून हिन्दे गाणी ऐकली आहेत्य ....

शब्द चुकीचे वापरतात पण रीदम तोच असतो.....

फार अभिमान वाटतो अस काही ऐकल की.....

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

विसोबा खेचर's picture

11 Aug 2008 - 1:15 pm | विसोबा खेचर

हॉलिवुडमधील चित्रपटगीतं इकडे भारतात कधी कुणी गुणगुणतांना दिसत नाही! ;)

तात्या.

सहज's picture

11 Aug 2008 - 1:30 pm | सहज

भारतीय चित्रपट संगीत सगळ्या तिकडच्या चाली ढापते ना मग तिच गाणी गुणगुणतात. कशाला हवी वरीजीनल ;-)

असो. अरे आहे ना बॉ सगळ्यांना बॉलीवूड चे कौतुक. कोण साला [सॉरी उच्चभ्रु ;-)] नाही म्हणतो!

भला है बुरा है कैसाभी है मेरा शिणेमा मेरा देवता है!!

ऑल हेल बॉलीवूड!!

विसोबा खेचर's picture

11 Aug 2008 - 1:36 pm | विसोबा खेचर

भला है बुरा है कैसाभी है मेरा शिणेमा मेरा देवता है!!

तेच तर मीही म्हणतोय. ते तुमचे परदेशी चित्रपट जळ्ळे असतील की नितांतसुंदर अन् ऑस्करच्या लायकीचे! जल्ला आम्ही कुठे नाही म्हणतोय?

परंतु आमच्या हिंदी चित्रपटांची शानच निराळी!

आपला,
(उत्पलदत्तच्या गोलमालचा प्रेमी) तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Aug 2008 - 3:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तेच तर मीही म्हणतोय. ते तुमचे परदेशी चित्रपट जळ्ळे असतील की नितांतसुंदर अन् ऑस्करच्या लायकीचे! जल्ला आम्ही कुठे नाही म्हणतोय?
आणि ऑस्करच मोठं हे कोण ठरवणार? गोल्डन ग्लोब, कान काय कमी आहेत का? का तिथे पण पाश्चिमात्य दुनियेत फक्त अमेरीकाच मोठी आणि बाकी सगळे चिरकूट?

जर्मनीत शाहरूख खान हिट आहे. रशियात आणि चीनमधे अजूनही राज कपूर आणि त्याची गाणी चालतात. एवढंच काय मी रामूचा 'भूत' ब्रिटीश (बीबीसीच्या) वाहिनीवर पाहिला आहे.

आणि भले हॉलीवूडच्या कल्पना उचलत असतील आमचे लोक, पण ते चित्रपट बघताना कधीही परकीय वाटतात का? उदा, 'अगंबाई अरेच्चा' पाहताना कधीही तो परकिय वाटतो का? असे अनेक चित्रपट 'उचललेल्या' या प्रकारातले असतील. पण त्यांचं रुपांतर, भाषांतर नाही, किती छान, भारतीय होतं! किती लोकांना 'डोंबिवली फास्ट' बाहेरचा वाटला? त्या चित्रपटाचंही 'फॉलिंग डाऊन'शी साधर्म्य नाही असं थोडीच आहे?
जर 'ती फुलराणी'ला टाळ्या पडतात 'माय फेअर लेडी'चं रूपांतर असूनही तर 'उचललेल्या' हिंदी चित्रपटांना का नाही?

आणि तात्यांचा संगीताचा मुद्दा तर आहेच! पाश्चात्य संगीत हे मात्र चित्रपटांमधून आपल्या भेटीला येत नाही, बाहेरच रहातं!

भाग्यश्री's picture

11 Aug 2008 - 10:16 pm | भाग्यश्री

अगदी सहमत.. लास वेगास मधील बेलाजिओ कॅसिनो मधे, आम्हाला पाहून त्या माणसाने आवारा हु,इचक दाना, मेरा जुता है जापानी वगैरे राज कपूरची गाणी म्हणून दाखवली होती.. त्या बरोबर, ते खांद्याला अडकवलेली पेटी सदृश वाद्य होते, ते ही वाजवत होता तो.. ( मला प्लीज या वाद्याचं नाव सांगा.. खूप दिवस शोधतीये..)
आम्ही दोघंही अवाक झालो होतो! आपल्या बॉलीवूडची गाणी इतकी प्रसिद्ध नसती, राज कपूर इतका प्रसिद्ध नसता, तर त्यांना कसं कळलं असतं की हे भारतिय संगीत आहे.. किंवा भारतिय कलाकार आहे.. आम्हाला पाहून आमच्या देशातलं गाणं त्याला कसं वाजवता/म्हणता आलं असतं, जर आपले चित्रपट्,कलाकार्,संगीत इतकं लोकप्रिय नसतं तर.. ??

