घोडा का अड(क)ला?

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
30 Jul 2014 - 3:54 pm

लेवॉन अरोनिअन आणि आनंद यांच्यातल्या डावांचं स्टॅटिस्टिक्स अरोनिअनच्या बाजूने आहे (६-२) पण आनंदने त्याला हरवलेले जे डाव आहेत ते दोन्ही अफलातून आहेत.
२०१३ सालच्या विक अ‍ॅन झी स्पर्धेतल्या डावाबद्दल मी उंटांची चालच तिरकी! हे रसग्रहण लिहिले होते. तो डाव भन्नाटच होता म्हणजे त्यातली काँबिनेशन्स अशी काही तुफान जमवली होती आनंदने की काही विचारता सोय नाही. मॅग्नुस कार्लसन सुद्धा अवाक झाला होता तो डाव बघून!

या वर्षीच्या कँडिडेट स्पर्धेत आनंद जिंकला आणि कार्लसनचा आव्हानवीर म्हणून आता तो नोवेंबरमध्ये खेळेल. खरंतर स्पर्धा सुरु होण्यापूर्वी अरोनिअनकडे संभाव्य विजेता आणि कार्लसनचा आव्हानवीर म्हणून बघितलं जात होतं परंतु स्पर्धेतल्या पहिल्याच फेरीत आनंदने त्याला जो दणका दिलाय त्यातून तो सावरलाच नाही आणि शेवटी बिचारा सहाव्या क्रमांकावर घसरला! (या स्पर्धेत खेळायचं की नाही अशा द्विधा अवस्थेत आनंद होता परंतु क्रामनिकनं त्याला मैत्रीपूर्ण सल्ला देऊन खेळ असे सांगितले आणि आनंद जिंकला, क्रामनिक स्वतः या स्पर्धेत तिसरा आला! मित्र असावेत तर असे!! ;) विनोदाचा भाग सोडा, पण क्रामनिक खरंच जंटलमन आहे. त्याच्या आणि कास्पारोवच्या जगज्जेतेपदाबद्दल लिहायचं आहे कधीतरी.)

1

चला डाव बघूयात.

आनंद पांढर्‍या मोहोर्‍यांनी खेळतोय. रॉय लोपेझ प्रकाराने डावाची सुरुवात.
1. e4 e5 2. Nf3 Nc6 3. Bb5 a6 4. Ba4 Nf6 5. O-O Be7 6. Re1 b5 7. Bb3 O-O
सातव्या खेळीअखेरीस किल्लेकोट होऊन दोन्ही राजे बंदिस्त होऊन बसले! इथपर्यंत सगळं कॉपीबुक स्टाईल.

8. h3 एफ६ वरचा काळा घोडा जी४ वरती येऊ नये यासाठी ही खेळी. Bb7 अरोनिअन त्याचा उंट मोठ्या कर्णात घेऊन येतो
9. d3 प्याद्यांची फळी उभी करुन ई४ वरच्या प्याद्याला आधार दिला आनंदने, d5 अरोनिअनचे लक्ष्य ई४ वरचे प्यादे आहे, डाव मोकळा करणे त्याला आवश्यक.

10. exd5 Nxd5 प्याद्यांची मारामारी झाली. इथे अरोनिअनने ई५ वरचे प्यादे देऊ केले आहे पांढर्‍या घोड्याने ते प्यादे मारले तर दोन्ही काळी घोडी पुढे सरकून बी४ आणि डी४ अशा घरात येऊन बसतात शिवाय कर्णातला उंट मोकळा होतो. ते प्यादे घेण्याचे आनंद सध्या स्थगित ठेवतो.

11. Nbd2 Qd7 दोघांनी आपापली मोहोरी विकसित करणे सुरु ठेवले. अरोनियनची स्थिती जास्त मोकळी आहे.

12. Nxe5 आनंदने आता ई५ वरचे प्यादे घेतले. Nxe5 अरोनिअनने घोडा घेतला. 13. Rxe5 घोड्यांची मारामारी होऊन हत्ती पटाच्या मध्यात आलाय आनंदचा. डी५ वरचा घोडा Nf6 आता अरोनिअनचा कर्णातला पांढरा उंट एकदम जोरात आला.

