नॉस्टॅल्जिआ

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
24 Apr 2014 - 10:55 am

आज मी नॉस्टॅल्जिक व्हायचे ठरवले.
म्हटले चला जरा पूर्वीसारखा
ग्यालरीत पाय पसरून,
कोरा करकरीत, घडी न मोडलेला,
खर्राखुर्रा पेपर हातात घेऊन,
वाफाळत्या चहा सोबत, एकीकडे बिस्कीटाचा तुकडा तोडत,
कोवळ्या सूर्यकिरणांना डोळ्यांवर पडु देत,
आतून येणार्‍या रेडीयोच्या खरखरीकडे दुर्लक्ष करत,
समोरच्या किलबिलणार्‍या झाडावर
-नी त्याच्याच मागील खिडकीवरही-
एक डोळा ठेवून,
चेहर्‍यावर येणारी चहाची वाफ हुंगत,
ताज्या दुधाचा, पहिल्या चहाचा,
पहिला घोट घेऊन पाहू.
पण छे! तु खिडकीत आलीस
मग कशाला नॉस्टॅल्जिक व्हायचे!?

=======

आज मी पुन्हा नॉस्टॅल्जिक व्हायचे ठरवले.
म्हटले चला जरा पूर्वीसारखा
ग्यालरीत पाय पसरून,
एकदाच घडी मोडलेला, खर्राखुर्रा पेपर हातात घेऊन,
एकीकडे बिस्कीटाचा तुकडा तोडत,
कोवळ्या सूर्यकिरणांना डोळ्यांवर पडु देत,
आतून येणार्‍या कुकरच्या शिटीकडे दुर्लक्ष करत,
मुलीच्या शाळेच्या तयारीवर
-नी मागून येणार्‍या बांगड्यांच्या किणकिणाटावर-
एक डोळा ठेवून,
तु पिठाने भरलेल्या हातून दिलेला,
ताज्या दुधाचा, पहिल्या चहाचा,
पहिला घोट घेऊन पाहू.
पण छे! तुझ्या हातचा चहा प्यायल्यावर
मग कशाला नॉस्टॅल्जिक व्हायचे!?

========

आज मी पुन्हा नॉस्टॅल्जिक व्हायचे ठरवले.
म्हटले चला जरा पूर्वीसारखा
ग्यालरीपर्यंत पोचून,
तिथे पडलेला, कुठला का असेना
खर्राखुर्रा पेपर हातात घेऊन,
वाफाळत्या चहा सोबत, एकीकडे बिस्कीटाचा तुकडा तोडायला जमवत,
कोवळ्या सूर्यकिरणांना डोळ्यांवर पडु देत,
आतून येणार्‍या आवाजांकडे दुर्लक्ष करत,
समोरच्या किलबिलणार्‍या झाडावर
-नी त्याहून अधिक काही दिसलं तर इतर कशावरही-
एक डोळा ठेवून,
चेहर्‍यावर येणार्‍या चहाच्या वाफेचा अंदाज घेत,
स्वतःच केलेल्या चहाचा,
चटका न बसता, न सांडता,
पहिला घोट घेऊन पाहू.
पण छे! तु आठवणीत आलीस नी
वेगळे नॉस्टॅल्जिक व्हायचे राहुनच गेले!

जीवनमान

प्रतिक्रिया

जेनी...'s picture

24 Apr 2014 - 11:12 am | जेनी...

ह्म्म !!

मुळ कवितेची कल्पना तशी वाटत नाही पण सहजच,

दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन
बैठे रहें तसव्वुर -ऐ -जाना किये हुए

हे गाणं आठवलं

शुचि's picture

24 Apr 2014 - 3:06 pm | शुचि

पहिल्यांदा ती समोरच्या खिडकीत येत असे -(१)
मग ती चहा बनवून देउ लागली - (२)
मग ती परत का गेली? - (३)
.
.
.
ओह ओके ओके ती स्वर्गवासी झाली ? :( WOW!!! A different poem!!! Very touching!

