'द साऊथ सी बबल'… एका जागतिक महाघोटाळ्याची कथा

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in जनातलं, मनातलं
17 Oct 2014 - 11:42 am

पुर्वी झालेले आणि संभाव्य घोटाळे हा सर्वसामान्यांना बाजारापासून दूर ठेवणारा एक मोठा घटक!!. हे गैरप्रकार नक्कीच निषेधार्ह, पण अशा घोटाळ्यांतून वा अपघातांतूनच प्रचलित व्यवस्थांना सुधारणांचे बाळकडू मिळते, त्या सुदृढ बनतात हे नाकारता येणार नाही. असे भ्रष्टाचार हल्लीच होतात, आपल्याकडेच होतात असे बिलकुलच नाही. वाचकांचा असा गैरसमज असेलच तर तो दूर करणारी ही एक ऐतिहासिक महाघोटाळ्याची सुरस कथा....

‘घोटाळा' हा शब्द अलीकडे आपल्या भलताच परिचयाचा झाला आहे, वर जेव्हा तो शेअरबाजारासारख्या (कु??)प्रसिद्ध बाबीशी जोडला जातो, तेव्हा 'घोटाळस्य कथाः रम्याः' हे ओघानेच आले. पुण्याचा इतिहास म्हणले की पानशेतचा प्रलय आठवतोच, तसे शेअर घोटाळा म्हणताक्षणी वाचकांना लगेचच हर्षद मेहता वा केतन पारेख असे महानुभाव आठवले असतील.. पण नाही, ही कथा आपल्या भारतीय नायकांची नाही. किंबहुना असे घोटाळे फक्त आपल्याकडेच होतात असे नाही, तर या बाबतीत जागतिक परंपराही तितक्याच 'भव्य-दिव्य' आहेत असे मला सुचवायचे आहे.

चला मग,..ऐका ही शेअरबाजारांच्या इतिहासातील एक जागतिक महाघोटाळ्याची, 'द साऊथ सी बबल'ची कहाणी..

अठराव्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटीश साम्राज्य जगभर पसरले होते, मात्र त्याच वेळी आक्रमक वसाहत विस्ताराच्या धोरणाने इंग्लंड सरकारवर स्पेनबरोबरील युद्धामुळे प्रचंड कर्ज झाले, ते कसे फेडावयाचे ह्याची चिंता पार्लमेंटला लागून राहिली होती. १७११ साली स्थापन झालेल्या 'द साऊथ सी' कंपनीने सरकारला एक क्रांतिकारक प्रस्ताव दिला. सरकारचे कर्ज चुकविण्यासाठी कंपनी सरकारला अल्प दराने कर्ज देईल, मात्र त्या बदल्यात सरकारने 'द साऊथ सी' कंपनीला स्पेन व दक्षिणेकडील वसाहतींबरोबर व्यापाराची मक्तेदारी बहाल करावी.. असा तो प्रस्ताव होता. लगोलग बॅंक ऑफ इंग्लंडनेही या प्रस्तावासारखाच प्रस्ताव संसदेस दिला (८०च्या दशकात, भारतातील एका कुख्यात स्मगलरने, आपल्या सरकारला, 'तुम मुझे स्मगलिंग की परमिशन दो, मै तुम्हारा पूरा कर्जा उतारूंगा' असा बाणेदार प्रस्ताव दिला होता म्हणे - माहिती अर्थातच ऐकीव.)

या दोन्ही प्रस्तावांवर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये गरमागरम चर्चा सुरू झाली. तेव्हाच्या सर्वोत्तम संसदपटूंपैकी एक श्री. रॉबर्ट वॉल्पोल या एकमेव गृहस्थांनी 'द साऊथ सी' कंपनीच्या प्रस्तावास कडाडून विरोध केला. पण त्यांच्या विद्वत्तेचा, वक्तृत्वाचा पराभव झाला, आणि ०२ फेब्रु. १७१७ रोजी बहुमताने 'द साऊथ सी अ‍ॅक्ट' मंजूर झाला.

