साहित्यः
४ मध्यम आकाराची कारली (बिया काढून, जरा जाडसर काचर्या कराव्या.)
२-३ हिरव्या मिरच्या
८-१० कढीपत्याची पाने
फोडणीचे साहित्य (मोहोरी, हिंग, ह्ळद या क्रमाने फोडणीत घालावे)
मीठ (चवीप्रमाणे)
गूळ (१/४ कप)
कोथिंबीर (बारीक चिरलेली १/४ कप)
तेल १/४ कप (ह्या कृतीत तेल जरा जास्त लागते)
कृती:
१. तेल जरा जाड बुडाच्या पातेल्यात गरम करुन फोडणी करावी. फोडणीत हिंग नेहमीपेक्षा जरा जास्त घालावा.
२. फोडणीत मिरच्या व कढीपत्याची पाने घालून जरा परतून घ्यावी.
३. आता त्यात कारल्याच्या काचर्या घालाव्या. वर मीठ घालून नीट परतावे. ही भाजी करताना पातेल्यावर झाकण अजिबात ठेवायचे नाही.
४. भाजी शिजली की त्यात गूळ घालून तो पूर्ण वितळेपर्यंत परतावी. त्यात चिरलेली कोथिंबीर घालून वाढावी.
हि भाजी पुरी, पोळी, भाकरी किंवा दहिभाताबरोबर छान लागते.
जेवणे झाल्यावर फोटो काढायची आठवण झाली.....
प्रतिक्रिया
28 Dec 2013 - 7:07 am | इन्दुसुता
कारल्याची भाजी अत्तिशय आवडती..
मी ह्यात साखर घालते आणि वर लिंबू.. ( आणि बी काढत नाही, त्या कुरकुरीत बिया खायला मला फार आवडते)!
28 Dec 2013 - 12:19 pm | त्रिवेणी
माझीपण आवडती भाजी.
पण 1/4 वाटी गुळ घालुन सुद्धा भाजी एवढी हिरवी कशी दिसते आहे?
28 Dec 2013 - 6:30 pm | काकाकाकू
गूळ भाजी शिजल्यावर घातल्यावर हिरवा रंग टिकतो.
हि भाजी आमच्याकडेपण सगळ्यांना आवडते. अजून २-३ प्रकार आहेत....जेव्हा करीन तेव्हा इथेपण देईन. आवडल्या तर जरुर कळवा.
@इन्दुसुता आणि त्रिवेनी.....प्रतिसादाबद्दल आभार.
28 Dec 2013 - 8:24 pm | प्रभाकर पेठकर
वेगळी पद्धत दिसते आहे करून पाहावी लागेल.
28 Dec 2013 - 8:56 pm | जेपी
कारले चिरल्यावर थोडावेळ मिठाच्या पाण्यात भिजु घालणे (15 मिनीट ) नंतर चिंचे सोबत गुळा घालणे .
कडवट पणा पुर्ण पणे जातो .
बाकी पाक्रु आवडली .
28 Dec 2013 - 9:22 pm | प्यारे१
वरील पद्धतीत कारळ्याचा कूट घालून केल्यास कारलं झॅण्टॅमॅटिक लागतं.
28 Dec 2013 - 10:12 pm | काकाकाकू
तीळ घालून करतात.....पण कारळे घालूनही करतात हे माहित नव्हते. आता एकदा घालून बघेन.