के-२ : द सॅव्हेज माऊंटन - १० (अंतिम)

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in भटकंती
9 Apr 2014 - 7:50 am

के-२ : द सॅव्हेज माऊंटन ही लेखमाला आज संपली. ही लेखमाला प्रकाशीत करु दिल्याबद्दल मिस़ळपाव प्रशासनाचा मी मनापासून आभारी आहे. एव्हरेस्टच्या तुलनेत के २ हे चढाईसाठी कठीण आणि के २ वरील संदर्भग्रंथही तुलनेने ब-याच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. या लेखमालेच्या निमीत्ताने माझ्या संग्रहातील पुस्तके आणि इंटरनेटवरील लेख पुन्हा वाचण्याचा योग आला.

ही लेखमाला आपल्याला कशी वाटली हे जरुर कळवा

*********************************************************************************************

के २ च्या इतिहासात १९८६ आणि २००८ ही दोन वर्षे सर्वात घातकी म्हणून नोंदली गेली आहेत. १९८६ च्या एका मोसमात के २ वर १३ गिर्यारोहक प्राणाला मुकले तर २००८ मध्ये एकाच चढाईच्या दरम्यान ११ गिर्यारोहकांनी मृत्यूला कवटाळलं. एकाच चढाईत सर्वात जास्त गिर्यारोहक मृत्यूमुखी पडण्याचा हा के २ वरील दुर्दैवी विक्रम होता. ( ८००० मी वरील शिखरावर एकाच चढाईत सर्वात जास्त गिर्यारोहक नंगा पर्वतावर १९३७ मध्ये मृत्यूमुखी पडले होते. कार्ल विनच्या जर्मन मोहीमेतील १६ गिर्यारोहकांचा राखिओत शिखराखाली कँप ४ वर अ‍ॅव्हलाँचमध्ये बळी गेला होता ).

२००८ च्या मोहीमेतील मार्को कन्फर्टोलाच्या दोन्ही पायांची बोटं फ्रॉस्टबाईटमुळे कापावी लागली. कन्फर्टोलाने २०१० मध्ये ल्होत्सेच्या चढाईत भाग घेतला, परंतु त्याला ७९९१ मी वर माघार घ्यावी लागली. २०१२ मध्ये त्याने पसांग शेर्पासह मनास्लूवर यशस्वी चढाई केली. २१ मे २०१३ ला कन्फर्टोलाने अखेर ल्होत्से शिखराचा माथा गाठला. आतापर्यंत त्याने ८००० मी वरील ८ शिखरांवर यशस्वी चढाई केली असून सर्व १४ शिखरांवर चढाई करण्याची त्याची मनीषा आहे !

डच गिर्यारोहक विल्को वॅन रूजेनही गिर्यारोहणात अद्यापही सक्रीय आहे. २००८ च्या के २ मोहीमेनंतर त्याने २०११ मध्ये अंटार्क्टीकातील सर्वोच्च शिखर माऊंट व्हिन्सेंटवर यशस्वी चढाई केली. सातही खंडांतील सर्वोच्च शिखरांवर आणि उत्तर आणि दक्षिण धृवांवर पोहोचलेला तो पहिला डच गिर्यारोहक आहे.

स्वीडीश गिर्यारोहक फ्रेड्रीक स्ट्रँगने २००८ च्या के २ मोहीमेनंतर २००९ मध्ये मकालू आणि ल्होत्से शिखरांवर यशस्वी चढाई केली. २०१० मध्ये त्याने गशेर्ब्रम १ आणि गशेर्ब्रम २ चा माथा गाठला. २०१२ मध्ये त्याने पुन्हा के २ वरील मोहीमेत भाग घेतला. यावेळी तो के २ च्या माथ्यावर पोहोचण्यात यशस्वी झाला. स्ट्रँग अद्यापही गिर्यारोहणात सक्रीय आहे.

रॉल्फ बेईच्या मृत्यूमुळे सेसील स्कॉग पूर्णतः खचली होती. काही दिवसांनी दु:खातून सावरुन तिने पुन्हा गिर्यारोहणाला सुरवात केली. २००९ मध्ये तिने स्कीईंग करून ग्रीनलँड ओलांडण्याची मोहीम आखली. २०१० मध्ये तिने संपूर्ण अंटार्क्टीका खंड ( बर्कनर आयलंड - दक्षिण धृव - रॉस आईस शेल्फ ) स्कीईंग करुन ओलांडण्याचा विक्रम केला. २०११ मध्ये तिने नॉर्वेपासून स्कीईंग करुन उत्तर धृव गाठला !

