चला व्हिएतनामला ०२ : हा नोईचा फेरफटका - १

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
22 Nov 2013 - 12:47 am

====================================================================

चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०(समाप्त)...

====================================================================

...२०१३ च्या अंदाजांप्रमाणे तेथील दर माणशी वार्षिक उत्पन्न २,००० अमेरिकन डॉलर होईल आणि खरेदीक्षमतेच्या दराने (परचेजिंग पॉवर पॅरिटी) ते ४,००० डॉलर होईल.

वंशशास्त्र संग्रहालय

आम्ही सामान गाडीत टाकून, गेल्या २४ तासांच्या प्रवासाचा शीण विसरून विमानतळावरून सरळ संग्रहालयाकडे निघालो. संग्रहालय पहायला सुरुवात केल्यापासून पहिल्या पंधरा मिनिटातच हॉटेलला जाणे बाद करायला लावल्याबद्दल आमचा मार्गदर्शक "थान्ह" (Thanh) चे आभार मानले. हे हा नोईतले सर्वात नवीन आणि सर्वात मोठे संग्रहालय आहे.

साधारणपणे १०,००० वस्तू, १५,००० फोटो आणि मुख्य इमारतीखेरीज संग्रहालयाच्या विस्तीर्ण प्रांगणातील अनेक वास्तू यांच्यासह व्हिएतनाममधील ५४ अल्पसंख्याक जमातींचे रोजचे जीवन, रीतीभाती, इ चे प्रदर्शन करणारे हे संग्रहालय आपल्याला खिळवून ठेवते. असंख्य रंगीबेरंगी चित्ताकर्षक वस्तूंत काय बघू आणि काय नको असे होते.

सर्व जमातींच्या नेहमीच्या वापराच्या आणि लग्नासारख्या समारंभांसाठीच्या आकर्षक पेहरावांच्या वेगवेगळ्या शैली हे मला आवडलेले खास आकर्षण होते...

.

.

 ...

या सगळ्याच वस्तू इतक्या सुंदर रंगीबेरंगी होत्या की एक वेगळ्याच दुनियेतून सफर करतोय असे वाटत होते.

घरातली सजावट...

.

.

या संग्रहालयाचे विशेष आकर्षण म्हणजे इमारतीतील बंदिस्त भागांबरोबर येथे उघड्या आवारात काही जमातींची खास प्रकारची घरे त्यांच्या मूळ शैलीत आणि आकारत बांधलेली आहेत. आपण आरामात घराचे मालक असल्यासारखे घरांमध्ये फिरून सगळ्या वस्तू पाहू आणि हाताळू शकतो.

हे आहे ए दे जमातीचे लांबट घर (E De long house)

ए दे घराचा अंतर्भाग...

हे आहे बा ना जमातीचे सार्वजनिक घर (community house). हे लग्नसमारंभ आणि इतर सामाजिक अथवा धार्मिक समारंभांसाठी वापरले जाते...

तेथून थोडे पुढे गेलो तर एक घरासारखीच इमारत लागली.ते गिया राय जमातीचे समाधिस्थान (GiaRai tomb) होते. त्याच्या चारी बाजूच्या कुंपणावर मानवी जीवनचक्राचे प्रतिनिधित्व करणार्‍या (स्त्रीपुरुषसंबंध - गर्भार स्त्री - जन्म - बालपण - तरुणपण) लाकडी बाहुल्या असतात...

पुढे एक जरा वेगळीच दिसणारी लाकडी रचना दिसली म्हणून पटकन तिच्याबरोबर फोटो काढून घेतला...

नंतर मार्गदर्शकाने सांगितले की ती एका श्रीमंत जावयाने सासर्‍याला प्रेमाने भेट दिलेली शवपेटिका आहे ! त्या जमातीत अशी भेट फार मानसन्मानाची समजली जाते !

चिनी मातीच्या फारशांनी सजवलेली घरे ही एका जमातीची खासियत आहे. त्या फारशांचे काही नमुने संग्रहालयाच्या एका भागातील इमारतीत ठेवलेले होते...

.

