लहानपणापासून घरात जाडं मीठ पहात आल्यामुळे, लग्नानंतरहि स्वयंपाकात तेच मी वापरू लागले. माझ्या लहानपणी वाण्याकडे जाड्या व बारीक मीठाची अशी दोन पोती असायची. नंतर 'आयोडीनयुक्त' ,सर सर असं पडणारं बारीक मीठ पिशव्यांतून मिळू लागलं आणि पोत्यांत ठेवलेलं बारीक मीठ दिसेनासं झालं.अजुन जाडं मीठ मात्र , पिशव्यांतूनच, मिळतं.मी अजुनहि स्वयंपाकात, शक्य असेल तेथे जाडं मीठच वापरते. मला वाटतं ह्या जाड्या मीठाचा वापर हल्ली कमी झालाय. बर्याच जणांना जाडं मीठ म्हणजे काय हेच माहित नाही. माझ्या मुलीला, १९९९च्या सुमारास Microbiology हा विषय शिकताना,बहुधा भेसळ ओळखण्यासंदर्भात, कॉलेजात जाडं मीठ न्यायचे होते.वर्गात कोणालाहि ते कसे असते हे माहित नव्हते.म्हणून तिने ते घरून नेले, इतरांना दाखवले व वाण्याकडे मिळते ही बहुमोल माहिती त्यांना दिली. मला वाटतं की स्वयंपाकात जाड्या मीठाचा वापर व्हावयास हवा.ते नैसर्गिक स्वरूपात असतं.Branded बारीक मीठ प्रक्रीया केलेलं असल्यामुळे त्यातील रसायनांमुळे ते तब्येतीस हानीकारक असते असे मला वाटते.दुकानांतहि आता दळून बारीक केलेलं मीठ मिळत नाही. म्हणून मी शक्यतोवर जाडंच मीठ वापरते. तुम्हाला काय वाटतं? माझा समज चुकीचा असेल तर तो सुधारावा.
प्रतिक्रिया
14 Aug 2014 - 2:10 pm | सुनील
जाडे मीठ घातलेल्या पाकृंची चव वेगळीच (चांगल्या अर्थाने!) लागते, हे अनुभवाने सांगू शकतो.
14 Aug 2014 - 2:24 pm | गवि
दादरप येथील श्रीकृष्ण बटाटवडा जाड्यामिठाच्या वापराने बनवतात किंवा किमान त्यात जाडेमीठ दाताखाली लागते इतके नक्की. त्यामुळे खरोखर चांगली चव येते.
बाकी आयोडिनची कमतरता होऊ नये म्हणून सर्वाधिक सामान्यपणे खाल्ल्या जाणार्या पदार्थात आयोडीन मिसळण्याच्या पद्धतीला जाड्या मिठाने अडसर होत असेल तर ते वाईटच.
एकूणच पदार्थ नीट पॅक केलेले अधिक चांगले असे (त्या पदार्थांचा प्रथमपासूनचा प्रवास दृष्टीआड असल्याने) मत झालेले आहे. पोत्यातले जिन्नस बहुतांशी उघडे असतात.. उघड्या पोत्यातल्या धान्यावर चिमण्या, त्यांची शीट, पोरकिडे, हवेतली धूळ कचरा, आणि इतर अनेक गोष्टी येतात.
खडेमिठाचं पोतं हे सर्वात उपेक्षित अवस्थेत ठेवलेलं असतं. बिनपावसाच्या दिवसांत मिठाची उघड्या तोंडाची पोती चक्क दुकानाबाहेरच्या भिंतीला टेकून किंवा रस्त्याकडेला ठेवलेली मी अनेकदा पाहिली आहेत. त्यावर येणारेजाणारे श्वान मुक्तपादे जलसिंचन करताना पाहून तेव्हापासून जाडेमीठ विकत आणण्याची इच्छा मेली आहे.
14 Aug 2014 - 3:21 pm | प्रभाकर पेठकर
>>>> त्यावर येणारेजाणारे श्वान मुक्तपादे जलसिंचन करताना पाहून.......