14. Re1 Rae8 15. Nf3 Bd6 बाराव्या खेळीत एका प्याद्याचा बळी देऊन अरोनिअनने मोहोर्‍यांच्या स्थितीत वरचष्मा मिळवला आहे. दोन्ही उंट कर्णात बसून राजाकडे रोख धरुन आहेत. दोन्ही हत्तींचा समन्वय होऊन एक हत्ती ई स्तंभात आलाय. त्यामानाने आनंदची मोहोरी बरीचशी मागच्या बाकावरती बसून आहेत!

16. Be3 पुढच्या खेळीत डी४ वरती येणार्‍या प्याद्याला आधार द्यायला उंट पुढे आणला आनंदने, Re7 काळ्याची ई स्तंभात हत्ती दुहेरी करण्यासाठीची खेळी.

17. d4 Rfe8 काळ्याचे हत्ती दुहेरी झाले.

18. c3 पुन्हा एकदा प्याद्यांची तटबंदी उभी केली आनंदने. h6 पांढर्‍याचा ई३ मधला उंट जी५ मधे येऊन त्रासदायक ठरु नये म्हणून अरोनिअनने एच प्यादे सरकवले.

आता अरोनिअनकडे कर्णातले दोन ताकदवान उंट आणि जोडीला स्तंभातले दुहेरी हत्ती आहेत. आनंदकडे एक प्यादे जास्त आहे. गँबिट प्रकारात मोहोर्‍यांचे पोझीशनल अ‍ॅडवांटेज विरुद्ध मटेरिअल अ‍ॅडवांटेज असा सामना असतो. त्याचा तोल आपल्याबाजूने ठेवणे हे कौशल्य. आनंदने विचार केला असावा की मटेरिअल अ‍ॅडवांटेज परत देऊन टाकूयात आणि कर्णातल्या दोन उंटांपैकी एकाचा काटा काढूयात. कारण ते उंट प्रसंगवशात भलतेच आक्रमक होऊ शकतात.

19. Ne5! घोडा उंटासमोर आला मारामारीसाठी. त्याचवेळी काळ्या वजिरावर हल्ला देखील केलाय आनंदने. वजिरासाठी सी८ ही जागा फारशी मोक्याची नाही. तो जर एफ५ असा पुढे घुसला तर आनंद उंट सी२ मधे आणून त्याला परत हुसकावून लावेल. मग वजीर जर ई६ मधे हलवला तर एफ ४ असे प्यादे पुढे सरकवून घोड्याला जोर दिला जातो आणि पटाच्या मध्यातला मोक्याच्या जागेचा घोडा हुसकावून लावणे नंतर कठीण होऊन बसते. शिवाय घोडा डी ५ असा खेळून एफ ६ असे पांढर्‍या घोड्यावर यायचे म्हटले तर वजीर डी३ येतो आणि उंट+वजीर काँबिनेशन एच ७ वर रोख धरते. असा विचार करून अरोनिअनने घोडा मारला Bxe5

20. dxe5 Rxe5 हत्तीने प्यादे मारून अरोनिअनने बाराव्या खेळीत देऊ केलेलं प्यादे परत घेतेले आणि आनंदने काळ्या उंटाचा काटा काढून राजाच्या रोखाने लावलेल्या जोरांपैकी एक जोर निष्प्रभ केला.

21. Qxd7 Nxd7 आनंदने वजिरावजिरी घडवून आणली. आता पांढर्‍या राजाच्या रोखाने बसलेली दोन मोहोरी, काळा उंट आणि वजीर नाहीयेत. हल्ला बोथट झाला. पहिला टप्पा पूर्ण, आता प्रतिहल्ल्याची तयारी!

22. Red1 मोकळ्या डी स्तंभाचा फायदा घेत आनंदने घोड्यावर हल्ला केला. Nf6 घोडा पुन्हा निमूट एफ ६ मध्ये परतला. (घोडा सी५ मधे येऊ शकतो. पण मग Bxc5, Rxc5 अशी मारामारी होऊन पांढर्‍याचा हत्ती Rd7 असा सातव्या पट्टीत घुसतो जी काळ्यासाठी अडचणीची स्थिती आहे.)