सुखवस्तू, आणि असलेला पैसा गुंतविण्याच्या आकर्षक पर्यायाच्या शोधातील जनतेच्या पाठबळामुळे आधीच तेजीत असलेल्या शेअर बाजारात या बातमीचे पडसाद दिसू लागले होते. कंपनीच्या संचालकांनी बाजारात जाणीवपूर्वक बातम्या पेरावयास सुरुवात केली. सरकारकडून मिळालेल्या व्यापार हक्कांचा वापर करून 'द साऊथ सी' कंपनीला वसाहतींतील दुर्गम प्रदेशांतील सोने, चांदी व अतिमह्त्त्वाची खनिजे अतिशय स्वस्त दरात मिळणार आणि कंपनीचा नफा शेकडो पट वाढणार, अशा आवया उठू लागल्या. महिन्या-दोन महिन्यांतच या कंपनीच्या हक्कबहालीचे बील हाउस ऑफ कॉमन्समध्ये १७२ वि. ५५ अशा बहुमताने पास होईस्तोवर या शेअरचा भाव १०० पौंडावरून ३३० पौंडावर स्थिरावला.
पुढे, हाउस ऑफ लॉर्ड्समध्ये या बिलाचे प्रथम वाचन ०४ एप्रिलला, द्वितीय वाचन दुसर्‍याच दिवशी, ०५ एप्रिलला झाले. ०६ रोजी हे बील 'कमिट' झाले आणि ०७ एप्रिलला ते संमतही झाले. त्याच दिवशी बिलास राजघराण्याची मंजुरी घेण्यात येऊन त्याचे कायद्यात रूपांतर करण्यात आले. इतक्या महत्त्वाच्या विधेयकाचे अशा घाईने कायद्यात रूपांतर होण्याची ब्रिटिश इतिहासातील ही एक अपवादात्मक घटना मानली जाते.

गंमत म्हणजे आजच्या भाषेतील प्रसिद्ध 'buy on rumors...sell on the news' ह्या सुप्रसिद्ध वचनाचा तेव्हाही प्रत्यय आला. गेले २-३ महिने सतत उसळ्या घेऊन एव्हाना 400 पौंडावर पोहोचलेला ह्या कंपनीचा भाव सदरहू कायदा मंजूर होताक्षणीच कोसळला, आणि 07 एप्रिलला तो ३१०वर आणि पुढच्याच दिवशी २८० पौंडावर बंद झाला. पण एव्हाना या कंपनीच्या ‘हितचिंतकां’मध्ये बरेच वजनदार लोक सामील होऊ लागले होते, ज्यांची पोटे अजून भरावयाची होती. (असे म्हणतात की ब्रिटिश संसदेच्या दोन्ही सभागृहांतील मिळून अर्ध्यापेक्षा अधिक सदस्यांकडे या कंपनीचे शेअर्स होते.) साहजिकच कंपनीच्या बाबतीत अतिशयोक्तीपूर्ण बातम्यांचे पेव फुटले, स्पेनच्या राजाने कंपनीबरोबर व्यापारात रस दाखविला आहे, राजाला थोडासा मोबदला देऊन त्या बदल्यात 'रॉक ऑफ जिब्राल्टर'सारख्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणांवर आपल्या कंपनीची मक्तेदारी असेल.. अशा वावड्या 'आतल्या गोटातल्या' व्यक्तींच्या हवाल्याने उठू लागल्या. शेअरचा भाव पुन्हा वाढू लागला.

कंपनीच्या हुशार प्रवर्तकांनी १२ एप्रिलला, हुबेहुब हल्लीच्या बुक बिल्डींग इश्श्युसारखीच, प्रति शेअर ३०० पौंड दराने शेअर्सची सार्वजनिकरित्या विक्री करावयाचे जाहीर केले. ह्या योजनेला जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. कंपनीने या पैशांतून खनिजे आणि कापड व्यवसाय या मूळ धंद्याव्यतिरिक्त, जहाजे विकत घेऊन नवीन व्यापारी मोहिमा काढणे, गुलामांची खरेदी-विक्री यासारख्या तत्कालीन कमालीच्या फायदेशीर व्यवसायांत हातपाय पसरल्याचा दावा केला. बाजारांत शेअरचे भाव वाढतच राहिले. १७१९ सालापर्यंत कंपनीने सरकारला दिलेले कर्ज ०५ कोटी पौंडापर्यंत पोहोचले. गेल्या दोन-तीन वर्षातील देदीप्यमान कामगिरी, जाहिरातबाजी आणि बाजारातील तेजीचा उन्माद याचा फायदा घेऊन कंपनीने अनेकदा निरनिराळ्या प्रकल्पांसाठी चढ्या दराने इश्श्युज काढून बाजारातून पैसा उभारला.