कोरीयन गिर्यारोहक किम जे सू आणि गो मी यंगने २००९ मध्ये नंगा पर्वतावर यशस्वी चढाई केली. खाली उतरत असताना बर्फाच्या कड्यावरुन कोसळून गो मी यंग मृत्यूमुखी पडली. किम जे सू आजही गिर्यारोहणात सक्रीय आहे.

२००८ च्या मोहीमेतील गिर्यारोहकांपैकी विल्को वॅन रुजेन, मार्को कन्फर्टोला, चिरींग दोर्जे आणि छोटा पसांग लामा यांनी आपले अनुभव आपापल्या पुस्तकांत मांडले आहेत.

२००८ च्या के २ च्या मोहीमेत ११ गिर्यारोहकांनी प्राण गमावले. यापैकी अनेक गिर्यारोहक सीरॅक कोसळल्यामुळे मृत्यूमुखी पडले असं वरकरणी दिसत असलं, तरीही मानवी चुका कितपत कारणीभूत होत्या ?

कँप ४ वरुन अंतीम चढाईसाठी मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने पाकीस्तानी पोर्टर आणि शेर्पांनी गिर्यारोहकांच्या आधी चढाईला सुरवात केली होती. अल्बर्टो झरीनही त्यांच्याबरोबर शिखराच्या मार्गाला लागला होता. मात्रं कँप ४ पासून काही अंतरावर असतांनाच पोर्टरनी सुरक्षा दोर बांधण्यास सुरवात केली होती. अर्थात शाहीन बेगचा अनुभव इथे कामाला आला असता, परंतु बेगला खाली परतावं लागलं होतं.

बॉटलनेकच्या आधीच सुरक्षा दोर वापरल्यामुळे बॉटलनेकमध्ये बांधण्यासाठी दोर कमी पडला आणि अर्थातच अंतीम चढाईच्या दृष्टीने उशीर होण्यास सुरवात झाली. अखेर बॉटलनेकच्या खालच्या उतारावरुन दोर मोकळा करुन बॉटलनेक मध्ये बांधण्यात फुकट गेलेल्या वेळामुळे शिखरावर पोहोचण्यास उशीर झाला होता.

विल्को वॅन रुजेनच्या म्हणण्याप्रमाणे बेस कँपवर असताना सर्वांनी शिखरापर्यंत मार्ग तयार करण्यासाठी सहकार्य करण्याचं कबूल केलं होतं. परंतु कँप ४ वर अनेक मोहीमांतील गिर्यारोहकांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही.

एड व्हिस्टर्सने रुजेनच्या या मतावर तीव्र टीका केली आहे. व्हिस्टर्सच्या मताप्रमाणे रुजेन स्वतः अनुभवी गिर्यारोहक होता. अशा परिस्थीतीत दुस-या कोणावर अवलंबून राहून त्याच्या तुकडीने जास्तीचा सुरक्षा दोर कँप ४ वर न नेणं हे अक्षम्य होतं. रुजेनने दुस-या अनेक मोहीमांतील गिर्यारोहकांचे पोर्टर आणि शेर्पा आपल्या चढाईसाठी बिनदिक्कतपणे वापरण्याचा प्रयत्न केला होता. ह्यूजेस डी'ऑब्रेडने आपले पोर्टर त्याच्या दिमतीला देण्यास नकार दिल्यावर रुजेनचा त्याच्याशी वाद झाला होता.

के २ च्या माथ्यावर पोहोचण्यासाठी घाई करण्या-या रुजेनच्या उतावळेपणामुळे त्याच्या प्राणावर बेतलं होतं. सर्बीयन गिर्यारोहकांच्या तुकडीतील शेर्पाने प्रसंगावधान राखून रुजेनला सावरलं नसतं तर ड्रेन मँडीकच्या आधी रुजेन बॉटलनेक मध्ये मरण पावला असता. रुजेनच्या क्रॅम्पॉनमुळे इसो प्लॅनीकच्या हाताला जखम झाली होती.

