दुधीचे मुटकुळे (मुटके)

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in पाककृती
17 Jul 2014 - 4:29 pm

Dudhi Mutkule-web

साहित्यः

दूधी - अर्धा किलो
आलं - १ इंच
लसूण - ४ पाकळ्या
धणे - २ मोठे चमचे (टेबल स्पून)
जीरे - १ मोठा चमचा (टेबल स्पून)
तिखट - १ लहान चमचा (टि स्पून)
हळद - अर्धा लहान चमचा (टि स्पून)
कोथिंबीर - मुठभर
खायचा सोडा - अर्धा लहान चमचा (टी स्पून)
मीठ - चवीपुरतं
तेल - अर्धी वाटी.
चण्याचे आणि तांदूळाचे पीठ समप्रमाणात.

तयारी:

दूधीची साल काढून टाका. दूधी उभी चिरुन (दोनच भाग करायचे) चमच्याने आतल्या बिया काढून टाका. आता दूधी जाड किसणीवर किसून घ्या. दूधीला मीठ लावून दहा मिनिटे ठेवा.
आलं-लसूण वाटून घ्या. धणे-जिर्‍याची पुड करून घ्या.
कोथिंबीर बारीक चिरुन घ्या.

कृती:

किसलेल्या दूधीत आल-लसूण पेस्ट, धणे-जिरे पुड, तिखट, हळद, खायचा सोडा, कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्या. आतात त्यात मावेल एव्हढे चण्याचे आणि तांदूळाचे पिठ समप्रमाणात मिसळा (साधारणपणे दोन्ही ३-४, ३-४ मोठे चमचे लागेल). मुटका वळता आला म्हणजे झाले.
एका मोठ्या पातेलात बसेल अशी ताटली घेवून त्याला तेल लावा आणि त्यावर हे वरील मिश्रणाचे, मुठीने वळून मुटकुळे/मुटके
बनवा आणि नीट मांडून घ्या. एकच थर लावा. एकावर एक ठेवू नका. पातेल्यात पाणी घालून त्यावर एक चाळणी पालथी ठेवा आणि त्या चाळणीवर मुटकुळ्यांची ताटली ठेवून, पातेल्यावर झाकण ठेवून, १२ ते १५ मिनिटे वाफवून घ्या. पातेल्यात उकळणारं पाणी ताटलीच्या आंत येणार नाही एव्हढेच ठेवा. आंच बारीक ठेवा.
नंतर पातेल्यातून ताटली बाहेर काढून मुटकुळे थंड होऊ द्या.
आता एका फ्राय पॅन मध्ये अर्धीवाटी तेल घेऊन मध्यम आंचेवर तापवा. तेल तापले की एका वेळी पॅन मध्ये मावतील एव्हढेच मुटकुळे, चरचरीत फ्राय करून घ्या.
तांबूस रंगावर फ्राय केलेल्या मुटकुळ्यांचा, गरम असतानाच, दही आणि लोणच्या बरोबर अस्वाद घ्या. हे जेवणात भाजी ऐवजीही खाल्ले जातात किंवा वन डिश मील म्हणूनही खाता येतात.
दूधी प्रमाणेच मेथीच्या पानांचे, मुळ्याचे किंवा दूधी, मुळा, मेथी असे मिश्र मुटकुळेही छान लागतात.

शुभेच्छा...!

प्रतिक्रिया

सूड's picture

17 Jul 2014 - 4:32 pm | सूड

आहाहा !!

मस्त पाकृ काका.. नक्की करुन बघते. तसाही आजकाल इथे दुधी भोपळा मिळतोय.

गणपा's picture

17 Jul 2014 - 4:39 pm | गणपा

बल्लव असावा तर असा.
एकीकडे सामिषवाल्यांचे लाड करुन झाले की दुसरीकडे 'घासफुस'वाल्यांची ही काळजी घेतो. ;)

प्रभाकर पेठकर's picture

17 Jul 2014 - 4:54 pm | प्रभाकर पेठकर

अरे माझा सुद्धा हा आवडता पदार्थ आहे. लहानपणी माझी आई करायची. ते पण लोखंडाच्या तव्यावर चारही बाजूने तेल सोडत. इतक्या वर्षात विस्मृतीत गेलेला पदार्थ आठवला. ताबडतोब मुंबईला बहिणीला दूरध्वनीवर जिन्नस विचारले, सामग्री गोळा केली आणि मुटकुळे पानात अवतरले. करायलाही मजा आली आणि खायलाही.

प्रचेतस's picture

17 Jul 2014 - 5:31 pm | प्रचेतस

अगदी अगदी.
खूप छान पाकृ.

