रन राहुल रन...!!

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
26 Oct 2014 - 1:11 am

..................................................................
सुरुवातीच्या काळातील लिखाण,
थोडेफार सत्यघटनेवर आधारीत.
..................................................................

रन राहुल रन...!!

धापा टाकतच राहुल उठला. त्याच्या सर्वांगाला पाणी सुटले होते. छातीतील धडधड थांबायचे नाव घेत नव्हती. एका हाताने ती धडधड रोखायचा प्रयत्न करत दुसर्‍या हाताने बिछान्याचा आधार घेत तो आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊ लागला. आपण आपल्या घरातच, स्वत:च्याच बेडवर आहोत याची खात्री पटू लागली तसे हळूहळू नॉर्मल होऊ लागला. पण मन अजूनही साशंक होते. छतावर फिरणार्‍या पंख्याचा वेग दर दुसर्‍या क्षणाला कमीजास्त होत असल्याचे जाणवत होते. पंख्याच्या वाढत्या वेगाबरोबर छातीतील धडधड वाढताना भासत होती, तर कमी होणार्‍या वेगाबरोबर कमी होत
कायमची थांबतेय की काय असे वाटत होते. नजर स्थिरावू लागली तसे खोलीभर पसरलेला अंधार मावळू लागला. पण उजाडायला अजून अवकाश आहे हे खिडकीबाहेर दाटलेला मिट्ट काळोख सांगत होता. उशाजवळ ठेवलेला आपला मोबाईल उचलून त्याने वेळ चेक केली. तीन वाजून सत्तावीस मिनिटे. इतरदिवशी हि वेळ बघत अजून उजाडायला अवकाश आहे म्हणत मोठ्या आनंदाने तो पुन्हा पांघरूणात शिरला असता. पण आता मात्र त्याला लवकर उजाडावेसे वाटत होते. कसल्याश्या घाणेरडया स्वप्नातून दचकून उठला होता. आठवायचा प्रयत्न केल्या आठवत नव्हते. आठवायचेही नव्हतेच. पण ते स्वप्नच होते हि मनाला खात्री पटवून दिल्याशिवाय पुन्हा झोप येणे शक्य नव्हतेच. थोडावेळ तो तसाच छतावर गरगरणार्‍या पंख्याकडे बघत बेडवर पडून राहिला. आणि अचानक काहीसे सुचले तसा ताडकन उडी मारत उठला आणि ड्रेसिंग टेबलकडे झेपावत ड्रॉवर उघडून आतील लिफाफा बाहेर काढला. उतावीळपणेच आतील कागद बाहेर काढून सारे काहे जागच्या जागी आहे याची खात्री केली आणि परत जागेवर येऊन लवंडला. स्वप्न अजूनही आठवले नव्हतेच, पण भरलेली धडकी आता शांत झाली होती. सारे काही आलबेल होते, याच विश्वासात पहाटे कधीतरी डोळा लागला असावा.

........... पण फार काळासाठी नाही !

थड थड, थड थड थड ... थड थड, थड थड थड ...
दरवाजा ठोठावण्याच्या आवाजाने पुन्हा झोपमोड झाली.

राहुलने बेडवरूनच आवाज दिला, "कोण आहे?"

"अरे सोनू, बाहेर ये लवकर.. पोलिस आलेत आपल्याकडे.." आईचा किंचित घाबरा आवाज राहुलची झोप उडवून गेला. प्रतिक्षिप्त क्रिया घडल्याप्रमाणे तो ताडकन बिछान्यातच उठून उभा राहिला. पंख्याची गरगर आता डोक्याच्या अगदी वर चार बोटांवर जाणवत होती. छातीतील धडधड पुन्हा एकदा त्या आवाजाशी स्पर्धा करू लागली. त्याच्या डोक्यातील विचारचक्रे जोरात फिरू लागली. स्वप्नातली भिती प्रत्यक्षात उतरली होती. पण अजूनही स्वप्नातच तर नाही ना म्हणत त्याने स्वताला एक चिमटा काढून बघितला. ते ही कमी म्हणून स्वताच्या दोन थोबाडीत मारून झाल्या. पण काही फायदा नाही. स्वप्न नव्हतेच ते!

पुन्हा एकदा दारावर थडथड आणि पाठोपाठ आईचा आवाज, "सोनू बेटा, उठ लवकर, इथे काय प्रॉब्लेम झालाय बघ... हे बघ पोलिस काय म्हणत आहेत.."

आता मात्र पुढचा मागचा विचार न करता सोनू बेटाने बेडवरून उडी मारली. ड्रॉवरमधील लिफाफा बाहेर काढला. आतला दस्तावेज पुनश्च चेक करण्याचा मोह झाला पण हाताशी तेवढा वेळ नव्हता. दारावरची थडथड वाढतच होती. सैरभैर होऊन तो आसपास लिफाफा लपवण्यासाठी जागा शोधू लागला. खरे तर त्याला स्वत:लाच कुठेतरी दडी मारून लपावेसे वाटत होते. पण ते शक्य नव्हते. दहा बाय बाराची जेमतेम खोली. स्टडी कम बेडरूम म्हणून राहुलने वापरायला घेतली होती. एक बेड आणि टेबल सोडला तर फर्निचर म्हणून काही नव्हते. इथे कुठेही लिफाफा लपवला तरी पोलिसांना तो शोधणे फार काही कठीण जाणार नाही हे तो थोड्याच वेळात समजून चुकला. खिडकीतून बाहेर फेकून द्यावा असा विचार केला खरे, पण कितीही लांब फेकला तरी खालच्या गार्डन पलीकडे जाणार नव्हता. आता सुटकेचा एकच मार्ग त्याला दिसू लागला. तो म्हणजे लिफाफ्यासकट पळ काढायचा. खरे तर असे केल्याने त्याच्यावर असलेला संशय आणखीन बळकट होण्याची शक्यता होती. पण तरीही, कोणताही आरोप सिद्ध करायला पुरावा लागतोच. किमान तो तरी त्याला नष्ट करणे शक्य होते. अर्थात हा सारासार विचार करायच्या मनस्थितीत तो होता कुठे. विचार मनात आल्याक्षणीच अंमलबजावणीला सुरूवातही झाली होती. आता ना त्याला आईची हाक ऐकू येत होती ना दारावरची थाप. बस्स कानावर एक आवाज पडत होता.. रन राहुल रन.. रन राहुल रन.. कदाचित हा आवाज त्याच्याच अंतर्मनातून असावा. आणि अश्यावेळी नेहमी तोच ऐकला जातो.

