अळूचं फदफदं

गणपा's picture
गणपा in पाककृती
26 Jan 2014 - 2:24 pm

गेल्या आठवड्यात पहिल्यांदा इथे भाजी मार्केटमध्ये अळूचं पान पाहिलं तेही कचरर्‍यात पडलेलं. इथले लोक अळूच्या पानांना काय म्हणतात ते माहित नसल्याने मग त्याच्याकडे बोट दाखवून विक्रेत्याला विचारलं की ही पानं कुठेशी मिळतील? त्यावर म्हणाला ही आम्ही विकत नाही कोथिंबीरीसारख्या भाज्या ने-आण करताना पॅकिंग म्हणुन वापरतो. मग त्याला विचारलं पुढल्यावेळी माझ्यासाठी थोडी वेगळी आणशील का? तर त्याने शुक्रवार पर्यंत थांबायला सांगीतल. त्याचा फोन नंबर घेऊन ठेवला आणि गुरुवारी त्याला पानं आणण्याची आठवण करुन दिली. परवा त्याने कबुल केल्या प्रमाणे पानं आणुन दिली. आपल्याकडे तशी ही बारामाही असणारी पानं पावसाळ्याच्या आस पास बाजारात सर्रास दिसतात. गावाला मात्र घरी अंगणात-परसदारी मोकळी जागा असल्यानं वडीचं आणि भाजीचं अळू नेहमी असतं.
शुक्रवारी पानं मिळतीलच ही खात्री होती म्हणुन फदफदं करायचा बेत फिक्स होता. दोन दिवस आधीच वाल भिजत घातले होते. शनिवार पर्यंत मोडही आलेले. आईला फोन करुन एकादा पाककृतीची उजळणी करुन घेतली. हो आयत्यावेळी पोपट नको व्हायला काय? ;)

साहित्य :

१ वाटी/बाऊल बिरडं. (सोललेले वाल)
१ नग मध्यम आकाराचा कांदा
५-६ अळूची पानं देठां सकट
१-२ हिरव्या मिरच्या

वाल नसले तर चणे/ चणाडाळ ही चालेल.

फोडणीसाठी : तेल, मोहरी, हिंग, असल्यास कडीपत्याचं पान.
१/२ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, १ चमचा गरम मसाला, २ पेर दालचीनी, १ १/२ चमचा आलं-लसुण पेस्ट.
चिंच-गुळ, मीठ स्वादानुसार.

कृती :

अळूची पानं बारीक चिरुन घ्यावी. देठाची सालं काढून त्याचे ही बारीक तुकडे करुन घ्यावे.
मिरच्यांना उभा चर देऊन तुकडे करुन घावे. कांदा मध्यम,लांब-उभा चिरुन घ्यावा.

मोहरी, मिरची, कडीपत्ता, हिंग यांची फोडणी करुन त्यात कांदा, हळद टाकुन परतावं.
नंतर त्यात अळूचे देठ आणि चिरलेली पानं घालावी. लाल तिखट, किंचीत मीठ भुरभुरुन एकत्र करावं.

अळूची पानं थोडी बसली की मग त्यात आलं-लसुणाची पेस्ट टाकावी, गरम मसाला, दालचीनीची वाटुन टाकावी.
नंतर त्यात बिरडं घालुन हलक्या हातानं सगळं एकत्र करुन घ्यावं. चवी नुसार मीठ घालावं.

थोडंस पाणी टाकून, वर झाकण आणि त्यात पाणी ठेऊन मंद आचेवर भाजी शिजत ठेवावी. (चणा असेल तर कुकरला लावली तरी चालेल, पण बिरड्याचं अगदीच पीठ होऊन जातं तेव्हा शिट्या घेताना काळजी घ्यावी.)
वाल संपुर्ण शिजले की मगच त्यात चींचेचा कोळ आणि गुळ टाकुन पुन्हा उकळी आणावी. रस भाजी हवी असल्यास गरजे नुसार पाणी वाढवावं किंवा मग आटवावं.

