कान्हा नॅशनल पार्क - कसे जावे (भाग १)

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in भटकंती
16 Jan 2014 - 3:44 pm

यंदा दिवाळीमध्ये शनिवार-रविवार जोडुन चक्क ९ दिवस सुट्टी मिळाली होती. अर्थातच ती घरात बसुन घालवण्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळे दिवाळीचा एक महिना आधी फराळापेक्षा ट्रिप प्लान करण्यातच जास्त वेळ गेला. अबीरला घेऊन पहिल्यांदाच जात असल्याने फार लांब जायचे नव्हते. शिवाय दिवाळीची बेसुमार गर्दी टाळायची होती. ह्या सगळ्या खेरीज एक छोटासा प्रॉब्लेम म्हणजे ४ सळसळणार्‍या रक्ताचे तरूण "कुठे जायचं" हे ठरवायला बसलेले असल्याने "एकमत" नावाचा इल्लुसा गड सर करायचा होता. ८-१५ दिवस रोज एक ह्या न्यायाने भारतभर फिरवुन झाल्यावर, जेव्हा बुकिंग करावेच लागतील अशी परिस्थिती आली तेव्हा "मध्यप्रदेश - कान्हा जंगल" हे फायनल झाले. मला वाटलं झालं..शंप..पण नाही.. ट्रिप प्लानिंग हे दिव्य अजुन व्हायचे होते. बाकी सगळे गडी फार कामाचे असल्याने गायब झाले आणि मीच काय ती रिकामी असल्याने प्लानिंग माझ्याकडे आले. कान्हा नक्की कुठाय हे शोधण्यापासुन सुरवात झाली. एक चक्कर मध्यप्रदेश टुरीझम मध्ये पण मारुन आले. तिथले भयंकर रेट्स ऐकुन हैराण झाल्यावर, आता आलोच आहोत तर रिकाम्या हातानी जायचं नाही म्हणुन मध्यप्रदेशचा मोठा नकाशा आणि एम्.पी टुरिझम च्या सगळ्या जागांची पत्रकं घेउनच आले. डेस्क वरच्या डायर्‍या, पर्स आणि कंप्युटर ह्यांना तुच्छपणे मागे सारुन मस्त पैकी नकाशा पसरला आणि नक्की ह्या एम्.पी मध्ये आहे तरी काय काय हे बघायला सुरवात केली. जस जशी ठिकाणं सापडत गेली तस तसे मी "अबीर-गर्दी-जवळची ठिकाणं" वगैरे विसरुन आणि ऑफिसचा बेसुमार वेळ ह्या कामामध्ये घालवुन, ८ दिवसांची "नागपुर्-जबलपुर्-कान्हा-झाशी-खजुराहो-नागपुर" अशी भरगच्च ट्रिप तयार केली!!!
लग्गेच मस्त एक्सेल बनवुन बाबांना पाठवली आणि बाबांनी लगेच कॉल करुन "मी अबीर आणि बाकी ७-८ जणांचं लटांबर घेउन रेल्वे स्टेशनवर येणार नाही" ह्या कारणाखाली "नागपुर-कान्हा-नागपुर" अशी ती कटशॉर्ट पण केली..
बाबांचा एकंदरीत सुर पाहता जास्त आग्रह केला तर बाबा "हॉल्-बेडरुम्-किचन-हॉल" अशी ट्रिप दिवाळीभर करवतील ह्याची मला (अनुभवातुन आलेली) खात्री होती. मी मुकाटपणे एक्सेल एडिट केली आणि जड अंतकरणानी "खजुराहो" डिलीट केलं..

पुढच्या एक महिन्यात मी "ट्रिप प्लानिंग" च्या नावाखाली वेठबिगारा सारखी राबले.. काही दिवसांनी मी आहे ती नोकरी सोडुन मध्यप्रदेश टुरीझमच्या ऑफिसमध्ये जाऊन बसले असते तरी चाललं असतं एवढी माहिती मी गोळा केली. पण जनहितार्थ त्यातली मुद्द्याची तेवढी इथे देते आणि ती गोळा करताना आलेले रोमहर्षक अनुभव सांगायचे टाळते...( कोण म्हणालं हुश्श्श्??? )

