जागतिकीकरण आणि साहित्यप्रवास...

संपादक's picture
संपादक in विशेष
13 Jul 2008 - 11:17 pm
संपादकीय

यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल!

जागतिकीकरण आणि साहित्यप्रवास...

जागतिकिकीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा त्याचा कशा-कशावर परिणाम होईल याची चर्चा सुरू झाली. नव्वदीला आम्ही नवे आर्थिक धोरण स्वीकारले, मुक्तधोरणाचा पुरस्कार केला विविध सेवाक्षेत्रात खुलेपणा आला, आणि आता तर देशात जागतिकीकरणाचे धोके लक्षात येऊ लागले म्हणे, खरे तर अजून जागतिकीकरणाच्या झळा पोहचल्याच नाही, आणि त्याच्या अधिक-उणेची चर्चा सुरू झालेली दिसते. असे असले तरी अपरिहार्यतेने आपण त्याचे स्वागतच केले आहे.

जागतिकीकरणाचे साहित्यावर काय परिणाम झाले, होताहेत याची वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा सुरू झाली. जागतिकीकरण म्हणजे काय? त्याचा समाजावर कसा परिणाम होतो, साहित्यावर परिणाम कसा होतो, त्याचे स्वरुप कसे असते या प्रश्नांचीही उत्तरे वाचकांनी शोधलीच पाहिजे, सर्व चर्चासत्रातून, चर्चेतून ज्ञानेश्वराच्या साहित्यापासून ते नुकतीच दोन ओळीची कविता लिहिणार्‍या कवीपर्यंतच्या कवितेत प्रस्थापित आणि नव साहित्यिक जागतिकीकरणाचा शोध घेऊ लागले. कवितेत, कथेत, जागतिकिकीरणामुळे माणसांची कशी फरफट होते ते दाखविण्याचे प्रयत्न सुरू झाले. लेखनाची बदललेली भाषा,शैली, नवनवे शब्द, म्हणजे जागतिकीकरणाचा प्रभाव अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली. जागतिकीकरणाने सकल जग एक खेडे बनवले. नवनव्या ज्ञानप्रसाराच्या साधनामुळे जीवनाच्या सर्वच क्षेत्रावर परिणाम होत आहे. भारतासारख्या बहुभाषिक प्रदेशात नव्या लाटांचा प्रभाव पडणे अपरिहार्य आहे. जागतिकीकरणामुळे सामाजिक व आर्थिक विषमता वाढत जाते, गरीब राष्ट्रे आणि तेथील जनतेच्या दारिद्र्यातत भर पडत आहे. पर्यावरणाचेही प्रचंड नुकसान होत आहे. त्यासाठी वर्तमान बदलायचे असेल तर जागतिकीकरणाच्या प्रवाहात खंबीरपणे उभे राहून साहित्य समृद्ध करावेच लागेल. असे करायचे असेल तर साहित्यविषयक विचार मांडताना आशय आणि अनुभवाचे क्षेत्र विस्तारले पाहिजे. मानवतावादी मूल्याकडे लक्ष पुरविले पाहिजे. आणि नेमका मानवतावादी मूल्यांचा र्‍हास होत आहे. दूरदर्शन, विविध वाहिन्यांच्या मालिका, चित्रपटांचे आशय या बाबतीत असे दिसते की, उपभोगवाद, चंगळवाद या मुळे सवंग लोकप्रियेतेसाठी लिहिले जाणारे लेखन वाढत आहे. केवळ तिथेच नव्हे तर मराठी संकेतस्थळावरही तसेच दिसून येते. चिंतन मननाअभावी लिहिण्याची प्रचंड घाई नवलेखकामध्ये दिसते. अर्थात टिकणारे लिहिता येत नाही, म्हणून त्यांनी आपली लेखणी थांबवावी असे मुळीच नाही. परंतु साचेबद्ध, एकसुरी, कंटाळवाणे आणि एकच लेखन चार-चार संकेतस्थळांवर टाकण्याची सवय, हे सर्व सोडले पाहिजे. अनुभवविश्व जर बदलायचे असेल तर साहित्याच्या विकासाकडे पाहण्याची नवी दृष्टी हवी. इतर भाषेतील कलाकृती आणि विद्यमान मराठी साहित्य यांची तुलना करता ज्ञानपीठ पुरस्कारात आपण किती मागे आहोत ते लक्षात येतेच आहे.

वि. स. खांडेकरांची ययाती सारखी ऐतिहासिक कलाकृती अजरामर ठरली ती त्यांच्या लोकविलक्षण प्रतिभा शक्तीमुळे, कुसुमाग्रजांच्या नटसम्राटाने मराठी वाचकांचा हृदयाचा ठाव घेतला, विंदाची कविता ऐकून माजी राष्ट्रपती डॉ. कलामांना मराठी भाषा शिकावी वाटते, याचा अर्थ असा की श्रेष्ठ अभिव्यक्ती ही उत्कंठावर्धक साहित्यास जशी गती देते तशी ती भाषेला नवा वाचक वर्गही जोडते. ऐतिहासिक साहित्य, आदिवासी, जनवादी, स्त्रीवादी, विज्ञानवादी, दलित आत्मकथने, कथा, कविता, तसेच काही प्रमाणात येणारे समृद्ध ललित साहित्य, वेगवेगळ्या मराठी संकेतस्थळांवर, अनुदिन्यांवर, लिहिले जाणारे, उत्तम असलेले पण दुर्लक्ष झालेले साहित्य ह्या जमेच्या बाजू असल्या तरी, मराठी साहित्यात आणखी किती तरी आकृतिबंध समर्थपणे अवतरण्याची गरज आहे. त्याचबरोबर जालांवर मराठी वाचकांना साहित्यनिर्मितीसाठी नवनवीन व्यासपीठे, सेवा उपलब्द्ध करून देणारी काही मराठी संकेतस्थळे आहेत, त्यावरही काही नवा आशय कधी कधी व्यक्त होतांना दिसतो. काही मराठी संकेतस्थळांवर संस्थळाचे मालक (मिसळपावचे नव्हे )लिहिल्या गेलेल्या लेखनाला पुर्वी अनुमतीची प्रतीक्षा करायला लावत. परंतु आंतरजालावरील मराठी लेखक-वाचकांच्या वाढत्या रेट्यामुळे, तसेच मिपासारख्या काही लोकाभिमूख संकेतस्थळांमुळे आंतरजालावरील परीटघडीची एकाधिकारशाही मोडीत निघाली ही एक आनंदाची गोष्ट आहे. मराठी भाषा, साहित्य, साहित्यसंमेलन सातासमुद्रापलिकडे जात आहे, ही अभिमानाची आनंदाची गोष्ट असली तरी येथील महाराष्ट्रभर वावरणार्‍या मराठी वाचकांकडे दुर्लक्ष होऊ नये, म्हणुनच की काय रत्नागिरीतही संमेलन व्हावे, असे वाटते.

या दशकात महाराष्ट्रातील लोकजीवन समृद्ध झालेले आणि त्याचे चित्रण साहित्यातून उमटले पाहिजे, मराठी साहित्याची उंची वाढली पाहिजे. मराठी जीवनाच्या विविध परिघांना स्पर्श करण्यासाठी मराठी लेखकांचे अनुभवविश्व समृद्ध झाले पाहिजे. जागतिकीकरणानंतर साहित्याचे विषय बदलत आहेत. तीव्र संघर्ष आणि जगण्याची विलक्षण गती यामुळे जीवनातील फरफट वाढत आहे. शतकाच्या पलीकडे जाऊन डोकावण्याचे सामर्थ्य ज्या साहित्यात, ज्या लेखकात असेल तेच साहित्य प्रवाहात टिकून राहील. एकसुरी, कंटाळवाण्या रुक्ष वाङमयीन कलाकृती निर्माण करण्यापेक्षा, लेखन करणार्‍यांनी नव्या दिशेने विचार केला पाहिजे. तहान, बारोमास ( कादंबरी) तूर्तास, जागतिकीकरणात माझी कविता (काव्यसंग्रह), अशा कलाकृतींनी पुढे वेग घेतला पाहिजे. नव्या जगात एक नवा माणूस व नवा समाज घडवायचा आहे. शिक्षण, शेती, संगणक जग, कुटुंब, नोकरी, मुले, स्त्री-पुरुष आणि इतरही विषयांसहित साहित्य हे परिवर्तनाचे माध्यम बनावे, मराठी साहित्य हे परिवर्तनाचे शस्त्र व शास्त्र बनावे अशा दृष्टिकोनाने लिहावयाचे म्हणजे ते प्रचारांती असावे असे नाही. स्वांतसुखाय या दृष्टीने ते लिहिले जाऊ शकते. 'दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो', असा वैश्विक मानवतावादी दृष्टिकोन घेतला तर जगाला कवेत घेऊन सकल विश्व चराचर! हे विश्वची माझे घर हा ज्ञानदेवाचा विचार सार्थ होऊ शकेल.

