जिजामाता उद्यान कट्टा वृत्तान्त

सुधांशुनूलकर's picture
सुधांशुनूलकर in भटकंती
29 Jan 2014 - 11:28 am

|| श्री गुरवे नम: ||

जिजामाता उद्यान कट्टा वृत्तान्त

जिजामाता उद्यानातलं वृक्ष-पुष्पवैभव

डिस्क्लेमर : खरं तर वृक्ष-वनस्पती या विषयात मला फार काही माहीत नाही. प्राणी-पक्षी-कीटक-फुलपाखरं-साप हे माझ्या विशेष आवडीचे आणि अभ्यासाचे विषय. मात्र, बायकोला वृक्ष-वनस्पतींची खूप माहिती असल्यामुळे, तिच्यामुळे मला जे काही थोडंफार माहीत झालं, त्याच्या जोरावर कट्ट्याला गेलो आणि हा सचित्र वृत्तान्त सादर करतो आहे. सर्वांकडून फोटो मिळाल्यानंतर हा वृत्तान्त लिहितो आहे, त्यामुळे उशीर झाला.

रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही सकाळी साडेनऊ-दहा वाजता तब्बल पंधरा-सोळा मिपाकर कट्ट्यासाठी उत्साहाने जमले, तेव्हाच हा कट्टा मस्त होणार, हे नक्की झालं. डॉ. खरे, तन्मय (मुक्त विहारींचा मुलगा), विलासराव आणि विनोद१८ यांनी फोटो काढायची जबाबदारी घेतल्यामुळे आम्ही निश्चिंत मनाने उद्यानात शिरलो. हल्ली अनेक वृक्षांवर नावाच्या पाट्या लावल्यामुळे रोहितक, दिवीदिवी अशा काही अनोळखी वृक्षांची नव्याने ओळख झाली. शिवाय भटक्या खेडवालासारखा माहितगार बरोबर असल्यामुळे दुधात साखरच!

आत शिरल्यावर समोर प्रथम दिसतात गोरखचिंचेचे (बाओबाब Adensonia digitata) दोन अजस्र, ढेरपोटे वृक्ष. हे मूळ आफ्रिकेतल्या ओसाड प्रदेशातले. तिथले रहिवासी याच्या खोडापासून पाणी मिळवतात. पोटात पाण्याचा साठा, म्हणून यांचा बुंधा मोठाला असतो. काही महिन्यांपूर्वी मुरूडला त्याच्या फुलाचा फोटो काढला होता, तोही इथे टाकत आहे.
baobab baobab flower

यांच्या जवळच ‘झुंबर’ (brownea) हे अत्यंत सुंदर फुलाचं झाड आहे, पण त्याला अजिबात फुलं नव्हती, म्हणून थोडा विरस झाला.

इतर वृक्षांपेक्षा फांद्यांची वेगळी रचना असलेला वृक्ष म्हणजे उंदीरमार (Gliricidia sepium). आडव्या मुख्य फांद्यांना उभ्या (जमिनीला काटकोनात) फुटणार्‍या फांद्यांमुळे हे झाड ओळखता येतं. ह्याची मुळं खाल्ल्यामुळे उंदीर मरतात म्हणे, म्हणून याचं नाव उंदीरमार. याच्या गुलाबी फुलांचा हा बहर.
undirmar undirmar flowers

पांढरंशुभ्र खोड असलेलं हे घोस्ट ट्री (Sterculia Urens). रात्री जंगलात फिरताना काळोखात हे पांढरंशुभ्र झाड भुतासारखं दिसत असावं. सध्या हे निष्पर्ण होतं. याचं खोड अगदी गुळगुळीत. तर, खडबडीत गठुळीदार खोड असलेले हे दोन वृक्ष. पाहिला आहे गब/गाब (Diospyros Malabarica) आणि दुसरा आहे भद्राक्ष (Guazuma tomentosa).
ghost tree gaub bhadraksh

गम ग्वायकम (लिग्नम व्हिटे, Guaiacum officinale)ची फिकट जांभळी छोटी फुलं. या मार्गाच्या दोन्ही बाजूंना हीच झाडं आहेत. जानेवारीच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यात याला भरपूर फुलोरा होता. याच्या खोडापासून डिंकासारखा पदार्थ (गम) मिळतो, तो औषधी असून बद्धकोष्ठावर वापरतात.
gum guaiacum

कोको (Theobroma cacao)चं फळ. याच्या बियांपासून कोको बनवतात. दिवाळीच्या सुमारास याला फुलोरा आला असेल. आता त्याचं फळ बघायला मिळतंय. फणसाला बुंध्यावर फळं येतात, तसंच यालाही. भवन्स महाविद्यालयाच्या बागेतही हे झाड आहे
cocoa fruit

पावडर लावायच्या पफसारखं हे गुलाबी आणि पांढरं पावडरपफ.
pinkpowderpuff whitepowderpuff

