कविता क्रमांक एक

सुशेगाद's picture
सुशेगाद in जे न देखे रवी...
17 Apr 2014 - 10:05 pm

वारा शापित आत्म्यासारखं सैरावैरा इकडे तिकडे भटकतो , माझ्या गालांना , केसांना स्पर्शतो , तो स्पर्श तेवढा हलका नसतो , ती झुळूक नसते वाऱ्यामध्ये श्वास घेऊ शकत नाही इतका भन्नाट वारा.

पावसाच्या मातीचा पहिले सुंगध एखाद्या काचेच्या नक्षीदार बाटलीमध्ये साठवून ठेवावा बाकी सर्व रुक्ष ऋतुंमध्ये ती बाटली उघडावी आणि हळू हळू तो सुंगंध माझ्या सर्वांगात मिसळवून टाकावा.
अगदी ओल्या मातीसारख वाटायला हव मन

तुझ्या पापण्या खाली गेल्यावरच तुझ्याकडे बघायचं धाडस पुन्हा याव माझ्या डोळ्यात
पावसाच्या थेंबासारख्या कवितांची अक्षर तुझ्या विरहाच्या मेघातून बरसावीत.
एकेक क्षण खूप जड चाललाय. खूप वर्षापासून तरंग न उमटलेल्या तलावासारखा स्तब्ध.

एखाद्या संध्याकाळी चुकून झालेला स्पर्श परत आणून देशील का मी मातीच्या सुगंधाची बाटली रिती करेन तुझ्यासाठी.

काळ्या काळ्या कभिन्न दगडावर कोरलेल्या शिल्पाचे रेखीव ओठांना डोळे झाकून स्पर्श करू लागलो कि तुझ्या दाहक ओठांचा चटका बसतो. बहुतेक अश्याच एखाद्या वेळी शिल्पाच्या ओठांमधून सगळ्या सुखद वेदना शब्दरुपाने बाहेर पडत असतील.
मृत्युनंतर हाडांचा सापळा होऊन काही दिवसांनी मातीत मिसळून जाण काही विशेष नाही पण भावनांचं रितेपण त्याहून भयानक!

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

पैसा's picture

18 Apr 2014 - 12:01 am | पैसा

आह आणि वाह एकाच वेळी निघालं मनातून!

मलाही आवडली.शेवटचे "भावनांचे रितेपण" सपकन वार करुन गेले.

जेनी...'s picture

18 Apr 2014 - 12:15 am | जेनी...

मस्त .....

फार आधी कधितरी लिहिलेलं आठवलं ...

तू म्हणजे पाउस ,बरसणारी ,थेम्बा थेंबात जगणारी ,
सहवासाच्या खुणा तश्याच ओल्या मनात जपून ठेवणारी
वाहणार्‍या झर्‍याचं अवखळ रूप तू ,
तुझ्या खळखळन्यानेच बहुतेक मी तुझ्या जवळ आलो ...
मग कधी हरवलो कळलच नाहि ....
मी मोहापसुन दूर नव्हतो ..
पण तुझ्या सहवासानं मनातलं सगळच गुपित उघडं पाडलं .
कधीतरी तुझ्या आठवणी मी उश्याशी घेऊन बसतो ...
एक एक पाण आठवणीतलं ,माझा मीच वाचतो ...
त्यातच रमतो ,
कारण तुझ्या आठवणी माझ्यासाठी अवेळी येणार्‍या पावसासारख्या ...
.भिजणार्‍या ,भिजवणार्‍या ...
.तुझी ओढ संपता संपत नाही ..आता तर ती संपूच नये असं वाटतं ..
.थंडगार सरी सारखी सतत तु मनात रहावीस ...
थेंबाथेंबाचं रूप घेऊन दवबिंदुसारखी सजाविस .

मी कायम त्या पाणासारखा तुझा विसावा बनेन ..
.तुझ्या सुखदुखातला भागीदारहि बनेन ..
तु लांब आहेस असं क्षणभरहि वाटत नाहि ...
तुझ्या लांब गेलेल्या सावल्या आजहि जवळ आहेत ...
भावनांची कास धरुन !!
वेदनेशी सवांद असतो त्यांचा ..
.मिटलेल्या पापणीवरहि त्यांचा अधिकार ...
.ओठावरच्या हसण्याशी नाजुक संबध ..
मनाच्या इतकं जवळ आजवर तुझ्याशिवाय कुणीच येऊ शकलं नाहि ...
कदाचित तुझा दरवळ रातराणी सारखा असावा ..

तुझ्यामाझ्यातलं नातं शब्दातही मांडता येणार नाहि ...
विरहाचा ..दुराव्याचा त्याला जराहि गंध नाही
तु तुझ्यात नसुन ,कायम माझ्यात असतेस ..
बहरलेल्या मोगर्‍यासाऱख अलगद उमलु पहातेस
तुझ्या भावनिक स्पर्शाची आता इतकि सवय झालिय ..
तु आहेस जवळ ,हि कल्पनाच खुप गोड असते ...
शब्दात नसेल मांडता येत मला ...
पण सहवासातले सगळेच क्षण आजहि ताजे आहेत ..
तुझ्या प्रत्येक शब्दांची मनाला अजुनहि तेवढीच ओढ आहे...

आता तर असंही वाटुन जातं..

कदाचित ..आपलं भेटणं ...आपल्याच सुखाच्या कल्पना होत्या ..
काहि आपण रुजवल्या ..काहि आधिपासुनच रुजलेल्या होत्या ..

मार्मिक गोडसे's picture

18 Apr 2014 - 12:52 am | मार्मिक गोडसे

का कोनास ठाउक परंन्तु 'द ग्रेट एक्स्पेक्टेशन' ह्या चित्रपटातील Gwyneth Paltros व Ethan Hawke ह्यांच्या बालपणीचे कारंजाजवळिल पाणी पिताणाचे 'ते' दृश्य आठवले. व तो भव्य उदास वाडा समोर आला.

सुशेगाद's picture

18 Apr 2014 - 1:24 am | सुशेगाद

खुप दिवसांपासून कविता अशी प्रेम कविता लिहायचं सोडून दिल होत. अचानक वाटल कि प्रयत्न करून पाहून काय लिहू शकतो. याला खरच कविता म्हणायचं का नाही हे कळाल नाही आणि नावसुद्धा सुचत नव्हत म्हणून कविता क्रमांक एक अस नाव देऊन टाकल. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

स्पंदना's picture

19 Apr 2014 - 5:11 pm | स्पंदना

लिहीत रहा!

कवितानागेश's picture

19 Apr 2014 - 7:23 pm | कवितानागेश

छान लिहिलय. :)

आतिवास's picture

19 Apr 2014 - 8:36 pm | आतिवास

कविता आवडली.

शब्दांमध्ये काहीसा असा विराम घेतला तर परिणामकारकता वाढेल असं एक वाटलं.

वारा शापित आत्म्यासारखं सैरावैरा इकडे तिकडे भटकतो ,
माझ्या गालांना , केसांना स्पर्शतो ,
तो स्पर्श तेवढा हलका नसतो ,
ती झुळूक नसते वाऱ्यामध्ये श्वास घेऊ शकत नाही इतका भन्नाट वारा.
पावसाच्या मातीचा पहिले सुंगध
एखाद्या काचेच्या नक्षीदार बाटलीमध्ये साठवून ठेवावा
बाकी सर्व रुक्ष ऋतुंमध्ये ती बाटली उघडावी
आणि हळू हळू तो सुंगंध माझ्या सर्वांगात मिसळवून टाकावा.
अगदी ओल्या मातीसारख वाटायला हव मन