सोयीस्कर गांधीवाद

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जनातलं, मनातलं
1 Feb 2014 - 5:40 pm

Premise Four: Civilization is based on a clearly defined and widely accepted yet often unarticulated hierarchy. Violence done by those higher on the hierarchy to those lower is nearly always invisible, that is, unnoticed. When it is noticed, it is fully rationalized. Violence done by those lower on the hierarchy to those higher is unthinkable, and when it does occur is regarded with shock, horror, and the fetishization of the victims.
-Derrick Jensen (Endgame)

The world has enough for everyone's need, but not enough for everyone's greed
-M.K.Gandhi

The hottest places in hell are reserved for those who, in a time of moral crisis, remain neutral.
-Dante Alighieri

We have met the enemy and he is us.
-Pogo

आम्हाला बापूजींबद्दल अतीव आदर आणि अभिमान आहे. गांधीजींचे विचार आज जगभरात मान्यताप्राप्त झाले आहेत. मोठमोठ्या महासत्तांचे नेते आज त्यांच्या भाषणात गांधीजींचे नाव आदराने घेतात. विश्वशांती आणि अहिंसा म्हटले की पहिले नाव आठवते ते गांधीजींचेच. आम्ही गांधीजींच्या विचारांचे अभ्यासक, पाईक आणि प्रचारक आहोत आणि इतरांनी ते विचार अंगिकारले पाहिजेत असा आमचा आग्रह असतो.

आम्ही - जगातल्या सांपत्तिकदृष्ट्या वरच्या वीस-पंचवीस टक्क्यांतले लोक. आम्ही - त्या वीस-पंचवीस टक्क्यांतल्या वीस-पंचवीस टक्के लोकांसाठी काम करणारे लोक. आम्ही - मालकीहक्काची व त्यातून निर्माण होणार्‍या उतरंडीची (मराठी: हायरार्कि) प्राणपणाने जपणूक करणारे लोक. आम्ही - जगातल्या ऐंशी टक्के संपत्तीची मालकी बाळगून असणारे लोक. आम्ही - जगातल्या गाड्यांपैकी, इंधनापैकी व स्रोतांपैकी मोठा भाग स्वतःसाठी वाढत्या प्रमाणावर वापरणारे लोक. आम्ही - पर्यावरणावरच्या अनिष्ट परिणामांचा व स्रोतांच्या टंचाईचा अभ्यास करू शकणारे शिकलेले लोक. आम्ही - त्या अभ्यासाच्या अनुमानानुसार योग्य ती धोरणे ठरवू शकणारे लोक. आम्ही - आमच्या उपभोगातून उडालेल्या खरकट्यावर खालच्या लोकांनी जगावं अशी अपेक्षा करणारे लोक. आम्ही - हे सगळं आपण आहोत हेही न कळणारे लोक. आम्ही - ते कळूनही सामूहिकरित्या काहीही करु न शकणारे लोक. आम्ही - कामाच्या ठिकाणी रिसोर्स आणि त्याच्या बाहेर कन्झ्युमर असणारे लोक.

असे आम्ही गांधीजींच्या विचारांचे पाईक असलो तरी त्यातले कोणते विचार पाळायचे आणि कोणते टाळायचे ते आम्हाला आपोआप समजते. उदाहरणार्थ नुकताच लोकसत्तात आलेला हा लेख पाहा. वाढती लोकसंख्या, घटते स्रोत आणि बिघडते पर्यावरण ही संकटत्रयी ढळढळीत समोर दिसत आहे, येत्या दशकभरातच त्याची झळ लागायला सुरुवात होणार आहे हेही कळते आहे. अशा परिस्थितीत आपल्यापुढे काय पर्याय आहेत हेही माहित आहे. ते अंमलात आणण्याचे सगळे मार्ग, साधने आणि वेळ हाताशी आहे. पण काय करणार? ते पर्यायी विचार आम्हाला पटत नाहीत ना! स्वयंपूर्ण खेडे किंवा स्वयंपूर्ण माणूस अशी कल्पनाही आम्हाला अव्यवहार्य वाटते. त्या उलट सगळा बाजार आहे आणि प्रत्येकजण काही ना काही विकत असतो हे तत्त्वज्ञान आम्हाला सहज आणि नैसर्गिक वाटते. जिच्या मांडीवर आम्ही जन्मलो ती आमची इंडस्ट्रियल इकॉनॉमी आम्हाला आमच्या आईपेक्षा जास्त प्रिय आहे आणि ती टिकवण्यासाठी सर्वसमावेशक विकास वगैरे पोपटपंची करायला आमचे गांधीप्रेम आडवे येत नाही, किंबहुना त्याची मदतच होते.

गांधींच्या आम्हाला आवडणार्‍या विचारांपैकी सगळ्यात प्रमुख विचार म्हणजे अहिंसा! गांधीजींच्या अहिंसेला घाबरून इंग्रज हा देश सोडून पळून गेले असे आम्ही लहान मुलांना व भोळ्या-भाबड्यांना सांगतो. गांधींचे हे विचार दूरदूरच्या कानाकोपर्‍यांपर्यंत, तिथे राहणार्‍या आदिवासींपर्यंत पोचतील याची काळजी घेतो. एका गालावर मारली तर दुसरा पुढे करावा हे त्यांनी शिकणे गरजेचे आहे कारण नंतर आम्ही त्यांच्या जमिनींवर धरणे आणि खाणी बांधायला जाणार तेव्हा त्यांनी विरोध न करता उलट दिलेली नुकसानभरपाई घेऊन आनंदाने अत्यंत कमी पगारावर तिथेच नोकरी करण्यात उपकार मानणे आमच्या सर्वसमावेशक विकासासाठी महत्त्वाचे आहे. कोणी त्याला हिंसक विरोध करु लागला की आमचा सात्त्विक संताप होतो आणि आपले अहिंसक सैन्य आपल्या अहिंसक बंदुका घेऊन तिथे पाठवून त्या लोकांना चांगला प्रेमाने धडा शिकवावा असे आम्ही पोटतिडीकीने बोलतो. त्यांची हजारो वर्षे टिकलेली जीवनव्यवस्था बदलून पुढची दोनशे वर्षेतरी टिकेल की नाही याची शाश्वती नसलेली जीवनव्यवस्था त्यांच्यावर लादण्याचे पुण्यकर्म केल्याची त्यांना योग्य ती जाणीव नसल्याच्या भावनेने खंतावतो.

गांधीजींचा दुसरा आवडणारा विचार म्हणजे प्रतिकात्मक कृती. आमच्या इंडस्ट्रियल यंत्रातला आम्ही एक नगण्य भाग असल्याने ठराविक परिघातच फिरण्याचे आमच्यावर बंधन असते त्यामुळे प्रत्यक्षात फरक पडेल असे काही करण्याएवढा आमच्याकडे वेळही नसतो आणि तेवढी शक्तीही नसते. त्यामुळे गांधीजींच्या चरख्यासारखी प्रतिकात्मक कृती आम्हाला अत्यंत सोयीस्कर वाटते. एखाद्या वीकेंडला जाऊन पीडितांच्याबरोबर एखादा दिवस काढणे, त्यांच्या बरोबर गाणी म्हणणे, मेणबत्त्या लावणे, घोषणा देणे इत्यादी प्रकार करून ज्या व्यवस्थेला आम्हीच आधार दिला आहे तिचाच प्रतिकात्मक निषेध करणे त्यामुळे किती सहज जमते.

गांधीजींचा तिसरा आवडणारा विचार म्हणजे अध्यात्मिक बैठक. ही बैठक एकदा जमली की आजूबाजूच्या कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना माणसाच्या मनाची शांती ढळवू शकत नाहीत. गाडीच्या काचेतून फक्त सुरम्य गोष्टीच दिसण्याची व्यवस्था होते आणि ज्ञानसाधनेतही आपल्याला हवे तेच आणि व्यावहारिकदृष्ट्या फायद्याचेच ज्ञान डोक्यात जायचीही व्यवस्था होते. काही लोक याला ज्ञानियांची तटस्थता म्हणतात काही लोक याला स्वतःची सोबत म्हणतात. काही खवचट लोक याला भावनाशून्यताही म्हणतात. या बैठकीसाठी मग आपल्या परिघातल्या परिघात दुसर्‍यांना त्रास होतील असे बदल करून आपले माहात्म्य सिद्ध करता येते. म्हणजे उदाहरणार्थ, मी वेगन आहे किंवा मी कांदा-लसूण खात नाही असे जाहीर करून जिकडे जाऊ तिकडच्या लोकांची पंचाईत करून त्यांना न्यूनगंड देता येतो. मी रात्री फक्त फलाहारच घेतो असे म्हणून लाखो लिटर इंधन जाळून, लाखो जीवांच्या जिवावर उठलेल्या रस्त्यावरून आणलेली फळे आनंदाने स्वतःच्या अध्यात्मिक तेजात निथळत मिटक्या मारत खाता येतात.