घोडा आणि हत्ती यांचा अतिशय कल्पक वापर हे आनंदचे वैशिष्ठ्य आहे. परंतु या डावात त्याने दोन्ही उंटाचा वापरही तितकाच कौशल्याने केला आहे. मोकळ्या पटावर घोड्यापेक्षा उंट जास्त बलवान ठरतात. इथून पुढचा डाव म्हणजे कोणत्याही क्लिष्टतेत न जाता सहजसुंदर, तर्कसुसंगत खेळ्या कशा असाव्यात याचा वस्तुपाठच बघायला मिळतो.

आता पटाचे निरीक्षण केले तर असे दिसेल की वजिराच्या बाजूची जी ३ प्यादी आहेत ए, बी आणि सी स्तंभातली, त्यातून पुढे घुसायचे असेल तर त्यात फूट पाडणे गरजेचे आहे. आनंदला ए४ किंवा सी४ असे खेळावे लागेल. ए४ खेळण्यातला तोटा असा आहे की काळा उंट डी५ असा पांढर्‍या उंटावर हल्ला करुन येतो. a4, Bd5, Bxd5, Nxd5 आणि आनंदच्या काळ्या उंटावर हल्ला होतो. काळ्याकडे ई स्तंभाचा ताबा राहतो, काळा घोडा डावाच्या मध्यात येतो. ही स्थिती आनंदसाठी फारशी उत्साहवर्धक ठरणार नाहीये.
दुसरा पर्याय आहे c4. या खेळीने काळा उंट आणि घोडा डी५ मधे यायला प्रतिबंध होतो. आणि पुढच्या खेळ्या सहाजिकच टळतात.

23. c4 प्याद्याच्या या खेळीने घोड्यासाठी आणि उंटासाठी डी ५ घर बंद केले. c6 बी५ वरच्या प्याद्याला जोर लावला अरोनिअनने.
24. Rac1 मोकळ्या सी स्तंभात हत्ती आणून आनंदने प्याद्याला जोर लावला. R5e7 अरोनिअनने हत्ती मागे नेला.
25. a4 बी ५ वरच्या प्याद्यावर दुहेरी हल्ला bxc4 अरोनिअनने सी४ वरचे प्यादे मारले
26. Bxc4 आनंदने उंटाने प्यादे परत घेतले.

आता काळ्या प्याद्यांची साखळी तुटली आणि ए व सी प्यादी आयसोलेटेड पॉन्स झाली. ती एकमेकाच्या आधाराने सरकू शकत नाहीत कोणीतरी मोहोर्‍याने त्यांना जोर लावत बसावे लागते. फोडा आणि झोडा मधले अर्धे काम झालेय!

Nd5 ई ३ मधल्या उंटावर हल्ला त्यायोगे उंट मारून नंतर हत्तीने ई ३ वरचे प्यादेही मटकावण्याचा काळ्याचा उद्देश.
27. Bc5 उंट मारू द्यायचा नाहीये आनंदला सी ५ मधे येऊन हत्तीवर हल्ला केला त्याच उंटाने. Re4 पांढर्‍या उंटाने जर घोडा मारला तर सी स्तंभातले प्यादे डी स्तंभात येते उंटाच्या जोरावर.

28. f3 उंट हलवला तर ए४ वरचे प्यादे पडते. म्हणून एफ प्यादे पुढे सारून हत्तीला मागे रेटले. R4e5 हत्ती मागे गेला.
29. Kf2! किती बारीकसारीक विचार आहे बघा. पुढे उंटाची मारामारी झाल्यावर इ२ या घरावर हत्तीची नजर आहे राजाने ते घर धरून ठेवले. Bc8 कारण घोडा डी५ मधून हालला तर पांढरा हत्ती डी७ घरात मुसंडी मारु शकतो ते टाळण्यासाठी उंट मागे नेला.

30. Bf1 उंटाची माघार कारण हत्तीला मोकळ्या बी स्तंभात नेणे हा उदेश आहे R5e6

31. Rd3 हत्ती तिसर्‍या पट्टीत आला Nf4 घोडा हत्तीवर घातला काळ्याने.
आनंद तयारच होता 32. Rb3 हत्ती बी स्तंभात आला. Rd8 मोकळ्या डी स्तंभाचा ताबा घेतला काळ्या हत्तीने. शिवाय डी २ मध्ये येऊन राजाला शहाची धमकी सुद्धा आहे.

