किल्ले हरिहर

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in भटकंती
21 Jul 2014 - 1:24 am

1

मागे मिपावर कि आंतरजालावर हरिहरच्या अजस्त्र कड्याचं आणि त्यात खोदलेल्या पायर्‍यांचं दर्शन झालं तेव्हाच या दुर्गाने मला प्रचंड भुरळ घातली होती. विशेषत: अखंड कातळात खोदलेल्या उभ्या चढणीच्या त्या पायर्यांनी!! केव्हातरी तिथे जायची संधी मिळेलच या आशेवर मधली वर्षे-दिड वर्षे लोटली आणि शेवटी एकदाचं जून महिन्यातल्या यशस्वी माहुली ट्रेकनंतर जुलैच्या मध्यावर आम्ही (खरेतर मीच!! ;) ) हरिहरची निवड केली. प्लॅन केल्यानंतर नक्की येण्यासाठी तयार झालेले आठजण शेवटी कमी होत होत, १२ जुलैला सकाळी साडेसहा वाजता ठाण्यात इगतपुरीकडे जाणार्या तपोवनमध्ये आम्ही फक्त चौघेजणच चढलो. :)

हरिहरची भेट पहिल्यांदाच! त्यामुळे जाण्याआधी कुठून कसे जायचं, कुठे उतरायचं याची पुरेशी माहीती आंतरजालावर वाचली, त्याचबरोबर ओळखीच्या काही जणांकडून मार्गदर्शनही घेतलं. यासगळ्या शिदोरीच्या जोरावर आणि वेळेच्या गणितानुसार आपला ट्रेक व्यवस्थितरित्या पार पडेल असा फुकाचा आत्मविश्वास मी माझ्या मनाचा करून घेतला. पण प्रत्येक वेळेला तुम्ही ठरवल्याप्रमाणे होईलच याची खात्री नसते. कधी कधी अगदी तुम्ही ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत जातात अन् मनातल्या मनातच आपण आपली पाठ थोपटून घेत असतो. पण कधी कधी याच्या नेमकं विरूध्द घडत जातं, वेळेचं गणित चुकत जातं, काही गोष्टीत आपला अंदाज चुकतो आणि याची परिणती ट्रेकच्या आरंभी असलेला आपला जबर आत्मविश्वास मोक्याच्या क्षणी उणा पडायला लागतो. हरिहरच्या भेटीदरम्यान या सगळ्या गोष्टींचा मी पुरेपूर अनुभव घेतला. या ट्रेकने मला बर्‍याच सकारात्मक गोष्टी शिकवल्या.

हरिहरला जाण्यासाठी इगतपुरी गाठायचं अन् तिथे मागुन ठाण्याहून येणारी त्र्यंबकेश्वरची एसटी पकडून वाटेत गडाच्या पायथ्याशी असलेल्या निरगुडपाड्याला उतरायचं आणि ट्रेक सुरू करायचा असा सर्वसाधारण प्लॅन आम्ही बनवला. त्याप्रमाणे सकाळी पावणेसातला निघालेल्या तपोवनने आम्हाला नऊच्या दरम्यान इगतपुरी स्थानकात सोडलं आणि ती तशीच पुढे नांदेडला गेली. आता पोचलोच आहोत इगतपुरीला तर थोडासा नाश्ता करून त्र्यंबकेश्वरची गाडी पकडू आणि तासाभरात गडाच्या पायथ्याशी पोहचू असा छानसा विचार मी मनाशीच केला. बाकीचे तिघे माझ्यावर सगळं सोपवून निर्धास्त होते. पण तिथून पुढे ते तसं मुळी घडायचंच नव्हतं असंच त्या दिवसाने ठरवलं होतं. तिथे आम्हाला ट्रान्सपोर्टेशनबद्दल दोन-तीन वेगवेगळ्या सुचना मिळाल्या त्यामुळे आमचा थोडा गोंधळ उडाला.

हरिहरला मुंबईहून दोन-तीन मार्गांनी जाता येतं. मुंबईहून लोकलने कसारा गाठावं, तिथून खोडाळा या गावी पोचावं. कसार्याहून खोडाळ्याला जाण्यासाठी शटल लागलेल्या असतात. त्याचबरोबर काही खासगी वाहनेही कसारा-खोडाळा अशा फेर्या करतात. खोडाळ्याहून त्र्यंबकेश्वरची गाडी पकडायची आणि वाटेतच असणार्या निरगुडपाडा या गडाच्या पायथ्याशी असणार्या गावात उतरावं. खोडाळा ते त्र्यंबकेश्वर अशी एसटी महामंडळाची बससेवाही आहे. कसारा ते खोडाळा हे अंतर साधारण ३७ किमी आणि खोडाळा ते निरगुडपाडा हे अंतर साधारण २५ किमी, कसार्याहून असा साठ किमीचा प्रवास केल्यानंतर तुम्ही गडाच्या पायथ्याला पोहचू शकता. दुसर्या मार्गाने मुंबई-भिवंडी-वाडा-खोडाळा-निरगुडपाडा असं करतही तुम्हाला पोचता येतं. किंवा मग डायरेक्ट नाशिकला पोचून तिथून खोडाळ्याची गाडी पकडावी. पण त्यातल्या त्यात जरा सोप्पी पद्धत म्हणजे मुंबई सेंट्रलहून सकाळी सहाला सुटणारी त्र्यंबकेश्वरची एसटी पकडावी आणि त्र्यंबकेश्वरच्या सात किमी अलीकडे असणार्या पहिने फाट्यावर उतरावं. तिथून खासगी वाहनाने तुम्हाला निरगुडपाड्याला जाता येतं. आंतरजालावर बर्याच ठिकाणी मुंबई किंवा इगतपुरीहून त्र्यंबकेश्वरला जाणारी एसटी ही निरगुडपाड्यामार्गे त्र्यंबकेश्वरला जाते असं सांगितलं आहे, पण प्रत्यक्षात ही माहीती चुकीची वाटते. कारण तो मार्ग पुर्णतः वेगळा आहे हे त्या दिवसाच्या प्रवासावरून मला कळालं. मुंबई-इगतपुरी-घोटी मार्गे त्र्यंबकेश्वरला जाणारी गाडी एसटी महामंडळाच्या रूटमध्ये घोटीनंतर नाशिकच दाखवते. निरगुडला जाण्यासाठी मध्येच उतरून तुम्हाला दुसरी गाडी पकडावी लागते. अर्थात हा सगळा खटाटोप तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत असाल तरच करावा लागतो. खाजगी वाहनाने जात असाल तर निवांतपणे मुंबई-नाशिक हायवेमार्गे तुम्ही सरळ निरगुडपाड्याला पोहचू शकता.

