आली दिवाळी

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
30 Oct 2013 - 2:48 pm

माझे बालपण एका गावात बागडण्यात गेले. गावात तसे सगळेच सण पूर्वी उत्साहाचे वाटायचे. त्यात दिवाळी म्हणजे सगळ्यात मोठा सण इतका मोठा की पूर्वी दिवाळीच्या स्वागताला प्रत्येक घर जवळजवळ महिनाभर आधी पासून तरी सज्ज असायचं. त्यातून गावातील घरांच्या दिवाळीसाठी शहराच्या तुलनेने जास्तच तयारी असायची. घराची रंगरंगोटी डागडूगी करून रंगरंगोटी करायची. घरासमोर अंगण असायचं. ते अंगण कुदळीने उखळायचे. पाणी शिंपडून चोपणीने चोपायचे. येणारे बारीक-सारीक दगडही काढून टाकायचे. अंगणाची पातळी एकसमान करावी लागत असे. चोपायचा कार्यक्रम दोन-तीन दिवस तरी चालायचा.

अंगणातच रांगोळी काढण्यासाठी ओटीच्या पायर्‍यांच्या समोर खास रांगोळी काढण्यासाठी अंगणापासून थोड्या उंचीवर ओटा तयार करावा लागत असे. त्यासाठी अंगणाची पातळी तयार झाल्यावर ओट्यापुरती जास्त माती आणून ओटा चोपला जाई. त्यानंतर अजून पाणी मारून अंगण व ओटा दोन्ही गुळगुळीत करून घ्यावे लागायचे. हे गुळगुळीत केलेले अंगण-ओटा सुकला की त्याला शेणाने सारवले जायचे. हे सर्व होताना आठवडा तरी जायचाच. शेण खराटा व हाताने दोन्ही प्रकारे सारवता यायचे. खराट्याची किंवा हाताने शेण सारवल्याची सुंदर नक्षी अंगणात उमटत असे. मग अंगण अगदी सुंदर, स्वच्छ नवे कोरे वाटायचे. माझे वडील मुंबईत प्रीमियर कंपनीत नाइट शिफ्ट करायचे. नाइट शिफ्ट वरून येऊन ते घरातील दिवाळीच्या तयारीला उत्साहाने भाग घ्यायचे.

पूर्वी तांब्या-पितळेची भांडी असायची. ह्या भांड्यांना कल्हई लावून घ्यावी लागायची, तेव्हा कल्हईवाले दर आठवड्याला दारावर ओरडत यायचे. कल्हाईईईईईई अशी त्यांची हाकही तितकीच लयदार असायची.

स्टोव्ह दुरुस्तीवालाही दारावर येत असे. त्याची इस्टो रिपेर अशी हाक ऐकू आली की त्याला बोलवून आणायची घाई व्हायची. स्टोव्ह व्यवस्थित ८-१० दिवस चाललाय मी असे पाहिलेच नव्हते रोज त्या स्टोव्ह ला पिन मारावी लागायची ती मारलेली नसेल तर स्टोव्हची फ्लेम हमखास डिस्को डान्स करायची. कधी उजव्या बाजूला कधी डाव्या बाजूला धाव घ्यायची. स्टोव्ह दुरुस्तीवाला स्टोव्ह खोलून तो दुरुस्त करून द्यायचा. नवीन वायसर वगैरे टाकायचा मग मात्र स्टोव्ह काही दिवसांसाठी मस्त भकाभक चालत असे.

माझी आई प्रार्थमिक शाळेत शिक्षिका होती तर . आईला दिवाळीची सुट्टी पडलेली असायची. स्वयंपाक खोलीतील भांडी घासण्याचा एक दिवस कार्यक्रम असे. अगदी पितळी टाक्या, तांब्याचे-पितळेचे हंडे, कळश्या, पातेली, तांबे, डबे, समई, व इतर बाकीची भांडी आधी चिंचेने मग राखेने घासून लख्ख केली जात मग ती वाळवून, पुसून पुन्हा ऐटीत जागच्या जागी सोन्याप्रमाणे चमकायची. स्टोव्हही पितळेचा असल्याने तोही चिंचेने घासावा लागायचा. घडवंचीवरील भांडी तर त्यांच्या रचण्यामुळे फारच सुबक दिसायची. स्टीलची भांडी चिंच लावावी लागत नसल्याने पटकन घासली जायची त्यात डझनभर ग्लास, तांब्या, पेले, चमचे, ताट, वाट्या असायच्या. त्यात कडीवाले उभे डबेही असायचे. शिवाय दिवाळीचा फराळ ठेवण्यासाठी मोठ मोठे डबे असायचे ते वेगळेच.

