ओंकारेश्वर प्रवासाचे निमित्ताने-एकूण ४ पैकी भाग १

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in भटकंती
3 Jan 2015 - 3:58 pm

उज्जयिनी, इंदौर, मांडू, महेश्वर आणि ओंकारेश्वरचे पर्यटन करावे असे कधीचेच मनात होते. मात्र संधी मिळत असे तेव्हा तिथे जाण्यास अनुकूल ऋतूमान नसे.

अनुकूल ऋतूमान निवडावे कसे ह्याकरता त्या ठिकाणांच्या हवामानचित्रांची मदत घेता येऊ शकते. लगतचे प्रकाशचित्र पाहा [१].

इंदौर आणि आसपासच्या प्रदेशात दिवसाचे तापमान नेहमीच अतिशय जास्त असते. ते कमी असण्याचा काळ पावसाळ्याच्या आसपासचा असतो. तिथले रात्रीचे तापमान नेहमीच खूप कमी असते. दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानातील फरक सुमारे १५ अंश सेल्शसचा असतो. म्हणून पाऊस पुरेसा घटल्यावर आणि रात्रीचे तापमान अगदी १० अंश सेल्शस पर्यंत उतरण्याच्या आतच म्हणजे नोव्हेंबरात तिथले ऋतूमान सुखकर असते. नंतर पुन्हा दिवसाचे तापमान फारसे वाढण्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारीतही सोयीस्कर ऋतूमान असते.

आम्ही ह्या नोव्हेंबरच्या सुरूवातीस तिथे जाण्याचा निर्णय घेतला. इंदौरच्या पर्यटन वर्तुळातील ही ठिकाणे पाहायची तर निरनिराळ्या प्रकारे कार्यक्रम आखले जाऊ शकतात. ज्यांना स्थलदर्शन करत असतांनाच, वातानुकूलित स्वयंचलित वाहनांतील प्रवासही हवाहवासा वाटतो, त्रासदायक वाटत नाही, असे अनेकजण इंदौरला एकाच-जागी-राहणे पसंत करतात. तिथूनच एक दिवस उज्जयिनीला, एक दिवस मांडूला, एक दिवस महेश्वरला आणि एक दिवस ओंकारेश्वरला जाऊन परत येत असतात. ह्यात एकाच जागी राहणे होत असल्याने खाण्यापिण्याची, राहण्याची, सामानाची उत्तम सोय अनुभवता येते. पर्यटन संयोजकांच्या सोयीचा असा हा कार्यक्रम असतो. शहरात निवास ठेवल्याने पर्यटकाकडून शहरी दराने निवासखर्च वसूल करता येतो. वातानुकूलित स्वयंचलित वाहनांतील प्रवासही भरपूर होत असल्याने त्या गाड्यांच्या मालकांचाही भरपूर लाभ होत असतो.

किमान-निव्वळ-प्रवास करायचा तर मुंबईकडून येतांना उज्जयिनीसच उतरावे. दर्शनाच्या जागेवर मुक्काम हलवत न्यावे. परततांना इंदौरहून मुंबईकरता गाडी धरावी. ह्यामुळे पर्यटन स्थळावर प्रत्यक्ष निवास करण्याचा आनंद लाभू शकतो. निव्वळ प्रवास किमान राहून, पर्यटनास-लाभलेल्या-वेळेचा-इष्टतम-सदुपयोग होऊ शकतो. जास्तीत-जास्त-पर्यटन-कमीत-कमी-खर्चात होऊ शकते. आम्ही हेच धोरण पत्करले होते.

भारतातील असंख्य लोहमार्ग स्थानकांवर विश्रामकक्ष (रिटायरिंग रूम्स) आहेत. अतिशय वाजवी दरात ते प्रवासाच्या दोन दिवस आधीपासून तर प्रवासाच्या दोन दिवस नंतर पर्यंतच, रहिवासाकरता मिळू शकतात. वैध तिकिटाने प्रवास करणार्‍या प्रवाशासच केवळ ते उपलब्ध असतात. ह्या कारणानेच एवढ्या वाजवी दरात लोहमार्ग व्यवस्थापन ते आपल्याला उपलब्ध करून देऊ शकत असतात. एरव्ही मागणी अफाट वाढून, त्यांचे भाडे वाढविणे अत्यंत निकडीचे झाले असते. लोहमार्ग प्रवास करणार्‍याने निवासाकरता नक्कीच विचारात घ्यावा असा हा पर्याय आहे. आम्ही मात्र ह्यापूर्वी हा पर्याय कधीही वापरलेला नव्हता. ह्यावेळी मात्र तो वापरून प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असा निर्णय घेतला. मुंबईहून आम्ही उज्जयिनी स्थानकावर उतरलो त्या दिवसाकरता, त्या स्थानकावरील विश्रामकक्ष आम्ही सुमारे रु.४००/- दरदिवस दराने आरक्षितही केला. आय.आर.सी.टी.सी.च्या संकेतस्थळावर तशी सोय आहे. लोहमार्गप्रवासाप्रमाणेच ह्या आरक्षणासही रद्द करण्याबाबत निश्चितस्वरूपाचे धोरणही आहे.

उज्जयिनीचे लोहमार्ग स्थानक! इथूनच आमच्या प्रवासाला सुरूवात झाली. पहिल्या मजल्यावरील डाव्या हाताच्या ओवरीत इथले विश्रामकक्ष आहेत. स्थलदर्शनाचे दृष्टीने ही जागा, शहरात मध्यवर्ती असून अत्यंत सोयीची आहे. सुरक्षित आहे. इथला प्रशासकीय व स्वच्छतेबाबतचा अनुभव फारसा वाखाणण्यासारखा नाही. एकूणातच असलेल्या सरकारी अनास्थेचा तो भाग आहे. मात्र त्याकरता हा पर्याय अव्हेरावा एवढा तो मुद्दा सशक्त नाही.