साहित्याची नवीन गरज भरून काढणारा नव्या युगाचा सहित्यिक सध्या महाराष्ट्रात नवयुगाची वाट पाहत आहे. लिहितोय तेही उत्तमच लिहितोय, त्याच्यात काही बदल व्हावेत, हटके निर्मिती व्हावी, साहित्यात जागतिकीकरण शोधता यावे, असे कधी तरी तासावर जाणार्‍या प्राध्यापकाला आणि मिपाच्या टेंपरवारी संपादकाला वाटते पण त्यांचे ऐकणार कोण?

पाहुणा संपादक : प्राध्यापक डॉ दिलीप बिरुटे.

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Jul 2008 - 3:04 am | llपुण्याचे पेशवेll

मराठी साहित्य हे परिवर्तनाचे शस्त्र व शास्त्र बनावा....
हा मोलाचा विचार पटला.
सध्या मराठी भाषेला साहित्य भाषा म्हणून झळाळी देणार्‍या तरूण साहित्यिकाची गरज आहे असे वाटते. कारण स्वभाषेचा अभिमान हा केवळ प्रचाराने जागवता येत नाही तर तो मनातून निर्माण व्हावा लागतो. त्यामुळे नवीन काळाची पावले ओळखून साहीत्य निर्मीती व्हावे असे वाटते हे खरे आहे. सरांचे विचार पटले.
मुक्तसुनीतरावांच्या लेखाप्रमाणेच हा अग्रलेख देखील चिंतनीय....
पुण्याचे पेशवे

बेसनलाडू's picture

14 Jul 2008 - 3:55 am | बेसनलाडू

संपादकीय विचार फारच आवडले.जागतिकीकरणाचे मानवी जीवनावर झालेले परिणाम साहित्याच्या माध्यमातून प्रकट व्हावेत आणि त्या दृष्टीने साहित्यनिर्मिती व्हावी,पारंपारीक विषयांबरोबरच जागतिकीकरण आणि गतिमान जीवनाने जन्माला घातलेले 'हट् के' विषय साहित्यात हाताळले जावेत,हे पुरेपूर पटले.
(समजूतदार)बेसनलाडू
काही मराठी संकेतस्थळांवर संस्थळाचे मालक (मिसळपावचे नव्हे )लिहिल्या गेलेल्या लेखनाला पुर्वी अनुमतीची प्रतीक्षा करायला लावत. परंतु आंतरजालावरील मराठी लेखक-वाचकांच्या वाढत्या रेट्यामुळे, तसेच मिपासारख्या काही लोकाभिमूख संकेतस्थळांमुळे आंतरजालावरील परीटघडीची एकाधिकारशाही मोडीत निघाली ही एक आनंदाची गोष्ट आहे. मराठी भाषा, साहित्य, साहित्यसंमेलन सातासमुद्रापलिकडे जात आहे, ही अभिमानाची आनंदाची गोष्ट असली तरी येथील महाराष्ट्रभर वावरणार्‍या मराठी वाचकांकडे दुर्लक्ष होऊ नये, म्हणुनच की काय रत्नागिरीतही संमेलन व्हावे, असे वाटते.
लेखाचा मूळ विषय लक्षात घेता येथे विषयांतर होऊन काही वाक्यांपुरते तरी लेखाचे बेअरिंग सुटले,असे माझे वाचक,लेखक आणि आंतरजालावरील मराठी भटक्या अशा सगळ्याच भूमिकांतून उमटलेले प्रामाणिक मत आहे.या वाक्यांतून आलेले विचार हे स्वतंत्र चिंतनाचा विषय असून त्यांवर वेगळे संपादकीय होईल,असा विश्वास वाटतो.प्रस्तुत विषयाच्या संदर्भात ते अप्रस्तुत वाटले.असो.
(प्रामाणिक)बेसनलाडू
लेखाच्या अनुषंगाने काही प्रश्न पडले,ते असे -
१. जागतिकीकरणाच्या नकारात्मक बाजूच साहित्यातून मांडल्या जात आहेत/गेल्या आहेत,असे आहे काय?असल्यास ते बदलण्यासाठी काय करता येईल?त्याच्या सकारात्मक बाजूंवर झालेले लेखन,भिन्न संस्कृती आणि जीवनशैलींच्या निरीक्षणातून व अभ्यासातून निर्माण झालेले लेखन,त्याला मिळालेली स्वीकृती आणि दाद यांबद्दल आपणांस काय वाटते/आपले निरीक्षण वा अनुभव काय?
२. जागतिकीकरण हे(च) मानवी मूल्यांच्या र्‍हासाचे मूळ ठरण्याइतपत मानवाची विवेकबुद्धी खुंटली आहे काय?नवसाहित्यात हेच दिसून येते काय?
३. स्वतःच्या मूल्यांचे व संस्कृतीचे पालन,भिन्न संस्कृती व मूल्यांचा स्वीकार आणि अंगिकार या बाबतींत जागतिकीकरणाने आणि/किंवा नवसाहित्याने काय परिणाम दाखवले आहेत?
(पृच्छक)बेसनलाडू
सर,तुम्ही संपादकीय लेखन व प्रतिसादांबरोबरच(किंवा त्या व्यतिरिक्त) वरील प्रश्नांच्या दृष्टीने आणि नवसाहित्याचा अभ्यासक म्हणा किंवा शिक्षक या नात्याने (काही कारणास्तव) फार लेखन करीत नाही,अशी माझी प्रेमळ तक्रार आहे.तिच्याकडे लक्ष द्यावे ही नम्र विनंती.
(नम्र)बेसनलाडू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2008 - 7:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही मराठी संकेतस्थळांवर संस्थळाचे मालक (मिसळपावचे नव्हे )लिहिल्या गेलेल्या लेखनाला पुर्वी अनुमतीची प्रतीक्षा करायला लावत. परंतु आंतरजालावरील मराठी लेखक-वाचकांच्या वाढत्या रेट्यामुळे, तसेच मिपासारख्या काही लोकाभिमूख संकेतस्थळांमुळे आंतरजालावरील परीटघडीची एकाधिकारशाही मोडीत निघाली ही एक आनंदाची गोष्ट आहे. मराठी भाषा, साहित्य, साहित्यसंमेलन सातासमुद्रापलिकडे जात आहे, ही अभिमानाची आनंदाची गोष्ट असली तरी येथील महाराष्ट्रभर वावरणार्‍या मराठी वाचकांकडे दुर्लक्ष होऊ नये, म्हणुनच की काय रत्नागिरीतही संमेलन व्हावे, असे वाटते. आणि येथे विषयांतर होऊन काही वाक्यांपुरते तरी लेखाचे बेअरिंग सुटले,असे माझे वाचक,लेखक आणि आंतरजालावरील मराठी भटक्या अशा सगळ्याच भूमिकांतून उमटलेले प्रामाणिक मत आहे.या वाक्यांतून आलेले विचार हे स्वतंत्र चिंतनाचा विषय असून त्यांवर वेगळे संपादकीय होईल,असा विश्वास वाटतो.प्रस्तुत विषयाच्या संदर्भात ते अप्रस्तुत वाटले.असो.

लेखन अनुमती, प्रतिक्षा हा स्वतंत्र चिंतनाचा विषय असला तरी त्याचा उदारीकरणाशी संबंध असावा, असे वाटते.....