इगतपुरीला पोचल्यानंतर त्र्यंबकेश्वरची गाडी आम्ही जायच्या आधीच आठ वाजता निघून गेलेली होती. त्यानंतरची गाडी दुपारी एक वाजता येणार होती. एसटी स्थानकापाशी बहुतेक लोकांना निरगुडपाडा नावाचं गावच ठाऊक नव्हतं. मुख्य रेल्वे स्थानकात खासगी गाड्या डायरेक्ट निरगुडपाड्याला जाण्यासाठी हजार ते बाराशेपर्यंत भाव सांगतात असं ऐकून होतो ते त्यादिवशी प्रत्यक्ष पाह्यलं. त्यामुळे त्या फंदात न पडता शेवटी जिथे मिसळ खाल्ली त्या हॉटेलवाल्याला विचारून त्याच्या सांगण्यानुसार आम्ही एका शेअर रिक्षाने घोटीला पोचलो. कदाचित त्र्यंबकची गाडी तिथून पटकन मिळेल या आशेने घोटीला पोचलो खरे पण तिथेही आमच्या प्लॅनचे "बारा" वाजण्याची चिन्हे दिसत होती. घोटीहून त्र्यंबक फाटा पुन्हा तिथून मागे घोटी स्थानक अशा फेर्‍या मारत आम्ही घोटी स्थानकातून त्र्यंबकसाठी जाणारं 'जीपडं' पकडलं तेव्हा दुपारचे साडेबारा वाजत आले होते. त्यातून जीपवाल्याने त्र्यंबकला जाणारी गाडी निरगुडपाड्यामार्गे जात नाही, तुम्हाला पहिने फाट्याला उतरायला लागेल असं सांगितल्याबरोबर हरिहर आमच्यापासून अजूनही 'कोसो' दूर आहे याची आम्हाला खात्रीच पटली.

"तुमी चलाओ भो! फाट्यावरनं कि नय तुमाला दोन दोन मिनिटाला गाड्या मिळतील."

"तुमी चला. मी बरोबर सोडतो तुमाला.!"

ड्रायव्हर प्रचंड आत्मविश्वासात आमच्याशी बोलत होता. त्याच्या भुलथापांना बळी पडून तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही पहिने फाट्याला पोचलो. तिथून त्र्यंबकेश्वर सरळ सात किमी होतं आणि डावीकडे खोडाळा ३८ किमी दाखवत होतं.

पहिने फाटा
2

त्र्यंबक सरळ सात किमी
3

खोडाळा (घोटीहून येताना) डावीकडे ३८ किमी
4

पहिने फाट्याला जवळ जवळ अर्धा तास थांबून सुध्दा एकाही गाडीचा यायचा पत्ता दिसत नव्हता. शेवटी अर्ध्या तासाने एक 'छोटा हाथी' वाला आम्हाला निरगुडपाड्याला जाण्यासाठी थांबला. तो थांबला खरा पण त्याच्या गाडीत सुतभरही जागा दिसेना. कसही करून जायचंच या जिद्दीने आम्ही त्याला गाडीच्या टपावरून न्यायला विनंती केली.

एक प्रवास...टपावरून! ;)
5

सुमारे अर्ध्या-पाऊण तासानंतर पंधरा-वीस घरांची वस्ती असणार्या कोटमवाडीत पोचलो, जी हरिहर गडाच्या अगदी पायथ्याला आहे. तिथे उतरल्यानंतर समोर सगळीकडे प्रचंड धुकं पसरलेलं दिसत होतं, जिथे झाडाची साधी फांदीसुद्धा दिसत नव्हती तिथे गडाचा तो प्रचंड कातळ कुठून दिसायचा.?! उशीरा का होईना पण पावसाने लावलेल्या हजेरीमुळे तिथला स्थानिक बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त दिसत होता. एकीकडे वाडीतली बरीचशी मोठी मंडळी शेतात राबताना दिसत होती तर दुसरीकडे त्यांच्या रिकाम्या घरातून त्यांची लहानशी चिल्ली पिल्ली बाहेर डोकावताना दिसत होती. कधी त्या लहानग्यांना तर कधी नांगरणीसाठी निघालेल्या एखाद्या शेतकर्‍याला विचारत शेवटी गडाच्या वाटेला लागलो तोपर्यंत घड्याळातले काटे अडीच वाजल्याचं दाखवत होते.