कान्हा नॅशनल पार्क , मध्यप्रदेश
ह्याच्याशी संबंधित माहिती तुम्ही गुगलुन काढालच त्यामुळे ती देत बसत नाही. कान्हाला जाताना जी माहिती हवीच तेवढी देते.
कान्हा हे जबलपुर जवळ असणारे (१७० किमी) मध्यप्रदेश मधील, वाघांसाठी प्रसिद्ध अभयारण्य आहे. हे अभयारण्य फक्त १६/१८ ऑक्टोबर - ३० जुन पर्यंत पर्यटकांसाठी चालु असते. इथे जाण्यासाठी ३ गेट्स आहेत :- १. मुक्की २. किसली ३. कान्हा . ह्यात कान्हा, मुक्की, किसली आणि सारही हे ४ झोन आहेत जिथे तुम्ही जाउ शकता. दर बुधवारी दुपारी जंगल बंद असते. जंगलात जाण्यासाठी "सफारी" बुक करावी लागते. ही सफारी हॉटेल बुक करुन देतात किंवा आपण ऑनलाईन करु शकतो.

ऑनलाईन सफारी बुकिंगः-
१. ही साईट वापरुन तुम्ही ऑनलाईन बुकींग करु शकता
२. कान्हा व्यतिरिक्त मध्यप्रदेश मध्ये पन्ना, पेंच आणि बांधवगढ हेही नॅशनल पार्क आहेत. त्याचेही बुकिंग इथेच होते.
३. सफारी म्हणजे मोठ्या उघड्या जीप मधुन तुम्हाला जंगलात फिरवतात. ह्यात घाबरायचे काही कारण नसते. जनावरे हल्ला करत नाहीत.
४. एका सफारीमध्ये तुम्ही ६ जण जाऊ शकता. दिड वर्षापेक्षा लहान बाळांना नेता येत नाही, नेऊही नये.
५. सफारी २ वेळेत होते:- सकाळी - ६-१२ आणि दुपारी ३-६.
६. एकदा का जीप मध्ये बसलं की खाली उतरता येत नाही. सकाळच्या सफारीमध्ये एक ब्रेक घेतात. जंगलात एक कँटिन आहे तिथे थांबवतात. इथे चहा व नाश्ता मिळतो.
७. जंगलात जातानाचे काही नियम आहेत (जसे की भडक रंगाचे कपडे घालु नयेत) ते वाचुनच जावे.
८. सफारीच्या तिकिटामध्ये फक्त प्रवेश मिळतो. जीप तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन बुक करावी लागते. हॉटेल मधुन हे बुकिंग होते. १ किमी ला १०० रु घेउन जीप हॉटेलच्या दाराशी येते. (जसे की आमचे हॉटेल मुक्की गेट पासुन ५ किमी वर होते. ५००/- जास्त घेऊन सकाळी ५.३०-६ ला जीप दारात येई. अर्थात आमच्याकडे स्वतःची गाडी होती. त्यामुळे हा खर्च वाचु शकला असता.) ह्या गाडी सोबत एक गाईडही असतो. (ह्या बद्दल एकंदरीत सिस्टीम चांगली केली आहे). हा तुम्ही निवडु शकत नाही. सगळे काही वनखात्याच्या अखत्यारित आहे.
९. ह्या सफारीचा खर्च तुम्ही कोणत्या झोन मध्ये जात आहात, कधी जात आहात आणि गाडी कुठुन घेत आहात (गेट की हॉटेल) ह्यावर अवलंबुन आहे. आम्ही कान्हा झोनची सफारी ४३०० मध्ये केली आणि मुक्की झोनची ४०००. (प्रवेश फी + गाडी (ह्यात ड्रायव्हर+गाईड येतातच) ) रेट्स बदलत असतात. [वनखात्याचे नियम एकंदरीत सतत बदलत असतात]
१०. जाताना सोबत प्रत्येकाचे आयडि प्रुफ सोबत ठेवा. (प्रत्येकाची जन्म तारीख आणि कोणते आयडी प्रुफ सोबत ठेवणार आहात, त्याचे नंबर इ. माहिती बुकिंग करताना लागते. मी फक्त टिम लीड म्हनुन एकाचीच ही सगळी माहिती भरली. बाकीच्यांची फक्त नावं लिहीली. त्यामुळे आम्हाला गेटवर अडवले. पण मग सगळ्यांकडे प्रुफ आहेत हे पाहुन, अर्ज लिहुन द्यायच्या बोलीवर सोडले. अर्ज काही लिहुन घेतला नाही. पण एकंदरित ही माहिती फॉर्मवर भरुन ठेवलेली चांगली).
११. सफारी बुक करतानाच सगळे डिटेल्स तयार हवेत :- किती आणि कोण कोण, कधी जाणार. जे ६ जण एकत्र जाणार त्यांची नावे व इतर माहिती जवळ हवी. हा फॉर्म असा दिसतो.