गांधीजींच्या ब्रह्मचर्य आणि अल्पसंतुष्टता या विचारांना पूर्णपणे दुर्लक्षित करुनही आम्ही पूर्ण गांधीवादी असू शकतो. गांधीवाद सगळा अंमलात आणणे आवश्यक नाही. किंबहुना अंशत:ही अंमलात आणणे आवश्यक नाही. तो अंमलात आणतो असा आव आणला तरी पुरे आहे. खरेतर त्याचीही गरज नाही. गांधी महान होते आणि त्यांचे महान विचार मला पूर्णपणे मान्य आहेत असे फक्त म्हणणे पुरेसे आहे. असा हा सोपा, सैलसर आणि सोयीस्कर असा गांधीवाद आम्हाला अत्यंत प्रिय असणार यात काय संशय?

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

आतिवास's picture

1 Feb 2014 - 6:14 pm | आतिवास

'गांधीवाद' आला तेंव्हाच सोयिस्करपणाही आला. एकावर एक 'फ्री' आहे ते! :-(

प्रसाद गोडबोले's picture

1 Feb 2014 - 6:30 pm | प्रसाद गोडबोले

गांधीगिरी इज अ बेटर वर्ड :D

आतिवास's picture

1 Feb 2014 - 8:18 pm | आतिवास

इथं धागाकर्त्याने वाद हा शब्द 'विचारप्रणाली' (इझम) या अर्थाने वापरला आहे असं मी समजते. त्याचा एरवीच्या 'वादविवादाशी' संबंध नाही.
मला 'गांधीगिरी' हा शब्द आवडत नाही, पण तो वेगळा विषय आहे; इथं त्यावर अवांतर नको :-)

नगरीनिरंजन's picture

2 Feb 2014 - 10:56 am | नगरीनिरंजन

होय. वाद हा शब्द 'इझम' या अर्थानेच वापरला आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Mar 2014 - 12:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

'गांधीवाद' आला तेंव्हाच सोयिस्करपणाही आला. एकावर एक 'फ्री' आहे ते!

+१

तिमा's picture

1 Feb 2014 - 7:58 pm | तिमा

ज्या देशाची लोकसंख्या इतक्या वेगाने वाढत आहे त्या देशाला गांधीवाद परवडला नसता. नेहरु हे विचारवंत होते, ते गांधीजींच्या सान्निध्यात होते. तरीही त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर मोठ्या योजना आखल्या त्यामुळे आज देशाला भुकेकंगाल व्हायची तरी वेळ आलेली नाही. त्यांनी व अन्य राजकर्त्यांनी जर संपूर्ण गांधीवाद स्वीकारला असता तर आजचा विकास बघायला मिळाला नसता. प्रचंड लोकसंख्येने एकाच खेड्यांत शंभरावर सुतार्,लोहार्,कुंभार आणि तत्सम कसबी लोक झाले असते आणि लोकांच्या गरजा गांधीवाद आचरल्याने इतक्या कमी झाल्या असत्या की त्यांना कामच उरले नसते. निदान बहुतांशी लोक कामात गुंतल्यामुळे आणि शिक्षणामुळे आज लोकसंख्या १२५ कोटीच आहे. गावोगांवी रिकामे लोक राहिले असते तर याहीपेक्षा लोकसंख्या वाढली असती. जुन्या पद्धतीने शेती होत राहिली असती तर हरित क्रांती झालीच नसती. सैन्यासाठी हत्यारेच मिळाली नसती तर अजून आपले लोक तलवारी,तीरकामठे यांनी बाहेरच्या जगाशी लढू शकले असते का ? कारण तुम्ही गांधीवाद स्वीकारला तरी जगाने स्वीकारलाच असता असे थोडेच आहे ? असो.
एखाद्याविषयी पराकोटीचा आदर असला तरी तुम्ही त्याच्यासारखेच आचरण करु शकाल असे नाही.

सुबोध खरे's picture

1 Feb 2014 - 8:26 pm | सुबोध खरे

+१
आपली साक्षरी अफलातून आहे

नगरीनिरंजन's picture

1 Feb 2014 - 8:42 pm | नगरीनिरंजन

म्हणजे लेखात म्हटलंय तेच ना! हा विचार व्यवहार्य नाही म्हणून नको. अहिंसा फक्त दुसर्‍यांनीच करायची. खरं कोणीच बोलत नाही. मग गांधीवाद राहिला कुठे?
नुसती बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात! जग करतंय तेच करायचं तर तोंडाने त्यांचं भजन तरी नको. दुटप्पीपणा कशाला?
म्हणूनच दरसाल जयंती-पुण्यतिथीला कोणी गांधींबद्दल आदराचे उमाळे काढायला लागला की काटा हालतो. गांधीजींना दुटप्पीपणाचा मॅस्कट बनवले गेले आहे.

सुबोध खरे's picture

1 Feb 2014 - 8:27 pm | सुबोध खरे

स्वाक्षरी: बुद्धी स्थिर रहाते,अक्कल मात्र वाहू लागते.
आपली स्वाक्षरी अफलातून आहे असे वाचावे

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Feb 2014 - 11:50 pm | निनाद मुक्काम प...

गांधी ह्यांना आपल्याला सगळ्यातील सगळे कळते असा भ्रम असावा , असाच भ्रम हिटलर चा होता ,
हिटलर ने जसा आपल्या आत्म चरित्रात त्याला जर्मन पिढी चे वर्तन , मुल्य , विचार कसे असावेत ह्या बद्दल आग्रही मते होती ,
तशीच मते गांधी ह्यांनी वेळोवेळी मंडळी ,
आता दोघांच्या मध्ये एक फरक असा होता , त्याची आपल्या देशातील जनतेच्या वर्तवणूक त्यांचे आचार विचार कमालीचे भिन्न होते ,मात्र साम्य असे होते दोघांना आपली मते आपल्या देशाच्या जनतेच्या माथी काहीही करून मारायची होती , ह्या साठी हिटलर कडे हुकुमशहा असल्याने जबरदस्ती करण्याचा मार्ग होता
तर गांधी हे महात्मा असल्याने भावनिक जबरदस्ती जनतेवर करायला आवडायचे जसे उपोषण करणे.
बाकी कोणत्याच महापुरुषाचे विचार १०० पैकी १०० अचूक नसतात , तेव्हा उगाच सामान्य माणसाला असामान्यत्व देऊन आपली राजकीय पोळी भाजणारे ह्या देशात जन्मले तरी आता सध्याच्या काळात जनता शहाणी झाली आहे.

हुप्प्या's picture

2 Feb 2014 - 12:59 am | हुप्प्या

गांधीवाद ही अत्यंत भोंगळ संकल्पना आहे. ह्या विचाराला कुठलीही ठोस वैचारिक बैठक नाही. निव्वळ राजकीय स्वार्थ. आणि बाबा वाक्यम प्रमाणम अशी वृत्ती.
ज्याने गांधीवाद निर्माण केला त्याच्याठायी हा सोयिस्करपणा पुनःपुनः दिसतो तर तो अनुसरणार्‍या अनुयायातही तो दिसावा यात नवल ते काय?

अहिंसा: उठता बसता अहिंसेचे डोस पाजणार्‍या ह्या माणसाने आयुष्यात मुस्लिम लोकांना मांसाहार सोडा असे सांगायचे धाडस केले नाही. १९२० च्या सुमारास बिनडोक आणि घातक अशी खिलाफत चळवळ ह्या माणसाने सुरु केली. तेव्हा त्या निव्वळ मुस्लिमांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणार्‍या खिलाफतीला हिंदूनी पाठिंबा द्यावा म्हणून बदल्यात मुस्लिमांनी गाई मारणे थांबवावे अशी मागणी केली गेली तेव्हा ती गांधींनी झिडकारली. कारण काय? मुस्लिम लोक आपल्यामागे येणार नाहीत हेच.

चोरीचौरा हत्याकांड झाले त्याबद्दल उपोषण केले पण काँग्रेसने २र्या महायद्धात ब्रिटिश लोकांना बिनशर्त सैनिकी मदत करु असे कबूल केले तेव्हा उपोषण नाही. खरे तर २ र्‍या महायुद्धातली हिंसा ही जगात आजवर झालेल्या हिंसेत सर्वोच्च म्हणता येईल. पण सोयिस्कर नसल्यामुळे तिथे उपोषण केलेले दिसत नाही.

