Our Undoing ,शेवटचा दिवस.

Targat Porga's picture
Targat Porga in जनातलं, मनातलं
26 Nov 2014 - 6:20 pm

'शॉर्ट फिल्मच्या'शूटिंगचा शेवटचा दिवस..., नेब्याने (दिग्दर्शक) सर्वांना संध्याकाळी ७:३० पर्यंत शाम्याच्या घरी(शुटींग च ठीकाण) हजर राहण्याची आधीच ताकीद दिली होती. त्या नेमाने मी ७:१५ लाच शाम्याच्या घरी धडकलो. खरेतर शाम्या आणि कंपनी नेब्याच्या घरी सुट्याची वाट पाहत बसलेले होते. तिकडून ते सर्व लोक मिळून शाम्याच्या घरी येणार होते. मी(स्क्रीनप्ले रायटर) एकटाच माझ्या गाडीवर बुड टेकवून शांतपणे शाम्याच्या घराबाहेर कानात हेडफोन टोचून सगळ्यांची वाट पाहत उभा होतो. खरेतर हा शांतपणा थोडाच वेळ टिकाव धरून राहिला. त्याची जागा एव्हाना प्रचंड राग आणि व्देषाने घेतली. कारण,अर्थातच सुट्या! (सीनेमॅटोग्राफर ).,नेब तिकडे अगणित कॉल्स आणि मेसेजेस करून रडकुंडीला आलेला होता, आणि इकडे माझीही तीच अवस्था. पण सुट्याचा काही पत्ता नाही की एक साधा मेसेजसुद्धा नाही. अगदी नेहमीप्रमाणे शेवटच्या दिवशीही सुट्याने असा उलटवार करावा ही आमची अपेक्षा नव्हती. १० वाजेपर्यंत सर्व काही गुंडाळता येईल असे निजोजन होते. पण इथे तर ८:३० होऊन गेले आणि कथित वक्तशीर श्रीमान सुटे भूमिगत सुट्याने दगा दिला हे अनपेक्षित जरी असले तरी आताशा स्पष्ट झाले होते. 'गाशा गुंडाळा' अशा आशयाचा मेसेज मी नेबाला पाठवला देखील. तिकडे त्या सर्वांची भावनिक अवस्था देखील माझ्यापेक्षा काही फारशी वेगळी नव्हती. किंबहुना ते सारे लोक थोडे जास्तच तापले होते. कारण वेशभूषेसह सर्व तयारी झालेली होती. पुन्हा पुन्हा शूटिंग साठी ह्या सर्व गोष्टी जुळवून आणने सोपे काम नसते. ह्या सर्व विचारात असतानाच माझा मोबाईल व्हाईब्रेट झाला. त्यासरशी मी देखील व्हाईब्रेट झालो. परंतु कारणे वेगवेगळी होती. एक नेबाच्या मेसेजमुळे आणि दुसरे साक्षात दत्त गुरु दिगंबर (सुट्या) अचानक समोर उभे ठाकल्याने. डोळे दिपून निघाले. मी नमस्कार केला. उपरोधाने अर्थात, अगदी कोपरापासून हात जोडून. वाळूत रुतलेली सुट्याची अक्टीव्हा दहा हातांच्या अंतरावर हेड लाईटच्या प्रकाशाने अजून डोळे दिपवत उभी होती. आता बास झाले सुट्याचे, चार गोष्टी सुनावून सुट्याची चांगली कान उघडणी करण्याच्या पावित्र्यात मी असतानाच ट्राईपॉड आणि कॅमेरा सरळसरळ सुट्याने खाली वाळूत फेकून दिले. वातावरण गंभीर आहे ह्याची जाण येण्यास मला वेळ लागला नाही .