पराठा अन वाफाळत्या भातासोबत ताट वाढलय.
आज साधाच बेत आहे, या जेवायला. :)

प्रतिक्रिया

ह भ प's picture

26 Jan 2014 - 2:44 pm | ह भ प

ग्रेट!!
मस्त रेसिपी..
या जेवायला म्हणालात.. पण कुठं ते नाही सांगितलत.. ;)

पैसा's picture

26 Jan 2014 - 2:47 pm | पैसा

क्या बात है! मस्तच! अळू म्हणजे एकदम टेस्टी भाजी. फक्त एक शंका. सगळीच अळू 'सभ्य' नसतात. ही पॅकिंग म्हणून वापरलेली खाजरी नव्हती का? नसतील तर तुला आता अळूवड्या पण कधीही करता येतील!

दैव योगे अळू खाजरं निघालं नाही. :)
भगवान न करे खारज निघालं असतं तर चंचेचा कोळ होताच की.
तशीही खाण्याची खाज इतकी होती की त्यापुढे ती खाज काहीच नाही. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jan 2014 - 7:30 pm | अत्रुप्त आत्मा

@तशीही खाण्याची खाज इतकी होती की त्यापुढे ती खाज काहीच नाही. >>> :D
=)) __/\__ =))

>>नसतील तर तुला आता अळूवड्या पण कधीही करता येतील!

भाजीच्या अळवाच्या कशा अळवड्या करणार पैकाकू?

पैसा's picture

27 Jan 2014 - 11:22 am | पैसा

ज्याअर्थी पॅकिंगसाठी पाने वापरतात त्याअर्थी ती मोठी अळूवड्यांची पाने असणार. त्यांची गणपाने भाजी केली. अळू मिळणे महत्त्वाचे. तेच इतके दिवस मिळत नव्हते ना त्याला!

हे अळू मिळालं म्हणजे तेही होत असेलच इथे. पण अजुन दिसलं नाही.
उम्मीद पें दुनिया टिकी है.

विटेकर's picture

27 Jan 2014 - 2:44 pm | विटेकर

गणपा शेठ .. चेपा , आमच्यावतीने पण !
...

रच्याकने , भाजीचा आळू आणि वडीचा आळू कसा ओळखतात?
खाजरा आळू नुसता पाहून ओळखता येतो का ?

वडीचं अळू जरा दाट हिरव्या रंगाचं असतं आणि पानाच्या खालच्या शीरा ही काळपट(डार्क) असतात तर भाजीचं अळू हे किंचीत पोपटी असतं.


हे वडीचं अळू


आणि हे भाजीचं
(दोन्ही चित्रं जालावरुन साभार.)

हेच म्हणणार होतो. फोटोतल्या अळवाची देठं साधारण हिरवी दिसली म्हणून याच्या वड्या होतील का अशी शंका आली होती.

पैसा's picture

27 Jan 2014 - 3:14 pm | पैसा

आता तू म्हटल्यावर मी फोटो नीट बारीक डोळे करून बघितला! =))

प्रभाकर पेठकर's picture

28 Jan 2014 - 1:48 am | प्रभाकर पेठकर

वडीच्या अळूचा आकार खालच्या बाजूस टोकदार असतो तर भाजीचा अळूची पाने साधारणपणे कमी टोकदार (गोलसर) असतात.

राही's picture

26 Jan 2014 - 2:49 pm | राही

एक वेगळ्या पद्धतीचे अळू. पद्धत सोपीही वाटली. फक्त ते 'बिरडं' सोलणं सोडून!
बाकी प्रेज़ेंटेशनबाबत क्या कहने! आणि ते सफाईदारपणे एकसारखे बारीक चिरलेले अळू आणि तसाच चिरलेला तो कांदा. वाह.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jan 2014 - 6:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

फक्त ते 'बिरडं' सोलणं सोडून! मागेही एकदा बिरडं सोलण्याबद्दल बर्‍याच कॉमेंट्स वाचल्या होत्या म्हणून माझे दोन शब्दः

१. वाल जेवण्यात वापरण्याच्या आधी तीन दिवस अगोदर पूर्ण बुडतील इतक्या पाण्यात एका पातेल्यात झाकून ठेवा.