अरे बापरे! गवि म्हणताहेत त्या अर्थी नक्कीच त्यांनी कुठेतरी पाहिले असावे. पण ही घटना प्रातिनिधिक मानता येणार नाही. बाहेर ठेवलेल्या उघड्या पोत्यातील मीठावर (आणि इतर धान्यावर) कोणी पक्षी-प्राणी येवू/बसू नयेत म्हणून वाण्याचे कामगार दक्ष असतात. लगेच दांडकं घेऊन धावतात. २-४ वेळा असे घडले की क्षेत्रातील प्राण्यांना/पक्षांना दहशत बसते. ते पुन्हा तिथे फिरकत नाही. रात्रीच्या वेळी पोतं बाहेरच असलं तरी त्याचं तोंड बंद करून वर वजन ठेवण्यात येतं. इतर धान्याची पोती दुकानात आंतमध्ये घेतली जातात.
14 Aug 2014 - 5:15 pm | सूड
गविंचा प्रतिसाद तिसर्यांदा नवीन म्हणून टॅग झालाय. दया कुछ तो गडबड हय !!
14 Aug 2014 - 5:17 pm | गवि
बटाटवड्याच्या पश्चिमेची चुकीने पूर्व झाल्याने संपादकांना विनंती करोन प्रतिसाद दुरुस्त केला.
14 Aug 2014 - 6:00 pm | अनुप ढेरे
तुम्ही स्वतः संपादक आहात ना? का डीमोशन झालं?
14 Aug 2014 - 9:38 pm | स्पंदना
अहो त्यांनी स्वतःलाच विनंती केली. ;)
14 Aug 2014 - 2:34 pm | आदूबाळ
यानिमित्ताने विचारून घेतो:
"मिठाची आमली" हा काय प्रकार असतो? कोकणाच्या पार्श्वभूमीवरच्या कथा कादंबर्यांत याचा उल्लेख वाचला आहे. म्हणजे मीठ घातलेली भाताची पेज का?
14 Aug 2014 - 10:02 pm | पैसा
लहान अख्ख्या कैर्या किंवा कैर्यांचे पातळ उभे काप मीठ घालून मुरत ठेवतात. कितीही गरीब घरात पेजेबरोबर तोंडी लावायला या आमल्या तरी नक्कीच असतात. आमली म्हणजे लहान कैरी.
14 Aug 2014 - 10:20 pm | पिवळा डांबिस
आणि अगदी गरीब घरात असंच नाही पण चांगल्या घरातही पावसाळ्याच्या दिवसांत मासळी मिळत नसल्याने तोंडी लावायला आमली वापरली जाते (पूर्वी जायची, सध्याचं माहिती नाही!) एप्रिल/मे महिन्यात झाडांवरून खाली पडणार्या छोट्या कैर्यांचा सदुपयोग! कधीकधी अंबाडीची हिरवी फळेही अशीच मिठात मुरवून पेजेबरोबर वापरतात (त्यालाही आमली असंच म्हणतात)
15 Aug 2014 - 2:17 am | कंजूस
आमटे/अंबाडे लहान चिकू एवढे असतात आणि त्यांचा आंबटपणा एकसारखा असतो .तसे कैऱ्यांचे नसते त्या आंब्याच्या जातींप्रमाणे कमी जास्ती आंबट असतात .जानेवारी महिन्यात अंबाडे झाडावरून खाली पडतात त्यावेळी झाडाला पाने नसतात फक्त फिकट हिरवे अंबाडेच असतात .हे अंबाडे बरणीत भरून खडे मिठाने झाकले की काही दिवसांनी पाणी सुटून त्यात ते मुरतात .ब्रान्डेड मिठाला पाणी लवकर सुटत नाही .त्यावर तशी प्रक्रियाच केलेली असते .लोणची वगैरे खारवण्याच्या उद्योगात खडे मीठ आपल्या खारेपणाला जागते असं म्हणता येईल
14 Aug 2014 - 2:44 pm | प्रभाकर पेठकर
माझ्या लहानपणी बहुतेक वाणसामान मसजिद बंदर इथून आणलं जायचं. माझे वडील आणायचे. कधी कधी मला बरोबर न्यायचे. (हाय! ते मस्जिद बंदर स्थानकावरचे मुगाचे वडे {http://www.misalpav.com/node/2275{}).
जाडे मीठ आमच्या नाक्यावरच्या वाण्याकडून आणले जायचे. ते पाट्यावर वाटून बारीक करणे (जेवताना ताटात घेण्यासाठी) हे काम माझ्याकडे असायचे. जाडे मीठ पाट्यावर वरवंट्याने वाटून बारीक करणे हे माझे काम असायचे.
