ठिपका

अनिरुद्ध अभ्यंकर's picture
अनिरुद्ध अभ्यंकर in जे न देखे रवी...
25 Jul 2008 - 4:29 pm

घडायचे ते घडले काही टळले नाही
त्या वळणावर तुला भेटणे चुकले नाही

कळले नाही कसा कधी संवाद संपला
वाद कधी मग सुरू जाहला कळले नाही

आज अचानक अर्थ असा हा समोर आला
त्या धक्यातुन शब्द कधी सावरले नाही

तू ओठांनी निर्धाराने खूप लपवले
पण डोळ्यांना तुझ्या कधी ते जमले नाही

तशी जुनी शब्दांची माझी ओळख आहे
पण अश्रूंना का त्या मी ओळखले नाही

मान्य कधीही केले नाही आपण चुकलो
दोघांमधले अंतर मग हे घटले नाही

बदलत गेला रस्ता अन मी बघत राहिलो
रस्त्यासंगे मला बदलणे जमले नाही

तू जाताना नजर तुझी माघारी वळली
का माघारी पाय तुझे पण वळले नाही?

बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना
मला कळेना का डोळे हे मिटले नाही

-अनिरुद्ध अभ्यंकर

कवितागझल

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

25 Jul 2008 - 4:50 pm | प्रियाली

अनिरुद्ध,

फारच सुंदर गझल.

बदलत गेला रस्ता अन मी बघत राहिलो
रस्त्यासंगे मला बदलणे जमले नाही

तू जाताना नजर तुझी माघारी वळली
का माघारी पाय तुझे पण वळले नाही?

वा! व्वा! सर्व शेर आवडले, उद्धृत अधिक आवडले.

केसु,

प्लीज प्लीज या गझलेचे विडंबन करा ना! ;)

केशवसुमार's picture

25 Jul 2008 - 5:33 pm | केशवसुमार

केसु, प्लीज प्लीज या गझलेचे विडंबन करा ना! ;) हा हा हा हा
प्रियालीताई
हल्ली कुठली ही कविता/ गझल वाचली की आम्हाला दादांचे एक गाणे आठवतं..

तपस्या भंग... करू नको दंग.. ग भलताच रंग.. तुझा ग बाई..
स्वांग साधूच घेतलय असल न् मला खर वाटत नाही
(निवृत्त साधू)केशवसुमार

मनस्वी's picture

25 Jul 2008 - 5:08 pm | मनस्वी

सगळे शेर सुंदर अनिरुद्ध.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

इनोबा म्हणे's picture

25 Jul 2008 - 5:09 pm | इनोबा म्हणे

सुंदर गझल...

बदलत गेला रस्ता अन मी बघत राहिलो
रस्त्यासंगे मला बदलणे जमले नाही

तू जाताना नजर तुझी माघारी वळली
का माघारी पाय तुझे पण वळले नाही?
या ओळी खासच...

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मदनबाण's picture

25 Jul 2008 - 5:11 pm | मदनबाण

अभ्यंकरजी फारच सुंदर .....

तू जाताना नजर तुझी माघारी वळली
का माघारी पाय तुझे पण वळले नाही?
हे फार आवडल..

(नजरेतील ओढ शोधणारा)
मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

मुक्तसुनीत's picture

25 Jul 2008 - 5:27 pm | मुक्तसुनीत

तुमची ही रचना वाचली. खूप आवडली. त्यानिमित्ताने थोडे लिहावेसे वाटले म्हणून लिहीतो आहे.

तंत्राच्या, काव्य करतेवेळी पाळायच्या पथ्यांच्या बाबतीत तुम्ही "पार एक्सलन्स" आहात हे पूर्वी सुद्धा म्हण्टले आहे. याकवितेमधे सुद्धा त्याचा प्रत्यय येतोच. काव्याची सखोल जाण असल्याशिवाय हे होणे नाही. मुरंब्यात मुरावे तसे तुम्ही काव्यात मुरला आहात. मी ही जी दिली ती तुम्हाला लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट असे तुम्हाला वाटेल. पण तसे खरेच नाही. मनापासून हे सांगतो आहे.

आशयाच्या बाबतीत , नवीन संकल्पनांच्या बाबतीत , त्या संकल्पना व्यक्त करायच्यासाठी योजलेल्या शब्दांच्या अभिनवपणाबद्दल मात्र तुम्ही आता लक्ष द्यावे असे मला सुचवावेसे वाटते. तुमची लेटेस्ट कविता घेऊ. मीटरपुरता विचार केला तर "आयुष्यावर बोलू काही" या कवितेची झटकन आठवण येते. मीटरचे तुम्ही बादशहा असल्याने , तुमची शब्दरचना चपखल आहे यात शंका नाही.

