इंटरस्टेलारच्या निमित्ताने...

सतिश गावडे's picture
सतिश गावडे in जनातलं, मनातलं
11 Nov 2014 - 7:05 pm

इंटरस्टेलार हा मी भारतातील थियेटरला पाहिलेला पहिला इंग्रजी चित्रपट.

एका हॉलीवूड चित्रपटवेडया मिपाकर मित्राच्या आग्रहास्तव त्याच्या सोबत हा चित्रपट पाहायला गेलो. इंग्रजी चित्रपटातील उच्चार कळत नसल्यामुळे चित्रपट कितपत समजेल याबद्दल साशंक होतो. मात्र चित्रपट सुरु होताच पडद्याच्या खालच्या बाजूला इंग्रजी सब टायटल्स दिसू लागली आणि मी निश्चिंत झालो.

चित्रपट अतिशय सुंदर असल्यामुळे नजर पडद्यावर खिळली होती. काही प्रसंग अक्षरशः श्वास रोखून धरायला लावत होते.

आता पृथ्वीचा विनाश जवळ आला आहे. त्यामुळे मानवजात वाचवायची असेल तर अवकाशात एखादया परग्रहावर, एखाद्या दुरस्थ आकाशगंगेत मानवांच्या अस्तित्वास पोषक असे वातावरण आहे का हे शोधण्यासाठी अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा एन्ड्युरन्स नावाच्या यानातून काही अंतराळवीर शोध मोहिमेवर पाठवते. त्या सफरीचे वर्णन अशा विज्ञान कल्पनेवर आधारीत संकल्पनेवर हा चित्रपट बेतला आहे.

मला चित्रपटाच्या मुख्य कथानकापेक्षा अधिक भावले ते चित्रपटातील उपकथानक. वडील आणि मुलीच्या नात्याची व्याकुळ कथा.

कुपर हा अमेरिकेच्या हवाई दलातील माजी वैमानिक. दुष्काळग्रस्त भागातील लोकवस्तीवर विमानातून बॉम्ब टाकण्यास नकार दिल्यामुळे नोकरीवरुन काढून टाकल्यामुळे नाईलाज म्हणून मक्याची शेती करणारा तरुण. शाळेत जाणार्‍या एका मुलाचा आणि मुलीचा बाप. बायको मेंदूच्या गंभीर आजाराने मरण पावलेली. सोबतीला डोनाल्ड, वयोवृद्ध वडील. मुलाचे नाव टॉम तर मुलीचे नांव मर्फ जे मर्फीच्या नियमामुळे ठेवलं होतं. मुलीचे आणि वडीलांचं घट्ट नातं.

एका विचित्र योगायोगाने रात्रीच्या वेळी कुपर नासाच्या गुप्त संशोधन केंद्रापर्यंत पोहचतो आणि तिथल्या चर्चेतून तो नासाच्या एका अंतराळ मोहिमेचा म्होरक्या म्हणून अंतराळात जायला तयार होतो. बाबा आपल्याला सोडून जाणार हे चिमुरडया मर्फला सहन होत नाही. ती रडते. बाबांना अडवण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी बाबांचा जायचा निर्धार पाहून अंगावर पांघरुण घेऊन मुसमुसत रडत राहते. आईविना वाढणारी ती पोर बापाच्या जाण्याने तुटून जाते. पुढे जेव्हा नासातर्फे कुपरच्या कुटुंबियांना नासातर्फे कुपरला रेकॉर्डेड व्हिडीओ मेसेजेस पाठवण्यास सांगितले जाते तेव्हा मर्फ आपल्या बाबांना तसा संदेश देण्यास नकार देते. पुढे ती जेव्हा ती तेवीस वर्षांची होते तेव्हा बाबांनी "अंतराळात काळ ही संकल्पना सापेक्ष असते. त्यामुळे तू जेव्हा तेवीस वर्षांची होशील तेव्हा मी ही तेवीस वर्षांचा असेल. तेव्हा मी तुला भेटायला येईल." असे सांगितलेले आठवते. मात्र तेवीस वर्ष उलटूनही बाबा परत येत नाही तेव्हा ती अतिशय दु:खी मनाने बाबांना रेकॉर्डेड व्हिडीओ मेसेज पाठवते. कुपर जेव्हा एन्ड्युरन्समध्ये तो मेसेज पाहतो तेव्हा त्याच्या डोळ्यांत पाणी येते.

अगदी इतक्या टोकाचा नसला तरी अशा प्रकारचा अनुभव आपण प्रत्येकाने आपल्या लहानपणी घेतलेला असतो. आई किंवा बाबांनी आपल्या जवळ राहावं अशी आपल्या बाल मनाला वाटत असताना ते आपल्याला सोडून कामानिमित्त बाहेरगावी जातात. आपल्याला खुप वाईट वाटते. आपण रडतो. मात्र नंतर शांत होतो. काही दिवसांनी कामानिमित्त बाहेरगावी गेलेली आई किंवा बाबा परत येतात आणि आपण काही घडलं होतं हे विसरुन जातो.