Online Booking Form

नंतर लोक कमी-जास्त करता येतात, पण ते खर्चिक काम आहे.

आम्ही नागपुरला जाऊन, तिथुन गाडी करुन जायचा प्लान केला. गाडी नेउन परत पाठवण्यापेक्षा ती ४ दिवस सोबत ठेवणे परवडते. विमानतळावरच ज्याच्याशी १ महिना फोनवर बोलुन गाडी ठरवली होती त्या माणसाने (त्याला आपण गटणे म्हणुया) ड्रायव्हरचा नंबर दिला. ड्रायव्हरने पर डे १०००/- जास्त मागितले. आम्ही परत गटणेला फोन केला. ही बातमी ऐकुन सशाच्या काळजाच्या गटणेने फोनच बंद करुन ठेवला. इकडे परत डायवरला फोन केला तर त्याने "मी दुसरे गिर्‍हाइक घेतले आहे" हे शुभ वर्तमान दिले. ८ जण, २ चिल्ल्या पिल्ल्यांसह आणि अगणित बॅगांसह विमानात चढत होते. पण नागपुरला पोहचुन ऐन दिवाळीत आपण कान्हाला कसे जाणार हा प्रश्न थोबाडावर होताच. मग सगळ्यांनी आहे नाही ती पुण्याई कामाला लावुन नागपुरमध्ये असणार्‍या प्रत्येक परिचिताला फोन लावायला सुरवात केली. खुप फोनाफोनी नंतर विमानात बसल्यावर "गाडी मिळाली.. कॅरिअर सकट" असा कॉल आला.. आणि आता लोक्स मला मारणार नाहीत म्हणुन मी सुटकेचा निश्वास सोडला...

नागपुर-कान्हा प्रवास (~३०० किमी) हा एक संपुर्ण वेगळा विषय आहे, त्यावर एक लेख होईल. (ज्यात ९०% शिव्या असतील..) काय घोडं मारलय आपण सरकारचं की असले रस्ते करुन ठेवलेत देव जाणे.. तरी महाराष्ट्रातले रस्ते उत्तम म्हणावे असे मध्यप्रदेश मधले रस्ते. मध्येप्रदेश बॉर्डर क्रॉस केली की डांबरी मोठे रस्ते संपुन अचानक लहान मातीचे कच्चे रस्ते सुरु. long story short.. ४ वाजता नागपुर सोडलं आणि उजाड, वैराण , अंधार्‍या रस्त्यांवरुन आम्ही रात्री २ ला कान्हाला पोहोचलो.. आता बोला..

त्यात थोडीशी गंमत अशी झाली की ज्या हॉटेल मध्ये आम्ही राहाणार होतो, तिथल्या लोकांनी १००० वेळा सांगुनही आम्ही "परसवाडा" वरुन आलो नाही.. कारण अर्थातच रात्रिची वेळ, सोबत बायका पोरं आणि नक्षलवाद्यांची भिती. त्यमुळे दुसरा रस्ता ज्याने आम्ही आलो तो नेमका भयंकर वाईट (आणि नक्षलावाद्यांवला मक्खन...!) इतका वेळ गाडीत बसलो होतो की अजुन थोडी गाडी पुढे नेली तर हिमालयात पोहचु असं वाटायला लागलं..
आम्ही गेलो तो रुट :- नागपुर - भंडारा - तुमसर - गोंदिया - बालाघाट - बैहर - मुक्की गेट (कान्हा)
असं जायला हवं होतं :- नागपुर - भंडारा - तुमसर - गोंदिया - बालाघाट - परसवाडा - बैहर - मुक्की गेट (कान्हा)

Route

ह्या तापात दोन गोष्टी चांगल्या होत्या. १. आमचा ड्रायव्हर २. आमचं हॉटेल.
आमच्या देवमाणुस "दिलीपभाऊंनी" एकदाही कटकट न करता आणि छताला न टेकवता आम्हाला सुखरुप आमच्या हॉटेलमध्ये पोहोचवले. आमचे हॉटेल - मुबा अ‍ॅट मुक्की...