(ह्ं.. त्याने 'राज कपूर' ची गाणी म्हटली, सलमान खानची नव्हे.. ही बाब विसरता येणार नाही.. लोकांना शाहरुख खान वगैरे माहीती असतो, लोकं क्रेझी देखील असतात.. पण संगीत/ गाणं म्हणायचं झालं तर त्यांना बहुधा आवारा हू किंवा मेरा जुता है जापानी च आठवेल! निदान त्या लास वेगास मधल्या माणसाला आठवलं.. तो जेव्हा वाजवत होता, तेव्हा आसपासचे सगळेजण थांबून ते ऐकत होते.. आणि तो फक्त आम्हा भारतियांसाठी ते वाजवून दाखवत होता! अक्षरश रोमांच आले होते.. जमल्यास ती व्हीडीओ क्लीप मी इथे लोड करेन..)

मेघना, अग्रलेख आवडला.. अजुन थोडा मोठा चालला असता... पण वेगळ्या पर्स्पेक्टीव्हने केलेला विचार आवडला..

सर्किट's picture

11 Aug 2008 - 10:28 pm | सर्किट (not verified)

( मला प्लीज या वाद्याचं नाव सांगा.. खूप दिवस शोधतीये..)

अकॉर्डियन ?

अमर अकबर ऍन्थनी मध्ये कुणीतरी वाजवते ना ?

- सर्किट

भाग्यश्री's picture

11 Aug 2008 - 10:51 pm | भाग्यश्री

ह्म्म.. बरोबर.. अकॉर्डीयनच ते.. किती दिवस आठवत होते नाव! धन्यवाद!

विसुनाना's picture

12 Aug 2008 - 11:19 am | विसुनाना

अमर उर्फ विनोद खन्ना वाजवतो. त्याच्या (पायाच्या!!) गुडघ्यांना (गुडघे दुसरीकडे कुठे असतात?!!) (दोन) झांजा बांधलेल्या (वाजवण्यासाठी दोन झांजा पुरेत!!) असतात. वगैरे...

अनिल हटेला's picture

11 Aug 2008 - 1:18 pm | अनिल हटेला

मला एक ईन्ग्लीश गान पूर्ण येत ....

r u ready ..........................

बास शेवट पर्यन्त एवढच म्हणायच !!!!!!

- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

मराठी_माणूस's picture

11 Aug 2008 - 1:59 pm | मराठी_माणूस

हिंदी चित्रपट संगीत हा आपल्या विविधतेला एका सूत्रात ओवणारा एक मजबूत धागा झाला आहे

प्रखर सत्य,. धागा कसला चांगला दोरखंड आहे.

एक गोष्ट मात्र खटकते , ती म्हणजे , जे संगीत अभिप्रेत आहे त्याचि निर्मिति मात्र गेल्या बर्‍याच वर्षा पासुन थांबलि आहे असे वाटते.

भडकमकर मास्तर's picture

11 Aug 2008 - 2:51 pm | भडकमकर मास्तर

अनेक संस्कृती भांडवलशाहीच्या वरवंट्याखाली / रणगाड्याखाली अस्तंगत झाल्या / होणार आहेत असे असताना संस्कृतीचा बुलंद झेंडा फडकवत ठेवणार्‍या या भारतीय चित्रसृष्टीला सलाम.... ( माझ्या मते भारतीय म्हटले असते तर त्यात सगळेच तामिळ, तेलगु , मल्याळम आले )

व्यावसायिकच्या तुलनेत प्रायोगिकचं कितीही कौतुक केलं तरी व्यावसायिक उत्तम चालू असतानाच प्रायोगिक मूळ धरतं, हा मुद्दा काहीसा वेगळा वाटला आणि पटला... :)

मेलोड्रामा आणि नाचगाणी या उच्चभ्रू वर्गाने नाक मुरडलेल्या गोष्टी या प्रवाहाने आपले भूषण म्हणून मिरवल्या. शस्त्र म्हणून वापरल्या. ओळख म्हणून जिवंत ठेवल्या.
मुद्दा पटलाच.... पण इथे मात्र अधिक विस्तृत लेखन अपेक्षित होतं....