अशा विसंगतीनी भरलेल्या वादाचे नाव घेऊन वाटचाल करणार्‍या लोकांतही विसंगती दिसली तर मला तरी आश्चर्य वाटत नाही.

नगरीनिरंजन's picture

2 Feb 2014 - 4:29 am | नगरीनिरंजन

गांधीवाद भोंगळ नाही आणि त्याला वैचारिक बैठक नाही असे म्हणता येणार नाही.
अहिंसा हे तत्व जैन व बौद्ध धर्मात प्रामुख्याने आढळते. आपल्या इंडस्ट्रीयल इकॉनॉमीच्या अंगभूत गुणधर्मांमध्येमात्र अहिंसा बसत नाही.
तसेच गांधींनी मांडलेले साधी राहणी व स्वयंपूर्ण खेडे इत्यादी विचार टॉलस्टॉयच्या प्रभावातून आले होते आणि आज गांधीवादी असो वा नसो, सगळ्या संवेदनशील लोकांनी त्यावर किमान विचार करायला सुरुवात करणे आवश्यक आहे.
अन्यथा काही वर्षांनी तळागाळातल्या लोकांच्या अस्तित्वावरच घाला येण्यासारखी परिस्थिती येऊ शकते आणि त्याची झळ वरच्या २५% लोकांना बसणार नाही असे समजणे दूधखुळेपणा आणि क्रौर्य आहे.

लेखाचा उद्देश गांधीवादावर टीका करणे हा नसून भोंगळ गांधीप्रेमावर टीका करण्याचा आहे हे स्पष्ट करु इच्छितो.

टवाळ कार्टा's picture

2 Feb 2014 - 10:03 am | टवाळ कार्टा

+११११

धोरणे गांधीच नव्हे, तर सर्वच नेत्यांची उत्तम आहेत. महत्त्वाचे आहे त्यामागची वैचारिक बैठक अन मनोधैर्य. ते नसेल तर कितीही उच्च धोरण प्रभाव पाडू शकणार नाही.
गांधीजींनी गाल पुढे करणे अन एखाद्या चाकरमान्याने करणे यात फरक आहे !

कवितानागेश's picture

2 Feb 2014 - 8:09 am | कवितानागेश

म्हणजे गांधींइतके मोठ्ठे होउन मगच गाल पुढे करावा असा पण अर्थ होउ शकतो.
पण गांधीजींनी असा गाल पुढे केल्याचा ऐकिवात नाही. त्यांच्या प्रभावाखाली मात्र अनेकाम्नी फुकट मार्खाल्ला आणि मारणारे काही सुधारले नाहीत.
असो.
वैयक्तिक आणि सामाजिक संदर्भात वागणूकीचे नियम बदलावेत हेच बरं...

सस्नेह's picture

2 Feb 2014 - 11:16 pm | सस्नेह

मलाही गांधींनी गाल पुढे केल्याचे कधी वाचलेले आठवत नाही.

सुनील's picture

3 Feb 2014 - 8:36 am | सुनील

मला सदर वाक्य गांधींनी म्हटल्याचेही कधी वाचलेले आठवत नाही!

(मात्र येशूने म्हटले असे वाचल्याचे आठवते आहे!)

नगरीनिरंजन's picture

8 Mar 2014 - 11:11 pm | नगरीनिरंजन

सदर वाक्य गांधींनी म्हटलेले नाही हे खरे आहे पण येशू आणि बुद्धाचे दाखले त्यांनी वेळोवेळी दिलेले आहेत.
शिवाय अत्याचार्‍याला मारणे वा आत्महत्या करणे हे दोनच पर्याय असल्यास सन्मानाने आत्महत्या करावी असे त्यांनी म्हटलेले आहे.

मंदार दिलीप जोशी's picture

14 Mar 2014 - 1:25 pm | मंदार दिलीप जोशी

हो मोपल्यांच्या बलात्कारापासून वाचायला हिंदू स्त्रियांनी श्वास रोखून धरावा आणि प्राण द्यावेत असे त्यांचे म्हणणे होते :D

माहितगार's picture

15 Mar 2014 - 3:32 pm | माहितगार

गांधीजींनी गाल पुढे करणे अन एखाद्या चाकरमान्याने करणे यात फरक आहे !

अंशतः सहमत आहे. या विषयावर जॉर्ज ऑर्वेल यांची Reflections on Gandhi कॉमेंट विचारात घेण्या सारखी आहे.

माझ्या मते, तुम्ही लोकांसाठी काहीतरी केलेल असल पाहीजे आणि लोक तुम्हाला थोडेतरी मानत असले पाहीजेत. वरचच वाक्य

अण्णा हजारेंनी गाल पुढे करणे आणि महात्मा गांधींच्या नातवाने करणे यात फरक आहे !

असे वाचून पहा; अण्णा हजारेंनी दहा चूका केल्या तरी त्यांची चार चांगली काम लक्षा घेऊन अनुयायी असा पेटून उठतो की अण्णा हजारेंच्या गालाला हात लावण्याची कुणाची सहजी हिम्मतही होणार नाही, तेच महात्मा गांधींच्या नातवाने केवळ नातू आहे म्हणून कितीही शांतता संदेश दिले तरीही काही फरक पडत नाही. गांधींच्या नातवाने गाल पुढे केला कुणी मारलेच तर त्याने मारावयास नको होते एवढीच प्रतिक्रीया येईल, कारण व्यक्तीगत जीवनात तेवढी उंची गाठता आलेली नाही.

स्वतः गांधी किंवा हजारेंच्या गालावर खरेच कुणी मारले तर काय प्रतिक्रीया येईल ? गांधी हजारे यांनी गाल पुढे करण्यात आणि सर्वसामान्य चाकरमान्याने गाल पुढे करण्यात फरक असतोच आणि तो राहणारच.

मारकुटे's picture

2 Feb 2014 - 9:47 am | मारकुटे

चांगला लेख.

आजकाल गांधी या नावाप्रमाणेच कॉर्पोरेटमधे बुद्ध नावाला चलती आहे. पुन्हा एकदा भारतात बुद्धाच्या नावाला वलय प्राप्त होत चालले आहे.

विटेकर's picture

2 Feb 2014 - 10:12 am | विटेकर

नोत. अगेन

सर्वप्रथम लेखन आवडले. उगाच कैच्याकै आरोअप-प्रत्यारोपांच्या पोकळ खेळाच्यावर अधिक विचार करायला लावणारे आहे.

माझ्यामते भारतात "गांधीवाद" नावाचे काय ते माहिती नाही पण गांधीजींनी नुसती सांगितलेलीच नव्हे तर आचरणात आणून दाखवलेली कित्येक तत्त्वे अजूनही भिनलेली आहेत.

सर्वात मुख्य आहे, की आपले मत निर्भिडपणे मांडणे. मराठी संस्थळांपसून ते पार्लमेंटमर्यंत प्रत्येक जण आपले मत निर्भिडपणे मांडताना दिसतो. ते बहुसंख्यांना पटो वा ना पटो मते येत असतात. (हे विनोदाने म्हणत नाहिये). आणि हे मत पटवून देण्याचा प्रयत्न करताना हिंसक मार्गांचा वापर कमी वेळा होताना दिसतो. फारच असंतोष असला तरी अजूनही आपली मागणी बंद/हरताळ/मोर्चे आदी बर्‍यापैकी शांततामय मार्गातून व्यक्त होताना दिसते. आपलेच नागरीच आपल्याच देशाच्या संसदेवर/पोलिसांवर हल्ला करताहेत किंवा आपलेच लष्कर आपल्याच देशात आपल्याच नागरीकांशी लढते आहे हे दृश्य आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर दिसलेले नाही. हे इतके सवयीचे आहे की त्याच्यामागे अहिंसक चळवळींच्या मार्गाने जायची भारतीय मानसिकतेची झालेली मशागत कोणालाही जाणवते आहे की नाही कोण जाणे?