जागतिकीकरणातील आर्थिक उदारिकरणाचा आणि घटस्फोटाचा काय संबंध असा प्रश्न विचारण्यासारखा आमचा मुद्दा असेल पण दुर्दैवाने त्याला आमचा विलाज नाही. लोकांकडे जसा पैसा येऊ लागला. तसतसा लोकांचा स्वच्छंदीपणे जीवन जगण्याकडे त्यांचा कल वाढू लागला. जीवनाला व्यवहाराचे स्वरुप आले. प्रत्येक गोष्ट पैशात मोजली जाऊ लागली. कोणतीही गोष्ट पाहिजे असेल तर ती पैशाच्या जोरावर मिळवता येते. आणि नाही मिळाली तर त्यावरुन संघर्ष गुन्हे सुरु झाले. पती पत्नीत विश्वास राहिला नाही, संशयाचे वातावरण निर्माण झाले आणि त्याची परिणीती घटस्फोटात होऊ लागली. (उदाहरण: आर्थिक उदारिकरण आणि घटस्फोट संबध )

जागतिकीकरणाचा आणि साहित्य अनुमती प्रतिक्षेचा विषय म्हणजे वडाची साल पिंपळाला जोडण्यासारखे वाटू शकले. पण ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, त्यांना आपण इतरांना कसेही वागवू अशी एक गुर्मी दिसून येते. आम्हाला वाटते तेच लिहावे कींवा आम्ही ठरवू तेच योग्य अशी त्यामागची भुमिका आहे. अशा परिस्थितीत नैतिक, अनैतिक, धर्म, अधर्म, सत्कृत्य- दुष्कृत्य, वगैरे गोष्टीचा विचार करायला धनदांडग्यांना वेळ नाही.

त्यामूले लिहिलेलेले हे प्रामाणिक असेल का अशी शंका येते किंवा लेखकाच्या लिहिण्याला स्वातंत्र्य आहे का ? तो त्याचा विचार जशाच तसे मांडू शकतो का ? किंवा अशा अनुमतीमुळे थेट भिडणारे लिहू शकले का ? इतकाच माझा प्रश्न आहे. खरे तर संपादकीय वजा लेखन करतांना ते गाळता आले असते असा एक सभ्य विचार डोकावून गेलाच होता. पण वाटले ते लिहिले भले आवडो न आवडो.

उदाहरर्णार्थ पाहा.....आम्ही एका वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवतो म्हटल्यावर काही गाइड विक्रेते आम्हाला गाइड लिहिण्याचा आग्रह धरतात. त्यासाठी आम्ही खूश होऊ असे पैसे मोजण्याची त्यांच्यी तयारी असते. त्यासाठी त्यांची एक अट असते, ती अट म्हणजे गाइड लेखकाची नावे ते टाकत नाही. ( लेखक: प्रसिद्ध लेखक असे लिहितात. ) याचाच अर्थ आमचे ज्ञान त्यांना विकतो. ही एक प्रकारची आर्थिक गुलामगिरी आहे. तसेच मालकांना आवडते लिहिणे म्हणजे एक गुलामगिरी आहे, एवढेच आमचे म्हणने आहे.

अर्थात आम्ही लिहिलेले आपल्याला पटावेच अशी अपेक्षा नाही, पण आम्ही विषयाला धरुन लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, असे आम्हाला प्रामाणिकपणे वाटते.

बाकीच्या प्रश्नांची उत्तर येथे येतीलच, यावेत असे वाटते.

आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

बेसनलाडू's picture

14 Jul 2008 - 7:54 am | बेसनलाडू

लेखनविषय,उद्दिष्टे,जागतिकीकरण आणि वैचारीक व लेखनातील,प्रकटीकरणातील गुलामगिरी यांचा जो संबंध तुम्ही वर स्पष्ट केलाय,तो मला बादरायण संबंध वाटतो आहे,हे नम्रपणे आणि प्रामाणिकपणे नमूद करतो.म्हणूनच लेखनाचे बेअरिंग सुटून विषयांतर झाल्यासारखे वाटले.आणि असे वाटणारा मी एकटाच नाही,याचीही खात्री आहेच.पुरावा खालच्या एका प्रतिसादात आहे.असो.
(खात्रीपूर्वक)बेसनलाडू
खरे तर संपादकीय वजा लेखन करतांना ते गाळता आले असते असा एक सभ्य विचार डोकावून गेलाच होता. पण वाटले ते लिहिले भले आवडो न आवडो.
हे तर उत्तमच! गाळता आले असते,हा विचार तुमच्या मनाला शिवला यातच तुम्हांला त्यावेळी लेखनाचे बेअरिंग सुटत असल्याचे/विषयांतर होत असल्याचे जाणवले होते,हे कळून येते.सभ्यासभतेशी त्याचा काडीचाही संबंध नाही/नसावा.अर्थात वाचकांच्या आवडीनिवडीविषयी संपादकाने स्वतःच्या लेखनात जागरूक नसावे(च);त्यामुळेच कोणाला कितीही आवडो,नावडो; संपादकाच्या चष्म्यातून तटस्थ परीक्षण आणि लेखणीतून वस्तुनिष्ठ लेखन उतरावे,हीच अपेक्षा असते.आणि संपादकाचे विचार हे त्याचे स्वतःचे असतात,हे वाचक म्हणूनही सर्वांनी मान्य केलेच पाहिजे/केलेले असते.
(संपादकीय)बेसनलाडू
बाकी मी विचारलेल्या इतर प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडून येतील व त्यावर साधकबाधक विचारमंथन होईल, या विश्वासाने येथे वाचत,प्रतिसाद टंकत राहीन.
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.यातून तुमच्या लेखनविषयक जबाबदारीचाच प्रत्यय आला.
(आभारी)बेसनलाडू

प्रियाली's picture

14 Jul 2008 - 4:59 am | प्रियाली

जागतिकीकरणाचे मराठी साहित्यावर झालेले नेमके परिणाम, त्यातून निर्माण होत असलेल्या नव्या साहित्यकृती यांबद्दलही अधिक वाचायला आवडले असते.

केवळ तिथेच नव्हे तर मराठी संकेतस्थळावरही तसेच दिसून येते. चिंतन मननाअभावी लिहिण्याची प्रचंड घाई नवलेखकामध्ये दिसते. अर्थात टिकणारे लिहिता येत नाही, म्हणून त्यांनी आपली लेखणी थांबवावी असे मुळीच नाही. परंतु साचेबद्ध, एकसुरी, कंटाळवाणे आणि एकच लेखन चार-चार संकेतस्थळांवर टाकण्याची सवय, हे सर्व सोडले पाहिजे.

अगदी खरे आहे! हातात लेखणी आहे म्हणून आम्ही मनाला येईल तसे लेख टाकत जातो या विचारसरणीपेक्षा मी हा लेख का लिहितो? त्यामागील उद्दीष्ट पूर्ण होते काय? वाचकांना ते अपील होते का? याचा विचार लेखकाने जरूर करावा.

ज्यांची लेखणी धारदार आहे त्यांनी साहित्यातील वेगवेगळे फॉर्म्स प्रयोगात आणायला काहीच हरकत नाही. प्रतिसादांचा भरघोस ओघ म्हणजे यश हे समीकरण खोटे आहे आणि या समीकरणावर श्रद्धा ठेवून ताकदीच्या लेखकांनी आपल्याला सिमीत करू नये असे वाटते.

असो.

वर बेसनलाडूने म्हटल्याप्रमाणे मलाही स्पष्टपणे असे वाटते की -

काही मराठी संकेतस्थळांवर संस्थळाचे मालक (मिसळपावचे नव्हे )लिहिल्या गेलेल्या लेखनाला पुर्वी अनुमतीची प्रतीक्षा करायला लावत.

हे वाक्य अप्रस्तुत वाटले. अनुमतीची प्रतीक्षा ही तात्पुरती आणि त्या मालकांना पटतील अशा सबळ कारणांतून आली होती. एका चांगल्या लेखात वरील वाक्याची गरज नव्हती.

मुक्तसुनीत's picture

14 Jul 2008 - 8:01 am | मुक्तसुनीत

मूळ विषय चांगला हाताळला आहे. त्यातील प्रशासकीय परवानगीबद्दलचा संदर्भ अवांतर असला तरी तो भाग अंमळ बाजूला ठेवावा असे मी सर्वपक्षीयाना विनवतो.

याबद्दल बिरुटेसरांचे संपादकीय समयोचित आहे.

भाषा मुळात प्रगल्भ असते म्हणून तिच्यात लोक लिहीत नाहीत - उलट लोक महत्त्वाच्या गोष्टी त्या भाषेत लिहितात, म्हणून भाषा प्रगल्भ होते.

जागतिकीकरणामुळे अनेक नवीन विषय, चिंतेचेही आणि आनंदाचेही, आपल्या आयुष्यात आले आहेत. ते विषय हाताळून जोमाने साहित्यनिर्मिती झाली, तर वाचकांना ही रस वाटेल. वाचक मिळाले तर मराठी लेखकांना हुरूप वाटेल. आणि या प्रगतिचक्रात आपल्या भाषेची भरभराट होईल.

विंदाची कविता ऐकून माजी राष्ट्रपती डॉ. कलामांना मराठी भाषा शिकावी वाटते, याचा अर्थ असा की श्रेष्ठ अभिव्यक्ती ही उत्कंठावर्धक साहित्यास जशी गती देते तशी ती भाषेला नवा वाचक वर्गही जोडते.