एखाद्या सुट्टीच्या रविवारी आई-वडील सामान भरायचे. महिन्याच्या किराण्यासोबत दिवाळी स्पेशल खरेदीही असायची. त्यात दिवाळीच्या पदार्थांचे सामान, उटणे, रांगोळी, पणत्या, साबण असायचा. साबण मोतीचा असायचा. फार सुगंधी असायचा आधी तो. हे सगळं सामान घरी आण्यल्यावर काढून बघायला मला खूप गंमत वाटायची. मग आई रांगोळी, रंग डब्यांमध्ये भरून ठेवायची. दिवाळीचे सामान वेगळे ठेवून रोजचे सामान जागच्या जागी ठेवले जायचे.

एका बाजूला दिवाळीच्या फराळाची तयारीही चालू असायची. डाळी, पोहे, साखर वाळवायची. आमच्या घरी जाते होते. आजी, आई त्यावर पीठ, साखर सगळी दिवाळीला लागणारी दळणे दळत असत. इतर जिन्नसे निवडून ठेवली जात. अनारशाचे पीठ करण्यासाठी तांदूळ २-३ भिजवून ते दळले जायचे. मग अनारशाचे मिश्रण तयार करून ठेवले जायचे.

भाऊ कंदील बनवण्यासाठी सज्ज असायचा. कंदील बनवण्यासाठी वेगवेगळे रंगीत कागद त्याला वडील आणून देत असत. त्यात जिलेटीन पेपर पण असायचा हे मला आठवत. त्यावेळी ते पेपर पाहायला, हाताळायला फारच आनंददायी वाटायचे. दिवाळी पर्यंत जेव्हा भाऊ कंदील करायचा तेव्हा फारच गंमत वाटायची. मला छोटे छोटे कंदील फार आवडायचे. मी पण फुकट गेलेले कागद खेळायला घेऊन कंदील करायचे प्रयत्न करायचे पण खेळात इकडे तिकडे टाकल्याने पुन्हा त्याचा चुरगळा व्हायचा. त्यात काही चकचकणारे कागदही असायचे. मग ते कागद मी बारीक बारीक कैचीने कापायचे, तसेच पूर्वी गजर्‍यांना पेचक लावलेल्या असायच्या मग अशा आईच्या वापरून झालेल्या गजर्‍यांची पेचक काढून ती पण अगदी बारीक कापून सगळे डबीत भरून ठेवायचे. ह्याचा उपयोग रांगोळीवर चकाकी म्हणून टाकण्यासाठी व्हायचा.

दिवाळी सण म्हणजे नवीन कपडे आलेच. मग आई-वडील बाजारातून मला फ्रॉक साठी, भावाला, वडिलांना शर्ट पँट साठी कापड आणायचे. आईला नवीन साडी आणली जायची. आजीसाठी जरीकाठाची खास नऊवारी साडी असायची. तशी आजी नेहमीच काठाचीच साडी नेसायची. प्रिन्टेड साडी तिला जमायची नसे. शिवाय भाऊबीजेसाठी सगळ्यांच्या भावा-बहिणींसाठी कपड्यांची किंवा भांड्यांची खरेदी असे. माझ्या चुलत भावांसाठी कधी नॅपकीन, छोटे टॉवेल, बनियन, रुमाल, डबे, वाडगे अशा वस्तू असायच्या. आईचे भाऊ मोठे असल्याने त्यांना कधी शर्ट पीस, पॅंट पीस, मोठी भांडी, बेडशीट, उशांची कव्हरे, मोठे टॉवेल अशा वस्तू आणल्या जायच्या. भावाला इतर चुलत बहिणींना देण्यासाठी वाडगे, तांब्या, डबा अशा वस्तू असायच्या तर कधी कधी भाऊ त्यांना आरतीत पैसेच टाकायचा. त्यावेळी आरतीत २ रु. टाकले जायचे हे मला आठवते. वडिलांच्या बहिणींसाठी साड्या असायच्या. ह्या कपड्याची खरेदी एकाच दुकानात केली जायची. ह्या खरेदीसाठी मी नेहमी आई-वडिलांच्या सोबत असायचे. त्या रंगीबेरंगी, मऊ-मऊ साड्या पाहून त्यांना हाताळताना मला मखमली स्पर्शाचा अनुभव येत असे.

दिवाळीत टेलरकडे कपड्यांचा ढीग पडलेला असायचा. १ महिना आधी पासूनच हा ढीग रचायला सुरुवात झालेली असायची. त्यामुळे कापड घेतल्या घेतल्या लगेच टेलरकडे धाव मारावी लागायची तेव्हा टेलर दिवाळीच्या १-२ दिवस आधी कपडे शिवून द्यायचा. शिवलेले कोरे कोरे कपडे घरी येऊन शिस्तीत कपाटात विराजमान व्हायचे.