दुसरे असे की भारतातील राजकीय सजगता आणि प्रशासनातील सहभाग. मुळात प्रशासन हे काही तरी बाहेरचे आणि आपल्यावर राज्य करायला बसले आहे हे शक्य तितके टाळून गांधीचा व्यवहार झाला. अगदी बाहेरचे ब्रिटिश असतानाही ते काँग्रेसचा प्रशासनातील सहभाग हळूहळू वाढवतच गेले. सत्ता एका रात्रीत बदलावी वगैरे गर्जना न करता विविध स्तरातील व्यक्तींना त्या बदलात समाविष्ट करत गेले व त्याचे रुपांतर मोठ्या चळवळीत झाले. त्याही वेळी याहून वेगळा मार्ग अवलंबणर्‍या व्यक्ती होत्याच. मात्र जनता त्यांच्या मागे इतक्या संख्येने गेली नाही. आणि अजूनही भारतात दिसणारी राजकीय सजगता, सहभाग फार कमी देशांमध्ये दिसतो. एकतर आहे ते आहे तसे मंजूर व श्रेष्ठ हे एक टोक दिसते नाहितर सगळे उलथवण्याची मानसिकता दिसते. गांधींचा हा बदल हळु घडवणारा मात्र तरीही आश्वासक मार्ग पुर्ण व्यवस्थेतच इतका भिनला आहे त्याला कितीही नावे ठेवली तरी त्याचे निगेटिव्ह परिणाम टाळूनही त्याचे भारत एकसंध रहाण्यात खूप मोठे योगदान नाकारता येऊ नये.

तिसरे असे की स्वदेशी, स्वराज्य हे तत्कालिन कार्यक्रम झाले. एक भारत देश म्हणून केवळ नेत्यांपुरतेच मर्यादित न राहता भारतीय म्हणून 'स्वाभिमान' बर्‍याच जणांनी जागवला. मात्र 'स्वभान' जाणवून देणार्‍यांत गांधीजींचा वाटा नाकारता येणार नाही.

असो. मुळात काळाप्रमाणे प्रत्येक गोष्टीत बदल घडतोच. गांधीवादाचे स्वरूप आता वेगळे झाले आहे. एका गालावर थप्प्ड मारल्यावर समोरच्याचे मनःपरिवर्तन होईपर्यंत दुसरा गाल पुढे करण्याइतका वेळ आणि त्याहून महत्त्वाचे तेवढी तत्त्वनिष्ठा म्हणा किंवा हिंमत म्हणा आता उरलेली दिसत नाही हे खरे. पण भारतीय कितीही 'पेटला' तरी देश न पेटवता फक्त सरकारच पाडतो हे त्याच अहिंसेचे सद्य स्वरूप आहे.

जुने गांधीवादाचे मार्ग रिलेव्हन्ट नसतीलही मात्र गांधीवादच रिलेव्हन्ट नाही असे वाटत नाही.

माहितगार's picture

3 Feb 2014 - 2:27 pm | माहितगार

नगरीनिरंजन यांच्या मूळ लेखात एका पेक्षा अधिक विषयांची सरमिसळ आणि कुठे अंशतः विरोधाभास नाही ना ? अशी साशंकता वाटली.वेळेच्या अभावी इच्छा असूनही दीर्घ प्रतिसाद देणे जमले नाही. एनी वे मोस्ट इंपॉर्टंट ऋषिकेश यांचा प्रतिसाद आवडला हे नोंदवावेसे वाटते.

धन्यवाद

नगरीनिरंजन's picture

3 Feb 2014 - 3:30 pm | नगरीनिरंजन

चांगले मुद्दे मांडले आहेत ऋषिकेश.
परंतु वाढता नक्षलवाद व त्याला चिरडण्यासाठी लष्करी/सशस्त्रदलांची कारवाई करण्यास बहुतेकांचा पाठिंबा वा मध्यंतरी मावळ तालुक्यात झालेला गोळीबार अशा घटना घडतच आहेत. म्हणजे आंदोलक हिंसक झाले तर ते वाईट आणि सरकार झाले तर काही नाही हाच माझा मुद्दा आहे.
गरीब आदिवासींना झेपत नसतानाही ते कोर्ट-कज्जे करत बसणे त्यांना भाग पाडणे आणि त्यात वर्षानुवर्षे वाया घालवून अनेकांचे जीवन त्या दरम्यान बरबाद करणे हाही हिंसाचारच आहे. एक अधिकृत आणि एक अनधिकृत हिंसाचारापैकी अनधिकृत हिंसाचार फारसा होत नाही हा गांधींच्या विचारांचा चांगला प्रभाव म्हणता येईलच पण मग अधिकृत हिंसाचाराला पाठिंबा देणे हा सोयीस्कर गांधीवाद नाही का? म्हणजे अन्यायग्रस्त लोक आपले अहिंसा पाळताहेत आणि जनतेची सेवा करण्यासाठी अस्तित्वात आलेली व्यवस्था मात्र हिंसा करते हे खटकण्यासारखे आहे.
विशेषतः पर्यावरणाबाबतचे अहवाल परस्पर गुंडाळून टाकणे, ठेकेदाराच्या ट्रकखाली आयपीएस अधिकारी मरणे, नदीतून राजरोस वाळूचा उपसा होत असतानाही लोकांनी बघत राहायचे. सरकारने केलेला कायदाही जिथे बेदरकारपणे मोडला जातो तिथे अहिंसक आंदोलने करुन काय होणार? पण अशा शिरजोर लोकांसाठी हे अहिंसेचे तत्वज्ञान मात्र पथ्यावर पडते. त्यामुळेच कॉर्पोरेट जगात या तत्त्वज्ञानाला फार भाव आहे.
गांधींचे इतर विचार मात्र अव्यवहार्य म्हणून सरळ कचर्‍याच्या टोपलीत टाकले तरी कोणाही गांधीवाद्याला दु:ख झाल्याचे मी पाहिलेले नाही.
एकूण माझा मुद्दा एवढाच आहे की अहिंसेचा मुद्दा फायद्याचा आणि खेड्यांकडे जाण्याचा मुद्दा तोट्याचा म्हणून फक्त सोयीस्करपणे फायद्याच्याच मुद्द्यांचा पुरस्कार केला जातो कारण अहिंसेच्या लढ्याने जिंकायला खूप वेळ लागतो आणि ज्यांच्याविरुद्ध लढायचे आहे त्यांचे फारसे नुकसानही होत नाही.
पर्यावरणाच्या बाबतीत तर अहिंसेच्या लढ्याने लढत बसल्याने व्हायचे ते नुकसान होऊन गेलेले असते किंवा स्टेटस को साठीच लढण्याची ऊर्जा खर्चत बसावे लागते. पर्यावरणासाठी कोणी आंदोलक हिंसक झाला तर तो माथेफिरु पण कंपन्यांसाठी सरकारने हिंसक कृती केली तर ती मात्र समर्थनीय.

परंतु वाढता नक्षलवाद व त्याला चिरडण्यासाठी लष्करी/सशस्त्रदलांची कारवाई करण्यास बहुतेकांचा पाठिंबा वा मध्यंतरी मावळ तालुक्यात झालेला गोळीबार अशा घटना घडतच आहेत. म्हणजे आंदोलक हिंसक झाले तर ते वाईट आणि सरकार झाले तर काही नाही हाच माझा मुद्दा आहे.

या मुद्द्याशी पूर्ण सहमत आहे. अशा प्रसंगी सरकारची कृती ही निर्घृणच आहे.

एकूण माझा मुद्दा एवढाच आहे की अहिंसेचा मुद्दा फायद्याचा आणि खेड्यांकडे जाण्याचा मुद्दा तोट्याचा म्हणून फक्त सोयीस्करपणे फायद्याच्याच मुद्द्यांचा पुरस्कार केला जातो कारण अहिंसेच्या लढ्याने जिंकायला खूप वेळ लागतो आणि ज्यांच्याविरुद्ध लढायचे आहे त्यांचे फारसे नुकसानही होत नाही.

भावना कळताहेत. "एस्टॅब्लिशमेंट स्पॉन्सर्ड हिंसा" म्हणा "दहशतवाद म्हणा" होते आहे हे ही मान्य आणि ते गैर आहे हे तर त्रिवार मान्य!

पण त्याला गांधीवाद जबाबदार किती वा त्याचा संबंध किती?
शिवाय गांधीवाद (किंवा प्रसंगी कोणताही वाद) अख्खा स्वीकारावा किंवा मग अख्खा टाकावा हेच दोन पर्याय आहेत हे पटत नाही. खरंतर प्रस्थापितांपैकी कोणताही एक वाद-इझम न पाळता नेहमी प्रश्नांवर स्वतःचे असे उत्तर तयार करावे हे गाधीवादाचे महत्त्वाचे अंग आहे. गांधीवाद हाच मुळात निव्वळ सत्य, स्वदेशी वा अहिंसा यावर आधारलेला नाही असे माझे मत आहे. तो "स्वत्त्व/स्वभान" जागवण्यावर अवलंबलेला आहे.

पर्यावरणाच्या बाबतीत तर अहिंसेच्या लढ्याने लढत बसल्याने व्हायचे ते नुकसान होऊन गेलेले असते किंवा स्टेटस को साठीच लढण्याची ऊर्जा खर्चत बसावे लागते. पर्यावरणासाठी कोणी आंदोलक हिंसक झाला तर तो माथेफिरु पण कंपन्यांसाठी सरकारने हिंसक कृती केली तर ती मात्र समर्थनीय.