आता बाजू पालटलेली होती. कधीही ह्यापूर्वी इतका गंभीर सुटे बघितल्याचे माझ्या तरी आठवणीत नव्हते. नेहमी मजेशीर(?) कोड्यांत वागणारा आणि बोलणारा सुटे ह्या क्षणी प्रचंड गंभीर मुद्रेत , थोडासा रागात आणि थोडासा तणावात दिसावा हे थोडे अनाकलनीय होते. त्या क्षणी मला स्वप्न्या (कलाकार) आणि सुटे व्दयीच्या 'कसे फसविले' ह्या काल रात्रीच्या दमदार विनोदी साखळीची का सारखी सारखी आठवण व्हावी हे उमजत नव्हते. नाही, वातावरण खरेच गंभीर होते. इतका वेळ सुटे त्याची महिनाभरापूर्वी पंधरा हजार खर्चून घेतलेली प्राईम लेन्स शोधात होता हे कळाले. दोन दिवसांपूर्वीच एका चहाच्या टपरीवर महाशय आपला तितकाच नवा ट्राईपॉड विसरून आलेले. नशीब बलवत्तर म्हणून तो परत मिळाला. ती चूक चुकून पचली म्हणून हे नवे प्रकरण जणू.
सुटे पोहोचताच मी नेब आणि कंपनीला तसे कळवले होते. तेही पाचच मिनिटांत शाम्याच्या घरी पोहोचले. सुट्या बाहेर पायरीवरती,आतल्या आत धुमसत बसला होता. सुट्याच्या अनपेक्षित मूड चे कारण सर्वांना कळल्यावर मात्र सगळ्यांना धक्का बसला. सगळा गाशा शेवटच्या टप्प्यावरती गुंडाळला जाणार हे स्पष्ट झाले. परंतु सर्वांना वाईट मात्र ह्या चार आठ दिवसांच्या पोरखेळात सुट्याने त्याची आवडली लेन्स गमाल्याचे वाटत होते.
इकडे सुटे आतल्या आत धुमसत जरूर होता, परंतु कुठलेही काम कोणत्याही परिस्थितीत अर्धवट न सोडण्याच्या सुट्याच्या स्वभावाची प्रचीती आली. होय, सुट्याची दुसरी झूम लेन्स इथे कामी आली. आजचे शूटिंग हे शेवटचे आणि सर्वांत महत्वाचे आहे, हे तो जाणून होता. आता शूटिंग होणार हे पक्के होते. सर्वांच्या जिवात जीव आला. 'काहीही झाले तरी आज संपूर्ण शूट संपवायचे' असे सुट्ट्याने नेबाला पडक्या पण ठाम आवाजात सांगितले. दुसरी लेन्स त्याने सोबत आणली होती खरी पण म्हणून प्राईम लेन्स हरवली ह्या गोष्टीचे गांभीर्य काही कमी होणार नव्हते. माझाही मूड निघून जात होता. सर्वांत शेवटच्या आणि महत्वाच्या सीन्स साठी सुट्याचा क्रिएटीव मूड चांगला असणे अतिशय महत्त्वाचे होते. दुर्दैवाने मात्र नेब्याने त्याशिवायच काम पूर्ण करावे करण्याचे ठरवले होते. अर्थात सुटे आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याने नेबाकडेही दुसरा पर्याय उरला नव्हता. शेवटी ९:३० वाजता शूटिंग चालू झाले.