मात्र प्रत्येक लहान मुल इतकं नशिबवान असतंच असं नाही. काहींच्या आई बाबांचा घटस्फोट होतो. मुलांची आई कडे कोण आणि बाबांकडे कोण अशी वाटणी होते. कधी मुलांनाच विचारलं जातो की तू कोणाकडे राहणार. मुलाला आई बाबा दोघेही हवे असतात, जे शक्य नसतं. कुणा एका पालकाचा दुरावा मुलाला स्विकारावाच लागतो. नाईलाज म्हणून.

काही वेळा मुलांच्या लहान वयात आई किंवा वडील किंवा दोघांचाही मृत्यू होता. हा धक्का मुलांना सहन होत नाही.

काही वेळा असं होतं की आई वडील सोबत असले तरी ते भावनिकदृष्टया मुलांच्या जवळ नसतात. मानसिकदृष्टया किंवा नुसतेच आजारी असलेले आई-वडील, व्यसनी आई-वडील यामुळे मुलं भावनिकरीत्या, मनाने पालकांशी जोडली जात नाहीत. काही वेळा पालकांना मुलांच्या आपल्याकडून काही भावनिक अपेक्षा आहेत याची जाणिव नसते. राहायला घर, खायला अन्न, घालायला कपडे आणि शिक्षण दिलं म्हणजे आपण आपलं आई वडीलांचं कर्तव्य उत्तमरीत्या पार पाडतोय असा पालकांचा समज होतो.

मुलांच्या मनात आई-वडील आपल्यापासून दूर गेल्याची भावना निर्माण होते. ही दुराव्याची भावना मनात घर करुन राहते. पुढे जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा डोके वर काढते. त्या मुलाच्या व्यक्तिमत्वावर, नातेसंबंधांवर आणि एकंदरीत त्याच्या आयुष्यावर दुरगामी परीणाम करते. मनात एकाकीपणाची भावना निर्माण होते. जवळचा मित्र, मैत्रीण किंवा आयुष्याचा जोडीदार आपल्याला सोडून जाईल अशी भीती कायम मनात घर करुन राहते.

मानसशास्त्रात याला fear of abandonment म्हणतात.

fear of abandonment विषयी अधिक माहिती आपण पुढील लेखात घेऊ.

जीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

>>मानसशास्त्रात याला fear of abandonment म्हणतात.

Sometimes I feel like you read mind !!

चित्रपट पाहात असताना तुझ्या डोक्यात बरेच काही काही विचार चालू होते तर.....

सुहास झेले's picture

12 Nov 2014 - 1:46 am | सुहास झेले

हॉलीवूड चित्रपट वेडा मिपाकर म्हणजे तूच काय? ;-)

नोलनचा मी पंखा आहे... सिनेमा आवडला, पण शेवट इतका नाय रुचला. असो !!

पुढचा भाग लवकर टाकावा हि विनंती :) :)

मुक्त विहारि's picture

12 Nov 2014 - 7:27 am | मुक्त विहारि

बॉलीवूड, टॉलीवूड आणि मॉलीवूड,तेलीवूड( हे तेलीवूड पण लय भारी आहे) पेक्षा वरीजनल हॉलीवूड जास्त उत्तम..

खटपट्या's picture

12 Nov 2014 - 4:38 am | खटपट्या

मस्त लेख स. गा. !! आपल्या मुलांची ताटातूट खूपच क्लेशदायक असते. सद्या अनुभवतोय.

स्पंदना's picture

12 Nov 2014 - 5:55 am | स्पंदना

काही वेळा असं होतं की आई वडील सोबत असले तरी ते भावनिकदृष्टया मुलांच्या जवळ नसतात. मानसिकदृष्टया किंवा नुसतेच आजारी असलेले आई-वडील, व्यसनी आई-वडील यामुळे मुलं भावनिकरीत्या, मनाने पालकांशी जोडली जात नाहीत. काही वेळा पालकांना मुलांच्या आपल्याकडून काही भावनिक अपेक्षा आहेत याची जाणिव नसते. राहायला घर, खायला अन्न, घालायला कपडे आणि शिक्षण दिलं म्हणजे आपण आपलं आई वडीलांचं कर्तव्य उत्तमरीत्या पार पाडतोय असा पालकांचा समज होतो.

मुलांच्या मनात आई-वडील आपल्यापासून दूर गेल्याची भावना निर्माण होते. ही दुराव्याची भावना मनात घर करुन राहते. पुढे जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा डोके वर काढते. त्या मुलाच्या व्यक्तिमत्वावर, नातेसंबंधांवर आणि एकंदरीत त्याच्या आयुष्यावर दुरगामी परीणाम करते. मनात एकाकीपणाची भावना निर्माण होते. जवळचा मित्र, मैत्रीण किंवा आयुष्याचा जोडीदार आपल्याला सोडून जाईल अशी भीती कायम मनात घर करुन राहते.

