आलिया निवडणूक असावे सादर !!

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
13 May 2014 - 8:59 am

गेले कित्येक दिवस ज्याची वाट बघत होतो तो मतदानाचा दिवस आता चोवीस तासांवर आला होता. " उद्या मतदान करायचं " एवढा एकच विचार मनात घोळत होता . याआधी दोन -तीन वेळा मतदान केलं असलं तरी यावेळचा मतदानाचा उत्साह काही संपता संपत नव्हता. जणू काही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही माझ्या एका मतानेच हादरणार होती. मला आज सकाळपासूनच माझ्या लहानपणीचं निवडणुकीच्या वेळेस चं वातावरण आठवत होत. कोणत्यातरी एका निवडणुकीच्या वेळी गल्लीतल्या आम्हा सगळ्या मुलांमध्ये प्रचारपत्रकं गोळा करण्याची स्पर्धा लागली होती. म्हणजे अक्षरश: भोंगा लावून प्रचार करत फिरणाऱ्या ऑटो किंवा टांग्याच्या मागे धावत जाऊन आम्ही पत्रकं गोळा करायचो. अर्थात त्यावेळी पक्ष कोणता , उमेदवार कोणता ह्याचा विचार आम्ही करत नव्हतो. पंजा, कमळ, धनुष्यबाण, नांगर, शिलाई मशीन , टीव्ही ,दगड ,माती-धोंडे .... इ. सगळ्या निवडणूक चिन्हांची पत्रकं आम्ही जमवली होती. (" साहेब, त्यावेळी घड्याळ अस्तित्वात यायचं होतं म्हणून ते आणू शकलो नाही. कृपया आमच्या गावातील धरणांवर याचा राग काढू नका !! ". आणि हो ! त्यावेळी "झाडू" चा जन्म देखील व्हायचा होता हे देखील सांगायला हवं नाहीतर आम्ही सगळे अंबानीचे एजंट आहोत असे आरोप "सामान्य माणूस" करेल. त्याकाळात रेल्वे इंजिन सुद्धा रस्त्यावरील टोलनाक्यावरून न धावता रुळावरूनचं धावायचं म्हणून ते सुद्धा घरी आणू शकलो नाही !! )

त्यावेळी मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदान केलं जायचं. मतमोजणीला २-३ दिवस लागायचे. मतपत्रिका वापरून मतदान करण्याची माझी फार इच्छा होती. पण आम्ही एकविसाव्या शतकातले मतदार असल्यामुळे हे शक्य झालं नाही. आम्हाला मतदानाचा हक्क मिळाला तेंव्हा electronic मतदानाच युग सुरु झालं होतं. तसा आधुनिकीकरणाला किंवा संगणक युगाला माझा विरोध नाहीये. पण तरी कोणतीही गोष्ट electronic झाली ना की मला जरा भीतीचं वाटते. नेमकी आपल्याच वेळी ती व्होटिंग मशीन बंद पडली किंवा खराब झाली तर काय ? असा प्रश्न हजार वेळा माझ्या मनात येउन गेला . पण माझी ही शंका लगेच दूर झाली. आजकाल व्होटिंग मशीन व्यवस्थित काम करते आहे कि नाही हे बघायला उमेदवार स्वत: मतदान कक्षात येउन जातात म्हणे. इतकचं काय तर आपल्या पक्षाचं चिन्ह पाचपन्नास वेळा दाबून ते खात्री सुद्धा करून घेतात. मग काळजीचं कारण नाही !!!!

सगळी तयारी झाली पण आपलं अमुल्य मत कोणाला द्यायचं याचा निर्णय अजून होत नव्हता. वेगवेगळ्या पक्ष्यांच्या नेत्यांची भाषणं ऐकून दमायला झालं होतं पण यातला नेमका कोण खरा हे कळत नव्हतं. एका नेत्याला तर देशातील महिलांची इतकी काळजी वाटत होती कि त्याच्या प्रत्येक भाषणात , " महिला सक्षम झाल्याच पाहिजे" हाच मुद्दा वारंवार येत होता. म्हणजे त्याला देशातील वीजप्रश्न , पाणीप्रश्न, अर्थव्यवस्था, जातीयवाद वगैरे काहीही प्रश्न विचारले तरी , "महिला सक्षम झाल्याशिवाय हा देश सुधारणार नाही " असंच उत्तर यायचं. आता महिला सक्षम करणार म्हणजे काय प्रत्येकीच्या हातात बंदूक देणार का ? असा प्रश्न मला पडला. (खरंच असं झालं तर घरातल्या मोलकरणीला सुद्धा ," मावशी ,उद्या जरा लवकर याल का ? असं विचारताना आधी चिलखत घालावं लागेल ). कदाचित त्या नेत्याने लहानपणापासूनच त्याच्या घरी आजी,आई, बहिण यांचाच हुकुम चालतो असं बघितलं असेल. त्यामुळे देशातील सगळ्या पुरुषांचा रोल फक्त स्वत: च्या कुटुंबांना "आडनाव" देण्यापुरताच मर्यादित असावा असं त्याला वाटत होतं. पण एका गोष्टीत मात्र या नेत्याच खूप आश्चर्य वाटायचं. स्वत: अज्ञान निरागसतेच्या नावाखाली लपवायचा प्रयत्न करताना बाकी सगळ्या जगात सुद्धा अज्ञान पसरलं आहे अशी त्याची ठाम समजूत होती. त्याला बघितलं कि ' दिवार ' सिनेमातला एक प्रसंग आठवतो. नोकरीच्या शोधात असलेला रवि (शशी कपूर) आपल्या मैत्रिणीच्या पोलिस कमिशनर असलेल्या वडिलांना भेटायला जातो.
ते विचारतात ," रवि बेटा, आजकल क्या करते हो ?".
स्वत:च्या बेरोजगारीची लाज वाटून रवि म्हणतो ," जी क्या बताऊ , मैं आजकल कुछ नही करता ".
यावर पोलिस कमिशनर म्हणतात , "अरे कुछ नही करते तो पुलिस में भरती हो जाओ !!!!"
तसंच काहीसं या नेत्याचं झालं असावं. " कुछ नही करते तो राजनीती में आजाओ. हमारे देश को प्रधानमंत्री कि बहोत जरुरत हैं !!! "

