गप्पा … त्याच्याशी

भावना कल्लोळ's picture
भावना कल्लोळ in जनातलं, मनातलं
23 Jun 2014 - 2:54 pm

आज जरा निवांत भेटला तो. त्याला म्हणाले ये, बैस जरा. घटकाभर बोलु आपण. किती दिवस झाले बोलले नाही आहे तुझ्याशी मनमोकळेपणाने. तू येतोस आणि जातोस. मी आपली प्रपंच गाढ्यात. तो म्हणाला अग मग बोलू कि त्यात काय. मी आहे आता ४ महिने तरी. जा घेऊन ये एक वाफाळता कप चहाचा म्हणजे गप्पाची लज्जत वाढेल अजुन.

मी : राहु दे, असे म्हणुन दडशील पुन्हा. मग येशील जेव्हा तेव्हा निवांत असेन कि नाही कोण जाणे.

तो : नाही ग, आज असेन मी, तुझ्यासाठी.

मी : खरंच, राहशील माझ्यासाठी, माझे मन हि खूप जड झाले आहे, आज मी हि तुझ्यासोबत बरसेन म्हणते.

तो : आवडेल मला. मी बरसतो सर्वजण पाहतात. तुला बरसताना फक्त आणि फक्त मीच पाहतो, जाणतो.

मी : हम्म, काय करू? अवघड असते रे प्रत्येक कप्पा मोकळा नाही करू शकत न. संसार, रीतभात, बंधन खुप अडसर असतात उलगडताना. त्यात नाही समजले कुणाला तर उगाच गैरसमज, त्रास. त्यापेक्षा आपले आपल्यात खुललेले बरे असते.

तो : अग, वेडाबाई … म्हणुन तर येतो न मी. समजतो मी तुला. आताचे हे नाते आहे का? लहानपणापासून पाहतोय तुला. तू किती हसरी आहेस, रडवी आहेस, बोलकी आहेस सर्व काही जाणतो तुझे.

मी : हो रे, म्हणून तर तू आलास कि आपल खरच कुणी आहे, जीवाभावाचे आहे असे वाटून जाते. ज्याच्याकडे मन मोकळे करताना समाज, दुनिया, त्याचे रिती रिवाज काही काही मध्ये येत नाही. फक्त मी असते आणि मला हवे तसे व्यक्त करू शकते. तू आलास न कि वयात आल्यासारखे वाटते पुन्हा. सर्व नाती पुन्हा नव्याने जगायची उमेद येते. तुझ्याशी बोलताना वेंधळेपण नसते, लाज नसते, संकोच नसतो आणि अबोला धरला तरी हि तू रुसत नाहीस. कधी कधी तू मित्रासारखा वाटतोस, तर कधी आई सारखा कुशीत घेतोस, कधी वडिलासारखा दरडावतोस तर कधी एकाद्या वैऱ्या सारखा हि भासतोस. कधी लहान होऊन झिमाड नखशिखांत भिजुन गेल्यासारखे होते तर कधी लुप्त होऊन असा डोळ्यात दाटतोस. तुझाच आधार वाटतो रे मला. तुझ्याशी चार शब्द दुःखाचे, सुखाचे बोलता येतात. तुझ्याशी कसलेही स्पष्टीकरण न देत हक्काने भांडु शकते मी. खिडकीच्या कडेला बसले आणि तू आलास कि गजेवर पडून तुझ्या थेंबाचे होणाऱ्या तुषाराचा स्पर्श हेलावुन जातो रे मला. तुला कोसळताना चेहऱ्यावर झेलले कि पुन्हा नव्याने जन्म घेते मी. तो प्रत्येक थेंब मना मध्ये साठवुन आठवणीचा ऋतू हिरवा करते. तू आलास कि गंज लागलेल्या मनाला हिरव्या रंगाचे पाचु पडतात. कधी शहाणी होते तर कधी ठार वेडी. मनाचे तर विचारू नकोस. तो तर सैरभैरच असतो. कधी कुठे असेल माहीतच नसते. शब्दांना नवीन रूप आलेले असते. कधी हसतात, तर कधी रडतात, कधी समुद्र किनारी जाऊन बसतात तर कधी माळरानात फिरून येतात. कधी कोंडून घेतात स्वतःला, कधी उंच आकाशात गवसणी घालतात. कधी सयंत असतात तर कधी तोल ढासळतात. कधी पारंब्यावर हिंदडतात तर कधी कोपऱ्यात बसतात. आणि हे सगळे तू आलास कि होते. मुक्त हि होते आणि कोंदण हि होते त्यांची.

तो हसला, गडगडला, स्वतःला तिरपा करून खिडकीत उभ्या असणाऱ्या मला भिजवून गेला. म्हणाला मुक्त व्हावे ग, जड झालेली कोणती हि गोष्ट मुक्त करावी. मग ते शरीर असो, मन असो वा नाते. जड झाले कि रिक्त करावे. जडत्व हे मेलेल्याचे लक्षण आणि मुक्ती हे पुन्हा नव्याने जगण्याचे.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

मधुरा देशपांडे's picture

23 Jun 2014 - 2:59 pm | मधुरा देशपांडे

खूप छान. आवडले.

रेवती's picture

23 Jun 2014 - 3:01 pm | रेवती

छान लिहिले आहे.

प्रीत-मोहर's picture

23 Jun 2014 - 3:14 pm | प्रीत-मोहर

खूप छान लिहितेस ग. शेवटचा पॅरा विशेष आवडला

मुक्त विहारि's picture

23 Jun 2014 - 3:18 pm | मुक्त विहारि

खास करून

"जडत्व हे मेलेल्याचे लक्षण आणि मुक्ती हे पुन्हा नव्याने जगण्याचे."

दिपक.कुवेत's picture

23 Jun 2014 - 3:32 pm | दिपक.कुवेत

कल्लोळ आवडला.

कवितानागेश's picture

23 Jun 2014 - 3:43 pm | कवितानागेश

:)

"जडत्व हे मेलेल्याचे लक्षण आणि मुक्ती हे पुन्हा नव्याने जगण्याचे"
संपुर्ण जीवनाचे सार सांगणार्‍या या ओळी आहेत.
खुप छान लेख.

इशा१२३'s picture

23 Jun 2014 - 4:12 pm | इशा१२३

सुरेख लिहिले आहेस...आवडले.

यशोधरा's picture

23 Jun 2014 - 4:23 pm | यशोधरा

मुक्त व्हावे ग, जड झालेली कोणती हि गोष्ट मुक्त करावी. मग ते शरीर असो, मन असो वा नाते. जड झाले कि रिक्त करावे. जडत्व हे मेलेल्याचे लक्षण आणि मुक्ती हे पुन्हा नव्याने जगण्याचे.

क्या बात हैं! फार सुरेख!

Maharani's picture

23 Jun 2014 - 11:13 pm | Maharani

Khupach masta ga.....lihit raha....

त्रिवेणी's picture

24 Jun 2014 - 2:14 pm | त्रिवेणी

*i-m_so_happy*

इनिगोय's picture

24 Jun 2014 - 9:34 pm | इनिगोय

:-)

आवडलं..विशेषकरुन हे: "जडत्व हे मेलेल्याचे लक्षण आणि मुक्ती हे पुन्हा नव्याने जगण्याचे."

पैसा's picture

27 Jun 2014 - 5:34 pm | पैसा

छान मुक्तक!