सखे तुझ्या कवितेत...

अनाम's picture
अनाम in जे न देखे रवी...
30 Aug 2014 - 7:32 am

सखे,
तुझ्या कवितेत छान वर्णन असतं,
आभाळाचं, पावसाचं, गर्द झाडीचं,
पानाफुलांचं, भविष्याच्या स्वप्नाचं.
शब्दाशब्दातून पाऊस पडत असतो,
आणि दुर डोंगरावर रंगतही असतात,
शब्दांची रानंफुलं.

झाडांच्या पानाआड बसुन
जमीनीतून उमलणा-या रोपाशी खेळत
म्हणते-
उमलू दे रे तुझा जीव
फुलु दे तुझं मन,
झुरु दे रे हृदय,
साठवू दे तुला,
पानापानातुन निथळणा-या
चुकार थेंबांचा.. एक दीर्घ श्वास.

मैत्रीणीच्या घरातले 'बापू' आठवतात,
'असतात रे प्रत्यकाच्या श्रद्धा'
आपण पाहतो त्यात जगण्यातले संदर्भ
हरवलेले, गवसलेले आणि शोधतो,
त्या रंगलेल्या 'फ्रेम'चा अर्थ
कवितेत उगाच घुसलेल्या बिनअर्थाचे
शब्द आणि शब्द.

काल संवाद क्षणभर थांबला
उघडलेल्या पावसासारखा,
आणि नुसती ओल आणि चिखल मनभर.
मी अस्वस्थ,सैरभैर तुझ्या कवितेत,
तु माझ्या मिठीत शांत विसावलेली असते,
समोर काळापाषाण,
यातलं काहीच वास्तवात नसतं.
आणि मी जळत असतो भर पावसात.

काळ आम्हाला आठवत नाही.
उद्यावर माझा भरवसा नाही.
'वादे-कसमे बाते है बातो का क्या'
अन, पावसाचा अबोला सहन होत नाही.
नसलेला पाऊस नुसता धुसमळत असतो
मनातील कासावीस,तडफड
पोहचत नाही...

अन सखे,
तुझ्या कवितेत छान वर्णन असतं
आभाळाचं, पावसाचं, गर्द झाडीचं,
तुझं आणि माझंही......!

कविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

30 Aug 2014 - 8:39 pm | प्रचेतस

क्या बात है...!

हा आयडी कधीतरीच उगवतो आणि छान कविता लिहून जातो.

पैसा's picture

30 Aug 2014 - 10:02 pm | पैसा

मस्त! नेहमी लिहा अशा अस्वस्थ कविता!

कवितानागेश's picture

30 Aug 2014 - 11:11 pm | कवितानागेश

आहा!! :)