मी जरा मोठी झाल्यावर कधी कधी घराबाजूच्या खडीमध्ये सापडणारे शिंपले, सागरगोटे घेऊन ते खलबत्त्यात बारीक कुटायचे आणि ते चहाच्या गाळणीत किंवा पीठ चाळायच्या चाळणीत गाळून त्याची रांगोळी बनवायचे. रांगोळी काढण्यासाठी लागणारा ठिपक्यांचा कागदही पूवी घरी बनवला जायचा. एका वर्तमान पत्रावर उभ्या आडवा समांतर रेषा मारून उजळणीला लागणार्‍या रकान्यांप्रमाणे रकाने करायचे व प्रत्येक रकान्याच्या कोपर्‍यावर धूर येणारी अगरबत्तीने भोके पाडायची. मध्येच ही भोके जास्तवेळ जळल्याने मोठी व्हायची.

मुलांना दिवाळीची सुट्टी पडलेली असायची. तेव्हा मुले घरासमोर मातीचा किल्ला बनवून त्यावर मातीचे मावळे उभे करून त्याच्या भोवती मेथी पेरायचे. ही मेथी आठ दिवसात दिवाळी पर्यंत उगवून किल्ल्याचा परिसर हिरवागार, लॉन लावल्यासारखा दिसायचा.

दिवाळीला ८-१० दिवस बाकी असले की गावात सगळ्यांच्या घरातून तिखट-गोड फराळाचा वास सुटायचा. वासाने कधी एकदा आपल्या घरातील पदार्थ खाते असे व्हायचे. पूर्वी गावातील सर्व ओळखीच्या घरांमध्ये, नातेवाइकांमध्ये आपले स्नेहभाव प्रकट करण्यासाठी घरात बनलेल्या फराळाच्या पुड्या आपापसात वाटल्या जायच्या. आमच्या घरात ३ किलोचे २-३ प्रकारचे लाडू, ५ किलोचा चिवडा, ५ किलोच्या चकल्या, करंज्या अश्या मोठ्या प्रमाणात आई फराळ करायची. करंज्या लाटण्यासाठी आजू-बाजूच्या मुली-बायका मदत म्हणून हौसेने यायच्या. तेव्हा प्रत्येकाकडे मदतीला जाण्याची मुलींची पाळीही ठरलेली असायची.

फराळ करताना मला मध्ये लुडबुडायला मजा वाटायची. आमच्या इथे लाकडी दोन हँडलने दाबायचा चकलीचा साचा होता. त्या साच्यातून चकली पाडताना मला ब्रह्मांड आठवे. खूप मेहनत लावून माझ्याने त्यातून एखादी चकली पडायची. हातही दुखून यायचे. नंतर मी मोठी होईपर्यंत म्हणजे चकली पाडता यायला लागेपर्यंत आईने पितळी गोल दांडा फिरवायचा साचा घेतला. करंज्यांच्या लाटलेल्या पारीत सारण भरणे मग ती कातणी ने कापणे ही कामे मला आवडायची.

दिवाळीच्या म्हणजे वसुबारसेच्या दिवसापर्यंत फराळ तयार असायचा. माझी रांगोळ्या काढण्याची हौस ह्या दिवसापासून चालू व्हायची. मी अगदीच लहान होते तेव्हा आईच रांगोळी काढायची. मला त्याचे आकर्षण असायचे म्हणून मी रांगोळीचा डबा घेऊन अंगणभर रेषा, ठिपके मारायचे. ह्याच दिवशी कंदील दीपावलीचे स्वागत करण्यासाठी दारासमोर झगमगत असे. कंदिलाचा रंगसंगतीतील ओटी-अंगणात पसरणारा प्रकाश हे खास आकर्षण असे. त्यातून भावाने स्वतः बनवलेला कंदील म्हणून त्याचे अजून कौतुकही असे.

धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी आई रांगोळी काढून पाट मांडायची आणि त्यावर घरातील दागिने, जुनी नाणी, चंदीच्या वस्तू एका ताटात घेऊन त्यावर हळद-कुंकू, फुले वाहून, दिवा ओवाळून धनाची पूजा करायची. ते सजवलेलं ताट फार देखणं दिसायचं. धणे आणि गुळाचा प्रसाद सगळ्यांना वाटला जायचा.

त्यानंतर यायची पहिली अंघोळ/नरक चतुर्दशी. हा दीपावलीचा सगळ्यात मोठा, खास दिवस. ह्या दिवशी पहाटे ४-५लाच आई स्वतः उठून सगळ्यांना उठवायची. भाऊ उठला की तो फटाके वाजवायचा त्या आवाजानेच मला जाग यायची. मग आजी-आई सगळ्यांना उटणे, लावून त्यांची अंघोळ व्हायची. तेव्हाच्या उटण्यालाही एक अनोखा सुगंध होता. उटणे लावताना प्रत्येकाच्या समोर फुलबाज्या लावून दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी ह्या ओळी आनंदात गायल्या जायच्या. प्रत्येक व्यक्ती जेव्हा अंघोळ करून बाहेर यायची त्यासाठी एक चिरांटू/चिरांटे फळ ठेवलेले असायचे. आमच्या घराच्या आसपास ह्या फळांच्या वेली असायच्या. त्या आदल्या दिवशीच शोधून त्यावरची फळे आणून ठेवली जायची. ही फळे पायाच्या अंगठ्याने दाबून फोडली जायची. आजी सांगायची की ही फोडली म्हणजे आपण नरकासूराचा वध केला. मला ती चिरांटू फोडायला खूप गंमत वाटायची. मी खूप शूर आहे असे वाटायचे ती फोडताना. मग एका ऐवजी दोन-तीन चिरांटी पायाने जोरात फोडून टाकायचे.