संग्रहालयाच्या आवारात फिरता फिरता एका उघड्या रंगमंचावर व्हिएतनामचा खास पाण्यातल्या कठपुतळ्यांचा खेळ चाललेला दिसला. तेव्हा तेथे पाय वळणे साहजिकच होते...

पारंपरिक व्हिएत लग्नाच्या कार्यक्रमाचा खेळ चालला होता. मार्गदर्शकाने पुढे बराच कार्यक्रम बाकी आहे तेव्हा तिथे फार वेळ न थांबता पुढे चलण्याची विनंती केली म्हणून निघायलाच लागले कारण आमच्या सहल कंपनीच्या कृपेने आज अर्ध्या दिवसात पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आटपायचा होता. मात्र रात्री हा नोईच्या खास प्रेक्षागृहात पाण्यातल्या कठपुतळ्यांचा खेळ बघायचा आहे याची त्याने आठवण करून दिली तेव्हा जरा बरे वाटले. मग मात्र रेंगाळणारी पावले पटापट पडू लागली.

हा नोई साहित्य मंदिर (Ha Noi Temple of Literature)

या जागेचे नाव जरासे फसवे आहे. हे इ स १०७० मध्ये बांधलेले कन्फ्यूशियसचे मंदिर आणि व्हिएतनामचे पहिले राष्ट्रीय विद्यापीठ आहे. या जुन्या व्हिएत शैलीत बांधलेल्या वास्तूची राष्ट्रीय स्मारक म्हणून जपणूक केली जात आहे.

विद्यापीठाचे प्रवेशव्दार...

विद्यापीठाचे क्षेत्र बरेच मोठे आहे. एका मागोमाग एक असे करत प्रशस्त आवारे (Courtyards), त्यांचे चौसोपे आणि नावे दिलेली द्वारे पार करत करत आपण पुढे जात राहतो. ही आहे तिसर्‍या आवारातली स्वर्गीय स्वच्छता असलेली विहीर (Well of Heavenly Clarity) आणि पुष्परचनेने बनवलेला २०१२ वर्षाचे स्वागत करणारा संदेश...

अवांतर : व्हिएतनाम जवळ जवळ १००० वर्षे (इ पू २००० ते १०००) चीनच्या पारतंत्र्यात होता. तेव्हा चिनी भाषेच्या जबरदस्तीने मूळ व्हिएत लिपीचा वापर कमी होउन ती जवळ जवळ नष्ट झाली होती. कम्युनिस्ट सत्तेवर आल्यावर त्यांनी किचकट चिनी लिपी किंवा मृतप्राय झालेली व्हिएत लिपी यांच्याऐवजी लिहायला सोपी रोमन लिपी व्यवहारात आणली. त्यामुळे आपण व्हिएतनामीज भाषा वाचू शकतो पण समजू शकत नाही ;)

पाचव्या आवारात आपण पोहोचतो तेव्हा सम्राटाच्या अकादमीची वास्तू समोर येते...

मंदिरातील उत्सवमूर्ती कन्फ्यूशियसची मूर्ती...

आणि हे त्याचे दोन खास शिष्य...

विद्यापीठाच्या उच्च विद्याविभूषित आणि नावाजलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ तेथे कासवांच्या पाठीवरचे शिलालेख आहेत. कासव सर्व दक्षिणपूर्वेत आणि अतिपूर्वेत तीव्र बुद्धिमत्ता आणि दीर्घायुष्याचे प्रतीक समजले जाते...

कन्फ्यूशियस गुरुजींचा निरोप घेऊन विद्यापीठाबाहेर पडलो आणि पाचच मिनिटावर असलेल्या पुढच्या थांब्यावर चालत निघालो. जाताना झालेले हा नोईच्या रस्त्यांचे दर्शन...

.

.

====================================================================

परत केलेल्या तलवारीचे तळे (Hoàn Kiếm Lake), सूर्योदय पूल (The Huc Bridge) आणि हरिताश्म (जेड) पर्वत मंदिर (Ngoc Son Temple)

रस्त्यावरची पुणेरी पद्धतीची (मुख्यतः दुचाकी आणि तिचाकी रिक्षांच्या गर्दीत मिसळलेल्या चारचाकी आणि पादचारी) गर्दी पार करत करत पाचच मिनिटात एका तळ्याच्या काठावर पोहोचलो. चेहरे सोडले तर बर्‍यापैकी भारतीय मोहोल वाटत होता. पण हा पूल बघितला आणि परत व्हिएतनाम मध्ये परतलो...