उज्जयिनीला महांकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. इथे कुठलेही सामान, पर्स, मोबाईल, कॅमेरे आत नेऊ देत नाहीत. १५१ रुपयांचे विशेष दर्शन करणार्‍यांना मूळ रांगेत बरेच पुढे सोडले जाते, तसेच त्यांचे सामान ठेवण्याकरता एक कप्पाही कुलूप-किल्लीसहित मोफत पुरवला जातो. आम्ही हाच पर्याय निवडला. ह्या मंदिरात मात्र सुरूवातीपासून तर बाहेर पडेपर्यंत व नंतरही पंडे पिच्छा पुरवतात. त्यांच्यापासून होता होईस्तोवर दूरच राहावे. बडा गणपती मंदिरातही गणेशाचे दर्शन घेतले. मग आम्ही हरिसिद्धी मंदिरात गेलो. ही सर्व मंदिरे एकाच परिसरात आहेत. हरिसिद्धी मंदिराच्या प्रवेशद्वारावर कुठल्याशा उत्सवाच्या निमित्ताने पूर्ण रुंदीची, फुलांच्या माळांची झालर घातलेली होती. त्यातही हरिसिद्धीची मूर्ती साकारलेली असल्याने सुंदर देखावा दृष्टीस पडला.

हरिसिद्धी मंदिराच्या बाजूलाच, सम्राट वीर विक्रमादित्याच्या नवरत्नदरबारातील नऊ रत्नांच्या भव्य तस्विरी टांगलेले एक लांबलचक भव्य दालन पर्यटकांना खुले आहे. तिथे आम्हाला कोशकार अमरसिंह, संस्कृत वैय्याकरणी वररुची, विख्यात वैद्य धन्वंतरी, महान-वास्तुविशारद शंकू, कविकुलगुरू महाकवी कालिदास, यमक-काव्य-शिरोमणी घटकर्पर, महान-ज्योतिर्विद-वराहमिहीर, थोर- खगोल-शास्त्रज्ञ-क्षपणक आणि बेताल भट्ट नावाचा विख्यात-जादुगार अशा नवरत्नांची ओळख झाली. हा बेताल भट्ट म्हणजेच "विक्रम और वेताल" मधला वेताळ असावा. तो लक्ष्यार्थाने राजाच्या मानगुटीवर बसून न्याय्य मागण्यांची तड लावत असे. घटकर्पर याने २२ कडव्यांचे एक प्रसिद्ध यमक काव्य लिहिले आणि जाहीर केले की, याहून सरस यमक काव्य जो लिहील त्याचे घरी घटकर्पर फुटक्या मडक्याच्या खापराने पाणी भरेल. म्हणूनच त्याचे नाव घटकर्पर पडले.

ह्यानंतर आम्ही भर्तृहरी गुहेकडे गेलो. इसवीसनपूर्व ५५४ मध्ये महाराज गंधर्वसेन (वीरसेन), उज्जयिनी नगरीत राज्य करत असत. त्यांना दोन राण्या होत्या. सुशीला नावाच्या राणीपासून त्यांना भर्तृहरी नावाचा मुलगा झाला. दुसर्‍या राणीपासून विक्रमादित्य नावाचा मुलगा झाला. हा राजा-विक्रमादित्य, पराक्रमी, शककर्ता होता. आपण काल-गणनेकरता जे विक्रमसंवत अनुसरत असतो त्या शकाचा कर्ता तोच आहे. राजा विक्रमादित्याचा नवरत्न दरबार होता. त्यातच कालिदास, अमरसिंह इत्यादींचाही समावेश होता. भर्तृहरीस, विक्रमादित्य आणि सुभटवीर्य हे दोन धाकटे भाऊ होते. त्यांच्या बहिणीचे नाव मैनावती होते. मैनावतीचा मुलगा गोपीचंद हा पुढे जाऊन नाथ पंथातील साधू झाला. उज्जयिनीमध्ये भर्तृहरीगुहे नजीकच गोपीचंदाची गुहादेखील आहे.

भर्तृहरी भविष्यात मोठा योगी होईल असे भविष्य वर्तवले गेले. राजपुत्र मोठा झाला. सर्व विद्यापारंगत झाला. कलानिपूण झाला. महाराज गंधर्वसेनांचा भर्तृहरी हा मोठा मुलगा असल्याने, त्यांच्या पश्चात, वयाच्या सोळाव्या वर्षी त्यास राज्याभिषेक झाला. भर्तृहरीला दोन राण्या होत्या. त्यानंतर त्याचा मगधदेशाची राजकन्या पद्माक्षी हिचेशी विवाह झाला. तिचे नाव पिंगला ठेवले. पिंगला अतिशय सुंदर होती. तिच्या प्रेमपाशांत भर्तृहरी बुडून गेला.

राजा भर्तृहरी रसिक कवी होता. थोर मुत्सद्दी होता. कुशल प्रशासक होता. मात्र राणी पिंगलेच्या प्रेमात बुडून गेल्याने तो देहभान विसरला. राज्यकारभारात त्याचे मन रमेना. त्याने राज्यकारभार विक्रमादित्यावर सोपवला आणि नवयौवनाच्या सर्व शृंगारसुखांचा मनःपूत आस्वाद घेऊ लागला. कलासक्त कवी आणि संस्कृत भाषा पंडित असल्याने, शृंगाराच्या रसास्वादावर त्या कालावधीत त्याने शंभर सुरेख कवने रचली. शृंगाराचे यथातथ्य आणि सुरस वर्णन करणार्‍या ह्या काव्याचा प्रभाव, आजही सर्व भारतभर विद्यमान आहे. अनेक लेखन विवरणांतून भर्तृहरीच्या काव्याचे संदर्भ नेहमीच दिले जात असतात. संस्कृत वाङमयात, छंदशास्त्रावरील कविकुलगुरू महाकवी कालिदासाचा “श्रुतबोध” हा ग्रंथ विख्यात आहे. श्रुतबोधात वर्णिलेल्या वृत्तांत बांधलेल्या काव्याचे दाखले मात्र, भर्तृहरीच्या काव्यातूनच सहजगत्या उपलब्ध होत असतात. त्याच्या काव्याचा एक सरस दाखला खाली दिलेला आहे.