कोटमवाडीतली प्राथमिक शाळा अन् त्यामागे डावीकडे फणीचा डोंगर
8

13

6

पाहिलीये का कधी अशी रंगसंगती :)
7

भाताची खाचरं
10

'बरोबर पोहचू कि नाही?', 'नेमकी हीच वाट आहे का?', 'इथे तर काहीच दिसत नाही', 'आत्ता अडीचला चढतोय तर मग वर पोचणार कधी आणि खाली उतरणार कधी?' मनातल्या या सगळ्या प्रश्नांना अनुत्तरीत ठेऊन मुकाट गड चढायला सुरूवात केली.

9

जसजसं वर चढत होतो तसं वाट योग्यच असल्याची खात्री पटत गेली आणि आणखी उत्साहाने वर चढायला सुरूवात केली. सोबतीला धुकं कधी धुसर होत होतं तर कधी पुन्हा दाटून येतं होतं. सुमारे दिड तासाच्या भराभर चढाईनंतर आम्ही एका पठारावर पोचलो जिथे त्या पठाराच्या मधोमध एक त्रिशूळ उभा केला होता आणि त्यासभोवतीने शेंदूर फासलेले अनवट देव आम्हाला पाहायला मिळाले. एवढा चढून आलो होतो पण ती प्रसिद्ध कातळभिंत आणि त्या पायर्‍या काही दिसण्याची लक्षणं दिसत नव्हती. त्या अनवट देवांभोवती पाच मिनिटं विसावा घेतल्यानंतर डाव्या बाजूची वाट पकडून आम्ही पुन्हा निघालो.

11

अवघ्या पाचच मिनिटात एक छोटासा रॉकपॅच चढून आम्ही त्या कातळपायर्‍यांच्या पायथ्याला पोचलो. मागाहून मला कळालं, पठारावर ज्याठिकाणी शेंदूर फासलेले देव होते तिथून तो प्रचंड मोठा कातळ आणि त्या पायर्‍या समोरच दिसतात. पायर्‍यांपाशी पोचलो तेव्हा चार वाजले होते. वेळ फक्त घड्याळातच पुढे सरकत होती पण आमच्या आजुबाजूचा निसर्ग मात्र एखाद्या चित्रासारखा स्तब्ध झाला होता. सरळ उभ्या चढत जाणार्‍या त्या पायर्‍या पाहून आमच्यातल्या नेहमी आघाडीवर असणार्‍या 'सुपरमॅन'ला वर चढावं कि नाही असा प्रश्न क्षणभर पडला. त्याला कारणही तसंच होतं. सरळ आभाळात घुसलेल्या फक्त दिड-दिड फुटाच्या पायर्‍या, दोन्ही बाजूने धुक्याने वेढलेली खोल दरी, वरून रिपरिप पडणारा पाऊस. हे सगळं पाहून आम्ही जागेवरच थबकलो. बाकीचे दोघेही पार गपगार झाले. मनाशी विचार केला 'या पायर्‍यांना बघण्यासाठी इतक्या दूरवर आलोय आणि त्या पाह्यंल्याच आहेत तर आता पुन्हा माघारी फिरावं.'

हरिहरला यायचं ते फक्त अखंड कातळात खोदलेल्या या दगडी पायर्‍यांठीच!
12

त्याची भव्यता कळावी म्हणून आंजावरून हा फोटो साभार.
16

आणखी एक आंजा साभार.
27

आमच्यामागून आलेल्या नाशिकच्या काही लोकांनी दोन घटका तिथे विसावा घेत लगेचच भराभर त्या पायर्‍या चढायला सुरूवात केली. त्याचं पाहून आम्हालाही थोडासा हुरूप आला आणि त्यांच्यामागे आम्हीही हळूहळू वर चढायला सुरूवात केली. खालून प्रचंड अवघड वाटणार्‍या पायर्‍या प्रत्यक्ष चढताना मात्र त्यामानाने सोप्या वाटत होत्या. प्रत्येक पायरीवर दोन्ही बाजूस खोबण्या असल्यामुळे त्यांच्या आधाराने वर चढायला सोपं जात होतं. पण त्यातूनही खाली वळून पाहायला भिती वाटत होती.

14

सरळसोट उभ्या!!
15

25

साधारण सत्तर एक पायर्‍या चढल्यानंतर आपण गडाच्या पहिल्या दरवाजातून आत प्रवेश करतो. आत शिरल्यानंतर लगेचच उजवीकडे खडकात कोरलेली, शेंदूर फासलेली गणरायाची मुर्ती पाहायला मिळते. त्याच्या थोडेच पुढे मारूतीरायाही असाच पाहायला मिळतो. उजवीकडे कातळ आणि डावीकडे सरळ खाली जाणारी दरी यामधून निमुळत्या होत गेलेल्या वाटेने आपण पायर्‍यांच्या दुसर्‍या टप्प्यापाशी येतो. या वाटेने जाताना मध्येच एका ठिकाणी दरीकडच्या बाजूल वरच्या बाजूस एक छोटंस नेढ पाहायला मिळतं.

प्रवेशद्वार
18

प्रवेशद्वारातून टिपलेल्या पायर्‍या
28

गणपती बाप्पा
16

मारूतीराया
17

नेढं
19

तिथून थोडं पुढे गेल्यानंतर लगेचच कपार फोडून काढलेल्या पायर्‍या लागतात, तिथून सावकाशीने वर चढत अवघ्या दहा मिनिटात दुसर्‍या प्रवेशद्वाराने आपण गडाच्या पठारावर पोचतो. तिथे चढताना फार सांभाळून चढायला लागतं, घाई गडबड करून चालत नाही.