खिडकीला लागून असलेल्या पाईपाच्या आधारे चढण्या-उतरण्याचा प्रकार या आधीही राहुलने ३-४ वेळा केला होता. त्यामुळे उतरताना आधारासाठी नेमके कुठे पकडायचे याचा जास्त विचार त्याला करावा लागला नाही. हा मुलगा पहिल्या माळ्यावरून असा खिडकीमार्गे पळून जाऊ शकतो हे दाराबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांच्या डोक्यात येईपर्यंत तो कुठेतरी लांब पोहोचणार होता. पण नक्की कुठे..? कुठवर..?? त्याचे त्यालाही ठाऊक नव्हते.

गार्डनच्या कंपाऊंडवॉल वरून उडी मारून राहुल मागच्या रस्त्याला तर आला होता, पण पुढे कुठे जायचे याचा काहीच विचार डोक्यात नव्हता. नुकतेच उजाडले होते. नक्की किती वाजले होते याची कल्पना नव्हती. पण पानाची टपरी उघडलेली दिसत होती. रात्रभर गस्त घालणारे दोन हवालदार सवयीने तिथे उभे असलेले दिसले आणि त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कश्यावरून हे देखील आपल्याच पाठीमागे नसावेत..? असा विचार डोक्यात येण्याचा अवकाश तसे राहुल त्यांची नजर चुकवून पुन्हा पळत सुटला.

हायवे ओलांडून समोरच्या नेहरूनगर वस्तीत शिरेस्तोवर त्याला बरीच धाप लागली होती. एवढा वेळ आपल्याच धुंदकीत मारेकरी पाठीमागे लागल्यासारखा जिवाच्या आकांताने तो पळत होता. एखादा आडोसा मिळाला तसा जरासा विसावला. श्वास समेवर आले आणि पुढचे विचार चालू झाले. शक्य तितक्या लवकर कोणालातरी फोन करणे गरजेचे होते. ज्याच्यामुळे या सर्व प्रकरणात अडकला होता निदान त्याला तरी. पण हाय रे कर्मा, सारे खिसे तिसर्‍यांदा चाचपून झाल्यावर त्याच्या लक्षात आले की घाईघाईत आपण ना मोबाईल बरोबर घेतला आहे ना पैश्याचे पाकीट. वरच्या खिशात ठेवलेली पंधरा-वीस रुपयांची चिल्लर ती काय एवढ्या शोधाशोधीतून त्याच्या हाती लागली. पब्लिक बूथवरून एक रुपया खर्च करत फोन करणे शक्य होते, पण नंबर कोणाचाही पाठ नव्हता. कसेही करून गण्याशी संपर्क साधणे गरजेचे होते आणि आता तो कॉलेजलाच भेटला असता. साहजिकच पुढचे लक्ष्य कॉलेज गाठणे होते. रिक्षा करून कॉलेजला जावे. तर सारे पैसे त्यातच खल्लास झाले असते. येणारा दिवस काय दाखवणार होता याची कल्पना नव्हती. पैश्याची पुढे कितपत गरज पडेल याची शाश्वती नव्हती. पण हा विचार याक्षणी क्षुद्र होता. जर पोलिस घरापर्यंत पोहोचले होते तर कॉलेजमध्येही कोणत्याही क्षणी पोहोचू शकत होते. गण्याला कदाचित याची काहीच कल्पना नसावी आणि पोलिस त्याच्याही मागावर असणारच. जर पोलिस एव्हाना कॉलेजला पोहोचले असतील तर तो पकडला गेला असेल का? की फरार झाला असेल? मग माझे कॉलेजला जाणे कितपत सेफ आहे? पण या सार्‍या प्रश्नांची उत्तरेही आता कॉलेजमध्ये गेल्यावरच मिळणार होती. फारसा विचार न करता पुढच्याच क्षणी राहुलने रिक्षाला हात दाखवला.