तोफेच्या गोळ्यासारखं फळ असलेलं कैलासपती उर्फ कॅननबॉल (Couroupita guisnensis). याच्या फुलाला गोडसर सुगंध असतो. झाडाच्या आसपास गेल्यावर वास यायला लागतो. याच्या फुलाच्या आत शंकराच्या पिंडीसारखी रचना दिसते. त्याचं जड फळ खाली पडून फुटतं, त्याला मात्र दुर्गंध येतो.
cannonball1 cannonball2

हे खडबडीत फळ आहे नोनीचं (Morinda citrifolia). 'सत्तर रोगांवर अक्सीर इलाज' म्हणून याचा रस सात-आठशे रुपयांपासून विकला जातो.
noni

जंगली बदाम (Sterculia foetida) हा खास या मातीतला वृक्ष. याच्या लाल छोट्या फुलांना उग्र वास असतो. (याच्या शास्त्रीय नावातल्या ‘फोटिडा’ या शब्दाचा अर्थ ‘ उग्र दर्प/दुर्गंध’.) याचा फुलोरा तर निघून गेलाय, त्याला आता फळ आली आहेत. विनोद१८नी गमतीदार माहिती पुरवली, की याच्या फळाच्या रिकाम्या कवचात पाणी भरून ठेवलं की काही तासांनी डिंक तयार होतो. हे ऐकून काही उत्साही (म्हणजे मी नाही हो! मी मुलखाचा आळशी आहे) मिपाकरांनी हा प्रयोग करण्यासाठी ते घरी नेलं.
janglibadamtree janglibadamfruit

हे चेंडूफळ (बॅडमिंटन बॉल Parkia biglandulosis). खरं तर असंख्य फुलांनी बनलेला हा एक बॉल असतो, ते फोडल्यावर स्पष्ट दिसतंय. बॉलच्या गाभ्यामध्ये बिया तयार होतात.
badmintonballtree badmintonball

उद्यानाच्या मधोमध जिजाऊमाता आणि बालशिवाजी यांच्या पुतळ्याजवळ हे एकमेव नीलमोहर (ब्लू जॅकारांडा Jacaranda mimosaefolia). पुण्यात याची भरपूर झाडं बघायला मिळतात. उद्यानातलं मात्र हे एकमेव झाड. त्याचा बहर ओसरलाय, मात्र मिपाकरांना बघायला मिळावं, म्हणून निदान एकतरी गुच्छ टिकून होता, त्याचे हे फोटो.

bluejacaranda1 bluejacaranda2

या पुतळ्याजवळच एक जपानी बाग आहे. योकोहामा या जपानी शहराने ‘भगिनी शहर’ म्हणून मुंबईशी नातं जोडलं, त्याप्रीत्यर्थ ही बाग उभारली आहे. या बागेतलं हे ‘बॉटलब्रश’ (Callistemon citrinus).
bottlebrush

बागेतल्या तळ्यातली ही कमळं आणि कासव.
pinkkamal whitekamal kasaw

बागेतला कांचनही (Bauhinia varigata) मस्त फुलला होता. फुलाचा हा क्लोज-अप. याची पानं आपट्यासारखी असल्यामुळे फुलोरा नसतानाही हे झाड मला ओळखता येतं.
kanchan

याच बागेत एका छोट्या कमानीवर चढवलेल्या एका वेलीची ही सुंदर फुलं. हिचं नाव ‘लसूणवेल’, कारण हिची पानं थोडी चुरडल्यावर बोटांना लसणीचा वास येतो.
lasunwel

वैशिष्ट्यपूर्ण पानं असलेला हा एक वृक्ष – सॅटिन लीफ / स्टार अ‍ॅपल (Chrysophyllum cainito). याच्या पानाचा रंग एका बाजूने गडद हिरवा, तर मागच्या बाजूचा रंग सोनेरी ब्राउन आणि स्पर्श सॅटिनसारखा मऊ असतो. लॅटिनमधील ‘क्रायसोस’ म्हणजे सोनेरी आणि ‘फायलम’ म्हणजे पान, म्हणून शास्त्रीय नाव ‘क्रायसोफायलम’.
satinleaf

सीतेचा अशोक (Saraca asoka) कसा भरगच्च फुलला आहे, बघा. लाल-शेंदरी फुलांचा गुच्छ मस्त दिसतो. सीतेला अशोकवनात (याच वृक्षांच्या वनात) ठेवलं होतं, म्हणून याला ‘सीतेचा अशोक’ म्हणतात. याच्या खोडापासून, पानांपासून अशोकारिष्ट, अशोक घृत वगैरे अनेक गुणकारी औषधं बनवतात. (प्रासजी, बरोबर आहे ना?)
sitaashok

याचसाठी केला होता अट्टाहास...

