ओंकारेश्वर प्रवासाचे निमित्ताने-एकूण ४ पैकी भाग ४

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in भटकंती
6 Jan 2015 - 10:18 am

पुलावरून दिसणारे ओंकारेश्वर मंदिर आणि पुलाच्या उजवीकडील तेजाजी जाट ह्यांचा पुतळा

सकाळी उठलो. तयार झालो. मात्र पाहतो तर चालक अजून झोपेतच होता. त्याला आन्हिके आटपायला थोडासा अवधी दिला आणि मग पुलाकडे निघालो. आज काहीतरी विशेषच उत्सव असावा अशी गर्दी रस्त्यावर लागून राहिलेली दिसली. डोक्यावर मोठमोठाले ओझी घेऊन असंख्य स्त्री-पुरूष दर्शनाला निघालेले दिसत होते. काल ज्या पुलाजवळच्या वाहनतळापर्यंत आमचे वाहन गेले होते त्या ठिकाणाच्या सुमारे एक किलोमीटरभर आधीच पोलिसांनी गाडी रोखली. आमच्या परिक्रमामार्गावरील चालण्यात जातायेता मिळून दोन किलोमीटर भर तर पडलीच शिवाय वेळेचे गणितही चुकेल असे वाटू लागले.

गायत्री शक्तीपीठाची इमारत पुलापार अगदी समोरच आहे तर बाहेती धर्मशाळेची तिच्या उजवीकडे

मुळात ठरल्यानुसार सहा वाजता परिक्रमेस सुरूवात करून, अगदी सर्वात जास्त वेळेत म्हणजे साडेतीन तासातही आम्ही परिक्रमा करू शकलो असतो तर, अतिथीगृहात आठ ते दहा मिळणार असलेला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टही करू शकलो असतो. आता मात्र पुलाच्या सुरूवातीस आम्ही पोहोचेपर्यंतच सात वाजले होते. परिक्रमा करण्यास आम्हाला तीन तासही लागले असते तरी, आता कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट हुकणार हे नक्की होते. शिवाय अतिरिक्त गर्दीमुळे चालण्यासही काहीसा अधिकच वेळ लागत होता.

पुलापार गेल्यावर पुलाखालून उजवीकडे गेल्यास ओंकारेश्वर मंदिर लागते तर पुलाखालून डावीकडे गेल्यास लागतो गीता परिक्रमापथ

त्यातही अगदी पाण्यालगतचा मार्ग सोडून द्यायचा. परिक्रमा मार्ग किंचित वरून आहे.

परिक्रमामार्गावर कुठे कुठे पायर्‍या होत्या, कुठे कुठे नुसतेच काँक्रीटचे चढ-उतार

परिक्रमामार्गावर कुठे कुठे पायर्‍या होत्या, कुठे कुठे नुसतेच काँक्रीटचे चढ-उतार, तर कुठेकुठे वाट मातीतूनही चालत होती. मात्र उजव्या बाजूस गीतेचे श्लोक असलेले दगडी फलक दिसत राहत. त्यातल्या अध्याय व श्लोक ह्यांच्या संख्येवरून परिक्रमापथावरील आपली प्रगती लक्षात येत राही. जागोजाग नर्मदेची, शिवाची, मारुतीची मदिरे; एवढेच काय तर बौद्ध पॅगोडासारखी प्रार्थनास्थळेही दिसत होती. शिवाय मारुतीचे अग्रदूत असलेली माकडे, व्यवस्थित वानरभोजन मिळत असल्याने सर्वत्रच आढळून येत होती. काही पिल्ले तर अतिशयच लहान दिसत होती.

पॅगोडासारखी प्रार्थनास्थळेही दिसत होती. काही पिल्ले तर अतिशयच लहान दिसत होती.

स्थानिक प्रशासनाने अनधिकृत बांधकामे नुकतीच हटवली होती. त्यांच्या पुनर्स्थापनेची कामे आबालवृद्ध स्त्रीवर्गानेच हाती घेतलेली दिसून येत होती.

परिक्रमापथावर माळांची दुकाने आणि देवींच्या मूर्ती जागोजाग असत

धोत्र्याची आणि घंटेची फुलेही आपापल्या डौलदार झुडुपांवर फुललेली दिसत होती

स्थानिकांत कपाळावर ओंकार रेखण्याची शैली प्रचलित होती, तर भाविकांत सर्वसामान्य प्रथेनुरूप हातांत गंडेदोरे बांधणे खूपच लोकप्रिय असल्याचे दिसून येत होते.