हा ज्या तळ्यात आहे त्याचे "परत केलेल्या तलवारीचे तळे" हे नाव एका दंतकथेवरून पडले आहे. चौदाव्या शतकात चीनच्या मिंग सम्राटाला शह देऊन स्वतःची ले राजवट स्थापन करणारा सम्राट ले लोई हा व्हिएतनामचा एक मोठा योद्धा म्हणून प्रसिद्ध आहे. दंतकथेप्रमाणे चीनबरोबरच्या युद्धात साहाय्य म्हणून त्याला एका दैवी शक्तीने जादूची तलवार दिली होती. युद्धानंतर एकदा सम्राट जलविहार करत असताना ती तलवार त्याच्या हातातून एका कासवाने ओढून नेली. हरतर्‍हेचे प्रयत्न करूनही त्या तलवारीचा आणि कासवाचा शोध लागला नाही. मग सम्राटाने जाहीर केले की सोनेरी कासव देवानेच (Golden Turtle God; Kim Qui) ती तलवार परत नेली आणि त्या गोष्टीची आठवण म्हणून तळ्याचे नविन नामकरण केले.

वरचा चित्ताकर्षक लालभडक सूर्योदय पूल आपल्याला त्या तळ्यात असलेल्या हरिताश्म (जेड) बेटावरच्या मंदिरापर्यंत नेतो.

मंदिराचे प्रवेशव्दार...

बेट छोटेखानी असले तरी रमणीय आहे. बरीच झाडी आहे. येथील मंदिर तेराव्या शतकात मोंगलांचा पराभव करणार्‍या सरदार त्रान हुंग दावो (Tran Hung Dao), व्हिएतनामी धनवंतरी ला तो (La To) आणि एक वान झोंग (Van Xuong) नावाचा विव्दान या तिघांना वाहिलेले आहे.

उत्सवमूर्ती आणि त्यांच्या समोरची आरास...

जिवंत असताना २५० किलो वजन असणारे एक कासव तेथे जतन करून ठेवलेले आहे...

पूर्वेकडे बुद्धिमत्तेचे आणि दीर्घायुष्याचे प्रतीक म्हणून कासव जागोजागी दिसते आणि पुजले जाते.

संध्याकाळ होत आली होती. आता त्रॉन कोक बुद्धमंदिर (Tron Quoc Pagoda) पहायची वेळ निघून गेली होती म्हणून त्या प्रेक्षणीय स्थळाला भेट देता आली नाही...


(चित्र जालावरून साभार)

ताम्र नदीच्या (Red River) पात्रात इ स च्या सहाव्या शतकात बांधलेल्या या पॅगोड्याच्या आवारात भारताचे माजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी भेट दिलेल्या बोधी वृक्षाच्या फांदीपासून वाढवलेला वटवृक्ष आहे. सहल कंपनीचा मनातल्या मनात परत उद्धार करत धावपळत पाण्यातल्या कठपुतळ्यांचा खेळ बघायला निघालो.

संध्याकाळच्या ट्रॅफिक जॅम मधून वाट काढत आमच्या गाडीने थांग लाँग (Thăng Long) रंगमंदिर गाठले. प्रेक्षागृहात पोचलो तेव्हा वाद्यवृंद स्थानापन्न होऊ लागला होता. हुश्श्य ! वेळेवर पोचलो होतो !...

थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू झाला. लोककथा आणि त्याचबरोबर विनोदी कथांवर आधारलेले नाट्य पाण्यावर तरंगणार्‍या बाहुल्यांच्या माध्यमातून एका बांबूच्या पडद्यामागे पाण्यातच उभे राहिलेले कलाकार मोठ्या कसबाने सादर करतात आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. ही कला व्हिएतनाममध्ये अकराव्या शतकात आस्तित्वात आली. आजच्या घडीलाही ही वैशिष्ट्यपूर्ण कला भरपूर लोकप्रिय आहे.