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विकास's picture

11 Aug 2008 - 7:12 pm | विकास

अग्रलेखामागची मूळ कल्पना आवडली जरी त्यातील सर्वच विचार पटले नसले तरी...

अशा कालखंडात आपल्या 'निर्बुद्ध'हिंदी चित्रपटांचे आपण ऋणी असले पाहिजे. कारण त्यांनी नकळतच या गृहीतकाचा पराभव करून आपला स्वतंत्र आवाज बुलंद ठेवला आहे. अनेक क्षेत्रांनी त्यांचा हा धडा गिरवला, तर आपल्याला आपल्या मरत्या संस्कृतीच्या नावाने गळे काढण्याचे काहीच कारण उरणार नाही.

वरील विधान हे प्रातिनिधीक म्हणून लिहीले आहे पण त्या व्यतिरीक्त खालील मुद्दे आपल्या संपुर्ण अग्रलेखासंदर्भातच आहेत -

  1. वास्तवीक संस्कृती म्हणून म्हणालच तर भारतीय चित्रपटसृष्टीची सुरवात करणार्‍या सुरवातीच्या मराठी (आणि कधी चालू झाले ते माहीत नाहीत पण बंगाली देखील) चित्रपटात "कॉपिकॅट" प्रकार कमी दिसून येतो. प्रभातचे कुंकू , शेजारी आणि माणूस सारखे चित्रपट तर सरळ सरळ सामाजीक होते. पण "संत ज्ञानेश्वर" सारखा चित्रपट पण सामाजीक जाणीव करून देणारा, लोकशिक्षण देणारा होता असे आता पाहील्यावर वाटते... ते करत असताना मूळ मातीशी इमान सोडले नव्हते. पण जे काही दाखवले ते तत्कालीन समाजाला शिकवण्यासाठी मांडले तत्कालीन समाजाचे चित्रपटातील रूप म्हणून मांडले नाही. अर्थात मी नंतरच्या मराठी चित्रपटांबद्दल बोलत नाही. नाही म्हणायला "वोरीजीनल" बोलपट काढून जनसामान्यात (केवळ बुद्धीवाद्यांत नाही) यशस्वी करणारा असामी कलावंत म्हणजे - दादा कोंडके!
  2. या उलट पुर्वीच्या काळातील गुरूदत्त, राज कपूरचे जुने चित्रपट आणि नंतर अर्थातच स्मीता पाटील, शबाना आझमी सारख्या असामान्य नट्यांचे कलात्मक चित्रपट सोडल्यास काय दिसते? - तर जे समाजात आहे, अथवा होवू घातले आहे त्याचे प्रतिबिंब.
  3. मला हे चित्रपट आवडतात आणि पुन्हा पुन्हा पाहू शकतो, पण विश्लेषण म्हणून विचार करा - शोले: पेड प्रायव्हेट आर्मी... , दिवार - समाजातील गुंडगिरीचे अप्रत्यक्ष उदात्तीकरण (ऐकीव माहीतीप्रमाणे तो चित्रपट हाजी मस्तान वर आहे), मग अनेक चित्रपट हे निव्वळ हॉलीवूडची कॉपी होऊ लागले. बप्पी लेहरी आला आणि फ्रिक्वंट फ्लायर माइल्सचा उपयोग करत जगभर हिंडून संगीत चोरू लागला...बर्‍याचदा (अर्थात त्यातपण अपवाद आहेतच), जे काही नाच दिसू लागले ते पहाताना "सर्वांग हिडीस व्यायाम" असे वर्णन योग्य वाटण्यासारखे झाले. (उ.दा. म्हणून साध्या पोषाखात पण एखादा पाश्चात्य पद्धतीचा नाच चांगला कसा वाटू शकतो हे गीता बालीने इतके चांगले दाखवले तरी ... )
  4. मग याला संस्कृती कसे म्हणायचे?

तरी देखील एक गोष्ट राहून राहून वाटते - की लता-आशा-किशोर-रफी-मुकेश आणि मग इतर अनेक यांच्या प्रसिद्ध हिंदी गाण्यांचा एक परीणाम नक्की झाला दक्षिणेत पण हिंदी विरोध काही अंशी हळू हळू कमी होवू लागला...

