भोलेबाबा अमरनाथ दर्शन २००१

खुशि's picture
खुशि in भटकंती
20 Sep 2014 - 2:18 pm

सकाळी अमरनाथसाठी निघालो, श्रीनगर शहरात रस्त्यावर मोठमोठे चिनारचे व्रुक्ष आहेत.रस्त्याच्या मधोमध असले तरी रस्ता रुंदीकरणासाठी त्यांची कत्तल केलेली नाही तर जागोजाग रस्त्यालाच वळण दिलेले आहे.गन्दरबल येथे माताश्री खिरभवानीच्या दर्शनासाठी गेलो.निसर्गरम्य ठिकाण आहे.छोटीसी स्वच्छ वाहत्या पाण्याची नदी आहे घाट आहे,सरोवरात खिरभवानी मातेचे छोटेसे मन्दीर आहे.५१शक्तिपीठा पैकी एक आहे.येथे साबुदाण्याच्या खिरीचा प्रसाद मिळतो.प्रसादालयाच्या जवळ एका ठिकाणी उभे राहुन वर आकाशाकडे पाहिले असता झाडांच्या फांद्यांमधुन भारताचा नकाशा दिसतो.घनदाट व्रुक्षराजी आहे.भरपुर कावळे आहेत पण ते पिवळ्या चोचीचे आणि गोड आवाजाचे आहेत.मंदिराभोवती आणि परिसरात मिलिट्रीचा कडक बंदोबस्त आहे.सर्वानी भवानी अष्टक म्हणून प्रार्थना केली.मंदिराभोवतीच्या सरोवराच्र पाणी काळेकुट्ट होते,सध्या भारतावर आणि काश्मीरवर आतंकवादाचे घोर संकट आलेले असल्याने हे पाणी काळे आहे असे तिथे आम्हाला सांगितले,पाणी स्वच्छ झाले म्हणजे संकट निवळले असे समजता येईल असे तेथील जनतेचे म्हणणे आहे.मुसल्मान जनताही हे मानते हे विषेश.
आम्ही तीन सुमो मधुन प्रवास करत होतो,निसर्गरम्य परिसरातुन चाललो होतो,दुतर्फा अक्रोडाची झाडे होती.आमचा ड्रायव्हर उंच डोंगरात असलेली घरे दाखवुन म्हणाला वो सारे मकान पंडीतोंके थे सारे भाग गये.वाईट वाटले ऐकुन.एका ठिकाणी गाड्या अचानक थांबवल्या आम्हाला कळे ना काय झाले? तर हा हायवे एकेरी असल्याने मिलिट्रीच्या वाहनाना जाण्यासाठी प्रथम प्राधान्य देतात म्हणून थांबविले होते.जवळ जवळ चारपाचशे गाड्या जाईपर्यन्त तास दीडतास थांबावे लागले.छोट्या छोट्या खेडेगावांमधुन रस्ता जातॉ,गाडी दिसली की गोबर्‍या गोबर्‍या गालांची तांबुस गोर्‍या रंगाची सुंदर गोंडस मुले जय भोले जय भोले असे ओरडत खाऊ मागत होती.निरागस मुस्लीम मुले, त्याना धर्म आड येत नव्हता,भाषा आड येत नव्हती.आम्ही बरोबर भरपुर चॉकलेट घेतली होती सर्वाना खाऊ वाटत मजेत चाललो होतो.मुलांचे गोड हसू पाहुन गलबलुन येत होते कधी संपणार हा जीवघेणा आतंकवाद?ह्या मुलाना सुखाचे जीवन कधी बहाल होणार? याच विचाराने मन अस्वस्थ झाले होते,मुस्लीम असली तरी ती आपलीच भारतमातेची लेकरे होती,त्यानाही सुखाचे जगायला मिळायला हवे, तो त्यांचाही हक्क आहे.