पेम्बा ग्याल्जे आणि कॅस डी गेवेलने प्रचंड दमलेल्या अवस्थेत असतानाही रुजेनच्या शोधासाठी सेसन मार्गावरुन खाली उतरण्यास सुरवात केली, दुस-या दिवशी पेम्बा आणि गेवेलने अखेर रुजेनला गाठलं. सेसन मार्गावरुन खाली येताना पेम्बाने रुजेन आणि गेवेलला अनेकवेळा खाली उतरण्यास मदत केली होती.

रुजेनच्या पुस्तकात मात्रं त्याने शेर्पांचा आणि त्यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख पूर्णपणे टाळला आहे. त्याच्या पुस्तकाचा एकंदर सूर निव्वळ आत्मप्रौढीचा आहे. केवळ आपल्या अनुभवाच्या जोरावर आपण दोन रात्री बायव्हॉक करून खाली उतरुन आलो हे नमूद करताना आपल्याबरोबर पहिल्या रात्री कन्फर्टोला आणि मॅक्डोनेल होते आणि सेसन मार्गावरुन खाली येताना पेम्बाने केलेल्या मदतीकडे त्याने सोईस्कर दुर्लक्षं केलं आहे.

बॉटलनेकमधील रॉल्फ बेईचा बळी घेणारा सीरॅक कोसळल्यावर त्यात सुरक्षा दोर गाडले गेले होते किंवा साफ तुटले होते. त्यामुळे बॉटलनेकमधील आधीच टेक्नीकल असलेली वाट आणखीनच धोकादायक झाली होती. त्यातच गिर्यारोहक सुरक्षा दोरावर अवलंबून असलेल्या गिर्यारोहकांना बॉटलनेकमधून उतरण्याची कामगीरी आवाक्याबाहेरची वाटत होती.

बॉटलनेक मधून सुरक्षा दोराविना खाली उतरुन येणं कठीण असलं तरी अशक्यं मात्रं निश्चीतच नव्हतं. लार्स नेसा, सेसील स्कॉग, पेम्बा ग्याल्जे, चिरीगं दोर्जे आणि छोटा पसांग लामा, कॅस वॅन डी गेवेल, किम जे सू हे दोराविना रात्रीच्या अंधारात बॉटलनेक उतरुन जाण्यात यशस्वी झाले होते. ह्यूजेस डी'ऑब्रेड मात्रं बॉटलनेकमध्येच कोसळला होता.

२००८ च्या के २ च्या मोहीमेतील अत्यंत गोंधळाचा विषय म्हणजे जेरार्ड मॅक्डोनेलचा मृत्यू नेमका कधी झाला ?

मार्को कन्फर्टोलाच्या मताप्रमाणे तो जुमीक भोटे आणि कोरीयन गिर्यारोहकांच्या सुटकेचा प्रयत्न करत असताना जेरार्ड मॅक्डोनेलने पुन्हा चढाईस सुरवात केली आणि तो वर दिसेनासा झाला. जेरार्डचा आपल्या मनावरील ताबा उडाला आणि त्या भरात तो खाली उतरण्याऐवजी पुन्हा वर चढाई करु लागला असा कन्फर्टोलाने निष्कर्ष काढला.

कन्फर्टोलाच्या या निष्कर्षाला अनेक गिर्यारोहकांनी आक्षेप घेतला आहे. सेसन मार्गाकडे सरकलेल्या विल्को वॅन रुजेनने मॅक्डोनेलला वरच्या अँकरच्या दिशेने चढताना पाहीलं होतं. त्याच्या मते अँकरपर्यंत जाऊन वजन ट्रान्सफर केल्यावर मॅक्डोनेल पुन्हा कोरीयन आणि जुमीकपाशी आला आणि कितीतरी वेळ त्यांना दोरांच्या जंजाळातून सोडवण्याचा प्रयत्न करत राहीला.