या ओळी पहा :

कळले नाही कसा कधी संवाद संपला
वाद कधी मग सुरू जाहला कळले नाही

या ओळीत व्यक्त झालेला भाव चिरपरिचित आहे. त्यादृष्टीने त्या ओळींमधून व्यक्त होणारा परिणाम सपाट होतो, त्यामध्ये पॉईग्नन्स येत नाही. तीच गोष्ट

मान्य कधीही केले नाही आपण चुकलो
दोघांमधले अंतर मग हे घटले नाही

या ओळींची. ओळी तंत्रशुद्ध आहेत, नेटक्या आहेत. पण संकल्पना आता चिरपरिचित आहे.

मात्र या ओळी पहा :

बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना
मला कळेना का डोळे हे मिटले नाही

हां . इथे काहीतरी नवे घडते. काहीशा ओळखीच्या प्रदेशातून कविता बाहेर येते, विरहाच्या दु:खातले काहीतरी टोकदार , खुपणारे दाखवते. कवितेने असे नवे प्रदेश दाखविणे गरजेचे आहे. "चांगल्या" कवितेकडून "ग्रेट" कवितेकडे जायचा मार्ग , हा असा न धुंडाळल्या गेलेल्या वाटांमधे असावा असे मला वाटते.

मी व्यक्त केलेल्या अभिप्रायांचा उद्देश तुम्हाला दुखविण्याचा नव्हता हे वेगळे सांगायला नको. एका चांगल्या दर्जाच्या कवीकडून असणार्‍या अपेक्षा व्यक्त करतो आहे. गैरसमज नसावा.

तू ओठांनी निर्धाराने खूप लपवले
पण डोळ्यांना तुझ्या कधी ते जमले नाही

तशी जुनी शब्दांची माझी ओळख आहे
पण अश्रूंना का त्या मी ओळखले नाही

हे तर सुरेखच!

(स्वगत - पुन्हा पुन्हा वर डोकं काढणार्‍या 'केशाला' टप्पू मारुन गप्प बसवायला अनिरुद्धला किती त्रास झाला असेल ना? :? :W )

चतुरंग

सर्किट's picture

25 Jul 2008 - 10:12 pm | सर्किट (not verified)

ह्याच दोन द्विपदी खूपच भावल्या !!!!

बाकी गझलही खणखणीत !

वा अभ्यंकर वा !

(स्वगतः कच्चा माल मिळाला रे!)

- सर्किट

विसोबा खेचर's picture

25 Jul 2008 - 5:41 pm | विसोबा खेचर

अनिरुद्धा, फार सुंदर गझल रे!

बर्‍याच दिवसांनी तुझे स्वत:चे ओरिजिनल काव्य वाचून खूप आनंद झाला..! :)

जियो..!

तात्या.

चित्तरंजन भट's picture

25 Jul 2008 - 6:09 pm | चित्तरंजन भट

गझल छान, सफाईदार, बोलती/बोलकी झाली आहे.

बघत राहिलो दूर तुला ठिपका होताना
मला कळेना का डोळे हे मिटले नाही
वाव्वा... सुरेख

आज अचानक अर्थ असा हा समोर आला
त्या धक्यातुन शब्द कधी सावरले नाही
वाव्वा...

पुन्हा एकदा तेच:
'भाव चिरपरिचित' असणे हा गझलेचा दोष असू शकत नाही. (इतर काव्यप्रकारांनाही हे लागू व्हावे) अगदी मीर आणि गालिब ह्यांच्या गझलांतही 'चिरपरिचत भाव' आणि 'कल्पना' आल्या आहेत. उदाहरणे शेकड्याने देता येतील. अशावेळी द्विपदीचा/शेराचा बोलण्याचा अंदाज, लहजा कसा आहे, हे बघायला हवे. केवळ काय सांगितले आहे (वेगळेपणा आहे का वगैरे) हे बघण्यापेक्षा कसे सांगितले आहे हे देखील बघायला हवे, असे ह्या क्षेत्रातले मर्मज्ञ म्हणतात.

मुक्तसुनीत's picture

25 Jul 2008 - 6:31 pm | मुक्तसुनीत

लहेजा , शैली याबाबतीत कवीला मुक्त दाद दिलीच आहे. परंतु जे सांगितले जात आहे ते "फ्लॅट" असू नये, आशय बहुपेडी असावा. "पेडेस्ट्रियन" दर्जा आणि गालिबसारख्यांच्या दर्जातला फरक म्हणजे रूढ संकल्पनांच्याच नवनवीन छटा, नवनवीन अर्थांचे दर्शन असा असतो.

चित्तरंजन भट's picture

25 Jul 2008 - 7:10 pm | चित्तरंजन भट

आधीच्या प्रतिसादातील "पुन्हा तेच" कवितेच्या समर्थनार्थ नव्हते. "परंतु जे सांगितले जात आहे ते "फ्लॅट" असू नये, आशय बहुपेडी असावा." ह्या वाक्याशी कुणीच असहमत होऊ शकत नाही. आपले हे वाक्य पहिल्या प्रतिसादात आले असते तर मी एवढे पाल्हाळ ;) लावले नसते.
"पेडेस्ट्रियन" दर्जा आणि गालिबसारख्यांच्या दर्जातला फरक म्हणजे रूढ संकल्पनांच्याच नवनवीन छटा, नवनवीन अर्थांचे दर्शन असा असतो.
ह्या विषयावर बरेच काही लिहिता येईल. स्वतंत्र विषय आहे. चिरपरिचित भाव असणे काही चूक नाही एवढेच सांगायचे होते. ह्या गझलेच्या संदर्भात नाही. "ग़ज़ल ये एक्सप्रेशन की शायरी है" हे उर्दू गझलकार निदा फ़ाज़लींचे मत इथे नमूद करावेसे वाटते. सरदार जाफरींनी गझलेला सहजावस्थेची कविता म्हटले आहे. गझल फक्त एक्सप्रेशनची कविता आहे किंवा नाही, हा आणखी एक वेगळा विषय.

मुक्तसुनीत's picture

25 Jul 2008 - 7:20 pm | मुक्तसुनीत

संवादात् जायते संबोधः ! :-)

मानस's picture

25 Jul 2008 - 6:42 pm | मानस

बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना
मला कळेना का डोळे हे मिटले नाही

ह्या ओळी विशेष आवडल्या. सुंदर रचना.

वरदा's picture

25 Jul 2008 - 7:04 pm | वरदा

बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना
मला कळेना का डोळे हे मिटले नाही

सह्हीच....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

सुचेल तसं's picture

25 Jul 2008 - 8:43 pm | सुचेल तसं

सहमत!!!

छान गझल!!!

http://sucheltas.blogspot.com

प्राजु's picture

25 Jul 2008 - 8:24 pm | प्राजु

कोणत्या शब्दांत कौतुक करू तुमचं!!

तू ओठांनी निर्धाराने खूप लपवले
पण डोळ्यांना तुझ्या कधी ते जमले नाही

तू जाताना नजर तुझी माघारी वळली
का माघारी पाय तुझे पण वळले नाही?

बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना
मला कळेना का डोळे हे मिटले नाही

हे शेर म्हणजे अत्युच्च.

अनिरूद्ध, आपली ही गझल मला काही इन्स्पिरेशन देऊ शकेल असे वाटते.

स्वगत : बाई गं.. तू सांगू नको कोणाला की, तू अनिरूद्ध अभ्यंकरांना गुरू मानतेस.. :(

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

25 Jul 2008 - 8:40 pm | धनंजय

तू ओठांनी निर्धाराने खूप लपवले
पण डोळ्यांना तुझ्या कधी ते जमले नाही

इथे "तू"चे ओठ शिस्तबद्ध आहेत, डोळे घात करतात. विश्वासघातकी ओठांबद्दलचा एक शेर आठवला :
अपनी आवाज़ की लर्ज़िश पे तो काबू पा लो
प्यार के बोल तो होठों से निकल जाते हैं ।

(कवी?)

मानस's picture

26 Jul 2008 - 1:25 am | मानस

अपनी आवाज़ की लर्ज़िश पे तो काबू पा लो
प्यार के बोल तो होठों से निकल जाते हैं ।
(कवी?)

बहुतेक "हसरत मोहानी"

बेसनलाडू's picture

25 Jul 2008 - 9:14 pm | बेसनलाडू

उत्तम गझल. आवडली. बाकी चर्चा सवडीने.
(आस्वादक)बेसनलाडू

अनिरुद्ध अभ्यंकर's picture

26 Jul 2008 - 11:48 am | अनिरुद्ध अभ्यंकर

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापसून आभार!
(आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर

अनिल हटेला's picture

26 Jul 2008 - 12:52 pm | अनिल हटेला

बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना
मला कळेना का डोळे हे मिटले नाही

सही !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~