अंघोळी झाल्या की नवे कोरे कपडे घालायचे. मग आई आमची आरती करायची. देवाला फराळाचे नैवेद्य दाखवायची. नैवेद्यात चकली, चिवडा, २-३ प्रकारचे लाडू, अनारसा, करंजी, शेव, शंकरपाळी असे पदार्थ असायचे. ह्या पदार्थांचा आम्ही घरातील सगळी मंडळी एकत्र बसून फराळ करायचो. मला ठिपक्यांची रांगोळी काढता यायला लागल्या पासून मी रांगोळी काढू लागले. रंगांचा तो विशिष्ट वास, चुकलेली रांगोळी दुरुस्त करणे, तासन तास त्या रांगोळीसाठी बसण्यात काही वेगळाच आनंद होता.

९-१० च्या सुमारास पाहुण्यांची, फराळ वाटणार्‍या व्यक्तींची वर्दळ चालू व्हायची. मग प्रत्येकाला आई फराळाची डिश भरून देत असे. मला गावामध्ये फराळ वाटण्याची ड्यूटी असे. एका मोठ्या पिशवीत फराळाच्या पुड्या घेऊन मी सगळ्या घरांमध्ये वाटून येत असे. मग प्रत्येक घरात काही ना काही पदार्थाची चव घ्यावी लागायची. संध्याकाळ झाली की दिवे लागणीची, अमावस्येच्या काळोख्या रात्रींना पणत्यांच्या तारकांनी धरतीवर लखलखाट करण्याची. मातीच्या पणत्या आईने सकाळीच पाण्यातून काढून सुकवलेल्या असायच्या. त्या पणत्या पेटवल्या जायच्या मग ओटीवर दाराच्या दोन खिडक्यांच्या बाजूला, माळ्यावरच्या कठड्यावर, रांगोळीच्या मधोमध, तुळशीभोवती, देवळावर, (आमच्या अंगणासमोर शंकराचे छोटेसे मंदिर आहे) पडवीत आम्ही पणत्या लावायचो. पणत्या लावल्या की सगळे अंगणात पणत्यांची रोषणाई पाहण्यासाठी जमायचो. तो दिपोस्तव पाहतच राहावा असे वाटायचे. मध्येच वारा यायचा एखादी पणती विझायची मग परत ती लावायची. थोड्याच वेळात भावाच्या फटाक्यांचा कार्यक्रम चालू व्हायचा. अगदी लहान होते तेव्हा मला फटाक्यांची खूप भिती वाटायची. मग मी घराबाहेर पडायचेच नाही. फटाक्यांचा आवाज संपे पर्यंत घरातच बसून राहायचे. थोडी मोठी झाल्यावर बंदूकीच्या गोळ्या मिळायच्या त्या हातोड्याने किंवा दगडाने फोडायचे. नंतर रोल मिळू लागला तोही तसाच फोडून फट फट आवाज काढायला मजा यायची.

दूसरा दिवस लक्ष्मी पूजनाचा. लक्ष्मीपूजनाची संध्याकाळी लगबग चालू व्हायची. लक्ष्मीपूजनासाठी आई पुन्हा देवघरात पाटा खाली रांगोळी काढून त्यावर ताट ठेवून ताटात घरातील पैसे, जुनी नाणी वगैरेची पूजा करायची.

पाडव्याच्या/बलिप्रतिपदेच्या दिवशीही ४-५ वाजताच उठून आई घरातील केर काढायची, तो केर एका पुठ्ठ्यावर भरायचा, एक जुनी केरसुणी आधीच आईने जपून ठेवलेली असायची. त्या केरावर ती जुनी केरसुणी ठेवून त्यावर दिवा लावून वडील तो केर बाहेर घेऊन जायचे व एका कोपर्‍यावर ठेवायचे. केर नेत असताना आम्ही ताटाचा लाटण्याने टण-टण आवाज करायचो. पाढव्याच्या दिवशी झेंडू, आपटा व भाताच्या कणश्या मिळून केलेले तोरण दाराला बांधले जायचे. प्रत्येक घराच्या समोर पाच शेणाचे गोळे व त्यावर झेंडूचे फुल टोचून त्या गोळ्यांची पूजा केली जायची. आई वडीलांना औक्षण करायची. मग ते एकमेकांना भेटवस्तू द्यायचे. दुपारी ते गोळे सगळ्यांच्या भिंतीवर चिकटलेले दिसायचे. दुपारी घरी श्रीखंड पुरीचा बेत ठरलेलाच. श्रीखंडासाठी चक्काही दही फडक्यात बांधून टांगून घरीच केलेला असायचा. ह्या चक्क्यात भरपूर साखर घालून पुरण यंत्रातून काढून त्यात चारोळ्या, वेलची घालून श्रीखंड केले जायचे. आठवण झाली की तो चक्का मिश्रित साखरेचा खरखरीतपणा अजून हाताला स्पर्शून जातो.