मनेगावला अमरनाथ यात्रेचा चेकिंग पॉइंट आहे,गाड्या थांबवल्या.बरीच मोठी रांग होती.आमचा नंबर आला,गिरिशने सर्वांचे पास दाखवले तरिही प्रत्येक गाडीपाशी येउन सैनिकानी चौकशी केली, महाराष्ट्रातुन आलो म्हटल्यावर लगेच सोडले. आता आमच्या उजव्या बाजुने सिन्धुनदी प्रचंड वेगाने वाहात होती.पलिकडे डोंगरावर घनदाट देवदार,चीड,पाईन वगैरे व्रुक्षांचे जंगल होते.रंगीबिरंगी फुलेही फुललेली होती.स्रुष्टीदेवता या परिसरावर प्रसन्न झालेली होती.पक्षीगण आनंदाने शिवस्तुतीगान करत होते.हवेत सुखद गारवा होता.आणि नंदनवनातील सौंदर्याची खाण असलेले सोनमर्ग आले. मैलोंगणती हिरवळीचा गालिचा डोंगरमाथ्यापासुन रस्त्यालगत पर्यंत पसरला होता.त्यावर अगणित फुलांचा कशिदा काढलेला होता.धरतीपर कही स्वर्ग है तो बस वह यही है यही है यहि है हे बादशहा जहांगिराचे हे शब्द खरेच आहेत.हेच पटवुन देणारे हे ठिकाण आपल्याला अजुन एखाद लाख तरी डोळे हवे होते असे वाटत होते.हिरवळीवर अक्षरशः लोळण घेतले सगळ्यानी,किती मऊ मखमली आहे हा धरतीमातेचा बिछाना.सोनमर्ग पासुन आठ कि.मि.वर बालतल हा यात्रेचा बेसकॅम्प आहे,तिथे पोहोचल्यावर सर्वांच्या बॅग्ज स्कॅन करुन,वैयक्तिक तपासणी करवुन बाहेर यायला सहा वाजले.इथे सहा वाजता दुपारी असते तसे उन होते.तंबू घेतले.जमिनीवर जाड गाद्या घालुन बिछाने केलेले होते.असंख्य भंडारे खानपान सेवा देण्यासाठी सज्ज होते. प्रातर्विधीसाठी फायबरचे लॅट्रिन,बाथरुम होते,तिथे सेवाभावी आपल्या हातावर घालण्यासाठी गरम पाणी साबण घेऊन तत्पर होते,आणि ही सर्व सेवा नि:शुल्क होती.प्रत्येक ठिकाणी आपले स्वागत आओ भोले आओ भोले म्हणून होत होते.जय बाबा बर्फानी भुकेको अन्न प्यासेको पानी ही घोषणा आसमंतात दुमदुमत होती.भोजन पंचपक्वान्नाचे,पुन्हा आटवलेले मसाला दुध,पान खाणार्‍याना चांदिच्या वर्खाचे पान,बडिशोप थाट होता नुसता.कुठे किर्तन,कुठे भजन,आरती यात्रेची नुसती धामधुम.आतंकवादाच्या सावटाचे नावही नव्हते,इथेही आपले सैनिक डोळ्यात तेल घालुन दक्ष होते म्हणूनच हा भोलेभंडारीचा सोहळा आनंदाने नाचत होता.उद्या बर्फानी बाबांच्या गुफेकडे प्रयाण.
पहाटे ४/३०ला ॐ नमःशिवाय,जय बाबा भोलेनाथच्या गजरात पायी वाटचाल सुरु केली,काही जणानी घोडा केला आम्ही सॅक घेण्यासाठी एक पिठ्ठू{कुली}केला. त्याने आमच्या तिघांच्या म्हणजे मी,हे आणि ह्यांची बहिण निशा यांच्या सॅक घेतल्या.एवढे १४कि.मि.,१५०००फूट उंचावर जाण्यासाठी प्रत्येकी फक्त ५०रुपये घेतले त्या म्हातार्‍याबाबानी.२कि.मि.वर एका छोट्या नाल्यावरच्या पुलाजवळ चेकिंग झाले,तिथल्या सैनिकाने आमच्या पिठ्ठूला उगाचच मारले मी रागावले म्हटले क्यु मारते हो बेचारेकॉ क्या किया है उसन? माताजी आपको मालुम नही ये बडे बदमाश होते है,सैनिक म्हणाला,मेरा पिठ्ठू है वो, मारना नही ,उसका कार्ड है मेरे पास अच्छा अच्छा ठिक है आप आईये असे म्हणून त्याने आम्हाला पुढे सोडले.