स्वातंत्रोत्तर भारताचा राजकीय इतिहास-भाग ३: राष्ट्रपतींचे अभिभाषण

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
6 Feb 2014 - 11:32 am
गाभा: 

स्वातंत्रोत्तर भारताचा राजकीय इतिहास-भाग ३: राष्ट्रपतींचे अभिभाषण

राज्यघटनेतील तरतुदींप्रमाणे लोकसभा निवडणुक झाल्यानंतर झालेले लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या आणि प्रत्येक कॅलेंडर वर्षातील पहिल्या अधिवेशनाच्या सुरवातीला राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीपुढे अभिभाषण करतात.या अभिभाषणाचा मसुदा केंद्रीय मंत्रीमंडळाने बनविलेला असतो आणि राष्ट्रपती ते भाषण केवळ वाचून दाखवितात.अभिभाषणाबद्दल राष्ट्रपतींचे आभार मानणारा 'धन्यवाद प्रस्ताव' संसदेकडून पास केला जातो.मुळात अभिभाषणाचा मसुदा केंड्रीय मंत्रीमंडळाने बनविलेला असल्यामुळे त्यात सरकारच्या धोरणांचा अंतर्भाव होतो.त्या कारणामुळे या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत सरकारच्या एकूणच कारभारावर चर्चा होते.हा धन्यवाद प्रस्ताव समजा लोकसभेत फेटाळला गेला तर त्याचा अर्थ लोकसभेचा सरकारच्या धोरणांवर विश्वास नाही असा त्याचा अर्थ होतो आणि सरकार सत्ताभ्रष्ट होते. सरकार हे केवळ लोकसभेलाच जबाबदार असल्यामुळे राज्यसभेने जरी धन्यवाद प्रस्ताव फेटाळला तरी त्याचा सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होत नाही.

नोव्हेंबर १९९० मध्ये वि.प्र.सिंगांचे सरकार पडून काँग्रेसच्या पाठिंब्यावर चंद्रशेखर यांचे सरकार सत्तारूढ झाले. इंदिरा गांधींनी चरणसिंगांना पाठिंबा देऊन पुढील निवडणुकीपर्यंत ते सरकार स्टॉप-गॅप अ‍ॅरेन्जमेन्ट म्हणून वापरले तसेच चंद्रशेखर सरकारबाबत राजीव गांधी करणार ही गोष्ट अगदीच उघड होती.फक्त ते कधी होणार हाच प्रश्न होता.इंदिरा गांधींनी चरणसिंगांचा पाठिंबा अगदी एक महिन्यातच काढला होता.पण त्या मानाने चंद्रशेखरांना जवळपास चार महिने मिळाले.

काँग्रेस पक्ष चंद्रशेखरांचा पाठिंबा काढून घेण्यासाठी निमित्त शोधत होता अशा प्रकारच्या चर्चांना पाठबळ मिळावे अशी एक घटना २८ फेब्रुवारी १९९१ रोजी घडली. हरियाणा पोलिसांमधील दोन कॉन्स्टेबल्सना राजीव गांधींच्या दिल्लीतील घरावर पाळत ठेवल्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक झाली. त्या विरोधात काँग्रेस पक्षाने संसदेच्या कामकाजावर बहिष्कार घातला.वास्तविकपणे त्या दोन पोलिसांना अटक आणि नियमांतर्गत इतर कारवाई होत असताना हा मुद्दा पक्षाने इतका ताणून धरायची गरज होती असे वाटत नाही. त्यातच ६ मार्च १९९१ रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव लोकसभेत मतदानासाठी आला. त्यावेळी सभागृहात सत्ताधारी पक्षाचे जवळपास ६० तर विरोधी पक्षांचे २५० पेक्षा जास्त सदस्य हजर होते.सरकारचा पराभव निश्चित होता.अशा वेळी पंतप्रधान चंद्रशेखर बोलायला उभे राहिले.सरकारचा पराभव होणार हे निश्चित असल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायची घोषणा केली. त्यांनी लोकसभा अध्यक्ष रवी रे यांना सभागृह काही काळासाठी स्थगित करायची विनंती केली आणि पंतप्रधानांनी राष्ट्रपती आर.वेंकटरामन यांची भेट घेऊन राजीनामा दिला.

चंद्रशेखर यांच्या राजीनाम्यानंतर एका आठवड्यात संसदेने इतर महत्वाचे कामकाज पूर्ण केले.त्यात आर्थिक वर्ष १९९१-९२ च्या पहिल्या चार महिन्यांसाठीच्या लेखानुदानाला मंजुरी देणे आणि अन्य काही बिलांचा समावेश होता.त्यानंतर आठवड्याने म्हणजे १३ मार्च १९९१ रोजी नववी लोकसभा अवघ्या १५ महिन्यात विसर्जित झाली आणि मध्यावधी निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला.या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान २१ मे १९९१ रोजी राजीव गांधींची हत्या झाली.त्यानंतर महिन्याने २१ जून १९९१ रोजी पी.व्ही.नरसिंह राव पंतप्रधान झाले.नव्या सरकारने नवीन आर्थिक निती अवलंबली. १९९१ नंतरचा भारत त्यापूर्वीच्या भारतापेक्षा बराच वेगळा आहे.त्या सगळ्याची सुरवात झाली राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील मतदानाच्या वेळी म्हणजे ६ मार्च १९९१ रोजी.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2014 - 1:20 pm | श्रीगुरुजी