मुख्य प्रवेशद्वारापाशी रिक्षा नेणे मुर्खपणाचे होते. तसेही त्यांचा अड्डा कॉलेजच्या मागेच जमायचा. गण्या नाहीतर निदान त्याची बातमी तरी तिथेच मिळणार होती. पण सुदैवाने फारशी शोधाशोध करायची गरज न पडता गण्याच नजरेस पडला. बरोबर ग्रूपचे आणखी दोघे जण होते. त्यांच्या चेहर्‍यावरचे टेंशन बघून राहुल काय ते समजून गेला. त्याही परिस्थितीत त्या सर्वांच्या भकाभक सिगारेटी ओढणे चालूच होते. किंबहुना नेहमीपेक्षा किंचित जास्तच. राहुलला मात्र या सिगारेटचा वास कधीच जमला नव्हता. पण तरीही मैत्रीखात्यात कधीकधी तो स्वत: देखील या पोरांना सिगारेट प्यायला पैसे द्यायचा. ईंजिनीअरींगच्या पहिल्याच वर्षापासूनचे सारे मित्र. काही त्याच्याच वर्गातील, तर काही दुसर्‍या डिपार्टमेंटमधील. तर काही गेले तीन-तीन, चार-चार वर्षे ड्रॉप लागलेली मुले. सगळ्यांचे एकत्र येण्याचे सारखे दुवे म्हणजे सिगारेट ओढणे आणि कॉलेजच्या मागे भरघाव बाईक फिरवणे. पण एवढ्या वर्षात पोरगी मात्र एकाच्याही पाठीमागे बसलेली कधी दिसली नव्हती. कशी दिसणार, कॉलेजमधील नावाजलेल्या टारगट मुलांचा म्हणून ओळखला जाणारा ग्रूप. पण तरीही, राहुल यांच्यात असूनही या सार्‍यांपेक्षा वेगळा. अपघातानेच यांच्यापैकी एकाशी ओळख झाली आणि ट्यूनिंग जमली म्हणून हळूहळू या सार्‍यांमध्ये सामील झाला. कसेही असले तरी ही मुले मैत्रीखातर जिवाला जीव देणारी आहेत या एकाच विश्वासावर त्याचे नाते या सर्वांशी घट्ट बांधले गेले होते. तो स्वत: अभ्यासात प्रचंड हुशार. पण ईंजिनीअरींगमध्ये हुशार विद्यार्थी तोच, जो आदल्या रात्री अभ्यास करूनही पास होतो, या चुकीच्या समजुतीत अडकलेला. तरीही एक चांगली गोष्ट म्हणजे यांच्यात चोवीस तास राहूनही तो कधी त्यांच्यासारखा बनला नव्हता. पण ना कधी त्यांना आपल्यासारखे बनवायचा प्रयत्न केला होता. ते जसे होते, तसे होते, पण राहुलचे मित्र होते आणि त्याला त्यांच्या ग्रूपमधील एक हुशार मुलगा म्हणून योग्य तो मान होताच. आणि का नसावा, कारण ते सारे पास व्हावे म्हणून त्यांचा कोणी अभ्यास घ्यायचा, त्यांना शिकवायचा तर तो राहुलच होता. खास करून गण्याभाईला...

इतरांसाठी गणेशभाई, जवळच्यांसाठी गण्याभाई, पण राहुलसाठी मात्र बघताबघता गणेशभाईचा गण्याभाई, आणि गण्याभाईचा गण्या झाला होता. तसे मारामारी किंवा भाईगिरी करणे हा राहुलचा पिंड नव्हता, पण गण्याभाईचा हात डोक्यावर आहे म्हटल्यावर चार पोरे राहुललाही वचकून राहायची. आणि राहुलला देखील हे आवडायचे. गण्या गेली चार वर्षे या कॉलेजमध्ये होता पण अजूनही दुसर्‍या ईयत्तेला पार करू शकला नव्हता. आणि त्यात काही नवल नव्हते म्हणा, कारण पास होण्यासाठी मुळात अभ्यासाची आवड तरी असावी लागते वा तशी गरज तरी. ज्याचा दिवस चहाच्या टपरीवर सुरू होऊन कॉलेजच्या जिममध्ये संपायचा अश्या गण्यासाठी ईंजिनीअरींगचा अभ्यासक्रम बनलेलाच नव्हता. पण या गण्याला डीग्रीसह कॉलेजच्या बाहेर काढायची जबाबदारी राहुलने आपल्या खांद्यावर घेतली होती आणि त्यासाठी तो जे काही करत होता ते चुकीचे आहे हे माहीत असूनही तो याला मित्रकर्तव्याचे नाव देत होता.

राहुलने जेव्हा गण्याला त्याच्या घरापर्यंत पोहोचलेल्या पोलिसांबद्दल सांगितले तेव्हा गण्याच्या चेहर्‍यावरच्या आठ्या आणखी पसरल्या. कुठल्याही संकटातून जर कोणी मार्ग काढू शकत असेल तर तो एक गण्याच हा राहुलचा विश्वास होता. पण आज गण्यालाही चिंताग्रस्त बघून राहुलचेही टेंशन आणखी वाढले. गण्याच्या माहितीनुसार एक्झाम डीपार्टमेंटमध्ये असलेल्या C.C.T.V. कॅमेर्‍यांमुळे त्यांची चोरी पकडली गेली होती. थोडाबहुत ऑफिस स्टाफ गण्याचा खास होता ज्यांच्याकडून त्याला ही खबर मिळाली होती. हे कॅमेरे हल्लीच बसवले असल्याने सारे अनभिज्ञ होते. पण कॉलेज एवढ्या लवकर पोलिसांपर्यंत जायची अ‍ॅक्शन घेईल असे गण्यालाही वाटले नव्हते. कोणालातरी पटवून, कोणाचे तरी पाय धरून, वेळ पडल्यास आपले आतापर्यंत कमावलेले वजन वापरून यातून बाहेर पडू अश्याच समजुतीत तो होता. फार तर फार एखाद दोन वर्षाचे निलंबन, ईतपत मानसिक तयारी त्याने करून ठेवली होती. पण पोलिस केस म्हणजे थेट जेल आणि सारी शैक्षणिक करीअर उध्वस्त, नव्हे सार्‍या आयुष्याचे मातेरं.

