डॉ. आंबेडकर, बुद्ध आणि मार्क्स

Atul Thakur's picture
Atul Thakur in जनातलं, मनातलं
6 Dec 2013 - 9:03 pm

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या अखेरीला “बुद्ध कि मार्क्स” नावाचा निबंध लिहुन मार्क्सवादाबद्दलचे स्वतःचे विचार नि:संदिग्धपणे स्पष्ट केले. त्यामुळे काहिंची कुचंबणा झाली. विषेशतः दलित मार्क्सवाद्यांची अवस्था कायमस्वरुपी दयनिय झाली. खरंतर तसं होण्याची गरज नाही. ज्या कुठल्या तत्वज्ञानाने तुम्ही भारुन गेला आहात त्यात जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत या भ्रमात नसलं, त्यातील उणीवांचं भान असलं, त्या मान्य करण्याइतपत प्रामाणिकपणा तुमच्यात असला तर कसलेही प्रश्न उद्भवण्याची गरज नाही. पण नेमकी समस्या येथे आहे. एका पोथीत सारे काही आहे. संपुर्ण जग बदलण्याची कुवत आहे. सर्व मानवी समस्यांची उत्तरे आहेत. जग बदलण्याची वेळ आलेली आहे. जग संक्रमणावस्थेत आहे. आता क्रांती होणारच आहे या आणि असल्या भ्रामक कल्पनांनी पछाडलेल्यांना पुढे प्रमाणिक राहताच येत नाही. बाबासाहेबांच्या काही वाक्यांना ओढुन ताणुन वेगळा रंग देण्याचा काही मार्क्सवाद्यांचा प्रयत्न हा त्याचेच फलित आहे. मात्र या काळात, जेव्हा मार्क्सवाद हा जागतिक पटलावरुन जवळपास नाहीसा होण्याचा मार्गावर असताना, त्यातील फोलपणा रशियाच्या विघटनानंतर लक्षात आला असताना आपल्याकडे बाबासाहेबांच्या निबंधातील मार्क्सवादाबद्दलची मते कितपत महत्वाची आहेत? असा जर विचार केला तर हे दिसुन येते कि आजच्या काळात त्या निबंधाचे महत्व आणखि वाढले आहे. अलिकडेच डॉ. आनंद तेलतुंबडेंच्या वक्तव्याबाबत जो गदारोळ उठला त्यावरुन हे दिसुन येते कि मार्क्सवाद आणि दलित समस्या यांच्यातील संबंध दुर्लक्षिण्याजोगे नाहीत. निदान भारतात तरी, जेथे जातीयता अजुनही संपलेली नाही, संपण्याची शक्यता नजिकच्या काळात दिसत नाही तेथे या संबंधातील गुंतागुंत अधुनमधुन डोके वर काढणारच.

पुढे जाण्याअगोदर एका हळव्या गोष्टीला स्पर्श करणं भाग आहे कारण त्यावरुन दलितसमाजात मार्क्सवादाचा संबंध हा बाबासाहेबांनंतर कुठे आला हे स्पष्ट होईल. दलित अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर १९७२ साली दलितपँथरची स्थापना झाली. अल्पावधीत या संघटनेचं नाव जागतिक स्तरावर पोहोचलं. जगातील मोठमोठ्या नेत्यांनी या संघटनेची दखल घेतली. आणि १९७५ साली फुट पडुन दलितपॅंथरचा प्रभाव संपला. त्यानंतर काही वर्षांनी लता मुरुगकरांनी दलित पँथरवर प्रबंध लिहिला. त्यात फुटीच्या कारणांचा सविस्तर उहापोह केला आहे. तत्कालिन नेत्यांच्या मुलाखतींवर हा प्रबंध आधारलेला असल्याने त्याला वेगळे महत्व आहे. तूर्तास या लेखासाठी त्यातील इतर कारणांकडे जाण्याची मला आवश्यकता वाटत नाही. मात्र अनेक कारणामध्ये महत्वाचे कारण हे वैचारिक मतभेदांचे होते हे दिसुन येते. राजा ढाले हे आंबेडकरवादी आणि नामदेव ढसाळ यांचा कल मार्क्सवादाकडे यातुन हे मतभेद झाल्याचे मुरुगकरांचे निरिक्षण आहे. आजदेखिल सभेत हा विषय निघाला कि त्यावेळच्या दलित नेत्यांच्या चेहर्‍यावर खंत दाटुन येते. खुद्द बाबासाहेबांचा याबाबत अनुभव काय होता हे जाणुन घेणं देखिल महत्वाचं आहेच. भारताच्या संदर्भात खुद्द मार्क्सचे निरिक्षण चुकले. भारतातील जातीव्यवस्था आधुनिकतेच्या रेट्याखाली संपेल असे मार्क्सला वाटले होते. तसे झाले नाही. ५ ऑगस्ट १८५३ च्या “न्युयॉर्क डेली ट्रीब्युन मध्ये मार्क्स लिहितो…Modern industry, resulting from the railway system, will dissolve the hereditary divisions of labor, upon which rest the Indian castes, those decisive impediments to Indian progress and Indian power. हे अर्थातच प्रत्यक्षात आले नाही. भारतातल्या कारखानदारी, शहरीकरण, आधुनिकता येऊनही जातीसंस्था हि वेगळ्या स्वरुपात चालुच राहिली.