अभिज्ञ's picture

11 Aug 2008 - 7:15 pm | अभिज्ञ

तात्या,
जगभरातल्या चित्रपटसृष्टीतलं अत्यंत युनिक व एकमेवाद्वितीय असं असलेलं हिंदी चित्रपटसंगीत किंवा भारतीय चित्रपटसंगीत ह्या मुद्द्यावर सर्वच प्रतिसादी मूग गिळून गप्प का आहेत ते समजत नाही!

तुमचा हिंदुस्थानी संगीत व त्याबद्दल असलेले हिंदि चित्रपट सृष्टीचे योगदान हा मुद्दा ग्राह्य आहे.
परंतु नाइलाजास्तव हे मान्यच करावे लागेल की आपणास अभिप्रेत असलेले हिंदी संगीत हे ६० ते ९० च्या दशकातले असावे.
दर्जेदार हिंदी चित्रपटसंगीत आम्ही तरी हेच मानतो.
किशोरदा,लता-आशा,पंचमदा....वगैरे असंख्य मंडळींनी दिलेले योगदान कालातीत आहे.
परंतु दुर्दैवाने तो दर्जा आज सापडत नाहि.
"आजा मेरी गाडि में बैठ जा",किंवा "गोरी गोरी लडकी..." सारखी तद्दन फालतू व बाजारू गाणि त्या त्या वेळेस टॉपटेन लिस्ट मध्ये उच्चपदाला होती.
असो,
हा दर्जेदार हिंदी चित्रपट संगीताचा मुद्दा ग्राह्य धरला तरी हे विसरून चालणार नाहि कि हि निर्मिती ज्या काळात झाली त्याला तरी
"जागतिकिकरणाचा" काळ मानता येणार नाहि.
जागतिकी करण हे जाणवु लागले ते गेल्या दशकाच्या शेवटी शेवटी. इंटरनेट, सिडि-डिव्हिडि ,केबल टिव्हि ,२४ तास चालु असणारे मुव्ही चॅनेल्स, फॅशन टिव्ही,एम टिव्ही....वगैरे असंख्य गोष्टींचा फरक भारतीय मानसावर होत असलेला किंवा झालेला परिणाम हिंदि चित्रपटातुन चांगलाच जाणवतो.
खर्‍याखुर्‍या जागतिकी करणाच्या काळात ,तात्या तुम्हाला अभिप्रेत असलेले दर्जेदार संगीत हे अभावानेच ऐकायला मिळतेय,हि वस्तुस्थिती आहे.
तेंव्हा खरे आव्हान हे आता उभे आहे असे मला वाटते.

त्याच अनुषंगाने मेघना ताईंनी व्यक्त केलेले मत हे फारच घाईत केल्या सारखे वाटते.
किंबहुना संपादकिय लेखात ह्या बाजुचा देखील उहापोह अपेक्षित होता,त्यामुळेच मला तरी हा लेख एकांगी वाटला.

अभिज्ञ.

घाटावरचे भट's picture

12 Aug 2008 - 1:27 am | घाटावरचे भट

अभिज्ञराव,

तुम्ही आजच्या जमान्यातल्या रेहमान आणि शंकर-एह्सान-लॉय सारख्या बुद्धीवान आणि कुशल संगीतकारांना विसरता आहात. आजकाल माध्यमांच्या प्रभावामुळे पाश्चात्य संगीत आपल्याकडे लगेच पोहोचतंय आणि त्याचा जनमानसावरचा प्रभावही वाढतो आहे. अशा परिस्थितीत, पाश्चात्य संगीताचा खुबीने वापर करून, अस्सल भारतीय संगीताला त्याची योग्य जोड देउन हे लोक एक वेगळंच अत्यंत चांगलं संगीत निर्माण करतायत, जे खचितच कौतुकास्पद आहे.

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

प्राजु's picture

11 Aug 2008 - 7:29 pm | प्राजु

लेख आवडला.

हिंदी चित्रपट संगीत हा आपल्या विविधतेला एका सूत्रात ओवणारा एक मजबूत धागा झाला आहे
भारतीय संस्कृती जपणारा आणि भारतीय माणसाला एकत्र बांधून ठेवणारा दोर खंडच आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Aug 2008 - 7:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मरत्या संस्कृतीसाठी हिंदी चित्रपटाचे आपण ऋणी असले पाहिजे, हे वयक्तिक पटणारे नसले तरी बॉलीवूडने अनेक गोष्टी दिल्या हे मान्यच केले पाहिजे, त्याचबरोबर चित्रपटात विविध संस्कृतीचे दर्शनही बर्‍याचदा घडते. चित्रपट जगताचा लेखाच्या निमित्ताने घेतलेला आढावा आवडला.