शेवटचा दिवस भाऊबीजेचा. ह्या दिवशीही मामा, माझे चुलत भाऊ घरी यायचे. ह्या दिवशीही जेवणाचा खास बेत असायचा. औक्षण करून सगळ्यांची भाऊबीज व्हायची. कोणी कोणी काय काय भाऊबीज भेट आणली हे जाणून घ्यायला मी उस्तुक असायचे. शेवटचा दिवस असल्याने भाऊ थोडे फटाके तुळशीच्या लग्नासाठी व मध्ये मध्ये वाजवायसाठी ठेवून बाकीचे सगळे उडवून टाकायचा. मी थोडी मोठी झाल्यावर फुलबाजे, पाऊस, चक्र, नागाच्या गोळ्या, माचीस, रॉकेट असे फटाके उडवू लागले. मी फुलबाजे पेटवून त्यांची तार तोडी वाकवून ते मोठ्या झाडांच्या फांदीवर फेकून लटकवायचे. अशी झाडावरची फुलबाज्यांची लाइटिंग पाहायला मला फार आवडायचे. फटाके उडवले की सगळीकडे धूर, फटाक्यांचा वास दरवळायचा.

भाऊ मोठा झाला तसा त्याचा फटाके उडवण्याचा छंद कमी झाला मग फार थोडे फटाके आमच्या घरी असायचे. फक्त माझ्यापुरतेच हलके फुलके. काही वर्षात भावाचे लग्न झाले आणि मला वहिनी आली. वहिनीनेही घरातील सगळेच सोपस्कार अंगिकारले व आईचा भार कमी झाला, मला सोबत मिळाली. आम्ही दोघी मिळून रांगोळी काढू लागलो. तिला रंगसंगती चांगली जमायची त्यामुळे रांगोळी अजून देखणी दिसू लागली. सगळ्याच गोष्टीत ती उत्साहाने भाग घ्यायची. काही वर्षातच भावाच्या दोन मुली समिधा आणि विदीता ह्यांनी घरातील माझे लहानपण भरून काढले.

दिवाळी झाली तरी दिवाळी संपली असे वाटायचे नाही कारण तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळीचेच वातावरण असायचे. दारासमोर रांगोळ्या असायच्या, आकाश कंदील पेटलेलाच असायचा, पूर्णं ओटीभर नसल्या तरी रोज रात्री दोन पणत्या बाहेर पेटलेल्या असायच्या. रात्री कमी प्रमाणात पण फटाक्यांच्या इथे-तिथे तुटक आवाज येत असायचा. सुट्या असल्याने पाहुण्यांची वर्दळही चालूच असायची. माझे काका-आत्या सगळे मुंबईत असल्याने ते ह्या सुट्टीत मुलांना आजोळी घेऊन यायचे. आई-आजी मग सगळ्यांचा पाहुणचार करण्यात गुंतून जायच्या. त्यांचा मुक्काम शाळा चालू होईपर्यंत असायचा. मग घरात हा गडबड गोंधळ, पळापळ, धडपड. आम्ही मुले रोज भातुकली, झाडावर चढणे खेळायचो. काका मला आणि भावाला फटाके आणायचे ते ह्या दिवसात उडवायचे.

थोड्याच दिवसांत तुळशीच्या लग्नसराईची लगबग असायची. तुळशीच्या लग्नाचा एखादा दिवस ठरला की देऊळ व तुळस रंगवली जायची. तुळशी भोवती रांगोळी काढली जायची. लग्नात तुळशीसमोर ठेवण्यासाठी चिंचा, आवळे आम्ही झाडावरून तोडून आणायचो व तोडताना त्याचा आस्वादही घ्यायचो. वडील ऊस तोडून आणायचे व तुळशीत रोवायचे. मग अंतरपाट धरून कृष्ण तुळशीसमोर ठेवून एखादा छोटा मुलगा तुळशीसाठी लग्नाला तयार करून मंगलाष्टके म्हणायची. आम्ही बच्चे कंपनी तांदूळ हातात घेऊन सावधान म्हटल्यावर कोणाला तरी टार्गेट करून त्यांच्या अंगावर तांदूळ उडवायचो. मग मोठ्या माणसांचा ओरडा मिळायचा.