त्या खेळाची ही काही क्षणचित्रे...

.

.

.

सरतेशेवटी पडद्यामागून पुढे येऊन प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारणार कलाकारवृंद...

कार्यक्रम रंगतदार होता म्हणून भान विसरून पाहत होतो. पण तो संपल्यावर ३६ तासांच्या घावपळीचा थकवा जाणवायला लागला होता. हॉटेल गाठून चेक इन केले, एक जोरदार गरम शॉवर घेतला आणि केव्हा बिछान्यात गुडुप झालो ते कळले सुद्धा नाही.

क्रमश :

====================================================================

चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०(समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

सोबतची सीट बूक केली आहे!!!!

नेहमीप्रमाणे मस्त सफर सुरू झाली आहे. :)

मोदक नंतर माझा नंबर. जरा घ्या सरकून शेठ. गर्दी होणार आहे.

निनाद's picture

22 Nov 2013 - 5:07 am | निनाद

मस्त...
चीनी प्रभाव व्हियेत्नामवर असणारच. पण म्हणून रोमन लिपी...? हेच ईंडोनेशियामध्येही झाले :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Nov 2013 - 1:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

...पण म्हणून रोमन लिपी...? हेच ईंडोनेशियामध्येही झाले

हा युरोपियन वसाहातवादाचा भलाबुरा परिणाम आहे. त्यांना त्या काळातल्या पर्यायातील हाच सर्वोत्तम वाटला असावा. पण व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि मलेशिया सोडून इतर देश (कंबोडिया, थायलंड, ब्रम्हदेश, इ) त्यांच्याच मूळ लिप्या वापरत आहेत.

स्पंदना's picture

22 Nov 2013 - 5:40 am | स्पंदना

बरेच सगळे पुतळे हे सिंगापुरच्या चिनी मंदिरात असलेल्या पुतल्यांसारखे वाटतात. त्यांची लिपी नष्ट झाल्याचे वाचुन फार वाईट वाटले.
बाकी मी तिकीटाचे पहाते, तुम्ही गाडी सुरु करा.
खण्ण खण्ण खण्ण. चला सुट्टे पैसे काढा!!

संग्रहालयातील काही कपडे भारतीय कपड्यांशी साधर्म्य दाखवतात. जुन्या पद्ध्तीच्या घरांच्या लाकडी पायर्‍या फार मस्त!
टाईल्स तर आजच्या काळातही सुंदर दिसतील अशा आहेत (त्यावरून डोक्यात काहीतरी किडा वळवळू लागलाय). परत केलेल्या तलवारीच्या तळ्यातला लाल पूल आवडला, पाण्यातील प्रतिबिंबामुळे एकदम रोलर कोस्टर राईड असावी असे वाटले. दुकानंमध्ये असलेले पंखे आवडले. तसे भारतात कुठे मिळाले तर घेणार. दगडी कासवे आवडली नाहीत. पूर्वीही एकदा मातीचे सैन्य असलेला चीनी सफरीतला भाग दिला होतात त्याची आठवण झाली. एकंदरीतच रंगीबेरंगी सफर चालू आहे. आवडतीये.

जेपी's picture

22 Nov 2013 - 10:13 am | जेपी

सेकंड गिअर पडला तर , आंदे आंदे

त्रिवेणी's picture

22 Nov 2013 - 11:34 am | त्रिवेणी

वाचतीये.

सुधीर कांदळकर's picture

22 Nov 2013 - 11:35 am | सुधीर कांदळकर

सुंदरच.
पण एक प्रश्न विचारावासा वाततो. स्थळे पाहतांना सहल कंपनी मार्फतच का जाता? एकटेच गेलात तर प्रवास महाग होईल पण हॉटेल स्वस्त मिळेल. अर्थात काहीतरी कारण असेल आणि ते तुम्हाला ठाऊक असेल. नसेल तर त्या अनुषंगाने अंदाजित खर्चाची कृपया चौकशी करून ठेवा.