क्वचित्सुभ्रूभङ्गैः क्वचिदपि च लज्जापरिणतैः ।
क्वचिद् भीतित्रस्तैः क्वचिदपि च लीलाविलसितैः ॥
नवोढानामेभिर्वदनकमलैर्नेत्रचलितैः ।
स्फुरन्नीलाब्जानां प्रकरपरिपूर्णा इव दिशः ॥ -शिखरिणी, श्रुंगारशतक-४, राजा भर्तृहरी, इ.स.पू.५५४

म्हणजेः

कधी भ्रूभंगाने क्वचित कधि लाजून हसता ।
कधी भीतीयोगे क्वचित कधि लीलेत रमता ॥
कुमारींच्या सार्‍या नयन विभ्रमी चित्त हरता ।
असे वाटे सार्‍या उमलत दिशा नीलकमला ॥ - मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१४१०२३

राजा भर्तृहरी शूर होता. राजाला आपल्या शौर्याचा सार्थ अभिमान होता. एकदा तो उज्जयिनीच्या उत्तरेकडील तोरणमाळ पर्वतावर शिकारीला गेला होता. दिवस मावळतीला आला, तरीही शिकार गवसली नव्हती. निराश होऊन परतत असतांना, त्याला हरणांचा एक प्रचंड मोठा कळपच दृष्टीस पडला. हरिणींना मारण्यात त्याला स्वारस्य नव्हते. त्याने काळवीटाचा वेध घेतला. राजा त्याला घोड्यावर बांधून नेऊ पाहत होता. असंख्य हरिणींचे डोळे तडफडणार्‍या काळवीटावर खिळून राहिले होते. काळवीट असहाय्यतेने मरणास सामोरे जात होता. तिथेच काही अंतरावर गोरखनाथ साधना करत होते. त्यांनी ही घटना पाहिली. त्यांनी राजाला निष्कारण केलेल्या हत्येबाबत दूषण दिले. ते राजाला म्हणाले की, “राजा, तुला ह्या काळवीटाचे प्राण घेण्याचा मुळीच अधिकार नाही. कारण त्याला जीवदान देण्याचे सामर्थ्य तुझ्यापाशी नाही.” मग, गोरखनाथांनी आपल्या विद्येने त्याचे प्राण वाचविले. काळवीट उठून उभा राहिला आणि जंगलात पळून गेला. ही सर्व अद्भूत घटना पाहून, राजा त्यांच्या विद्येच्या प्रभावाने स्तिमित झाला. राजा त्यांचा शिष्य झाला. त्यांना आपले गुरू मानू लागला.

राजा असाच वरचेवर शिकारीला जात असे. अशावेळी, श्रुंगारसुखाच्या आस्वादाला सदैव आसुसलेली राणी पिंगला, सुरक्षादलप्रमुख असलेल्या महिपाल ह्यासच जवळ करू लागली. राजाची शिकार, त्याची प्रेमासक्ती, इत्यादींमुळे राजाचे राज्यकारभाराकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्या काळात उज्जयिनीस परकीय आक्रमणांचा धोका संभवत होता. विक्रमादित्याने भर्तृहरीला त्याची कल्पनाही दिली. मात्र श्रुंगाररसात आकंठ बुडालेल्या भर्तृहरीस ते रुचले नाही. त्याने विक्रमादित्यासच राज्याबाहेर घालवून दिले.

त्या दरम्यान, उज्जयिनीत एक जयंत नावाचा ब्राम्हण राहत असे. त्याने केलेल्या तपःसाधनेच्या फलस्वरूप, त्याला एक दिव्य फळ प्राप्त झाले होते. त्या फळाचे सेवन केले असता, सेवन करणारा मनुष्य अमर होणार होता. ब्राम्हणाने विचार केला की, मी अमर होऊन कुणाचे भले होणार? त्यापेक्षा राजा अमर झाला तर त्यामुळे प्रजेचे भले होईल. म्हणून राजदरबारात जाऊन त्याने ते फळ राजास अर्पण केले. राजाचे राणी पिंगलेवर अपार प्रेम होते. त्याला असे वाटे की, राणी पिंगला जर अशीच चिरतरूण राहिली, तरच आपल्याला खरा सुखोपभोग संभव आहे. म्हणून त्याने ते फळ राणी पिंगलेला दिले. राजाच्या अनुपस्थितीत राणीने असा विचार केला की, आपल्याला खरे सुख महिपालाकडूनच मिळत असते. तेव्हा तोच जर चिरतरूण राहिला तर आपल्याला खरे सुख दीर्घकाळ लाभू शकेल. म्हणून तिने ते फळ महिपालाला दिले. महिपालाचे लाखा नावाच्या एका राजनर्तिकेवर मन जडले होते. त्याने असा विचार केला की आपल्याला जर चिरसौख्य हवे असेल तर, राजनर्तकी चिरतरूण रहायला हवी. म्हणून त्याने ते फळ तिला दिले. राजनर्तिकेला असे वाटत होते की, एका राजनर्तिकेने चिरतरूण होऊन काय साधणार, त्यापेक्षा राजा चिरतरूण झाल्यास सार्‍याच प्रजेला दीर्घकाळ सुखात ठेवेल. म्हणून एक दिवस राजदरबारात येऊन ते दिव्य फळ तिने राजास अर्पण केले. राजाने ते दिव्य फळ ओळखले. फळाच्या प्रवासाची हकिकत त्याने शोधून काढली आणि तो सुन्न झाला. त्याला वाटत होते की राणी पिंगलेचे त्याच्यावर अपार प्रेम आहे. प्रत्यक्ष राजाची राणी असलेल्या पिंगलेने, महिपालावर प्रेम करावे ह्या वास्तवाने, त्याला वैराग्य प्राप्त झाले. ताबडतोब, म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी, त्याने विक्रमादित्यास पाचारण करून, राज्य त्याचे सुपूर्त केले आणि संसारत्याग करून तो चालता झाला.