उद्यानाची एक रोपवाटिका आहे. तिच्या आत असलेली ही पिवळी सावर (यॅलो सिल्क कॉटन Cochlospermum religiosum). आत गेल्यावर हा फोटो मिळाला, पण तेवढ्यात शिपाईमामा शिट्या फुंकत आले आणि आम्हाला बाहेर हाकललं. सर्वत्र आढळणारी काटेसावर (लालगुलाबी फुलं) आणि पांढरी सावर यांचाच हा भाऊ.
yellowsilkcotton

व्हाईट शेव्हिंग ब्रश (Psuedobombax ellipticum) याच दिवसात फुलतो आणि त्याचा फुलोरा थोडे दिवसच असतो. तो बघण्यासाठी कट्ट्याचा एवढा आटापिटा केला.
shavingbrushtree shavingbrush2

उर्वशी उर्फ रतनज्योत (अ‍ॅमहर्स्टिया नोबिलिस) - नावाप्रमाणेच ‘नोबल’ फूल. मूळचं द. अमेरिकेतलं. इथे आता मस्त फुललंय.
urwashi1 urwashi2

फुलांसाठी एक खास संकेतस्थळ इथे पाहा.

या दिवसात न फुललेली काही फुलं - महाराष्ट्राचं राज्यफूल तामण/जारूळ, बहाव्याच्या विविध जाती, गोरखचिंच वगैरे एप्रिल-मेमध्ये फुलतील. तो फुलोरा बघायला एप्रिल-मेमध्ये उद्यानात चक्कर टाकायलाच हवी, हेवेसांनल.

सरतेशेवटी,

मुजरा....jijaushiwaji

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

29 Jan 2014 - 11:36 am | पिलीयन रायडर

मस्त व्रुतांत!!! उत्तम फोटोज.. मजा आली.. असा एखादा कट्टा इकडे पण व्हायला हवा...

आतिवास's picture

29 Jan 2014 - 11:41 am | आतिवास

वृत्तांत आणि विशेषतः सगळी प्रकाशचित्रं आवडली.
आता पुढच्या मुंबई भेटीत इथं परत एकदा जाण्याचा बेत करते आहे हा वृत्तांत वाचून.

जोशी 'ले''s picture

29 Jan 2014 - 12:04 pm | जोशी 'ले'

धन्यवाद सुंदर माहिती...कैलासपती उर्फ कॅननबॉल चे वृक्ष गेली 3 वर्षे बोरीवली पुर्वेला मागाठणे सिग्नल ला स्पेशल स्टिल समोरच्या रस्त्यावर बघतोय नाव माहित नव्हतं

मस्त व्रुतांत आणी फोटोपण .
आमच्या इकड एक अशोकाच झाड सोडल तर बाकीचे नाहीतच

मुक्त विहारि's picture

29 Jan 2014 - 12:12 pm | मुक्त विहारि

व्रुत्तांत छान लिहीला आहे.

पुनः प्रत्ययाचा आनंद झाला.

प्रमोद देर्देकर's picture

29 Jan 2014 - 12:33 pm | प्रमोद देर्देकर

खुप छान माहिती आणि छायाचित्र.

यशोधरा's picture

29 Jan 2014 - 12:45 pm | यशोधरा

मस्त!

नंदन's picture

29 Jan 2014 - 12:49 pm | नंदन

फारच छान! अनेक झाडांची नावं प्रथमच समजली. आता पुढच्या खेपेत जिजामाता उद्यानात केवळ झाडांसाठीच फेरी मारायला हवी.

अवांतर - छिद्रान्वेषीपणाबद्दल क्षमस्व; पण " ओक्लाहोमा या जपानी शहराने ‘भगिनी शहर’ म्हणून मुंबईशी नातं जोडलं" - येथे ओक्लाहोमा ऐवजी योकोहामा हवं.

मोहन's picture

29 Jan 2014 - 1:40 pm | मोहन

सहमत

सुधांशुनूलकर's picture

29 Jan 2014 - 7:25 pm | सुधांशुनूलकर

" ओक्लाहोमा या जपानी शहराने ‘भगिनी शहर’ म्हणून मुंबईशी नातं जोडलं" - येथे ओक्लाहोमा ऐवजी योकोहामा हवं.

आवश्यक तो बदल केला आहे. नजरेस आणून दिल्याबद्दल आभार.

मस्त...फोटो व वृत्तांत.

बरीच माहीती नव्याने कळली...धन्यवाद.

सुज्ञ माणुस's picture

29 Jan 2014 - 1:22 pm | सुज्ञ माणुस

मस्त ! तो चेंडूफळ (बॅडमिंटन बॉल Parkia biglandulosis) फोटो पाहून लहानपणीचे दिवस आठवले. आम्ही त्याला टण्णु चे झाड म्हणायचो. ते टण्णु एकमेकांच्या डोक्यात मारायचे. बेक्कार लागतात :) असाच सेम एक फळ पण ते काळे असते आणि त्याला फुले नसतात. ते तर अजून वाईट लागते( डोक्यात मारल्यावर) :)

ते टण्णु एकमेकांच्या डोक्यात मारायचे. बेक्कार लागतात >> अगदी अगदी! आम्ही मागच्या बेंच्वर बसून पुढच्या बेंचवरच्यांच्या डोक्यात मारायचो! :D

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jan 2014 - 1:48 pm | अत्रुप्त आत्मा

फोटूच फोटू सगळीकडे! :)

अजया's picture

29 Jan 2014 - 1:50 pm | अजया

अप्रतिम!