वाह - कळीचा मुद्दा. येथे पुढच्या पिढीला मराठीतला वाचकवर्ग केले पाहिजे. त्यांच्या (म्हणजे आपल्याच) जागतिक झालेल्या आयुष्याशी निगडित श्रेष्ठ अभिव्यक्तीचे साहित्य तयार नसले, तर कंटाळून ही पिढी मराठीला केवळ "आजी-आजोबांशी बोलायची भाषा" अशी मानू लागेल.

मुकसुनीत म्हणतात : "मूळ विषय चांगला हाताळला आहे. त्यातील प्रशासकीय परवानगीबद्दलचा संदर्भ अवांतर असला तरी तो भाग अंमळ बाजूला ठेवावा असे मी सर्वपक्षीयाना विनवतो." सहमत. माझीही तीच विनवणी.

प्रकाश घाटपांडे's picture

14 Jul 2008 - 8:37 am | प्रकाश घाटपांडे


शिक्षण, शेती, संगणक जग, कुटुंब, नोकरी, मुले, स्त्री-पुरुष आणि इतरही विषयांसहित साहित्य हे परिवर्तनाचे माध्यम बनावे, मराठी साहित्य हे परिवर्तनाचे शस्त्र व शास्त्र बनावे अशा दृष्टिकोनाने लिहावयाचे म्हणजे ते प्रचारांती असावे असे नाही. स्वांतसुखाय या दृष्टीने ते लिहिले जाऊ शकते.


म्हणुन तर अनुदिन्यांचे पेव (चांगल्या अर्थाने)फुटले आहे. इतक्या चांगल्या अनुदिन्या आज आंतरजाला वर आहेत कि तुम्ही फक्त वाचत रहावे. अगोदर वाचु यात नंतर लिहु यात ही भुमिका घ्यायला लागलो तर आपण फक्त वाचतच राहु इतके सकस साहित्य आज आंतरजालावर आहे. हा जागतिकि करणाचाच साहित्यावर झालेला परिणाम आहे. आज आपण जगाच्या काना कोपर्‍यातून इथे जमतो ही बाब ही सकारात्मक आहे.
राहिला मुद्दा प्रशासकीय अनुमतीचा. उदारीकरणातुन दिलेल्या तांत्रिक मुभेचा दुरुपयोग (जरी सापेक्ष असला तरी) होउ नये व रसभंग होउ नये म्हणुन घेतलेली काळजी आहे. आमच्या देव गुरुजींच्या भाषेत "कोणी खंडीच्या वरणात मुतलास का रे?" असे होउ नये म्हणुन. त्याची जागा वेगळी आहे. त्याला ही स्थान आहेच कुठेतरी. मी तर पिवळ्या पुस्तकांनाही साहित्य म्हणतो. त्यातही काही दर्जेदार मिळतं.
बाकी अतिथी संपादकीय ही स्वांत सुखाय का होईना साहित्य सेवाच असते.
अवांतर- चला मराठवाड्याला स्थान दिलं. आता भीती नाहि
प्रकाश घाटपांडे

कोलबेर's picture

15 Jul 2008 - 1:31 am | कोलबेर

जागतिकीकरणाचा मराठी साहित्यावरील परिणाम दिसू लागलेला आहे.

जागतिकीकरणाचाच एक परिणाम म्हणजे पुस्तक/छापील ह्या पारंपारिक माध्यमांच्या मर्यादीत कक्षा तोडून बाहेर पडलेले अनुदिन्या/संकेतस्थळांवरील साहित्य.

अतिथी संपादकीय ही स्वांत सुखाय का होईना साहित्य सेवाच असते.

१००% सहमत!

विसोबा खेचर's picture

14 Jul 2008 - 9:02 am | विसोबा खेचर

बिरुटेसर,

आपला अग्रलेख खरोखरच सुरेख आहे आणि आजच्या मराठी साहित्यविषयक परिस्थितीबाबत सांगोपांग विचार करणारा आहे. मराठी सहित्याच्या उत्कर्षाविषयीची अतिशय प्रामाणिक कळकळ आपल्या अग्रलेखातून दिसून येते! पुन्हा एकदा सवडीने वाचेन.

बाकी प्रियाली म्हणते त्याप्रमाणे काही संस्थळांवर लागलेल्या प्रशासकीय अनुमतीचं कारण हे तात्पुरते आणि त्या मालकांना पटतील अश्या सबळ कारणाकरताही असेल हे मान्य. परंतु माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार बोलायचे झाले तर माझ्यासारख्या सातत्याने लेखन करणार्‍या एखाद्या सभासदाने त्यावर तीनतीनदा आक्षेप घेतला असता त्याला त्याबाबत एका शब्दानेही जाहीर अथवा खाजगी, कुठलेच उत्तर दिले गेले नाही/दिले जाऊ नये याचे सखेद आश्चर्य वाटले, आजही वाटते! त्यामुळे बिरुटेसरांनी 'एकाधिकारशाही' हा शब्द वापरला आहे तो येथे पटतो! एकाधिकारशाहीची भावना/अथवा माज (!) असला कीच असा बेमुर्वतखोरपणा आणि बेफिकीरपणा अंगी येतो! संस्थळ चालकांना काही एक ठाम धोरणे निश्चितच अवलंबावी लागतात त्या शिवाय संस्थळ चालवणे मुश्कील आहे हे स्वानुभवातून मीही मान्य करतो परंतु त्याचबरोबर त्यांनी त्या संस्थळाचे आधारस्तंभ असलेल्या सभासदांना वेळोवेळी विश्वासात घेऊन अधिकाधिक लोकाभिमूख रहायला पाहिजे हेही तितकेच खरे!

तात्या.

विकास's picture

14 Jul 2008 - 9:41 am | विकास

अग्रलेख आणि त्याचा विषय, मांडणी आवडले.

सध्याची मराठी संकेत स्थळे ही पुढे मराठी माणसाच्या एकत्रीत येण्यासाठी (संघटीत वगैरे अर्थाने नाही!) म्हणून असलेली एक पायरी ठरावी अशी इच्छा आहे. अशी संकेतस्थळे चालू होण्या आधीपासून अनुदिन्या होत्याच पण त्यात एकतर्फी कर्णावापरून संवाद म्हणून ओरडण्यासारखा प्रकार होता. अर्थात याचा अर्थ तो प्रकार वाईट आहे असा नाही, त्यातून पण बरेच चांगले लिहीणारे तयार झाले असले तरी मिपा आदी संकेतस्थळांनी संवादाचे माध्यम दिले हे नक्की! वर्षाहूनही कमी कालावधीत नुसतीच अनेकांच्या विचारांची मिसळ करण्याचा प्रयत्न करणार्‍या या स्थळाने विविध प्रकारचे प्रयोग करून पाहीले. अशा प्रयत्नातून जसे हे संकेतस्थळ पुढे जात राहील असे वाटते तसेच येथील आणि इतर स्थळांवरील संवादातून पण एकंदरीतच मराठी माणूस अनुभवाचे आदानप्रदान देत पुढे जाईल अशी आशा वाटते.

मेघना भुस्कुटे's picture

14 Jul 2008 - 10:57 am | मेघना भुस्कुटे

अगदी समयोचित अग्रलेख.
जागतिकीकरण - अनुदिन्या - संस्थळे यांचा एक निश्चित संबंध आहे. साहित्याच्या प्रांतात या जालीय माध्यमांचा आता सणसणीत वाटा आहे. या साहित्याच्या प्रकृतीबद्दल अजून विस्ताराने काही आले असते, तर आवडले असते.

नंदन's picture

14 Jul 2008 - 12:26 pm | नंदन

सहमत आहे, अग्रलेख आवडला. जालीय माध्यमांच्या प्रकृती आणि क्षमतांबद्दल तसेच आतापर्यंतचे साहित्य (दलित साहित्याचा, तोही सुरूवातीच्या दलित साहित्याचा) अपवाद वगळला तर एकाच साच्यात गुंतून पडलेल्या ह्या साहित्याला बसणार्‍या धक्क्यांबद्दलही अधिक वाचायला आवडेल.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अग्रलेखाने विचारमंथन सुरू करायचे काम चोख बजावले आहे.