अशा प्रकारे दिवाळीचा सहवास १ ते दीड महिना सहज असायचा. रंग, सुगंध, रोषणाई, आतिषबाजी, खमंग आस्वाद, परस्परांतील स्नेहभाव ह्याचा मिलाप म्हणजे दिवाळी. जसं जशी वर्षे सरू लागली तसं तसे परिस्थिती नुसार दिवाळीच्या ह्या धांदलीचे स्वरूप बदलू लागले. तांब्या-पितळेची भांडी आईने मोडीत काढली. स्टोव्ह च्या जागी गॅस आला. दिवाळीत घर सजत त्यापेक्षा जास्त पटीने बाजारपेठेतील दुकाने सजू लागली. कंदील, रंगीत पणत्या, रांगोळ्या , रांगोळ्यांच्या रंगांचे ठिग, ठिपक्यांचे कागद, रांगोळीची, पुस्तके, फटाके ह्यांची जत्राच लागू लागली. जाते नामशेष झाली आणि गिरणीने दळण्याचे कष्ट वाचवले.

वर्षभर दिवाळीसारखे पदार्थ बाजारात मिळू लागले त्यामुळे दिवाळीत बनणार्‍या फराळाचे कोणाला अप्रूप राहिले नाही. नवीन वाढणार्‍या पिढीमध्ये देवाण घेवाणीची प्रथा कमी झाली. बाजारात फराळाची दुकाने जागोजागी लागू लागली पण कुठलाही फराळ आईने किंवा वहिनीने कधीच विकत आणून घरात ठेवला नाही. फराळ हा घरातीलच असे. कारण घरी केलेल्या पदार्थांमध्ये जो जीव ओतलेला असतो, जिव्हाळा ओथंबलेला असतो तो बाहेरच्या फराळांमध्ये मिळत नाही. पण फराळाचा नाश होऊ नये म्हणून आई आणि वहिनी मर्यादित फराळ करू लागल्या. विविध रंगी, डिझाइन्सचे आकाशकंदील बाजारात मिळू लागले. भाऊ कंपनीत नोकरीला लागला त्यामुळे अपुर्‍या वेळेमुळे आकाशकंदील बाजारातला येऊ लागला. अंगणात कोबा बसल्याने अंगण उखळून, चोपून सारवण्याचा त्रासही गेला. दिवाळीच्या तयारीसाठी करावे लागणारे कष्ट कमी झाले पण दिवाळीतील उटणे, चिरांटी, रांगोळ्या, दीपोत्सव, पारंपरिक पूजा ह्या तितक्याचे उत्साहात आणि आनंदात साजर्‍या होतात.

पुढे माझे लग्न झाले. घरात नवरा, सासूबाई, सासरे, दीर, जाऊबाई, पुतण्या, नणंदा सगळ्याच हौशी त्यामुळे दिवाळी म्हणजे मोठा जल्लोष वाटू लागला. १ वर्षे जुन्या घरात राहिलो तेव्हा पूर्वीचे सारवलेले अंगण, सासूबाईंची पितळी भांडी ह्याचा पुन्हा एकदा अनुभव घेतला. १ वर्षा नंतर नवीन घरात गेलो. अंगणात लादी असली तरी लादीवर गेरू सारवून आम्ही रांगोळीला बसायला लागलो. हल्ली कमी वेळ लागणारी आणि सुबक दिसणारी संस्कारभारती रांगोळी प्रचलित झाली आहे. पण आम्ही मधून मधून ठिपक्यांची रांगोळीही काढतो. नणंदेचे लग्न होण्यापूर्वी जाऊबाई, नणंदा आणि मी अशा मिळून एकच रांगोळी काढायचो. आता माझ्या मुली जोडीला आहेत. एक छोटी राधा लुडबुडायला तर मोठी श्रावणी मदतनीस म्हणून हौशी कलाकार.

माझा पुतण्या अभिषेक मोठा झाल्यापासून कंदील बनवतो. तितक्याच हौशीने बाजारातूनही आणायला सांगतो. मग आम्ही एक घरात वरच्या मजल्यावर एक आणि एक समोर असे दोन कंदील लावतो. अंगणात एका कोपर्‍यात किल्ला बनवला जातो. ओटीवर, अंगणात पणत्या लावून आम्ही सगळेच त्याचा अंगणात जाऊन आनंद घेतो.

सासरी आल्यावर सासूबाईंचा फराळातील बोरे हा प्रकार समजला व आम्ही तो शिकून घेतला. आता फराळाची सगळी जबाबदारी आम्हा दोन सुनांवर असते. बाजारात हल्ली फराळाचे सगळे पदार्थ ठिकठिकाणी मिळतात. पण दरवर्षी आमच्याइथे नोकर्‍या, जबाबदार्‍या सांभाळून पण आम्ही साग्रसंगित सगळे फराळ करतो, नातेवाइकामध्येही वाटतो.