आयोडिन युक्त मीठ हे मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असते. (पण म्हणून, जाहिरातीत दाखविल्याप्रमाणे, नुसते आयोडिन युक्त मीठ खाऊन कोणी 'कलेक्टर' वगैरे होत नाही). ते आपल्याला समुद्र वनस्पती, मासे ह्यातून मिळतेच पण चीझ, गाईचे दूध, अंडी, आईस्क्रिम, आयोडीनयुक्त मीठ, कवचयुक्त मासे, सोया दूध, सोया सॉस आणि दही ह्या पदार्थांमधूनही नैसर्गिकरित्या मिळते. डोंगराळ भागात जमिनीत आयोडीनचे प्रमाण कमी असते त्यामुळे तेथे स्थित माणसांमध्ये आयोडीन कमतरता भासते. ती वरील पदार्थांच्या सेवनाने भरून येते.
>>>>मला वाटतं की स्वयंपाकात जाड्या मीठाचा वापर व्हावयास हवा.ते नैसर्गिक स्वरूपात असतं.Branded बारीक मीठ प्रक्रीया केलेलं असल्यामुळे त्यातील रसायनांमुळे ते तब्येतीस हानीकारक असते असे मला वाटते.
जाड्या मीठात तयार बारीक मीठापेक्षा कांही पोषक द्रव्ये जास्त असतात त्यामुळे त्याची चव बारीक मीठापेक्षा जास्त चांगली असते. बाकी कांही फरक नाही. पण शरीराला आवश्यक तेव्हढे आयोडीन त्यातुन मिळेलच असे नाही. वरच्या यादीतील सर्व पदार्थ प्रत्येकाच्या रोजच्या सेवनात असतीलच असे नाही. त्यामुळे शारीराची आयोडीनची गरज सहजरित्या भागविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे 'आयोडीन युक्त' तयार, बारीक मीठाचा वापर. मीठातील आयोडीनचा उपयोग मेंदूच्या वाढीसाठी होत असला तरी कुठल्याही मीठाचे सेवन प्रमाणाबाहेर होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी.
18 Aug 2014 - 1:47 pm | प्रभाकर पेठकर
वरील प्रतिसादात दिलेली जोडणी (लिंक) जरा (एका अंकाने) चुकली आहे ती http://www.misalpav.com/node/22756 अशी वाचावी, ही विनंती. (मुळ जोडणी दुरुस्त करण्याची संपादक मंडळाला विनंती आहे.)
14 Aug 2014 - 2:53 pm | अनिता ठाकूर
जाडं मीठ आता वाण्याकडे बंद पिशवितहि मिळतं. बाकी दृष्टीआड सृष्टी! 'मिठाची आमली'... माहित नाही! हे नावहि कधी कानावर आले नाही.
14 Aug 2014 - 3:03 pm | कंजूस
जाडे मीठ उपेक्षित नाही .त्यामागची भावना समजून घ्यावी .वाणी मीठ विकतांना त्या बाहेर ठेवलेल्या पोत्यातले देत नाहीत .ज्याला मीठसुध्दा मागावे लागते तो फारच गरीब समजला जातो तो जर रात्री अपरात्री आलाच तर मीठ न मिळता परत जाऊ नये यासाठी एक पोतेभर मीठ दुकानाबाहेर ठेवण्याची प्रथा आहे .शिवाय पूर्वी गोसावी ,वगैरे पायी फिरत असत ते कोणताही अन्नपदार्थ झोळीत साठवत नसत .तेही घेत .
खडे मीठ समुद्राकाठच्या मिठागरात तयार होते .यात थोडे मग्नेशिअमही असते .अत्यल्प प्रमाणात आयोडिन असते .ते उपयोगी आहे .गुजरातकडे काही खाणीत आणि तिबेटच्या काही नद्यांतल्या मिठात हे दोन्ही नसतात .त्यांना गऴयाच्या गाठी सुजण्याचा रोग होऊ शकतो .
हल्ली पैकबंद मिठात आयोडिन घालतात आणि त्यावर पिष्टमय पदार्थाचे लुकण चढवतात त्यामुळे पाणी सुटत नाही .
14 Aug 2014 - 3:07 pm | गवि
ज्याला मीठसुध्दा मागावे लागते तो फारच गरीब समजला जातो तो जर रात्री अपरात्री आलाच तर मीठ न मिळता परत जाऊ नये यासाठी एक पोतेभर मीठ दुकानाबाहेर ठेवण्याची प्रथा आहे .