अलिकडे काही मार्क्सवादी हे मान्य करतात कि जातीसंस्थेबद्दल त्यांचे आकलन चुकले. विशेषतः वर्ग नाहीसे झाले कि जाती आपोआपच नाहीशा होतील आणि वर्ग हा जातीपेक्षा महत्वाचा प्रश्न आहे हि दोन्ही गृहीतके चुकली. मुळात मार्क्सवाद्यांच्या दृष्टीने जात महत्वाची नव्हतीच. जातीचा प्रश्न धर्माशी निगडीत होता आणि धर्म ही अफुची गोळी होती. अर्थ हा base आणि धर्म किंवा तत्सम कुठलेही तत्वज्ञान हे superstructure अशी ती मांडणी होती. सर्वतर्‍हेची विषमता लहानपणापासुन ते अगदी उच्चविद्याविभुषित झाल्यावरसुद्धा अनुभवलेले बाबासाहेब मात्र अगदी वेगळ्या मार्गाने गेले. भारतीय जनमानसातील धर्माचं महत्व त्यांनी अचुक ओळखलं होतं. मनुस्मृतीचा प्रभाव त्यांना माहित होता. भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेल्या जातीसंस्थेचं उच्चटन वर्ग नाहीसे झाल्याने होईल या भ्रमात ते नव्हते. शिवाय मार्क्सवाद्यांनी त्यांना एका बाबतीत निराश केलं होतं. मुंबईच्या गिरणी कामगारांमध्ये अस्पृश्यांना विणकाम खात्यात प्रवेश नव्हता. तेथे धागा चोखुन काम करावे लागत असे. अशा तर्‍हेच्या भेदभाव नाहीसा करण्यासाठी कम्युनिस्टांनी कुठलिही पावले उचलली नव्हती. त्यामुळे आयुष्याच्या अखेरीला बाबासाहेबांनी मार्क्सवादाबद्दल आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. हा निबंध प्रदीर्घ आहे. पण लेखाच्या दृष्टीने त्याचा गोषवारा देणे आवश्यक आहे.

बाबासाहेबांनी बुद्धाच्या आणि मार्क्सच्या तत्वप्रणालीची सर्वप्रथम मांडणी केली आहे. त्यात मार्क्सवादाबद्दल आपले भाष्य करताना ते म्हणतात कि” …समाजवाद अटळ आहे हा दावा पूर्णपणे फोल ठरला आहे. …साम्यवादाने रशियात पाऊल टाकण्याची शक्यता निर्माण होण्यापूर्वी पुष्कळ हिंसा व रक्तपात घडवुन जाणीवपुर्वक योजना आखावी लागली….इतिहासाचे एकमेव स्पष्टीकरण म्हणुन आता कोणीही इतिहासाचे आर्थिक स्पष्टीकरण स्विकारत नाही. कामगारांना वाढत्या प्रमाणात भिकेस लावले आहे हे कोणीही मान्य करत नाही.” मात्र बाबासाहेबांना मार्क्स हा अत्यंत महत्वाचा विचारवंत वाटत होता. त्याची चार तत्वे त्यांना महत्वाची वाटली मात्र त्यावरील बुद्धाचे उपाय त्यांना परिणामकारक वाटले. ती चार तत्वे म्हणजे १. तत्वज्ञानाचे कार्य जगाची पुनर्र्चना करणे आहे. २. वर्गावर्गामध्ये हितसंबंधांचा कलह आहे. ३. संपत्तेच्या खाजगी मालकिमुळे एका वर्गाला सत्त मिळते तर दुसर्‍या वर्गाला त्याची पिळवणुक क्झाल्यामुळे दु:ख मिळते. ४. समाजाच्या भल्यासाठी खाजगी संपत्ते नष्ट करुन हे दु:ख दूर करणे आवश्यक आहे.