मार्को कन्फर्टोलाने अ‍ॅव्हलाँचमधे पाहीलेले अवशेष मॅक्डोनेलचे होते असं त्याचं मत होतं. कन्फर्टोलाने पाहीलेल्या गिर्यारोहकाने संपूर्ण लाल रंगाचा गिर्यारोहणाचा पोशाख घातला होता. असा पोशाख घातलेले फक्त तीन गिर्यारोहक होते. विल्को वॅन रुजेन, कॅस वॅन डी गेवेल आणि मेहेरबान करीम ! मॅक्डोनेलचा पोशाख लाल-काळ्या रंगाचा होता.

रात्रीच्या अंधारात मोठा पसांग भोटे आणि चिरींग भोटे चढाई करत असताना दोन गिर्यारोहक खाली कोसळल्याचं त्यांनी पाहीलं होतं. कॅस वॅन डी गेवेलनेही कोसळलेला गिर्यारोहक पाहीला होता. या दोन पैकी एक गिर्यारोहक ह्यूजेस डी'ऑब्रेड होता हे उघड होतं. पण दुसरा गिर्यारोहक कोण होता ? तो गिर्यारोहक कदाचीत तीनपैकी एक कोरीयन गिर्यारोहक असावा. रुजेम, कन्फर्टोला, मॅक्डोनेल आणि पसांग भोटे यांनी दोनच कोरीयन गिर्यारोहक पाहीले होते. त्यांच्याबरोबर असलेला तिसरा गिर्यारोहक रात्रीच खाली कोसळला असावा. अर्थात दुसरा गिर्यारोहक मेहेरबान करीम असण्याचीही शक्यता होतीच.

मोठा पसांग भोटे कोरीयन गिर्यारोहक आणि जुमीक भोटेपाशी पोहोचला तेव्हा ते जवळपास मोकळे झालेले होते. अर्थात स्वतः दोरांच्या गुंत्यातून सुटका करुन घेणं त्यांना अशक्यं होतं. त्यांना मदत करु शकेल असा एकच गिर्यारोहक तेव्हा तिथे होता तो म्हणजे जेरार्ड मॅक्डोनेल ! पेम्बा ग्याल्जेशी संपर्क होण्यापूर्वी मोठ्या पसांगने बेस कँपवर धाकट्या पसांग लामाशी संपर्क साधला होता. जुमीक आणि कोरीयन मोकळे झाल्याचं त्याने पसांग लामाला सांगीतलं होतं. स्वतः जुमीकने पसांग लामाला आपली सुटका झाल्याचं आणि आपण खाली उतरत असल्याचं सांगीतलं होतं. मोठा पसांग भोटे त्यांच्यापाशी पोहोचल्यावर आलेल्या रेडीओ संदेशातील अंतर पाहता तो पोहोचला तेव्हा ते जवळपास मोकळे झाले होते.

पेम्बा ग्याल्जेशी संपर्क झाल्यावर पसांगने त्याला लाल-काळ्या पोशाखातील गिर्यारोहक सीरॅक कोसळल्याने बळी पडल्याचं सांगीतलं. कपड्यांच्या वर्णनावरुनच पेम्बाने तो मॅक्डोनेल असल्याचं ओळखलं होतं. अर्थात स्वतः पसांग, जुमीक आणि दोन कोरीयन काही वेळातच सीरॅकला बळी पडले.

के २ वरील मोहीमेतील एक लख्ख उजळून दिसणारी बाजू म्हणजे गिर्यारोहकांनी दाखवलेलं असामान्यं धाडस !

ड्रेन मँडीकच्या मदतीसाठी फ्रेड्रीक स्ट्रँग आणि एरिक मेयरने केलेली चढाई हे एक उदाहरण. मँडीकचा मृतदेह खाली आणण्याच्या नादात जेहान बेगच्या अ‍ल्टीट्यूड सिकनेसमुळे स्ट्रॅंग, इसो प्लॅनीक आणि जोकोविचच्या जवळजवळ जीवावर बेतलं होतं.

आपल्या हार्नेसला सुरक्षा दोर बांधून छोट्या पसांग लामाला खाली आणण्याचं चिरींग दोर्जेचं धाडस हा देखील वेडेपणाच होता. दोघांपैकी एकाचाही तोल गेला असता तर दोघंही निश्चीत जीवाला मुकले असते. पसांगचा पाय घसरल्यावर त्यांना वाटणारी ही भीती जवळपास खरीही ठरली होती.

