जागतिकीकरण आणि साहित्यप्रवास...
विशेष
यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल!
जागतिकीकरण आणि साहित्यप्रवास...
जागतिकिकीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा त्याचा कशा-कशावर परिणाम होईल याची चर्चा सुरू झाली. नव्वदीला आम्ही नवे आर्थिक धोरण स्वीकारले, मुक्तधोरणाचा पुरस्कार केला विविध सेवाक्षेत्रात खुलेपणा आला, आणि आता तर देशात जागतिकीकरणाचे धोके लक्षात येऊ लागले म्हणे, खरे तर अजून जागतिकीकरणाच्या झळा पोहचल्याच नाही, आणि त्याच्या अधिक-उणेची चर्चा सुरू झालेली दिसते. असे असले तरी अपरिहार्यतेने आपण त्याचे स्वागतच केले आहे.
जागतिकीकरणाचे साहित्यावर काय परिणाम झाले, होताहेत याची वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा सुरू झाली. जागतिकीकरण म्हणजे काय? त्याचा समाजावर कसा परिणाम होतो, साहित्यावर परिणाम कसा होतो, त्याचे स्वरुप कसे असते या प्रश्नांचीही उत्तरे वाचकांनी शोधलीच पाहिजे, सर्व चर्चासत्रातून, चर्चेतून ज्ञानेश्वराच्या साहित्यापासून ते नुकतीच दोन ओळीची कविता लिहिणार्या कवीपर्यंतच्या कवितेत प्रस्थापित आणि नव साहित्यिक जागतिकीकरणाचा शोध घेऊ लागले. कवितेत, कथेत, जागतिकिकीरणामुळे माणसांची कशी फरफट होते ते दाखविण्याचे प्रयत्न सुरू झाले. लेखनाची बदललेली भाषा,शैली, नवनवे शब्द, म्हणजे जागतिकीकरणाचा प्रभाव अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली. जागतिकीकरणाने सकल जग एक खेडे बनवले. नवनव्या ज्ञानप्रसाराच्या साधनामुळे जीवनाच्या सर्वच क्षेत्रावर परिणाम होत आहे. भारतासारख्या बहुभाषिक प्रदेशात नव्या लाटांचा प्रभाव पडणे अपरिहार्य आहे. जागतिकीकरणामुळे सामाजिक व आर्थिक विषमता वाढत जाते, गरीब राष्ट्रे आणि तेथील जनतेच्या दारिद्र्यातत भर पडत आहे. पर्यावरणाचेही प्रचंड नुकसान होत आहे. त्यासाठी वर्तमान बदलायचे असेल तर जागतिकीकरणाच्या प्रवाहात खंबीरपणे उभे राहून साहित्य समृद्ध करावेच लागेल. असे करायचे असेल तर साहित्यविषयक विचार मांडताना आशय आणि अनुभवाचे क्षेत्र विस्तारले पाहिजे. मानवतावादी मूल्याकडे लक्ष पुरविले पाहिजे. आणि नेमका मानवतावादी मूल्यांचा र्हास होत आहे. दूरदर्शन, विविध वाहिन्यांच्या मालिका, चित्रपटांचे आशय या बाबतीत असे दिसते की, उपभोगवाद, चंगळवाद या मुळे सवंग लोकप्रियेतेसाठी लिहिले जाणारे लेखन वाढत आहे. केवळ तिथेच नव्हे तर मराठी संकेतस्थळावरही तसेच दिसून येते. चिंतन मननाअभावी लिहिण्याची प्रचंड घाई नवलेखकामध्ये दिसते. अर्थात टिकणारे लिहिता येत नाही, म्हणून त्यांनी आपली लेखणी थांबवावी असे मुळीच नाही. परंतु साचेबद्ध, एकसुरी, कंटाळवाणे आणि एकच लेखन चार-चार संकेतस्थळांवर टाकण्याची सवय, हे सर्व सोडले पाहिजे. अनुभवविश्व जर बदलायचे असेल तर साहित्याच्या विकासाकडे पाहण्याची नवी दृष्टी हवी. इतर भाषेतील कलाकृती आणि विद्यमान मराठी साहित्य यांची तुलना करता ज्ञानपीठ पुरस्कारात आपण किती मागे आहोत ते लक्षात येतेच आहे.