ह्या हॉटेल बद्दल अत्यंत चवीचवीनी आणि निवांत बोलायला पाहीजे.. इतक्या सुंदर अनुभवाचा इतका मान राखलाच पाहिजे.. त्यामुळे ते पुढच्या भागात.. तोवर तुम्ही वाचा ह्या हॉटेल बद्दलचे ट्रिप अ‍ॅडव्हायझर वरचे रिव्ह्युज

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

16 Jan 2014 - 4:18 pm | मुक्त विहारि

वाचत आहे...

नाखु's picture

16 Jan 2014 - 4:20 pm | नाखु

धन्यवाद आपण स्वतंत्र (रेडीमेड पॅकेच्या टेकू शिवाय ) जंगल सफारी सहल करू शकतो असा थोडा थोडा विश्वास वाटतोय. *i-m_so_happy* *HAPPY*

पिलीयन रायडर's picture

16 Jan 2014 - 4:28 pm | पिलीयन रायडर

पॅकजनी जाउच नये उलट. स्वतंत्र जाणं फार सोप्पय.. किमान मध्येप्रदेश मधील तरी नॅशनल पर्कची सिस्टीम फार उत्तम आहे. सर्व काही ऑनलाईन बुक होते. काही प्रॉब्लेम झाला तर कॉल सेंटर आहे. सर्व काही नियमाने होते. वनखात्याचे नियम फार फार कडक आहेत त्यामुळे उलट सोप्प आहे. मनस्ताप होत नाही. ठरल्या बरहुकुम सर्व होते.
अर्थात जाण्या आधी, जाऊन आलेल्या व्यक्तिला विचारणे नेहमीच सोयीचे जाते. किंवा ट्रिप अ‍ॅडव्हायझरवर माहिती मिळतेच.

एक मोठा नकाशा + इंटरनेट + फोन आणि बराचसा वेळ हाताशी असेल स्वतः ट्रिप प्लान करण्या एवढी मस्त गोष्ट कोणतीही नाही!

बॅटमॅन's picture

16 Jan 2014 - 4:45 pm | बॅटमॅन

अति उत्तम. नेमके डीटेल्स दिल्याने मज्जा आली. पुढील भागांच्या प्रतीक्षेत, आणि शेवटी

एक मोठा नकाशा + इंटरनेट + फोन आणि बराचसा वेळ हाताशी असेल स्वतः ट्रिप प्लान करण्या एवढी मस्त गोष्ट कोणतीही नाही!

याच्याशी हजारवेळा/खच्चून/कचकून/तहे दिलसे वैग्रे वैग्रे सहमत आहे.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत .

प्यारे१'s picture

16 Jan 2014 - 5:28 pm | प्यारे१

मत्त मत्त!
फुले???? ;)

अरे वा.. वाचते आहे. पुढचा भाग लवकर येउद्या.

कपिलमुनी's picture

16 Jan 2014 - 5:49 pm | कपिलमुनी

बरे वाइट सर्व अनुभव लिहा ..
कही मागे ठेउ नका !!
पुभाप्र !

अनिरुद्ध प's picture

16 Jan 2014 - 6:27 pm | अनिरुद्ध प

पु भा प्र

रेवती's picture

16 Jan 2014 - 6:37 pm | रेवती

वाचतिये. माहिती आवडली.

यसवायजी's picture

16 Jan 2014 - 7:23 pm | यसवायजी

वाचतोय. पु.भा.लवकर टाका.

स्वप्नांची राणी's picture

16 Jan 2014 - 8:01 pm | स्वप्नांची राणी

मस्त कान्हा आणि त्याच मस्त वर्णन!! आम्ही खाटिया गाव, किस्ली ईथे मोगली रिसॉर्ट मधे राहीलो होतो. ट्रीप खरच खूप मस्त झाली होती.