रॉल्फ बेईच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरुन सेसील स्कॉगला कँप ४ वर खाली उतरण्यास परावृत्त करण्यात तुलनेने अननुभवी असूनही लार्स नेसाने यश मिळवलं. शांत डोक्याने निर्णय घेऊन बॉटलनेकमधून रात्रीच्या अंधारात स्कॉगला सावरत उतरणं हे निश्चीतच सोपं नव्हतं.

चिरींग भोटे आणि मोठा पसांग भोटे मध्यरात्री बॉटलनेकच्या चढाईला लागले होते ! गो मी यंगला कँप ४ वर सुरक्षीत परत आणल्यावरही जुमीकच्या शोधात बॉटलनेकमध्ये जाणं हे जीवावरचं साहस होतं. जुमीक आणि कोरीयन गिर्यारोहकांपर्यंत पोहोचण्यात पसांग यशस्वीही झाला होता. आपल्या धाडसाचं मोल त्याला आपल्या प्राणांनी चुकवावं लागलं.

मार्को कन्फर्टोलाचा जीवानीशी वाचण्यास पेम्बा ग्याल्जेचं प्रसंगावधान कारणीभूत होतं. बॉटलनेकमधून मार्कोला कँप ४ वर परत आणण्यासाठी पेम्बा आणि गेवेलने पुन्हा चढाई केली होती. मार्कोला कँप ४ वर आणल्यानंतरही रात्रीच्या अंधारात पेम्बा आणि गेवेल रुजेनच्या शोधात सेसन मार्गावरुन खाली उतरले होते. गेवेलशी चुकामुक झाल्यावर पेम्बाने कँप ३ गाठून रुजेनचा शोध घेण्याची तयारी चालवली होती ! रुजेनशी भेट झाल्यावरही त्याला आणि गेवेलला बेस कँपवर आणण्यात पेम्बाने यश मिळवलं होतं.

या सर्वांचा मुकुटमणी ठरला तो जेरार्ड मॅक्डोनेल. मार्को कन्फर्टोलाच्या साथीने आणि कन्फर्टोला खाली गेल्यावर एकट्याने अविश्रांत धडपड करुन कोरीयन आणि जुमीकची सुटका करण्यात मॅक्डोनेल यशस्वी झाला होता. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांची सुटका करणा-या मॅक्डोनेलला आपला जीव मात्रं वाचवता आला नाही.

अर्थात लागोपाठ दोन रात्री उघड्यावर बायव्हॉक करुनही बेस कँपपर्यंत आपल्या पायांनी चालत येण्याची विल्को वॅन रुजेनची शारिरीक क्षमताही जबरदस्तच होती तशीच कॅस वॅन डी गेवेलचीही !

के २ वरील सुरक्षीत परत फिरण्याची वेळ ( टर्न अराऊंड टाईम ) दुपारी ३ ते ५ असते.

२००८ च्या मोहीमेत केवळ अल्बर्टो झरीन या वेळेत शिखरावर पोहोचून परत फिरला होता. इतर अनेक गिर्यारोहक रात्री ८ वाजेपर्यंत शिखरावर पोहोचले होते. योग्य वेळी परत फिरण्याची खबरदारी न घेतल्यामुळे अनेकांना रात्री अंधारातून वाट काढत कँप ४ गाठावा लागला होता किंवा बायव्हॉक करण्याची वेळ आली. सुरक्षा दोर कमी पडणे, अ‍ॅव्हलाँच, सीरॅक कोसळणे या इतकंच योग्य वेळी परत न फिरणं कितपत जबाबदार होतं ?

के २ च्या धोकादायक उतारांवर अजून किती गिर्यारोहकांना प्राणाला मुकावं लागणार आहे ?