या चारही गोष्टींवर बुद्ध धर्मामध्ये परीणामकारक उपाय आहेत असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. त्यासाठी त्यानी या निबंधात जागोजाग निरनिराळे दाखले दिलेले आहेत. विशेषतः बुद्ध व त्याचा शिष्य आनंद यांच्या संवादातुन बाबासाहेबांनी हे स्पष्ट केले कि हाव असण्याचे कारण मालकी असे बुद्ध धर्म मानतो. भिक्षुंना खाजगी संपत्ती बाळगण्याची परवानगी नाही. त्यात मार्क्सच्या चौथ्या तत्वाचे निवारण होते. तथापी मार्क्सवाद्याची साधने त्यांना कधीही पटली नाहीत. विशेषतः हिंसेच्या ते विरुद्ध होते. बाबासाहेबांना धर्म महत्वाचा वाटत होता. मार्क्सवाद्यांच्या धर्मद्वेषाला त्यांची कधीही मान्यता नव्हती. एक कायमची हुकुमशाही म्हणुन राज्याविषयी असलेला मार्क्सवादी सिद्धांत त्यांना पटला नव्हता. “जर अखेरीला राज्य नष्ट होणार” तर ते केव्हा नष्ट होणार याचा कालावधी साम्यवादी सांगु शकत नाहीत. शिवाय हुकुमशाहीने तिचे कार्य केल्यावर, लोकशाहीचा मार्ग सुरक्षित बनवल्यावर स्वतः संपुष्टात का येऊ नये? हा बाबासाहेबांचा घाणाघाती आक्षेप होता. सरतेशेवटी ते म्हणतात “साम्यवाद केवळ समता ही एकच गोष्ट देऊ शकतो, (समता,सहभाव व स्वातंत्र्य या)सर्व गोष्टी देऊ शकत नाही”. इतक्या स्पष्ट आक्षेपांनंतर बाबासाहेबांच्या विचारांशी मार्क्सवादाची सांगड घालण्याचा अप्रामाणिकपणा करण्यात अर्थ नाही हे कुणालाही पटेल. तरीही हे प्रयत्न का होतात? याचे उत्तर मार्क्सवाद्यांच्या ढोंगीपणात दडलेले आहे.

मार्क्सवाद हा जगभरातुन नाहीसा होत असला तरी विचारवंत विद्वानांमध्ये ते चलनी नाणं आहे. आणि हे विचारवंत आणि विद्वान घाऊक प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रात आणि विद्यापिठात सापडतात. फर्ड्या इंग्रजीत मार्क्सवरची गाडाभर पुस्तके वाचावीत, त्यावर क्रिटीकल थिंकर्सनी लिहिलेली आणखि खंडीभर पुस्तके वाचावीत. पेपर्स लिहावेत, सेमिनारमध्ये वाचावेत. गरीबांच्या शोषणावर वातानुकुलित गाड्यांमधुन प्रवास करुन व्याख्याने द्यावीत, पिचलेल्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये भाषणे आयोजित करावीत. आणि हे सारं अतिक्लिष्ट भाषेत करावं म्हणजे विद्वत्तेला आणखि झळाळी प्राप्त होते. बाबासाहेबांनी कितीही स्पष्टपणे लिहिलं तरी बाबासाहेबांचा आणि मार्क्सचा सांधा जुळवण्याचं याचं काम सुरुच असतं. कारण बाबासाहेबांना खोडुन काढता येत नाही. तेवढी त्यांची कुवतही नसते. मग पुढे यांची मजल “मुळात बाबासाहेबांच्या काळापर्यंत मार्क्सचे महत्वाचे ग्रंथ उपलब्ध नव्हते” हे म्हणण्यापर्यंत जाते. त्यातुन त्यांना हे ध्वनित करायचे असते कि जणुकाही हे ग्रंथ बाबासाहेबांच्या हाती लागले असते तर त्यांच्या विचारात फरक पडला असता. खरंतर रशियाच्या विघटनापर्यंत बाबासाहेब हयात असते तर त्यांनी मार्क्सवादावर आणखि हल्ला चढवला असता. ज्या बाबासाहेबांना मार्क्स हा अत्यंत म्हत्वाचा विचारवंत वाटत होता. त्याच्या ग्रंथांचे अध्ययन बाबासाहेबांनी केले नसेल हे त्यांचे अजस्त्र वाचन ज्यांना माहित आहे त्यांना पटणारच नाही. या सार्‍या बाबी वैयक्तीक पातळीवर सुरु असतील तर एकवेळ समजता येईल मात्र विद्यार्थ्यांना शिकवताना आंबेडकरांचे सुप्रसिद्ध “अ‍ॅनहिलेशन ऑफ कास्ट” हे भाषण घ्यावे कारण त्यात जातीसंस्थेवर प्रखर हल्ला आहे मात्र “बुद्ध कि कार्ल मार्क्स” या निबंधाला हातदेखिल लाऊ नये याला संधिसाधु अप्रामाणिकपणाशिवाय दुसरे काहीही म्हणता येत नाही. मार्क्सने धर्माला अफूची गोळी म्ह्टले आहे मात्र खुद्द मार्क्सवाद हा आता बुद्धीमंतांसाठी अफूची गोळी ठरला आहे हे नक्की.