राजाचे वैराग्य पराकोटीचे होते. गुरू गोरखनाथांपाशी त्याने संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी त्याकरता आसक्तीचा संपूर्ण त्याग करणे आवश्यक असल्याचे सांगितले आणि त्याच्या वैराग्याची परीक्षा घेण्याकरता, त्याला राणी पिंगलेकडून भिक्षा मागून आणण्यास सांगितले. राजाने तेही केले. “भिक्षा दे, माते पिंगले!” अशी त्याने भिक्षा मागितली. राणीच्या अविरत विलापानेही तो मुळीच द्रवला नाही. योगचर्या पत्करण्याच्या त्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची, राणी पिंगलेची विनंती त्याने फेटाळून लावली. नंतर त्याने उज्जयिनी नगरीबाहेरील क्षिप्रा नदीच्या किनार्‍यावरील गुहेत बारा वर्षे तपश्चर्या केली. नाथपंथाच्या “वैराग्य ऊर्फ बैरागी” उपपंथाची त्याने स्थापना केली. पराकोटीच्या वैराग्याचे स्वतःचे अनुभवही, त्याने श्रुंगाराच्या अनुभवांप्रमाणेच काव्यात रचून ठेवले. ते काव्यही जनमानसात अजरामर झाले. त्या शंभर कवनांना वैराग्यशतक म्हणून ओळखले जाते. त्या सुरस काव्याची मोहिनी, भारतीय तत्त्वज्ञानावरील त्यानंतरच्या सर्वच रचनांवर पडलेली आहे. उदाहरणार्थ पुढील वर्णन पाहा. त्यातील “कालाय तस्मै नमः” हा शब्दसमूह तर मराठी, हिंदी आणि संस्कृत साहित्यातील वाक्प्रचारच बनून राहिला आहे.

सा रम्या नगरी महान्स नृपतिः सामन्तचक्रं च तत् ।
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ॥
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ताः कथाः ।
सर्वं यस्य वशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः ॥ शार्दुलविक्रीडित, वैराग्यशतक-३९

म्हणजेः

ती माया नगरी, महान नृपती, मंत्रीहि सारे तसे ।
ती विद्वानसभा, तशाच ललना तेथील चंद्रानना ॥
तो गर्वोन्नत राजपुत्र, सगळे ते भाट, त्यांच्या कथा ।
हे ज्याचे कृतिने, स्मृतीत पुरले, काळा नमस्कार त्या ॥ - मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१४१०२३

उत्तर आयुष्यात राजा, राजस्थानातील अलवार गावानजीक राहत असे. आजही तिथे राजा भर्तृहरीची समाधी आणि मंदिर आहे. तिथे पाण्याचे कायमच दुर्भिक्ष्य असे. आसपासच्या लोकांना राजास प्राप्त असलेल्या अद्भूत सिद्धी माहीत होत्या. त्यांनी त्यास, पाणी मिळवून देण्याची विनंती केली. आपल्या अलौकिक सिद्धीचा वापर करून राजाने पत्थरातून निर्झर उत्पन्न केले. राजस्थानातील लोककथांतून भर्तृहरीच्या असंख्य कहाण्या शतकानुशतके गायिल्या जात आहेत. उत्तर आयुष्यातील समृद्ध अनुभवांच्या आधारे, राजाने, जगात कसे वागावे ह्याचे सुरेख उद्बोधन शंभर कवितांत करून ठेवले आहे. ह्या शंभर कवनांना नीतीशतक म्हटले जाते. नीतीशतकांतील काव्य, भारतीय संस्कृतीत एखाद्या चमचमत्या तेजस्वी तार्‍याप्रमाणे कायमच तळपत आलेले आहे. उदाहरणार्थ पुढील कवनात तर त्याच्या स्वतःच्या जीविताचे सारच जणू भर्तृहरीने काव्यात गुंफून ठेवले आहे. एवढेच नव्हे तर सामाजिकदृष्ट्या ते निंदनीय आहे असे सांगून, अशा वर्तनांचा धिक्कारही केला आहे.

यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता ।
साप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्तः ॥
अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या ।
धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च ॥ - वसंततिलका नीतिशतक-२, राजा भर्तृहरी, इसवीसनपूर्व ५५४ वर्षे

म्हणजे:

मी जीस चिंतीत असे, न रुचे तिला मी ।
जो आवडे तीस, तयास रुचे परस्त्री ॥
तो आवडे ना परस्त्रीस, मला वरे ती ।
धिक्‌ तीस, त्यास, मदनास, हिला, मलाही ॥ मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१४१०२३

राजाचे अनुभव अत्यंत समृद्ध होते. त्याची भाषा अतिशय श्रीमंत होती. अनुभवांचे सार काव्यबद्ध करून ठेवत असतांना त्याला भाषेची रंगत उमगली. त्याने संस्कृत भाषेच्या व्याकरणावर “वाक्यपदीय” ह्या नावाचा अलौकिक ग्रंथ रचला. त्यातील “स्फोट” सिद्धांताने, त्यानंतरच्या संस्कृत भाषारचनांवरील सर्व ग्रंथांत मानाचे स्थान मिळवले आहे. तोंडातून फुटणार्‍या अविभाज्य उच्चारांचे “वर्ण” असे वर्णन करण्याची संकल्पना ह्याच सिद्धांताचा भाग आहे.

