मुगाच्या डाळीचे वडे.

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in पाककृती
16 Sep 2012 - 3:15 pm

Mugache-Vade

साहित्यः

मुगाची बिनसालाची डाळ १ वाटी
आलं २ इंच
हिरव्या मिरच्या ३ नग
कोथिंबीर अर्धी वाटी
हळद १/२ लहान चमचा (टी स्पून)
जीरं १ लहान चमचा
खायचा सोडा १/२ लहान चमचा (थोडा कमी घातला तरी चालेल पण जास्त अजिबात नको.)
मीठ चवीनुसार
तेल तळणीसाठी

तयारी:

मुगाची डाळ भरपूर पाण्यात ५-६ तास भिजत घाला. नंतर पूर्ण निथळवून, मिक्सरमधून, पाणी न घालता भरडसर वाटून घ्या.
आलं, मिरच्या खलबत्यात कुटून घ्या. खलबत्ता नसल्यास मिक्सरमधून वाटून घ्या.
कोथिंबीर बारीक चिरुन घ्या.
मुगाची वाटलेली डाळ, आलं-मिरच्यांचा ठेचा, कोथिंबीर, हळद, जीरं आणि मीठ सर्व मिसळून घ्या.
तेल मध्यम आंचेवर तापायला ठेवा.

कृती:

तेल मस्त तापले की मुगाच्या डाळीत खायचा सोडा घालून हाताने भरपूर फेटून घ्या आणि लगेच तापलेल्या तेलात लिंबाच्या आकारापेक्षा थोडे लहान असे गोल वडे हातानेच (किंवा लहान चमच्याने) सोडा.

वडे सोनेरी रंगावर तळून घ्या.

चिंचेच्या चटणी बरोबर खायला द्या.

शुभेच्छा....!

प्रतिक्रिया

ज्ञानराम's picture

16 Sep 2012 - 3:36 pm | ज्ञानराम

माझी आई बनवते , पण त्यात ती चण्याची डाळ पण घालते.
चण्याच्या डाळीमुळे भजी कुरकुरीत लागतात...
आवडीची पाक्रु.

हिरव्या मिरचीची चटणी पण मस्त लागते याबरोबर....

सुर's picture

17 Sep 2012 - 11:12 am | सुर

काळी मिरी ची भरड पण त्यात घातली तर चांगली लागते.

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2012 - 12:28 pm | प्रभाकर पेठकर

होय. पण काळीमिरीची भरड मुख्यत्वे 'गोटे' प्रकारात घालतात. दोन वड्यांमधील वेगळे पण टिकविण्यासाठी मुगाच्या वड्यांमधे काळीमिरी भरड टाळलेली बरी. ही सुद्धा गुजराथी पाककृती आहे.

बडोदे आणि अहमदाबाद स्थानकां दरम्यान कुठे तरी 'आणंद' हे गाव लागते. ('अमूल' डेरी आहे वाटतं तिथे) तिथे हे 'गोटे' આણંદ ના ગોટા नांवानेच प्रसिद्ध आहेत. कर्जतला जसे बटाटे वडे मस्त मिळतात/मिळायचे तसेच आणंदच्या रेल्वे स्थानकावर मिळणारे 'गोटे' प्रसिद्ध आहेत. हे गोटे बारीक रव्याचे बनतात. बनविताना त्यात दूध घालतात ज्या योगे ते हलके होतात.

गणपा's picture

16 Sep 2012 - 3:37 pm | गणपा

चला आता मुगाची डाळ भिजत घालणे आले. :)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Sep 2012 - 3:38 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआ..............

अभ्या..'s picture

16 Sep 2012 - 4:36 pm | अभ्या..

पेठकर काका
एकदम सोपी पाकृ घरगुती पध्दतीने दिलीत.
सोलापुरात चपटे वडे करतात आणि वरून लाल होईपर्यंत तळतात. वरून कोरडा मसाला टाकून खातात.

किती मस्त फोटू. अनेक वर्षात हे वडे खाल्ले नाहीत.

यशोधरा's picture

16 Sep 2012 - 6:58 pm | यशोधरा

झकास!

पैसा's picture

16 Sep 2012 - 7:19 pm | पैसा

वड्यांचा रंग अप्रतिम आलाय. गेली २ वर्षे एका राजकारणातल्या मिपाकराने मूगडाळीच्या वड्यांची पाकृ देतो अशी आश्वासने दिली होती. त्या लालचीने मी एक कविता सुद्धा करून दाखवली पण पाकृ नाहीच मिळाली. पेठकर काका पाकृसाठी खूप धन्यवाद!

५० फक्त's picture

17 Sep 2012 - 10:06 am | ५० फक्त

राजकारणी साहित्यिक माहित होते, राजकारणी मिपाकर कोण ओ पैसातै ? मुलाखत वगैरे देतात काय कुठल्या छ्यानलवर.

जाई.'s picture

16 Sep 2012 - 8:02 pm | जाई.

सुपर्ब

कौशी's picture

16 Sep 2012 - 8:42 pm | कौशी

खुप सोपी आहे रेसिपी..करून बघेल.

खडीसाखर's picture

16 Sep 2012 - 9:25 pm | खडीसाखर

आजच सकाळी केले होते..मला कढीसोबत खायला फार आवडतात हे वडे.

खडीसाखर's picture

16 Sep 2012 - 9:33 pm | खडीसाखर

आजच सकाळी केले होते..मला कढीसोबत खायला फार आवडतात हे वडे.

ज्योति प्रकाश's picture

16 Sep 2012 - 11:30 pm | ज्योति प्रकाश

छानच लगेच खावेशे वाटतात.तोंपासु.