ओहो.. हृद्य प्रथा. हे माहीत नव्हतं म्हणून तसा गैरसमज झाला होता. (मीठ हा तुलनेत स्वस्त पदार्थ असल्याने जागा कमी पडल्यावर त्याला बाहेर ठेवणे आणि धान्य तेल वगैरे आत ठेवणे इ.)
माहितीबद्दल धन्यवाद.
14 Aug 2014 - 3:25 pm | प्रभाकर पेठकर
>>>>मीठ हा तुलनेत स्वस्त पदार्थ असल्याने....
हा मुद्दाही असतोच. मीठ जेवणात अत्यल्प लागत असल्याने आणि स्वस्त असल्याकारणाने कोणी मीठाची चोरी करायचा प्रयत्न करीत नाही.
14 Aug 2014 - 9:42 pm | स्पंदना
खरच? वॉव!
14 Aug 2014 - 4:20 pm | कंजूस
मिठाला पारका झाला म्हाणजे खूपच गरीबी आली .वाण्याच्य पोत्यातले मीठ उचलावे लागते ही चोरी नाही .वाण्यासमोरच उचलले तरी तो काही बोलणार नाही उलट त्याला बोलवून मापटंभर तांदूळ डाळवगैरे त्याला देईल .असो .
14 Aug 2014 - 5:05 pm | प्यारे१
हे अजिबातच माहिती नव्हतं. आभारी आहे.
14 Aug 2014 - 5:02 pm | बहुगुणी
जाडे (खडे) मीठात सोडियम क्लोराईड व्यतिरिक्त मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड हे क्षार तसेच मॅग्नेशियम सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट हेही क्षार असतात. अतिरिक्त खारटपणा (आणि थोडासा कडवटपणाही) या क्षारांनी येतो. तसंच या मीठाचं हवेतला ओलावा शोषून घेणंही वाढतं (हाय्ग्रोस्कोपिक).
14 Aug 2014 - 6:00 pm | एसमाळी
काही वर्षापुर्वी माझ्या आईचे थॉयरोईडचे ऑपरेशन झाले तेंव्हा डॉक ने कारण सांगितले. जुनी लोक खडी मीठ खात त्यात आयोडीन नसल्यामुळे असे आजार संभवतात.
14 Aug 2014 - 6:34 pm | लक्ष्या
मी ब्रश नतर मीठाच्या पान्यानी गुळ्न्या करतो त्या साठी खडी मीठ वापरतो. दातासाठी चागले आसते.
14 Aug 2014 - 7:26 pm | राही
जाडे मीठ मिठागरांमध्ये मानवी श्रमांद्वारे तयार होते. त्यावर फारशी किंवा कोणतीही प्रक्रिया होत नाही. आजकाल मानवी वस्तीलगतचा किनारा फारच प्रदूषित असतो. भांडूपच्या पूर्वेला अजूनही मिठागरे आहेत, ती पहावी. दूर मोरवी, मांडवी वगैरे ठिकाणी प्रदूषण कदाचित कमी असेल पण अजिबात नसेल असे नाही. यास्तव रीफाइन्ड मीठ खाणे योग्य असावे असे वाटते.
14 Aug 2014 - 10:17 pm | सुहास..
खडे मीठ ...काळे मीठ !! आयोडिन ई. ई. ...ते काही का असेना ...खड्या वा काळ्या मिठाला चव वेगळी आणि छान असते ......मी आठवड्यातुन एकदा , जेव्हा बाजरी च्या भाकरीच जेवण असते ...आवर्जुन टाकतो :)
गळ्याला अजुन कसलाही त्रास नाही ...
असो ..आ.बा. आमल्या फकत कोकणात नाही तर मराठवाड्याकडे ही बनवितात , विषेश म्हणजे आम्ही त्यात लाल मिरच्यांचा ठेचा ही टाकतो :)
15 Aug 2014 - 1:40 am | कंजूस
आता वारीच्या निमित्ताने वारकरी झाडाखाली जेवण कसे करतात ते टिव्हीवर दाखवले .भाकऱ्या करून झाल्यावर त्याच तव्यावर तेल टाकून बचकाभर हिरव्या मिरच्या परतल्या आणि नंतर खडे मीठ घालून वाटल्या .झाला खरडा तयार आणि भाकरी .हे खाऊन पंचवीस किमी चालायला वारकरी तयार !
18 Aug 2014 - 12:15 pm | अनिता ठाकूर
जाड्या मीठाचा वापर होत रहावा,तो पूर्ण थांबू नये एव्हढच मला वाटतं.