तीन मोठमोठे सीन्स होईपर्यंत ११ चे टोल पडूनही गेले होते. दरम्यान 'स्वप्न्याच्या बापा'चा फोन सारखा सारखा येत होता. त्याच्या बाबांचा तापट स्वभाव तसा शाळेपासूनच सर्वांच्या परिचयाचा होता. त्यामुळे 'शाम्याच्या वाढदिवसाला जातोय' असे सांगून बाहेर पडलेल्या स्वप्न्याचे सर्व सीन्स फटाफट उरकून त्याला १०:१५ लाच नेब्याने वाटेला लावले होते. त्या नंतर बाकीच्या सीन्स साठी सुट्याने मलाच स्वप्न्याचा डमी म्हणून उभे केले. मी कशीबशी परिस्थिती हाताळली. परंतु आता मात्र वातावरण थोडे हाताबाहेर जाण्याचे चिन्हे दिसू लागली. सुन्ना आणि सुटे ह्या दोघांचे फोन वाजण्याची आता ही वेळ होती. सुन्नाने थातुरमातुर कारण सांगितले, आणि सुट्ट्याने तर दुसऱ्या खेपेस फोन बंदच केला. मी मात्र घरी 'संपूर्ण रात्र शाम्याकडे काढणार' असे सांगून आलो होतो. आणि असे सांगण्याची सुबुद्धी मला कुठून झाली देव जाणे. १२ चा टोल पडताच सर्व कामही झाले. आता पळापळीचा वेग वाढला होता. सर्वांना घरी जाण्याची घाई होती. मधल्या संपूर्ण काळात सुट्याचा चेहरा मात्र तसाच पडलेला होता. माझीही जाण्याची वेळ झाली होती. मी निघणार तेवढ्यात सुट्ट्याने मला थांबवून लेन्स शोधण्यास येण्याची विनंती केली. ह्या वेळी सुट्याला नाही म्हणणे मलाच काय कुणालाही जमले नसते. लेन्स हरवलेली असतानाही त्याने आज संपूर्ण काम संपवले होते. त्याच्यासाठी एवढे तरी मला करता यावे. मी चटकन हो म्हणालो. सुट्ट्याने शाम्याकडून टोर्च मागवली. शाम्या लगेच मोठी ब्याटरी घेउन आला.

१२:३० झाले होते. सुटे भरधाव गोगाबाबाकडे निघाला. होय, परवा संध्याकाळी आम्ही गोगाबाबावरती शूटिंग केलेले. तेव्हापासूनच लेन्स गायब होती. एकूण ७ ते ८ किलोमीटर अंतर कापून आम्हाला टेकडीच्या पायथ्याशी पोहोचायचे होते. वास्तविक पाहता हा सुट्याचा भावनिक मूर्खपणा होता. एरवी त्याला भावनिक पाहणे म्हणजे अगदीच अशक्य. सुट्या त्याच्या लेन्स वरती किती प्रेम करतो हे जगजाहीर होते. परंतु ह्या भयाण वेळी गोगाबाबाच्या टेकडीवरती, जवळजवळ शहराबाहेर, निर्जन आणि अंधाऱ्या जागी क्रिकेटच्या चेंडू एवढी गोष्ट सापडण्याची आशा बाळगणे म्हणजे माझ्या मते शुद्ध पागलपणाच. दाट झाडी, काळोख आणि निबिड शांतता आणि मधूनच पंडित कुत्रेंचा दर्दभरा आलाप. गोगाबाबा जितका दिवसा रमणीय असतो तितकाच तो रात्री भयानक असतो. दिवसा वर्दळ तर रात्री एकदम नर्क. तसेही मला त्याचे मन मोडायला जमलेही नसते.