33. Be3 आनंदचे कौशल्य बघा त्याने उंट मागे घेऊन डी २ घर तर हत्तीला बंद केलेच परंतु घोड्यावर चाल करून त्यालाही हुसकावून लावले! Nd5 घोडा पुन्हा उलटून अंगावर आला.

34. Bd2 आनंदने उंट मागे नेला. Nf6 पुन्हा घोडा एफ ६ मध्ये नेऊन हत्तीचा उंटावर हल्ला. (गंमत बघा घोडा डी५ आणि एफ ६ असाच बराच वेळ घुमत राहिला आहे.)

पुढची खेळी बघा
35. Ba5 उंट असा बसवलाय की डी२ घरावरची नजर तर ढळली नाहीच शिवाय तिथे येऊ बघणार्‍या हत्तीला सुद्धा धमकावले आनंदने. उंटाच्या हालचालींनी अरोनिअन जेरीला आला आहे!
Rde8 हत्ती गेला बिचारा ई स्तंभात परत.

इसी मौकेकी तो तलाश थी!
36. Rb6 घुसला हत्ती बी ६ मधे. आता झोडा मोड सुरु! ए६ आणि सी६ या दोन्ही प्याद्यांवर हत्तीचा हल्ला. सी ८ वरचा उंट केविलवाणा आहे कारण त्याला आठवी पट्टी सोडता येत नाही अन्यथा ए ६ चे प्यादे पडते. Re5 हत्तीने उंटावर हल्ला केला.

37. Bc3 पुन्हा तेच ज्याने हल्ला केलाय त्यालाच परत पाठवणे उंट सी ३ मधून हत्तीवर आला.
आता ए ६ चे प्यादे पडते. कारण त्याच्यावर बी६ मधला हत्ती आणी एफ १ मधला उंट असा डबल हल्ला आहे. अरोनिअन वैतागलाय! ते प्यादं पडलं तर आनंदचे ए४ मधले प्यादे पास्डपॉन होतंय आणि त्याला रोखता येईल की नाही याबद्दल तो संभ्रमात आहे.
Nd5(?) जो होगा देख लेंगे म्हणत अरोनिअनने घोडा हत्तीवर घातला. तू माझा हत्ती मार मी तुझा मारतो. अरोनिअन सापळ्यात अडकला. आनंदला हेच हवं होतं. इथे खरंतर ए ६ वरचं प्यादं जाऊ दिलं असतं तरी चाललं असतं निकराचे प्रयत्न करुन कदाचित डाव बरोबरीत नेता आला असता.

38. Bxe5 Nxb6 एकमेकांचे हत्ती मारले.
39. Bd4 पुन्हा एकदा उंटाने घोड्याला डिवचले! मानसशास्त्रीय दॄष्टीने देखील हे त्रासदायकच आहे. एकच मोहोरे पटाच्या मध्यभागात खेळत राहून आपल्या इतर मोहोर्‍यांना सळोकीपळो करून सोडते याने प्रतिस्पर्ध्याच्या आत्मविश्वासावर परिणाम होतोच!
Nxa4(?) चल मी तुझे ए ४ प्यादे मारतो तू माझे सी ६ प्यादे खा. 40. Rxc6

आता इथे डावातला एक मूलभूत नियम अरोनिअनने पायदळी (किंवा टापांखाली म्हणा! ;) ) तुडवला आहे. घोडा जेव्हा पटाच्या कडेच्या घरात जातो त्यावेळी त्याच्या अंगभूत आठ हालचाली योग्य घरांपैकी किमान ४ घरे तो गमावून बसतो. "Knight on the rim is dim" असं म्हटलं जातं! इथे तेच झालंय, शिवाय बारकाईनं बघितलं तर लक्षात येईल की घोड्याला सुरक्षित जाण्यासाठी एकही ठिकाण आत्ता नाहीये! बी २, बी ६, सी ३ आणि सी ५ चारही घरं उंटाच्या धाकाखाली आहेत. यातून वाट काढण्याची अरोनियनची धडपड सुरु होते आणि दलदलीत फसलेल्या प्राण्याप्रमाणे तो अधिकाधिक खोलात खेचला जातो!

Rd8 उंटावर हत्तीचा हल्ला. आता त्याशिवाय अरोनिअनकडे इलाज नाहीये.