मांधाता पर्वताच्या शिखरावर पोहोचलो तेव्हा त्याचा आकार ओंकारस्वरूप असल्याचे पुरावे दिसू लागले. वळणे ओळखीची वाटू लागली. तसेच नर्मदा आणि कावेरिका ह्यांच्या पैलतीरांवरील शिखरेही स्पष्टपणे दृष्टीस पडू लागली.

पथ चढत चढत मांधाता पर्वतावर, राजराजेश्वर मंदिरापाशी घेऊन गेला. तिथे कमळे फुलली होती.

शिखरावरील रस्ता सरळसोट आणि सपाट होता. वर सिद्धेश्वर मंदिराचे भग्नावशेष दिसून आले.

सिद्धेश्वर मंदिराचे भग्नावशेष आणि जनावरांना पाणी प्यायला असते तशी एकसंध दगडातली डोणी.

आता धरण दिसू लागले आणि परिक्रमापथ ओंकाराच्या शेपटीचे वळण घेत खाली उतरू लागला.

मग उंचावरून अमलेश्वरनजीकचा पूल दिसला, त्यानंतर आम्हीही उतरून त्याच्या पातळीवर आलो

अखेरीस गीतेतला अखेरचा श्लोक दिसला आणि अमलेश्वर पूल नजरेच्या टप्प्यात आला.

आता आमच्या अतिथिगृहाकडचा पूलही दिसू लागला होता आणि मग त्या पुलाचा चढ-उतार.

दहा वाजून गेले होते. कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टही गेलेलाच होता. मात्र पायी परिक्रमा तीन तासात पूर्ण केल्याचे समाधान मोठे होते. त्याची तुलना ब्रेकफास्टशी होऊच शकत नव्हती. परत येऊन नाश्तानुमा जेवण केले. किंचित विश्रांती घेतली.

मग सुमारे दोन अडीच तासांच्या, इंदौरातील नखराळी ढाणीपर्यंतच्या प्रवासास निघालो. तिथे चहापान करून मग आम्ही बिजसेन माता आणि कस्तुरबाग्राम ह्या स्थलदर्शनाकरता पुन्हा विमानतळ रस्त्यावर निघालो. सुमारे अर्ध्या तासात आम्ही बिजसेन माता मंदिरात पोहोचलो. अक्षरशः जत्राच भरलेली होती. आम्हीही दर्शन घेतले. मात्र कस्तुरबाग्रामबद्दल असे कळले की ते शहराच्या पूर्वेला देवास रस्त्यावर आहे. दिवसभराच्या धावपळीमुळे आज जरा थकवाही जाणवत होता, शिवाय आम्हाला शहरात जेवण करून दक्षिणेला २० किलोमीटरवर असलेल्या नखराळी ढाणीपर्यंत परतीचा प्रवासही करायचा होता. त्यामुळे मग आम्ही शहरात एके ठिकाणी पुन्हा माहेश्वरी साडी खरेदी करून, गुरूकृपा रेस्टॉरंटमध्येच जेवण केले आणि परत फिरलो.

नंतरच्या दिवशी दुपारी अडीच वाजता आमची परतीची गाडी होती. म्हणून किमान दीड वाजेपर्यंत स्थानकावर पोहोचायचे ह्या हिशेबाने बारा साडेबारापर्यंत गुरूकृपा गाठायला हवे होते. त्यामुळे सकाळी नऊ वाजताच आम्ही नखराळी ढाणी सोडली. नऊ ते बारा, खजराणा भागातले गणेशमंदिर आणि शहरातले मध्यप्रदेश पर्य़टनविकास मंडळाचे मृगनयनी एम्पोरियम पाहण्याचे ठरवले.

हे गणेशमंदिर, विस्तीर्ण आवारात वसलेले आणि सुव्यवस्थित ठेवलेले सुरेख मंदिर आहे. मृगनयनी एम्पोरियमही सुरेखच आहे. सुती पिशव्या, पर्सेस, सतरंज्या, चादरी इत्यादी हातमागाच्या वस्तू तर दृष्ट लागण्याजोग्या होत्या. आम्ही माफक खरेदी केलीही. नंतर गुरूकृपाकडे कूच केले.