दुसरीकडे एका नेत्यांनी देशभर सभा घेण्याचा सपाटा लावला होता. ते सतत काहीतरी "model" दाखवायचे. त्यांनी स्वत: च्या निवडणूक चिन्ह बरोबरचं चहाचा इतका प्रचार केला की ते निवडून आल्यावर बहुतेक चहाला "राष्ट्रीय पेय" म्हणून जाहीर करतील. ते बघून करन जोहर सुद्धा आपल्या "कॉफी विथ करन" कार्यक्रमांच नाव बदलून "चहा विथ करन" करणार असल्याच ऐकलं होतं. राष्ट्रीय स्तरावरील पक्षाचा प्रचार करण्यासाठी या नेत्याला पक्षातील इतर कोणताही नेत्याची गरज नाही असं जाणवत होतं. या नेत्याला बघून 'दिवार' मधला दुसरा प्रसंग आठवतो.
एका अशक्यप्राय कामाची रणनीती आखताना विजयचा (अमिताभ बच्चन) बॉस त्याला म्हणतो , " विजय, तुम्हारा वहा अकेले जाना ठीक नही. क्या तुम्हे लगता हैं के ये काम तुम अकेले कर सकते हो ?".
त्यावर विजय म्हणतो ," नही.....मैं जानता हू के ये काम मैं अकेले कर सकता हू !!! ".
या पक्षाची प्रचार नीती ठरवताना असंच काहीसं संभाषण झालं असावं !!

हे सगळं सुरु असताना एक सामान्य माणूस सुद्धा यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. या सामान्य माणसाची कथा काय वर्णावी महाराजा !! त्याला तर देश बदलण्याची इतकी घाई झाली होती की विचारू नका. " "चट मंगनी पट बिहा " !! एवढ्यावरच तो थांबला नाही तर , लग्न झाल्यावर काही दिवसातच म्हणजे संसार कसा करायचा हे कळायच्या आधीच बायकोशी "तात्त्विक" कारणांमुळे घटस्फोट !! मग लगेच दुसऱ्या लग्नाची तयारी.... दुसऱ्या लग्नानंतर तीन - चार वर्षातच दहा- बारा पोरांचा बाप होण्याची स्वप्न !!मग त्या पोरांना शिक्षण फुकट !! वीज फुकट !! पाणी फुकट !! अशी त्याची योजना होती. पण कोणतीही योजना घोषित करताना कुठेतरी कोपऱ्यात * conditions apply असं लिहायला तो विसरायचा नाही. क्रिकेटच्या भाषेत सांगायचा तर हा नेता जर खेळायला आला तर पुढीलप्रमाणे नियम असतील .
१. मी सामान्य माणूस असल्याने मलाच पहिली ब्याटींग मिळाली पाहिजे
२. माझ्या बॅटनी चेंडूला नुसता स्पर्श जरी केला तरी सहा रन देण्यात यावे आणि स्पर्श न झाल्यास गोलंदाजावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात यावा
३. मी सामान्य माणूस असल्याने प्रायोजकांनी माझ्यावर कोणताही दबाव टाकू नये आणि याआधी च्या सामन्यात कमावलेल्या पैशांचा हिशोब द्यावा
४. अम्पायरने सगळे निर्णय मला विचारून घ्यावेत अन्यथा तो प्रायोजकांचा एजंट असल्याचे मी जाहीर करेल
५. मी सुद्धा प्रेक्षकांसाराखाच सामान्य माणूस असल्याने माझा संघ हरल्यास प्रेक्षकांनी माझ्यासोबत पीचवरचं "धरणे " द्यायला बसावे.
काही राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचा जोरात प्रचार सुरु होता . निवडणुकीच्या घौडदौडीत एक महिला नेता आपला हत्ती पुढे दामटवत होती . आता फक्त हत्तीवरून साखर वाटायचीच बाकी राहिली होती. मला तर स्वप्नात तिरंग्यात अशोकचक्र ऐवजी हत्ती दिसायला लागला होता. एका राज्यातल्या राजकारणात "चिकन सूप आणि वडा" असा नवीन पदार्थ तयार झालं होता. प्रादेशिक पक्षांची एक गोष्ट अनाकलनीय असते. दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये जरा काही झालं कि यांना डायरेक्ट पंतप्रधान पदाची स्वप्न पडू लागतात. आणि अशी मोठी स्वप्न बघितली कि रेल्वे मंत्री किंवा कृषी मंत्रिपद तरी मिळूनच जाते !!
असो. तर या सगळ्या गोंधळातून कोणाला निवडून द्यावा हा निर्णय होत नाहीये . म्हणजे आमचा स्वत: च असं काहीच मत नाही असं नव्हे. पण आमच्या मनासारखा नेता निवडून जरी आला तरी एकशे वीस कोटी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं सोप नाहीये. मुळात सामान्य माणसाच्या अपेक्षा फार कमी असतात . पण वर्षानुवर्षे त्या कोणीच पूर्ण न केल्याने आता त्या डोंगर एवढ्या वाटतायेत. थोडा विचार केला तर सामान्य माणसाच्या अपेक्षा पुढील दोन ओळीत सांगता येतील आणि थोडा प्रयत्न केला तर त्या पूर्ण देखील करता येतील !!
थोडा हैं थोडे की जरुरत हैं
जिंदगी फिर भी यहा खुबसुरत हैं !!

