किल्ले हरिहर
त्र्यंबक सरळ सात किमी
सुमारे अर्ध्या-पाऊण तासानंतर पंधरा-वीस घरांची वस्ती असणार्या कोटमवाडीत पोचलो, जी हरिहर गडाच्या अगदी पायथ्याला आहे. तिथे उतरल्यानंतर समोर सगळीकडे प्रचंड धुकं पसरलेलं दिसत होतं, जिथे झाडाची साधी फांदीसुद्धा दिसत नव्हती तिथे गडाचा तो प्रचंड कातळ कुठून दिसायचा.?! उशीरा का होईना पण पावसाने लावलेल्या हजेरीमुळे तिथला स्थानिक बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त दिसत होता. एकीकडे वाडीतली बरीचशी मोठी मंडळी शेतात राबताना दिसत होती तर दुसरीकडे त्यांच्या रिकाम्या घरातून त्यांची लहानशी चिल्ली पिल्ली बाहेर डोकावताना दिसत होती. कधी त्या लहानग्यांना तर कधी नांगरणीसाठी निघालेल्या एखाद्या शेतकर्याला विचारत शेवटी गडाच्या वाटेला लागलो तोपर्यंत घड्याळातले काटे अडीच वाजल्याचं दाखवत होते.
कोटमवाडीतली प्राथमिक शाळा अन् त्यामागे डावीकडे फणीचा डोंगर
पाहिलीये का कधी अशी रंगसंगती :)
भाताची खाचरं
अवघ्या पाचच मिनिटात एक छोटासा रॉकपॅच चढून आम्ही त्या कातळपायर्यांच्या पायथ्याला पोचलो. मागाहून मला कळालं, पठारावर ज्याठिकाणी शेंदूर फासलेले देव होते तिथून तो प्रचंड मोठा कातळ आणि त्या पायर्या समोरच दिसतात. पायर्यांपाशी पोचलो तेव्हा चार वाजले होते. वेळ फक्त घड्याळातच पुढे सरकत होती पण आमच्या आजुबाजूचा निसर्ग मात्र एखाद्या चित्रासारखा स्तब्ध झाला होता. सरळ उभ्या चढत जाणार्या त्या पायर्या पाहून आमच्यातल्या नेहमी आघाडीवर असणार्या 'सुपरमॅन'ला वर चढावं कि नाही असा प्रश्न क्षणभर पडला. त्याला कारणही तसंच होतं. सरळ आभाळात घुसलेल्या फक्त दिड-दिड फुटाच्या पायर्या, दोन्ही बाजूने धुक्याने वेढलेली खोल दरी, वरून रिपरिप पडणारा पाऊस. हे सगळं पाहून आम्ही जागेवरच थबकलो. बाकीचे दोघेही पार गपगार झाले. मनाशी विचार केला 'या पायर्यांना बघण्यासाठी इतक्या दूरवर आलोय आणि त्या पाह्यंल्याच आहेत तर आता पुन्हा माघारी फिरावं.'
हरिहरला यायचं ते फक्त अखंड कातळात खोदलेल्या या दगडी पायर्यांठीच!
आणखी एक आंजा साभार.
आमच्यामागून आलेल्या नाशिकच्या काही लोकांनी दोन घटका तिथे विसावा घेत लगेचच भराभर त्या पायर्या चढायला सुरूवात केली. त्याचं पाहून आम्हालाही थोडासा हुरूप आला आणि त्यांच्यामागे आम्हीही हळूहळू वर चढायला सुरूवात केली. खालून प्रचंड अवघड वाटणार्या पायर्या प्रत्यक्ष चढताना मात्र त्यामानाने सोप्या वाटत होत्या. प्रत्येक पायरीवर दोन्ही बाजूस खोबण्या असल्यामुळे त्यांच्या आधाराने वर चढायला सोपं जात होतं. पण त्यातूनही खाली वळून पाहायला भिती वाटत होती.
सरळसोट उभ्या!!
साधारण सत्तर एक पायर्या चढल्यानंतर आपण गडाच्या पहिल्या दरवाजातून आत प्रवेश करतो. आत शिरल्यानंतर लगेचच उजवीकडे खडकात कोरलेली, शेंदूर फासलेली गणरायाची मुर्ती पाहायला मिळते. त्याच्या थोडेच पुढे मारूतीरायाही असाच पाहायला मिळतो. उजवीकडे कातळ आणि डावीकडे सरळ खाली जाणारी दरी यामधून निमुळत्या होत गेलेल्या वाटेने आपण पायर्यांच्या दुसर्या टप्प्यापाशी येतो. या वाटेने जाताना मध्येच एका ठिकाणी दरीकडच्या बाजूल वरच्या बाजूस एक छोटंस नेढ पाहायला मिळतं.