करायला एकदम सोपे आणि खायला तर त्याहूनही सोपे.. :)

इरसाल's picture

17 Sep 2012 - 10:00 am | इरसाल

काका का मिपाकरांच्या " जी" वावार उठला आहात ?

बाकी गुजरातेत असल्याने जवळ्पास आठवड्यात एकदा या हिशोबाने हापिसात पण हादडत असतो. ते ही कढी सोबत.

जैसे ही वेळ मिळ्या की फटु डालताच मय !

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2012 - 10:34 am | प्रभाकर पेठकर

होय. कढी पेक्षा मीठ घातलेल्या ताकात भिजत ठेवून ताकाला हिंग+जीरं+कढीलिंब अशी फोडणी द्यायची वरून कोथिंबीर भुरभुरायची. असेही हे वडे खायची पद्धत आहे.

पियुशा's picture

17 Sep 2012 - 10:14 am | पियुशा

यम्मी ........... करेन लवकरच :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2012 - 10:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल करण्यात आले. पण ते मुगाच्या वड्यापेक्षा मुगाच्या भज्यांच्या अंगाने गेले. पण चांगले लागले. :)
अशा सोप्या सोप्या पाकृत्या दिल्या तर करायला बर्‍या पडतात. आभार.

-दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2012 - 10:48 am | प्रभाकर पेठकर

अगदी सहमत. आकार पाहता आपण त्याला 'भजी'च म्हणू.

पण, हा गुजराथी पदार्थ आहे (असे मला वाटते) आणि गुजराथीत ह्याला મગના ડાલના વડા असे म्हणतात म्हणून मराठी भाषांतर मुगाच्या डाळीचे वडे.

नंदन's picture

17 Sep 2012 - 12:55 pm | नंदन

छान पाककृती. बोरिवली पश्चिमेला जया टॉकीजलगतच्या गोयल शॉपिंग सेंटरमध्ये एका लहानशा गल्लीत हे मूगवडे (आणि कच्छी दाबेली) मिळतात, त्यांच्या आठवणीने जीभ खवळली.

सानिकास्वप्निल's picture

17 Sep 2012 - 7:20 pm | सानिकास्वप्निल

छानच दिसत आहे
करून बघायला हवे :)

मदनबाण's picture

17 Sep 2012 - 7:23 pm | मदनबाण

वाह ! :)

कच्ची कैरी's picture

17 Sep 2012 - 7:36 pm | कच्ची कैरी

वाह्ह !!! तोंडाला पाणी सुटले :)

प्यारे१'s picture

17 Sep 2012 - 8:39 pm | प्यारे१

भन्नाट.

पिवळा डांबिस's picture

17 Sep 2012 - 11:39 pm | पिवळा डांबिस

मूगवडे/ भजी मस्त दिसताहेत.
पिवळा डांबिस जर गणपा असता तर नक्की 'करून बघीन' म्हणाला असता!!!
:)
फार वर्षांपूर्वी ठाण्यात घंटाळीमध्ये श्रद्धा नांवाचं चाकटमाकट खाण्याचं एक छोटंसं दुकान होतं. तिथे पंजाबी समोसा खायला नियमित जायचो. कारण तिथला पंजाबी समोसा करणारा पूर्वी ठाण्याच्या खंडेलवाल मध्ये ते प्रसिद्ध समोसे करत असे. मग खंडेलवालमध्ये संप की काहीतरी झाल्यानंतर तो इथे श्रद्धाकडे आला होता...
तर एके दिवशी समोसा ऑर्डर केल्यावर त्याने, 'साहेब हा एक नवीन पदार्थ बनवला आहे, चव घेऊन कसा आहे ते सांगा." असं म्हणून ही मूगभजी दिली. सोबत तीच चिंचेची आंबटगोड चटणी!
आम्ही मत काय देणार? दुसरे दिवसापासून समोश्याच्या आधी ही भजी हादडणं सुरू झालं, आधीच तुटपुंज्या असलेल्या पॉकेटमनीमध्ये आणखी खर्च वाढला!!!!!
:)

स्वाती दिनेश's picture

3 Oct 2012 - 3:22 pm | स्वाती दिनेश

अजून आहे ते दुकान तेथेच, :)
स्वाती

शिल्पा ब's picture

3 Oct 2012 - 9:29 pm | शिल्पा ब

मी मुगडाळ, उडीद डाळ अन थोडी चना डाळ मिक्स करुन त्याचे वडे करण्याऐवजी डोसा किंवा आंबोळीसारखं करते. तेलकट आताशा सोसवत नै !

कवितानागेश's picture

5 Oct 2012 - 6:40 pm | कवितानागेश

मी वडेच करणार होते. पण डाळ वाटल्यावर पाणी जास्त झाले त्यात. :(
मग मुकाट्यानी धिरडी घातली.
त्यात कान्द्याची पात आणि मिरी घातली होती. मस्त लागली चवीला.
त्याची बिनाअम्ड्याचे आम्लेट (पौराणिक) अशी पाक्रु टाकावी का, विचार करतेय. ;)

प्रभाकर पेठकर's picture

5 Oct 2012 - 8:14 pm | प्रभाकर पेठकर

पेनिसिलीन आणि एक्स रे चा शोधही अपघातानेच लागला होता. हतोत्साहित होऊ नये.

स्मिता.'s picture

4 Oct 2012 - 10:42 pm | स्मिता.

मूगडाळीचे भजे, वडे सगळं खूप आवडतं त्यामुळे ही पाकृ करणारच.

मोहनराव's picture

5 Oct 2012 - 1:56 pm | मोहनराव

मस्त आहे पाकृ.