तसा चिकणा आहे, पण... (लघुतम कथा)

धनंजय's picture
धनंजय in जनातलं, मनातलं
6 Nov 2007 - 9:30 pm

तसा चिकणा आहे, पण... (लघुतम कथा)

शेवटची बस चुकेल की काय म्हणून मी धावत चाललो होतो. तर पाठीमागून हाक आली - "ए डीजे, माझ्यासाठी बस थांबव!" मी आवाजाला उत्तर दिले - "ओके, नीना." पण मी ड्रायव्हरला काही सांगायच्या आत नीना बसच्या दाराशी होती.
माझ्याशेजारी तिला जागा करून तिला म्हणालो, "इतका उशीर का करतेस ऑफिसात? ही शेवटची बस चुकली असती म्हणजे?" "वा रे वा! तू मोठा वेळेवर निघालायस." "नाही, म्हणतो की आधीच लुकडीसुकडी आहेस, अशी जेवणे चुकवशील तर वाळूनच जाशील." अशा प्रकारची वैयक्तिक टीका मुलींना चालते, असा माझा अनुभव आहे. माझ्या सराईत तिरकस प्रशंसेकडे तिने सराईत दुर्लक्ष केले. "अरे, संशोधनाच्या अर्जाची तारीख आठवड्यावर आलेली आहे." "माझंही तेच. काय त्रांगडं आहे. महिना-महिनाभर हे गलेलठ्ठ अर्ज लिहायचे..." "मग मन कामावर एकाग्र कधी करायचं? पूर्वी हे असं नव्हतं." पूर्वी कसे चालायचे त्याचा मला अनुभव नाही आणि नीनालाही नाही. "या जमान्यात पावसच कमी पघा - जिराइतीचं काय खरं नाय र्‍हायलं..." असे समदु:ख वाटले की गावकी साधते.
"बरं, आज उशीरा पर्यंत काम केलंस, नीना, तर तुझी बियर माझ्या खात्यावर." हे नीनाचे माझे नित्याचेच. ती माझ्या शेजारच्याच बिल्डिंगमध्ये राहाते, म्हणून बसमध्ये आमची बरेचदा गाठ पडते. मग फोनाफोनी करून घरचा थांबा यायच्या आत आम्ही आमचा बियरकंपू जमवलेला असतो. "हं, बघू. इतक्या उशीरा दोस्तलोकं सगळी पायजमे-नायटी घालून झोपण्याच्या मार्गावर असतील." - ती म्हणाली. "बरं झालं. आज माझ्या खात्यावर म्हणालो ना! माझे पैसे वाचले!"
बारमध्ये नीनाने सुरुवात केली, "अरे दोन..." "...नेहमीच्या बियर आणि बटाट्याच्या काचर्‍यांची प्लेट!" ओळखीच्या बारटेंडरला आम्हा सर्वांच्या आवडीनिवडी पाठ आहेत. बारपाशी बसलो, आणि मी म्हटले, "आता कामाचं नको बोलायला. म्हणजे कामाचं बोलूया. मागच्या आठवड्यात म्हणालीस की सीमाच्या वाढदिवसाच्या पार्टीत एकाने म्हणे तुझा नंबर मागितला होता?"
"तुला सांगितलं की काय मी?? माझ्या तोंडात तीळ भिजत नाही, हट!" तिने आलेला ग्लास उचलला.
"तसं काही सांगितलं नव्हतंस. पण त्याचं नाव जर्मेन होतं, आणि तो फ्रेंच होता, असं काहीतरी माझ्या उगीच लक्षात राहिलं."