41. Rc4 आनंद हत्तीने उंटाला जोर लावतो आणि त्याचवेळी घोड्यावर हल्ला करतो. ज्याला खेळाचा टेंपो टिकवून धरणे म्हणतात तसा खेळतोय आनंद. एखाच खेळीत दोन उद्देश साध्य केल्याने प्रतिस्पर्ध्याला मुसक्या अवळल्यासारखा फील येतो. त्याला त्याचे डावपेच आखायला किंवा आखलेले अमलात आणायला उसंतच मिळत नाही! (आठवतंय, मगाशी सी ४ वरचा पांढरा उंट मागे नेऊन एफ १ मध्ये बसवला होता आनंदने? त्याचं महत्त्व लक्षात येतंय? अन्यथा हत्ती सी स्तंभात मुक्तपणे फिरु शकला नसता!)

घोड्याला तर हलायला जागाच नाहीये मग उंट मदतीला धाडलान अरोनिअयने Bd7

42. b3! प्याद्याने हल्ला घोड्यावर! Bb5 उंट घोड्याला आधार देत हत्तीवर हल्ला करता झाला. शिवाय काळ्या हत्तीचा पांढर्‍या उंटावर हल्ला झालाय पण आनंदने ही स्थिती मनाच्या पटावर आधीच खेळून बघितली आहे!

43. Rb4 हत्ती हळूच उंटावर सरकतो. ए ५ असे प्यादे सारून हत्तीवर येता येत नाहीकारण उंट बिनजोरी होईल! आता घोडा कुठे जाणार?

Nb2! अरोनिअनचा एक साळसूद सापळा! जर उंटाने घोडा मारला तर हत्ती डी २ शह असा राजाच्या अंगावर येतो आणि उंट पडतो!! आनंद त्याचं बारसं जेवलाय 44. Bxb5 axb5 पांढर्‍या उंटांची मारामारी करतो आनंद.

अत्यंत अचूक कॅलक्यूलेशन्स हा कोणत्याही जगज्जेत्या खेळाडूचा स्थायिभाव असतो. त्याखेरीज चाली रचता येत नाहीतच. पुढल्या राजाच्या खेळ्या अभ्यासण्याजोग्या आहेत.

45. Ke3! राजा इथेच यायला हवा तो जर के ई २ असा आला तर अरोनियन त्याचा घोडा सी ४ असा आणतो मग प्याद्याने घोडा मारला तर आनंदचा हत्ती आणि उंट याच्यामध्ये त्याचेच प्यादे येऊन उंटाचा जोर तुटतो, उंट पडतो आणि डाव बरोबरीत जातो!!

Re8+ हत्तीने शह दिला. 46. Kd2 शह काढला

Rd8 हत्ती पुन्हा उंटावर आणला. 47. Kc3 इथेही पुन्हा तेच राजा जर सी २ मध्ये नेला तर घोडा सी ४ मध्ये सटकतो! आता घोड्याला जागा नाही तो ठाणबंद झालाय, अड(क)लाय!!! अरोनिअनने डाव सोडला. 1-0

या पराभवाचा अरोनिअनने धसका घेतला हे नक्की कारण त्यापुढे तो स्पर्धेत जे डाव हरला ते त्याचा आत्मविश्वास ढासळलेला आहे हे दाखवणारे होते. बिचारा पहिला दुसरा सोडाच सहाव्या स्थानावर घसरला! अर्थात दुसरा आलेला सर्गी कार्याकीन सुद्धा संपूर्ण स्पर्धेत उत्तमच खेळला. खरंतर तो अंडरडॉग समजला गेला होता परंतु एकवेळ अशी आली होती की तोच स्पर्धा जिंकतोय की काय असे वाटत होते.

या डावाचं विश्लेषण करावसं मला का वाटलं? आनंद या डावात थोडासा कार्लसनच्या शैलीने खेळलाय असं मला वाटतं. एकेक अचूक खेळी, कणाकणाने पटाचा आणि स्थितीचा ताबा घेत जाणे, येता जाता केलेल्या हल्ल्यांनी डिवचून डिवचून प्रतिस्पर्ध्याला बेजार करणे, त्याने केलेल्या छोट्या छोट्या चुकांचा फायदा उठवत फास आवळत नेणं आणि कोणत्याही क्लिष्ट स्थितीमध्ये न जाता डाव जिंकणं अशा सगळ्या गोष्टी या डावात दिसल्या!