या नंतर गुफेशिवाय मध्ये चेकिंग होणार नाही. डोमेल आले,आता चढाई सुरु.रोज पांडवलेणे चढणे वगैरे सराव केला होता पण ह्या चढाईपुढे ते काहीच नव्हते.थोडे थोडे मध्ये मध्ये थांबत,पाण्याचे घोट घेत,लिमलेटची गोळी चघळत कापुर हुंगत वाटचाल करत होतो.बर्डीमार्ग जवळ आला महाभयानक द्रुष्य समोर ठाकले,एक वीस बाविस वर्षांची मुलगी पुढ्यात लहान मुलाला घेउन घोड्यावरुन चालली होती;घोड्याचा पाय सटकला आणि तिच्यासकट दरीत कोसळला,त्या मुलीने प्रसंगावधान राखुन मुलगा जवळच उभ्या असलेल्या सैनिकाकडे भिरकावला,सैनिकाने त्या मुलाला झेलुन खाली ठेवले आणि तुरंत तो त्या दरीत वेगाने उतरला जवळच्या लोकानी त्या मुलाला उचलुन कडेवर घेतले.काही मिनिटातच तो सैनिक त्या मुलीला खांद्यावर टाकुन वर आला,मुलगी बेशुद्ध झाली होती. ह्या घटनेला घडायला मला लिहिण्याला लागलेल्या वेळाच्या एक शतांशही वेळ लागला नसावा. ह्या धामधुमीत आम्ही बर्डीमार्गच्या मिलिट्री कँपमध्ये पोहोचलो मी सैनिकांच्या मदतीसाठी गेले,मुलीला मल्टीपल फ्रॅक्चर्स होती.प्रथमोपचार सुरु केले,क्षणभरातच मिलिट्रीचे डॉक्टर पोहोचले.तेवढ्यात मला गिरिशची वहिनी धावा अशी हाक आली,आम्ही धावलो.६०/७० फुटांचा तो उतार आम्ही धावत तो कसा उतरलो हे समजले सुद्धा नाही. आमच्या ग्रुपमधील पनवेलचे गोखले याना चक्कर आली होती आणि श्वास लागला होता.गिरिश खुप घाबरला होता.प्रथम त्याना जमिनीवर झोपवुन त्यांचे पाय वर करुन त्याना हेडलो पोझिशन दिली,त्यांच्या तोंडात ग्लुकोजची साखर घातली,दोन तीन मिनिटांच्या आतच ते सावध झाले मग त्याना बसवुन माझ्या जवळ असलेली डेरिफायलीन आणि बेटनेसॉल ची गोळी दिली,हे लाइफ सेव्हिंग ड्रग आहेत.गोखले ठीक झाले मी पुढे येतो असे म्हणाले पण सर्वानुमते त्याना घोडा करुन खाली बालतलला पाठवले,तिथे डॉक्टराना दाखवुन औषधोपचार घेऊन तंबूत विश्रांती घ्यायला सांगितले.त्याप्रमाणे ते गेले.दरम्यान सैनिकानी तेथील सपाटीवर तात्पुरते हेलिपॅड बनवुन हेलिकॉप्टर बोलावले होते आणि मग त्या मुलीचि आणि तिच्या नातेवाईकांची श्रीनगरला पाठवणी केली. या सार्‍या घडामोडीत तीन तास गेले होते.