"काय तुझं हे! एक गोष्ट धड लक्षात ठेवशील तर... होता जर्मन आणि नाव फ्रँक. खरं म्हणजे सीमाच्या पार्टीत माझं लक्षही गेलं नव्हतं त्याच्याकडे. मागाहून सीमाचा फोनवर निरोप आला, फ्रँकला तुझा नंबर देऊ का?"
"कसला धटिंगणपणा!"
"तसं नाही रे. सीमा सारखी माझ्यासाठी मुले शोधत असते. सारखे सारखे तिला कडमडू नकोस सांगून मीच कंटाळले. म्हणून या वेळेला हो म्हणून सांगितले."
"तुझं पण काय हे वागणं, काही कळत नाही. उचलून कटाक्ष टाकशील तर मजनूंची रांग लागेल गल्लीत कुर्बान व्हायला. आणि याने तुझा नंबर काय मागितला आपल्या त्या हिला, आणि तू देऊन टाकलास?"
"हे बघ. तू सीमाला 'आपली ती ही' म्हणू नकोस, तिला मुळीच आवडत नाही."
"सीमाचं सोड. तिच्या त्या त्याने मग केला का तुला फोन?"
"केला तर. परवाच त्याला सिटीकॅफेमध्ये भेटले."
"मग आठवला का चेहरा - की सिटीकॅफेमध्ये प्रत्येकाला 'तूच का तो फ्रँक' विचारावं लागलं?"
"आठवला, आठवला. म्हणजे तसा तो आहे नाकीडोळी धारदार. पण काय तो वेडावाकडा हेअरकट. छे बुवा!"
"हे मात्र खरं तुझं, नीना. केस म्हणजे चेहर्‍याभोवतीची चौकट. हिर्‍याकडे लक्ष वेधायला कोंदण नेटके हवे."
"आणि शरीरपण एकदम टकाटक! नेमाने पोहायला जातो, असं म्हणाला."
"हं. नेहमी तर सांगत असतेस, की तुला बाहुबली बाहुला नको. त्यापेक्षा तू भावनांना भाव देतेस, ना?"
"भाव देतेच भावनांना. पण डोळ्यांना दिसतं ते दिसतं. भावना शोधताना मी डोळे थोडेच मिटणार आहे."
"आणि मी तरी कुठे म्हणतो आहे की रूप पाहू नये."
"पण रूप पाहावे तर आरारा... काय तो गबाळा वेष. म्हणजे तसा गबाळा वेष नाही रे. पण आपल्याला बर्‍यापैकी बॉडी आहे, समोरच्या मुलीवर छाप पाडावी, म्हणून चांगले फिटिंगचे कपडे घालायला नको होते का त्याने? कसले ते ढगळ कपडे. माझी नजर एक्सरे आहे असं समजला की काय तो?"
"नाही म्हणतेस तुझी नजर एक्सरेची? पण कपडे निवडता यावे बुवा माणसाला - कॉलेज शिकला, वावरला आहे की नाही हा मुलगा?"
"शिकलाय. समाजशास्त्र शिकवतोही कॉलेजात. चांगल्या दीड तास गप्पा मारल्या म्हणून माहीत आहे मला. मग त्याला सांगितलं की सीमाचा माझा पिक्चरचा बेत ठरलेला आहे, तर निघते."
"असा कटवलास तर त्याला."
"अगदी कटवण्याइतका तो कंटाळवाणा नव्हता. बर्‍याच गमतीदार विषयांवर बोलला तो. शिवाय माझे बोलणेही तो आवडीने ऐकत होता. पिक्चरचं ऐकून हा ओशाळून म्हणतो कसा, पुन्हा कधी भेटूया तर. खरं म्हणजे त्याने बोलण्यात थोडी चालाखी वापरली असती तर मी सीमाला फोन करून पिक्चरचं बाद केलं असतं. याचं मुली पटवण्याचं काही जमणार नाही, वाटतं. असा हा वेंधळा. पण पिक्चरचं कारण खरं होतं." तिने काचर्‍यांच्या प्लेटकडे लक्ष वळवले.