सूड's picture

29 Jan 2014 - 2:22 pm | सूड

मस्तच !!

वडापाव's picture

29 Jan 2014 - 2:24 pm | वडापाव

रिव्हिजन झाली!! :)
मजा आली!! :)

स्वाती दिनेश's picture

29 Jan 2014 - 3:55 pm | स्वाती दिनेश

छान वृत्तांत आणि फोटो तर सुंदरच,
स्वाती

पद्मश्री चित्रे's picture

29 Jan 2014 - 6:22 pm | पद्मश्री चित्रे

नव्या नजरेने राणीची बाग बघण्याचा अनुभव

तिमा's picture

29 Jan 2014 - 6:31 pm | तिमा

काय वन ट्रॅक मेंदु असलेला माणूस आहे मी ! राणीच्या बागेत प्राणी बघायला गेलो तेंव्हा झाडांकडे बघितलंच नाही. आता हे फोटो बघितल्यावर परत जायलाच पाहिजे.

सुहास झेले's picture

29 Jan 2014 - 6:32 pm | सुहास झेले

मस्तच... वृत्तांत आणि माहिती आवडली आहे.

पुन्हा कट्टा जमवा लोकहो :)

राही's picture

29 Jan 2014 - 6:40 pm | राही

फोटो खरोखर छान आहेत. पहाताना मजा आली. जांभळा कांचन फार सुरेख दिसतो आहे.
ग्लिरिसिडिया साठी मला वाटते इंग़ळहळ्ळीकरांनी 'गिरिपुष्प' हे सुंदर नाव सुचवले आहे.
घोस्ट ट्री ला मराठीत बहुधा 'कांडोळ' हे नाव आहे. ताडोबामध्ये ही झाडे दिसतात. इतरत्रही असणारच.
जंगली बदामाच्या झाडाला ठाणे-रायगड जिल्ह्यांत गावठी देवदार म्हणतात. ह्याच्या बिया दगडावर घासून हातावर ठेवल्या तर पांगार्‍याच्या बियांसारखा चटका बसतो.
पुण्याच्या एम्प्रेस गार्डनमध्ये खर्‍या अशोकाची एक वाटिकाच आहे. इथले महोगनी, टेंभुर्णी आणि पहाडी नारळाचे वृक्षही पहाण्याजोगे आहेत.
मुंबईत करंज फुलू लागला आहे. अगदी सकाळी झाडांखाली बारीक फुलांचा सडा मंद सुवास पसरीत असतो.

प्यारे१'s picture

29 Jan 2014 - 6:51 pm | प्यारे१

>>>एम्प्रेस गार्डन

हह्ह्ह्ह्ह!

राही's picture

29 Jan 2014 - 9:24 pm | राही

यात हहहह! करण्याजोगे काय आहे? ते एक वनस्पतिउद्यान आहे आणि बाकी कितीही दुरवस्था असली तरी वृक्ष पहायला जाणार्‍यांना त्याने काहीही फरक पडत नाही.

प्यारे१'s picture

30 Jan 2014 - 12:42 pm | प्यारे१

अहो ते तुमच्या प्रतिसादाला नव्हतं. सॉरी!

आठवतं कधी कधी काही काही! ;)

प्रचेतस's picture

29 Jan 2014 - 6:49 pm | प्रचेतस

अतिशय सुंदर वृत्तांत.
माहिती खूप आवडली.

सुबोध खरे's picture

29 Jan 2014 - 7:02 pm | सुबोध खरे

Every body has eyes but a few have vision.
प्रत्येकाला डोळे असतात पण दृष्टी फक्त काही जणांना असते.
ही दृष्टी नुलकर साहेबानी दिली.नाहीतर आपल्यापैकी बहुसंख्य माणसानी राणीचा बाग आणि त्यातील प्राणी बर्याच वेळेस पाहिलेले आहेत.
मिसळपाव कट्ट्यावर आवर्जून येण्याचे कारण अशी अफाट माणसे. आपले विलासराव घ्या मैत्रिणीच्या कडे सात समुद्रपार गेले किंवा दोन हजारावर किमी पायी चालून नर्मदा परिक्रमा केली. अशी माणसे घर बसल्या कशी भेटणार?
यास्तव आपल्या मित्राना विनंती आहे जमेल तितके कट्टे भरावा आणि भेटा आणि आपले अनुभव विश्व समृद्ध करा

माझे लेखन

अनन्न्या's picture

29 Jan 2014 - 7:13 pm | अनन्न्या

बरीच झाडे प्रथमच पाहिली.

सुधांशुनूलकर's picture

29 Jan 2014 - 8:18 pm | सुधांशुनूलकर

प्रतिसाद अगदी मनापासून दिले आहेत, असं जाणवलं. आभार.