२. पहिल्या २४ तासांनंतर दोनतीनदा पाण्याने नीट धुवून नंतर सर्व पाणी काढून टाका आणि एका फडक्यात बांधून टांगून ठेवा (किंवा त्याच पातेल्यात झाकून ठेवा)

३. पुढच्या ४८ तासांत दर ८ ते १२ तासांनी वाल बांधलेले फडके न सोडता तसेच पाण्यात पूर्ण बुडवून परत टांगून ठेवा (किंवा वाल पातेल्यात ठेवले असल्यास दोनदा पाण्याने धुवून पाणी पूर्ण निथळून परत झाकण ठेवा)

४. तीन दिवसांत वालांना १ ते ५ मीमी लांब मोड येतात (लेखातल्या पहिल्या चित्रात दिसतात तसे) आणि इतपत मोड आलेले वाल मोड न आलेल्या वालांपेक्षा जास्त चवदार लागतात. मोड अती मोठे झाल्यास वालांची चव कमी होते, तेव्हा ते टाळावे.

५. वालांची साले काढण्याआधी ते १०-१५ मिनीटे कोमट पाण्यात ठेवा. साली एकदम सहज निघून येतात. बोटांना अजिबात त्रास होत नाही.

इतर काही महत्वाचे:

अ. मोड येण्याचा काल हवामानवर अवलंबून असतो. उन्हाळ्यात कमी तर हिवाळ्यात जास्त वेळ लागतो.

आ. वरच्या १ ते ३ या पायर्‍यांत वाल भिजवायला साध्या ऐवजी कोमट पाणी वापरले तर मोड कमी वेळात येतात.

इतकं लिहून मी "बिरडं सोलणे" या विषयावरचे माझे दोन शब्द संपवतो :)

--- (बिरड्याच्या प्रेमात आकंठ बुडालेला) इए

गणपा's picture

26 Jan 2014 - 8:30 pm | गणपा

एक्का काका माझे टंकण्याचे श्रम वाचवल्या बद्दल धन्यवाद. :)

विजुभाऊ's picture

27 Jan 2014 - 12:41 am | विजुभाऊ

आमच्या कडे अळूची भाजी शेंगदाणे , डाळे घालून करतात.
पण ही भाजी देखील झक्कास. आता बघतो इथे जोहान्स्बर्गात अळू कुठे मिळतात ते.
आहाहा.....गणपा.............. अळूची भाजी कित्येक महिन्यात नाही खाल्लेली.

स्वप्नांची राणी's picture

29 Jan 2014 - 1:45 am | स्वप्नांची राणी

आईशपथ....किती विषयांमधे मास्टरी आहे हो तुमचि...? इस्पीकेक्कोछ्हिश्टं जगतं सर्वम असं वाटतय!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jan 2014 - 2:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

हायला ! हा साधा बेत? किती अत्याचार,सकाळी सकाळी, आँ ;) आळूचं फदफदं आणि वाल ! ए-१ !!

आळूचं फदफदं तसंच बिरड्या/चण्यांशिवाय पण थोडे शेंगदाणे पेरूनही मस्त लागतं.

दिपक.कुवेत's picture

26 Jan 2014 - 3:14 pm | दिपक.कुवेत

पण फदफद्यात "वाल" आणि "हरभरे" घातल्याने आख्खी भाजीच नविन वाटतेय. माझ्या अल्प माहितीप्रमाणे अळूच्या फदफद्यात उकडलेले शेंगदाणे छान लागतात्/घालतात आणि वर दिलेले मसाले घालुन (दालचीनी सोडुन) उकळवतात. पानं घ्यायच्या आधी हिंग-तुप-जिर्‍याची फोडणी देतात. वेल पण ह्या पद्धतीनेहि करुन चाखायला हरकत नाहि.