प्रवेशद्वार
तिथून थोडं पुढे गेल्यानंतर लगेचच कपार फोडून काढलेल्या पायर्या लागतात, तिथून सावकाशीने वर चढत अवघ्या दहा मिनिटात दुसर्या प्रवेशद्वाराने आपण गडाच्या पठारावर पोचतो. तिथे चढताना फार सांभाळून चढायला लागतं, घाई गडबड करून चालत नाही.
हनुमंताचं आणि शिवशंभूचं छोटेखानी मंदिर.
गोड्या पाण्याचं छोट्टसं तळं
त्याचमार्गाने थोडं पुढे गेल्यावर दगडात बांधलेली एक आयताकृती इमारत म्हणजे अर्थातच दारूगोळ्याचं कोठार पाहायला मिळते. आत प्रवेश करण्यासाठीचं त्याचं प्रवेशद्वार म्हणजे दिड फुट बाय दोन फुटाची दगडी चौकट आहे. त्या इमारतीत दोन खोल्या समोरासमोर आहेत. १०-१२ लोकांच्या राहाण्याची व्यवस्था तिथे आरामात होऊ शकते. आम्ही गेलो तेव्हा तिथे शिवमगिरी नावाचे नाथपंथी योगी राहात होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी अखंड मौन पाळलं आहे आणि पुढच्या वर्षीच्या कुंभमेळ्यानंतर ते आपलं मौन सोडणार आहेत अशी माहीती मिळाली. पोटात भुकेचे कावळे ओरडल्याची जाणिव झाली आणि त्या इमारतीत बॅगा टाकत आम्ही व्यवस्थित पोटपुजा उरकली.
वाचने
17962
वाचनखूण
प्रतिक्रिया
60
मस्त. त्या पायऱ्यांचा फोटो बघूनच धडकी भरतेय. हिरवळीचे आणि धुक्यातले फोटो फारच छान.
अप्रतिम रे किस्ना! सुंदर वृत्तांत. माझ्यासाठी ;) रौद्रभीषण (काही) पण तितकीच देखणी (सगळीच) छायाचित्रं.
जबरी फोटो आणि वर्णन !! ते नागपंथी महाराज बसलेत त्यांच्या मागे खडूने जी कलाकारी केली आहे ती बघून वाईट वाटले.
जबरदस्त.
या पायर्यांचा कोन पाहून मनात हादरलो. हिरवाई पाहून डोळे सुखावले. वर्णन वाचून आनंद झाला.
भयंकर चित्तथरारक ट्रेक
पायर्या पाहुन दणकुन फाटली
आता हा ट्रेक नक्की करणार
लय भारी !!!
पायर्या पाहून हरीहरला जायची ईच्छा झाली आहे.
In reply to लय भारी !!! by धन्या
किसनदेवा दंडवत तुम्हाला.
@धन्या जाताना हाक मार.
झक्कास
बाप रे, याच पायर्या उतरायच्या !डेंजर काम आहे, ते फोटो बघून पण धडकी भरतीये !
मस्तं!
ब्रिटिशांनासुद्धा ह्या पायऱ्यांचे जबर कौतुक वाटले होते त्यावेळी आणि म्हणूनच त्यांनी त्या उध्वस्त करायच्या टाळल्या. सुंदर वर्णन आणि फटू किसनद्येवा :)
क्या बात है !
क्या बात है किसनराव. मोठ्या आशेने आज मिपा उघडलं की एखादा ट्रेकवृत्तांत, काही सुरेख फोटो बिटो बघय्यला मिळावेत. आणि हरिहर ! हरिहरि ! क्या बात है. फोटो सुरेख, वर्णन झक्कास आणि एकूणच... मार्व्हलस.
हे सांगायला नकोच की पाय शिवशिवतायत. बघू. 'आमचा' योग कधी येतो.
सुंदर फोटो आणि वर्णन..
स्वाती
डोळ्याचं पारणं फिटलं रे फोटो पाहुन. वर्णन तर त्याहुन सुरेख झालयं. त्या सरळसोट पायर्या बघुन मात्र जाम तंतरली आहे.
ट्रेक चांगला झाला हे सुंदर प्रकाशचित्रं सांगत आहेतच.
पण नियोजन किती काळजीपूर्वक करायला हवे याचीही जाणीव झाली.