जर गण्यासारख्या मुलाची ही हालत होती तर राहुलची कल्पनाही न केलेली बरे. अजूनही त्यांच्याकडे शेवटचा मार्ग हाच होता की जाऊन प्रिन्सिपल सरांचे पाय पकडणे. परीक्षा विद्यापीठाची नसून कॉलेजची अंतर्गत असल्याने अंतिम निर्णय काय घ्यायचा हे ठरवणे कॉलेज प्रशासनाच्याच अखत्यारीत येत होते. पोलिस तक्रार मागे घेतली गेली तर कदाचित यातूनही सुटकेची संधी होती. निघण्यापूर्वी गण्याने बॅगेतून एक धारदार चाकू काढून खिशात ठेवला. "कशासाठी? कोणासाठी?", राहुलच्या नजरेतील प्रश्नांना गण्याने आपल्या नजरेनेच गप्प केले. तसेही त्याच्याशी वाद घालण्यात आता अर्थ नाही हे तो समजून होता. गण्या नेहमी आपल्याच मनाचे ऐकायचा. त्याच्यामते, जर आयुष्य एकदाच मिळते तर विचार दोनदा का करायचा, निर्णय हा नेहमी पहिल्याच फटक्यात घ्यायचा असतो.. आणि आताही गण्याने तो घेतला होता.. दोघांसाठीही!

....... अजुनही राहुलचा गण्यावर विश्वास होता.

प्रिन्सिपल सरांच्या केबिनकडे जाताना रस्त्यात त्यांना बर्‍याच जणांनी पाहिले. पण कोणाच्याही नजरेत काही वेगळे जाणवले नाही. म्हणजे अजून या प्रकरणाचा बोभाटा झाला नव्हता. जर प्रिन्सिपल सरांनी त्यांची बाजू समजून घेतली तर अजूनही सुटकेची आशा होती. पण कोणती बाजू ते मांडणार होते हा प्रश्नच होता. परवा होणार्‍या प्रश्नपत्रिकेची चोरी केली होती त्यांनी. काय सांगणार होते ते सरांना? सर, आमचा अभ्यास झाला नव्हता, नापास होऊ, वर्ष फुकट जाईल या भितीने असे केले हे सांगणार होते? की पैश्यांची गरज होती, प्रश्नपत्रिका विकून चार पैसे मिळतील या लालसेपोटी केले हे कारण देणार होते? पण जेव्हा प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये पोहोचले तेव्हा त्यांचा संतप्त अवतार बघून त्यांच्या तोंडून शब्दच फुटेनासे झाले. राहुलने त्यांचे हे रूप आजवर कधी पाहिले नव्हते. राहुल अगदीच त्यांच्या लाडक्या विद्यार्थ्यांपैकी एक नसला तरी या मुलात एक चुणूक आहे हे ते जाणून होते. वेळोवेळी हे त्यांनी दर्शवलेही होते. त्यामुळे त्यांच्या मनात राहुलबद्दल नक्कीच एक सॉफ्ट कॉर्नर होता. पण कालच्या कृत्याने त्याने तो ही गमावला होता. आज त्याची जागा रागाने घेतली होती. सरांचा शाब्दिक मार सुरू होता आणि राहुल जागीच थिजल्यासारखा उभा होता. आजपर्यंत बर्‍याचदा ब्लॅकलिस्ट मध्ये नाव लागले म्हणून असे प्राध्यापकांच्या केबिनमध्ये जाण्याचे प्रसंग त्याने अनुभवले होते. पण प्रत्येकवेळी एक प्रकारची बेफिकीरी असायची की काही झाले तरी हे आपले कॉलेज आहे, समोर ओरडणारे आपलेच सर आहेत. हे काही आपल्याला जीवे मारायची शिक्षा देणार नाहीत. जे काही बोलतील ते खाली मान घालून निमुटपणे ऐकायचे की झाले, सुटलो. पण आज तशी परिस्थिती नव्हती. आज त्याला निर्लज्जासारखे उभे राहणे जमत नव्हते. आणि रडायलाही येत नव्हते. मन एवढेही कोडगे झाले नव्हते, पण रडून आपली चूक धुतली जाणार नाही याची त्याला जाणीव होती. अजूनही सर यातून काहीतरी मार्ग काढतील, आपल्या आयुष्याची, आपल्या शैक्षणिक करीअरची अशी वाट लागू देणार नाहीत हा विश्वास अजूनही कुठेतरी त्याच्या मनात होताच. आणि त्याचा हा विश्वास अगदीच काही चुकीचा नव्हता. आपण मुलांचे भविष्य घडवण्यासाठी या जागी आहोत, ना की त्यांची स्वप्ने उध्वस्त करण्यासाठी याची थोडीबहुत जाण सरांनाही होती. संतापाचा जोर ओसरला तसा त्यांचा बोलायचा रोख बदलू लागला. राहुलकडे त्यांनी आतापर्यंत केलेल्या त्याच्या सार्‍या चुकांचा कबुलीजबाब मागितला.