निव्वळ अहिंसा वा निव्वळ हिंसा किती फायद्याची आहे साशंक आहे. गांधीजींनीही निव्वळ अहिंसेचा पुरस्कार केल्याचे आठवत नाही. त्यांनी अहिंसक मार्गांनी परंतु प्रभावी विरोध करायच्या बाजुने आहे. सध्याच्या पर्यावरणवाद्यांचे आंदोलन मला व्यक्तीशः तितके प्रभावी वाटत नाही. गांधीजी केवळ आंदोलन करत नसत ते त्या विरोधाला अतिशय उच्च प्रतीचे राजकारणाची व मोठ्या जनाधाराचीही जोड देत असत. सध्याचे आंदोलन 'भाबडे' आंदोलन करत आहेत असे मला दुरून वाटते. त्यांच्यात उत्तम राजकारण करणारे कोणी नाहीच शिवाय ते जनाधार जमवायचा प्रयत्नही प्रभावीपणे करत नाहीत.

ऋषिकेश's picture

3 Feb 2014 - 4:22 pm | ऋषिकेश

यावरून अजून एक आठवले ती मी काही काळापूर्वी ऐसीवर स्वावलंबी गावावर ही एक चर्चा सुरू केली, ती या निमित्ताने वाचनीय ठरावी

गुलाम's picture

3 Feb 2014 - 2:16 pm | गुलाम

आपलेच नागरीच आपल्याच देशाच्या संसदेवर/पोलिसांवर हल्ला करताहेत किंवा आपलेच लष्कर आपल्याच देशात आपल्याच नागरीकांशी लढते आहे हे दृश्य आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर दिसलेले नाही. हे इतके सवयीचे आहे की त्याच्यामागे अहिंसक चळवळींच्या मार्गाने जायची भारतीय मानसिकतेची झालेली मशागत कोणालाही जाणवते आहे की नाही कोण जाणे?

खुपच सुंदर प्रतिसाद ऋषिकेशजी. (खरं सांगायचं तर एवढंच सांगण्यासाठी आज खूप दिवसांनी मिपावर लॉगिन केलं)

आजच्या राजकारण्यांची अभिनिवेशी भाषणे, 'फोडा आणि झोडा' विचारसरणी आणि लोकानुनय हीच वैचारिक दिशा हे सगळं बघितलं तर गांधिजींची महानता आणि वेगळेपण चटकन उठून दिसते. उलट मला तर असं वाटतं की केवळ चौरीचौराला हिंसाचार झाला म्ह्णून भरात असलेलं आंदोलन मागे घेणे हा तर त्यांचा कळसाध्याय होता. उच्चतम आदर्शवाद आणि निस्वार्थ असल्याशिवाय हे करणे अशक्य आहे. आजचा कोणता राजकारणी हे करु धजेल? कल्पना करा उद्या केजरीवालांचे दिल्लीतील एखादे भरात असलेलं आंदोलन, केवळ कुठेतरी हिंसा झाली म्हणून ते मागे घेतील??

नगरीनिरंजन's picture

3 Feb 2014 - 3:35 pm | नगरीनिरंजन

कुठेतरी हिंसा झाली म्हणून आंदोलन मागे घेतलं तर कोणतेही आंदोलन यशस्वी होणार नाही कारण हिंसाचार घडवून आणला जाऊ शकतो आणि तो आंदोलनकर्तेच करतील असे काही नाही.
हिंसाचार झाला म्हणून आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेणं हे अपेक्षित असल्यास माहिती अधिकाराच्या माध्यमातून लढणार्‍या कार्यकर्त्याचा खून झाल्यावर सरकारने राजिनामा देणे अपेक्षित आहे की नाही?

माझ्या मते आंदोलन सुरू करू शकणारे अनेक नेते झाले, आपल्या एका शब्दासरशी ते पूर्ण ठप्प करू शकणारा नेताच सध्या अस्तित्त्वात नाहीये वा महात्मांजींनंतर झाला नाही. त्यामुळे "कुठेतरी हिंसा झाली म्हणून आंदोलन मागे घेतलं तर कोणतेही आंदोलन यशस्वी होणार नाही" या जर-तरच्या गोष्टी झाल्या. मुळात असे देशव्यापी आंदोलन पूर्णपणे थांबवणार कोण आणि कसे?

वेल्लाभट's picture

3 Feb 2014 - 3:45 pm | वेल्लाभट

'गांधीवाद' आला तेंव्हाच सोयिस्करपणाही आला. एकावर एक 'फ्री' आहे ते!

क्या बोला है ! वाह.

हेच आहे. बास अजून काहीच म्हणता येऊ शकत नाही.

माहितगार's picture

3 Feb 2014 - 4:25 pm | माहितगार

नगरीनिरंजन यांनी काढलेला हा धागा लेख भावनोत्कट पद्धतीने लिहिला गेला आहे.त्यांना काही मुख्य समस्या मांडावयाच्या आहेत जसे की जमिनींचे अधिग्रहण पर्यावरण धरणे खाणी इत्यादींनी होणारी सामान्य माणसांची परवड.

दुसरा विषय आहे या सामान्य माणसांच्या शांततामय आंदोलनांचा आवाज शासना पर्यंत पोहोचतच नाही पोहोचला तरी समस्येचे सुयोग्य न्याय्य असे वेळेत निराकरण होतच नाही.

जेव्हा आंदोलकांचा संयम सुटतो तेव्हा समस्या निराकरणास प्राधान्य देण्या एवजी गांधीवाद (अहिंसा) शिकवण्याचे प्रयत्न केले जातात

गांधीवाद हा सोईनुसार वापरणारी मंडळी खरी गांधीवादी नाहीतच तो तोंडदेखला गांढीवाद आहे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे. नगरीनिरंजनांचा रोष महात्मा गांधींच्या तत्वज्ञानापेक्षा व्यवस्थेबद्दल आहे असे वाटते.

नगरीनिरंजनांनी एकाच वेळी बरेच विषय हाताळले आणि सरमिसळ केल्याने काही गोंधळ तर होत नाहीना अशी शंकेची पाल चुकचूकते.

माहितगार's picture

3 Feb 2014 - 4:26 pm | माहितगार

तोंडदेखला गांधीवाद असे वाचावे

नगरीनिरंजन's picture

8 Mar 2014 - 10:14 pm | नगरीनिरंजन

यावर अधिक तपशीलवार लिहीन लवकरच.

पैसा's picture

8 Mar 2014 - 10:51 pm | पैसा

शक्य तेवढे लवकरच लिहा! वाट बघत आहे.

माहितगार's picture

3 Feb 2014 - 5:02 pm | माहितगार

मुख्य समस्या मांडावयाच्या आहेत जसे की जमिनींचे अधिग्रहण पर्यावरण धरणे खाणी इत्यादींनी होणारी सामान्य माणसांची परवड.

सध्या उपलब्ध प्रशासन व्यवस्था लोकप्रतिनिधी त्यांच्या त्यांच्या भूमिका नीटशा पार पाडत नाहीत त्यामुळे सामान्य माणसांच्या समस्यांची हेळसांड होते हे खरे आहे. वृत्तमाध्यमांना कधी मधी जाग येते आणि न्याय यंत्रणा सुस्तपणाने काम करते. हे व्यवस्था परिवर्तनाचे प्रश्न आहेत.

राही's picture

3 Feb 2014 - 5:48 pm | राही

"हे व्यवस्था परिवर्तनाचे प्रश्न आहेत."
अगदी नेमके. मुद्द्यावर बोट ठेवले आहे.
प्रतिसाद आवडत आहेत.

माहितगार's picture

3 Feb 2014 - 6:38 pm | माहितगार

प्रतिसादाकरिता धन्यवाद

प्रसंगी (कि बर्‍याच वेळी) आंदोलनकर्त्यांच नेतृत्वात जबाबदारीचा समतोल परिपक्व दृष्टीकोणांचा अभावा एक्सपोजर आणि अभ्यासाचा अभाव संवाद आणि माध्यम संपर्क कौशल्यांचा अभाव. समर्थकांमध्ये अवास्तव अवाजवी स्वप्न दाखवणे. रिझल्ट दाखवणे क्रेडीट घेणे राजकीय चढाओढ यातून येणारा हटवादीपणा आणि आंदोलन कर्त्यांची होणारी ससेहोलपट आणि दिशाभूल. नेमक कुठे आणि केव्हा थांबायच याचा अदमास नसणे इत्यादी आंदोलनकर्त्यांच्या नेतृत्वातील त्रुटींचा एक भाग झाला पण त्याही पेक्षा महत्वाची बाब व्यवस्थेतील बॉटलनेक प्रॉब्लेम्स ओळखून त्यांना वैधानिक मार्गाने पर्याय शोधण्या पेक्षा उद्रेकाच्या बळावर मी व्यवस्था कशी वाकवून दाखवली यास महत्व येत हेही ठिक पण व्यवस्था परिवर्तन हा मुख्य गाभा मागे पडतो.