स्वाती दिनेश's picture

26 Jan 2014 - 3:15 pm | स्वाती दिनेश

अळू मिळालं तुला चक्क.. वा!
रेसिपी वेगळी दिसतेय,(आम्ही कांदा,दालचिनी,आलंलसूण घालत नाही..)
स्वाती

प्यारे१'s picture

26 Jan 2014 - 3:44 pm | प्यारे१

अरे मस्त च!
ताक घालतात ना?

(बाकी 'ही' पाककृती गणपाकडून??????? कोलेस्टेरॉल काय रे? ;) )

१. अळू बारीक चीरुन तो शेंगदाणे/हिरव्या मिरच्या घालुन उकडतात. मोहरी-हळदिची फोडणी करुन उकडलेला अळू घालतात. एक उकळि आली कि त्यात चवीप्रमाणे मीठ, चींचेचा कोळ आणि गुळ घालुन मग तुप-जिर्‍याची फोडणी देतात.
२. चींच/गुळ न घालता ताक घालुन मग तुप-जिर्‍याची फोडणी देउन करु शकतो.
३. अळूची देठं उकडुन हातानीच मॅश करुन घ्यायची. त्यात दहि/हिरवी मिरची चुरडुन घालायची. चवीप्रमाणे मीठ/साखर आणि दाण्याचं कुट घातलं तोंडिलावणं तैयार!......मला वाटतं त्यालाच अळुचं फदफद म्हणतात. वर आहे ती अळूची आमटि.

स्वाती दिनेश's picture

26 Jan 2014 - 6:29 pm | स्वाती दिनेश

अळूची देठी किवा नुसते देठी म्हणतात ३. नं वर जी कृती दिली आहेत त्याला..
स्वाती

भ ट क्या खे ड वा ला's picture

26 Jan 2014 - 9:15 pm | भ ट क्या खे ड वा ला

सहमत

तिखट मीठ ,चिंच गूळ , गोड मसाला,दाण्यांचे कूट अशी देठी हि करतात

दिपकराव जिथं मैला गणीक भाषा बदलते तिथे पाककृतींच्या चवीत/पदार्थांत थोडाफार फरक व्हायचाच. :)

असो आमटी म्हणा वा फदफदं ज्याला आवडेल ते नाव द्यावं.
आम्हाला आपला हाणण्याशी मतलब. काय म्हणता? :)

दिपक.कुवेत's picture

27 Jan 2014 - 12:39 pm | दिपक.कुवेत

माझंहि पान वाढा.......हा मी आलोच बघा!

,
चांगलेच झालेले दिसते आहे
योग्य पद्धत कळली त्या बद्दल धन्यवाद , या वरून गंमत आठवली विद्यार्थ्यांथिनिना ज्वालामुखी शिकवताना ज्या वेळेस शिलारस थंड होत असताना खदखदत असतो त्या वेळेस वाफ बाहेर पडते बबल्स राहून खडक तैयार होतो , त्यासाठी अळूच्या फदफदयाचे उदाहरण देते

आतिवास's picture

26 Jan 2014 - 4:17 pm | आतिवास

धन्यवाद.
मला करुन बघता येण्याजोगी पाककृती दिल्याबद्दल :-)

अमेय६३७७'s picture

26 Jan 2014 - 5:04 pm | अमेय६३७७

एक नाव सोडलं तर ही भाजी प्रचंड आवडती. शेंगदाणे आणि फणसाच्या आठळ्याही मस्त लागतात याच्यात.
तुमची रेसिपीही झकासच. फोटो, माडणी आवडली :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Jan 2014 - 6:06 pm | कैलासवासी सोन्याबापु

आळुचं फद्फदं म्हणुन पुणेरी खाणावळींत जी "स्वीटडीश" चारतात त्यापेक्षा तर सरस आहेस, बाकी जिधर बिरड्या उधर हम!!!! (बिरड्या त्याही सोललेल्या पाहुनच म्हतारी आठवली पगा आमची) :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Jan 2014 - 6:06 pm | कैलासवासी सोन्याबापु