अतुल ठाकुर

संदर्भ:
बुद्ध कि कार्ल मार्क्स – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर – धनंजय कीर
Dalit Panther Movement of Maharashtra – A Sociological Appraisal – Dr. Lata Murugkar

समाजलेख

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

6 Dec 2013 - 9:47 pm | प्रचेतस

लेख आवडला.

कवितानागेश's picture

7 Dec 2013 - 12:15 am | कवितानागेश

वाचतेय हळूहळू. :)

राजेश घासकडवी's picture

7 Dec 2013 - 1:09 am | राजेश घासकडवी

अभ्यासपूर्ण लेख आवडला. मार्क्सच्या कळकळीशी सहमत होऊनही बाबासाहेबांना त्याच्या मार्गाविषयी (आर्थिक वर्गांमधल्या संघर्षातून - क्रांतीतून - तळागाळातल्या वर्गाचा विजय) शंका होती ही माहिती कळली. तसंच दलित पॅंथरच्या फुटीविषयी साधारण माहित होतं, पण त्यामागची तात्विक, वैचारिक पार्श्वभूमी माहित नव्हती.

Modern industry, resulting from the railway system, will dissolve the hereditary divisions of labor, upon which rest the Indian castes, those decisive impediments to Indian progress and Indian power.

हे मार्क्सचं निदान नक्की कुठे चुकलं ते समजावून सांगाल का? जातीव्यवस्था आजकाल फक्त रोटीबेटी व्यवहारापुरती राहिलेली आहे. आज अमुक जातीने अमुकच काम करावं हा आचारच काय, विचारही पूर्ण मोडून पडलेला आहे. आज पंच्याण्णव टक्के मुलं शाळेत जातात. सर्व व्यवसायांमध्ये सर्व जातींचे लोक दिसतात. इथपर्यंतचा हा प्रवास मार्क्सला अपेक्षित मार्गाने झाला नाही, म्हणजे पददलित, कामगार आणि शेतकरी यांनी केलेल्या क्रांतीतून झाला नाही हे खरं आहे. त्याबाबतीत त्याचं निदान चुकलं म्हणता येईल. पण उत्क्रांतीची प्रक्रिया चालू आहे. तुम्ही दिलेल्या उदाहरणाचंच बघा - एके काळी अस्पृश्य असणारांना आज कापड गिरणीतली नोकरी त्यांच्या जातीपायी दिली जात नाही असं होतं काय?

शेवटच्या परिच्छेदातली विचारवंतांवरची झोड अस्थानी वाटली. आज मार्क्सवादाची भलामण करणारे फारसे शिल्लक नाहीत असं मला दिसून आलेलं आहे. तुम्हाला तशी प्रतिष्ठित उदाहरणं माहित असतील तर सांगा.

राजेशजी, आपलं म्हणणं मान्य आहे परंतु काहीशी असहमतीदेखिल आहे.

जातपात ही दृश्य स्वरुपात (शहरात) गेली असली तरी तिने सुक्ष्म स्वरुप धारण केले आहे असे माझे मत आहे. मुंबईतील एका मोठ्या कॉलेजमध्ये मी ही घटना पाहीली. लायब्ररीयन खालच्या जातीतील आणि तिच्या हाताखालील कर्मचारी तथाकथीत उच्चवर्णिय. ते जेवायला एकत्र बसत मात्र तिने दिलेलं काहीही खात नसत. अस्पृश्यता पारंपरिक स्वरुपात दिसत नसली तरीही ती नाहीशी झाली असे म्हणवत नाही. तिचे स्वरुप बदलले आहे. गावाकडे आजही खैरलांजी भीषण सारखी प्रकरणे होतात. तेथेही टीवी चॅनल्स असतील, लोकांकडे मोबाईल असतील. शाळा असतील. आधुनिकतेचे वारे वाहात असतील म्हणुन मार्क्सने म्हटल्याप्रमाणे या घटना संपलेल्या नाहीत.