20

21

खडक फोडून त्यातून मधूनच काढलेली वाट आपल्याला पाहायला मिळते.

23

22

26

दुसरे प्रवेशद्वार
24

समुद्रसपाटीपासून गडाची उंची ३५०० फुट इतकी आहे खरी, पण त्यामानाने गडाचा घेरा फारच छोटा आहे. गडाचा इतिहास बहुत प्राचिन असावा असं वाटतं. अगदी सातवाहन काळापासूनचा. गडाचा घेरा फार छोटा असल्यामुळे वर गड वसवला गेला नसावा, परंतू तळकोकणातून वर नाशिकला आलेल्या व्यापारी वाटा आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी लष्करी तळ म्हणून याची निर्मिती झाली असावी असं म्हणता येईल. गडावर असलेली एकमेव इमारत म्हणजेच दारूगोळ्याचे कोठार पाहिले की याची खात्री पटते. कालौघात याची मालकी शहाजी राजांकडे, कधी अहमदनगरच्या निजामशाहीकडे, तर कधी मुघलाकडे जात राहीली. तदनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारी पेशवे असलेल्या मोरोपंत पिंगळ्यांनी हा गड १६७० साली स्वराज्यात सामील केला. सरतेशेवटी इंग्रजांच्या १८१८ सालच्या 'गड उडवा, मराठे बुडवा' या मोहिमेत याचा ताबा इंग्रजांकडे गेला. त्र्यंबकच्या रांगेत हरिहरसोबत असणार्‍या बसगड, भास्करगड, फणीचा डोंगर, त्र्यंबकगड या रांगेमुळे गडाचे लष्करीदृष्ट्या महत्व अधोरेखित होते.

दुसर्‍या प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर एक छोटीशी टेकडी चढायला लागते. ती चढून गेल्यावर डावीकडच्या वाटेने जाताना मध्येच पाण्याची काही टाकी आणि काही उरलेले अवशेष पाहायला मिळतात. त्याच वाटेने थोडंस पुढे चालत राहिल्यानंतर एका ठिकाणी पठारावर मारूतीचे आणि शिवाचे छोटेसे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. हनुमंताच्या छोटेखानी मंदिरामागे पाणी अडवून केलेला एक छोटासा तलाव आपल्याला पाहायला मिळतो, त्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे.

पाण्याची टाकी
32

33

हनुमंताचं आणि शिवशंभूचं छोटेखानी मंदिर.
29

30

31

गोड्या पाण्याचं छोट्टसं तळं
34

त्याचमार्गाने थोडं पुढे गेल्यावर दगडात बांधलेली एक आयताकृती इमारत म्हणजे अर्थातच दारूगोळ्याचं कोठार पाहायला मिळते. आत प्रवेश करण्यासाठीचं त्याचं प्रवेशद्वार म्हणजे दिड फुट बाय दोन फुटाची दगडी चौकट आहे. त्या इमारतीत दोन खोल्या समोरासमोर आहेत. १०-१२ लोकांच्या राहाण्याची व्यवस्था तिथे आरामात होऊ शकते. आम्ही गेलो तेव्हा तिथे शिवमगिरी नावाचे नाथपंथी योगी राहात होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी अखंड मौन पाळलं आहे आणि पुढच्या वर्षीच्या कुंभमेळ्यानंतर ते आपलं मौन सोडणार आहेत अशी माहीती मिळाली. पोटात भुकेचे कावळे ओरडल्याची जाणिव झाली आणि त्या इमारतीत बॅगा टाकत आम्ही व्यवस्थित पोटपुजा उरकली.

35

गडावरच्या इमारतीत राहणारे नाथपंथी योगी शिवमगिरी महाराज.
36

तिथे दहा-पंधरा मिनिटे विश्राम केल्यानंतर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. खाली उतरायली सुरूवात केली तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. खालच्या वाडीतून शेवटची गाडी कुठे जाणारी आहे आणि किती वाजता आहे याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती म्हणून उतरताना अगदी भराभर उतरायला सुरूवात केली. अगदी तासाभरातच म्हणजे सातला खाली उतरलो. तोवर आजुबाजूच्या भागातलं सगळं धुकं निवळून सगळा प्रदेश अगदी स्वच्छ धुतल्यासारखा दिसायला लागला होता. हरिहर, त्यासमोरचा फणीचा डोंगर, त्यापुढचा भास्करगड सगळं लख्ख दिसू लागलं होतं.