कार्लसन बरोबरच्या आधीच्या जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत ज्या प्रकारचे डाव खेळले गेले त्यातून एक लक्षात आले होते की कार्लसनला ओपन पोझिशन्स जास्त आवडतात. डाव शक्यतोवर थोडी मोहोरी आणि प्यादी यांच्या स्थितीत न्यायचा आणि लांबवत ठेवून खेळत रहायचे! शेवटी मानसिक ताणाखाली छोट्या चुका करायला भाग पाडून कणाकणाने डाव जिंकायचा, ग्राईंडिंग!!

स्वत: आनंदला टॅक्टिकल डाव जास्त प्रिय आहेत. (href="http://misalpav.com/node/23895">उंटांची चालच तिरकी! या डावात त्याचे प्रत्यंतर येते!) डावाच्या शेवटात सुद्धा तो तितकाच उत्तम खेळतो परंतु त्याने पोझीशनल + टॅक्टिकल असा समन्वय ठेवून शैलीत किंचित बदल करणे आवश्यक आहे आणि या डावात नेमके तो हेच खेळला आहे असे मला वाटते. शैलीतला बदल ही प्रतिस्पर्ध्याला गोंधळवून टाकायची पहिली पायरी असते. ही प्रदीर्घ अनुभवानंतर येणारी प्रगल्भता असावी का? का हा फक्त या डावापुरता दिसलेला पैलू आहे?

कँडीडेट स्पर्धा जिंकून आनंद कार्लसनचा आव्हानवीर तर झालाय, आता ७ नोवेंबरला दोघे रशियात एकमेकांसमोर येतील त्या ऐतिहासिक क्षणाची वाट बघतोय!! :)

खाली सम्पूर्ण डाव खेळून बघता येईल. (क्रोममधून डाव नीट दिसत नाही त्यामुळे 'आंतरजाल विचक्षक' अथवा 'अग्निकोल्हा' वापरावेत.)

Play Online Chess[Event "World Chess Championship Candidates"][Site "Khanty-Mansiysk RUS"][Date "2014.3.13"][Round "1"][White "Viswanathan Anand"][Black "Levon Aronian"][Result "1-0"][WhiteELO "2785"][BlackELO "2805"]%Created by Caissa's Web PGN Editor1. e4 e5 2. Nf3 Nc6 3. Bb5 a6 4. Ba4 Nf6 5. O-O Be7 6. Re1 b5 7. Bb3 O-O 8.h3 Bb7 9. d3 d5 10. exd5 Nxd5 11. Nbd2 Qd7 12. Nxe5 Nxe5 13. Rxe5 Nf6 14. Re1Rae8 15. Nf3 Bd6 16. Be3 Re7 17. d4 Rfe8 18. c3 h6 19. Ne5 Bxe5 20. dxe5 Rxe521. Qxd7 Nxd7 22. Red1 Nf6 23. c4 c6 24. Rac1 R5e7 25. a4 bxc4 26. Bxc4 Nd527. Bc5 Re4 28. f3 R4e5 29. Kf2 Bc8 30. Bf1 R5e6 31. Rd3 Nf4 32. Rb3 Rd8 33.Be3 Nd5 34. Bd2 Nf6 35. Ba5 Rde8 36. Rb6 Re5 37. Bc3 Nd5 38. Bxe5 Nxb6 39.Bd4 Nxa4 40. Rxc6 Rd8 41. Rc4 Bd7 42. b3 Bb5 43. Rb4 Nb2 44. Bxb5 axb5 45.Ke3 Re8+ 46. Kd2 Rd8 47. Kc3 1-0document.getElementById("cwvpd_1406650623").value=document.getElementById("cwvpg_1406650623").innerHTML;document.getElementById("cwvfm_1406650623").submit();

टीप : चित्र आंजावरुन साभार

-चतुरंग

क्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

माहितीपूर्ण - नेहमीप्रमाणे.
सवडीने डाव खेळून बघते.