आळुचं फद्फदं म्हणुन पुणेरी खाणावळींत जी "स्वीटडीश" चारतात त्यापेक्षा तर सरस आहेच, बाकी जिधर बिरड्या उधर हम!!!! (बिरड्या त्याही सोललेल्या पाहुनच म्हतारी आठवली पगा आमची) :)

सस्नेह's picture

26 Jan 2014 - 6:15 pm | सस्नेह

वाल घालून फतफते प्रथमच पहिले. मी खाल्ले आहे त्यात चणाडाळ, खोबर्‍याचे अन काजूचे काप अन गरम मसाला चिंच गूळ इ. होते. हेही आवडेल.

विनटूविन's picture

26 Jan 2014 - 7:17 pm | विनटूविन

हो कांदा, वाल सर्वच नवीन आहे यात...
आम्ही मुळा, आंबट चुका, गूळ चणाडाळ, खोबरे, काजू, बेसन पीठ घोटताना लावायला, व खमंग कांदालसूणाशिवायची फोडणी करतो

आयुर्हित's picture

26 Jan 2014 - 6:26 pm | आयुर्हित

झकास बेत आहे राव तुमचा.
उत्तम पाकृ. उत्तम फोटो व लेख.
धन्यवाद.

सुहास झेले's picture

26 Jan 2014 - 6:43 pm | सुहास झेले

ज ह ब ह री _/|\_

बाकी काही शब्दच नाहीत....... !!!

प्रभाकर पेठकर's picture

26 Jan 2014 - 7:09 pm | प्रभाकर पेठकर

गणपा भाऊ,

ही पद्धत वेगळी आहे त्यामुळे नक्की करून पाहिनच.

आमच्या पद्धतीत स्नेहांकिताने म्हंटल्या प्रमाणे चणाडाळ, खोबर्‍याचे काप, शेंगदाणे किंवा काजू (किंवा दोन्ही) घालून चिंच गुळ घालून मस्त आंबट गोड भाजी केली जाते. तसेच चार जुड्या अळूची पाने असतील तर एक जुडी अंबाडीची पाने घालून, वाफवून नंतर घोटून डाळी, शेंगदाणे, काजू, गोडा मसाला घालून त्यावर जास्त हिंगाची फोडणी करून फदफदे केले जाते. (मिळून येण्यासाठी थोडे चण्याचे पीठ पाण्यात कालवून लावायचे).

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jan 2014 - 7:34 pm | अत्रुप्त आत्मा

नविन श्टाइल नवा फ्लेवर
बल्लवाचार्य गंपा... फॉर एव्हर... &&& एव्हर! :)

आह्हाहा! किती दिवसांनी आवडती भाजी दिसली. आमच्याइथे अळू बरेचदा मिळतात पण त्याबरोबर घालायला आंबटचुका मिळत नाही. आंबटचुक्याने भाजी मिळून येते व खाजरेपणा जाण्यास मदत होते. चिंच कोळही घालायचाच! खोबर्‍याचे काप, भिजवलेले शेंगदाणे, काजू, खवलेलं ओलं खोबरं, गोडा मसाला, गूळ, डाळीचं पीठ असं घालतात. सोललेल्या देठांसकट भाजी चिरून उकडून घोटून वगैरे........जाऊ दे!
आज तू या भाजीची आठवण करून दिलीस, बघते आता मिळतीये का! मला वाटते चुका मिळत नाही तर पालकाची थोडी पाने घालते. फोटू तर एकदम फर्मास आलेत. सगळे मसाले प्लेटमध्ये व्यवस्थित ठेवलेला फोटू आवडला.

ऐग्गग्ग्गं! मुळ्याचे काप घालायचे कशी विसरले मी! ते तर हवेतच! उद्या नेमके ते दुकान बंद, आता परवा जाते.