धुक्यात हरवलेला फणीचा डोंगर
37

भास्करगड
38

हरिहर
39

40

पायथ्याची कोटमवाडी
41

खाली पोचल्यावर जाता जाता वाटेतच एका काकांनी शेवटची खोडाळ्याला जाणारी गाडी आता अगदी पाच मिनिटातच येईल हे ऐकल्यानंतर पळतच मुख्य रस्ता गाठला. खोडाळ्याहून कुठच्याही गाडीने नाशिक किंवा घोटी गाठता येईल या आशेने आम्ही आठ वाजता खोडाळ्याला पोचलो, पण तिथेही आम्हाला धक्का बसायचा बाकी होता. शेवटची शटल खोडाळ्याला मुक्कामी येऊन थांबली होती आणि तिथून पुढच्या आमच्या प्रवासाला फुलस्टॉप पडतोय की काय असं वाटून दोघांनी मुक्कामाची सोय पाहायला सुरूवात केली नि दोघांनी एखाद्या खाजगी गाडीची व्यवस्था पाहायला सुरूवात केली. शेवटी स्थानिक मुलांच्या मदतीने बर्‍याच घासाघिसीनंतर खोडाळा ते कसारा या ३७ किमीच्या अंतरासाठी अन् पाऊणतासाच्या प्रवासासाठी हजार रूपये देऊन खाजगी गाडीवाला एकजण यायला तयार केला. त्यावेळी पैशांपेक्षा आम्हाला वेळ खुप महत्वाची वाटली. त्या गाडीने कसारा स्थानकात सोडल्यानंतर तिथून मुंबईकडे येणार्‍या ९.२१ च्या लोकलमधल्या बाकड्यावर जेव्हा आम्ही चौघांनी देह पसरून दिला तेव्हा आम्हा चौघांच्याही चेहर्‍यावर एक वेगळं समाधान झळकत होतं. त्याची तुलना अखंड वारी चालून पंढरपुरातल्या गाभार्‍यात विठुरायाचे दर्शन घेतलेल्या वारकर्‍याच्या मुखावर दाटलेल्या समाधानाशी करता येईल किंवा करवीरच्या अंबाबाईचा पौषातला किरणोत्सव पाहताना तिच्या लेकरांच्या चेहर्‍यावर जे समाधान उमटतं त्याच्याशी करता येईल!!

सह्याद्री, त्यातल्या डोंगररांगा, त्यावरचे गडकोट किल्ले, त्यावरच्या अनवट घाट-वाटा, या सर्व दुर्गम दुर्गांचे अधिपती छत्रपती शिवराय या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्यासाठी गुरूतुल्य! माता-पित्याच्या जोडीने या गुरूचे स्थानही तितकेच महत्वाचे. सह्याद्री तुम्हाला अंगाखांद्यावर खेळवत अनेक चांगल्या वाईट गोष्टी शिकवत असतो. तुमचे अनुभव समृद्ध करत असतो. त्याचा राकटपणा जितका कणखर तितकीच त्याची माया अपार आहे. १२ जुलैच्या गुरूपौर्णिमेला या समाधिस्त योग्याने मला अनेकाविध अनुभवांनी समृद्ध करताना माझ्या आयुष्यातलं त्याचं गुरूपद आणखी अढळ केलं.!!

- इति लेखनसीमा

प्रतिक्रिया

मधुरा देशपांडे's picture

21 Jul 2014 - 1:42 am | मधुरा देशपांडे

मस्त. त्या पायऱ्यांचा फोटो बघूनच धडकी भरतेय. हिरवळीचे आणि धुक्यातले फोटो फारच छान.

प्यारे१'s picture

21 Jul 2014 - 1:57 am | प्यारे१

अप्रतिम रे किस्ना! सुंदर वृत्तांत. माझ्यासाठी ;) रौद्रभीषण (काही) पण तितकीच देखणी (सगळीच) छायाचित्रं.

खटपट्या's picture

21 Jul 2014 - 2:20 am | खटपट्या

जबरी फोटो आणि वर्णन !! ते नागपंथी महाराज बसलेत त्यांच्या मागे खडूने जी कलाकारी केली आहे ती बघून वाईट वाटले.

चित्रगुप्त's picture

21 Jul 2014 - 5:20 am | चित्रगुप्त

जबरदस्त.

चौकटराजा's picture

21 Jul 2014 - 7:09 am | चौकटराजा

या पायर्‍यांचा कोन पाहून मनात हादरलो. हिरवाई पाहून डोळे सुखावले. वर्णन वाचून आनंद झाला.

भयंकर चित्तथरारक ट्रेक

पायर्या पाहुन दणकुन फाटली
आता हा ट्रेक नक्की करणार

धन्या's picture

21 Jul 2014 - 9:25 am | धन्या

लय भारी !!!
पायर्या पाहून हरीहरला जायची ईच्छा झाली आहे.

मितभाषी's picture

22 Jul 2014 - 8:49 am | मितभाषी

किसनदेवा दंडवत तुम्हाला.

@धन्या जाताना हाक मार.

मुक्त विहारि's picture

21 Jul 2014 - 9:44 am | मुक्त विहारि

झक्कास

अजया's picture

21 Jul 2014 - 9:50 am | अजया

बाप रे, याच पायर्‍या उतरायच्या !डेंजर काम आहे, ते फोटो बघून पण धडकी भरतीये !

अनुप ढेरे's picture

21 Jul 2014 - 10:05 am | अनुप ढेरे

मस्तं!

सुहास झेले's picture

21 Jul 2014 - 10:16 am | सुहास झेले

ब्रिटिशांनासुद्धा ह्या पायऱ्यांचे जबर कौतुक वाटले होते त्यावेळी आणि म्हणूनच त्यांनी त्या उध्वस्त करायच्या टाळल्या. सुंदर वर्णन आणि फटू किसनद्येवा :)

वेल्लाभट's picture

21 Jul 2014 - 10:39 am | वेल्लाभट

क्या बात है !

क्या बात है किसनराव. मोठ्या आशेने आज मिपा उघडलं की एखादा ट्रेकवृत्तांत, काही सुरेख फोटो बिटो बघय्यला मिळावेत. आणि हरिहर ! हरिहरि ! क्या बात है. फोटो सुरेख, वर्णन झक्कास आणि एकूणच... मार्व्हलस.

हे सांगायला नकोच की पाय शिवशिवतायत. बघू. 'आमचा' योग कधी येतो.