मृत्युन्जय's picture

30 Jul 2014 - 4:36 pm | मृत्युन्जय

आनंदने घोड्यासाठी उत्तम सापळा लावला यात काही वाद नाही. पण एकुण डाव थोडा अमेच्युअर नाही का वाटला (आनंदचा असा नाही. एकुणच. खुप सरधोपट चाली वाटल्या)

चतुरंग's picture

30 Jul 2014 - 5:48 pm | चतुरंग

कारण कोणतीही टॅक्टिकल काँबिनेशन्स नाहीयेत त्यामुळे चमकदार वाटत नाही डाव, जसा 'उंटांची चालच तिरकी' हा डाव वाटतो. परंतु पोझीशनल सटलिटी ज्याला अभ्यासायची आहे त्याच्यासाठी हा डाव खासच आहे. 'काहीच घडत नाही पण तो डाव मात्र जिंकतो' हे जे फीलिंग आहे ते फारच अस्वस्थ करुन टाकणारं असतं. कार्लसनच्या बर्‍याचशा डावात नेमकं असंच फीलिंग येतं आणि म्ह्णूनच हा डाव मला वेगळा वाटला.
अमेच्युअर नक्कीच नाहीये कारण साध्या वाटणार्‍या चालीच डाव पुढे नेतात हे सत्य उमगायला बरंच खोल पाण्यात जायला लागतं. आनंदनं स्वतःच म्हणून ठेवलंय You could say that both Fischer and Carlsen had or have the ability to let chess look simple.

मृत्युन्जय's picture

30 Jul 2014 - 5:50 pm | मृत्युन्जय

अमेच्युअर नक्कीच नाहीये कारण साध्या वाटणार्‍या चालीच डाव पुढे नेतात हे सत्य उमगायला बरंच खोल पाण्यात जायला लागतं.

हे मात्र खरे. चेस चांगला येणे सोप्पे आहे. त्यात पारंगत व्हायला मात्र कसोटी लागते,

उन्मेष दिक्षीत's picture

30 Jul 2014 - 6:55 pm | उन्मेष दिक्षीत

मस्त डाव आणि तितकच सही विश्लेषण !

मला वाटतं चेस मध्ये दोन्ही खेळाडू स्वतःविरुद्धच खेळत असतात. त्यामधे ज्याला डावाच्या पोझीशन प्रमाणे कोणत्या मोहर्‍या कशा वेरिएशन मधे जिंकु शकतात हे थोडं आधीच कळतं, तो शेवटी जिंकतो.

मी तुमची आधीचीही विश्लेषणं आणि खेळाडुंबद्दलचे सर्व लेख वाचलेत. मजा येते वाचायला !

असं म्हणता येईल की नाही माहीत नाही. टॅक्टिकल (काँबिनेशनल), पोझीशनल असे दोन मुख्य प्रकार ढोबळ मानाने असतात. पोझीशनल प्रकारात प्रतिस्पर्ध्याच्या चांगल्या खेळ्या आटवत नेणं आणि शेवटी वाईट खेळी करायला भाग पाडणं असा साधारण प्रकार दिसतो यात बराच वेळ चालणारे डाव असतात आणि आतषबाजी फारशी असत नाही. पेट्रोशान, कारपोव, निम्झोविच हे या प्रकारातले खेळाडू गणले जातील.
टॅक्टिकल प्रकारात मोहोर्‍यांची काँबिनेशन्स, बलिदाने, सापळे हे जास्त असू शकतात आणि असे डाव बघायला मजा येते. त्यात थ्रिल एलेमेंट जास्त असतं. ताल, कास्पारोव, आनंद हे या प्रकारात मोडतात.
कार्लसन प्रामुख्याने हा पोझीशनल खेळाडू आहे. परंतु त्याचे अतिशय महत्त्वाचे वैशिष्ठ्य (निदान मला जाणवलेले) असे की तो कोणत्याच नियमात, किंवा थिअरीमधे स्वतःला साचेबद्ध करत नाही. थिअरी काहीही सांगत असली तरी त्या क्षणी डावात काय सुरु आहे आणि त्याची इंट्यूशन त्याला काय सुचवते आहे त्याप्रमाणे तो अगदी नाविन्यपूर्ण चाली करायला मागेपुढे बघत नाही. शिवाय तो अतिशय चिवट आहे त्यामुळे शेवटपर्यंत खेळत राहतो ज्यामुळे प्रतिस्पर्धी टेकीला येऊ शकतो.