सुहास झेले's picture

24 Jul 2014 - 9:39 pm | सुहास झेले

ह्येच बोलतो... पाककृती आवडली हेवेसांनल :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jul 2014 - 4:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त !

स्नॅक म्हणूनही छान होईल !

वा वा! आमच्यासाठी पाकृ आली म्हणायची! पाकृ व फोटो आवडले. दुधी मिळताच करण्यात येतील.

अनिता ठाकूर's picture

17 Jul 2014 - 5:31 pm | अनिता ठाकूर

वा.... छान! तुमची ताई नशीबवान. भावाचं काम एकदम झटपट. *i-m_so_happy*

झक्कास...नक्कीच बनवून खाणार. *ok*

मुक्त विहारि's picture

17 Jul 2014 - 7:39 pm | मुक्त विहारि

एक विनंती आहे.

तुमच्या मस्कतला आमच्या साठी एखादी नौकरी असेल तर बघता का?

तुमच्या हातचे खायला पण मिळेल आणि आपला रोज मिपा कट्टा पण होईल.

एसमाळी's picture

17 Jul 2014 - 8:07 pm | एसमाळी

वाफवुन घेण्यपेक्षा थेट शॅलोफ्राय केलेतर ? काही फरक पडेल का ?कारण आम्ही सातुचे मुटके शॅलोफ्राय करतो!

प्रभाकर पेठकर's picture

17 Jul 2014 - 8:11 pm | प्रभाकर पेठकर

करायला हरकत नाही पण कधी बाहेरून लाल होतात पण आत कच्चे राहतात. उकडून घेतले तर आत पर्यंत शिजतात आणि नंतर बाह्य आवरण सोनेरी लाल केले की झाले.

हा मला करता येण्याजोगा पदार्थ दिसतो आहे. करून बघते.

सुबोध खरे's picture

17 Jul 2014 - 8:24 pm | सुबोध खरे

एक आगाऊ सूचना -- याला लौकी कबाब म्हटले तर नवाबी थाट येईल काय ?
तसे पाहिले तर आपण मराठी माणसे आपले खाद्यपदार्थ आपलीच लाल करून लोकांना खपवायला कमी पडतो असे मला वाटते.
म्हणजे कसे कि -- कोथिम्बिर वडी म्हणालो तर पन्नास रुपयाला चार वड्या कोणी घेत नाही पण तेच धनिया कबाब म्हणून चार कांद्याच्या आणि टोमटोच्या चकत्या(रिंग म्हणायला पाहिजे) लावल्या तर हाटेलात १५० रुपयाला विकता येतील.
आपल्यांना शहाणपण शिकवण्याची आमची लायकी नाही अनुभवही नाही (परंतु एक डोक्यात विचार घोळत होता म्हणून पिंक टाकली. रागावू नये)
असो. पदार्थ दिसायला उत्कृष्ट आहेच चवीलाही उत्तम असणारच. आता जर बायकोला मक्खन लावावे लागणार.

खरं आहे. लौकी कबाब नांवाने चालतीलच पण लौकी न खाणारेही खुप जणं असतात. त्यामुळे ह्याच पाककृतीला अजून राजस्थानी व्हेज कबाब, लखनवी व्हेज कबाब, पारसी व्हेज कबाब अशी नांवे दिली की गिर्‍हाईकांना कांहीतरी वेगळे खाल्याचा आनंद होतो. त्यात लौकी आहे हे समजतही नाही.


>>>>आपण मराठी माणसे आपले खाद्यपदार्थ आपलीच लाल करून लोकांना खपवायला कमी पडतो असे मला वाटते.

असं मला नाही वाटंत. आपले मराठी पदार्थ मराठी पदार्थ म्हणूनच चांगले खपू शकतात. उदा. थालीपिठ, झुणका भाकर, मसाले भात, डाळींब्यांचा भात, मालवणी मांसाहार, श्रीखंड पुरी, पुरण पोळी, भरली वांगी, भाकरी-भरीत, पोहे वगैरे वगैरे अनेक पदार्थ आहेत जे त्यांच्या मुळ मराठीपणाला आणि नांवाला टिकवून लोकप्रिय होऊ शकतात.
खाद्यपदार्थांच्या नांवाबाबत नाही पण व्यवसाय कौशल्याबाबत आपला मुद्दा बरोबर आहे. आपल्याकडे व्यावसायिक वृत्ती नसते. कुठल्याही बाबतीत स्वस्तुती आपण करीत नाही. 'माझ्याजवळ ज्ञान आहे ते इतरांनी ओळखून मला मान द्यावा' अशा कांही वेड्या कल्पना आपण मनी बाळगतो. कुठल्याही व्यवसायात 'Blowing your own trumpet' हे अत्यंत आवश्यक असतं. सतत, थोड्याथोडक्या यशाचीही जाहिरात करायची आणि अपयश मनांत ठेवून त्याचा अभ्यास करायचा. महत्त्वाकांक्षा, श्रम आणि आत्मविश्वास ह्यात कुठेतरी आपण कमी पडतो किंवा आपला आत्मसंतुष्टपणा आपल्याला भोवतो.