रेवतीताई,
मुळ्या बरोबर भाजी शिजवताना थोड्या तांदळाच्या कण्या किंवा शिजल्यावर थोडासा तयार भात घालावा.
चव अजुन व्दिगुणित होते.तसेच मुळ्याचा पालाही या भाजीत घालतात.
पैजारबुवा,

सानिकास्वप्निल's picture

26 Jan 2014 - 8:54 pm | सानिकास्वप्निल

नवीन प्रकारचे फतफते / फदफदे खूप आवडले :)
आम्ही पण ह्यात आबंट्चुका, भिजवलेले हरभरे, भिजवलेले शेंगदाणे, चिंच-गुळ घालून बनवतो.
तुम्ही दिलेल्या पद्धतीने बनवून बघेन पण अळूची पाने कुठून आणू आता?

पाकृ, फोटो सगळेच बेस्ट :)
आवडेश

प्रचेतस's picture

26 Jan 2014 - 8:54 pm | प्रचेतस

खल्ल्लास पाकृ झालीय.
मझा आगया.

भ ट क्या खे ड वा ला's picture

26 Jan 2014 - 9:26 pm | भ ट क्या खे ड वा ला

दालचिनी टाकून पाहिली पाहिजे.
रेसिपी ,फोटो सगळच झकास.
शेंग दाणे ,अठीला या ऐवजी बिरड्या हि आयडिया मस्तच

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2014 - 9:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रेझेंटेशन, मांडणी, फोटो, कारागिरी, पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत. :)

बंगला नको, महागड्या गाड्या नको, खूप श्रीमंतीही नको, फक्त माझ्या डोळ्यादेखत या दोन पाच मिपाकरांची सुंदर सुंदर पाककृतींची पुस्तकं बाजारात यावी, एवढंच सालं त्या देवाकडे आपलं कायम मागणं आहे. :)

-दिलीप बिरुटे

सुधीर's picture

26 Jan 2014 - 10:46 pm | सुधीर

इतकी वर्ष नावं ऐकत होतं. आज पाहिलं. कधीतरी चाखून पाहीन. :)

शिद's picture

26 Jan 2014 - 11:39 pm | शिद

बाकी पाक्रु लाजवाब.

कवितानागेश's picture

26 Jan 2014 - 11:42 pm | कवितानागेश

कधी काम्दा आलं लसूण घालून केले नाही.
एकदा करुन पहायला हवं.
आमच्याकडे (म्हन्जे माझ्या आईच्या पद्धतीनी ;) ) अश्या फदफद्यात शेंगदाणे, चणाडाळ,खोबर्‍याचे काप, गूळ, चिंच, काळा मसाला असं घालतात.
ताकातल्या भाजीत थोडे बेसन, कधीतरी कांदा आणि लसणाची फोडणी घालतात.
आणि देठी वेगळी करतात. त्यातही शेंगदाणे असतात. साधी फोडणी असते. आणि वरुन दही घालतात.

इरसाल's picture

28 Jan 2014 - 9:28 am | इरसाल

माउ आणी विजुभौ एक्मेकांचे डुआयडी वाटतात. (जरी दोघांचे फोटो पाहिले असले आणी यापैकी एकाला प्रत्यक्ष भेटलोय तरीही)

खेडूत's picture

27 Jan 2014 - 12:32 am | खेडूत

अति सुंदर!
पाहूनच कळतंय काय झालं असेल!

प्राचीन काळी लग्नकार्यात पण हे असे. मात्र इतके साग्रसंगीत नक्कीच नाही!
(इ ए काकाना पण धन्यवाद मोड आणण्याच्या प्रक्रिये बद्दल.)

गणपा ,सादरीकरण फारच आवडले .

१)ज्याअर्थी पाने पैकिंग म्हणून
आली त्याअर्थी ती कधीच खाजरी नसणार .त्यांचे अळू शेतातले खास लागवडीचे असते .लोकांच्या घरामागचे (परसदारी !) बरेच वेळा खाजरे असते आणि तिकडे न्हाणीचे पाणी सोडतात त्यामुळे खायची इच्छा होत नाही .