दोन वर्षांपूर्वी राहुलने पहिल्यांदा गैरमार्गाचा वापर करून गण्याची मदत केली होती. परीक्षेच्या आदल्या रात्री स्वत:चा अभ्यास बाजूला ठेऊन गण्याला शिकवायचा निष्फळ प्रयत्न करून झाल्यावर तो समजून चुकला की उद्याच्या पेपरात गण्याची दांडी पुन्हा एकदा गुल होणार आहे. म्हणून गण्याच्याच सांगण्यानुसार राहुलने त्याच्या जागी डमी बसायचा निर्णय घेतला. पकडला गेला असता तर दोघांवरही एकदोन वर्षांची बंदी आली असती. पण पकडले जाण्याची शक्यता कमी होती. परीक्षागृहात हजर असणारे सारे निरीक्षक बाहेरचे असायचे. कॉलेजचे काही वॉचमन आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा वावर तिथे असायचा पण त्यांच्यावर मुलांकडे लक्ष द्यायची विशेष अशी जबाबदारी नव्हती. आणि लक्ष गेले तरी ते काणाडोळा करणार होते, कारण ते सारे गण्याच्या ओळखीचे होते. पहिला पेपर निर्विघ्नपणे पार पडला तसा राहुलचा हुरूप वाढला. अजून तीन-चार अवघड विषय त्याने गण्याला डमी बसून सोडवून दिले.

त्याच्या पुढचे वर्षही असेच सुटले. पण या वर्षी मात्र प्रत्येक वर्गात एक तरी निरीक्षक कॉलेजचा हवा असा विद्यापीठाने नियम केल्याने त्यांची बोंब झाली. अभ्यास करून पास होणे हा प्रकार आता गण्या विसरून गेला होता. आणि राहुलच्या मतेही गण्याचा अभ्यास घेण्यात काही अर्थ नव्हता. म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी असते. फसवणूकीचा एक नवीन मार्ग शोधला गेला. गण्याने एका वॉचमनला हाताशी धरून कोर्‍या उत्तरपत्रिकांचा एक गठ्ठा चोरला होता. परीक्षेच्या दिवशी पेपर चालू झाल्यावर दहा ते पंधरा मिनिटांतच गण्या बाथरूमचे कारण देऊन बाहेर पडायचा. बरोबर एक प्रश्नपत्रिका असायची जी तो पर्यवेक्षकांच्या नकळत एक्स्ट्रा घ्यायचा. बाथरूममध्ये आधीच त्याची वाट बघत असलेल्या साथीदाराला ती सुपुर्त केली जायची. मग तो साथीदार ती प्रश्नपत्रिका घेऊन तडक हॉस्टेलच्या रूमवर यायचा. तिथे त्या चोरलेल्या उत्तरपत्रिकांवर पेपर सोडवायचे काम राहुल करायचा. अर्थात, पहिले पर्यवेक्षकांच्या हस्ताक्षराचे पान रिकामे सोडले जायचे. सोबतीला आणखी दोनचार साथीदार पुस्तके घेऊन बसलेली असायची जी फटाफट उत्तरे शोधून द्यायचे काम करायची. अश्या तर्हेने वेळेच्या पंधरा-वीस मिनिटे आधीच जमेल तितके लिहून ती उत्तरपत्रिका पुन्हा बाथरूमच्या मार्गेच गण्याच्या हवाली केली जायची. त्यानंतर गण्या त्याच्याजवळच्या उत्तरपत्रिकेचे पहिले पान ज्यावर परीक्षागृहात हजर पर्यवेक्षकांनी हस्ताक्षर केलेले असायचे ते काढून या उत्तरपत्रिकेला जोडायचा की झाली नवी उत्तरपत्रिका तयार.

बर्‍यापैकी फूलप्रूफ प्लॅन होता. दररोज पर्यवेक्षक बदलत असल्याने या मुलाला रोजच का बाथरूमला जावे लागते असा संशय येण्यासही फारसा वाव नव्हता. सारे काही सुरळीत चालू होते. पण मागच्या पेपराला गण्याच्या एका मित्रानेही यांच्या नकळत हीच पद्धत वापरायचा प्रयत्न केला जो योग्य नियोजनाअभावी फसला आणि तो पकडला गेला. परीणामी उर्वरीत सत्रासाठी पेपरची वेळ सुरू झाल्यावर कोणालाही परीक्षागृहाच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली.

आता गण्याची खरी पंचाईत झाली होती. विद्यापीठाच्या नियमानुसार अंतिम वर्षात प्रवेश करण्यासाठी आदल्या वर्षीचे जास्तीत जास्त दोन विषय राहिले तरच हे शक्य होते. आणि अजून तीन पेपर बाकी होते. गण्याने स्वताच्या हिंमतीवर तोडकामोडका अभ्यास करून दोन पेपर देऊन पाहिले. पण केवळ औपचारिकता म्हणून तीन तास वर्गात बसून आला होता. शेवटचा पेपर, स्ट्रक्चरल अ‍ॅनालिसिस, ज्यात भल्याभल्यांची भंबेरी उडते. खुद्द राहुल गेल्या वर्षी त्यात कसाबसा पास झाला होता. तिथे गण्यासारख्याचा टिकाव लागणे अशक्यच. गण्या यातही नापास झाल्यास त्याचे अख्खे वर्ष फुकट जाणार होते. गण्याचा मते आता एकच मार्ग उरला होता. त्याचा निर्णय घेऊन झाला होता. राहुल असाही काही त्याच्या शब्दाबाहेर नव्हता. गण्याचे हे वर्ष सुटावे म्हणून त्याने स्वत:ही आतापावेतो इतका आटापिटा केला होता की तो व्यर्थ जाऊ नये म्हणून तो ही या कृत्यात त्याला साथ द्यायला तयार झाला. आधी डमी बसलो, मग एक वेगळीच क्लृप्ती लढवून सार्‍या परीक्षामंडळाला फसवून कॉपी केली आणि आता थेट प्रश्नपत्रिकेचीच चोरी! राहुलला हे सारे थ्रिलिंग वाटले होते. पण आता मात्र मागे वळून पाहताना आपण यात कसे अडकत गेलो हेच त्याला जाणवत होते. बोलताबोलता त्याचा बांध फुटला आणि तो अक्षरश: शाळकरी मुलासारखा रडू लागला. त्याला स्वत:चे हे रूप काही नवीन नव्हते. लहाणपणापासून मस्तीखोर स्वभावामुळे ही वेळ त्याच्यावर बर्‍याचदा आली होती. त्याचे ते वागणे निरागस असायचे. ते रडणे प्रामाणिक असायचे. अगदी आजही तसेच होते.