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Jan 2014 - 8:07 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्तच... मे महीन्यात ही ट्रिप करावी का? म्हणजे उन्हाळा वगैरे? आणि तुम्ही राहीलेल्या (किवा एकुणातच ) तिकडच्या हॉटेलचे रेट/व्यवस्था कसे आहेत?हॉटेल कुठल्या बाजुला निवडावे वगैरे काही टिप्स?

पु.भा.प्र.

पिलीयन रायडर's picture

18 Jan 2014 - 4:00 pm | पिलीयन रायडर

मे महिन्यात एकंदरीत गरमी असेल बरीच पण बहुदा फार त्रास नाही होणार. (ताडोबाला सहन होत नाही उन्हाळा). कान्हा मध्ये झाडी आणि पाणी बरेच असल्याने वातावरण फारसे गरम होत नसावे. निश्चित माहिती नाही. उलट उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी प्राणी बाहेर पडत असल्याने वाघ जास्त दिसतात म्हणे.

मी राहिलेल्या हॉटेल बद्दल भाग २ मध्ये लिहीले आहेच. रेट्स साधारण ३-४ हजार एका रुमला एका रात्री साठी प्रति २ माणशी असे आहेत. पण मी राहीले होते ते मडहाऊस ४४००/- प्रति ४ माणशी एका दिवसा साठी असे होते. त्यामुळे बर्‍यापैकी परवडले. व्यवस्था उत्तम होती.

मुबाचे रेट्स (सगळीकडे साधारण हेच रेट्स आहेत..)
Option 1: Deluxe room @ 3500/- per night double occupancy, extra person 1100/-
Option 2: Cottages @ 4200/- per night double occupancy, extra person 1200/-
Option 3: Mudhouse @ 4400/- per night,four sharing, extra person 1100/-
( includes all meals - lunch, dinner and breakfast with evening and morning tea)

कान्हा मध्ये बहुतेक सगळ्या हॉटेलमध्ये ए.पी (अमेरिकन प्लान) आहे त्यामुळे रुमच्या रेट मध्ये रुम्+नाश्ता+लंच+डिनर धरलेले असते.

यावर्षी सफारी [प्रवेश + गाडी (हॉटेलच्या दारापासुन) + गाईड ] रेट्स (हॉटेल तर्फे) असे आहेत:-
Mukki zone – Morning safari : 4200/- ( Rs. 1300 extra for foreigners)
Mukki zone – Evening safari : 4000/- ( Rs. 1300 extra for foreigners)
Kisli zone – Morning safari : 4400/- ( Rs. 1300 extra for foreigners)
Kanha zone – Morning safari : 4700/- ( Rs. 1850 extra for foreigners)

कोणता झोन निवडावा हे मोठे कोडेच आहे, आम्ही राहिलो मुक्की गेट जवळ आणि किसली व कान्हाची सफरी केली. आमच्या गाईडच्या मते मुक्की झोन उत्तम कारण ह्यात कुरणे आहे, दाट जंगल आहे, तळी आहेत. त्यामुळे खुप काही बघायला वाव आहे. कान्हा झोनला प्रिमियम झोन मानतात. हे दोन झोन जास्त प्रसिद्ध आहेत असं मला वाटलं.

पण एकंदरीतच २-३ सफारी (त्याही सकाळ आणि दुपारच्या दोन्ही..) कराव्यात. ह्यात तुम्ही ३ ही झोन बघु शकता. ज्या गेट जवळ हॉटेल असेल त्या गेट मधुन प्रवेश करायची मुभा असल्यामुळे कोणत्याही झोनला राहिले तरी फरक पडत नाही.

वेल्लाभट's picture

16 Jan 2014 - 8:16 pm | वेल्लाभट

जबरी.... पुढचे बाग येऊद्यात.....

मधुरा देशपांडे's picture

16 Jan 2014 - 8:29 pm | मधुरा देशपांडे

सविस्तर माहिती आणि वर्णन आवडले.
पुभाप्र.

पु.भा.प्र.

त्रिवेणी's picture

16 Jan 2014 - 8:51 pm | त्रिवेणी

खुप छान लिहिलं आहेस गं.
आता पुढचा भाग लवकर येवु दे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jan 2014 - 9:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

खूपच माहितिपूर्ण आणि खुसखुशीत शैलितला लेख. वाचनखूण साठवली आहे.