शेवटच्या परिच्छेदातली विचारवंतांवरची झोड अस्थानी वाटली. आज मार्क्सवादाची भलामण करणारे फारसे शिल्लक नाहीत असं मला दिसून आलेलं आहे. तुम्हाला तशी प्रतिष्ठित उदाहरणं माहित असतील तर सांगा.

हा मुद्दा मी शैक्षणिक क्षेत्रासाठी मांडलेला आहे. प्राध्यापकांमध्ये, विशेषतः समाजशास्त्राच्या प्राध्यापकांमध्ये मार्क्सवाद हे चलनी नाणं आहे हे नक्की. फार काय, काही विभागच्या विभाग किंवा विद्यापीठांवर या तत्त्वज्ञानाची दाट छाया अजुनही आहे. हे चांगले की वाईट या बद्दल चर्चा करता येईल. पण तुम्ही कुठल्याही विद्यापीठाचा समाजशास्त्राचा अभ्यासक्रम पाहिलात कींवा तेथील प्राध्यापकांशी चर्चा केलीत तर मार्क्सवाद अगदी चीवटपणे तेथे मुळ धरुन आहे. इतक्या चिवटपणे की इतर काही गोष्टींना वावच मिळत नाही. आणि तेथुनच आपले उद्याचे आधारस्तंभ बाहेर पडत असतात.

राजेश घासकडवी's picture

7 Dec 2013 - 9:32 pm | राजेश घासकडवी

या घटना संपलेल्या नाहीत.

हे अर्थातच मान्य आहे. सुंभ जळला तरी पीळ गेलेला नाही हे खरं आहे. मात्र प्रवास चालू आहे. आणि त्याची सुरूवात ही शैक्षणिक आणि आर्थिक सबलीकरणातून झाली. टीव्ही चॅनेल्स, मोबाईल, शाळा आहेत हे माझ्या मते काहीसं गौण आहे. टीव्ही, मोबाइल विकत घेण्याची क्षमता, आणि शाळेत जाण्याची परवानगी या अधिक महत्त्वाच्या आहेत. दीडशे वर्षांपूर्वी, जेव्हा मार्क्स लिहीत होता, तेव्हा तुम्हाला भारतातल्या शाळा कॉलेजात अस्पृश्य माणूस शिकवताना दिसला असता का? शिकवणं सोडा, शिकताना दिसला असता का? जातीव्यवस्थेद्वारे मोठ्या समाजावर 'तू हे काम करायचं नाही!' असा दंडक घालून तो अमलात आणण्याची शक्ती शून्यवत झाली आहे.

राजेशजी आपण याबाबत आशावादी आहात. मी देखिल आहे. पण यांत्रिकीकरणाच्या रेट्यामुळे अस्पृश्यता नाहीशी झाली काय? स्वातंत्र्य आणि त्यानंतर संविधानाने आणि कायद्याने जो रेटा आणला त्याचे काहीच महत्त्व नाही?

राजेश घासकडवी's picture

8 Dec 2013 - 2:47 pm | राजेश घासकडवी

पण यांत्रिकीकरणाच्या रेट्यामुळे अस्पृश्यता नाहीशी झाली काय? स्वातंत्र्य आणि त्यानंतर संविधानाने आणि कायद्याने जो रेटा आणला त्याचे काहीच महत्त्व नाही?

स्वातंत्र्य आणि घटनेने दिलेले अधिकार यांमुळे सगळ्यात मोठा बदल झाला आहे हे मान्य. मात्र मार्क्सने म्हटलेलं त्याआधी शब्दशः लागू आहे. यांत्रिकीकरण-शहरीकरण-रेलवे हे हातात हात घालून जातात. शहरात रेलवेमध्ये शेजारी असणाराला 'कोणाचा रं तू' असं विचारायला वेळ नसतो, सोय नसते, त्यामुळे अनेक बंधनं गळून पडली. त्यामुळे पुढची चळवळ यशस्वी व्हायला एक मोठी पार्श्वभूमी तयार झाली.