In reply to ट्रेक चांगला झाला हे सुंदर by आतिवास
सगळिच कामं नियोजीत रित्या पार पडली तर काय मजा?? कधी कधी अनप्लॅन्ड पण भटकंती करावी. अडत, ठेचकाळत सर्वांवर मात करत जेव्हा आपण आपल्या ईच्छीत स्थळि पोहचतो तेव्हा तो आनंद, ते समाधान अवर्णनीय असतं.
In reply to चालतं हो by दिपक.कुवेत
ते ठिक आहे, पण अशी अनप्लॅन्ड भटकंती करताना आपण कुठे अडकत तर नाही आहोत याची जाणीव असो द्यावी.
In reply to ते ठिक आहे, पण अशी अनप्लॅन्ड by किसन शिंदे
>>अनप्लॅन्ड भटकंती करताना आपण कुठे अडकत तर नाही आहोत>> सहमत....
तोरण्याला जाऊन आल्यावर खाली वेल्हे गावात यायला उशीर झाला आणि शेवटची बस निघुन गेली होती.जीपवाल्याने नसरापूर फाट्याला सोडायचे ५०० रुपये मागितले.एरवी २० रुपये सीटवर घेउन जातात
In reply to ट्रेक चांगला झाला हे सुंदर by आतिवास
नियोजन किती काळजीपूर्वक करायला हवे याचीही जाणीव झाली.याच्याशी प्रचंड सहमत. ट्रेक नियोजन करताना प्रवासासारख्या महत्वाच्या बाबीचा सर्व बाजूंनी विचार करून नियोजन करावं ही गोष्ट त्यादिवशी मी शिकलो.
किसन देवा,
लै भारी ट्रेक झालेला दिसतोय. फोटु तर जबरदस्त आले आहेत. पायर्या बघुन तर धडकीच भरते.
पावसाळ्यात असले ट्रेक टाळावेत का?
पैजारबुवा,
धन्यवाद ..........
जबरदस्त ! पायर्या पाहून गडावर जायची इच्छा झाली.
सगळे फोटो दिसत नाहीत :( (आजकाल बर्याचदा https://lh5.googleusercontent.com ने सुरु होणार्या लिंक्सवरचे फोटो दिसत नाहीत. गुगलचीच काहीतरी समस्या असावी.) वाखू ठेवली आहे. फोटो दिसायला लागल्यावर परत एकदा वाचण्यात येईल.
मागे मिपावर कि आंतरजालावर हरिहरच्या अजस्त्र कड्याचं आणि त्यात खोदलेल्या पायर्यांचं दर्शन झालं तेव्हाच या दुर्गाने मला प्रचंड भुरळ घातली होती. विशेषत: अखंड कातळात खोदलेल्या उभ्या चढणीच्या त्या पायर्यांनी!!स्पार्टाकस यांनी मी अनुभवलेला सह्याद्री या लेखात हरिहर किल्ल्याची प्रतिमा दिली होती. बाकी तुमची दुर्गभ्रमंती खासच. लेख व प्रतिमा दोन्ही छान आहेत. पावसाळ्यात ह्या पायर्या चढताना-उतरताना विशेष काळजी आवश्यक असते. पुणेकरांनी थेट त्र्यंबकेश्वराची येष्टी पकडली तरी चालू शकते. नंतर तिथून निरगुडपाड्याला गाड्या आहेत.
@त्याची तुलना अखंड वारी चालून पंढरपुरातल्या गाभार्यात विठुरायाचे दर्शन घेतलेल्या वारकर्याच्या मुखावर दाटलेल्या समाधानाशी करता येईल>>> __/\__
लेखन आणि फोटो *good*
कय मस्त जागा आहे. पायर्या तर खासच. :)
आईच्या गावात. काय पायर्या आहेत का चेष्टा? बघून चांगली १८० मध्ये फाटली, ते एक असोच. पण हा ट्रेक नक्की करणार म्ह. करणारच!
बाकी लेखन आणि फटू दोन्हीही आवडले, त्यातही
सह्याद्री, त्यातल्या डोंगररांगा, त्यावरचे गडकोट किल्ले, त्यावरच्या अनवट घाट-वाटा, या सर्व दुर्गम दुर्गांचे अधिपती छत्रपती शिवराय या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्यासाठी गुरूतुल्य! माता-पित्याच्या जोडीने या गुरूचे स्थानही तितकेच महत्वाचे. सह्याद्री तुम्हाला अंगाखांद्यावर खेळवत अनेक चांगल्या वाईट गोष्टी शिकवत असतो. तुमचे अनुभव समृद्ध करत असतो. त्याचा राकटपणा जितका कणखर तितकीच त्याची माया अपार आहे. १२ जुलैच्या गुरूपौर्णिमेला या समाधिस्त योग्याने मला अनेकाविध अनुभवांनी समृद्ध करताना माझ्या आयुष्यातलं त्याचं गुरूपद आणखी अढळ केलं.!!हा प्यारेग्राफ लय म्हणजे लयच आवडला! जियो किसना. :)
In reply to आईच्या गावात. काय पायर्या by बॅटमॅन
>>हा प्यारेग्राफ लय म्हणजे लयच आवडला!