प्रिन्सिपल सरांचा राग आता बरेपैकी निवळला होता. आवाजाची धार सौम्य झाली होती. मगासपासून जे ताशेरे ओढले जात होते त्याची जागा आता उपदेशपर आणि समजुतीच्या शब्दांनी घेतली होती. पण हा बदललेला नूर फक्त राहुलपुरताच होता. सर गण्यालाही चांगलेच ओळखून होते. हा नासका आंबा पेटीतूनच काय बागेतूनही काढायच्या निर्णयाप्रत ते आले होते. राहुल आता माफीचा साक्षीदार झाला होता आणि आरोपीच्या पिंजर्‍यात गण्या फक्त एकटाच उरला होता.

सरांचे बोलून झाल्यावर राहुलने गण्याकडे किंचित अपराधीपणाच्या नजरेने पाहिले. पण क्षणभरच. दुसर्‍याच क्षणी गण्याचा हातातील लखलखते पाते पाहून त्याचे डोळे विस्फारले. काय घडतेय हे कोणाला समजण्याआधीच गण्या सरांवर झेपावून सपासप वार करू लागला. राहुलने काही हालचाल करेपर्यंत फार उशीर झाला होता. सर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते. राहुलला सरांच्या अंगावर ढकलून गण्याने पळ काढला. पण जाता जाता त्याने काढलेले उद्गार राहुलच्या कानात बराच वेळ घुमत राहिले.. "जर मी लटकलो राहुल्या, तर मी तुला पण बरोबर घेऊन लटकणार... तुला पण बरोबर घेऊन लटकणार.."

राहुल आता खरोखरच लटकला होता. सर्वांनी गण्या आणि राहुलला सरांच्या केबिनमध्ये एकत्र जाताना पाहिले होते. ज्या कारणासाठी जात होते त्या प्रकरणात दोघेही गुंतले होते. जर सरांवर हल्ला करायची कल्पना एकट्या गण्याचीच होती हे कोणाला माहित होते तर ते फक्त प्रिन्सिपल सरांना, जे राहुलच्या समोर जमिनीवर निपचित पडून होते. जिवंत होते की मृत हे कळायला मार्ग नव्हता. त्यांना आता असेच सोडून आपणही पळ काढावा की बाहेर जाऊन कोणाकडे तरी मदत मागावी, राहुलला काहीच सुचेनासे झाले. पुन्हा एकदा त्याने स्वत:च्या दोन थोबाडीत मारून पाहिल्या, कदाचित आपण या दु:स्वप्नातून बाहेर पडू या आशेने.. पण असे काही होणार नव्हते हे त्यालाही माहीत होते. जे घडतेय ते सत्य आहे आणि हि आपल्या कर्माचीच फळे आहेत, जी कधी ना कधी आपल्याला भोगावीच लागणार होती हे तो समजून चुकला होता. बाहेरील लोकांचा आवाज कानावर पडत होता. वर्दळ वाढत होती. दुसर्‍याच क्षणी कोणीही इथे येण्याची शक्यता होती. बंद दरवाज्याच्या पलीकडून एक आवाज आणखी आणखी जवळ येतोय असे जाणवले तसे राहुलच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजू लागली. पाठोपाठ तोच आवाज.. रन राहुल रन... रन राहुल रन... पण यावेळी मात्र हा आवाज आपल्या अंतर्मनातून न येता कोणीतरी परकीच व्यक्ती आपल्या कानात पुकारतेय असे वाटत होते. हा आवाज, हा सल्ला आपल्या भल्यासाठी आहे की आपल्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहे हे त्याला समजेनासे झाले. पण आता त्याचा विचार करायची वेळ टळून गेली होती. पर्याय एकच होता.. रन राहुल रन..

जसे दरवाजा लोटून कोणीतरी आत आले तसे राहुलने सरळ त्याला धडक देत बाहेरच्या बाजूला धाव घेतली. पाठीमागून येणारा धडपडल्याचा आवाज.. शिवीगाळ.. गोंधळ.. सारे आवाज आता चोहीकडून येत आहेत असे त्याला वाटू लागले. धावता धावता राहुल कॉलेजच्या गेटबाहेर पडला. कदाचित कायमचाच! मागे वळून एकदा कॉलेजला बघून घ्यावे अशी इच्छा तर होत होती पण हिंमत होत नव्हती. कॉलेजशी असलेले सारे बंध केव्हाच तुटले होते.