त्यातही रस्ता अतिशय खडकाळ. निबर अगदी. कुणीही अगदी साहजिकपणे आम्हाला वेडे ठरवले असते. त्यात नवल नाही. परंतु, नवती रक्त पडले आमचे. निर्भीडपणे त्या अंधारास कापत निघायचे ठरवले. पण माझ्या गाडीमध्ये पुरेसे इंधन नाही. आता आली का पंचाईत! पाकीट घाई-घाईत शाम्याच्या घरी विसरले. सुट्याच्या पाकिटात जेमतेम ५ नोटा निघाल्या दहा रुपयांच्या. पेट्रोल भरले रस्त्यात. वेळ भागून निघाली. आता सुट्याला समांतर मीही निघालो पाठोपाठ. परंतु त्याच्या वेगाशी जमवून घेताघेता मला कित्येक दुभाजके आणि गतिरोधके जणू यमदूतांना चुकवावे, चकवावे तसे भासत होते. दोन तीनदा बचावलो. सोबत वारा, किडे आणि डोळ्यांत जाणारी धूळ ह्यांची परिक्षा ती वेगळीच.टेकडी परिसराचा 'प्रवेश-मार्ग' सुदैवाने खुला होता.तशातच तिथल्या रखवालादारंनी आम्हाला अडवलेही नाही. परंतु, एक विचित्र लूक तेवढा दिला. तसल्या रस्त्यावरून मला सुट्या ६० च्या वेगात मागोमाग खेचत होता. शेवटी तो पायथ्याशी पोहोचला. त्याच्या मागोमाग मी थांबलो. आता मात्र माझी जाम हवा निघून गेली. कारण आतापर्यंत गाडीचा हेड लाईट तरी साथीला होता. गाड्या बंद होताच समोरचा सुटेही अंधारात गुडूप झाला. डिक्की उघण्याचा आवाज तेवढा झाला आणि सुट्याने शाम्याने दिलेली ब्याटरी पेटवली. तेवड्या मिणमिणत्या प्रकाशात तो परवाच्या ओढ्याकडे निघाला. जगण्यासाठी प्रकाशाची देखील ऑक्सिजन इतकीच आवश्यकता असते असे वाटून गेले . अर्थातच, त्यामुळे मला ब्याटरीच्या प्रकाशाच्या मागोमाग जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. इतक्या भयानक परिसरात जर इथे आम्हाला काहीबाही झाले असते तर मदतीला अंधार ही आला नसता. सोबतचा चंद्र तर कुठे गडपला होता कोण जाणे त्या दिवशी. रात्री १ च्या सुमारास, निर्जन गोगाबाबा कसा असतो हे जगात फक्त मीच सांगू शकतो, कारण सुट्या देखील त्या वेळी ही भीती समजून घेण्याच्याही परिस्थितीत नव्हता. त्या प्राणांतिक काळोखात पंडित कुत्र्यांचा दर्दभरा आलाप डासाच्या कुनकुनिपेक्षाही असह्य होता. रातकीड्यांच्या जुगलबंदीला दाद देण्याची ती वेळ नव्हती. आणि अशातच पावसाचे टिपूर टिपूर थेंब. पाउस वाढला नाही म्हणून ठीक, नाहीतर व्यतिरेक नाही पण दुष्काळात हा विचित्र तेरावा महिना झाला असता. बिथरलेला सुटे आणि मंदिराची घंटा ह्यांची वारंवारिता तेवढी जुळली होती. परंतु तो परवाचा ओढा, जिथे शूटिंग झालेली, तो काही केल्या सापडेना. ब्याटरीच्या त्या छोट्याशा परिघात तेही अशक्य होते. पण सुट्याला सांगणार कोण? त्यातच तिथे दिवसा खूप वर्दळ असते. त्यामुळे कुणीतरी ती उचलली असण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. ह्या सगळ्या शोधमोहीमेच्या पार्श्वभूमीवर नेब्याने मला फोन केला.... 'नसता व्यत्यय साला'..मी मनातच पुटपुटलो.

'अरे साल्या पऱ्या (मी), सुट्याची लेन्स माझ्या पिशवीत राहिली होती राव. मला आत्ता घरी आल्यावर सापडली....' झाले!!! काखेतलाच कळसा होता तर हा मग! मीच काय, माझ्या जागी कुणीही असता तर नेब्याला चार दहा शिव्या जाग्यावरच हासडल्या असत्या. नवल नाही. तश्या मी दिल्याही. सुट्याला मात्र हे कळताच तो प्रचंड खूष झाला. क्षणात सरसर शिरव्याचे पसरून ऊन झाले जणू. त्याचा दिवसभराचा रुसवा कुठल्याकुठे गेला. तो फक्त नाचायचा आणि फक्त नाचायचा बाकी होता. अर्थात तो नाचला जरी असता तरी इतर कुणी पाहून हसण्याची गोष्टच सोडा हो, मलाही फक्त ब्याटरीच दिसली असती त्या काळोखात. नेब्याचा राग तो आलेलाच होता मला, पण सुखाच्या आनंदात तो पार विरून गेला.