***************************************************************************************

१९८६ च्या के-२ मोहीमांतील गिर्यारोहक :-
 

Rouse
अ‍ॅलन रोझ

Chomoux
बेनॉईट शामॉक्स

Kukuz
जेर्झी कुकुझ्का

pitro
तडेऊस पिट्रोवस्की

Diem
कर्ट डिअ‍ॅम्बर्गर

Tulis
जुली टुलीस

Barads
लिलेन आणि मॉरीस बराड

Wanda
वांडा ऋत्कीविझ

Renato
रेनाटो कॅसारॉट्टो

Wroj
वोसिच व्रोज

Wolf
डोब्रोस्लावा म्योडोविच्झ-वोल्फ

Bozik
पीटर बोझीक

Majer
जानुझ माजर

***************************************************************************************

२००८ च्या के-२ मोहीमांतील गिर्यारोहक :-
 

Mandik
ड्रेन मँडीक

Baig
जेहान बेग

Bae
रॉल्फ बेई

Skog
सेसील स्कॉग

Nessa
लार्स नेसा ( के २ च्या माथ्यावर )

Zarin
अल्बर्टो झरीन

DObred
ह्यूजेस डी'ऑब्रेड

Cas
कॅस वॅन डी गेवेल

Roojen
विल्को वॅन रूजेन

McDonnel
जेरार्ड मॅक्डोनेल

Pemba
पेम्बा ग्याल्जे शेर्पा

Confortola
मार्को कन्फर्टोला

Pemba-Jerard
पेम्बा ग्याल्जे आणि जेरार्ड मॅक्डोनेल ( के २ च्या माथ्यावर )

Kinkle
क्रिस किंकल

Strang
फ्रेड्रीक स्ट्रँग

eric
एरीक मेयर आणि चिरींग दोर्जे शेर्पा

Jumik
जुमीक भोटे शेर्पा

Soo
किम जे सू

Ho
गो मिंग हो

***************************************************************************************

संदर्भ :-

K2 : The Savage Mountain - चार्ल्स ह्युस्टन
All Fourteen 8000ers - रेनॉल्ड मेसनर
No Shortcuts to the Top: Climbing the Worlds 14 Highest Peaks - एड व्हिस्टर्स
K2 : Life and Death on Worlds Most dangerous Mountain - एड व्हिस्टर्स
K2 : Triumph & Tragedy - जिम करन
The Endless Knot - कर्ट डिअ‍ॅम्बर्गर
K2 - Challanging the Sky - कर्ट डिअ‍ॅम्बर्गर
Surviving K2 - विल्को वॅन रुजेन
No Way Down - ग्रॅहम बॉली
Days of Ice - मार्को कन्फर्टोला
Buried in the Sky: The Extraordinary Story of the Sherpa Climbers on K2's Deadliest Day - पीटर झुकरमन आणि अमांडा पाडॉन

क्रिस किंकलचा ८००० मी. ब्लॉग

याव्यतीरिक्त इंटरनेट वरील अनेक संकेतस्थळांवरील लेख आणि विकीपीडीयावरील अमुल्य माहीती.
सर्व फोटो इंटरनेटवरुन साभार

समाप्त

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

9 Apr 2014 - 9:56 am | प्रचेतस

धन्यवाद ह्या अप्रतिम मालिकेबद्दल.
निव्वळ थरारक.

बेकार तरुण's picture

9 Apr 2014 - 12:21 pm | बेकार तरुण

अप्रतिम. ले़खमालिका वाचणे हा अत्यंत थरारक अनुभव होता.
धन्यवाद

बाबा पाटील's picture

9 Apr 2014 - 1:11 pm | बाबा पाटील

आजपर्यंत वाचलेली सर्वोत्कृष्ठ लेख मालिका,अप्रतिम....!

निवेदिता-ताई's picture

9 Apr 2014 - 1:21 pm | निवेदिता-ताई

अप्रतिम

असंका's picture

9 Apr 2014 - 3:07 pm | असंका

ह्या विषयाबद्दल कसलीही माहिती नव्हती. तरीही खिळवून ठेवलंत.

ही कसली ओढ म्हणायची हो या जिगरबाज लोकांची....आणि केवढा त्याग...सर्वोच्च त्याग!

या विषयाबद्दल प्रथमच वाचण्यात आले,तेही तुझ्या अफलातून लेखनशैलीत. न थांबता पुढली लेखमालाही लवकर येउ दे ही विनंती!

राघवेंद्र's picture

9 Apr 2014 - 9:54 pm | राघवेंद्र

एका अनोळखी विषयावर सुंदर लेख मालिका !!!
अजुन येउ दे...