स्वाती दिनेश's picture

21 Jul 2014 - 10:56 am | स्वाती दिनेश

सुंदर फोटो आणि वर्णन..
स्वाती

दिपक.कुवेत's picture

21 Jul 2014 - 11:01 am | दिपक.कुवेत

डोळ्याचं पारणं फिटलं रे फोटो पाहुन. वर्णन तर त्याहुन सुरेख झालयं. त्या सरळसोट पायर्‍या बघुन मात्र जाम तंतरली आहे.

ट्रेक चांगला झाला हे सुंदर प्रकाशचित्रं सांगत आहेतच.
पण नियोजन किती काळजीपूर्वक करायला हवे याचीही जाणीव झाली.

दिपक.कुवेत's picture

21 Jul 2014 - 11:11 am | दिपक.कुवेत

सगळिच कामं नियोजीत रित्या पार पडली तर काय मजा?? कधी कधी अनप्लॅन्ड पण भटकंती करावी. अडत, ठेचकाळत सर्वांवर मात करत जेव्हा आपण आपल्या ईच्छीत स्थळि पोहचतो तेव्हा तो आनंद, ते समाधान अवर्णनीय असतं.

किसन शिंदे's picture

21 Jul 2014 - 11:16 am | किसन शिंदे

ते ठिक आहे, पण अशी अनप्लॅन्ड भटकंती करताना आपण कुठे अडकत तर नाही आहोत याची जाणीव असो द्यावी.

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Jul 2014 - 2:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

>>अनप्लॅन्ड भटकंती करताना आपण कुठे अडकत तर नाही आहोत>> सहमत....

तोरण्याला जाऊन आल्यावर खाली वेल्हे गावात यायला उशीर झाला आणि शेवटची बस निघुन गेली होती.जीपवाल्याने नसरापूर फाट्याला सोडायचे ५०० रुपये मागितले.एरवी २० रुपये सीटवर घेउन जातात

किसन शिंदे's picture

21 Jul 2014 - 11:13 am | किसन शिंदे

नियोजन किती काळजीपूर्वक करायला हवे याचीही जाणीव झाली.

याच्याशी प्रचंड सहमत. ट्रेक नियोजन करताना प्रवासासारख्या महत्वाच्या बाबीचा सर्व बाजूंनी विचार करून नियोजन करावं ही गोष्ट त्यादिवशी मी शिकलो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Jul 2014 - 11:06 am | ज्ञानोबाचे पैजार

किसन देवा,

लै भारी ट्रेक झालेला दिसतोय. फोटु तर जबरदस्त आले आहेत. पायर्‍या बघुन तर धडकीच भरते.

पावसाळ्यात असले ट्रेक टाळावेत का?

पैजारबुवा,

सुकामेवा's picture

21 Jul 2014 - 11:18 am | सुकामेवा

धन्यवाद ..........

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jul 2014 - 11:21 am | डॉ सुहास म्हात्रे

जबरदस्त ! पायर्‍या पाहून गडावर जायची इच्छा झाली.

सगळे फोटो दिसत नाहीत :( (आजकाल बर्‍याचदा https://lh5.googleusercontent.com ने सुरु होणार्‍या लिंक्सवरचे फोटो दिसत नाहीत. गुगलचीच काहीतरी समस्या असावी.) वाखू ठेवली आहे. फोटो दिसायला लागल्यावर परत एकदा वाचण्यात येईल.

मागे मिपावर कि आंतरजालावर हरिहरच्या अजस्त्र कड्याचं आणि त्यात खोदलेल्या पायर्‍यांचं दर्शन झालं तेव्हाच या दुर्गाने मला प्रचंड भुरळ घातली होती. विशेषत: अखंड कातळात खोदलेल्या उभ्या चढणीच्या त्या पायर्यांनी!!

स्पार्टाकस यांनी मी अनुभवलेला सह्याद्री या लेखात हरिहर किल्ल्याची प्रतिमा दिली होती.

बाकी तुमची दुर्गभ्रमंती खासच. लेख व प्रतिमा दोन्ही छान आहेत. पावसाळ्यात ह्या पायर्‍या चढताना-उतरताना विशेष काळजी आवश्यक असते. पुणेकरांनी थेट त्र्यंबकेश्वराची येष्टी पकडली तरी चालू शकते. नंतर तिथून निरगुडपाड्याला गाड्या आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jul 2014 - 11:56 am | अत्रुप्त आत्मा

@त्याची तुलना अखंड वारी चालून पंढरपुरातल्या गाभार्‍यात विठुरायाचे दर्शन घेतलेल्या वारकर्‍याच्या मुखावर दाटलेल्या समाधानाशी करता येईल>>> __/\__

लेखन आणि फोटो *good*

कवितानागेश's picture

21 Jul 2014 - 1:04 pm | कवितानागेश

कय मस्त जागा आहे. पायर्‍या तर खासच. :)

आईच्या गावात. काय पायर्‍या आहेत का चेष्टा? बघून चांगली १८० मध्ये फाटली, ते एक असोच. पण हा ट्रेक नक्की करणार म्ह. करणारच!

बाकी लेखन आणि फटू दोन्हीही आवडले, त्यातही

सह्याद्री, त्यातल्या डोंगररांगा, त्यावरचे गडकोट किल्ले, त्यावरच्या अनवट घाट-वाटा, या सर्व दुर्गम दुर्गांचे अधिपती छत्रपती शिवराय या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्यासाठी गुरूतुल्य! माता-पित्याच्या जोडीने या गुरूचे स्थानही तितकेच महत्वाचे. सह्याद्री तुम्हाला अंगाखांद्यावर खेळवत अनेक चांगल्या वाईट गोष्टी शिकवत असतो. तुमचे अनुभव समृद्ध करत असतो. त्याचा राकटपणा जितका कणखर तितकीच त्याची माया अपार आहे. १२ जुलैच्या गुरूपौर्णिमेला या समाधिस्त योग्याने मला अनेकाविध अनुभवांनी समृद्ध करताना माझ्या आयुष्यातलं त्याचं गुरूपद आणखी अढळ केलं.!!