ऋषिकेश's picture

11 Aug 2008 - 11:20 pm | ऋषिकेश

महत्वाच्या विषयावरचा परंतू काहिसा त्रोटक अग्रलेख आवडला. परंतु पटला असे नाहि (आणि पटावा हा संपादिकेचा हेतु देखिल नाहि)
परंतू स्वतःला पटलेली/वाटणारी एक विचारधारा समर्थपणे मांडणारा किंवा एका विचारप्रवाहाचे प्रतिनिधित्व करणारा नेटका आणि बांधीव लेख म्हणून आवडला.

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

बेसनलाडू's picture

11 Aug 2008 - 11:40 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

चित्रा's picture

12 Aug 2008 - 12:27 am | चित्रा

अग्रलेखाचा विषय वेगळा म्हणून आवडला. भाषाही आवडली.
हिंदी चित्रपटसृष्टी हा एक यशस्वी व्यवसाय आहे. जो केवळ बाजारपेठेमुळे चालतो आहे, तो संस्कृतीचे नकळत रक्षण करतो असे म्हणवत नाही. मार्केटिंगचे तंत्र नीट सांभाळल्यामुळे झालेला फायदा इतर व्यवसायांनी तशीच दृष्टी ठेवून करून घ्यावा असे म्हणणे मात्र योग्य आहे.

अवांतर - एखाद्या समाजाची कुटुंबव्यवस्था हा जर संस्कृतीचा निदर्शक धरला, तर हल्ली तर हिंदी चित्रपटांतून पूर्वीसारखे हिंदी चित्रपटातली आई मुलाला गाजर का हलवा करताना दिसत नाही. कितीही गंभीर सिनेमा असो, नायक नायिकेचे आई-वडिल, इतर कुटंबीयही कसेबसे थोड्या वेळापुरते दिसले तर दिसतात. नायक नायिकेपुढे कितीही गंभीर प्रश्न असले तरी ते एकटेच त्यातून मार्ग काढताना दिसतात, घरच्यांचा कसलाही आधार त्यांना नसतोच, आईवडिल कुठेतरी लांबच्या गावाला असावेत जिथे फोनही नसतील अशी व्यवस्था करून ठेवलेली असते.

धनंजय's picture

12 Aug 2008 - 1:15 am | धनंजय

माझ्या घरची वडीलधारी मंडळी तमाशापटांना सवंग मानतात. आडगावात प्रत्यक्ष फडावर मी एखादाच तमाशा बघितलेला आहे. त्यातील अभिरुची त्या तुलनेने आणखीनही "सवंग" होती. तरी कित्येक लोकांचे मन रिझवण्याचे सामर्थ्य त्या आडगावात फिरणार्‍या तमाशाचे होते. प्रचंड जनमानसावर राज्य करणार्‍या लोककलेच्या आडोशाशी अभिजात कलांचे, थोड्यांनाच पण अतिशय गहिरा आनंद देणारे, अभिजात कलेचे घर असते.

पाश्चिमात्त्य लोकसंगीताशी (म्हणजे पॉप, रॉक, आदि संगीतप्रवाहांशी) नाक मुरडून फारकत घेतली, हे पाश्चिमात्त्य अभिजात संगीत आज येथे केवळ "म्यूझियम-पीस" बनून असण्याचे मोठे कारण आहे. त्याआधीची कित्येक त्या त्या काळच्या लोकसंगीताला स्फूर्तीचा स्रोत मानण्यास अभिजात पाश्चिमात्त्य संगीतकार काहीच कमीपणा मानत नसत.

अभिजात कलेची चटक लागलेल्या व्यक्तीला स्वस्तातली लोककला (म्हणजे तप-तप नाच न शिकलेल्या पोरी नाचवणारी आणि लाकडी चेहर्‍यांच्या नटांकडून काम करवून घेणारी लोककला) फार कंटाळवाणी वाटते. बहुतेक हिंदी चित्रपट बघताना मला डीव्हीडी बंद करायचा मोह अनावर होतो (फास्ट फॉर्वर्ड करून मी ती तहान भागवतो.) तरी या गल्लाभरू कलाविष्कारांची मूलतः हेटाळणी करू नये - लोकांना रिझवतात म्हणूनच तर गल्ला भरू शकतो.