सुधीर कांदळकर's picture

10 Apr 2014 - 8:02 am | सुधीर कांदळकर

थरार, आशानिराशेचा खेळ, उत्तुंग आत्मविश्वास, विजिगीषु वृत्ती, चिकाटी, स्वार्थत्याग, मानवता, काय नव्हते या उत्कंठा वाढवीत जाणार्‍या या मालिकेत? या मालिकेचा मनावरचा ठसा दीर्घकाळ राहणार आहे. आता माउंट एव्हरेस्ट वाचायला घेतली आहे. धन्यवाद.

स्पार्टाकस's picture

10 Apr 2014 - 8:44 am | स्पार्टाकस

सर्वांचे मनापासून आभार..!!!

आगामी - एस्केप फ्रॉम डाऊन अंडर

मधुरा देशपांडे's picture

10 Apr 2014 - 7:50 pm | मधुरा देशपांडे

सगळे भाग सलग वाचायचे म्हणून प्रतिसाद दिला नव्हता. प्रत्येक भाग उत्तम,थरारक. याविषयी १ माहितीपट पाहिला होता. त्यापेक्षाही केवळ शब्दांनी तुम्ही जास्त खिळवून ठेवलंत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2014 - 8:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पार्टाकस खरं तर आपली लेखमाला सलग वाचू शकलो नाही, पुस्तकाची काही पानं चाळावी तशी चाळली. आपले लेखन निवांत वाचून दाद देईनच. उत्तम लेखमालेला ही केवळ पोच.

पुलेशु.

-दिलीप बिरुटे

इरसाल's picture

11 Apr 2014 - 1:40 pm | इरसाल

अतिशय छान.
पुढील लेखमालेच्या प्रतिक्षेत.

केदार-मिसळपाव's picture

11 Apr 2014 - 2:16 pm | केदार-मिसळपाव

तुमची लेखनमालिका अप्रतीम होती. प्रत्येक भागानंतर पुढील भागाची प्रतिक्षा असायची मला. फक्त एक सुचना कराविशी वाटते की पुढील लेखनमालिकेत जरा फोटो येवु देत. अंतरजालावरचेही चालतील. काय आहे ना की सर्व सामान्य वाचकाला वाचायला हुरुप येतो आणि चित्रांमूळे कथानक समजावयाला मदत होते. शेवटच्या भागातील चित्रांनी लेखनमालिकेच्या सर्व पात्रांची ओळख झाली. आता पुढील मालिकेत पहिल्या भागापासुन कथेतील पात्रांची ओळख होवु दे.

सिद्धेश सुभाश महाजन's picture

14 Apr 2014 - 2:28 pm | सिद्धेश सुभाश महाजन

आधिच्या ९ भागाची लिन्क इथे द्या. शोधायला कण्टाळा येतोय.

प्रचेतस's picture

14 Apr 2014 - 2:30 pm | प्रचेतस
पुणे तिथे काय उणे's picture

14 Apr 2014 - 5:12 pm | पुणे तिथे काय उणे

फारच सुन्दर. पण सगळि पुस्तके वाचुन, इतर सन्दर्भ पाहुन अस लिहणे कथिण आहे. ह्यातुन तुमचा अभ्यास अणि चजिद्द, जिद्द दिसते आहे.

धन्यवाद !

सिद्धेश सुभाश महाजन's picture

14 Apr 2014 - 9:52 pm | सिद्धेश सुभाश महाजन

धन्यवाद. :)

पैसा's picture

15 Apr 2014 - 8:17 pm | पैसा

अत्यंत थरारक मोहिमा, त्यात गेलेले असंख्य बळी आणि तरीही के२ वर विजय मिळवायची गिर्यारोहकांची जबर इच्छा. मालिका सुरेख झाली. एव्हरेस्टच्या मानाने भारतात फारसे परिचित नसलेले शिखर आणि मोहिमा.

मालिकेसाठी धन्यवाद!

मनराव's picture

22 Apr 2014 - 5:00 pm | मनराव

धन्यावाद....... एकदम मस्त मालिका..... अनेक जणांना प्राण मुकावे लागले हा भाग वेगळा......पण ते अनुभव उत्तम मांडलेत......

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Aug 2021 - 4:31 pm | अमरेंद्र बाहुबली

छान मालिका.

diggi12's picture

7 Mar 2024 - 5:38 pm | diggi12

थरारक