मिसळपाव कट्ट्यावर आवर्जून येण्याचे कारण अशी अफाट माणसे.

खरं आहे खरेसाहेब.

विलासराव, विलासराव, विनोद१८ आणि तन्मय यांच्या उत्कृष्ट फोटोग्राफीमुळे या कट्ट्याला खरा अर्थ आला.

@आतिवास, तिमा, नंदन,
तुम्हाला केव्हाही जायचं असेल तेव्हा मला व्यनि करा. मला शक्य असेल तर मीही नक्कीच येईन तुमच्याबरोबर.

रेवती's picture

29 Jan 2014 - 8:37 pm | रेवती

छान माहिती व फोटू.

सानिकास्वप्निल's picture

29 Jan 2014 - 10:20 pm | सानिकास्वप्निल

छान वृत्तांत आणी सुंदर फोटो :)

रुस्तम's picture

29 Jan 2014 - 10:38 pm | रुस्तम

या वेळेस यायला भेटलं. परत जमल्यास नक्की येणार.

मुक्त विहारि's picture

29 Jan 2014 - 11:06 pm | मुक्त विहारि

नक्की या.

किसन शिंदे's picture

30 Jan 2014 - 1:14 am | किसन शिंदे

अतिशय माहीतीपुर्ण वृत्तांत आणि तेवढेच भारी फोटोही. तो एक कैलाशवृक्ष सोडला तर बर्‍याचश्या झाडांची आधी नावंही माहीती नव्हती. राणीचा बाग म्हणजे प्राणी संग्रहालय हाच समज कायमचा मनावर कोरलेला होता, पण आता तुमच्या या धाग्यामुळे तो पुर्णपणे बदलला गेलाय.

नुलकर साहेब, एकदा चलाच आमच्यासोबत कर्नाळ्याच्या जंगलात. :)

कर्नाळ्याच्या जंगलात कट्टा ठरवाच.

सुबोध खरे's picture

30 Jan 2014 - 9:24 am | सुबोध खरे

लवकरच ठरवा म्हणजे हवेत थंडी आहे तोवर भटकायला आणि खायला मजा येते.

अनुमोदन आहे! शिवाय एक तरी कट्टा माझ्या घराजवळ होइल, हा छूपा हेतू !!

रुस्तम's picture

30 Jan 2014 - 10:03 pm | रुस्तम

लवकरच ठरवा ...

इन्दुसुता's picture

30 Jan 2014 - 6:19 am | इन्दुसुता

झाडांचे फोटो आणि वर्णन आवडले.
( बघून थोडी जळ्जळ झाली खरी !! उगाच खोटे कशाला बोला? शेवटी आम्हीही निसर्ग प्रेमीच )
इनो घेतल्याची ही पोच :)

थोडी पुरवणी: (कट्ट्याला आलो नव्हतो पण फोटो बघुन स्वतःकडील माहिती देतोय. गेलेल्यांना आठवणींशी पडताळून बघता येईल)

पावडर पफ ला 'शिरिष' असे मराठी नाव आहे. झाडाचा आकार पावसातील छत्रीसारखा असल्याने त्याला काही जाणकारांकडून 'पर्जन्यवृक्ष' किंवा 'वर्षावृक्ष' म्हटलेलेही ऐकले आहे. मराठी विश्वकोषात याची साद्यंत माहिती इथे मिळेल

घोष्ट ट्री हा बहुदा मराठीतील 'मयाळ' वृक्ष असावा. फोटोत अख्खे झाड दिसत नाहिये त्यामुळे सांगता येणे कठीण आहे.

जॅकरँडाला अनेकदा नीळी गुलमोहर संबोधले जाते. मात्र हे झाड नी गुलमोहराचा संबंध नाही. जॅकरँडासारखीच पिवळी फुले येणारे झाड आहे. (नाव आठवताच देतो. बहावा वेगळा) त्यालाही अनेकदा पिवळी गुलमोहर म्हणायची चुक अनेक जण करताना दिसतात.

बाकी पुणेकरांसाठी:

जॅकरँडा पुण्यात अनेक रस्त्यांवर आहेच. पाषाणरोडबर तो दुतर्फा दिसेल. त्याच सोबत याच रोड वर साकुराच्या (चेरी) रंगाचा कॅसियाचा बहर सध्या आला आहे. (आता उतरतोय, याच आठवडयत तिथे फिरकलात तर). उन्हाळ्यात पाषाण ते औंध जोडणार्‍या अभिमानश्रीमधून जाणार्‍या रस्त्यावर दोन्ही बाजुला भरगच्च बहावा फुलेल. तो बघायला विसरू नका. त्या रस्त्यावर इतका बहावा आहे की सुर्यप्रकाशही पिवळाधम्मक दिसू लागतो. तो रस्ता उन्हाळात एक अतिशय देखणा रस्ता असतो. बाकी जुन्या कोल्हापूर मार्गावर दोन्ही बाजुला करवीर (कण्हेर), वड व शिरीष वृक्षांची रांग होती. आता रस्ते मोठे झाल्यावर हटली असावी :(

अवांतरः बॉटलब्रश आमच्या सोसायटीतच माझ्याच बिल्डिंग खाली आहे. शिवाय काही सोसायट्यांत विपींग विलोज दिसतात त्यांना सध्या बहार आलेला आहे. लक्ष ठेवा.