---- चिनार

विनोदलेख

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 May 2014 - 12:47 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मस्तच रे चिनारा. सध्यातरी चहात साखर नको असे चहावाले म्हण्ता आहेत.तुमच्या त्या मोबाईलमध्ये वेळ दिसतेच. तेव्हा घड्याळाची गरजही संपली असावी.

चिनार's picture

13 May 2014 - 5:32 pm | चिनार

प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार

आत्मशून्य's picture

13 May 2014 - 3:41 pm | आत्मशून्य

मजा आली. लिहीत रहा.

चिनार's picture

13 May 2014 - 5:46 pm | चिनार

प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार

चिगो's picture

13 May 2014 - 3:53 pm | चिगो

खुसखुशीत लेखन..

यावर पोलिस कमिशनर म्हणतात , "अरे कुछ नही करते तो पुलिस में भरती हो जाओ !!!!"
तसंच काहीसं या नेत्याचं झालं असावं. " कुछ नही करते तो राजनीती में आजाओ. हमारे देश को प्रधानमंत्री कि बहोत जरुरत हैं !!! "

खिक्क.. =))

प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार

शिद's picture

13 May 2014 - 3:59 pm | शिद

या सामान्य माणसाची कथा काय वर्णावी महाराजा !! त्याला तर देश बदलण्याची इतकी घाई झाली होती की विचारू नका. " "चट मंगनी पट बिहा " !! एवढ्यावरच तो थांबला नाही तर , लग्न झाल्यावर काही दिवसातच म्हणजे संसार कसा करायचा हे कळायच्या आधीच बायकोशी "तात्त्विक" कारणांमुळे घटस्फोट !! मग लगेच दुसऱ्या लग्नाची तयारी.... दुसऱ्या लग्नानंतर तीन - चार वर्षातच दहा- बारा पोरांचा बाप होण्याची स्वप्न !!मग त्या पोरांना शिक्षण फुकट !! वीज फुकट !! पाणी फुकट !! अशी त्याची योजना होती. पण कोणतीही योजना घोषित करताना कुठेतरी कोपऱ्यात * conditions apply असं लिहायला तो विसरायचा नाही.

हि कोपरखळी झक्कास्सच जमली आहे.

चिनार's picture

13 May 2014 - 5:50 pm | चिनार

प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार

दुश्यन्त's picture

13 May 2014 - 6:42 pm | दुश्यन्त

झाडू/खराटा हे चिन्ह आधीही असायचे. अपक्षांना हे चिन्ह स्थानिक/विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेले आठवते. घड्याळाचे पण तसेच असावे. मात्र आता झाडू (आप) आणि घड्याळ (एनसीपी) अधिकृत चिन्ह असल्याने हे पक्ष लढत असलेल्या राज्यात तरी कुणा अपक्षांना वरील दोन्ही चिन्हे मिळणार नाहीत. कुठल्याही प्रादेशिक / राष्ट्रीय पक्षाचे अधिकृत चिन्ह हे फक्त त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला किंवा त्यांनी पुरस्कृत केलेल्या अपक्षालाच मिळू शकते,

विवेकपटाईत's picture

13 May 2014 - 7:16 pm | विवेकपटाईत

"अरे कुछ नही करते तो पुलिस में भरती हो जाओ !!!!"
"अरे कुछ नही करते तो आप में भरती हो जाओ !!!!"
सगळं फुकट मिळेल *fool*

हा लेख आजच्या लोकप्रभा अंकात प्रकाशित झाला आहे :-) :-)

http://epaper.lokprabha.com/275890/Lokprabha/30-05-2014#dual/26/1