खजराणा भागातले गणेशमंदिरत्यात रेड्यावर स्वार झालेले शनिदेव 


गुरूकृपा रेस्टॉरंटमधले जेवण

वाटेत ५६-दुकान भागात मधुरम् नमकीन आणि स्वीटसच्या दुकानात इंदौरचे प्रसिद्ध नमकीन आणि तिळपट्टी खरेदी केली. खारी मुगडाळ सगळ्यात पसंत आली. तिळपट्टीही सुरेखच होती. मात्र शेव आणि तळलेली तिखट हरबरा डाळ भयानक तिखट निघाली. केवळ चार दाणे तोंडात टाकल्यावर असे वाटू लागले की, रोज फार तर चार चार दाणे तोंडात टाकून तहहयात किंवा डाळ संपेस्तोवर सावकाश खावी. गजक खरेदी आधीच गुरूकृपाशेजारच्या दुकानांतून करून ठेवलेली होती. गाडी वेळेवर सुटली. थोड्याच वेळात खिडकीतून मोर दिसले. काही अंतरावर हरीणही दिसले.


मृगनयनी एम्पोरियमचे प्रवेशद्वार, गाडीतून दिसलेले मोर

त्यानंतर मात्र दुतर्फा बाभुळबनच काय ते सर्वत्र दिसत राहिले. आमची ओंकारेश्वर सहल अपेक्षेहून अधिक आनंददायी अणि संस्मरणीय झाली होती. आम्ही निरोप घेतला खरा, पण केवळ पुनरागमनायच.

http://urjasval.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

6 Jan 2015 - 11:07 am | मुक्त विहारि

रसिकांच्या सोयीसाठी आधीच्या लेखांची लिंक देतो...

ओंकारेश्वर प्रवासाचे निमित्ताने-एकूण ४ पैकी भाग १ ===> http://www.misalpav.com/node/29910

ओंकारेश्वर प्रवासाचे निमित्ताने-एकूण ४ पैकी भाग २ ===> http://www.misalpav.com/node/29916

ओंकारेश्वर प्रवासाचे निमित्ताने-एकूण ४ पैकी भाग ३ ===> http://www.misalpav.com/node/29922

नरेंद्र गोळे's picture

7 Jan 2015 - 4:59 pm | नरेंद्र गोळे

धन्यवाद, मुक्त विहारि. दुव्यांची खरेच गरज भासते.

छान आहे. इंदुर शहरात राहिला असता तर संध्याकाळची सराफा बाचारातली खादाडी करता आली असती.
एकंदर वर्णन पाहता सहल आयोजकांनी तुम्हास खूपच उलटसुलट प्रवास घडवला आहे.

छान लिहिलंय. आवडेश.

यशोधरा's picture

6 Jan 2015 - 2:11 pm | यशोधरा

आवडली छोटी लेखमाला.

मदनबाण's picture

6 Jan 2015 - 3:01 pm | मदनबाण

वाचतोय...
जमल्यास घरी जाउन नर्मदा मैया मधल्या एका नावेचा टॉप व्हू मारला आहे तो शोधुन सापडला तर इथे देतो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
India will have to be prepared for a two-front war: Air Marshal PP Reddy

मदनबाण's picture

7 Jan 2015 - 7:22 am | मदनबाण

Narmada
Om

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॅक मारता है,करंट मारता है...देखो ये लडका करंट मारता है ! ;) :- Police Officer (1992)

नरेंद्र गोळे's picture

7 Jan 2015 - 4:58 pm | नरेंद्र गोळे

बोटीचा व्ही आकाराचा माग सुरेख टिपला आहे. इथे दिल्याखातर धन्यवाद.

मुक्त विहारि, कंजूस, स्वॅप्स, मदनबाण आणि यशोधरा सगळ्यांना प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद.

कंजूस,
इंदुर शहरात राहिला असता तर संध्याकाळची सराफा बाचारातली खादाडी करता आली असती.>>>>
पोटाच्या सुरक्षिततेकरता सराफा हेतुत: टाळला.

एकंदर वर्णन पाहता सहल आयोजकांनी तुम्हास खूपच उलटसुलट प्रवास घडवला आहे.>>>>>
सहल आयोजन आम्ही स्वतःच केलेले होते.
उलटसुलट प्रवास करणे मुद्दामहून टाळले आहे.
नकाशावर पाहाल तर तुम्हीही सहमत व्हाल.

कंजूस's picture

7 Jan 2015 - 6:49 pm | कंजूस

सहमत नाही.

पैसा's picture

16 Jan 2015 - 7:05 pm | पैसा

हा भाग पण आवडला!