राजा भर्तृहरी उज्जयिनीचा राजा असला तरीही, सर्व भारतभर तो लोककथांतून अजरामर झालेला आहे. दक्षिण भारतात भर्तृहरीकथांचे निरूपण केले जाते. उत्तर भारतात त्याच्या विचारांचा सन्मान केला जातो. त्याच्या उज्जयिनीत, लोकांच्या व्यवहारात त्याच्या शतक काव्यांची अमिट छाप पडलेली दिसून येते. तर त्याचे कर्तृत्वक्षेत्र असलेल्या राजस्थानात आजही, त्याच्या नावे यात्रा भरतात, मंदिरे घडविली जातात, आणि लोकगीतांच्या माध्यमातून त्याची शिकवण लोकमानसावर संस्कार करत असते. राजा भर्तृहरीच्या शतकत्रयीने, इतर संस्कृत साहित्यावर सखोल ठसा उमटवला आहे. शतकानुशतके जनमानसावर राज्य केले आहे. अनेक भारतीय भाषांतील वाक्प्रचार आणि म्हणी ह्यांत शतक-त्रयींतील श्लोक अभिव्यक्त झालेले दिसून येतात. उदाहरणार्थ “प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे” हे वाक्यही, वामन पंडितांनी मराठीत अनुवाद केलेल्या भर्तृहरीच्याच एका कवितेचा एक चरण आहे [२].

लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीड्यन्पिबेच्च ।
मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः॥
कदाचिदपि पर्यटन्शशविषाणमासादयेन्नतु ।
प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥ - नीतिशतक-५, राजा भर्तृहरी, इसवीसनपूर्व ५५४ वर्षे

म्हणजेः

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे ।
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनीही वितळे ॥
सशाचेही लाधे विपिनी फिरता शृंगही जरी ।
परंतु मूर्खाचे हृदय धरवेना पळभरी ॥ - मराठी अनुवादः वामन पंडित, इ.स.१६८० ते १६९५

स्वतः राजा भर्तृहरी मात्र पूर्वसुरींच्या पुण्यप्रभावाने अतिशय प्रभावित झालेला होता. पतंजलि मुनींबाबत तर त्याला विशेष आदर वाटत असे. पुढील कवनातून तो यथार्थपणे अभिव्यक्त होतांना दिसतो.

योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्यच वैद्यकेन ।
योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्रांजलिरानितोऽस्मि ॥ - राजा भर्तृहरी [३]

म्हणजे, योगाचे साहाय्याने चित्तशुद्धी, पाणिनीच्या सूत्रांवर “महाभाष्य” लिहून वाचाशुद्धी आणि चरक संहितेच्या पुनर्संस्करणाद्वारे वैद्यकाचे आधारे शरीरशुद्धी, ह्यांची साधने उपलब्ध करून देणार्‍या पतंजलि मुनींना, मी अंजलीबद्ध करतो. अशाप्रकारे आपल्या “वाक्यपदीय” ह्या ग्रंथात पतंजलि मुनींबाबत गौरवपर उद्गार काढणार्‍या राजा भर्तृहरीने, पुढे त्यांचाच वारसा चालवला. नाथसंप्रदायात योगसाधना करत असता, “वैराग्य ऊर्फ बैरागी पंथ” स्थापन केला. “वाक्यपदीय” ग्रंथाची रचना करून वाचाशुद्धीचा वसा चालवला. तसेच पत्थरांतून निर्झर निर्माण करून शरीरशुद्धीची साधने सामान्यांना उपलब्ध करून दिली. एवंगुणविशिष्ट राजा भर्तृहरीस सादर प्रणाम!

अशा राजा भर्तृहरीचे तपश्चर्यास्थळ पाहण्याची उत्कंठा मला बर्‍याच काळापासून लागून राहिलेली होती. आता आम्ही तिथे प्रत्यक्षात पोहोचलो होतो. राजा भर्तृहरी आणि गोपीचंद ह्यांच्या गुहा शेजारी शेजारीच आहेत. उज्जयिनी शहराच्या उत्तरेला, क्षिप्रा नदीच्या पूर्व किनार्‍यावर हे ठिकाण आहे. अत्यंत स्वच्छ आणि सुव्यवस्थितपणे राखलेले हे उत्तम पर्यटन स्थळ आहे. कुठल्याही पर्यटकाने त्यास अवश्यमेव भेट द्यावी. वाहनतळापासून लांबलचक छन्नमार्गातून पायर्‍या पायर्‍यांची वाट आपल्याला ह्या गुहांपर्यंत घेऊन जाते. त्यांच्या नजीकच गोरखनाथांचे सुरेख, भव्य मंदिरही आहे.


भर्तृहरी गुहेनजीकच्या गोरखनाथ मंदिरातील गोरखनाथांची आणि मच्छिंद्रनाथांची मूर्ती

गुरूशिखरावर वाहणार्‍या वार्‍याचे वर्णन गोरखनाथांनी “पवनही भोग, पवनही योग, पवनही हरे छत्तीसो रोग” असे केले होते. ते म्हणतात तसा वारा वाहत असणारी सिद्धकाली मंदिराची टेकडी आम्ही त्या दिवशी संध्याकाळीच पाहिली. हे मंदिर पश्चिम इंदौरमध्ये विमानतळ रस्त्यावर आहे. आतापुरता मात्र आम्ही मंगळनाथ मंदिराच्या दिशेने मोर्चा वळवला. उज्जयिनी शहराच्या उत्तरेकडील टोकास हे मंदिर आहे. ह्या ठिकाणास मंगळ ग्रहाचे जन्मस्थान मानले जाते. कर्कवृत्ताची रेषा ह्या ठिकाणातून पार होते असे म्हणतात. शिरावर पोवळ्याच्या रंगाचा खडा जडवलेल्या शिवलिंगाच्या स्वरूपातील मंगळाचे इथे पूजन केले जाते. नंतर आम्ही परतीच्या वाटेवर सांदिपनी ऋषींच्या आश्रमास भेट दिली. बलराम, कृष्ण आणि सुदामा ह्यांचे हे गुरूकूल. त्याकाळी उज्जयिनी उपाख्य अवन्ति नगरी शिक्षणाकरता विख्यात होती.

मंगळनाथ मंदिर आणि सांदिपनी आश्रम

मात्र आता दुपारचा दीड वाजत आलेला होता. जेवायची वेळ होत होती. आम्ही उज्जयिनी स्थानकासमोरच्या न्यू सुदामा रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो. रुचकर आलुपराठा-दही, जिरा-राईस आणि रस-मलाईचा आस्वाद घेऊन आम्ही आमच्या सकाळच्या स्थलदर्शनाचा समारोप केला.