माझी खरी सत्व परीक्षा होती ती आता घरी परत जाताना. मी आता एकटाच होतो. पुन्हा पोटात गोळा. कारण सुट्याचे घर तेथून मागेच होते. अगदी टेकडीच्या पायाथ्यापासुनच त्याचा रस्ता वेगळा आणि माझा वेगळा. एव्हाना १:२० झाले होते. आणि मला अजून १०-१२ किलोमीटर अंतर पार करायचे होते. मला धडकी भरली. तश्यात, पेट्रोल थोडके. शेवटी सुट्याने उलटे येऊन टेकडीच्या गेटपर्यंत मला सोडायचे ठरवले. कारण जाताना तिथल्या पहारेकऱ्यांनी दोघांना पहिले होते, मात्र येतांना 'मी एकटाच कसा आलो?' ह्या शंकेने त्यांनी मला अडवले असते अन मग मात्र खरोखरच लोचा झाला असता. गेट पर्यंत आल्यावर सुट्या मागे फिरला. इथून पुढे आता मला पंडित कुत्रेंचा आलाप आणि हल्ले चुकवायचे होते. हल्ल्यांचे पाहून घेऊ म्हणत मी कानात हेड फोन्स टाकून आलाप तेवढे चुकविले.

सुदैवाने रस्त्यात मला कसलाही त्रास झाला नाही. पण मोठा प्रश्न हा घरी आल्यानंतरचा होता. घरासमोर पोहोचल्यानंतर माझ्या लक्षात आले कि नुकतेच फोनचे ब्यालेंस देखील संपले आहे. मेसेज प्याक संपला असतानादेखील सुट्याला आणि नेब्याला खूप सारे मेसेजेस पाठविल्याचा पश्चाताप झाला. घरचे सर्व जण मी शाम्याकडेच झोपणार असे सांगितल्यामुळे वाट न पाहताच झोपी गेले होते. इतक्या रात्री बाहेरून आवाज देणे शक्य नव्हते. शेवटी धीर करून खिडकीवरती एक छोटासा दगड मारला. पाच मिनिटानंतर आईने मला फोन करून खात्री केली. हुश्श!!! शेवटी घरी पोहोचलोच तर.

OUR UNDOING चा शेवटचा दिवस खऱ्या अर्थाने रोमांचक ठरला.

चित्रपटछायाचित्रणअनुभव

प्रतिक्रिया

रोमांचक! मजा आली वाचून!

Targat Porga's picture

28 Nov 2014 - 12:44 am | Targat Porga

धन्यवाद!:)

संजय क्षीरसागर's picture

26 Nov 2014 - 11:31 pm | संजय क्षीरसागर

एकदम आवडलं. लगे रहो!

Targat Porga's picture

28 Nov 2014 - 12:46 am | Targat Porga

:)

स्पंदना's picture

27 Nov 2014 - 4:04 am | स्पंदना

धावतं वर्णन!!

Targat Porga's picture

28 Nov 2014 - 12:48 am | Targat Porga

धन्यवाद :)

वेल्लाभट's picture

27 Nov 2014 - 10:37 am | वेल्लाभट

जाम मजा आली वाचायला... डोळ्यासमोर चित्रं उभी राहिली.
जबरदस्त.

Targat Porga's picture

28 Nov 2014 - 12:52 am | Targat Porga

त्या रातीच्या वर्णनावर एक कविता पण केलीये…जमल्यास जरूर शेअर करेन.
थ्यांक्यू. :)