जागतिकीकरणात वाचक त्याच्या कार्यक्षेत्रामुळे व आंतरजालावरील उपलब्ध माहीतीसाठ्याने पुर्वीच्या [जागतिकीकरणाच्या आधीच्या] वाचकापेक्षा जास्त संख्येने माहीतगार होतो आहे. जास्त माहीती मुळे सहाजिक आवडीनिवडी बदलत आहेत. जागतिकीकरणाने उपलब्ध साधनसामग्रीने बदलेले आयुष्य व बदलेले आर्थीक समीकरण, महीलांचे सबलीकरण, महीला वाचक/ लेखकांना मिळालेले स्वातंत्र्य याच परिणाम मराठी साहित्यावर होणार आहे. आंतरजालावरील लेखनाने, साहीत्य म्हणजे ज्ञानपीठ पारितोषक विजेती पुस्तके व तसेच प्रतिथयश लेखक म्हणजेच "साहीत्य" हा समज हळुहळू बदलत चालला आहे.

आजवर मर्यादित स्वरुपात प्रकट झालेला वाचकवर्ग साहित्याला नवी दिशा, नवे योगदान देउ लागला आहे. आता हेच उदाहरण घ्या ना, संपादकीय सदर म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येणार्‍या वृत्तपत्रातील संपादकांचे लिखाण इतकेच माहीत होते. केवळ काही दिवसांच्या चर्चेतुन आता संकेतस्थळाच्या माध्यमातुन केवळ भाषेच्या प्रेमातुन एकत्र आलेली देशविदेशातील मंडळी वेगवेगळ्या विषयावर वैचारिक लेखन करत आहे. मराठी वाचकाचा हा केवढा मोठा फायदा आहे हे नाकारता येत नाही.

जागतिककरणाच्या ह्या प्रक्रियेत वाचकाला एकत्र यायची, मनसोक्त प्रकट व्हायची बहुमुल्य संधी मिळाल्याने इथलेच उदाहरण द्यायचे झाल्यास गेल्या वर्षभरातील या मंथनातुन काही लेखकरत्ने बाहेर आली आहेत जसे रामदास, धनंजय. काही रसीकरत्ने जसे मुक्तसुनित, चतुरंग जे ह्या साहीत्य यज्ञाचे अग्नीकुंड प्रज्वलीत करत आहेत. आंतरजालामुळे वाचकाची केवळ साहित्यीक अभिरुची नव्हे तर वाचकाचे एकंदरीत आयुष्य समृद्ध करणारी नवव्यवस्था आली आहे. एक हिरा शोधायला कित्येक टन माती चाळावी लागते त्याप्रमाणे संकेतस्थळाच्या खाणीत अनेक रत्ने निश्चीत बाहेर येत आहेत उद्याचे साहित्यिक ह्या माध्यमातुन अजुन झळाळुन येतील.

नवे साहीत्य, नवे माध्यम असले तरी शेवटी लोकांना एकत्र करुन समाजाचा विकास हेच ध्येय जागतिकीकरणात देखील कायम ठेवायचे आहे. त्याकरता सर्वांनी साहीत्यनिर्मीती जरी केली नाही तरी सुसंवाद चालू ठेवण्याचे काम / भान ठेवले पाहीजे.

मनिष's picture

14 Jul 2008 - 12:47 pm | मनिष

जागतिककरणाच्या ह्या प्रक्रियेत वाचकाला एकत्र यायची, मनसोक्त प्रकट व्हायची बहुमुल्य संधी मिळाल्याने इथलेच उदाहरण द्यायचे झाल्यास गेल्या वर्षभरातील या मंथनातुन काही लेखकरत्ने बाहेर आली आहेत जसे रामदास, धनंजय. काही रसीकरत्ने जसे मुक्तसुनित, चतुरंग जे ह्या साहीत्य यज्ञाचे अग्नीकुंड प्रज्वलीत करत आहेत. आंतरजालामुळे वाचकाची केवळ साहित्यीक अभिरुची नव्हे तर वाचकाचे एकंदरीत आयुष्य समृद्ध करणारी नवव्यवस्था आली आहे. एक हिरा शोधायला कित्येक टन माती चाळावी लागते त्याप्रमाणे संकेतस्थळाच्या खाणीत अनेक रत्ने निश्चीत बाहेर येत आहेत उद्याचे साहित्यिक ह्या माध्यमातुन अजुन झळाळुन येतील.

आणि हेच ह्या माध्यमाचे सर्वात मोठे बलस्थान ठरणार आहे. गुगलने त्याच्या ऍड्सेन्स साठी 'द लाँग टेल' (लांब शेपूट - फार्शा प्रसिद्ध नसलेल्या संकेतस्थळांचा एकत्रित हिट काऊंट) ही संकल्पना फार कल्पकतेने वापरली. तसेच ह्या विखुरलेल्या, तुरळक पण दर्जेदार लिहिणार्‍या लेखकांबाबतही म्हणता येईल. अशा कथा एकत्र करून कदाचित लवकरच एखादे पुस्तक, मासिकही निघेल.

आनंदयात्री's picture

14 Jul 2008 - 12:26 pm | आनंदयात्री

छान अग्रलेख बिरुटेसर आवडला.

केशवसुमार's picture

14 Jul 2008 - 12:32 pm | केशवसुमार

बिरुटेशेठ,
संपादकिय आवडले..या लेखाच्या अनुषंगाने मिपावर विचारमंथन ही सुरु होईल.. अभिनंदन!!
बेलाशेठ म्हणतात तसे
१. जागतिकीकरणाच्या नकारात्मक बाजूच साहित्यातून मांडल्या जात आहेत/गेल्या आहेत,असे आहे काय?असल्यास ते बदलण्यासाठी काय करता येईल?त्याच्या सकारात्मक बाजूंवर झालेले लेखन,भिन्न संस्कृती आणि जीवनशैलींच्या निरीक्षणातून व अभ्यासातून निर्माण झालेले लेखन,त्याला मिळालेली स्वीकृती आणि दाद यांबद्दल आपणांस काय वाटते/आपले निरीक्षण वा अनुभव काय?
२. जागतिकीकरण हे(च) मानवी मूल्यांच्या र्‍हासाचे मूळ ठरण्याइतपत मानवाची विवेकबुद्धी खुंटली आहे काय?नवसाहित्यात हेच दिसून येते काय?
३. स्वतःच्या मूल्यांचे व संस्कृतीचे पालन,भिन्न संस्कृती व मूल्यांचा स्वीकार आणि अंगिकार या बाबतींत जागतिकीकरणाने आणि/किंवा नवसाहित्याने काय परिणाम दाखवले आहेत?
ह्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी साधकबाधक चर्चा व्हावी..

परंतु साचेबद्ध, एकसुरी, कंटाळवाणे आणि एकच लेखन चार-चार संकेतस्थळांवर टाकण्याची सवय, हे सर्व सोडले पाहिजे. साचेबद्ध, एकसुरी, कंटाळवाणे हे व्यक्ती सापेक्ष(वाचक आणि लेखक) असू शकते असे वाटते..आणि एकच लेखन चार-चार संकेतस्थळांवर टाकल्याने नुकसान काहि ही नाही असे ही वाटले उलटपक्षी या मुळे जास्त वाचकांन पर्यंत पोचता येईल नवा वाचक वर्गही जोडला जाईल ... असो..
पुन्हा एकदा उत्तम संपादकिय लेखाबद्दल आभिनंदन आणि धन्यवाद.
केशवसुमार

मनिष's picture

14 Jul 2008 - 12:40 pm | मनिष

पण काही गोष्टी नाही समजल्या, काही पटल्या, काही नाही पटल्या --

जागतिकीकरणामुळे सामाजिक व आर्थिक विषमता वाढत जाते, गरीब राष्ट्रे आणि तेथील जनतेच्या दारिद्र्यातत भर पडत आहे. पर्यावरणाचेही प्रचंड नुकसान होत आहे. त्यासाठी वर्तमान बदलायचे असेल तर जागतिकीकरणाच्या प्रवाहात खंबीरपणे उभे राहून साहित्य समृद्ध करावेच लागेल.

म्हणजे काय? वर्तमान (किंवा भविष्य) बदलायचे तर कॄती जास्त आवश्यक नाही का?

असे करायचे असेल तर साहित्यविषयक विचार मांडताना आशय आणि अनुभवाचे क्षेत्र विस्तारले पाहिजे. मानवतावादी मूल्याकडे लक्ष पुरविले पाहिजे. आणि नेमका मानवतावादी मूल्यांचा र्‍हास होत आहे. दूरदर्शन, विविध वाहिन्यांच्या मालिका, चित्रपटांचे आशय या बाबतीत असे दिसते की, उपभोगवाद, चंगळवाद या मुळे सवंग लोकप्रियेतेसाठी लिहिले जाणारे लेखन वाढत आहे.