संदर्भः

१. इंदौरचे हवामानचित्र
२. भर्तृहरीकृत सार्थ श्रुंगारशतक, वैराग्यशतक आणि नीतीशतक, वामन पंडितांनी केलेल्या मराठी पद्य अनुवादासहित; वरदा प्रकाशन, सप्टेंबर २००५, किंमत प्रत्येकी रु.२५/- फक्त.
३. भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन, योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर, आदित्य प्रतिष्ठान प्रकाशन, प्रथम आवृत्तीः १८-०२-२००४, प्रस्तुत तृतीय आवृत्ती: १४-०१-२००७, देणगी मूल्य केवळ रु.५००/-.

http://nvgole.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

प्रतिक्रिया

राही's picture

3 Jan 2015 - 4:23 pm | राही

फार सुंदर आणि माहितीपूर्ण लेख. श्लोकांचे आपण केलेले मराठी अनुवाद अर्थ आणि वृत्त यांमध्ये अगदी तंतोतंत उतरले आहेत.
नवनाथांमध्ये काही ठिकाणी 'भर्तरी नाथ' हाही गणला जातो.

छान लिहिलं आहे.फोटोही आवडले. सोबत इतिहास जोडल्याने वाचनीय झाले आहे. रेल्वे विश्रामालय शक्यतो टाळावेच. मी चार वर्षांपूर्वी गेलो होतो त्यावेळी माहेश्वर, मांडू इथे एकेक दिवस राहिलो होतो.

माहितीपूर्ण सुंदर लेखन.खूप आवडला लेख.आपल्या नेहमीच्या वापरातले इतके वाक्प्रचार म्हणींचा उगम भर्तृहरीकृत आहे तर.वाचलंच पाहिजे.अनेक धन्यवाद आणि पुभाप्र.

मुक्त विहारि's picture

3 Jan 2015 - 5:48 pm | मुक्त विहारि

पुभाप्र

मदनबाण's picture

3 Jan 2015 - 6:10 pm | मदनबाण

अतिशय उत्तम माहिती... :)
या भागात माझे लहानपणी बर्‍याचदा जाणे झाले आहे,आता बर्‍याच आठवणी विसरायला सुद्धा झाल्या आहेत,अर्थात या सर्व परिसरात झालेला प्रचंड बदल हे देखील त्या पैकी एक आहे. भर्तृहरी गुंफेत सुद्धा अनेकदा जाणे झाले आहे...कमालिचा गारवा जाणवला आहे.अवंतिका नगरीचा राजा विक्रामादित्य या राज्याचा उल्लेख मला वाटतं भविष्य पुराणात प्रतिसर्ग पर्वात केलेला आढळतो तर याच भविष्य पुराणातील उत्तर पर्वात दिलेल्या विविध व्रतात "सत्यनारायण" व्रताचे देखील वर्णन आहे.
क्षिप्रा नदीजवळच सिद्धवट आहे जिथे राजा विक्रामादित्याने बसुन तपश्चर्या करुन वेताळाला वश मधे करण्याची सिद्धी प्राप्त केली.स्कंद पुराणातल्या उल्लेखा नुसार या वॄक्षाचे रोपण स्वतः माता पार्वतीने केले होते आणि याच वटाखाली कार्तिक स्वामींनी भोजन देखील केले होते. तारका सुराचा कार्तिक स्वामींनी वध केल्यावर ती सिद्धी याच ठिकाणी क्षिप्रा नदीत लुप्त झाली असे म्हंटले जाते आणि त्यामुळेच या तिर्थाला "शक्ती भेद" तिर्थ देखील म्हंटले जाते. मुघल काळात या वॄक्षाला कापुन टाकुन त्याच्या मुळाशी लोखंडाचे आवरण घालण्यात आले होते...त्या आवरणांना तोडुन पुन्हा वॄक्ष फोफावला जो आज पहावयास मिळतो.
सांदिपनी आश्रमाचे अजुन एक वैशिष्ठ आहे ते म्हणजे इथल्या शिवलिंगाची स्थापना {उत्पत्ती} सांदिपनी मुनींच्या हस्ते बिल्व पत्र {बेल} वाहुन झाल्यामुळे झाली असुन हे शिवलिंग जवळपास ६ हजार वर्ष जुने असल्याचे समजले जाते.तसेच मंगळाच्या मंदिरात मंगळाचे यंत्र सुद्धा आहे, असे मंगळ यंत्र मी पुण्याच्या एका लग्नकार्यालयात देखील बसवलेले पाहिलेले आहे,बहुधा मंगळ यंत्राचा आणि व्यापाराचा काही संबंध असावा...