ब्रह्मदेश सुद्धा छान आहे असे समजते. इंफाळवरून रस्ता आहे. पण इंफाळवरून इंडोबर्मा रस्त्याने प्रवेश देणारा व्हिसा मिळतो की नाही माहीत नाही. मला सेव्हन सिस्टर्स करून इंफाळवरून ब्रह्मदेश, थायलंड, कंबोडिया, विएतनाम करून मलेशियामार्गे परत यायचे आहे. तसा आराखडा सध्या बनवतो आहे.

पुभाप्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Nov 2013 - 1:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपल्याला हवी ती आणि आपल्या मनासारखी ठिकाणे बघायची असली तर प्रत्येक सहल नवीन सहल असल्या सारखीच आयोजीत करावी लागते. मात्र गाठीला असलेला मागचा अनुभव नक्कीच पुढच्या आयोजनाला उपयोगी ठरतो.

माझा साधारण आराखडा असा असतो...

१. पहिल्यांदा अभ्यास करून सहलीच्या स्थानांवर आपल्याला नक्की काय बघायचे / करायचे आहे ते निश्चित करतो. त्यातल्या कोणत्या गोष्टी आवश्यक आणि कोणत्या गोष्टींच्या बाबतीत तडजोड होऊ शकेल ते ठरवतो.

२. माझी यादी जर एखाद्या सहल कंपनीच्या प्रकाशीत सहलीत बरोबर बसली आणि किंमतही बजेटमध्ये असली तर हुर्रे... सरळ त्या सहलीत सामील होऊन फक्त मजा करण्यावर लक्ष केंद्रित करतो. हल्ली आंतरजालामुळे हे तुलनेने फारच सोपे झाले आहे.

३. स्थळांबद्दल आणि तिथल्या प्रेक्षणीय जागांबद्दल मी जरा चोखंदळ आणि निवड केल्यावर बराचसा आग्रही असल्याने बर्‍याचदा वरचा पर्याय मला १००% मिळत नाही. मग मी माझ्या पर्यायाच्या जवळपास असणार्‍या कंपन्यांशी संवाद साधून मला हवे तसे बदल करून मिळतील काय ते पाहतो. थोडा खर्च वाढतो, पण तो योग्य वाटला तर तो समाधानकारक सहलीची किंमत म्हणून स्वीकारतो.

४. आंतरजालामुळे बहुतेक आजकाल सगळ्या पर्यटन स्थानांवरच्या सोयी (हॉटेल, स्थानिक फेरफटका, इ) आणि विमान / रेल्वे तिकिटे वगैरे स्वतःच राखून ठेवून अगदी पूर्णपणे स्वतः सहल आयोजीत करणे अशक्य नाही. मात्र यात सगळ्या गोष्टींची सांगड स्वतःलाच घालावी लागते आणि ती कसरत करताना सहलीची (विशेषतः मोठ्या सहलीची) मजा खराब होणार तर नाही ना याची खात्री आधीपासून केलेली बरी. कारण बहुतेक मोठ्या परदेशी सहली आपण आयुष्यात एकदाच करतो, त्यामुळे एकदा हुकलेली संधी सहसा परत मिळत नाही.

५. कसेही असले तरी नवख्या ठिकाणी खात्रीचा स्थानिक वाटाड्या (गाईड) ही एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. ह्याबाबतीत तडजोड नको.

६. स्वतः आयोजीत केलेल्या सहलीची तुलना पर्यटन कंपनीने केलेल्या सहलीशी करताना वरच्या ३ , ४ आणि ५ या मुद्द्यांत नोंदवलेल्या फायदा-तोट्यांचाही बेरीज-वजाबाकी अंतर्भूत करावी.

मोठ्या सहलीची योजना करत आहात म्हणजे मार्ग, वाहन, दिवस, स्थाने, प्रत्येक स्थानावरची प्रेक्षणीय स्थळे आणि त्यासाठी लागणारे वेळेचे आणि आर्थिक कोष्टक तुम्ही बनवले असेलच. त्यात मध्ये मध्ये राखीव दिवस (बफर आणि विश्रांतीचे) आणि तातडीक अर्थयोजना असेलच.

तुमच्या यशस्वी सहलीसाठी अनेकानेक शुभेच्छा !