हॉलिवूडला प्रतिकार करण्यास बॉलीवूड समर्थ आहे, कारण हिंदी चित्रसृष्टीने जनसामान्याची मर्जी ओळखली आहे - संपादकीयाचा हा भाग पटला.

बाकीच्या काही देशांतही हॉलीवूडला कलाक्षेत्र पूर्णतः काबीज करता आलेले नाही - वगैरे मुद्दे काही प्रतिसादांत आलेलेच आहेत. "उच्चभ्रूंनी निर्बुद्ध मानले म्हणून लोकरंजन टाकाऊ होत नाही," हा संपादकीयाचा मूळ मुद्दा पटण्यासाठी हे "एकमेव" असल्याचे ठासून सांगितले नसते, तरीही चालले असते.

मेघना भुस्कुटे's picture

12 Aug 2008 - 8:53 am | मेघना भुस्कुटे

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.

काही स्पष्टीकरणे, काही मतभेद येणेप्रमाणे -

अग्रलेख त्रोटक आहे, असे बर्‍याच जणांनी नोंदवले आहे. अजून काही स्पष्टीकरणे विस्ताराने येणे गरजेचे होते, हे सरळच दिसते आहे. मात्र अग्रलेखाचे स्वरूप काहीसे गोळीबंद असावे, त्याने उदाहरणे-स्पष्टीकरणे-संदर्भ-प्रतिवाद न करता निष्कर्ष मांडावेत, उहापोहाचे काम नंतरच्या चर्चेवर सोडावे; असा माझा ग्रह आहे. त्याला अनुसरून लिहिण्याचा प्रयत्न मी केला होता. तो फसला असावा.

मिथक हा शब्द मी अत्यंत बेजबाबदार सैलपणे वापरला. त्याबद्दल माफी मागायला हवी. तिथे केवळ प्रतीक / मानबिंदू हे शब्द चालले असते.

थोर भारतीय संस्कृतीला बाजारू हिंदी चित्रपटांइतके उथळ प्रतीक देऊ करण्याबद्दल इथे तीव्र मतभेद दिसले. ते अपेक्षितच होते. पण मला आवडो किंवा नावडो - हे चित्रपट, त्यांचा कमीअधिक दर्जा, त्यांची लोकप्रियता, त्यांतून प्रतिबिंबित होणारी संस्कृती हे सगळे माझ्या भारतीय आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे हे मला नाकारता येणार नाही.

जागतिक चित्रपटांमधे इराणी / फ्रेंच / जपानी चित्रपट आघाडीवर आहेत हे खरेच. त्याबद्दल दुमत नाही. पण हे चित्रपट आणि चित्रपट उद्योग यांत आपण फरक करायला हवा. मला व्यावसायिक चित्रपटांबद्दल आणि त्यांच्या अर्थकारणाबद्दल काही मत मांडायचे होते. कुठलाही कलाप्रकार पोट भरलेल्या माणसाची मूलभूत गरज म्हणून टिकून राहतोच. त्यात काही अर्थपूर्ण प्रयोगही होत राहतात. पण त्याचा ओघ आणि सातत्य टिकून राहण्यासाठी त्याला आर्थिक बळाची / लोकप्रियतेची गरज असते हे सत्य आहे. कुणी एक अर्नाळकर लिहीत राहतो, कुणी मीना प्रभू लोकप्रिय होते, कुण्या 'मृत्युंजया'च्या अनेक आवृत्त्या निघतात - म्हणून पुस्तक उद्योग राहतो. अरुण कोलटकर वा नेमाडे जितके गरजेचे, तितकीच ही मंडळीही. कुणीच कुणाला कमी लेखण्याचे कारण नाही. एकमेकांच्या निष्ठा वा निकषांबद्दल वाद संभवू शकतात, पण अंतिमतः दीर्घदृष्टीने पाहता ('लाँग टर्म'साठी हा मराठी शब्द बरोबर आहे काय?) वाचकाला दोहोंची गरज असतेच.