पाकृ आवडली पेठकर काका, करुन बघायला पाहीजे अशी.

प्रभाकर पेठकर's picture

17 Jul 2014 - 8:56 pm | प्रभाकर पेठकर

सूड, Mrunalini , गणपा, वल्ली, इस्पिकचा एक्का, रेवती, अनिता ठाकूर, शिद, मुक्त विहारी, एसमाळी, अतिवास, सुबोध खरे आणि सखी आपल्या कौतुक सोहळ्याबद्दल धन्यवाद.

मुक्त विहारी साहेब,
नोकरी कशाला करायला हवी? मस्कतला या. तुम्हाला मस्कत दाखवतोही आणि छान छान पदार्थ खाऊ पण घालतो. फक्त मी केलेलेच नाही तर इतर उपहारगृहांचेही, जे मला आवडतात.

यशोधरा's picture

17 Jul 2014 - 9:07 pm | यशोधरा

पेठकरकाका, माझी आजी मस्त बनवायची हे. आता एकदा करुन पाहते. :) धन्यवाद.

स्वाती दिनेश's picture

17 Jul 2014 - 9:14 pm | स्वाती दिनेश

छान दिसताहेत.. चवीलाही चांगले असणार..
(एक शंका कम् सुचवणी- हेच मुटकुळे ग्रेव्हीत सोडले तर कोफ्ता करी सदृश्य काही पदार्थ होइल का?)
स्वाती

प्रभाकर पेठकर's picture

17 Jul 2014 - 9:19 pm | प्रभाकर पेठकर

हो होईल की. पण आकार गोल आणि लिंबाएव्हढा असावा. म्हणजे ग्रेव्ही आतपर्यंत शोषली जाईल आणि कोफ्ते मऊ आणि आतून ओले राहतील नाहीतर आकाराने मोठे असतील तर कदाचित आत कोरडे राहतील.

सानिकास्वप्निल's picture

17 Jul 2014 - 9:33 pm | सानिकास्वप्निल

दुधीचे मुटकुळे साधारण दुधी मुठियासारखेच आहे, फक्त इथे मुटकुळे फ्राय केले तर मी स्लाईस करुन फोडणीत परतवते.

पुढल्या वेळेस असे बनवून बघेन, पाकृ आवडली :)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jul 2014 - 12:52 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif

आयुर्हित's picture

18 Jul 2014 - 2:31 am | आयुर्हित

सकाळच्या न्याहारीलाही चालेल ही पाकृ.
फक्त वाफवलेले दुधीचे मुटकुळे(मुटके)म्हणजे हॄदयमित्रच होईल की हो!

प्यारे१'s picture

18 Jul 2014 - 3:20 am | प्यारे१

पेठकर काका,
गणपा म्हणतो तसं दोन्ही बाजूंचे लाड करणारा बल्लव. छान पाकृ.

जास्त कोरडे नाहीत ना ? टोटरे बसतात अशा पदार्थांचे. काही लिक्विड पण हवं ब्वा ह्याबरोबर.

दिपक.कुवेत's picture

18 Jul 2014 - 8:33 am | दिपक.कुवेत

हे खाल्लेस कि पाणी पी.....लीक्वीड पण आणि टोटरे (हा शब्द मात्र पहिल्यांदा एकला आणि आवडलाय) पण बसणार नाहित.

शुचि's picture

18 Jul 2014 - 7:32 am | शुचि

खूपच मस्त पाकृ.

दिपक.कुवेत's picture

18 Jul 2014 - 8:43 am | दिपक.कुवेत

करायलाहि एकदम सोपी वाटतेय आणि चविष्ट. दह्यापेक्षा मला त्या बाजुला ठेवलेल्या खारातल्या मिरचीबरोबरच खायला आवडतील.