१९९६ साली वाजपेयींनी प्रथमच पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर संसदेचे अधिवेशन सुरू झाले. त्यात राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांनी अभिभाषण केले. परंतु वाजपेयींनी पुढील काही दिवसातच राजीनामा दिल्याने देवेगौडाला लॉटरी लागून नवीन सरकार सत्तेवर आले. नवीन सरकारने राष्ट्रपतींच्या अभिभाषणासाठी राष्ट्रपतींचे आभारप्रदर्शन करण्याचा ठराव मांडून मंजूर करण्याची औपचारिकता पूर्ण करण्याची प्रथा न पाळण्याचे ठरविले कारण ते भाषण आधीच्या सरकारने तयार केले होते. स्वतंत्र भारतात अभिभाषणाबद्दल राष्ट्रपतींचे औपचारिक आभार न मानण्याचा हा बहुधा पहिलाच प्रसंग असावा.

क्लिंटन's picture

6 Feb 2014 - 1:49 pm | क्लिंटन

हो बरोबर. वाजपेयींचा शपथविधी झाला १६ मे १९९६ रोजी.त्यांच्याकडे बहुमत नव्हते हे अगदी स्पष्ट होते.त्यामुळे इतर कोणत्या पक्षांचा पाठिंबा मिळाला असता तरच सरकार तरायची थोडी तरी शक्यता होती.आणि १९९६ ची परिस्थिती लक्षात घेता अयोध्या, समान नागरी कायदा आणि कलम ३७० या तीन मुद्द्यांमुळे भाजपला इतरांचा पाठिंबा मिळणे कठिणच होते. अशा वेळी २४ मे १९९६ रोजी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मांचे अभिभाषण झाले.त्यात वाजपेयी सरकारने या तीन विवादास्पद मुद्द्यांचा उल्लेख अभिभाषणात केला नव्हता.इतर पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी केलेला हा प्रयत्न असावा का? अर्थातच वाजपेयींना इतर कोणाचाही पाठिंबा मिळाला नाही आणि २८ मे रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव चर्चेस येण्यापूर्वीच सरकार कोसळणे हा प्रकार इतिहासात पहिल्यांदाच झाला. त्यामुळे या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव हा अर्थहिन झाला.कारण त्या अभिभाषणात जुन्या सरकारच्या धोरणांचा अंतर्भाव होता आणि ते सरकार त्यापूर्वीच पडले होते.त्यामुळे तो धन्यवाद प्रस्ताव चर्चेला आणि मतदानाला आला नाही.

याविषयी राष्ट्रपतींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह नक्कीच उभे राहते.एकतर वाजपेयींकडे बहुमत नसताना आणि लोकसभेचे सव्वा तीनशे खासदार देवेगौडांना पाठिंबा द्यायला तयार असताना राष्ट्रपतींनी वाजपेयींना सरकार स्थापन करायला पाचारण करणेच मुळात गैर होते असे मला वाटते.त्यातच सरकारने बहुमत सिध्द करायच्या आधीच त्याच सरकारने तयार केलेले अभिभाषणही राष्ट्रपतींनी वाचून दाखविले--या अभिभाषणात अद्याप बहुमत सिध्द न केलेल्या सरकारच्या धोरणांचा समावेश असेल हे पक्के माहित असतानाही.हे कितपत योग्य आहे?

या अनुभवातून धडा घेऊन मार्च १९९८ मध्ये वाजपेयींचे सरकार परत स्थापन झाल्यानंतर राष्ट्रपती के.आर.नारायणन यांनी सरकारला आधी बहुमत सिध्द करायला सांगितले आणि नंतरच अभिभाषण केले.

पैसा's picture

8 Feb 2014 - 6:55 pm | पैसा

उत्तम माहिती. अतिशय मनोरंजक आणि माहितीपर असा लेख आणि क्लिंटनची प्रतिक्रिया आहे.

हल्ली दिल्ली विधानसभेतही सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापनेसाठी प्राधान्याने बोलावले होते. म्हणजे तशी प्रथा आहे असे दिसते. जर तेव्हा वाजपेयींनी नकार दिला असता तर अन्य पर्यायांचा विचार केला गेला असता. जे झाले ते प्रथेनुसारच झाले असावे असे दिसते.

विजुभाऊ's picture

9 Feb 2014 - 2:55 pm | विजुभाऊ

राष्ट्रपतींनी वाजपेयींना सरकार स्थापन करायला पाचारण करणेच मुळात गैर होते असे मला वाटते.
ते जे काही बहुमत होते त्याला भाजपच्या थोर नेत्यानी "जनादेश" असे संबोधले होते.