(१) अनुभवाचे क्षेत्र विस्तारणे - ह्यात कदाचित नातेसंबंध हेसुद्धा उपभोगतावादी, आत्यंतिक व्यक्तिकेंद्रीत होत आहे हे अपरिहार्यपणे जाणवेल. मानवतावादी मुल्यांचा र्‍हास होतो आहे हे एक जागतिकीकरणाचे वास्तव आहे.

(२) मग -- साहित्यात जे घडते आहे (उपभोगवाद, चंगळवाद ) त्याचे प्रतिबिंब पडते आहे. 'जसे आहे तसे' दाखवणे, तत्कालिन समाजाचे शब्दचित्र उभे करणे हे साहित्याचे महत्वाचे कार्य. मग हे सवंग लोकप्रियेतेसाठी(च) लिहले जाते असे का मानावे?

(३) त्याहून महत्वाचे साहित्याचे काम निरिक्षणे नोंदवणे, बदललेल्या समजाचा नात्यांचा, मानवी संबंधांचा धांडोळा घेणे, त्यातील व्यमिश्र गुंतागूम्त सम्जवून घेणे असेल तर काय बिघडले. 'समाजाने मानवतावादी मुल्ये जपावीत, त्यांचा र्‍हास होण्यापासून जपावे' हे एकवेळ समजावून घेता येईल - पण साहित्याने तेच करावे हे पटत नाही. साहित्याने त्यांचे प्रतिबिंब दाखवावे हे ठिक - लेखकाला वाटले तर त्याने त्यावर भाष्य करावे, मानवतावादी मुल्यांच्या दृष्टीकोनातून हे 'कसे असावे' ते लिहावे - पण त्याला तसे वाटत असल्यासच - ते साहित्याचे (किंवा कलेचे) गृहितक नकोत. साहित्य 'उपदेशामृत' होऊ नये.

मला खर तर 'अनुभवविश्व विस्तारावे' आणि 'मानवतावादी मूल्याकडे लक्ष पुरविले पाहिजे. आणि नेमका मानवतावादी मूल्यांचा र्‍हास होत आहे' हे मुद्दे परस्परविरोधी वाटतात. मानवतावादी मूल्यांचा र्‍हास होतो आहे हे सत्य - तयाचा साहित्यातला समावेश हे खरे अनुभवविश्व विस्तारणे - नाही का?

वि. स. खांडेकरांची ययाती सारखी ऐतिहासिक कलाकृती अजरामर ठरली ती त्यांच्या लोकविलक्षण प्रतिभा शक्तीमुळे, कुसुमाग्रजांच्या नटसम्राटाने मराठी वाचकांचा हृदयाचा ठाव घेतला, विंदाची कविता ऐकून माजी राष्ट्रपती डॉ. कलामांना मराठी भाषा शिकावी वाटते, याचा अर्थ असा की श्रेष्ठ अभिव्यक्ती ही उत्कंठावर्धक साहित्यास जशी गती देते तशी ती भाषेला नवा वाचक वर्गही जोडते.

खरे आहे! हे पटले - तसेच 'अनुवादातून' वेगळ्या भाषेशी, संस्कृतीशीही संबंध जोड्सला जाऊ शकतो. गुलजार ह्यांनी मधे कुसुमाग्रजांच्या कवितांचा अनुवाद करून त्या अमराठी वाचकांपर्यट पोहोचवल्या. नटसम्राट अर्थातच 'किंग लिअर' वरून प्रेरणा घेऊन लिहिले होते.

ब्लॉग, काही मराठी संस्थळ यांच्यामुळे, त्यातील सुलभतेमुळे, अनेक अ-लेखक नवीन कथा लिहितात आहे, त्यांना मर्यादित तरी ठराविक वाचकवर्गापर्यंत पोहोचता येत आहे, पुर्वीपेक्षा वेगळे फॉर्म्स, विषय यानिमित्ताने हाताळले जातात, लिहिले जातात - वर्तमानपत्रे, मासिक यासारखी माध्यमे देखील ह्या आंतरजालीय मराठी विश्वाची वेळोवेळी नोंद घेतात - ते मला फार मह्त्वाचे आणि चांगले लक्षण वाटते. वर्तमानपत्रे, मासिक याच्याप्रमाणेच 'आंतरजालीय मराठी ब्लॉग व संस्थळ' ह्या नव्या पण अतिशय वेगवान, सशक्त आणि समृद्ध माध्यमाची एक स्वतंत्र माध्यम म्हणून लवकरच ओळख निर्माण होईल अशी मला खात्री आहे . जागतिकीकरणात सगळ्यांचेच अनुभवविश्व झपाट्याने विस्तारते आहेच (आपल्या आधीच्या नोकरदार पिढीला जॉब इनसिक्युरीटी ही खर्‍या अर्थाने कधी जाणवलीच नाही, आणि आपल्या पिढीला जॉब सिक्युरीटी, पेन्शन हे विसरूनच जागावे लागणार आहे) त्याचे प्रतिबिंब वेगवेगळ्या रुपात साहित्यात पडेलच.

चतुरंग's picture

14 Jul 2008 - 4:43 pm | चतुरंग

आपला अग्रलेख चांगला आहे त्याबद्दल अभिनंदन पण अजून ताकदवान लिहू शकला असतात असे प्रामाणिकपणे वाटते.
आता थोडे पटले/न पटले.
पटले - साहित्यविषयक विचार हा स्थानिक पातळीवरुन जागतिक पातळीवर सहज गेला आहे आणि त्याचे मोठे श्रेय जागतिकीकरणाला जाते.

दूरदर्शन, विविध वाहिन्यांच्या मालिका, चित्रपटांचे आशय या बाबतीत असे दिसते की, उपभोगवाद, चंगळवाद या मुळे सवंग लोकप्रियेतेसाठी लिहिले जाणारे लेखन वाढत आहे. केवळ तिथेच नव्हे तर मराठी संकेतस्थळावरही तसेच दिसून येते. चिंतन मननाअभावी लिहिण्याची प्रचंड घाई नवलेखकामध्ये दिसते.
हे खरे. चिंतन/मननाने विचारांना एक खोली येते. कशासाठी लिहिले पाहिजे याचे भान येते. इतर सगळे भाराभर लिहितात, मी लिहिले नाही तर कोण दखल घेणार ह्या भीतीतून किंवा चला प्रतिक्रिया मिळायला लागल्या आहेत ना आता लिहितोच ह्या 'प्रेरणे'तून लिखाण होऊ नये नाही तर दर्जा घसरतो.
इतर लिखित साहित्याबरोबरच मराठी संकेतस्थळाचे एक वेगळे साहित्यविषयक स्थान निर्माण होऊ पहात आहे ही फार मोठी जमेची बाजू आहे.

न पटले -
जागतिकीकरणामुळे सामाजिक व आर्थिक विषमता वाढत जाते, गरीब राष्ट्रे आणि तेथील जनतेच्या दारिद्र्यातत भर पडत आहे. पर्यावरणाचेही प्रचंड नुकसान होत आहे. त्यासाठी वर्तमान बदलायचे असेल तर जागतिकीकरणाच्या प्रवाहात खंबीरपणे उभे राहून साहित्य समृद्ध करावेच लागेल.....मानवतावादी मूल्यांचा र्‍हास..
म्हणजे नेमके काय? इथे जागतिकीकरणाचे परिणाम फक्त उणेच आहेत असे गृहितक घट्ट धरुन ठेवल्यासारखे वाटते. सामाजिक/आर्थिक विषमता, पर्यावरण र्‍हास, मानवतावादी मूल्ये आणि साहित्य ह्यांचा अर्थाअर्थी संबंध स्पष्ट होत नाही.
दुसर्‍यापरिच्छेदात आलेले जागतिकीकरण, र्‍हास हे मुद्दे पुन्हा चौथ्या परिच्छेदात येतात त्यामुळे थोडा विस्कळितपणा जाणवतो. लेखनाचा चिरेबंदीपणा थोडा ढळलाय.
मराठी साहित्यात आणखी कितीतरी आकृतीबंध उतरणे गरजेचे आहे - एवढेच न लिहिता कोणते आकृतीबंध आपल्याला अपेक्षित आहेत ह्याबद्दल थोडी चर्चा झाली असती तर अधिक श्रेयस्कर झाले असते.
मराठी संस्थळे/अनुदिन्या ह्यावरील लिखाणाच्या बलस्थानांविषयी अधिक उहापोह व्हायला हवा होता असे वाटते.
बाकी काही मुद्द्यांचा परामर्श इतर मेंबरांनी घेतला आहेच.
असो. एकूण अग्रलेख 'मिपा'चा हा जालीय अग्रलेखाचा पायंडा अधिक भक्कम करणारा आहे ह्यात शंका नाही.