एव्हाना शेअर्समध्ये पैसे गुंतवून झटपट श्रीमंत होण्याच्या वेडाने परिसीमा गाठली होती. एकीकडे धनाढ्य, सावकार, उमरावांत या कंपनी्त गुंतवणुकीची अहममिका लागली असतानाच दुसरीकडे अगदी सामान्य, गरीबसुद्धा कर्जे घेऊन ह्या कंपनीचे शेअर्स घेण्यास आतुर झाले होते. आकडेवारीनुसार २/३पेक्षा अधिक पेन्शनर्सनी आपले निवृत्तिवेतन या इश्श्युमध्ये गुंतवले होते, यावरून या प्रकरणाची तीव्रता ध्यानात येईल. शेअर खरेदीची ही सुंदोपसुंदी इतकी मोठी होती की कंपनीची कार्यालये अपुरी पडली. जमलेल्या जनतेत धक्काबुकीचे, मारामारीचे प्रसंग घडले. शेवटी रस्त्यावर बाकडी मांडून कंपनीने इश्श्युद्वारे लोकांना शेअर्स दिले. सर आयझॅक न्युटनही या कंपनीत गुंतवणूक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. उपलब्ध माहितीप्रमाणे त्यांनी या कंपनीत ३०,००० पौंड गुंतवले व प्रचंड नुकसान (आजचे तब्बल २५-३० कोटी रुपये!!!) सोसल्याने उद्वेगाने 'I can calculate the motion of heavenly bodies, but not the madness of people” असे उद्गार काढले.

दरम्यान ०३ मे १७२० रोजी शेअरने ८९० पौंडाचा भाव नोंदवला. येथे प्रथमच गुंतवणूकदारांना 'बुडबुडा' फुटण्याची भीती वाटली व भावात मोठी घसरण झाली. मात्र तरीही काही हितसंबंधीयांनी पुन्हा तुफान खरेदी करून तेजीचा देखावा करण्यात यश मिळवले आणि ऑगस्टमध्ये भाव १००० पौंडापलीकडे पोहोचवला.

शेवटी A pin lies in wait for every bubble... ही उक्ती खरी ठरलीच, भाव वेगाने घसरू लागले. पूर्ण ऑगस्टमध्ये घसरण चालू राहिली, ०२ सप्टेंबर १९२० रोजी ७०० पौंड, ०८ सप्टेंबर - ६४०, ०९ सप्टेंबर - ५४० अशी तीव्र उतरण दाखवीत अंतिमतः शेअरचा भाव १३५ पौंडांवर स्थिरावला.

एक अंक संपला, पण आजही अगदी अल्पावधीत भावांत ५०-१०० पटींपेक्षाही अधिक वाढ दाखवून नंतर जमीनदोस्त होणार्‍या हिमाचल फ्युच्युरिस्टिक, पेन्टामिडिया यासारख्या कंपन्या हेच सांगतात की साठा उत्तराची कहाणी अजून सुफळ संपूर्ण व्हायची आहे.

हा महाघोटाळा आणि आपल्या बाजारांतील घोटाळे यांत अनेक साम्यस्थळे आहेत. (1) अति महत्त्वाकांक्षी प्रवर्तक आणि त्यांच्या राक्षसी लालसेला साथ देणारी बडी घेंडे ह्या भ्रष्ट युतीतूनच अशी प्रकरणे जन्म घेतात. सामान्य गुंतवणूकदार अशा फसव्या लोकांच्या जाळ्यात ओढला जातो, (आपले BSE सर्वाधिक काळ बंद पाडणारा MS Shoes घोटाळा) (2) आपण गुंतवणूक करीत असलेल्या कंपनीची मूलभूत माहितीही नीटशी घेण्याचे कष्ट आपण घेत नाही. येथेही 'द साऊथ सी' कंपनी ही एक अतिसामान्य व्यवस्थापन असलेली कंपनी होती, जिची अनेक जहाजे चुकीच्या पत्त्यावर जाऊन अडकल्याचा इतिहास होता. भारतातही अशाच कंपन्याच्या नादी लागून अनेकांनी हात पोळून घेतले आहेत. (3) मला काय त्याचे? मला गाठायचा आहे फक्त एक (माझ्यापेक्षा) मूर्ख... आणि मी सुटलो!! ही ‘Greater fool theory’ तेव्हाही होती, आजही आहेच आहे. (४) याशिवाय कोणत्याही तेजी आणि नंतरच्या कडेलोटात हमखास आढळणारी आशावाद (optimism), सहभाग (participation), उन्माद (euphoria), गळचेपी (Capitulation) आणि घबराट (panic) ही सर्व मूळ लक्षणे या गोष्टींत ठळकपणे दिसतात.