हा प्यारेग्राफ लय म्हणजे लयच आवडला! जियो किसना. :)

>>हा प्यारेग्राफ लय म्हणजे लयच आवडला!

असेच म्हणतो.

प्रसाद गोडबोले's picture

21 Jul 2014 - 4:37 pm | प्रसाद गोडबोले

लेख छान आहे
प्र.चि सुरेख आहेत
ट्रेक अवघड आहे
धुके कमी आहे

आदिजोशी's picture

21 Jul 2014 - 5:15 pm | आदिजोशी

पायर्‍यांवरून उतरताना जी हवा टाईट होते त्याला तोड नाही :)

वृत्तांत आवडला. अशीच एक निरुद्देश भटकंती आम्हीही केली त्यादिवशी. लेख लवकरच लिहीन.

प्रचेतस's picture

21 Jul 2014 - 5:28 pm | प्रचेतस

लै भारी रे किस्ना.

हरिहर मुंबईहून (स्वतःची गाडी बरोबर नसताना) करायचा असल्यास आदल्या दिवशी रात्री त्र्यंबकेश्वरला येणे अथवा पहाटेपर्यंत इगतपुरीला येणे श्रेयस्कर.

स्वतःच्या गाडीने यायचे असल्यास कोटमवाडीला न जाता घोटी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून मध्ये घाटात गाडी लावून सपाटीवरची अर्ध्या पाऊण तासाची चाल करून थेट हरिहरच्या पायर्‍यांपाशी पोहोचता येते. ह्यात दीड तासाची चढण पूर्णपणे टाळता येते.

बाकी ते नेढं नैसर्गिक नसून दुर्गस्थपतींनींच कोरवलेले आहे. ह्या नेढ्याजवळाची जी डोक्यावर कातळ असलेली आडवी वाट आहे अगदी तशीच ब्रह्मगिरीला पण आहे.

धमाल मुलगा's picture

21 Jul 2014 - 6:09 pm | धमाल मुलगा

असं आवर्जुन नेढं खोदणं/कोरणं ह्यामागं काय कारणं असावीत वल्लोबा?

दोरखंड ओवण्यासाठी हे तर सरळच आहे.

पण दोरखंड का ओवायचा हा प्रश्न समोर येतो.

आता बहुधा मग ही किल्ल्याची वाट कोरून काढताना सुरुवातीला आधारासाठी हे नेढं कोरलेले असावं किंवा ही वाट कोरून काढल्यावर दोराचा उपयोग तिथले (अजून एक लाकडी) प्रवेशद्वार बंद करण्यासाठी करीत असावेत किंवा निव्वळ पहिला दरवाजा शत्रूच्या ताब्यात गेल्यावर तिथून दोराचा आधार घेऊन निसटून खाली येण्यासाठीही कोरलेलं असावं.

व्यक्तिश: मला पहिला तर्कच जास्त योग्य वाटतो.

धमाल मुलगा's picture

21 Jul 2014 - 6:42 pm | धमाल मुलगा

आम्ही आपलं सवयीप्रमाणं मुद्दा सोडून तिसरेच विचार करत बसलो. म्हणलं, शिक्षा देण्यासाठी टांगून ठेवायला वगैरे असावं की काय वगैरे वगैरे...

प्रचेतस's picture

21 Jul 2014 - 6:48 pm | प्रचेतस

=))

मग कधी जायचं आता ट्रेकला?

धमाल मुलगा's picture

21 Jul 2014 - 6:53 pm | धमाल मुलगा

त्या पायर्‍या उलट्या अँगलनं पाहून आमच्या कपाळात गेल्यायत, जरा आम्हाला नॉर्मल होऊंद्या. मग जाऊ. ;)

यशोधरा's picture

21 Jul 2014 - 8:32 pm | यशोधरा

म्हंजे नै जाणार तुम्ही *mosking*

मस्त फोटो आहेत. आवडले :)

धमाल मुलगा's picture

21 Jul 2014 - 6:07 pm | धमाल मुलगा

किसनद्येवा,

एकवेळ धीर करुन चढून जाणं इथवर ठीक; पण मायला, त्या पावसापाण्यात असल्या पायर्‍या उतरुन येताना काय अवस्था झाली असेल ते लिव्हा की राव.

-(पायर्‍या चढतानाचे फोटू उरतणीच्या अँगलने पाहून पोटात वेट फिरलेला) ध.

यसवायजी's picture

21 Jul 2014 - 8:47 pm | यसवायजी

पैला हे घ्या __/\__

"पण त्यातूनही खाली वळून पाहायला भिती वाटत होती."

या वाक्याखालच्या फोटोत ज्या पायर्‍या आहेत त्यावरुन जायचं? नाही झेपणार वाटतंय :(

असल्या पायर्‍या उतरायच्या आहेत याची कल्पनाच करवत नाही. विशेषतः पावसाळ्यात इतकं घसरडं होत असणार... तिथे आधारासाठी काही दोरखंड वगैरे का नाही बांधून ठेवलेत?

धन्य आहेस! वर्णन आणि फोटो आणि धुकं आणि तो हरिहर आणि ती भिंत आणि त्या पायर्या.. सगळंच भहन्नाहाटह!