"हं. तो पिक्चर. सीमाने मलाही बोलावलं होतं. 'स्वदेस' पिक्चर होता ना? कसा वाटला? कळला का?"
"आता मला सवय झाली आहे खालची भाषांतरे पटापट वाचायची. तुझ्यासारख्या विदेशात असणार्‍याला स्वदेशाचं आकर्षण का ते आणखी थोडंसं समजलं. पण एक हलकं घ्यायचं - सीमाने पिक्चर निवडला म्हणजे तुमचा शाहरुख खान असणार हे आलेच."
"खरंय. शाहरुखचे गुणगान ऐकावं तर सीमाकडूनच. मिळालेले फिल्मफेअर अवॉर्ड पाठ, आणि हुकले तिथे निवड करणार्‍यांचे का चुकले ती कारणे पाठ. आहेच सीमा त्याची मोठी फॅन."
"तसं तिचं बरोबर आहे. पण मला सगळंच नाही पटत शाहरुखचं काम."
"काय, म्हणतेस काय? त्याने काय व्यायाम करायचं थांबवलं की काय? की त्याला वठवायचं पात्र नीट समजलं नाही?"
"व्यायामाचं कसचं काय! अगदी नेहमीसारखा चिकणा नंबर एक! पण ज्यांना आपण चिकणं असल्याचं ठाऊक असतं ना, नेमकं बोट ठेवून सांगता येत नाही, पण त्यांचं काहीतरी नैसर्गिक वागणं हरवतं. आणि काम करताना आपले अमुक इतके हावभाव छान जमतात असं त्याला समजलं आहे वाटतं. म्हणजे असा मानेला झटका देऊन मिश्किल हसतो ना..." - तिने प्रात्यक्षिक दिले - "मग मला असं व्हायला लागतं की मला त्या पात्रातला शाहरुखपणा दिसतो आहे, शाहरुखच्या कुडीतून ते पात्र वेगळे जिवंत होताना मला जाणवत नाही."
"नीना! तुला सीमाच्या हातची रस्साभाजी आवडते ना? तिच्या घरी आमंत्रण हवे असेल तर तिला हे समीक्षण सांगू नकोस."
"अरे मिष्टर. दोन गोष्टी ऐक. त्या चिकण्याकडे मी तीन तास डोळे फाडून बघितले ते सीमादेखत. सीमाची माझी गट्टी. शिवाय त्या पिक्चरची गोष्ट मला आवडली ते काही खोटं नाही सांगितलं. तू पण बघच तो पिक्चर."
"पुढच्या आठवड्यात अर्ज पाठवून होईल. मग सीमाला डीव्हीडी मागतो, आणि बघतो तो पिक्चर. बघ! गप्पांत वेळ किती झाला!"
"तुला म्हणायचं आहे की बियर संपली आणि काचर्‍या संपल्या, नाही का?"
"हो. आणि आपल्या गप्पा कधी संपायच्याच नाहीत."
"उद्या मलाही लवकर कामाला लागायचंय. तर निघूया. हे घे माझे पाच."
"ठेव ते तुझ्यापाशी. पुढची खेप तुझी" मी बिल चुकते केले.
दार उघडून बाहेर पडताना मी म्हटले, "नीना, एक सांगू? त्या वेंधळ्या फ्रँकला तू आणखी एक संधी देच."
"एकच नाही, दोन देईन." ती हसली. "गुडनाईट."
"गुडनाईट."