असे म्हणतात की 'History doesn't repeat itself, but it does rhyme', आपण अशा धड्यांतून काही बोध घेतला आहे का??....... निर्णय मी आपणावर सोडतो. धन्यवाद.!!

संदर्भ : (१) 'Extraordinary Popular Delusions and the Madness of Crowds'- by Charles Mackay, (२) ‘अर्थात’ - श्री. अच्युत गोडबोले आणि आंतरजालावरील अनेक दुवे.

गुंतवणूकलेख

प्रतिक्रिया

एस's picture

17 Oct 2014 - 11:59 am | एस

आवडेश! ह्यातून एक गुंतवणूकदार म्हणून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

अभिरुप's picture

17 Oct 2014 - 12:55 pm | अभिरुप

लेख आवडला.

अन्या दातार's picture

17 Oct 2014 - 1:54 pm | अन्या दातार

बराच त्रोटक वाटला. कंपनीने नक्की काय धंदा केला, तिला नफा-नुकसान किती झाले इ. गोष्टी आल्या असत्या तर शेअरमधली १००० ते १३५ ची घसरण का झाली हे कळले असते. शिवाय या सगळ्यात इंग्लंड राष्ट्राचे नुकसान काय झाले याचा उहापोह महत्वाचा आहे; कारण स्पेशल कायदा करुन कंपनीस परवानगी देण्यात आली होती.
कारण नसतानाही, चांगले तिमाही/सहामाही/वार्षिक निकाल असूनही आपटी खाणार्‍या कंपन्या कमी नाहीत. मग याच कंपनीच्या शेअरने आपटी खाल्ली म्हणून घोटाळा म्हणायचा का हेही कळले नाही.

दशानन's picture

17 Oct 2014 - 8:17 pm | दशानन

+१
असेच म्हणतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Oct 2014 - 9:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

+1

अजून जास्त माहिती असती तर मजा आली असती. सुरुवात मस्त झाली पण शेवट फार थोडक्यात गुंडाळला आहे.

पेन्टामिडिया चे नाव पण घेऊ नका, कळ येथे छातीत =))

तुम्ही एकटेच नाही आहात दशानन दादा. सर न्यूटन पण असेच म्हणाले होते.

'साउथ सी' चे नाव उभ्या हयातीत परत न घेण्याची आणि दुसर्यालाही न घेऊन देण्याची शपथ घेतली होती त्यांनी.

अमित खोजे's picture

17 Oct 2014 - 8:59 pm | अमित खोजे

याला योगायोग म्हणावा का? अगदी कालच "The Intelligent Investor" - Benjamin Graham यांचे पुस्तक वाचत होतो. नुकतीच सुरुवातच केली होती.
या अगोदर मला "द साउथ सी" कंपनीची काहीच माहिती नव्हती. पुस्तकात तिचे उदाहरण अगदी प्रस्तावनेतच दिलेले आहे. म्हटले वेळ मिळेल तसा गुगलून बघावे काय कंपनी होती ती; तर अगदी आजच तुमचा हा लेख वाचनात.

झकास. पण खरच थोडी अजून माहिती दिली असती तर थोडा आमच्याही डोक्यात जरा जास्त प्रकाश पडला असता. म्हणजे शेअर का कोसळले वगैरे.

बाकी लेख मात्र झकास हां!