व्यवस्था सातत्याने वाकवली गेली आणि कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली की समाजाच समर्थन गायब होण्याची शक्यता असते दुर्लक्ष होण्याची शक्यता असते याकडे आंदोलनकर्त्या नेतृत्वाच बर्‍याचदा दुर्लक्षही होत किंवा कस या बद्दलही शंका येते.अर्थात या सर्व बांबींनीही आंदोलकर्त्यांचे प्रश्न समस्या कमी महत्वाच्या आहेत असे होत नाही.

भारतीय लोकशाहीतील लोकप्रतिनिधींच्या उणीवा पहावयाच्या झाल्यातर गट अथवा समुहाधारीत राजकारण करणेही ठिक पण त्या चौकटी बाहेरच्या समुदायाच्या समस्यांची जाण नसणे निरुत्साह असणे प्रकर्षाने जाणवते. आपण ज्या लोकशाही संस्थांमधून कामकरतो त्यांना कायदा आणि नियामक मंडळे म्हणतात या बद्दलच्या संवेदनेचा जाणीवेचा अभावही प्रकर्षाने जाणवतो. तिथे सध्याच्या कायद्यांच्या अडचणी काय आहेत जुन्या कायद्यांचा नियमावलींचा रिव्ह्यू घेणे असे स्वतःहून होताना मुळीच दिसत नाही. जर कायदा आणि नियमावली अद्ययावत नसतील तर जनतेस न्याय मिळतो आहे असे वाटण्याच्या पहिल्याच ठिकाणी आडकाठी येते. केवळ समस्या गंभीर झाल्यावर रिस्पाँड करण्यात धन्यता मानली जाते. नवनवीन संकल्पनांमुळे नवेनवे उद्योग तंत्रज्ञान येते त्या करता नवीन आलेल्या संकल्पनांना कोणत्या कायद्यांची गरज आहे याचा अभ्यास आणि नियमना कडे एखादी मोठी दुर्घटना आर्थीक लूट इत्यादी होई पर्यंत पूर्ण दुर्लक्ष होते चांगल्या संकल्पनांनाही कायद्याचे म्हणावे तसे समतोल बळ मिळत नाही.

लोकप्रतिनिधींच्या समस्यांची एक बाजू झाली पण उणीव असलेल लोकनेतृत्व निवडून देणार्‍या समाजानेही नेतृत्व निवडताना आपापल्या जाती समुहांच्या पलिकडे सुद्धा संधी दिली पाहीजे अशी संधी दिली जावी म्हणून एनजीओ आणि आंदोलनकर्त्यांच्या तथाकथीत नेतृत्वांनीही समाज प्रबोधनात पुढाकार घ्यावयास हवा तेही पुरेसे होते का या बद्दल संशय घेण्यास जागा आहे. केवळ आपल्याच समाजातील नेतृत्व देण्याचा अट्टाहास असेल तर तेही ठिक पण किमान पक्षी तेच ते नेतृत्व पुन्हा पुन्हा निवडले जाणार नाही यावरही काही किमान नियंत्रणाची गरज आहे. आमेरिकेत अध्यक्षाला अधिकाधीक किती निवडणूका लढवता येतात यावर मर्यादा आहे त्याच पद्धतीने आपल्याकडील कायदे आणि नियामक मंडळातून सहकारी संस्थातून एकच व्यक्ती अधिकतम किती वर्षे राहू शकेल यावर काही एक मर्यादा हवी. अर्थात घराणेशाही टाळण्या बाबत मतदाराच्या प्रबोधनाची जबाबदारी पुन्हा एकदा एनजीओच्या आंदोलनकर्त्या नेतृत्वाची आणि बहुजनातील सुशिक्षीतांचीही बनते हे ठळकपणे नोंदवले जाण्याची गरज आहे असे वाटते.

माहितगार's picture

3 Feb 2014 - 6:52 pm | माहितगार

भारतीय लोकशाही व्यवस्थेत किमान ३० ते ४० टक्के जनतेनी मतदानच न केल्यामुळे त्यांच प्रतिनिधीत्व येतच नाही . जे मतदान करतात त्यातीलही २५% ते ३५ % मतदारांच समर्थन प्राप्त झाल तर भारतीय संसदीय लोकशाहीतील राजकीय पक्ष राज्यकर्ता पक्ष म्हणून मिरवून घेऊ शकतो. ६५ % जनतेच्या आकांक्षांकडे एका अर्थाने दुर्लक्ष होण्याची संभावना शिल्लक राहते अशा समुदायाला एक तर लोकशाहीतील रिप्रेझेंटेश अंशतःतरी सुधारण्यास वाव आहे का हे अभ्यासल जावयास हव. आणि शिवाय त्यांची न्याय्य शांततामय आंदोलने कितीही छोटी असली तरी एखाद्या विधीमंडळ आणि न्यायिक संयुक्त आयोगा मार्फत दखल घेण्याची कायमस्वरूपी व्यवस्था असण्याची गरज आहे असे वाटते. जेणेकरून शांततामय आंदोलनाची दखल वेळीच घेतली जाईल अर्थात मिपा सारख्या संस्थळावरून आपण या बाबत चर्चे पलिकडे फारसे काही करू शकतो असे नाही तरीपण व्यवस्थापरिवर्तना करता रचनात्मक काय काय करता येईल याची चर्चा सातत्याने विवीध माध्यमातून चालू ठेवणे आणि वैधानिक मार्गाने धसास लावणे गरजेचे आहे असे वाटते.

जेव्हा आंदोलकांचा संयम सुटतो तेव्हा समस्या निराकरणास प्राधान्य देण्या एवजी गांधीवाद (अहिंसा) शिकवण्याचे प्रयत्न केले जातात

परिस्थिती हाताबाहेर गेल्या नंतर होणारर्‍या फायरफायटींग मध्ये प्रशासन लोकप्रतिनिधी आंदोलनकर्ते माध्यमे न्याय यंत्रणा सर्वचजण व्यस्त असतात एक समस्या निवारे पर्यंत दुसर्‍या असंख्य समस्यांचा डोंगर साचत जातो हे टाळण्या करता वरच्या प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे व्यवस्था परिवर्तनाचे काही चांगले प्रयत्न होणे गरजेचे आहे. लोक केवळ उपदेश ऐकत राहत नाहीत आणि गांधीवादा बाबतच सात्वीक संताप निर्माण होण्याचे ते फार महत्वाचे कारण आहे असे वाटते.

गांधीवाद हा सोईनुसार वापरणारी मंडळी खरी गांधीवादी नाहीतच तो तोंडदेखला गांधीवाद आहे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे.

नगरी निरंजनांच्या शब्दात
गांधीवाद सगळा अंमलात आणणे आवश्यक नाही. किंबहुना अंशत:ही अंमलात आणणे आवश्यक नाही. तो अंमलात आणतो असा आव आणला तरी पुरे आहे. खरेतर त्याचीही गरज नाही. गांधी महान होते आणि त्यांचे महान विचार मला पूर्णपणे मान्य आहेत असे फक्त म्हणणे पुरेसे आहे. असा हा सोपा, सैलसर आणि सोयीस्कर असा गांधीवाद आम्हाला अत्यंत प्रिय असणार यात काय संशय?

नगरी निरंजन खर तेच बोलताहेत ज्यांना म्हणून गांधीवादी पक्ष म्हणतो त्यांच नेतृत्व स्वतःतरी खरच गांधीवादी राहील आहे का ? नसेल तर खाली कार्यकर्त्यांपर्यंत ते गांधीवाद पोहोचवताना दिसणारच नाहीत. गांधीवाद आणि गांधीवादी नसणार्‍या देशात स्वच्छ आणि चांगले प्रशासन मिळणे शक्यच नाही असे कुणीही खरा गांधीवादी म्हणेल असे वाटत नाही. गांधीवाद हि न्याय्य आणि चांगल्या प्रशासनाची पुर्वअट निश्चितपणे असू शकत नाही. अण्णा हजारे जस माझ नाव वापरू नका म्हणाले तस महात्मा गांधींच्या नावाच्या वापरावरही अधिकृत बंदी घालण्यास कोणताही खरा गांधीवादी हरकत घेईल असे वाटत नाही. या बद्दल अधीक चर्चा व्हावयास हवी असे मला बिगर काँग्रेसी बिगर राजकीय सच्चा नेहरूवादी म्हणून वाटते हे खरे आहे.