अवांतर.. सध्या नेमके कोणते पुस्तक वाचत आहेस? ;-)

किसन शिंदे's picture

22 Jul 2014 - 12:32 am | किसन शिंदे

सध्या पुस्तकं वाचणं पार बंदंय. :-(

प्रभाकर पेठकर's picture

22 Jul 2014 - 12:44 am | प्रभाकर पेठकर

हुश्श! अप्रतिम छायाचित्रं पाहात पाहात वाचलेले वर्णन तितकेच रसदार आणि अनिश्चिततेच्या रंगात प्रवासाचा आनंद, भिती, चिंता वाढविणारे आहे. मजा आली वाचताना.
पायर्‍या पाहून, हाच लेख अजून २० वर्षांपूर्वी कुठून वाचनात आला असता तर ताबडतोब गेलो असतो असे म्हणतो.

सखी's picture

22 Jul 2014 - 12:51 am | सखी

जबरी पाय-या आणि ट्रेकचं वर्णनही आवडलं. सगळी हिरवाई सुरेखच दिसतेय. फक्त नेढ्याचा फोटो रोटेट करायला पाहीजे का?

किसन शिंदे's picture

22 Jul 2014 - 8:36 am | किसन शिंदे

नाही, तो बरोबर आहे. पहिल्या दरवाज्यातून आत शिरल्यानंतर कड्यातल्या चिंचोळ्या वाटेने पुढे जाताना दरीच्या साईडने वरच्या बाजूस हे छोटंस नेढं आहे, ज्यातून फारफार तर एक मोठा दोरखंड ओवता येईल. वर वल्ल्या म्हणतो तसं ते नैसर्गिक नसून दुर्गबांधणीच्या वेळेस केलं असाव.

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Jul 2014 - 2:14 pm | राजेंद्र मेहेंदळे

लेख पुन्हा पुन्हा वाचुन काढला. स्वतः हरीहर फिरतोय असे वाटत होते.
पायर्‍या एकदम टेम्प्टींग आहेत असे दिसतेय. एकदा जाणारच ईथे.

अवांतर-- नेढी बर्याच ठीकाणी आढळतात.राजगडावर सुवेळा माची,रतनगडाचा माथा आणि अजुन एकदोन्(भंडारदरा धरणाजवळ कुठेतरी)..त्यांचे नेमके प्रयोजन मात्र समजत नाही.

नैसर्गिक नेढ्यांना प्रयोजन बियोजन काही नसते. ते आपोआप तयार झालेले असते. कैक किल्ल्यांवरची नेढी कैक लोक आरामात बूड टेकून बसू शकतील इतकी मोठी आहेत ती नैसर्गिकच आहेत. आर्टिफिशिअली तयार केलेले इतक्या मोठ्या साईझचे नेढे कुठे असल्यास माहिती नाही.

ब़जरबट्टू's picture

22 Jul 2014 - 2:56 pm | ब़जरबट्टू

पयंल __/\__ घ्या.. लय म्हणजे लय तंतरली राव त्या पायर्‍या बघूनच... हिंमत करावी म्हणतोच..

जबरी अनुभव व लेखण.. त्या शेवटच्या चार ओळी तर लय म्हणजे लयच आवडल्या.. :)

अनिल तापकीर's picture

22 Jul 2014 - 3:04 pm | अनिल तापकीर

जबरदस्तचं

बापरे! त्या पायर्‍या चढायला एकवेळ ठीक आहेत पण उतरायला अवघड! फोटू छान हिरवे आलेत. वर्णनही आवडले.

सस्नेह's picture

23 Jul 2014 - 12:06 pm | सस्नेह

लैच र्डेजर पायर्‍या हैत ! दगडी शिडीच जणू .
चढेकर्‍यांना सलाम !

पैसा's picture

23 Jul 2014 - 9:49 pm | पैसा

मस्त लिखाण आणि फोटो. असल्या कहार पावसात कशाला असल्या ठिकाणी जाताय रे?

प्रसाद गोडबोले's picture

24 Jul 2014 - 11:42 am | प्रसाद गोडबोले

असल्या कहार पावसात कशाला असल्या ठिकाणी जाताय रे?

ते बहुतेक फिरायला जात असावेत *biggrin*

नि३सोलपुरकर's picture

29 Jul 2014 - 3:58 pm | नि३सोलपुरकर

कहर ट्रेक आहे राव.
किसन देवा __/\__

बाकी हा ट्रेक करायला मला ही आवडेल ( मिपाकर मित्रानो निघताना जरा आवाज द्या रे).

पिलीयन रायडर's picture

29 Jul 2014 - 5:46 pm | पिलीयन रायडर

पायर्‍या बघुन घाबल्ले...!!!
सुंदर फोटो..!!! माहिती पण छान दिली आहे..

धन्यवाद!

मदनबाण's picture

31 Jul 2014 - 10:43 pm | मदनबाण

सुरेख फोटो ! लेख वेळ मिळताच शांतपणे वाचेन.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज न छोडुंगा तुझे दम दमा दम... { Dil }

प्यारे१'s picture

31 Jul 2014 - 11:03 pm | प्यारे१

किस्नाच्या ट्रेकच्या व्यसनामुळंच सरकारनं नवीन नियमावली काढली असं आबा दादांना सांगताना ऐकून बाबांनी मॅडमना फोन लावला.

गोरख कालेकर's picture

29 Aug 2014 - 5:11 pm | गोरख कालेकर

खुप छान लिखान किसन्....

सुहास पाटील's picture

1 Sep 2014 - 5:18 pm | सुहास पाटील

फोटु दिसत नहित बुवा