प्रसाद भागवत's picture

18 Oct 2014 - 6:02 pm | प्रसाद भागवत

.........अशाच तह्रेने ज्या प्रमाणे कुठेतरी क्षीण पणाने जन्माला आलेला प्रवाह पुढे जाऊन झरा ओहोळ आणि नदी बनु शकतो तसेच मनामनांत रुजलेल्या तेजी/मंदीच्या कल्पना पुढे विशाल स्वरुपात प्रकटताना दिसतात. साथीच्या रोगाप्रमाणे ही मानसिकता ही अनेकदा संसर्गजन्य असते. यातुनच बाजाराच्या भल्या-बुर्‍याला कारणीभुत अशा लोभ अथवा भीती या भावनांचा उद्रेक आणि कधेकधी अतिरेक होऊन बाजार असंतुलीत होतो पण गंम्मत म्हणजे. यातुनच बाजारात समतोल प्रस्थापित होण्याची प्रक्रिया,(जी अगोदरच्या भावनेच्या बरोब्बर विरुद्ध असते) तत्क्षणी नव्याने सुरु होते. संक्रमणाच्या या स्थितीला 'Overturn Mania' असे म्हटले जाते. ....... जहाजाच्या एका भागात अल्पसे पाणी झिरपते आहे या संशयाने प्रवासी त्या कोपर्‍यापासुन विरुद्ध दिशेस एकत्रित होऊ लागतात, मात्र काही काळाने जहाजाच्या एकाच टोकास बहुसंख्य प्रवासी जमल्याने जहाज कलंडण्याचा धोका उद्भवतो जो आधीच्या झिरपणार्‍या पाण्यापासुनच्या त्रासापेक्षा अधिक आहे याची जाणिव होऊन प्रवासी परत उलट्या दिशेने निघतात, हा या संज्ञेमागचा अर्थ आहे.

अर्थात सामान्य स्थितीत, अशा जमलेल्या गर्दीपैकी प्रत्येकाच्या परिस्थितीच्या आकलनाची, धोका पत्करण्याची पातळी व एकुणातच निर्णयक्षमता वेगवेगळी असल्याने हे दिशा वा पक्षबदल एकाच वेळी होत नाहीत. बाजारांत तेजी मंदीच्या लबकाला गती देणारे असे अक्षरशः अब्जावधी मेंदु एकाच वेळी भाग घेत असल्याने, अत्यंत अल्पकाळातही त्याच्या अशा स्वतंत्रपणे केलेल्या विचारांचा परिपाक म्हणुन मागणी/पुरवठा हे समीकरण सातत्याने बदलत रहाते, ज्याचे प्रतिबिंब भावपातळीत पडलेले दिसते.

या मानसशास्त्रीय दृष्टीकोनातुनच सर्वकालीन महान अर्थशास्त्रज्ञ जॉन केन्स यांनी बाजारांत वावरणार्‍या अल्पकलीन गुंतवणुकदाराची तुलना वर्तमानपत्रांतील पर्याय निवड स्पर्धेमध्ये वाचकांची सर्वाधिक मते मिळविणार्‍या सौदर्यवतीस मत देऊन भेटवस्तुस पात्र होणार्‍या वाचका बरोबर केली आहे. आणि या पार्श्वभुमीवर बाजारांत यशस्वी होण्याचा एकच गुरुमंत्र सुचविला आहे , तो म्हणजे "बाकीच्यांचे अंदाज काय असतील, - याचा अचुक अंदाज बांधावयास शिका'

जाता जाता A Mathematician Plays the Stock Market या विक्रमी खपाच्या पुस्तकात लेखक श्री. जॉन पावलोस यांनी बाजारांतील तेजी-मंदीची चक्रांचा उलटफेर कसा चालु रहातो या्च विषयला अनुषंगुन दिलेले एक सुंदर उदाहरण आपणा वाचकांना संगितल्या खेरीज रहावत नाही. लेखक एका महाविद्यालयांत घेत असलेल्या अभ्यासवर्गांत प्रत्येक दिवसाअखेर एक परिक्षा होत असे. लेखकाने उत्तर पत्रिकेच्या शेवटी एक ठ्ळक चौकोन छापला आणि बाजुला दोन सुचना लिहिल्या (1) ह्या चौकोनात फुली (cross) मारल्यास विद्यार्थ्थास 10 अतिरिक्त गुण देण्यांत येतील आणि (2) महत्वाचे म्हणजे एकुण विद्यार्थ्थापैकी निम्यापेक्षा अधिक जणांनी अशी फुली करण्याचा पर्याय निवडल्यास मात्र अशा प्रत्येकाच्या गुणसंख्येतुन 10 गुण वजा करण्यांत येतील.