अहिंसा, प्रतिकात्मक क्रिया, आध्यात्मीक बैठक, अल्पसंतुष्टता वगैरे गांधीवाद नाहि. हे सर्व तत्कालीन लढ्याची हत्यारं होती.
"आपला प्रामाणीक उद्देश साध्य करण्याकरता दीर्घकालीन फायद्याच्या दृष्टीने उपलब्ध साधन सामुग्रीचा काटेकोर वापर करणे" हे एका पक्क्या बनिया वृत्तीच्या अत्यंत शहाण्या आणि चिवट माणसाचे तत्व म्हणजे गांधीवाद.

अहिंसा का बरं ? तर सरळ सरळ रणांगणावर शत्रुला पराजीत करण्याची क्षमता नाहि म्हणुन. अन्यथा "करेंगे या मरेंगे" इतपत गांधीजी आलेलेच होते. काश्मीरात सैन्य पाठवण्याची सुचना गांधींनी केली होती असं मिपावरच कुणी तरी सांगीतलं आहे.

प्रतिकात्मक क्रिया का बरं? तर जो प्रचंड वटवृक्ष पुढे आकाराला आणायचा आहे त्याचे बीज जनसामान्यांच्या मनात रुजावे म्हणुन.

आध्यात्मीक बैठक का म्हणुन? तर कार्याचं ऑडीटींग, सींहावलोकन करायला नीरेक्षीर विवेक सतत जागृत हवा म्हणुन. एकदा का योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी पोचुन कार्याची धुरा वाहायला समर्थ झाले कि या आध्यात्मीक बैठकीचा आग्रह नाहि. नेहरुंनी दारु, सिग्रेटी पिल्या काय किंवा परस्त्री संबंध ठेवले काय, गांधींना त्याच्याशी घेणंदेणं नाहि.

अल्पसंतुष्टी का बरं? तर चार आणे कमवुन त्यापैकी ३ आण्यात गरजा भागवायच्या व उर्वरीत एक आणा परत इन्व्हेस्ट करायचा म्हणुन. त्याकरताच गांधीजी विनोबा भावेंना दिवसभर चरखा चालवायला लावतात व त्यातुन किती उत्पादन होते ते मोजतात. मग उत्पादन वाढायला चरख्याच्या डीजाइनमधे बदल घडवायला बघतात.

आपल्या राजकारण्यांनी गांधीवाद कधी उचललाच नाहि. तेव्हढा वकुबच दाखवला नाहि कोणि. गांधीनामक व्यक्तीच्या क्रिया प्रतिकात्मक दोन मिनीटापुरत्या करणं हा सोयीस्कर गांधीवाद नसुन ते राजकारण्यांच्या आणि जनतेच्या बौद्धीक दिवाळखोरीचं लक्षण आहे.

२१व्या शतकात गांधीजी अवतरले असते तर स्वयंपूर्ण खेड्याची १९-२०व्या शतकातली आपली योजना त्यांनी स्वहस्ते गुंडाळुन ठेवली असती. त्याऐवजी आधुनीक शिक्षण, टेक्नॉलॉजी, गावाचे भौगोलीक स्थान इत्यादींची सांगड घालुन त्यांनी प्रत्येक गावाला जागतीककरणाच्या प्रवहाशी घट्ट जोडले असते. ठिकठिकाणि वेगवेगळ्या प्रकारचे "आणंद" तयार केले असते. आमटे, बंग वगैरे मंडळींच्या फौजा तयार करुन आधुनीक जगातले सर्व फायदे जंगलातल्या अगदी तळागाळाशी पोचवले असते. चीनशी मैत्री घट्ट केली असती व इंडो-चायना नामक शक्ती जगात निर्णायक बनवली असती.

गांधीजी एक युद्ध लढले. मनुष्य स्वभावाला स्वाभावीक अशा चुका त्यांनीही केल्या असतील. त्यांचे काहि आराखडे चुकले असतील. नशिबाचे काहि दानं त्यांच्या विरुद्ध पडले असतील. पण त्यामुळॅ त्यांच्या आदर्श व्यवहारीपणाचे मुल्य कमि होत नाहि.

ऋषिकेश's picture

4 Feb 2014 - 4:35 pm | ऋषिकेश

अने एकदम चोक्कस!

प्यारे१'s picture

5 Feb 2014 - 6:01 pm | प्यारे१

+१११

अवतार's picture

5 Feb 2014 - 7:47 pm | अवतार

+१११

नगरीनिरंजन's picture

8 Mar 2014 - 10:29 pm | नगरीनिरंजन

हा प्रतिसाद अर्धवटरावांनीच लिहिला आहे ना अशी एकवार खात्री करून घेतली.
कमालीचा प्रतिसाद आहे.
प्रतिवाद करण्याची इच्छाच नाही कारण हा प्रतिसाद म्हणजे गांधीवादाचे सोयीस्कर अर्थ लावून आपल्या अन्सस्टेनेबल जीवनशैलीचे समर्थन करण्याचे अत्यंत चलाख उदाहरणच आहे.
थोडक्यात गांधीजी आज असते तर ते एखाद्या सीईओसारखे वागले असते असे म्हणायचे आहे असे दिसते. याप्रतिसादावरुन नरेंद्र मोदी हेच आजचे गांधी आहेत असे म्हणायचे आहे की काय अशी शंका यावी इतपत कोलांट्याउड्या मारलेल्या आहेत.

अहिंसा, सत्य, साधी राहणी वगैरे केवळ तात्कालिक होते आणि गांधीजी आज असते तर ते जागतिकीकरणाचा व औद्योगिक संस्कृतीचा पुरस्कार करणार्‍या नेत्यासारखेच वागले असते असे म्हटले तर जयंती-पुण्यतिथीला त्यांचा उदो-उदो करण्याचे तर मुळीच कारण उरत नाही कारण तसे प्रत्यक्षात करणारे इतर नेते सध्या आहेतच. असो.

अर्धवटराव's picture

14 Mar 2014 - 5:11 am | अर्धवटराव

गांधिजी सीईओ नव्हते काय? हि वॉज नथींग लेस दॅन अ सीईओ. सीईओ होणं त्यांनी स्वेच्छेने स्विकारलं. गांधीवादाला समजुन घ्यायचं असेल तर गांधी नामक व्यक्तीने कुठल्या उद्दीष्टाकरता कुठले सिद्धांत कसे अमलात आणले हे बघावच लागेल. तेच सिद्धांत बदलत्या काळात कसे एक्झीक्युट होतील याचा अंदाज देखील बांधावा लागेल. अन्यथा गांधीवाद २० व्या शतकापुरता बंदीस्त होवुन प्राण त्यागेल.

गांधीवादाची कालसुसंगतता नाकारणे आणि २ ऑक्टोबरला राजघाटावर भजनं वाजवणे एकाच कॅटॅगरीचे कृत्यं आहेत. सत्य, अहिंसा आदि तत्वांचा जागतीककरणाशी काय पंगा आहे हे कळलं नाहि. औद्योगीक / आर्थीक समृद्धी या तत्वांशिवाय चिरकाल टिकु शकत नाहि हे वास्तव नाकारण्यात काय हाशील? आणि गांधी वगैरे व्यक्तींचा जेव्हढा उदो उदो होतो त्याच्या १०% सुद्धा जे.आर.डी. टाटांच्या वाट्याला येत नाहि हे वास्तव कटु आहेच ना.

व्यक्ती गांधींची थोरवी आणि जीवनमुल्य तपासणे प्रत्येकाला इंटरेस्टींग वाटणार नाहि. लोकनेता गांधींच्या गांधीवादावरच थोडाफार प्रकाश टाकता येतो.

मारकुटे's picture

14 Mar 2014 - 1:07 pm | मारकुटे

"आपला प्रामाणीक उद्देश साध्य करण्याकरता दीर्घकालीन फायद्याच्या दृष्टीने उपलब्ध साधन सामुग्रीचा काटेकोर वापर करणे" हे एका पक्क्या बनिया वृत्तीच्या अत्यंत शहाण्या आणि चिवट माणसाचे तत्व म्हणजे गांधीवाद.