चतुरंग

रामदास's picture

14 Jul 2008 - 7:20 pm | रामदास

संपादकीयाच्या निमीत्ताने आवश्यक अशा सामाजीक मुद्द्यांवर चर्चा रंगत चालली आहे.त्यानिमीत्ताने आपल्या सर्वाचें अभिनंदन.
मला जागतिकीकरणाचे काही फायदे दिसले ते असे. नविन माध्यमे स्वस्तात उपलब्ध झाल्यामुळे लिहीणार्‍यांची आणि वाचणार्‍यांची संख्या वाढीस लागेल. सुरुवात नक्कीच झालेली आहे.एकांगी लेखनाला आळा बसेल. माध्यमांवरची मक्तेदारी संपून माध्यमे जास्त लोकाभिमुख होत जातील.पण अजून तरी जागतिकीकरणाच्या परीणामांचे हवे तेव्हढे प्रतिबिंब लोकसाहित्यात पडलेले दिसत नाहीत.मानसिकतेतला बदल चित्रीत होताना दिसत नाही आहे. कदाचीत माझे वाचन कमी पडत असावे., किंवा मी नेहेमीच्या माध्यमांकडे दुर्लक्ष करीत असेन . असं असेल तर ते इतर नविन माध्यमांच्या प्रभावामुळे असेल. इथे मी हा सर्वसामान्य रसिक माणूस गृहीत धरला आहे. वेळेवर मक्तेदारी हा एक नवी समस्या उभी राहतेच आहे.सवंग लिखाण जसे आज होत आहे तसे ते कालही होत होते.आपली बहुभाषीय संस्क्रुती जास्त फायद्यात राहणार आहे. मधुशालेचं मराठीकरण मला सहजंच उपलब्ध झालं ते माध्यमाच्या वाढत्या प्रसारामुळे. संस्कृत भाषेतील स्तोत्रे या सोयीतूनच मिळाली. पण नविन अनुभूतींचे चित्रण फार कमी वाचायला मिळाले.जतन होताना दिसते आहे पण संवर्धनाची गती हळू आहे असे वाटते.
चिंतन आणि मनन यांचा अभाव काही वेळ वाटतो खरा परंतू सकस निर्मीतीला थोडा वेळ द्यावाच लागेल. प्रयोगशिलतेला वाव मिळाला की हे नक्कीच होईल असे मला वाटते.
भाषेमधील झालेल बदल हा विषय आपण जास्त चांगला आमच्यापुढे आणू शकाल असेही मला वाटते. प्रायोगीक कलाकृतींकडे संशयानी बघण्याचे दिवस आता संपत आलेले आहेत.संगीताकडे आपण बघीतलं तर हा बदल लक्षात येण्यासारखा आहे.मी जागतिकीकरणामुळे लोकांच्या आवडी निवडी सहज बदलताना बघतो.जीवन एक ऍड हॉक पद्धतीने व्यतीत करणार्‍याची संख्या वाढताना बघतो आणि व्यथीत होतो.कारण मानवी मूल्यांचे बदलत जाणारे अर्थ मी समजू शकत नाही.लोकहितवादींची शतपत्रे, हरी नारायण आपट्यांच्या कादंबर्‍या त्या त्या काळच्या सामाजीक बदलांचे दिवे होते.
अपुर्‍या वेळेच्या या शतका मध्ये लोकांची मागणी लॉजीक साठी संपून सोल्युशनसाठी आहे . शास्त्राची मागणी कमी होऊन फक्त शस्रांना मागणी येत आहे हे आव्हान आपण लिहिणारे लोक पेलू शकू का?
डॉ . बीरूटे सरांचे मनोमन आभार. लेख इथेच न थाबता पुढे अ-संपादकीय म्हणूनही वाढवत न्यावा ही विनंती.
अवांतर. मी मनोरंजक लिखाण वाचत /लिहीत असल्यामुळे या विषयाशी माझा संपर्क कमी असतो. या लिखाणात तर्काची कमी असेअल तर ती माझी आहे. तर्क कमी असेल तर मनोरंजन नक्कीच होईल.

ऋषिकेश's picture

14 Jul 2008 - 9:15 pm | ऋषिकेश

वा अग्रलेखाच्या मालिकेतला दुसरा संपादकीय लेख आवडला.
अश्या असीम ;) विषयावर लिहिताना फाफटपसारा होण्याचा, नको त्या दिशेला लेख घसरण्याचा फार मोठा धोका असतो. तो टाळून इतका मोठा आवाका असणार्‍या विषयातील आपल्याला सांगायचा भाग निवडून केवळ त्यावर लेख लिहिल्याने तो 'नेमका' वाटला. त्याबद्दल अभिनंदन! नाहि म्हणायला प्रशासकीय अनुमतीचे सत्य वाचून घसरला की काय लेख असे वाटले पण इतकं चवीपुरतं मीठ हवंच नाहि का ;)

वि. स. खांडेकरांची ययाती सारखी ऐतिहासिक कलाकृती अजरामर ठरली ती त्यांच्या लोकविलक्षण प्रतिभा शक्तीमुळे, कुसुमाग्रजांच्या नटसम्राटाने मराठी वाचकांचा हृदयाचा ठाव घेतला, विंदाची कविता ऐकून माजी राष्ट्रपती डॉ. कलामांना मराठी भाषा शिकावी वाटते, याचा अर्थ असा की श्रेष्ठ अभिव्यक्ती ही उत्कंठावर्धक साहित्यास जशी गती देते तशी ती भाषेला नवा वाचक वर्गही जोडते

वा काय बोललात! अगदी सहमत!

यात मला खटकली ती लेखाची बांधणी. म्हणजे विचार आणि कंटेंटच्या दृष्टीनं संपादकीयात हा लेख पुरेपुर उतरतो असं वाटतं मात्र विचार जरी मुळ विषयाला धरून असले तरी तर्कशुद्ध क्रमाने येत नाहित. काही ठिकाणी विचार मनात येतात तसेच कागदावर (इथे टंकनसुविधेवर) उतरवल्यासारखे वाटले. थोडी लेखाची पुनर्बांधणी (रीस्ट्र्क्चरिंग) केली असती तर परिपूर्ण "संपादकीयाचा" फील आला असता असे व्यक्तीगत मत आहे.

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्रमोद देव's picture

14 Jul 2008 - 9:34 pm | प्रमोद देव

दिलीपराव लेखाचा आशय विचारप्रवर्तक आहे ह्या बद्दल अजिबात संदेह नाही. मात्र आपल्या लौकिकाला साजेसा उतरला नाही असेही वाटतेय. कुठेतरी काहीतरी कमी वाटतंय. नेमकेपणाने व्यक्त करता येत नाही पण वैयक्तिक माझ्याबद्दल बोलायचे तर मी फारसा संतुष्ठ नाहीये आपल्या कामगिरीवर. पुढच्या वेळेसाठी आत्ताच शुभेच्छा देऊन ठेवतोय.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

शितल's picture

14 Jul 2008 - 10:20 pm | शितल

मराठी भाषा, साहित्य, साहित्यसंमेलन सातासमुद्रापलिकडे जात आहे, ही अभिमानाची आनंदाची गोष्ट असली तरी येथील महाराष्ट्रभर वावरणार्‍या मराठी वाचकांकडे दुर्लक्ष होऊ नये, म्हणुनच की काय रत्नागिरीतही संमेलन व्हावे, असे वाटते.

हो घरातील लोकाना पहिला मान
आम्ही घरातीलच आहोत पण दुसरी कडे राहिलेलो
शतकाच्या पलीकडे जाऊन डोकावण्याचे सामर्थ्य ज्या साहित्यात, ज्या लेखकात असेल तेच साहित्य प्रवाहात टिकून राहील.
हे १००% खरे आहे.