एक सांगु कि नको प्रश्न पडलाय.....फोटो काढताना खालचा बॅकग्राउंड तरी (डार्क रंगाचं कापड/टॉवेल वगैरे) किंवा प्लेट तरी डार्क घ्यावी असं वाटतयं. वरील फोटोत कापड पांढरं आणि प्लेट लाईट कलरची असल्याने फायनल ईफेक्ट थोडा फिका झालाय. अर्थात पदार्थ छान असल्यावर ह्या गोष्टिंकडे सहसा कुणाचं लक्ष जात नाहि म्हणा.

प्रभाकर पेठकर's picture

18 Jul 2014 - 10:28 am | प्रभाकर पेठकर

>>>> फोटोत कापड पांढरं आणि प्लेट लाईट कलरची असल्याने फायनल ईफेक्ट थोडा फिका झालाय.

सहमत. पुढच्या वेळी काळजी घेईन.

धर्मराजमुटके's picture

18 Jul 2014 - 10:20 am | धर्मराजमुटके

पदार्थाचे नाव आणि आमचे आडनाव एकच असल्यामुळे ह्या पदार्थावर माझा पहिला हक्क आहे. प्लीज पार्सल पाठवून द्या नाहितर पाककृतीचे नाव बदलावे ही विनंती. :)

सौंदाळा's picture

18 Jul 2014 - 10:52 am | सौंदाळा

मस्त!
आम्ही पण करतो मात्र मुटके न करता थालीपिठाप्रमाणे थापुन करतो.

इरसाल's picture

18 Jul 2014 - 1:03 pm | इरसाल

आमच्या कंपनीमधे हेच ग्रेव्हीत टाकुन कोफ्ता करी बनवुन खावु घालतात.
तुम्ही बनवलेले संध्याकाळी लेकीला स्नॅक्स म्हणुन पळतील. जबरीच.

समजा मी ह्यांना मधे एक चीर देवुन मेयोनीज लावले तर एक्दम भन्नाट लागेल.वर थोडे ऑरेगॅनो भुरभुरवुन....

त्रिवेणी's picture

18 Jul 2014 - 1:04 pm | त्रिवेणी

काका मस्तच एकदम.
हे मुटके तंदुर मध्ये केल्या सारखे वाटत आहेत.

पाकृचा फोटो फ्लिकर वरुन इथे टाकलाय का? असल्यास कसा केला. हापिसात पिकासा वापरायची पावर नसल्याने फोटो डकवता येत नाहीत आणि फ्लिकरवरुन कधी केलेले नाही. माहिती मिळाली तर लांबणीवर पडलेला एक लेख बोर्डावर आणता येईल.

यशोधरा's picture

18 Jul 2014 - 7:15 pm | यशोधरा
प्रभाकर पेठकर's picture

18 Jul 2014 - 8:22 pm | प्रभाकर पेठकर

आधी फोटोशॉप मधून छायाचित्राचं रेझोल्यूशन कमी करून डेस्कटॉपवर टाकलं. नंतर ते फ्लिकर वर चढवलं. फ्लिकरवरील चित्रावर टिचकी मारल्यावर उजव्या हाताला खाली, छायाचित्र दूसर्‍या संस्थळावर टाकण्यासाठी, share अशी खूण दिसेल त्यावर टिचकी मारल्यावर लिंक उघडेल ती कॉपी करून मिपावर पेस्ट करा. शुभेच्छा...!

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Jul 2014 - 5:55 pm | राजेंद्र मेहेंदळे

रोज ऑफिसातुन घरी जाताना पावसाने भिजतोय
अशा वेळी असे गरमागरम मुटके मिळाले तर....आत्ताच घरी फोनवतो :)

Maharani's picture

18 Jul 2014 - 10:35 pm | Maharani

मस्त एकदम .... *ok*

अनन्या वर्तक's picture

24 Jul 2014 - 8:03 pm | अनन्या वर्तक

वा एकदम मस्त आठवणी आहेत ह्या पाककृतीच्या. ह्याला आजी आणि आई मुटके म्हणतात. मला हे पडत्या पावसात चहा बरोबर खावयास फार आवडतात. फोटो आणि पाककृती एकदम मस्त.

काका, मी केले आज हे मुटके.
मला नि घरात सर्वांना खूप आवडले. लेकीची डब्यात पण हवेत अशी फर्माइश आहे :)
धन्यवाद !

मधुरा देशपांडे's picture

24 Jul 2014 - 9:29 pm | मधुरा देशपांडे

पाकृ आवडली आहे. दुधी मिळाला की करायचे आणि मगच प्रतिक्रिया द्यायची असे ठरवले होते. पण दुधी काही मिळाला नाही. :( आता या विकांताला मिळाल्यास करेन.