ऋषिकेश's picture

30 Jan 2014 - 10:01 am | ऋषिकेश

आठवलं!!!
जॅकरँडा सारख्य पिवळ्या फुलांच्या झाडाला सोनमोहर म्हणतात

शिवाय ते पांढर्‍या खोडाचं झाड कदाचित सफेदी असु शकेल. उत्तरेला बरीच असतात. तिथे त्याच्या खोडापासून बॅट्स बनवतात.

सुधांशुनूलकर's picture

30 Jan 2014 - 11:13 am | सुधांशुनूलकर

विस्तृत प्रतिसादासाठी आभार.

काही बाबतीत थोडं स्पष्टीकरण :

पावडर पफ, शिरिष आणि पर्जन्यवृक्ष हे तिन्ही वेगवेगळे आहेत. पावडर पफ म्हणजे शिरिष अजिबात नव्हे. पावडर पफ हे एक झुडूप असून शिरिष (अल्बिझिआ लेबेक) हा एक मोठा, भारतीय वृक्ष आहे.

पर्जन्यवृक्ष (रेन ट्री - सॅमानिया सॅमन) हा विशाल वृक्ष मूळचा परदेशी आहे. त्याला 'विलायती' शिरिष असंही म्हणतात, कारण त्याची फुलं शिरिषसारखीच दिसतात.

घोस्ट ट्री म्हणजे 'कांडोळ', मयाळ नव्हे. मयाळ ही एक वेल आहे.

जॅकारँडासारखी पिवळी फुलं : सोनमोहर म्हणजे पेल्टोफोरम टेरोकार्पम (Peltoforum pterocarpum).

वृक्षांमध्ये गोंधळ होऊ नये, म्हणून धाग्यामध्ये लॅटिन नावं मुद्दाम घातली आहेत. खातरी करण्यासाठी या नावांनी गुगलून पाहावे.

ऋषिकेश's picture

30 Jan 2014 - 12:32 pm | ऋषिकेश

पावडर पफ, शिरिष आणि पर्जन्यवृक्ष हे तिन्ही वेगवेगळे आहेत. पावडर पफ म्हणजे शिरिष अजिबात नव्हे. पावडर पफ हे एक झुडूप असून शिरिष (अल्बिझिआ लेबेक) हा एक मोठा, भारतीय वृक्ष आहे. पर्जन्यवृक्ष (रेन ट्री - सॅमानिया सॅमन) हा विशाल वृक्ष मूळचा परदेशी आहे. त्याला 'विलायती' शिरिष असंही म्हणतात, कारण त्याची फुलं शिरिषसारखीच दिसतात.

मग मी पावडर पफ बघितलेले नाही. धाग्यात केवळ फुलांचे चित्र असल्याने तसे वाटले.
बाकी वर्षा वृक्ष चे वर्गीकरण सॅमानिया सॅमन पेक्षा Albizia saman अधिक योग्य वाटते. (मराठी विश्व कोषही सॅमानिया सॅमन म्हणतोय खरा पण विकी पानावर सॅमानिया सॅमन शोधल्यावर पान Albizia saman लाच डायरेक्ट होते ;) )

मी असे म्हणतोय कारण शिरीष ही फ्यामिली (कुळ) असल्यासारखीच आहे (Albizia फ्यामिली). त्यात गुलाबी फुले देणारी झाडे (Albizia saman - विलायती शिरीष) आहेत हे मान्य. शिवाय लुलै/कृष्णशिरीष (ॲल्बीझिया ॲमारा) आले.

या सगळ्याला सवयीने शिरीष असेच म्हटले जाते - म्हणून तसे लिहिले होते.

मात्र तुम्ही म्हणताय तो भारतीय शिरीष (अल्बिझिआ लेबेक) भारतात कुठेशी असतो? मी बहुदा अजून बघितलेले नाही. पफ सारखीच पण त्याची पिवळी फुले दिसताहेत, शेंगाही बर्‍याच लांब आहेत, पानेही जाड आहेत. तेव्हा बघायला आवडेल.

बाकी माहितीबद्दल आभार.

आनन्दिता's picture

30 Jan 2014 - 10:54 am | आनन्दिता

पुण्यातल्या संभाजी उद्यानात कैलासपती उर्फ कॅननबॉल ची दोन तीन झाडे आहेत.. रंग पण वेगवेगळे आहेत बहुतेक.. झाडं प्रचंड मोठी आहेत.. खुप फुलं येतात...