समीरसूर's picture

24 Apr 2014 - 3:49 pm | समीरसूर

कविता छान आहे.

आपले लाडके गायक मोहम्मद अझीझ यांचं एक गाणं होतं.

आजकल याद कुछ और रहता नही, एक बस आपकी याद आने के बाद
याद आने से पहले चले आईये, और फिर जाईये याद जाने के बाद...

आनंद बक्षींचा हा शाब्दिक झोल बहुधा 'नगीना' मधला होता. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं संगीत होतं. ऐकायला भारी आवडायचं. ही कविता वाचून या गाण्याची आठवण झाली. :-)

>> और फिर जाईये याद जाने के बाद..
हे डायरेक्ट ''जान जाने के बाद'' होतं!

पण त्या काळी आम्हाला चांद जाने के बाद- मंजे सकाळी! असं ऐकू यायचं :)
तो मो अझीझ काय गाणं बोल्तो कळायचं नाय!

समीरसूर's picture

2 May 2014 - 11:52 am | समीरसूर

बरोबर आहे; माझी चूक झाली. ते 'जान' आहे.

बाकी मो. अझीझ आणि शब्बीर कुमार हे दोन गायकरत्न हिंदी चित्रपट सृष्टीला पडलेले स्वप्नं आहेत. :-)

किसन शिंदे's picture

24 Apr 2014 - 6:58 pm | किसन शिंदे

आवडली. शुचिमामीने दिलेला अर्थ अभिप्रेत ठेवलाय कवितेतून

पैसा's picture

24 Apr 2014 - 11:21 pm | पैसा

शब्दात थोडा थोडा फरक करून अख्खं आयुष्य दाखवलंस की!

आज मी नॉस्टॅल्जिक होणार नाही असे ठरवले.
म्हटले चला नेहमीप्रमाणे,
ग्यालरीपर्यंत स्केटिंग करत येवून,
तिथे ठेवलेला, एक आर्ट पेपर
पेन पेन्सिल क्रेयोंसचा ढीग समोर टाकत,
वाफाळत्या बोर्नविटा सोबत, एकीकडे बिस्कीटाचा तुकडा ओरिओ सारखे चाखत,
कोवळ्या सूर्यकिरणांना पाठीवर घेत,
आतून येणार्‍या मॅगीच्या वासाकडे लक्ष देत,
समोरच्या किलबिलणार्‍या झाडावर
चिमण्या, खारुताई आणि त्या भारद्वाज पक्ष्यावर
मान उंचावून बघत,
चेहर्‍यावर येणारी वाफ फुंकून उडवत,
स्वतःच सांडलेल्या बोर्नविटाचा,
चटका बसता बसता वाचलेल्या,
पहिला घोट घेणारा बंकूकडे पाहून
मला लहानपणाचा विजयनाथच आठवला आणि
नेहमीप्रमाणे नॉस्टॅल्जिक झालो!
-भूतनाथ उर्फ कैलाशनाथ

विकास's picture

25 Apr 2014 - 1:22 am | विकास

आशय जरी शेवटी चटका देणारा असला तरी कविता आवडली...

रेवती's picture

25 Apr 2014 - 2:59 am | रेवती

अगदी आवडली कविता.

चित्रगुप्त's picture

25 Apr 2014 - 11:18 am | चित्रगुप्त

मुबारक बेगमचे हे गाणे आठवले:
https://www.youtube.com/watch?v=9-FuMAFtw9o&list=RDrpYFab53aqM

मदनबाण's picture

25 Apr 2014 - 11:20 am | मदनबाण

कविता आवडली.

कवितानागेश's picture

25 Apr 2014 - 6:46 pm | कवितानागेश

छान

निवेदिता-ताई's picture

25 Apr 2014 - 10:35 pm | निवेदिता-ताई

छान

वेल्लाभट's picture

2 May 2014 - 2:27 pm | वेल्लाभट

मस्त! जाम आवडली..... मस्तच्च