तांब्या-पितळेची भांडी आम्ही जुन्या घरीच ठेवली पण सासूबाईनी तांब्याचा बंब, घंगाळ आणि लोखंडी खलबत्ता मात्र आवर्जून आणला. दिवाळीत ही भांडी चमकवली जातात. बंबात पाणी तापवून घंगाळात सगळ्यांची उटणे लावून अंघोळ केली जाते. लोखंडी खलबत्त्यात गवळाकाचरी, खोबरे कुटून ते केसांना लावण्यासाठी रात्री भिजवून ठेवले जाते. दिवाळीच्या सगळ्या दिवसातील पूजा-अर्चा आम्ही लहानथोर मनापासून एकत्रीत करतो. मुलांचे नवऱ्याचे औक्षण करतो. चांगले ते घ्यावे, झेपेल ते करावे आणि अनावश्यक ते टाळावे ह्या तत्त्वाने घरातील काही जुन्या परंपरा आम्ही हौसेने अंगिकारल्या आहेत.

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

शिद's picture

30 Oct 2013 - 3:07 pm | शिद

मस्तच ताई… एकदम लहानपणात घेऊन गेला तुमचा लेख…
दिवाळीच्या हार्दिक आणि मन:पुर्वक शुभेच्छा…

प्रभाकर पेठकर's picture

30 Oct 2013 - 4:28 pm | प्रभाकर पेठकर

माझे एका गावात बागडण्यात गेले.

शब्दशः 'सरले' बालपण.

लेख मस्तं आहे. पण फक्त गावाकडेच नाही तर, मुंबईतही आम्ही हेच वातावरण उपभोगलं आहे. असो.

रम्य ते बालपण आणि रम्य ती बालदिवाळी.

अनिरुद्ध प's picture

30 Oct 2013 - 5:49 pm | अनिरुद्ध प

वर्णन्,जन्मच मुम्बै सारख्या शहरात झाल्याने आम्ही अशा गावातील गोष्टींचा आनंद अशा कथालेखातुनच अनुभवतो हे ही नसे थोडके.

मुक्त विहारि's picture

30 Oct 2013 - 5:57 pm | मुक्त विहारि

बालपणीचा काळ सूखाचा

चिप्लुन्कर's picture

30 Oct 2013 - 6:07 pm | चिप्लुन्कर

मस्त ,

थोड्या फार फरकाने मी पण हेच अनुभवले आहे . आता लेख वाचला आणि पटकन गावच्या आठवणीनि डोळ्याच्या कडा पाणावल्या .
खूप आभारी आहे जुन्या दिवाळीची आठवण करून दिल्याबद्दल .

रेवती's picture

30 Oct 2013 - 9:48 pm | रेवती

छान लिहिलेस जागु.

बहुगुणी's picture

31 Oct 2013 - 3:33 am | बहुगुणी

लहानपणापासूनच्या आठवणींची दिवाळी परत एकदा अनुभवली. धन्यवाद!

फक्त तो 'दिवाळीचा गृहपाठ' नामक प्रकार नव्हता का? आम्हाला दरवर्षी सुटी लागल्यावर लगेचच त्या शंभर-एक पानी गृहपाठाचा सुरूवातीलाच फडशा पाडायची खुमखुमी असायची, आणि न चुकता, फराळ, फटाके, नातेवाई़क आणि भावंडांच्या भाऊगर्दीत तो अभ्यास बाजूलाच राहून जायचा; मग सुटी संपत आली की अखेरच्या आठवडयात जीव तोडून, पाठ-मान एक करून एक-एक विषय संपवायचा!

ब्रिज's picture

31 Oct 2013 - 9:33 am | ब्रिज

आता मस्त फराळ-गप्पा रंगणार !

पैसा's picture

31 Oct 2013 - 10:06 am | पैसा

खूप छान लिहिलं आहे.

भाते's picture

31 Oct 2013 - 5:09 pm | भाते

जागुताई, किती छान लिहिता हो तुम्ही. हे वाचल्यावर डोळ्यात टचकन पाणी आल.

सुरेख लेख.

किसन शिंदे's picture

31 Oct 2013 - 6:13 pm | किसन शिंदे

अप्रतिम!! अगदीच अशी नाही पण थोडीफार यासारखीच दिवाळी मी चाळीतल्या घरात अनूभवली आहे लहानपणी!

विजयराजे's picture

31 Oct 2013 - 6:27 pm | विजयराजे

हा अनुभव आम्हीसुद्या घेतला आहे

अत्रुप्त आत्मा's picture

31 Oct 2013 - 7:31 pm | अत्रुप्त आत्मा

मस्स्स्त!

अत्रुप्त आत्मा's picture

31 Oct 2013 - 8:04 pm | अत्रुप्त आत्मा

calling संपादक! प्लीज वरच्या प्रतिसादातली स्मायली काढुन टाका. चुकुन पडली आहे.