महाकालेश्वराशी माझ्या लहानपणातील एक गूढ { म्हणजे मला तरी तो गूढ वाटतो} अनुभव आहे... जो अजुन इतक्या वर्षांनी देखील माझ्या लक्षात आहे. मी, माझे आई-वडिल दर्शन घेतल्यावर मंदिराच्या परिसरात होतो... त्यावेळी तिथे अनेक साधु होते...वेगवेगळ्या अवतारात असलेले ते साधु विलक्षण होते काही तर सर्वांग भ्स्म लिंपुन होते,अचानक एका साधुला पाहुन मला मनात काही तरी वाटले ! मी माझ्या वडिलांना सांगितले की बाबा मला त्या साधुच्या जवळ जावेसे वाटत आहे,वडिलांनी माझ्या आईला त्या साधु जवळ जातो असे सांगितले तिलाही त्या साधु जवळ येण्यास विचारणा केली,परंतु तिने नकार दिला. त्या साधुला { तो बहुधा एका वॄक्षा खाली बसला होता...आता इतके स्पष्ट आठवत नाही} मी नमस्कार केला आणि वडिलांनीही त्याला नमस्कार केला, त्याने काहीकी न बोलता फक्त बोटांनीच थांबण्याचा इशारा केला,त्याच्या झोळीतुन भस्म काढले आणि आम्हा दोघांनाही ते लावले, परत बोटांनीच थांबण्याचा इशारा केला आणि त्याच्या जवळ असणारा कमंडलु हातात घेतला, हा कंमंडलु वेगळाच होता कारण आकाराने तो फारच लहान होता {बहुधा इडलिंबु च्या आकाराचा } तो हातात धरुन त्याने मंत्र म्हणण्यास सुरुवात केली आणि नंतर ते तिर्थ मला आणि वडिलांना दिले... मी व वडिल आई जवळ परत गेलो { ती तिथुन काही अंतरावरच उभी होती} व तो साधु तिर्थ देतो आहे ते तू देखील घ्यावेस अशी विनंती केली, ती तयार झाल्यावर आम्ही परत तो साधु बसला होता त्या ठिकाणी आलो, परंतु तो साधु तिकडे नव्हता ! जरी तो कुठे चालत गेला असता तरी तो नजरेस पडला असता असा तो परिसर होता,मग तो साधु गेला कुठे ? आजु-बाजुला देखील पाहिले पण तो साधु काही परत दिसला नाही ! तो साधु, त्याचे ते वेगळेच कंमंडलु आणि त्याचे असे अचानक लुप्त होणे यामुळेच ही घटना आज देखील माझ्या स्मरणात आहे...
असो... हा भाग सुरेख झाला आहे, पुढच्या भागाची वाट पाहतो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- BHO SHAMBHO SHIVA SHAMBHO SVAYAMBHO

छान माहितीपुर्ण लेख! पण काही बोजड शब्द (लोहमार्ग स्थानक,लोहमार्ग प्रवास, वातानुकूलित स्वयंचलित वाहन) वापरल्याने वाचताना थोडे खटकते.

उज्जैनचे स्थलदर्शन कसे केलेत? कारने की स्थानिक साईट सिईंगचे काही पॅकेज?

प्रचेतस's picture

3 Jan 2015 - 6:43 pm | प्रचेतस

लेखन आवडले.

हा विक्रमादित्य शककर्ता कसा असेल? विक्रम संवत जे विक्रमाच्या नावाने ओळखले जाते त्याचा कर्ता अजूनही गूढ आहे. इसवी सनाच्या साधारण ५६ वर्षे ते पुढे आहे. त्याकाळी उज्जैनवर बहुधा सातवाहनांची हुकूमत होती. सातवाहनांच्या तत्कालीन नाण्यांवर उज्जैन चिन्ह कोरलेले आढळते.

दुसरा विक्रम जो आहे तो गुप्त सम्राट समुद्रगुप्ताचा मुलगा चंद्रगुप्त (दुसरा) अर्थात विक्रमादित्य इस. ३५०- ४०० च्या आसपास. विक्रम वेताळ मधला विक्रम तो बहुधा हाच. समुद्रगुप्ताने आपले राज्य विदिशेपर्यंत वाढवले. विक्रमादित्याने वाकाटकांची मदत घेत क्षत्रपांचा पूर्ण नायनाट करुन त्यआंची राजधानी भडोच सुद्धा गुप्त साम्राज्यात आणली. कालिदास, वराहमिहिर ह्याच गुप्तांच्या वैभवशाली राजवटीत बहरले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Jan 2015 - 7:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख ! भटकंतीबरोबर स्थळांच्या इतिहासाची सुरस माहिती देण्याची शैली विशेष आवडली.

अनेक मराठी म्हणींचा उगम भर्तृहरीच्या लेखानांत आहे हे समजून आश्चर्य वाटले. आणखी नवी माहिती म्हणजे, भर्तृहरी अग्रगण्य कवींपैकी एक होता हे माहित होते पण तो राजा होता आणि त्याने साहित्यासाठी राज्यत्याग केला हे नविन कळले ! धन्यवाद !

पुभाप्र.

त्याने साहित्यासाठी राज्यत्याग केला >>>>
हे खरे नाही. अशा अर्थाचे मी काहीच लिहीलेले नाही.

पिंगला राणीने केलेल्या विश्वासघातामुळे आणि त्यामागच्या कारणामुळे उद्विग्न होऊन त्यास पराकोटीचे वैराग्य प्राप्त झाले आणि म्हणून त्याने राज्यत्याग केला अशी ही गोष्ट आहे.

वयाच्या सोळाव्या वर्षीच त्याचा राज्याभिषेक झाला होता. तो संस्कृत पंडित, उत्तम प्रशासक आणि राजा होता. राज्यत्यागापूर्वी, त्यानंतर आणि मग आयुष्यभरच त्याने आपले जे अनुभव काव्यबद्ध केले त्यालाच हल्ली आपण साहित्य म्हणतो.

एकाच नावाचे बरेच राजे झालेले आहेत. परंतू ते महापराक्रमी असले की घोळ वाढतो.भतृहारी दोन होते एकजण गुजरात राजस्थान अफगाणिस्थान -गांधार इकडे गेला होता. पौराणिक काळापासून जी शहरे आहेत तिथे देवळे आणि कथा वाढतच राहतात.

उजैनीत स्थानिक टुअर चार तासांची दोनवेळा निघते. बारा ठिकाणे दाखवून शेवटी महाकालेश्वरला सोडून देतात कारण तिथे दर्शनास कितीही वेळ लागू शकतो. २०१०साली चाळीस रू घेतले होते. ३५ किमीच्या फेऱ्यात ठिकाणे आहेत. आम्ही आदले दिवशी संध्याकाळी स्वतंत्रपणे महा॰ +पेशव्यांचे गोपालमंदिर+सराफा बाजार करून घेतले होते.
या पर्यटनात रविवार ,सोमवार ,शिवरात्र नसतील अशा तारखा निवडाव्यात कारण बरीच गर्दी होते.

पैसा's picture

3 Jan 2015 - 7:36 pm | पैसा

प्रवासवर्णनाबरोबरच फोटो आणि इतर माहितीचा खजिना आहे! वर्षाच्या कोणत्या काळात तिथे जावे इथपासून सुरुवात केल्यामुळे अगदी आदर्शवत प्रवासवर्णन झाले आहे!