माणिकमोति's picture

30 Jan 2014 - 11:02 am | माणिकमोति

ह्या आठवड्यात नक्की जावून बघणार....!! कैलासपती बघून शाळेची आठवण आली. आमच्या शाळेत ह्याचे मोठ्ठे झाड होते. अजुनही असेल. आम्ही त्याला नागचाफा म्हणायचो.

असा कट्टा करायला माहीम येथील "निसर्ग उद्यान" देखील उत्तम आहे. खासकरुन रविवारी तेथे अनेक उपक्रम असतात. उत्तम प्रतीची भाजी देखील मिळते. धारावीच्या इतक्या जवळ इतके छान ठिकाण असेल ह्याची आत गेल्याशिवाय कल्पना येत नाही. येथे अनेक प्रकारची झाडे (रोपे) विकायला देखील असतात.

आनन्दिता's picture

30 Jan 2014 - 11:05 am | आनन्दिता

पुरवणी: फोटो क्र. ४ मधल्या ग्लायरिसिडीया च्या झाडामधे भरपुर प्रमाणात नायट्रोजन असते... शेतात त्याची लागवड केली जाते.. झाडे जरा मोठी झाली की त्यावरुन नांगर फिरवुन मातीत गाडली जातात....पुढे झाडे कुजुन त्यातला नायट्रोजन मातीत शोषला जातो... जमिनीची उपज क्षमता वाढते...

सुधांशुनूलकर's picture

30 Jan 2014 - 11:16 am | सुधांशुनूलकर

ही नवी माहिती मिळाली. आभार.

वृत्तांत वाचुन बरीच नविन माहिती मिळाली. धन्यवाद सुधांशु काका.

मदनबाण's picture

30 Jan 2014 - 3:30 pm | मदनबाण

दोन्ही वॄतांत आवडले. :) या वॄतांता मधील माहिती तर उपयोगी आहे.

हे चेंडूफळ (बॅडमिंटन बॉल Parkia biglandulosis). खरं तर असंख्य फुलांनी बनलेला हा एक बॉल असतो, ते फोडल्यावर स्पष्ट दिसतंय. बॉलच्या गाभ्यामध्ये बिया तयार होतात.
हे चेंडूफळ तर विशेष आवडले ! ;)
खरं तर हे फळ पाहुन कदंबाचे फळ आठवले ! मला वाटतं की कदंबाची फळे गुच्च्छात असतात,आणि त्याची पाने मोठी असतात. एखाद्या संत्र्याला सगळी कडुन मोड यावेत असं ते दिसत. ;)

हुप्प्या's picture

31 Jan 2014 - 1:21 am | हुप्प्या

मस्त आणि माहितीपूर्ण.
आभारी आहे.

प्रभाकर पेठकर's picture

31 Jan 2014 - 1:37 am | प्रभाकर पेठकर

घरबसल्या बॉटनिकल गार्डनची सफर झाली. वाचून मजा आलीच पण प्रत्यक्ष अनुभव अर्थात उच्च प्रतिचा म्हणावा असा.

पैसा's picture

1 Feb 2014 - 2:37 pm | पैसा

वृत्तांत मस्त खुसखुशीत! झाडांची माहिती आणि फोटो अप्रतिम! मंडळींनी सुचवल्याप्रमाणे एखादा कट्टा जंगलात करा आणि मग एप्रिल मे मधे करा. यायला जमलं नाही तरी अशा वृत्तांतामधून प्रचंड माहिती मिळते आहे! धन्यवाद!

भ ट क्या खे ड वा ला's picture

4 Feb 2014 - 5:38 pm | भ ट क्या खे ड वा ला

नूलकर साहेब वृत्तांत एकदम झकास.
रविवारी डॉक्टर खरे डोंबिवली कट्ट्याला आले होते.
आल्या आल्या त्यांनी सांगितले कि "बाओबाब" त्यांना मुलुंड ला दिसला.
असे "दिसू लागणे" हाच तर अश्या कार्यक्रमाचा उद्देश असतो.
मु वि. नाही डोंबिवलीतील जंगली बदाम , सुरमाड, आणि रेन ट्री दिसू लागले आहेत त्यांच्या नेहमीच्या रस्त्यावर.
जसे माणसाचे नाव माहित झाले तरच पुढे मैत्री होण्याची शक्यता असते तसेच वृक्षांच्या बाबतीत असते.
प्रत्येक वृक्ष वेगवेगळ्या मोसमात त्याच्या अबोल भाषेत आपल्याशी बोलू लागतो तेव्हा खरी मैत्री होते.
या कट्या च्या निमित्ताने तुमच्या सारखा एक वृक्षमित्र मिळाला.
वृक्ष ओळखीचे एक सूत्र असे सांगते कि पहिल्यांदा फुला वरून ओळखावा, मग पानांवरून आणि मग खोड,फांद्या, उंची या वरून ओळखावा.
उर्वशी उर्फ रतनज्योत (अ‍ॅमहर्स्टिया नोबिलिस),पिवळी सावर या दोघांसाठी तर या कट्याला आलो होतो.
पुन्हा कधी जाणार असाल तर मला नक्की सांगा . भ्रमण ध्वनी क्रमांक व्य नी करत आहे.
एप्रिल शेवटच्या आठवड्यात माझा जायचा विचार आहे.
सध्या डोंबिवलीत एक दोन tabebuia छान बहरले आहेत.
अंधेरी पश्चिमेला बँक ऑफ बडोदा जवळ एक कैलासपती हि परवा भेटला.
फोटो काढणाऱ्या मंडळींमुळे आपल्याला छान सलग सैर करता आली ,त्या बद्दल त्यांचे धन्यवाद.
रस्व्ह ,दीर्घ ,व्याकरण यातील चुका कायम क्षम्य कराव्यात अशी विनंती सर्वाना कायम करणारा
भखे .