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

7 Nov 2007 - 1:19 am | विसोबा खेचर

"या जमान्यात पावसच कमी पघा - जिराइतीचं काय खरं नाय र्‍हायलं..." असे समदु:ख वाटले की गावकी साधते.

क्या बात है..

छान टी पी कथा..

चिअर्स.. :)

तात्या.

भाषा मुद्दामून ओळखीची टाइमपास वापरली आहे. पण कथा शास्त्रोक्त "पंचतंत्र" पद्धतीने बांधली आहे.

पात्रपरिचय, समस्या, दाखला, समस्या सोडवणे, नैतिक बोध, वगैरे.

इथे अर्थात नैतिक बोध वेगळा आहे (पंचतंत्रात फारसा न आलेला), त्यामुळे पूर्ण कथाच वेगळी आहे...

पण टीपी म्हणून आवडली तरीही चियर्स!

सर्किट's picture

8 Nov 2007 - 11:38 am | सर्किट (not verified)

धनंजय,

गोष्ट आवडली.

नैतिक बोध वगैरे सामान्य वाचकाला न झेपण्यासारखा आहे हो !

- सर्किट

बेसनलाडू's picture

8 Nov 2007 - 12:06 pm | बेसनलाडू

नैतिक बोध वगैरे सामान्य वाचकाला न झेपण्यासारखा आहे हो !
--- बरोबरच आहे.
(सामान्य!)बेसनलाडू
अवांतर - असामान्यांना हा सामान्य प्रतिसाद झेपला असेल, अशी आशा आहे :)
(अवांतर)बेसनलाडू

धनंजय's picture

8 Nov 2007 - 9:01 pm | धनंजय

नैतिक बोध वगैरे एकदम सामान्य आहे :-)

कथेच्या आदल्या भागावरून, शेवटी नीनाने ठरवलेले पटले का? मग जे काय पटले तोच नैतिक बोध.
शेवटी नीनाने ठरवले ते बुचकळ्यात पाडणारे असले तर कथा फसली.

कोलबेर's picture

11 Nov 2007 - 10:27 am | कोलबेर

शेवटी निनाने फ्रँकला पुन्हा भेटायचे ठरवले... हे समजले.. पण त्यात नैतिक बोध काय? ते मात्र अजुनही आमच्या सामान्य आकलन शक्तिला कळले नाही. क्षमस्व!

गुंडोपंत's picture

9 Dec 2010 - 5:12 am | गुंडोपंत

धनंजय तू कुठे आहेस?
अशक्त भंपक विडंबनांच्या जमान्यात तुझे सशक्त कथालेखन हल्ली दिसत नाही?
दीर्घकाल तुझ्या लेखनाची उणीव जाणवलेला...

शिल्पा ब's picture

9 Dec 2010 - 6:03 am | शिल्पा ब

नेमकं काय म्हणणं आहे?समजा एखादा बारा वाटला तर दिला अजून एक चान्स (बोलून त्याला समजून घ्यायचा , इतरांनी काय चान्स द्यायचे ते त्यांचं त्यांनी ठरवायचं ;)) तर काय मोठंसं काही समजलं नाही...नीना खूपच तरुण असेल तर गोष्ट वेगळी.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Dec 2010 - 6:59 am | निनाद मुक्काम प...

डोंट जज बुक बाय इट्स कवर असे उगाच नाही म्हटले आहे .
त्यात परदेशात नीना हा आणि तो जर्मेल हे दोन्ही जीव परदेशी
तेव्हा त्याला एका चान्स नीनाने द्यायला हवा (पण त्याने नीनाला एक चान्स अजून दिला पाहिजे ना)
जमाना तेजीसे दौड राहा है.
लेख मस्त झालाय .

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Dec 2010 - 7:06 am | निनाद मुक्काम प...

हि गोष्ट आहे जेव्हा मी कुठल्याही बंधनात नव्हतो .आय मीन कमिटेड नव्हतो .आम्ही हॉटेल वाले पब मध्ये गेलो .होतो बरेचे युरोपियन व आम्ही मोजकेच कावळे होतो ..एका अबोध जर्मन बालकाला मी प्रश्न विचारला एक सुंदर सोनेरी केसांची उफाड्या बांध्याची रुपगर्विता व एक बी एम डब्लू चे लेटेस्ट मॉडेल ह्या गोष्टी एकाच वेळी तू बस मधून जातांना पाहिल्या तर तू कोणती एक गोष्ट प्राधान्य देऊन पाहशील .त्याने अर्थात त्या निर्जीव वस्तूला प्राधान्य दिले .हि लोक जन्मतः आपण जसे बालपणी डॉक्टर डॉक्टर खेळतो तसे मेकेनिक मेकेनिक खेळत असावेत बहुतेक .