प्राजु's picture

15 Jul 2008 - 12:52 am | प्राजु

सर, आपला लेख आवडला. खूप विचार करून लिहिलेला आहे.
जागतिकीकरणामुळे साहित्य निर्मितीवर परिणाम होतो आहे. माणसाचे अभ्यासाचे क्षेत्र वाढले आहे. पूर्वीच्या माणसांनी जे वाचले नसेल ते आता सहज वाचायला मिळते. हा जागतिकिकरणाचा फायदाच म्हणावा लागेल. बरेचसे ब्लोग्ज वाचनीय असतात पण ते सगळे वाचून आपण साहित्य निर्मिती करणं म्हणजे मग खूपच वेळ लागेल. भलेही इ-साहित्य लिहिणारे खूप विचार करत नसतील किंवा त्यांचे लेखन वर वर वाटणारे असेल पण त्यांच्या साहित्यातून दैनंदिन जीवनात घडणार्‍या गोष्टी डोकावतात. ज्या समाजात ते राहतात, वावरतात त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या साहित्यातून दिसते आणि ते अपरिहार्य आहे.
आपला लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सर्किट's picture

15 Jul 2008 - 1:13 am | सर्किट (not verified)

जागतिकीकरण आणि माध्यमांची मक्तेदारी संपणे ह्या दोन्हीतील कार्यकारणभाव सदर लेखातून स्पष्ट होत नाही. पण ह्याचा काहीतरी संबंध असावा, असे लेखकाने गृहीत धरलेले वारंवार जाणवते.

"साहित्य लोकाभिमुख व्हावे" असा घोष चक्रधरांच्या काळापासून ऐकू येत आहे.

मध्यंतरी ह्या घोषाचा अर्थ, "साहित्य विकले जावे" असा प्रकाशकांनी केला.

आता अनुदिन्या आणि संकेतथळांवर स्वखुषीने फुकट लिहिणार्‍यांमुळे "साहित्य वाचले जावे" असा अर्थ होतो, एवढेच.

ह्या बदलाचा संबंध "जागतिकीकरणाशी" कमी आणि माध्यमांच्या उपलब्धतेशी जास्त आहे.

समजा जागतिकीकरण झाले नसते, आणि मराठी वृत्तपत्रांची / पाक्षिकांची / साप्ताहिकांची संख्या वाढली असती, तरीही हेच झाले असते.

दुसर्‍या मुद्द्याविषयी बोलायचे(च) झाल्यास, मराठी संकेतस्थळांची एकाधिकारशाही मोडीत काढण्याचे श्रेय "मनोगत" कारांकडे जाते, हे मान्य करायला हवे. मायबोली ची एकाधिकारशाही त्यांनी मोडीत काढली, हे येथील जालसर्वज्ञांना पटेल.

ह्याचा संबंध जागतिकीकरणाशी लावणे चुकीचे आहे.

- (विचारी) सर्किट

कोलबेर's picture

15 Jul 2008 - 1:35 am | कोलबेर

दुसर्‍या मुद्द्याविषयी बोलायचे(च) झाल्यास, मराठी संकेतस्थळांची एकाधिकारशाही मोडीत काढण्याचे श्रेय "मनोगत" कारांकडे जाते, हे मान्य करायला हवे.

सहमत आहे.. तसेच प्रशासकीय अनुमतीची प्रथा प्रथम बंद करण्याचे श्रेय उपक्रमाला जाते.
(स्मरणशील) कोलबेर

चित्रा's picture

15 Jul 2008 - 1:48 am | चित्रा

उत्तम विचारमंथन करणारा लेख!

अग्रलेखातील सूर उपरोधिक वाटला (वरच्या प्रतिसादांमधून असे वाटणारी मीच एक आहे का अशी एक शंका आली). अग्रलेखातील जागतिकीकरणाविषयक उपरोधिक सूराचा अर्थ पाहुणे संपादक जागतिकीकरणाविरूद्ध आहेत असे नाही, तर या शब्दाचा जो वापर राजकारणी, समाजकारणी आणि इतर कुठच्याही संदर्भात झिजेपर्यंत करतात त्याविरूद्ध असावा.

मिपावरील पाककृतींना येणारे प्रतिसाद पाहिल्यास जागतिकीकरणाचे परिणाम सहज दिसून येतात, शोधावे लागत नाहीत, त्यात जे काही जागतिकीकरणाचे परिणाम दिसतात ते सहज असतात. तसेच इतरही अनुभव साहित्यात जिवंत भिनलेले असले (मग ते जगभरच्या मातीत असोत का घराबाहेरच्या) तर त्यात जी सहजता असते ती यावी अशी या अग्रलेखाची अपेक्षा आहे असे वाटले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2008 - 7:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्यासाहेब, आपण लिहिण्याची संधी दिली आणि त्यामुळेच मनातला विचार इथे टंकता आला. आपले पुन्हा एकदा मनापासून आभार !!!

आमच्या तोडक्या मोडक्या लेखनाच्या तुलनेत मिपाच्या प्रतिसादांची वैचारिक उंची भारावणारी अशीच आहे. अनेक प्रश्न जागतिकीकरणाने, आणि मिपाच्या मित्रांनी उभे केले त्याची साधक बाधक चर्चा वाचायला मिळत आहे, अतिशय आनंद झाला, होत आहे. यावर चिंतन / मंथन करण्यासाठी अजूनही भरपूर संधी आहे, आपल्या प्रतिसादाला पोच देण्यासाठी हा प्रपंच.
क.लो.अ.

-प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवांतर : सध्या जालाच्या तांत्रिक अडचणींमुळे मिपावर येता येत नाही. त्यामुळे कृपया कोणताही गैरसमज नको, की कळकळीची विनंती.

अरुण मनोहर's picture

16 Jul 2008 - 7:10 am | अरुण मनोहर

येवढ्या अफाट विषयाला मर्यादीत जागेत बसवणे खरच कठीण आहे. बिरुटे सरांनी हे कठीण काम चांगले सांभाळले आहे. भरकटण्याचा धोका काही ठिकाणी टाळता आला नाही. पण तिकडे दुर्लक्ष करता येते. आवडलेले मुख्य मुद्दे असे---

>>जागतिकीकरणाच्या प्रवाहात खंबीरपणे उभे राहून साहित्य समृद्ध करावेच लागेल. असे करायचे असेल तर साहित्यविषयक विचार मांडताना आशय आणि अनुभवाचे क्षेत्र विस्तारले पाहिजे. मानवतावादी मूल्याकडे लक्ष पुरविले पाहिजे......

>>या दशकात महाराष्ट्रातील लोकजीवन समृद्ध झालेले आणि त्याचे चित्रण साहित्यातून उमटले पाहिजे, मराठी साहित्याची उंची वाढली पाहिजे. मराठी जीवनाच्या विविध परिघांना स्पर्श करण्यासाठी मराठी लेखकांचे अनुभवविश्व समृद्ध झाले पाहिजे. जागतिकीकरणानंतर साहित्याचे विषय बदलत आहेत. तीव्र संघर्ष आणि जगण्याची विलक्षण गती यामुळे जीवनातील फरफट वाढत आहे. शतकाच्या पलीकडे जाऊन डोकावण्याचे सामर्थ्य ज्या साहित्यात, ज्या लेखकात असेल तेच साहित्य प्रवाहात टिकून राहील.

खालील मुद्द्यांवर मी सहमत नाही.
>>>जागतिकीकरणामुळे सामाजिक व आर्थिक विषमता वाढत जाते, गरीब राष्ट्रे आणि तेथील जनतेच्या दारिद्र्यातत भर पडत आहे.
हा स्वतंत्र अग्रलेखाचा चांगला विषय आहे. हा अग्रलेख ह्या विषयावर नाही म्हणून इथे चर्चा करत नाही. परंतू जाता जाता एक नमूद करण्याचा मोह टाळता येत नाही. दशक दोन दशकाआधी भारत कदाचित गरीब देश, मागासलेला देश आसेल. पण आज एक महाशक्ती बनण्याच्या मार्गावर आहे. हे काम जागतिकीकरणाशिवाय झाले असते का?

>>>एकच लेखन चार-चार संकेतस्थळांवर टाकण्याची सवय, हे सर्व सोडले पाहिजे.
हा मुद्दा पटत नाही . तसे बघीतले तर साहित्याचा प्रसार करायला हे एक उत्तम साधन आहे. हे फक्त साचेबद्ध, एकसुरी, कंटाळवाणे लेखनासाठी म्हटले आहे का? तसे असेल तरी पटत नाही. गुणवत्ता ही प्रकाशीत केल्यानंतर जोखता येते. जास्तीत जास्त जागी प्रकाशीत केल्यावर जास्त वाचन होउन जस्त उहापोह होइल, प्रातीनिधीक म्हटली जाउ शकणारे प्रतिसाद मिळतील. मगच ते लिखाणसाचेबद्ध, एकसुरी, कंटाळवाणे आहे की नाही ह्याचा अंदाज येइल. एखादे अक्षर साहित्य जर ह्यात असेल तर ते सगळ्या वाद प्रतिवादांना पुरुन उरेल.