माहितगार's picture

4 Feb 2014 - 10:20 am | माहितगार

राजकीय अर्थशास्त्राचा सध्याचा फोकस वेगळा असला तरी स्वयंपुर्ण खेडे ही संकल्पना पर्याय अर्थशास्त्राने कायमचा निकाली काढली आहे का ? समजा अशा काही इक्विपमेंट्सचे (आपल्या कामधेनु आणि कल्पतरू टाईप) शोध लागले की कुटूंबाच्या सर्व कुटूंबात भागतील तर ? किंवा खेड्यातल्या खेड्यात उत्पादनाचा खर्च कमी झाला तर ? अर्थशास्त्रात कायम स्वरूपी संकल्पना कोणती ?

स्वयंपूर्ण खेडे संकल्पनेतही वेगवेगळ्या कुटूंबांकडे गरजेपेक्षा अधिक झालेल्या उत्पादनाची देवाण घेवाण होतेच की नाही ? मग संपूर्ण देश किंवा संपुर्ण विश्व यांना एकच खेडे समजून घेता येण्याची काही शक्यता आहे किंवा कसे ?

खरा प्रश्न आर्थीक सामाजिक वीषमतेचे आणि पर्यावरण संतुलनाचे आहेत किंवा कसे ? आणि हे प्रश्न केवळ स्वयंपूर्ण खेडे या संकल्पनेने सुटणारे आहेत का ?

मानवी हावरटपणाला समाजवादी लगाम हवाच पण भांडवलशाही या हावरटपणाचा रचनात्मक उपयोग करून घेण्यास अधिक समर्थ आहे का ? कोणत्याही एकाच मार्गाचे टोक गाठायचे का समतोल साधणे अधीक श्रेयस्कर ?

माहितगार's picture

4 Feb 2014 - 10:59 am | माहितगार

या प्रतिसादा सुरवातीस भारतातील अहींसावादी तत्वज्ञानाचा परीचय नसलेल्या देशास विचारात घेऊ.आपण भारताता नाही आहोत आणि भारतीय नाही आहोत महाविर गौतमबुद्ध गांधी या कुणाशी काही एक परिचय नाही.

'अहींसा प्रत्येक काम करवून घेऊ शकतेच असे नाही.'
चूक का बरोबर ? बरोबरच !

'हिंसा प्रत्येक काम करवून घेऊ शकतेच असे नाही'
चूक का बरोबर ? बरोबरच !

बॉक्सींगखेळाच्या किंवा इतरही खेळांच्या डावपेचात आपण बर्‍याचदा बघतो की एखादा खेळाडू किंवा पक्ष दुसरी आक्रमक बाजू थके पर्यंत डिफेन्सीव्ह वर खेळत रहातो आणि आक्रमक बाजू थकल्यावर आपल आक्रमण चालू करतो जो जिता वही सिकंदर म्हणुन निघून जातो. या डावपेचांच्या खेळात हिंसा करणारा आक्रमक पक्ष सहाजिकपणे लवकर थकण्याची शक्यता अधिक असते उलट तुम्ही अहींसकतेने खेळलात तर एनर्जी सेव्हींग होते किंवा कसे.

तुम्हाला असा मानव मानवी गट समुह माहिती आहे का की ज्याने आयूष्यभर त्याच्या दैनंदीन जीवनातला प्रत्येक क्षणीच प्रत्येक काम केवळ हिंसात्मक मार्गानीच केल आहे ?

चला भारतात वापस येऊन गांधीवादी अहींसेचा विचार करू किती अहिंसावादी होता गांधीवाद अगदी टोकाचा ? ! प्रत्येकाच्या कार्यकर्याकडून भगवद गीता म्हणवून घेणारा अहींसावाद शेवटी किती अहिंसावादी होता ? (आणि स्वतःच्या अधिकारांबद्दल आग्रहि राहण्याकरता शिकवत नव्हता का ?) गांधींच्या विरोधी ब्रिटिश शासनाला दहशत खरेच अहींसावादाची होती का ? उपोषणाला बसलेले गांधी अचानक प्राण त्यागून गेले तर अख्खा देश एकाच वेळी पेटून उठेल याची दहशत अधिक होती ?

आक्रमकता वाद्यांकडून साम-दाम-दंड-भेद या पायरी पायरीने जाण्याच्या गोष्टी आहेत याचा विसर पडतो आणि सूरवातच आक्रमकतेने होते तेव्हा पहिल्याने आक्रमण करणारा आधी थकण्याची शक्यता नसते का ? दुसरे आक्रमकता पिढ्यांपीढ्या जपण्याच्या गप्पा केल्या गेलेल्या पाहण्यास मिळतात पण प्रत्यक्षात त्यांच्याच पुढच्या पिढ्या आक्रमण सोडून शांततावादी झालेल्या दिसतात म्हणजे आक्रमणही बाजूला राहील आणि अधिकारही मिळाले नाहीत हा कोणता फायद्याचा सौदा आहे ?आक्रमकतेत चुकीच्या ठिकाणी शक्ती खर्च होत नाही हे कोन तपासेल ?

तशाच अती अहिंसावादालाही मर्यादा असाव्यात का ? ज्या ज्या प्रदेशात अहींसावादी महापुरुष होऊन गेले तेथे नेमके हिंसा आणि अराजकाचे दृष्य बर्‍याचदा पहावयास मिळते असे का होते ? या बद्दलही वेगळ्या धाग्यातून विचार केला जावयास हवा असे वाटते.

हिंसा निसर्गाने बहाल केलेली स्पॉण्टॅनीयस क्रिया आहे. सामुहीक लेव्हलला पण. हिंसा करा म्ह्णुन सांगावं लागत नाहि. त्याचं केवळ नियोजन केलं जातं. त्याच्या उलट अहिंसेचं.

मनुष्याच्या इन्स्टींक्टला आवर घालुन राबवलेली अहिंसा व्यक्तीगत आणि समुह जीवनात विवेकवाद बहरायला स्कोप निर्माण करते हे खरं आहे. गांधीजींना अहिंसेचं हे महत्व खचीतच उमगलं होतं. योग्य वेळी हिंसा करायला देखील विवेकच आज्ञा करतो. ज्या विवेकाच्या जोपासनेकरता म्हणुन अहिसा पाळायची तोच विवेक हिंसा करायला प्रवृत्त करतो म्हटल्यावर आपल्या अहिंसेच्या तत्वांना चिकटुन बसणं म्हणजे अंधश्रद्धाच. गांधीजी असे अंधश्रद्धाळु होते काय? मला नाहि वाटत.

इंग्रजांनी गांधीजींना उचलुन धरलं ते प्रेशर कुकरच्या शिट्टी सारखा उपयोग करुन घेण्यासाठी. इंग्रजांचे आराखडे कुठेच चुकले नाहित. जहाल टिळक गेल्यावर गांधी आले. इंग्रजी सत्तेविरुद्धची वाफ वेळोवेळी कमि करायला काँग्रेस होतीच. भारतात इंग्रजी राज्यपद्धतीचा स्विकार आणि अंमल व्यवस्थीत एस्टॅब्लीश व्हायला देखील काँग्रेसचा उपयोग झाला. हे भारताच्या देखील पथ्यावर पडलं. एक संपूर्ण नवीन शासनपद्धतीचं लाइव्ह ट्रेनींग मिळालं. सामाजीक सुधारणा झाल्या. दळणवळणाची साधनं आलीत. या सर्व घडामोडी होताना राजकीय पातळीवर बरच काहिबाही होत राहिलं पण इंग्रजांच्या जीवाला कुठलाच धोका निर्माण न होण्याची व्यवस्था झाली. अहिंसेची फळं इंग्रजांनी आणि भारतीयांनी आपापल्या पद्धतीने चाखली. महायुद्ध लढायला इंग्रजांना मोठं धबाड उपलब्ध झालं. हि देखील अहिंसेचीच फलश्रुती. महायुद्ध न होते तर हळुहळु हा अहिंसावाद गांधींबरोबरच संपला असता व भारताला शस्त्र उचलावीच लागली असती. पण तत्पश्चात स्वतंत्र भारतात अहिंसेचे पालन झाले असते काय? दडपशाही वापरुन कदाचीत झाले असते.
सगळा जर-तर चा मामला. असो.

पोटे's picture

16 Mar 2014 - 1:13 pm | पोटे

:)

पैसा's picture

5 Feb 2014 - 5:17 pm | पैसा

लेख आणि चर्चा आवडली. पण एकूणात गांधीवादच का, सगळा समाजच सोयिस्कर तेवढ्या गोष्टी घेणारा झाला आहे. जे सोयिस्कर नाही त्याची काहीही करून मुस्कटदाबी करायची हे एकमेव तत्त्व आहे. मग या सगळ्याचं ( सोयिस्कर तेव्हा गांधीजींची आठवण काढणे वगैरे)आश्चर्य का वाटावं?