तो मॅकेनिकल ईंजिनीअरींगचा क्लासरूम, शेवटचा बाक, बाकावर बसून म्हटलेली गाणी. कधी याची खेच, तर कधी त्याला उकसव. कधी अचानक एखाद्या कठीण प्रश्नाचे उत्तर देऊन सरांना चकीत करणे आणि दाखवून देणे की बॅकबेंचर्सही काही कमी नसतात. अगदीच बोअर लेक्चर असेल तर मागच्या मागेच पळ काढणे. एखाद्या मित्राला आपली हजेरी लावायला सांगणे आणि स्वत: मात्र जिममध्ये जाऊन कॅरम खेळणे. यात कधी पकडले जाणे आणि मग शिक्षा म्हणून एखादी असाईनमेंट लिहिणे. ती लिहिण्यासाठी होस्टेलवर मित्रांसोबत नाईट मारणे. तिथेच पत्त्यांचा डाव रंगणे आणि रात्रभर जागूनही पुर्ण झाली नाही म्हणून तीच असाईनमेंट दुसर्‍या दिवशी सकाळी कॅंटीनमध्ये लिहित बसणे. लिहितानाही अर्धीअधिक नजर जवळपासच्या मुलींवर असणे आणि तरीही त्यांच्यावर ईंप्रेशन मारण्यासाठी त्यांच्याकडे लक्ष न देता अभ्यास करतोय असे दाखवणे. सरते शेवटी असाईनमेंट पुर्ण केल्याचा आनंद आणि तो साजरा करण्यासाठी मागवलेली कटींग चहा... सार्‍या सार्‍या आठवणी कडवट झाल्यासारख्या वाटत होत्या.

बसस्टॉपवर बसून राहुल स्वताशीच विचार करत होता. या सार्‍याच्या पार्श्वभूमीवर त्याला गण्याचे शेवटचे शब्द आठवत होते. आजपर्यंत राहुलने जे केले होते ते केवळ गण्याच्या मैत्रीखातर, गण्याच्या भल्यासाठी. पण काम निघून गेल्यावर तो मात्र पलटला होता. आणि यात काही नवल नव्हते. तो गण्याचा स्वभावच होता. जो राहुलला माहित असूनही तो त्याच्याबरोबर राहायचा कारण यात त्याचा स्वत:चाही स्वार्थ लपला होता. कॉलेजमधील चार मुले त्याला गण्याचा खास माणूस म्हणून जी इज्जत द्यायची ती त्याला गमवायची नव्हती. पण आज जे घडले होते त्याने मैत्री आणि संगत यातील फरक त्याला स्पष्ट झाला होता!

अजूनही त्याच्या कानावर कुठून तरी तेच शब्द ऐकू येत होते, रन राहुल रन.. रन राहुल रन.. सकाळपासून तो धावतच तर होता. थकला होता तो आता. पळून पळून कुठे जाणार होता. एका मुलाच्या हक्काच्या अश्या दोनच जागा असतात. एक घर आणि दुसरे कॉलेज. त्यातील दुसरी तर त्याने गमावली होती. आता जे काही होईल त्याला सामोरे जायचे असे ठरवून राहुलने घरी परतायचा निर्णय घेतला.

घरासमोर थांबलेली पोलिस वॅन बघून तो काय ते समजला. अश्या बातम्या पसरायला वेळ लागत नाही. असेही त्याचे नाव संशयितांच्या यादीत सर्वात वरचे होते. सरांवर झालेल्या हल्ल्यात त्याचा हात नव्हता हे केवळ त्यालाच ठाऊक होते. तरी काही ना काही करून आपण ते पोलिसांना पटवून देऊ अशी पुसटशी आशा होती. पण घरच्यांचा गमावलेला विश्वास तो कसा परत मिळवणार होता. वडीलांची भेदक नजर आज त्याला लाचार वाटत होती. काही झाले तरी त्यांचा मुलगा आजवर त्यांचा अभिमान होता. ‘पापा कहते है बडा नाम करेगा..’ कसले नाम आणि कसले काय! आज त्यांच्या मुलाने त्यांना बदनाम केले होते. दादा देखील वडीलांप्रमाणेच मान खाली घालून उभा होता. मोठ्या भावाच्या नात्याने राहुलच्या प्रती असलेली आपली जबाबदारी घेण्यात आपणही कुठेतरी कमी पडलो ही अपराधीपणाची भावना त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट झळकत होती. आजी आजोबांची आपलीच काहीतरी बडबड चालू होती. आपला नातू चुकीचे काम करूच शकत नाही हा त्यांचा विश्वासच नाही तर श्रद्धा होती. या सर्वात आई मात्र कुठेच नव्हती!

राहुलची नजर घरभर आईला शोधू लागली. आज त्याला सर्वात जास्त गरज तिच्या कुशीची होती. पण तीच कुठेतरी हरवली होती. सकाळपासून त्याची पाठ सोडत नसलेला तो चितपरीचित आवाज, "रन राहुल रन.." तो तेवढा आता पुर्णपणे थांबला होता. कितीही पळालो तरी परत फिरून आपल्याला आपल्या माणसांतच यायचे असते हे कदाचित त्याच्या अंतर्मनाला उमगले होते. इतक्यात एक दणकट बांध्याचा पोलिसवाला त्याच्यासमोर येऊन उभा राहिला आणि राहुलला अचानक परिस्थितीचे भान आले. आता त्याला फक्त खरे आणि खरेच बोलायचे होते. पण आता त्याच्या खरेपणावरही कोणाला विश्वास बसत नव्हता. जिथे जन्मदात्या आईवडीलांचा विश्वास गमावला होता तिथे परके त्याच्या शब्दांवर कसे विश्वास ठेवणार होते. ते ही पोलिसवाले, ज्यांना फक्त पुराव्याचीच भाषा समजते. राहुल परत परत तेच सांगत होता जे खरे होते, पण पोलिस काहीएक ऐकून घ्यायला तयार नव्हते. राहुल अगदी रडकुंडीला आला, पण त्यांना राहुलच्या तोंडून तेच ऐकायचे होते जे त्यांना स्वत:ला अपेक्षित होते. राहुलकडे सांगण्यासारखे आणखी वेगळे असे काहीच नव्हते, ना गण्या या वेळी कुठे आहे हे त्याला माहीत होते. सरते शेवटी त्या पोलिसमामांचा संयम तुटला आणि त्यांनी राहुलच्या एक खाडकन कानाखाली वाजवली.

...... तसा राहुल ताडकन उठून बसला. पुढचे काही वेळ तो तसाच गालावर हात ठेऊन बिछान्यात बसला होता. त्याचा विश्वास बसायला किंचित वेळच लागला की हे सारे स्वप्न होते.

डोक्यावर गरगर फिरणारा पंखा आता बरेपैकी निवळला होता. तसा तो ऊठला आणि पुन्हा एकदा ड्रॉवर उघडला. पुन्हा एकदा त्यातील लिफाफा बाहेर काढून आतील पेपर चेक केले. सारे काही जागच्या जागी होते. खिडकीतून सुर्याच्या कोवळ्या किरणांनी आत प्रवेश केला होता. त्या प्रकाशात घर बर्‍यापैकी उजळून निघाले होते. केलेल्या चुकीचे प्रायश्चित कबुलीजबाब देऊन करायची हिंमत आपल्यात नाही हे त्याने स्वत:शी कबूल केले होते. पण आपल्याला या लिफाफ्याची विल्हेवाट लावायची आहे एवढे त्याने नक्की केले. गण्याला कदाचित हे कधीच मान्य होणार नव्हते. कदाचित त्यांच्या मैत्रीचाही हा शेवट असणार होता. पण राहुलला मात्र आज मैत्रीची खरी परिभाषा समजली होती. त्याचा हा निर्णय गण्याचेही हितच बघणार होते. भले आज गण्याला हे पटले नाही तरी एक दिवस आपल्यासारखी त्यालाही जाग येईल हा विश्वास होता. एक शेवटचा द्रुढनिश्यय केल्याच्या आविर्भावात राहुलने दीर्घ श्वास घेतला. तो लिफाफा बॅगेत भरला आणि ती खांद्यावर लटकवून घराबाहेर पडला...!

--x--- समाप्त --x--

दोन शब्द - आयुष्य म्हटले की त्यात एखादे दु:स्वप्न हे आलेच. आपलेच आपण स्वत:ला कितीही चापट्या मारल्यासारखे केले तरी जाग मात्र तेव्हाच येते जेव्हा समोरून कोणीतरी येऊन आपल्या कानाखाली जाळ काढतो. पण ती वेळ का येऊ द्यावी? कथेतल्या राहुलला तर जाग आली. आता आपली वेळ आहे. तुमच्या घरातही असा एखादा राहुल असेल. तुम्ही स्वत: असाल, तुमचा भाऊ असेल किंवा तुमचा मुलगा असेल. तर त्याला वेळीच जागे करा. नाहीतर एक दिवस त्याच्यावरही अशीच वेळ येईल.... रन राहुल रन... रन राहुल रन...!!

- तुमचा अभिषेक

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

विनोद१८'s picture

26 Oct 2014 - 1:39 am | विनोद१८

बोधप्रद पण छान रंगलीय.

मुक्त विहारि's picture

26 Oct 2014 - 8:12 pm | मुक्त विहारि

सहमत...

बहुगुणी's picture

26 Oct 2014 - 3:43 am | बहुगुणी

पुन्हा आवडली.

तुमचा अभिषेक's picture

26 Oct 2014 - 7:45 pm | तुमचा अभिषेक

हो, दुसर्‍या एका संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली. जुनीच कथा आहे. वर नमूद केलेय, लिखाणाच्या सुरुवातीच्या काळातील आहे. तेव्हा मिपावर मी नव्हतो. :)

प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)

तुषार काळभोर's picture

26 Oct 2014 - 8:13 am | तुषार काळभोर

मला वाटले काहीत्॑री राजकीय फार्सिकल/विडंबन असं काहीतरी असंल...
असो!
आता वाचून पाहतो.

बोका-ए-आझम's picture

26 Oct 2014 - 10:17 am | बोका-ए-आझम

कथा मस्त. पण मला खरं सांगायचं तर राहुल गांधीच्या संदर्भात काही असेल असं वाटलं होतं.

कवितानागेश's picture

26 Oct 2014 - 6:30 pm | कवितानागेश

मस्तय कथा.

खटपट्या's picture

27 Oct 2014 - 8:37 am | खटपट्या

खूप छान ! आवडली !!

Maharani's picture

28 Oct 2014 - 7:43 pm | Maharani

कथा आवडली..

तुमचा अभिषेक's picture

28 Oct 2014 - 10:05 pm | तुमचा अभिषेक

धन्यवाद, सर्व प्रतिसाद

कथा चांगली आहे. पण वाचायला लागल्यावर पहिल्याच घासाला हा खडा लागला...

त्याच्या सर्वांगाला पाणी सुटले होते

अंतु बर्वा's picture

29 Oct 2014 - 8:21 am | अंतु बर्वा

छान कथा... रन लोला रन ची आठवण झाली. जमल्यास अवश्य पहावा असा चित्रपट.

योगी९००'s picture

29 Oct 2014 - 5:19 pm | योगी९००

मस्त कथा..मलाही पहित्यांदा रा.गा. च्या संदर्भात लिहीली असावी असे वाटले.

तुमची लेखनशैली सुद्धा आवडली. पु.ले.शु.