सौ.मुवि's picture

9 Feb 2014 - 10:33 pm | सौ.मुवि

एक दिवस, अहोंनी (म्हणजेच "मुविंनी" ) मला सांगीतले की, आपल्या चौघांना (म्हणजे, मी, मुवि आणि आमची २ मुले) मिसळपावच्या कट्ट्याला जायचे आहे.

तो भायखळा येथील जिजामाता उद्यान येथे होणार आहे.मी थोडीशी अनुत्सुकच होते.बघीतलेल्या गोष्टीच परत बघण्यात काय हशील?

कधी न्हवे ते अहोंच्या आग्रहाखातर, मी आणि मुले तयार झालो आणि खरे सांगायला आता हरकत नाही की, तेथे गेल्याचे सार्थक पण झाले.

आम्हा सर्वांना बागेतील कट्टा आल्हाददायक अनुभव देवून गेला."नुलकर काकांमुळे" हा कट्टा ज्ञानवर्धक झाला.झाडांच्या माहितीबरोबरच त्यंनी घरी बनवलेली चॉकलेट्स देवून .....

देणार्‍याने देत जावे.....

हा धडाच दिला.

ह्या कट्ट्यामुळे मी निसर्गाच्या जवळ गेले.झाडांकडे बघण्याची द्रुष्टी मला मिळाली.

शिवाय आमच्या बरोबर ह्या कट्ट्याला आलेले सुबोध खरे,भटक्या खेडवाला,वडापाव्,विमे,निलापी,कस्तूरी,विलासराव आणि विनोद१८ ह्या मंडळींच्या मनमिळावू स्वभावामुळे मला असे वाटलेच नाही की ही सगळी मंडळी मला परकी आहेत.सगळेजण वेळेवर आल्यामुळे कट्टा यशस्वी झाला.

हे असेच सुंदर कट्टे दरवेळी होवोत.त्यामुळे ऐक्याची भावना वाढीस लागण्यास मदत होईल.

सौ. मुवि (उर्फ म ज फा)

बॅटमॅन's picture

10 Feb 2014 - 3:58 pm | बॅटमॅन

अतिशय सुंदर फटू अन मस्त माहितीपूर्ण लेख! बहुत धन्यवाद. इकडे जायलाच पाहिजे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Feb 2014 - 4:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहिती आणि फोटो !

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

12 Feb 2014 - 2:24 pm | निनाद मुक्काम प...

लहानपणी ह्या उद्यानात कितीतरी वेळा गेलो आहे. पण त्यावेळी प्राणी पाहणे हा मुख्य हेतू होता.
आता ह्या वेळच्या भारत भेटीस बायकोला ,भारतीय वृक्ष संपदा आणि जगभरातील वृक्ष पाहण्यासाठी नक्की जावे लागेल ,

ऋषिकेश's picture

12 Feb 2014 - 2:47 pm | ऋषिकेश

वृक्षांकडे बघता बघता हळुहळू पक्षीही दिसू लागतात असा स्वानुभव आहे.
श्री.नुलकर यांच्यामुळे मंडळी झाडे बघु लागली आहेतच.

हे असं म्हणतोय कारण आता १४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी या दरम्यान जगभरात 'ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट' होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही थोर करायचं नाहिये तर या चार दिवसांत तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला जे जे पक्षी दिसले त्या त्या पक्षांची नोंद करून ती तुम्ही www.ebird.org वर करायची आहे.

कोणताही पक्षी असो, कुठेही दिसला असो. या दिवशी तुम्ही घरी असा, ग्यालरीत असा नाहितर बागेत नाहितर जंगलात, पक्षी हे हमखास दिसणारच (कै नै तरी कावळा/चिमणी आहेतच). तुम्हाला लगेच दुर्मिळ पक्षी दिसेल असे नाही पण असं ठरवून पक्षी बघायचा प्रयत्न केल्यावर तुम्हालाच आश्चर्य वाटेल की आपण कुठेही असलो तरी सभोवताली किती प्रकारचे जीव/पक्षी असतात ते.

धागा हैज्याक वगैरे करायचा हेतु नाही. फक्त इछुकांना माहिती आणि इतरांमध्ये पक्षी बघायची(ही) इच्छा निर्माण व्हावी हाच हेतु