प्यारे१'s picture

1 Nov 2013 - 2:37 am | प्यारे१

खूपच छान लेख!

गावची दिवाळी आठवली. सकाळी सकाळी अभ्यंग नि छान कढत पाण्याने घातली गेलेली आंघोळ, औक्षण, देवदर्शन नि थोडेसे फटाके, त्या नंतरचा फराळ मग इकडे तिकडे बागडणे, नवीन कपडे दुपारी थोडं फराळातलं नि बरोबर जेवण, क्रिकेट, मग संध्याकाळी बहिणींबरोबर शेणसड्याला मदत, सुपारी घेऊन तिच्यावर रांगोळी सोडून लिहीलेलं 'शुभ दीपावली', पुन्हा फटाके, फुलबाज्या, पाऊस, भुईनळ्या.... आहाहा!
२२-२४ म्हणजे बरीच वर्षं झाली की.... आम्ही म्हातारे झालो बहुधा! :(

विशाखा राऊत's picture

1 Nov 2013 - 4:24 pm | विशाखा राऊत

ताई घरची आठवण आली

निवेदिता-ताई's picture

4 Nov 2013 - 9:14 pm | निवेदिता-ताई

मस्तच ताई…
दिवाळीच्या हार्दिक आणि मन:पुर्वक शुभेच्छा…

जागु's picture

18 Oct 2014 - 12:40 pm | जागु

हा लेख शॉर्ट मध्ये लोकसत्ताच्या वास्तुरंग पुरवणी मध्ये प्रकाशित झाला आहे.

विवेकपटाईत's picture

18 Oct 2014 - 8:16 pm | विवेकपटाईत

मस्त ताई बालपण आठवले. तसे आज ही सौ. चकलीची भाजणी (चक्क ३-४ किलोची केलेली आहे), चिवडा, लाडू, अनरसेचे पीठ ही भिजवलेले आहे, बहुतेक उद्या चिवडा, चकली आणि शेव घरात करेल असे वाटते. बाकी करंज्या, अनरसे इत्यादी बहतेक सोमवार किंवा मंगळवारी करेल. रविवारी सुट्टी असल्या मुळे नाईलाजाने का होईना मला मदत करावी लागेल. चीन बने बनलेली स्वस्तात मिळणारी सजावटी विजेच्या दिव्यांची लडी आत्ताच मुलगा विकत घेऊन आला आहे. भाऊ बीजेचा कार्यक्रम यंदा माझ्या घरी आहे जवळपास ३०-४० (आम्ही 5 भाऊ बहिण, त्यांची मुले-सुना मामा, लेक जावई). वर्षांतून एकदा या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र जमतो. जो पर्यंत आई आहे तो पर्यंत तरी हे सुरु राहणार. अजूनही सर्वाना आईची भीती वाटतेच (आम्ही सर्वांनी पन्नासी-साठी गाठली तरी ही), नवीन पिढीने ही प्रथा सुरु ठेवावी ही अपेक्षा करू शकतो. सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा

प्रमोद देर्देकर's picture

20 Oct 2014 - 5:23 pm | प्रमोद देर्देकर

खुप छान लेख जागुतै. माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
६ वी पर्यंत चाळीत होतो तेव्हा सगळी मजा अनुभवली. तेव्हा एक भेंडीचे झाड होते त्यावर अशाच पेटलेल्या फुलबाज्या फेकायचो ती कुठल्यातरी फांदीवर अडकुन बसायची, मग किल्ले, फटाके काय मजेचे दिवस होते ते.
मग चाळ तोडुन तिथे बिल्डींग झाली. मग गच्चीत फटाके फोडायला लागलो किल्ला करायला जागाच उरली नाही.
आताशा फटाक्यांचा आवाज नकोशे वाटतात.
आणि भावुबिजेच्या दिवशी आमच्या घरात आईचे ४ भावु , मामी, त्यांची मुलं (प्रत्येकी ३ म्हणजे आम्ही ९ मामेभावु / बहीण) अशा सगळा गोताव़ळा जामायचा असे सगळे जण मिळुन किमान १८ जण तरी जमत असु. ओवळणीचा कार्यक्रमच १ तास चालायचा मग जेवायला पंगत बसायची.
रम्य ते बालपण आताच्या मुलांना जागेअभावी किल्ले नाहीत, कोणी कोणाकडे येत जात नाही (म्हणजे सख्खे सोडुन) म्हणुन नातेवाईकांची तोंडओळख नाही राहीली.
असो.

विवेकजी, प्रमोदजी धन्यवाद. काळानुसार कायापालट होणारच. निसर्गनियम आहे. पण ही कायापालटीत स्नेहभाव, सणांचे आपापल्यापरीने संस्कार टिकून रहावेत असेच वाटते.