लेखक पुढे सांगतात -पहिल्यांच दिवशी काही जणांनी फुली मारली आणि सहजी 10 अतिरिक्त गुण मिळवले, दुसर्‍या दिवशी व नंतर फुली मारणार्‍याची संख्या वाढली. लवकरच तिने 50% ची लक्ष्मणरेषा ओलांडली आणि त्या दिवशी फुली मारणार्‍याच्या नशिबी बक्षिसाऐवजी शिक्षा आली. मग मात्र कोणीच फुली मारावयास तयार होईना, आणि मग जेव्हा कोणीच फुली मारत नाही असे सगळ्यांच्या लक्षांत आले ---- मला वाटते, पुढील गोष्टीचा 'एक चिमणी आली---दाणा घेउन गेली' हा नीरस प्रकार मी सांगावयास नको.............. तेजी वा मंदीची चक्रे का व कशी गती घेतात या बद्दलचे माझे आकलन स्पष्ट करणारा माझ्याच अन्य एका लेखातील काही भाग.

प्रसाद भागवत's picture

18 Oct 2014 - 5:37 pm | प्रसाद भागवत

सर्वांचे धन्यवाद. प्रथमच सांगितले पाहिजे की अर्थपुर्ण या आर्थिक साक्षरतेचा प्रसार करणार्‍या मासिकाच्या दिवाळी अंकाकरिता हा लेख लिहिताना शब्दमर्यादा पाळण्याचे बंधन होते. अधिक माहितीसाठी लेखाच्या शेवटी काही संदर्भ पुस्तके दिली आहेत, ज्यांच्या आधारे हा लेख लिहिला आहे. जिज्ञासुंनी ती पुस्तके मुळापासुन वाचावीत असे मी सुचवेन.

@अन्या दातार - इंग्लंड राष्ट्राचे नुकसान काय झाले ... अशा घोटाळ्यांचे सामाजिक दुष्परिणाम होतात, मोठ्यांच्या या खेळांत सर्वसामान्याना फटका बसतो. 'आकडेवारीनुसार 2/3 पेक्षा अधिक पेन्शनर्सनी आपले निवृतीवेतन या इश्श्युमध्ये गुंतवले होते, … ' मला वाटते हे पुरेसे आहे.

@इस्पीकचा एक्का - खरे आहे आपण म्हणता ते, पण जसे फुग्यात हवा भरताना दमा दमाने भरली जाते, फुटायला क्षणभरच वेळ लागतो. तसेच येथेही ( आणि खरेतर प्रत्येक वेळीच) एकदा कोसळायला लागल्यावर तळ गाठेपर्यंत मधे लिहावे असे दुसरे काही घडलेले नाही.

@अमित खोजे -शेअर का कोसळले वगैरे........ 'मला काय त्याचे? मला गाठायचा आहे फक्त एक (माझ्यापेक्षा) मुर्ख...आणि मी सुटलो !! ही ‘Greater fool theory’ तेंव्हाही होती..आजही आहेच आहे, याशिवाय कोणत्याही तेजी आणि नंतरच्या कडेलोटात हमखास आढळणारी आशावाद(optimism) सहभाग(participation), उन्माद(euphoria) गळचेपी(Capitulation) आणि घबराट (panic) ही सर्व मुळ लक्षणे या गोष्टींत ठळकपणे दिसतात'.... असे मी लिहिले आहेच. सहभागी गुंतवणुकदारांची मानसिकताच अशा तेजीमंदीस कारणीभुत असते. आपण या विषयावरील माझे अन्य लिखाण वाचल्यास मला आवडेल.

सुबोध खरे's picture

14 Sep 2015 - 9:16 am | सुबोध खरे

सुंदर लेख.
अजून भरपूर आणि विस्तृत लेख येउ द्या अशी नम्र विनंती.

जेपी's picture

18 Oct 2014 - 5:49 pm | जेपी

लेख आवडला.
अश्या बोगस कंपन्या शेअर मार्केट च्या बाहेर पण असतात.
उदा-शारदा चिटफंड घोटाळा.
सध्या मला ' सम्रुद्ध जिवन फाऊंडेशन ' बद्दल असाच संशय येतो.सम्रुद्ध जिवन ची वाटचाल पाहिली तर संशयास्पद आहे

प्रसाद भागवत's picture

18 Oct 2014 - 6:05 pm | प्रसाद भागवत

सहमत.

प्रसाद१९७१'s picture

20 Oct 2014 - 2:28 pm | प्रसाद१९७१

सम्रुद्ध जिवन फाऊंडेशन बद्दल कोणाला काही माहीती असेल तर ती वाचायला आवडेल. हा नक्की काय प्रकार आहे ते कळत नाही.

प्रसाद भागवत's picture

16 Sep 2015 - 1:28 pm | प्रसाद भागवत

बरेच 'एजंट्स' फिरत असतात ह्या समुहाच्या (तथाकथित) मालकीच्या हॉटेल्स व बिल्डींग्ज, म्हशी, शेळ्यांचे गोठे ई. चे फोटो असलेले जाडजुड अल्बम घेवुन (दुर्दैवाने मालमत्तेसंदर्भात 'बॅलन्स शीट' नावाचा काही दस्तऐवज असतो याचे त्यांना कल्पना नसते). त्यांच्यापैकी कोणाशीही संपर्क साधा. माहिती मिळेल.

सम्रुद्धी जिवन फाऊंडशेनला आता सेबी ने लोकांना त्यांचे घेतलेले पैसे वापस करायला सांगितले आहेत.

हि फांऊडेशन चिटफंड आहे आणी महाराष्ट्रात फेमस आहे.
कायतरी घोटाळा घडणार आहे.

साधा मुलगा's picture

13 Sep 2015 - 7:48 pm | साधा मुलगा

अवांतर:
शेअर मार्केट मधील basic गोष्टी संबंधी एक धागा चालू करावा अशी विनंती आहे.
ज्यात मार्केट मधील काही संज्ञा ,व्याख्या, नियम तसेच d-mat account कसा उघडावा? online treading कसे करावे, या संबंधी सोप्या भाषेत माहिती मिळाल्यास बरे होईल.
याआधी असा धागा काढला असल्यास त्याची लिंक द्यावी.

प्रसाद भागवत's picture

16 Sep 2015 - 1:22 pm | प्रसाद भागवत

सवडीने लिहितो साहेब. धन्यवाद.

एचबीएन डेअरीबद्दल काही माहिती सांगू शकाल का? ह्याही कंपनीचा संशय येतो आहे.

प्रसाद भागवत's picture

16 Sep 2015 - 1:23 pm | प्रसाद भागवत

माहिती नाही या बद्दल. क्षमस्व.

चलत मुसाफिर's picture

17 Sep 2015 - 12:29 pm | चलत मुसाफिर

भागवत साहेब,

1. फारच छान लेख. अधिक खोलात जाऊन लिहावे ही विनंती. तुमची लेखनशैली आकर्षक असल्यामुळे आकडेवारी आणि ताळेबंदही वाचायला मजा येईल.

2. हे चिटफंड/गुंतवणूक घोटाळे नेमाने होत असतात. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा असे दिसून येत नाही. याबाबत एक शंका अशी: या कंपन्या चालवणारे (आणि खड्ड्यात नेणारे) लोक हे एकजात बदमाशच असतात का? हजारो लोकांची पुंजी घेऊन पोबारा करायचा, हाच त्यांचा पहिल्या दिवसापासूनचा उद्देश असतो का? Sound investment model असूनही अन्य काही कारणांमुळे कंपनी गाळात गेली असे असू शकते का?

मला वाटतं हर्षद मेहताने कोर्टात हाच बचाव मांडला होता.

समृध्द च्या संचालकांना नोटीस पाठवल्याच्या बातम्या वाचल्या होत्या.

अभिजित - १'s picture

20 Sep 2015 - 6:06 pm | अभिजित - १

बहुतेक परवाच रात्री ९:३० वाजता , मी मराठी channel वर समृद्ध जीवन मध्ये कसा गणेशोत्सव साजरा करत आहेत ते दाखवत होते. काही मिसेस मोतेवार दागिने घालून आपल्या भक्तीचे , देवाच्या आशीर्वादाचे महत्व सांगत होत्या. कंपनी मधील लोक उत्साहाने आरत्या कसे करतायत ते दाखवत होते. RBI च्या circular ची कोणालाच काही पडली नव्हती.

अभिजित - १'s picture

24 Sep 2015 - 10:02 pm | अभिजित - १

http://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/amtek-auto-plung...
The default raised risks of adding nearly Rs 8,000 crore potential bad loans to the Indian banking system.
The company is negotiating with banks for more than Rs 1,000 crore of loans to repay the bond holders, including JPMorgan Mutual Fund,
फायदा असेल तर पहिला वाटा परदेशी लोकांचा . आणि तोटा होत असेल तरी परदेशी लोकांना लगेच खास मार्ग काढून मार्ग द्यायचा !!
गेल्या तर गेल्या भारतीय बँक डब्यात .. जे पी मोर्गन सुटला पाहिजे.