२.भाजीवाल्यास त्याचे गड्डे (अळकुड्या) मागवायला सांगा .पहिल्या बैचची पाकृ न करता तीन तीन पेरा .
अळुवडीला तीन पाने लागतात .एकाचवेळी तीन पाने हवीत ."भाजीच्या अळूच्या" पानांची एकवेळ अळुवडी जमते पण अळुवडीच्यासाठी असलेल्या पानांची भाजी चोथट होते .

३.एका जुन्या मराठी सिनेमाने 'अळूची चिट्टी' (ही भाजी) अजरामर केली .इ चाएक्का त्याचे नाव आणि श्टोरी खुलवून सांगतील .

४पाकृ सादरीकरणात आणि चुरचुरीत लिहिण्यात पुरुष आइडी नंबर वन आहेत याची नोंद घेण्यात यावी .सुरुवात करण्यापासून सजवेपर्यंत ते चवीत आकंठ डुंबलेले असतात .

५.काहीवेळा भाजीपेक्षा देठी भाव खाऊन जाते .

६. "ट्रफल" नावाच्या सर्वात महागड्या (१५०० युअरो प्रतिकिलो ?) भाजी(कंद ?)बद्दल कोणी प्रकाश टाकेल काय ?

प्रभाकर पेठकर's picture

29 Jan 2014 - 1:34 am | प्रभाकर पेठकर

त्यांचे अळू शेतातले खास लागवडीचे असते .लोकांच्या घरामागचे (परसदारी !) बरेच वेळा खाजरे असते आणि तिकडे न्हाणीचे पाणी सोडतात त्यामुळे खायची इच्छा होत नाही

शेतात वापरण्यात येणार्‍या 'सोनखत' आणि 'शेणखता'चं नांव कानावरून गेलं असेलच.

अर्धवटराव's picture

27 Jan 2014 - 9:14 am | अर्धवटराव

किती निगुतीने केलेला स्वादिष्ट बेत. नॉस्टेल्जीआ वाढलाय ताटात.

प्रमोद देर्देकर's picture

27 Jan 2014 - 9:28 am | प्रमोद देर्देकर

आमाचे मामा यात उकडलेला मका घालायचे त्यानेही खुप छान चव येते.

सुधीर's picture

27 Jan 2014 - 7:48 pm | सुधीर

ऋषीपंचमीच्या दिवशी (गणेश चतुर्थी नंतरचा दुसरा दिवस) "ऋषीचं अळू" नावाची पारंपारीक भाजी दरवर्षी खातो. त्यात अळूबरोबर बर्‍याच पालेभाज्या, आणि तुम्ही म्हणताय तसं मक्याच्या कणसाचे तुकडे व ओले उकडलेले शेंगदाणे असतात. त्या भाजीची चव अप्रतिम असते, पण त्याची नेमकी चव अळूमुळे असते की इतर भाज्यांमुळे ते माहीत नाही.

राही's picture

28 Jan 2014 - 9:05 am | राही

ह्या भाजीला बर्‍याच ठिकाणी कंदमूळ म्हटले जाते. जो भाजीपाला आणि मुळे खाऊन अरण्यातले ऋषि आपली गुजराण करीत, ती भाजी म्हणजे ऋषीची भाजी. यात अळू असते पण इतर कंदमुळे आणि माठ वगैरे पालेभाज्याही असतात. शिवाय या भाजीत आणि या दिवशीही बैलाच्या श्रमातून निर्माण झालेले अन्न खायचे नसे. त्यामुळे नांगरणी वगैरे कुठल्याही मशागतीविना उगवलेले वरईसारखे धान्य, रानात आपोआप रुजलेल्या भाज्या, शेवगा वगैरे भाज्या, अळू, अळवाचे, सुरणाचे कंद, अंबाडे,(आंब्याचा एक प्रिमिटिव प्रकार, आंबा नव्हे.) असे सर्व घालून ही भाजी बनवीत. 'कल्टिवेटेड' असे काहीही या दिवशी खायचे नसे. अलीकडे चवीसाठी मक्याची कणसे घालतात, पण पूर्वी ती वर्ज्य होती. (शेतातून आणलेली असतील तर.)