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Nov 2013 - 1:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

पण इंफाळवरून इंडोबर्मा रस्त्याने प्रवेश देणारा व्हिसा मिळतो की नाही माहीत नाही.
यावरून नंतर सुचले म्हणून थोडे अधिक...

जर रस्त्याने देशांच्या सीमा ओलांडणार असाल तर दर देशाच्या वकिलातीतच किंवा किमान वकिलातीच्या जाल-संकेतस्थानावर नीट खात्री करूनच मग निर्णय घ्या. कारण...

१. काही देशात परदेशी नागरीकांना फक्त आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवेशाची परवानगी असते.

२. जरी जमिनी वरून प्रवेशाची परवानगी असली तरी ती सीमेवरच्या फक्त काही ठिकाणांवरच असते. (याचे मुख्य कारण असे की दर ठाण्यावर कस्टम्स ऑफिसर्स ठेवण्यासाठी होणारा खर्च.)

३. काही शेजारी देशांचे संबंध तितकेसे मैत्रीपूर्ण नसतात (उदा. सद्यास्तितीत थायलंड आणि कंबोडिया) त्यामुळे त्यांच्या सीमा ओलांडताना काही त्रास होईल की नाही याची पूर्ण खात्री करून निर्णय घ्या. आंतरराष्ट्रीय विमानतळावर याबाबतीत काही फरक पडत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Nov 2013 - 1:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

पण इंफाळवरून इंडोबर्मा रस्त्याने प्रवेश देणारा व्हिसा मिळतो की नाही माहीत नाही.
यावरून नंतर सुचले म्हणून थोडे अधिक...

जर रस्त्याने देशांच्या सीमा ओलांडणार असाल तर दर देशाच्या वकिलातीतच किंवा किमान वकिलातीच्या जाल-संकेतस्थानावर नीट खात्री करूनच मग निर्णय घ्या. कारण...

१. काही देशात परदेशी नागरीकांना फक्त आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवेशाची परवानगी असते.

२. जरी जमिनी वरून प्रवेशाची परवानगी असली तरी ती सीमेवरच्या फक्त काही ठिकाणांवरच असते. (याचे मुख्य कारण असे की दर ठाण्यावर कस्टम्स ऑफिसर्स ठेवण्यासाठी होणारा खर्च.)

३. काही शेजारी देशांचे संबंध तितकेसे मैत्रीपूर्ण नसतात (उदा. सद्यस्थितीत थायलंड आणि कंबोडिया) त्यामुळे त्यांच्या सीमा ओलांडताना काही त्रास होईल की नाही याची पूर्ण खात्री करून निर्णय घ्या. आंतरराष्ट्रीय विमानतळावर याबाबतीत काही फरक पडत नाही.

परिंदा's picture

22 Nov 2013 - 11:40 am | परिंदा

३ नंबरच्या फोटोत चक्क पंजाब्यांच्या लग्नात दुल्हे राजा घालतो तो सेहरा दाखवला आहे. :)

प्रवास छान चालला आहे. :)

सौंदाळा's picture

22 Nov 2013 - 12:15 pm | सौंदाळा

नेहमीप्रमाणेच मस्त.
वाचतोय.
तुम्ही तिथल्या संस्क्रुतीत समरसुन जाता हे फार आवडते. (मला हे का जमत नाही?)

नानबा's picture

22 Nov 2013 - 12:24 pm | नानबा

भ.न्ना.ट.

df

अनिरुद्ध प's picture

22 Nov 2013 - 12:36 pm | अनिरुद्ध प

चालु आहे,प्रवासाचा शिणवटा मात्र शेवट पर्यन्त दाखवलेल्या उत्साहात गायब होता हे विशेष्,पु भा प्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Nov 2013 - 1:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

काही अनवट फिरायला, बघायला, अनुभवायला मिळलं की आमचा शिणवटा अचानक गायब होतो :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Nov 2013 - 1:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

मोदक, प्यारे१, aparna akshay, रेवती, तथास्तु, त्रिवेनि, परिंदा, सौंदाळा आणि नानबा: धन्यवाद ! सहलीत असाच सहभाग असू द्यावा.

मदनबाण's picture

24 Nov 2013 - 9:42 am | मदनबाण

मस्त... :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2013 - 11:01 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !