अहमदाबाद-गांधीनगर_१

अमितसांगली's picture
अमितसांगली in भटकंती
1 Mar 2014 - 11:53 am

तर मग ठरले! अचानक मिळालेल्या सुट्टीचा पुरेपूर उपभोग घेण्याचा निश्चय करूनच कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यास सुरुवात केली. त्याचे झाले असे कि १६ फेब्रुवारीला महारक्तदान असल्यामुळे कॉलेजमध्ये पाटी टाकावी लागली. त्याची भरपाई सुट्टी मंगळवारी व बुधवारी शिवजयंती असा भांगयोग नशिबात कधी नव्हे तो जुळून आला. पण हे सगळे सोमवारी दुपारी कळले. त्यामुळे नशेतच सगळे विचारचक्र घुमू लागले. पहिल्यांदा खिशात हात घातला व सुटकेचा निश्वास टाकला. मग सगळ्यात पहिल्यांदा ओरंगाबादचा विचार आला पण ते इथे पलीकडेच असल्याने जेवढ्या लवकर आला त्याच वेगात निघून गेला. मग खूप दिवसापासून इंदोरला भेट देण्याचा विचार होता पण तिथे सगळी मंदिरे असल्याने न जाण्याचा सल्ला मिळाला. नंतर उदयपुर ठरले पण तिकडे जायला जवळपास १८ तास लागतात. म्हणजे मला दुपारी ३ वाजताची बस कशीही करून पकडावी लागणार होती व ते काही केल्या शक्य नव्हते. मग सरतेशेवटी अहमदाबाद माझ्या मनाच्या नकाशावर आले. लगेच गुगलकरून बघण्यासारखे काही आहे का याची खात्री करून बसचे वेळापत्रक बघितले. सगळे अगदी गुदगुल्या करण्यासारखे जुळून आले व शेवटी अहमदाबादवर शिक्कामोर्तब झाला. एव्हाना दुपारचे ३ वाजले होते व सगळी तयारी करून ९ची बस पकडायची होती. सगळ्यात मोठा प्रश्न कॅमेराचा होता कारण जवळची सगळीच दौऱ्यावर असल्याने व बाकीचे मित्र लांब राहत असल्याने जुळणी जवळपास अशक्य झाली. मग काय? कॉलेजमधून गाडी सरळ स्वारगेटजवळच्या मॉलमध्ये घातली व निकॉनचा L820 मॉडेल उचलले. बाकीची किरकोळ तयारी करून कशीबशी ९ची पटेलची आरामबस पकडली. दिवसभर अगोदरच दमलो असल्याने सकाळी ६च्या दरम्यान सुरतला पोहोचल्यावरच जाग आली. जवळपास ११.३०च्या सुमारास अहमदाबादला पोहचलो. अगोदरच खूप उशीर झाल्याने बस वगैरे शोधण्याच्या नाद सोडून देवून सरळ रिक्षावाल्याला गाठले व किरकोळ बाचाबाचीनंतर जवळपास ४० किमी.वर असणाऱ्या अक्षरधामच्या दिशेने प्रयाण सुरु केले.

अहमदाबादमधील रस्ते अतिशय स्वच्छ व प्रशस्त आहेत. पण रस्त्याची रुंदी जास्त असल्याने कुठे सिग्नल नाही त्यामुळे सगळे कशी तळीरामांसारखे गाडी चालवितात. रस्त्यावर डिजिटल फलक मात्र अतिशय दुर्मिळ(सगळीकडे मोदी असतील असे वाटले होते पण पूर्णपणे अपेक्षाभंग).

प्रवासाची रूपरेषा :
१. अक्षरधाम मंदिर, गांधीनगर : अहमदाबादपासून ४० किमी अंतरावर आहे. (मंदिर पाहण्यास लागणारा कालावधी: ३ तास )
२. अडालज वाव : अक्षराधामपासून १८ किमी. अंतरावर आहे. बसने किंवा वडापने अगदी आरामात पोहचू शकता. (कालावधी : ४०-४५ मि.)
३. हाथीसिंग जैन मंदिर : अडालजपासून १० किमी अंतरावर आहे. दिल्ली दरवाजाला जाणारी कोणतीही बस पकडा. (कालावधी : २५-३० मि.)
४. साबरमती रिव्हरफ्रंट : हाथीसिंग जैन मंदिरापासून १ किमी अंतरावर आहे.(कालावधी : १-१.३० तास)

अक्षरधाम: स्वामीनारायण या मनुष्यरूपी देवाचे हे सुंदर मंदिर. जवळपास ६००० गुलाबी दगडांचा वापर करून १००० कारागिरांनी आपली कला समर्पित करून हि अदभुत वास्तू उभारली आहे. आत प्रवेश केल्याबरोबरच आपल्याला एक सुंदर बगीचा व हत्तीचा आकार दिलेली झाडे बघायला मिळतात. मंदिराच्या सभोवताली स्वामीनारायण यांचे विचार कोरले आहेत. स्वामीनारायण यांनी वयाच्या ११व्या वर्षी गृहत्याग करून ७ वर्षात १२०० किमी.ची भारत भ्रमंती करून हिंदू धर्माच्या विचारांचा प्रसार केला होता.

a

मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर ५० रुपयांचे तिकीट काढून एक प्रदर्शन होते. त्याच्या पहिल्याच टप्यात एक सुंदर दृश्य होते. एका बाजूला असंख्य दगडे पडली होती तर दुसर्या बाजूला एक मूर्ती होती जिच्या हातामध्ये हातोडा व छिन्नी होती. हातोडा हे ताकतीचे तर छिन्नी हे बुद्धीचे प्रतिक होते. ताकद व बुद्धीच्या योग्य मिलाफातूनच मनुष्य श्रेष्टत्वाला पोहचतो नाहीतर त्याचा दगडच बनतो हाच संदेश हि मूर्ती देत होती. त्यानंतर एका अरुंद वाटेने जंगलात आलो जिथे सिंह डरकाळ्या फोडत होता, गोरिला विखारी नजरेने बघत होता, अजगर एका झाडावर लटकत होते आणि थंड हवा मनाला शांत करीत होती. काही काळासाठी खरोखरच जंगलात आल्याचा भास होत होता. त्यानंतर स्वामीनारायण यांच्या जीवनावरचा दृक-श्राव्य कार्यक्रम दाखविण्यात आला जो अतिशय भंपक होता. व नंतर महाभारतातील प्रसंगावर आधारित विविध देखावे दाखविण्यात आले. पुढे स्वामीनारायण यांचा जीवनप्रवास उलगडणारा व त्यांनी वापरलेल्या वस्तूंवर आधारित एक छोटेसे संग्रहालय आहे.

a

२००२च्या अतिरेकी हल्ल्यानंतर मंदिराची सुरक्षाव्यवस्था अतिशय कडक केली आहे. आपले सगळे सामान आपल्याला बाहेरच जमा करावे लागते. इतकेच काय कमरेचा पट्टा, पाकीटसुद्धा काढून तपासणी केली जाते. आतमध्येच १०० रुपये घेऊन २ तासात फोटो काढून देण्याची व्यवस्था केली आहे.

अडालज वाव : वाव म्हणजे पायऱ्यांची विहीर. हि विहीर १४००व्या शतकाच्या अखेरीस राजपूत राणी रुदाबाई यांच्या स्मरणार्थ बांधली होती. प्रवासी तसेच गावकर्यांना विश्रांतीचे एक ठिकाण म्हणून सुरुवातीस याचा वापर होत असे. अशा प्रकारच्या अनेक विहिरी गुजरातच्या विविध भागात आहेत. नंतर याचा उपयोग प्रामुख्याने पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी होऊ लागला.

a

a

हि विहीर अक्षरधाम मंदिरापासून साधारणता १८ किमी.च्या अंतरावर अहमदाबाद-गांधीनगर महामार्गावर आहे. जवळपास ७५ मी. लांब असलेली हि विहीर १६ खांबावर जवळपास ६०० वर्षानंतर भक्कम स्थितीत उभी आहे. विहिरीची रचनाच अशी केली आहे कि सूर्यकिरणे व्कचितच पाण्याला स्पर्श करतात त्यामुळे असे म्हणाले जाते कि बाहेरच्यापेक्षा पाण्याचे तापमान ५-६ अंशाने कमी असते.

a

a

a

हाथी सिंग जैन मंदिर: जैन तीर्थकार धर्मनाथ यांना समर्पित केलेले हे मंदिर. हाथीसिंग या व्यापाऱ्याने हे मंदिर बांधण्यास सुरुवात केली होती. पण हे मंदिर पूर्ण होण्याआधी वयाच्या ४९व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पुढे त्यांच्या पत्नीच्या देखरेखीखाली मंदिराचे काम पूर्ण झाले. त्यामुळे हे मंदिर हाथीसिंग याच नावाने प्रसिद्ध झाले.

a

a

a

अतिशय शांत व प्रेक्षणीय स्थळ. स्थापत्यकलेचा एक अदभुत अविष्कार. अतिशय देखणे कोरीव काम.

a

संध्याकाळी ७च्या आसपास जैन मंदिर बघून झाल्यानंतर जवळच असणाऱ्या साबरमती रिव्हरफ्रंटला भेट देण्याचा विचार होता. पण एकतर खूप कंटाळलो होतो व ज्या मित्राकडे राहायला जाणार होतो तो दुसऱ्या टोकाला राहत होता (जवळपास २ तासांचा प्रवास) त्यामुळे साबरमतीचे दुरूनच दर्शन घेतले व गुजराती थाळीवर ताव मारून दिवसाची दिवसाचा अध्याय संपवला.

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

1 Mar 2014 - 8:49 pm | आयुर्हित

हाथी सिंग जैन मंदिर कोणते आहे? ते कीर्ती/विजय स्तंभांसारखे ते का?
शेवटचे तीन फोटो कुठले आहेत?

पहिले दोन्ही फोटोवरून काढलेले फोटो आहेत असे वाटते.

सहावा आणि सातवा फोटो खासच आला आहे.
धन्यवाद.

रमेश आठवले's picture

1 Mar 2014 - 10:44 pm | रमेश आठवले

विजय स्तम्भाच्या फोटो नंतरचे (शेवटचे) तीन फोटो मंदिराचे आहे. हाथीसिंग नावाच्या जैन शेटजींनी हे मंदिर बांधले.

रमेश आठवले's picture

1 Mar 2014 - 11:26 pm | रमेश आठवले

विजयस्तंभ हा जैन मंदिराच्या परिसरातच आहे.

खटपट्या's picture

1 Mar 2014 - 10:52 pm | खटपट्या

छान फोटो

कंजूस's picture

2 Mar 2014 - 7:54 pm | कंजूस

झटपट
आणि छान .पाहाण्यासाठीचा लागणारा वेळही दिलात .नवीन कैमऱ्याची (L820)झलक
आणि सुरुवात दिमाखात झाली आहे .आमच्यापर्यंत लगेच पोहोचवलंत धन्यवाद .

प्रसाद१९७१'s picture

3 Mar 2014 - 10:49 am | प्रसाद१९७१

मोदींच्या अहमदा बाद चे पण फोटो टाका, उत्सुकता आहे. साबरमती रिव्हरसाईड वाक केलात का?

वा! वा! जुन्या आठवणी ताज्या केल्यात!

२००५-२००७ या काळात दर तीन महिन्यांनी गांधीनगरला जाणं व्हायचं. ३१ मार्चपासून सलग दोन महिने तिथेच. मला ते शहर प्रचंड म्हणजे बेफाट आवडलं होतं. मोकळे रुंद रस्ते, रहदारीचा पूर्ण अभाव, प्रत्येक सेक्टरचं मार्केट, ट्रॅफिक आयलंडवर चाटबीट खाणारे लोक वगैरे. तिथल्या लोकांशीही दोस्ती झाली होती. दर शुक्रवारी जवळच्या थेटराचा मॅनेजर फोन करून कोणता चित्रपट लागणार आहे वगैरे सांगायचा. पानवाला थेट पान भरवायचा. वेळप्रसंगी तीर्थाचीही सोय करायचा. ;)

एकदाच मला गांधीनगरात ट्रॅफिक जॅम लागला होता तेव्हा मी इतका आश्चर्यचकित झालो होतो की बसमधून उतरून नक्की काय झालंय बघायला दीड किलोमीटर चालत गेलो!

मला ते गाव इतकं आवडलं होतं की तिथे सेटल वगैरे व्हायचे विचार डोक्यात येत!

बॅटमॅन's picture

3 Mar 2014 - 6:06 pm | बॅटमॅन

मस्त आहेत हो फटू!! भारीच.

मुक्त विहारि's picture

3 Mar 2014 - 9:41 pm | मुक्त विहारि

आणि तितकाच सुंदर लेख

अत्रुप्त आत्मा's picture

3 Mar 2014 - 10:48 pm | अत्रुप्त आत्मा

लै लै झ्याक फोटू... लै लै झ्याक! http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/aokay-hand-gesture-smiley-emoticon.gif

जेपी's picture

4 Mar 2014 - 10:20 am | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

पैसा's picture

10 Mar 2014 - 2:54 pm | पैसा

लिखाण आणि फटु फार छान! पुढचा भाग कधी?