अजून एक गोष्ट. हिंदी चित्रपट कलावंत हे सगळे बुद्ध्याच करत आहेत असे माझे म्हणणे अजिबात नाही. हे कळत-नकळत घडत आले आहे, आणि ते लाभदायक आहे. रामगोपाल वर्माचे चित्रपट वाईटच असतात, म्हणून ते खेडेगावात चालत नाहीत; किंवा भोजपुरी चित्रपट अप्रतिम आणि बुद्धिवादी असतात, म्हणून गावोगावी गल्ला गोळा करतात असे नाही. ती एका विशिष्ट शैलीला दिलेली दाद आहे. त्यात स्वत्त्व आहे. आशय आहे की नाही, हे दिग्दर्शकावर ठरेल, ठरते.

बाकी सगळे नेहमीचेच. टीकेबद्दल आभाही. अर्थात कौतुकाबद्दलही. :)

धमाल नावाचा बैल's picture

12 Aug 2008 - 9:24 am | धमाल नावाचा बैल

अग्रलेख बरा वाटला. नावावरुन मला वाटलं ह्या अग्रलेखातुन मुंबईतल्या भैय्यांना झॉडपाल;)

संदीप चित्रे's picture

12 Aug 2008 - 8:37 pm | संदीप चित्रे

मेघना ...अग्रलेख आवडला कारण माझं हिंदी सिनेमावर मनापासून प्रेम आहे -- मग ते कसेही असोत !!!
हिंदी सिनेमा आवडणार्‍या / न आवडणार्‍यांनी शिरीष कणेकरांचे 'माझी फिल्लमबाजी', 'गाये चला जा' आणि 'यादों की बारात' जरूर वाचावीत.
(हिंदी सिनेमा आवडत नसेल तर आवडीन पहावासा वाटू लागेल !)

खूप हिंदी सिनेमा हॉलिवूडची कॉपी असतात हे मान्य करूनही (उदा. भट कँपचा गेल्या काही वर्षांतील कुठलाही सिनेमा !!!) जरा डोळसपणे पाहिले तर लक्षात येईल की गेल्या ७-८ वर्षांत खूप वेगवेगळ्या कथानकांवर सिनेमा तयार झाले. हिरो - हिरॉइन - व्हीलन हा ठराविक ढाचाही राहिलेला नाहीये. आशुतोष गोवारीकर, मधुर भंडारकर, आमीर खान, विपुल अमृतलाल शाह, शिमित आमीन, राजकुमार संतोषी -- प्रयोग करणार्‍यांची किती दिग्दर्शकांची नावं घ्यायची !!!
--------
मी स्वतः 'डाय हार्ड बच्चन एसी' आहे. एरव्ही शाहरूखला सहन करणं अशक्य असतं पण तोच शाहरूख जेव्हा स्वदेस किंवा चक दे इंडियामधून येतो तेव्हा जाणवतं की हा चांगला अभिनेताही आहे बरं का !
--------
थोडक्यात म्हणजे --
कुणी निंदा .. कुणी वंदा, हिंदी सिनेमा ... प्रिय सदा !!

यशोधरा's picture

12 Aug 2008 - 11:00 pm | यशोधरा

थोडक्यात म्हणजे --
कुणी निंदा .. कुणी वंदा, हिंदी सिनेमा ... प्रिय सदा !!

मलाही!!

अग्रलेख फारसा पटला नाही, पण अपनी अपनी सोच! :)

चतुरंग's picture

13 Aug 2008 - 2:07 am | चतुरंग

बॉलिवुडने हॉलिवुडच्या वेगवान हाताळणीला, तांत्रिक झगमगाटाला आपलेसे केले, पचवले आणि चक्क एक ढेकर दिली.

एवढे एक वाक्य सोडले तर मला बहुतेक मते पटली नाहीत. त्यांचा उहापोह वरती झालेला असल्याने पुनरुक्ती करीत नाही.
पु.ले.शु.

चतुरंग

चित्रपट सृष्टीत राष्ट्र जोडण्याचेही सामर्थ्य आणि क्षमता आहे.

१९४५ च्या सुमारास किस्मत या चित्रपटाने पूर्ण भारतात आगळी आणि वेगळी क्रांती केलेली होतीच. ( उपकार, पुरब और पश्चिम इत्यादी).

भारत आणि पाकिस्तान या देशाला एक आणण्याचे सामर्थ्य आणि क्षमता आपल्या चित्रपट सृष्टीत निश्चितच आहे.