पुढचे भाग सविस्तर (जरा जास्त लिहिले तर कायपण बिघडत नाय. लिवा तुमी बिनधास्त. मिपा आहे घरचं... ;) ) आणि शिवाय फोटोंसह टाका, लवकर लवकर. पुभाप्र.

योग्य आणि महत्वाची माहिती दिल्यामुळे नंतर जाणाऱ्यांसाठी खूप मदत होणार आहे .अशा ठिकाणांसाठी हेच अपेक्षित आहे .
(बाकी आम्हाला शेवटी एकदा वाघ कसा दिसला किंवा वाघ न पाहाता एक सुस्त अस्वल आणि चार रागीट रानडुकरे पंचवीस हजारात पाहिली छाप वर्णन वाचून कंटाळा आलाय)

लै वेळा धन्यवाद गं पिरा! वाचनखूण साठवते आहे.

किसन शिंदे's picture

17 Jan 2014 - 8:41 am | किसन शिंदे

डिटेल्ड लिहीलंय.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Jan 2014 - 8:53 am | कैलासवासी सोन्याबापु

उत्तम!!! आवडले!!! फक्त ते "ठुमसर" नाही हो "तुमसर" आहे ! :)

आतिवास's picture

17 Jan 2014 - 9:04 am | आतिवास

वर्णन आवडलं, वाचतेय.

प्रचेतस's picture

17 Jan 2014 - 9:12 am | प्रचेतस

उत्तम सुरुवात.
डिट्टेलवार माहितीबद्दल धन्स.

सुकामेवा's picture

17 Jan 2014 - 9:24 am | सुकामेवा

बघुया कधि जमतय ते

सुज्ञ माणुस's picture

17 Jan 2014 - 9:39 am | सुज्ञ माणुस

मस्त ! माहितीपूर्ण.
आता खरच जावेसे वाटतेय. :)
एक प्रश्न: तिथे हॉटेल वरच राहायला लागते का? स्वतःची काही व्यवस्था केल्यास कसे? (टेंट वैगरे)

जेपी's picture

17 Jan 2014 - 10:41 am | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

इन्दुसुता's picture

17 Jan 2014 - 10:55 am | इन्दुसुता

आवडले ...
वर सोन्याबापूंनी दिलेच आहे त्याच्याशी सहमत ( तुमसर बद्दल).
पुभाप्र

मस्त विस्तृत माहिती

वाचतोय

मदनबाण's picture

17 Jan 2014 - 3:31 pm | मदनबाण

पुढच्या भागाची वाट पाहतो. :)

पिलीयन रायडर's picture

17 Jan 2014 - 4:23 pm | पिलीयन रायडर

सर्व प्रतिसादकांचे आभार..
पुढचा भाग टाकला आहे.

आता स्वान्त सुखाय लिहीत असल्याने माहिती कमी आणि वर्णनं जास्त असतील.. पण तरी आठवेल आणि उपयुक्त वाटेल ते सर्व टाकेनच..

धन्यवाद!

पिलीयन रायडर's picture

17 Jan 2014 - 5:30 pm | पिलीयन रायडर

अरे हो.. "तुमसर" बद्दल धन्यवाद..!! बदल करते..

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Jan 2014 - 7:20 am | कैलासवासी सोन्याबापु

अहो धन्यवाद अन काय कश्याला हो!!! तुमसर कुठे रोज जायचे ठीकाण आहे!!! आमच्या भागातले आहे सो बोललो इतकेच!! तुमचे चालुदेत जोरात

पुलेशु

* तुम्हाला नागपुरात हात दाखवणार ड्रायव्हर न साल्यानं नाव मातीत घातलं आमचं!! पोट्ट्यांना सांगा लागते शोधा अन तीन टाईम फोडा म्हणुन सायच्याले

प्यारे१'s picture

18 Jan 2014 - 3:38 pm | प्यारे१

>>>तीन टाईम फोडा

जेवनाआदी का नंतरनं? ;)

अनन्न्या's picture

17 Jan 2014 - 5:26 pm | अनन्न्या

मस्त माहिती.

प्रीत-मोहर's picture

18 Jan 2014 - 10:34 am | प्रीत-मोहर

मस्तच ग पिरा

पैसा's picture

23 Jan 2014 - 2:40 pm | पैसा

मस्त खुसखुशीत आणि डिट्टेल लिहिलंस! आता एकेक भाग निवांत वाचते!