सुधीर's picture

28 Jan 2014 - 6:52 pm | सुधीर

माहिती आवडली. पाकृही येउद्या. :)

जेपी's picture

27 Jan 2014 - 10:13 am | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

सूड's picture

27 Jan 2014 - 10:56 am | सूड

मस्तच !!

मदनबाण's picture

27 Jan 2014 - 11:57 am | मदनबाण

मस्त ! :)
बाकी फदफदं हे नाव ऐकल की मला लयं हसु येत बघा. ;)

रमेश आठवले's picture

27 Jan 2014 - 12:02 pm | रमेश आठवले

लिहायला किंवा ऐकायला विचित्र वाटणारे "फदफदे" हे नाव या अळूच्या रुचकर पदार्थाला कसे पडले असावे हे कोणी सांगू शकेल का ? म्हणजे या शब्दाच्या व्युत्पत्ति बद्दल कोणाला काही माहिती आहे का ?

मायबाप वाचक आणि प्रतिसादकर्ते सर्वांचे आभार.
@ रमेश आठवले, पेठकर काका कदाचीत यावर प्रकश टाकू शकतील असं वाटतं.
@ कंजूस, परवाच ट्रफल बद्दल एक माहितीपट बघण्यात आला. सापडला की लिंक व्यनी करतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Jan 2014 - 2:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

ह्याचं स्लरी टाईप टेक्स्चर अन शिजवताना येणारा "रटरट" चा आवाज प्रथम बल्लवाने "फद्फद" असा ऐकला असावा!!! म्हणुन फदफदे!!!! *lol*

वेल्लाभट's picture

27 Jan 2014 - 3:12 pm | वेल्लाभट

काही बाकीच नाही ठेवलंत हो तुम्ही ! जबराट ... वर्णन, फोटो, सगळंच.
हे अनेकदा खातो, आणि जाम आवडतं.

अवांतार माहिती: माधुरी दिक्षित ची आवडती डिश आहे ही.

सुहास..'s picture

27 Jan 2014 - 3:16 pm | सुहास..

जा ! माझ सगळं लिखाण तुझ्या नावावर केलं !!

इरसाल's picture

27 Jan 2014 - 5:01 pm | इरसाल

अमारे इदर गुळ डाले बगेर बनाते इस्कु.

फदफदे/फतफते किंवा खदखदे/खतखते ही म्हणतात याला.

पैसा's picture

28 Jan 2014 - 11:37 pm | पैसा

तां वायलां! खतखतें म्हणजे बर्‍याच भाज्या असतात त्यात. फतफते फक्त अळूचं.

प्रभाकर पेठकर's picture

29 Jan 2014 - 1:27 am | प्रभाकर पेठकर

खतखत्याची पाकृ इथे पाहा.

फदफदे फक्त अळूचेच.

दिव्यश्री's picture

27 Jan 2014 - 5:18 pm | दिव्यश्री

प्रेक्षणीय ,सात्विक आणि देखणे फोटो...भाज्यांची चिराचीर हि किती सुरेख केली आहे

हेवा वाटतो तुमच्या सौं.चा. नशीबवान आहेत त्या. :)

अनन्न्या's picture

27 Jan 2014 - 7:17 pm | अनन्न्या

रत्नागिरीला २६ जानेवारीला जिलबी, बटाटेवड्यांबरोबर अळवाचे फतफतेही विकत मिळते. त्यामुळे तुमची रेसीपी त्याच दिवशी आलीय!

यशोधरा's picture

27 Jan 2014 - 7:54 pm | यशोधरा

भा हा री ही!

मुक्त विहारि's picture

27 Jan 2014 - 8:07 pm | मुक्त विहारि

झक्कास....

इतके लिह्हुन मी माझे दोन शब्द संपवतो...

घरीच लावलेला अळू चांगलाच पोसल गेला आहे. तेव्हा येत्या विकांती फदफदं नक्कीच..