या चर्चेमुळे मी मार्क्सवादी किंवा मार्क्सचं सगळंच बरोबर असं म्हणणारा आहे असं वाटेल, तर ते बरोबर नाही. माझं म्हणणं आत्ता एकाच विधानापुरतं आहे.

अर्धवटराव's picture

7 Dec 2013 - 1:38 am | अर्धवटराव

"गुलामाला तो गुलाम असण्याची जाणीव करुन द्या म्हणजे तो बंड करुन उठेल" असा अत्यंत मूलगामी विचार मांडणारे आंबेडकर मृत्युपश्चातही उपेक्षीतच राहिले काय? श्रीकृष्ण असो वा बुद्ध, शिवाजी असो वा आंबेडकर... त्याला निळ्या-भगव्या वेष्टनात गुंडाळुन ठेवणारी व्यवस्थाच खर तर सर्व समस्यांचं मूळ असावं...

पिंपातला उंदीर's picture

7 Dec 2013 - 9:19 am | पिंपातला उंदीर

सुन्दर विवेचन

पैसा's picture

7 Dec 2013 - 9:25 am | पैसा

प्रत्येक महान माणसाच्या शिकवणुकीचा पराभव त्याचे अनुयायीच करतात. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मात्र धर्म बदलूनही दलितांची परिस्थिती एकदम बदलली किंवा सुधारली असावी असे काही वाटत नाही.

आताच्या मार्क्सवाद्यांबद्दल काय बोलावे? वृंदा कारत यांचा मेक अप आणि साड्या आम्हा मध्यमवर्गीयांना सुद्धा न परवडणार्‍या असतात. स्वतः साधे रहाण्यापेक्षा साधी राहणी आणि गरिबी यावर अशोक हॉटेलमधे सेमिनार घेणे जास्त सोपे असते.

प्रकाश घाटपांडे's picture

7 Dec 2013 - 2:08 pm | प्रकाश घाटपांडे

उत्तम लेख.सोप्या भाषेत दिल्याबद्दल काही विद्वान खवळतील बर का! :)

या विषयावर लिहावं अशी पात्रता आणि त्याहून अभ्यास अजिबातच नाही. लेख वाचून आणि आजवर जे काही मत झालं असेल ते मांडतो.
कुठलाही वाद टाकाऊ नसतो. त्याचं मरण हे अनुयायांनी तय केलेलं असतं. मार्क्सवाद रशियात मृत्यू पावला, पण चीनमधे बदल सामावून घेत तो तगला. बदलांना सामोरं जाण्यासाठी बाळगलेली लवचिकता हा फरक ध्यानात घ्यावा लागेल.कुठलंही झाड कुठेही उगवत नाही. मार्क्सचं रोपटं भारतात रूजेल कि नाही या शंकेला मार्क्सवाद थोपवून आणि सारवासारवी करून उत्तर देता येत नाही. डाव्यांना त्यांच्या टार्गेट ऑडीयन्स पर्यंत पोहोचण्यात डॉ आंबेडकर डोकेदुखीच ठरलेत म्हणून त्यांनी जुळवून घ्यायचा प्रयत्न केला असावा. पण वर्ग आणि वर्ण हा वाद आला कि पोथीत मान खुपसून बसल्याने ते व्यवहारी टरले नाहीत. तस्मात प. बंगाल आणि केरळ इथेच त्यांना जमीन मिळाली. तिथेही आंबेडकरी तत्त्वज्ञान पोहोचल्यास पोथी गुंडाळून ठेवावी लागेल.

विवेकपटाईत's picture

7 Dec 2013 - 7:07 pm | विवेकपटाईत

नेहमीप्रमाणेच लेख आवडला. बाकी बोलायचे तर माझ्या अनुभावात आलेले अधिकांश मार्क्सवादी खात्यापित्या घरचे असतात. भरपूर अनुदाने खाऊन सेमिनार इत्यादी भरवितात. आंग्ल भाषेत खरडतात. यांच्या घरी नौकर चाकर ही असतात. शेवटी प्रत्येकाने स्वत:च्या (व्यक्ती असो व समाज, जाती इत्यादी) हिमाकीने जगायचे असते. दुसर्याचे हिसकून घेण्याचा विचारचे समर्थन करणार्याला काय म्हणायचे.

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. लवकरच सविस्तर उत्तरेही देण्याचा प्रयत्न करेन :)

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Dec 2013 - 12:22 pm | बिपिन कार्यकर्ते

सु रे ख

असे धागे अधिकाधिक यावेत ही इच्छा!

लता मुरुगकरांचा प्रबंध कुठे वाचायला मिळेल?