माझ्या लहानपणी मी सिंहासन बत्तिशी वाचल्याचे आठवते, यावर बहुतेक त्याकाळी एक मालिका सुद्धा आली होती, जी पाहिल्याचे स्मरते ! त्याच मालिकाचा एक भाग इथे देतो :-

सिंहासन बत्तिशी ही राजा विक्रमादित्याशी निगडीत आहे हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही. ज्यांना या कथा वाचण्यात रस आहे त्यांच्यासाठी दुवा देउन ठेवतो :-
सिंहासन बत्तिशी (प्रस्तावना)
अजुन एक दुवा :-
सम्पूर्ण सिंहासन बत्तिशी कथा संग्रह.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- BHO SHAMBHO SHIVA SHAMBHO SVAYAMBHO

प्रचेतस's picture

3 Jan 2015 - 11:17 pm | प्रचेतस

दुव्यांबद्दल धन्स रे बाणा.
सिंहासन बत्तीशी कधीचे शोधतोय पण मिळत नाहीये. स. आ. जोगळेकरांनी संकलित केलेले आहे ते मूळ पुस्तक आवृत्ती कित्येक वर्षांपासून अनुपलब्ध आहे.

हा राजा भोज म्हणजे दहाव्या शतकातील उज्जैनचा भोजराजा परमार. सिंहासन बत्तिशी कथेत मूळ सिंहासन बहुधा गौतमीपुत्र सातकर्णी अर्थात शालिवाहनाचे दाखवले आहे. त्याच सिंहासनावर नंतर विक्रमादित्य बसतो आणि ह्या विक्रमादित्याच्या संबंधित ३२ कथा पुस्तकात आहेत.

आत्तच या मालिकेचा २ रा भाग पाहिला त्यावरुन हे कळले की गाढवाचे लग्न हे नाटक / चित्रपट हे याच सिंहासन बत्तीशी मधुन आले आहे ! राजा विक्रमादित्य हा इंद्राच्या पुत्राचा {गंधर्वसेन} पुत्र आहे ! गंधर्व सेनाला ३ पुत्र झाले :- विक्रमादित्य,भर्तृहरी,प्रभव { सुभटवीर्य } बाकी याच विक्र्मादित्याचा {नक्की हाच का ?} संबंध कुतुब मिनार {धॄवस्तंभ} त्याच्याच बाजुला असलेल्या लोह स्तंभशी { गरुड स्तंभ} आहे असे म्हणतात. कुतुब मिनार आकाशातुन पाहिला असता { टॉप व्हूव} तो २४ पाकळ्यांच्या कमळा प्रमाणे दिसतो त्यातली प्रत्येक पाकळी "होरा" दर्शवते.

काही प्रश्न :-
१} कुतुब मिनार का बांधला गेला ?
उत्तर :- विजायाचे निशाण, विजय स्तंभ
२}कोणी कोणावर विजय मिळवला ?
उत्तर :- मोहम्मद घोरी ने पॄथ्वीराज चौहान वर विजय मिळवला.
३}कुठे आणि कुठल्या युद्धात ?
उत्तर :- तराइन च्या २ युद्धात, {संदर्भ :- तराइन का युद्ध}
४} विजय स्तंभ दिल्लीत का आहे ?
उत्तर :- कारण घोरी ने दिल्ली ही त्याची राजधानी केली. { या बद्धल वाद आहे ?}
पण घोरी ची राजधानी "गझनी" होती {Muhammad of Ghor} आणि दिल्लीला त्यानी कधीही राजधानी केली नसताना दिल्लीत विजय स्तंभ कसा उभारला गेला ?
यावर अधिक इकडे :- http://vediccafe.blogspot.in/2014/02/kutub-minar-its-name-sanskrit-conne...
असो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- BHO SHAMBHO SHIVA SHAMBHO SVAYAMBHO

ह्याच कुतुबमिनारच्या बाजूला असलेल्या लोहस्तंभावर अरविंद कोल्हटकरांनी 'ऐसी अक्षरे' वर एक माहितीपूर्ण लेख लिहिला आहे.

मदनबाण's picture

4 Jan 2015 - 11:00 am | मदनबाण

धन्यवाद वल्ली... :)
वाचकांसाठी संदर्भ म्हणुन त्या लेखाचा दुवा इथे देतो :- विष्णुध्वज नावाचा लोहस्तंभ

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नाम तुझे बरवे गा शंकरा :- {श्री.अजित कडकडे}

या चर्चेनिमित्ताने विचारतो सप्तपुऱ्या किती जुन्या आहेत? अशोकाच्या काळातले स्तंभ शिला लेख (जुनागढ वगैरेचे)सोडले तर अडीच हजार वर्षाँपूर्वीँचे अगोदरचे पुरावे भारतात कुठे आहेत? भीमबेटकाची चित्रे आदिमानव काळातील आहेत.
(@वल्ली एक याविषयी चर्चा धागा टाका आणि तिकडे हे सरकवले तरी चालेल.)

एस's picture

4 Jan 2015 - 5:04 am | एस

लेख खूपच छान आहे. भर्तृहरीबद्दलची माहितीही फारच सुरेख आहे. वर वल्लींनी म्हटल्याप्रमाणे शककर्ता विक्रमादित्य हा नव्हे.

पुभाप्र.

नरेंद्र गोळे's picture

4 Jan 2015 - 8:39 am | नरेंद्र गोळे

राही, कंजूस, अजया, मुक्त विहारि, मदनबाण, परींदा, वल्ली, इस्पीकचा एक्का, पैसा आणि स्वॅप्स सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद.

वा, सुरेख! लिखाण अतिशय आवडले.

प्रमोद देर्देकर's picture

7 Jan 2015 - 3:37 pm | प्रमोद देर्देकर

खुप माहिती पुर्ण लेख. वाचनखुणा साठवलेली आहे.