असेच म्हणतो.
लेख छान आहे
प्र.चि सुरेख आहेत
ट्रेक अवघड आहे
धुके कमी आहे
पायर्यांवरून उतरताना जी हवा टाईट होते त्याला तोड नाही :)
वृत्तांत आवडला. अशीच एक निरुद्देश भटकंती आम्हीही केली त्यादिवशी. लेख लवकरच लिहीन.
लै भारी रे किस्ना.
हरिहर मुंबईहून (स्वतःची गाडी बरोबर नसताना) करायचा असल्यास आदल्या दिवशी रात्री त्र्यंबकेश्वरला येणे अथवा पहाटेपर्यंत इगतपुरीला येणे श्रेयस्कर.
स्वतःच्या गाडीने यायचे असल्यास कोटमवाडीला न जाता घोटी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून मध्ये घाटात गाडी लावून सपाटीवरची अर्ध्या पाऊण तासाची चाल करून थेट हरिहरच्या पायर्यांपाशी पोहोचता येते. ह्यात दीड तासाची चढण पूर्णपणे टाळता येते.
बाकी ते नेढं नैसर्गिक नसून दुर्गस्थपतींनींच कोरवलेले आहे. ह्या नेढ्याजवळाची जी डोक्यावर कातळ असलेली आडवी वाट आहे अगदी तशीच ब्रह्मगिरीला पण आहे.
In reply to लै भारी रे किस्ना. by प्रचेतस
असं आवर्जुन नेढं खोदणं/कोरणं ह्यामागं काय कारणं असावीत वल्लोबा?
In reply to नेढं... by धमाल मुलगा
दोरखंड ओवण्यासाठी हे तर सरळच आहे.
पण दोरखंड का ओवायचा हा प्रश्न समोर येतो.
आता बहुधा मग ही किल्ल्याची वाट कोरून काढताना सुरुवातीला आधारासाठी हे नेढं कोरलेले असावं किंवा ही वाट कोरून काढल्यावर दोराचा उपयोग तिथले (अजून एक लाकडी) प्रवेशद्वार बंद करण्यासाठी करीत असावेत किंवा निव्वळ पहिला दरवाजा शत्रूच्या ताब्यात गेल्यावर तिथून दोराचा आधार घेऊन निसटून खाली येण्यासाठीही कोरलेलं असावं.
व्यक्तिश: मला पहिला तर्कच जास्त योग्य वाटतो.
In reply to दोरखंड ओवण्यासाठी हे तर सरळच by प्रचेतस
आम्ही आपलं सवयीप्रमाणं मुद्दा सोडून तिसरेच विचार करत बसलो. म्हणलं, शिक्षा देण्यासाठी टांगून ठेवायला वगैरे असावं की काय वगैरे वगैरे...
In reply to धन्यवाद! by धमाल मुलगा
=))
मग कधी जायचं आता ट्रेकला?
In reply to मग कधी जायचं आता ट्रेकला? by प्रचेतस
त्या पायर्या उलट्या अँगलनं पाहून आमच्या कपाळात गेल्यायत, जरा आम्हाला नॉर्मल होऊंद्या. मग जाऊ. ;)
In reply to थांबा हौ.. by धमाल मुलगा
म्हंजे नै जाणार तुम्ही *mosking*
मस्त फोटो आहेत. आवडले :)
किसनद्येवा,
एकवेळ धीर करुन चढून जाणं इथवर ठीक; पण मायला, त्या पावसापाण्यात असल्या पायर्या उतरुन येताना काय अवस्था झाली असेल ते लिव्हा की राव.
-(पायर्या चढतानाचे फोटू उरतणीच्या अँगलने पाहून पोटात वेट फिरलेला) ध.
पैला हे घ्या __/\__
"पण त्यातूनही खाली वळून पाहायला भिती वाटत होती."या वाक्याखालच्या फोटोत ज्या पायर्या आहेत त्यावरुन जायचं? नाही झेपणार वाटतंय :(
असल्या पायर्या उतरायच्या आहेत याची कल्पनाच करवत नाही. विशेषतः पावसाळ्यात इतकं घसरडं होत असणार... तिथे आधारासाठी काही दोरखंड वगैरे का नाही बांधून ठेवलेत?