बर्डीमार्ग ते संगम सरळ रस्ता आहे, संगमला बालतल आणि पंचतरणी अशा दोन्ही मार्गांचा संगम होतो इथे कुठल्याही नद्यांचा संगम नाही.संगमावरच्या भंडार्‍यात भोजन घेऊन पुन्हा चढाईला सुरवात केली.ही कठीण चढाई आहे.साधारण दोन कि.मि. मग उतार आहे.अमरगंगेच्या छोट्यापुलावर पोहोचलो,तिथे भुधर वकिलाना उलटी झाली,चक्कर येऊ लागली,त्याना बसवून पाणी,गोळ्या दिल्या,थोडावेळ थांबुन मग तंबू शोधायला लागलो,घोड्यावरुन येणार्‍यानी तम्बू घेऊन त्यावर गिरिशच्या नावाचे बॅनर लावलेले होते. संध्याकाळचे सहा वाजले होते.सॅक ठेवून पिठ्ठूला पैसे देऊन लगेच दर्शनाला गेलो.१००/१२५ पायर्‍या आहेत गुफेला.कॅमेरा न्यायला परवानगी होती फक्त त्यातील सेल काढून टाकावे लागतत कारण फ्लॅश पडता कामा नये.बम बम भोले,जय जय बाबबर्फानी,असा जयघोष चाललेला होता.अथावकाश गुफेत पोहोचलो.पायात मोज्यांवर प्लास्टिकची पिशवी घालुन रबरबँड लावला होता तरिही पायाना बर्फाचा गारवा चावत होता.गुफेत रेलिंगवर शिवसेनेच्या आनंददिघे यांचे बॅनर शिव भक्तांचे सहर्ष स्वागत करत होते.बाबा बर्फानींच्या समीप पोहोचलो,दहा फूट बर्फाची शिवपिंडी पाहुन जीवन धन्य झाले.मला प्रसादाबरोबर एक रुद्राक्ष मिळाला,पुजारी पंडीतजिनी डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद दिला.पार्वतीमाता व गणेश यांचे विग्रह मात्र अंतर्धान पावलेले होते तिथे फक्त बर्फाचा ओटा राहिला होता.अमरगंगेचे दर्शन घेतले.यात्रा सफल झाली होती.पण त्यावेळी माहीत नव्हते की आता बाबा आम्हाला दरवर्षी बोलावणार आहेत.भंडार्‍यात मुगाच्या डाळीचे स्वादिष्ट चिले खाल्ले.रात्री गरम गरम दुध घेतले.आता विश्रांती.
पहाटेपासुन जोरदार पावसाला सुरवात झाली,वाटले आज इथेच मुक्काम करावालागणार,पण सकाळी वातावरण निवळले,सात वाजता बालतल साठी रवाना झालो.संगम बर्डीमार्ग पर्यंत नीट आलो पण पुढे जाम लागला जवळजवळ ४५मिनिटे एका डोंगराच्या आधाराने एकाच जागी उभे होतो.नंतर त्यातुनच वाट काढत भरभर खाली उतरून २-३०वाजता बालतलला पोहोचलो.गोखलेना घेतले,विशाल भंडार्‍यात भोजनप्रसाद घेतला.दुपारी चारचे गेट सापडणे गरजेचे होते म्हणून लगेच गाड्यांत बसलो.निसर्गाच्या दिव्य सौंदर्याचा पुन्हःप्रत्यय घेत रात्री आठ वाजता श्रीनगर गाठले.

क्रमशः

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

20 Sep 2014 - 10:26 pm | कवितानागेश

किती छान. :)

यशोधरा's picture

15 Jun 2016 - 5:12 am | यशोधरा

हे लिखाण अर्धवट का सोडले? लिहा ना पुढे.

प्रीत-मोहर's picture

15 Jun 2016 - 10:03 am | प्रीत-मोहर

खुप मस्त लिहिलय खुशिताई

मीउमेश's picture

15 Jun 2016 - 5:35 pm | मीउमेश

ख़ुशी ताई नमस्कार,

तुमच्या बरोबरची हि दुसरी तीर्थयात्रा , पहिली नर्मदा परिक्रमा आणि आता भोलेबाबा अमरनाथ

पद्मावति's picture

15 Jun 2016 - 5:39 pm | पद्मावति

खूपच मस्तं!!