मानसशास्त्रात याला fear of abandonment म्हणतात.

वाट पहातेय पुढच्या लिखाणाची.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Nov 2014 - 7:40 am | अत्रुप्त आत्मा

पु.भा.प्र.

जेपी's picture

12 Nov 2014 - 10:22 am | जेपी

+१

कवितानागेश's picture

12 Nov 2014 - 11:01 am | कवितानागेश

छान लिहिलय. :)

प्रसाद गोडबोले's picture

12 Nov 2014 - 12:52 pm | प्रसाद गोडबोले

रॉजर दॅट !

चित्रपट पाहुन सविस्तर कमेन्ट देण्यात येईल :)

माझी अवस्था मात्र विरुद्ध आहे. सबटायटल्स दिसली की ती वाचायची की चित्रपट बघायचा असा गोंधळ उडतो आणि वाचायच्या नादात चित्रपट बघणे राहून जाते.

सतिश गावडे's picture

12 Nov 2014 - 7:46 pm | सतिश गावडे

सुरुवातीला असं होतं. मी तेलगू चित्रपट इंग्रजी सब टायटलसहीत पाहत असे. त्याची इतकी सवय झाली की काही दिवसांनी मला तेलगू बर्यापैकी समजू लागली.

स्वामी संकेतानंद's picture

17 Nov 2014 - 6:40 pm | स्वामी संकेतानंद

अस्मादिक तेलुगु असेचस शिकले.

क्या बात है. शिन्मावरनं भाषा शिकणं म्हणजे काय खायचं काम इल्ले.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Nov 2014 - 7:18 pm | अत्रुप्त आत्मा

@शिन्मावरनं भाषा शिकणं म्हणजे काय खायचं काम इल्ले.>>> +++१११
स्वामिज्जी महान है।
http://www.sherv.net/cm/emoticons/blue-face/fine-smiley-emoticon.png

छान लिहलयं, रिव्ह्यु ऐकल्यावर उपकथानकाने भुरळ घातली होतीच आता कधी पाहायला मिळतोय ते बघायचे.
पु.भा.प्र.

fear of abandonment विषयी अधिक माहिती
अजुन पेंडिंग आहे.
नाहि आपल एक रीमाइंडर टाकल.
मला फिअर वाटली तुम्ही सोडुन द्याल विषय.

सानिकास्वप्निल's picture

16 Nov 2014 - 4:48 pm | सानिकास्वप्निल

काल बघून आलेय , चित्रपट आवडला :)

छान लिहिलय. सिनेमा पाहण्याची इच्छा आहे हे विसरण्याआधी बघायला मिळाला तर बरे.

गौरी लेले's picture

17 Nov 2014 - 4:10 pm | गौरी लेले

सुंदर लेख सतिश !

अतिषय सुंदर चित्रपट आहे हा ! कालच पाहुन आले :)

fear of abandonment विषयी अधिक माहिती >>> ह्या विषयी वाचायला आवडेल !

सूड's picture

17 Nov 2014 - 6:09 pm | सूड

काकू, जरा शुद्धलेखन सांभाळा. कसें??

स्वामी संकेतानंद's picture

17 Nov 2014 - 6:42 pm | स्वामी संकेतानंद

माणसानं गप्प शिनुमा पहावा नि बाहेर पडावं. काय हे असले विचारबिचार मनात आणू नयेत.

अवांतर :- सुरेख मांडलं आहेस.

जेपी's picture

9 Dec 2014 - 10:21 am | जेपी

रिमांडर

सूड's picture

9 Mar 2015 - 4:11 pm | सूड

>>fear of abandonment विषयी अधिक माहिती आपण पुढील लेखात घेऊ.

पुभाप्र!

जेपी's picture

14 Mar 2015 - 10:16 am | जेपी

+११११११११११११

सांगलीचा भडंग's picture

10 Mar 2015 - 2:26 am | सांगलीचा भडंग

हा पिक्चर बघताना बर्याच गोष्टी काहीच कळाल्या नाहीत . सहज म्हटले बघू काय माहिती मिळते का तर काय माझ्या सारखे बरेच जण आहेत असे वाटते ज्यांना काही कळले नाही आणि त्यांच्या साठी डिटेल समजावणारी माणसे पण भरपूर आहेत आहेत
हि लिंक बघा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Apr 2023 - 2:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरं...!

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Apr 2023 - 1:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सिनेमा आज बघितला. सुंदर आहे, एक नवं जग आणि नवे नाते यांची गुंफन. आवडला.

-दिलीप बिरुटे

खुप सुंदर लिहिलंय!

काही सिनेमांमध्ये मनोरंजनाच्या गोठलेल्या बर्फाखाली एक नितळ वाहते भावविश्व असतं,ते शोधता आलं की ..युरेका :)