धन्य आहेस! वर्णन आणि फोटो आणि धुकं आणि तो हरिहर आणि ती भिंत आणि त्या पायर्या.. सगळंच भहन्नाहाटह!
अवांतर.. सध्या नेमके कोणते पुस्तक वाचत आहेस? ;-)
In reply to धन्य आहेस! वर्णन आणि फोटो आणि by इनिगोय
सध्या पुस्तकं वाचणं पार बंदंय. :-(
हुश्श! अप्रतिम छायाचित्रं पाहात पाहात वाचलेले वर्णन तितकेच रसदार आणि अनिश्चिततेच्या रंगात प्रवासाचा आनंद, भिती, चिंता वाढविणारे आहे. मजा आली वाचताना.
पायर्या पाहून, हाच लेख अजून २० वर्षांपूर्वी कुठून वाचनात आला असता तर ताबडतोब गेलो असतो असे म्हणतो.
जबरी पाय-या आणि ट्रेकचं वर्णनही आवडलं. सगळी हिरवाई सुरेखच दिसतेय. फक्त नेढ्याचा फोटो रोटेट करायला पाहीजे का?
In reply to खतरनाक by सखी
नाही, तो बरोबर आहे. पहिल्या दरवाज्यातून आत शिरल्यानंतर कड्यातल्या चिंचोळ्या वाटेने पुढे जाताना दरीच्या साईडने वरच्या बाजूस हे छोटंस नेढं आहे, ज्यातून फारफार तर एक मोठा दोरखंड ओवता येईल. वर वल्ल्या म्हणतो तसं ते नैसर्गिक नसून दुर्गबांधणीच्या वेळेस केलं असाव.
लेख पुन्हा पुन्हा वाचुन काढला. स्वतः हरीहर फिरतोय असे वाटत होते.
पायर्या एकदम टेम्प्टींग आहेत असे दिसतेय. एकदा जाणारच ईथे.
अवांतर-- नेढी बर्याच ठीकाणी आढळतात.राजगडावर सुवेळा माची,रतनगडाचा माथा आणि अजुन एकदोन्(भंडारदरा धरणाजवळ कुठेतरी)..त्यांचे नेमके प्रयोजन मात्र समजत नाही.
In reply to भन्नाट by राजेंद्र मेहेंदळे
नैसर्गिक नेढ्यांना प्रयोजन बियोजन काही नसते. ते आपोआप तयार झालेले असते. कैक किल्ल्यांवरची नेढी कैक लोक आरामात बूड टेकून बसू शकतील इतकी मोठी आहेत ती नैसर्गिकच आहेत. आर्टिफिशिअली तयार केलेले इतक्या मोठ्या साईझचे नेढे कुठे असल्यास माहिती नाही.
पयंल __/\__ घ्या.. लय म्हणजे लय तंतरली राव त्या पायर्या बघूनच... हिंमत करावी म्हणतोच..
जबरी अनुभव व लेखण.. त्या शेवटच्या चार ओळी तर लय म्हणजे लयच आवडल्या.. :)
जबरदस्तचं
बापरे! त्या पायर्या चढायला एकवेळ ठीक आहेत पण उतरायला अवघड! फोटू छान हिरवे आलेत. वर्णनही आवडले.
In reply to बापरे! त्या पायर्या चढायला by रेवती
लैच र्डेजर पायर्या हैत ! दगडी शिडीच जणू .
चढेकर्यांना सलाम !
मस्त लिखाण आणि फोटो. असल्या कहार पावसात कशाला असल्या ठिकाणी जाताय रे?
In reply to मस्तच! by पैसा
असल्या कहार पावसात कशाला असल्या ठिकाणी जाताय रे?ते बहुतेक फिरायला जात असावेत *biggrin*
कहर ट्रेक आहे राव.
किसन देवा __/\__
बाकी हा ट्रेक करायला मला ही आवडेल ( मिपाकर मित्रानो निघताना जरा आवाज द्या रे).
पायर्या बघुन घाबल्ले...!!!
सुंदर फोटो..!!! माहिती पण छान दिली आहे..
धन्यवाद!
सुरेख फोटो ! लेख वेळ मिळताच शांतपणे वाचेन.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज न छोडुंगा तुझे दम दमा दम... { Dil }
किस्नाच्या ट्रेकच्या व्यसनामुळंच सरकारनं नवीन नियमावली काढली असं आबा दादांना सांगताना ऐकून बाबांनी मॅडमना फोन लावला.
खुप छान लिखान किसन्....
फोटु दिसत नहित बुवा
मस्त