वि. स. खांडेकरांची ययाती सारखी ऐतिहासिक कलाकृती अजरामर ठरली ती त्यांच्या लोकविलक्षण प्रतिभा शक्तीमुळे, कुसुमाग्रजांच्या नटसम्राटाने मराठी वाचकांचा हृदयाचा ठाव घेतला, विंदाची कविता ऐकून माजी राष्ट्रपती डॉ. कलामांना मराठी भाषा शिकावी वाटते, याचा अर्थ असा की श्रेष्ठ अभिव्यक्ती ही उत्कंठावर्धक साहित्यास जशी गती देते तशी ती भाषेला नवा वाचक वर्गही जोडते. ऐतिहासिक साहित्य, आदिवासी, जनवादी, स्त्रीवादी, विज्ञानवादी, दलित आत्मकथने, कथा, कविता, तसेच काही प्रमाणात येणारे समृद्ध ललित साहित्य, वेगवेगळ्या मराठी संकेतस्थळांवर, अनुदिन्यांवर, लिहिले जाणारे, उत्तम असलेले पण दुर्लक्ष झालेले साहित्य ह्या जमेच्या बाजू असल्या तरी, मराठी साहित्यात आणखी किती तरी आकृतिबंध समर्थपणे अवतरण्याची गरज आहे. त्याचबरोबर जालांवर मराठी वाचकांना साहित्यनिर्मितीसाठी नवनवीन व्यासपीठे, सेवा उपलब्द्ध करून देणारी काही मराठी संकेतस्थळे आहेत, त्यावरही काही नवा आशय कधी कधी व्यक्त होतांना दिसतो. काही मराठी संकेतस्थळांवर संस्थळाचे मालक (मिसळपावचे नव्हे )लिहिल्या गेलेल्या लेखनाला पुर्वी अनुमतीची प्रतीक्षा करायला लावत. परंतु आंतरजालावरील मराठी लेखक-वाचकांच्या वाढत्या रेट्यामुळे, तसेच मिपासारख्या काही लोकाभिमूख संकेतस्थळांमुळे आंतरजालावरील परीटघडीची एकाधिकारशाही मोडीत निघाली ही एक आनंदाची गोष्ट आहे. मराठी भाषा, साहित्य, साहित्यसंमेलन सातासमुद्रापलिकडे जात आहे, ही अभिमानाची आनंदाची गोष्ट असली तरी येथील महाराष्ट्रभर वावरणार्या मराठी वाचकांकडे दुर्लक्ष होऊ नये, म्हणुनच की काय रत्नागिरीतही संमेलन व्हावे, असे वाटते.
या दशकात महाराष्ट्रातील लोकजीवन समृद्ध झालेले आणि त्याचे चित्रण साहित्यातून उमटले पाहिजे, मराठी साहित्याची उंची वाढली पाहिजे. मराठी जीवनाच्या विविध परिघांना स्पर्श करण्यासाठी मराठी लेखकांचे अनुभवविश्व समृद्ध झाले पाहिजे. जागतिकीकरणानंतर साहित्याचे विषय बदलत आहेत. तीव्र संघर्ष आणि जगण्याची विलक्षण गती यामुळे जीवनातील फरफट वाढत आहे. शतकाच्या पलीकडे जाऊन डोकावण्याचे सामर्थ्य ज्या साहित्यात, ज्या लेखकात असेल तेच साहित्य प्रवाहात टिकून राहील. एकसुरी, कंटाळवाण्या रुक्ष वाङमयीन कलाकृती निर्माण करण्यापेक्षा, लेखन करणार्यांनी नव्या दिशेने विचार केला पाहिजे. तहान, बारोमास ( कादंबरी) तूर्तास, जागतिकीकरणात माझी कविता (काव्यसंग्रह), अशा कलाकृतींनी पुढे वेग घेतला पाहिजे. नव्या जगात एक नवा माणूस व नवा समाज घडवायचा आहे. शिक्षण, शेती, संगणक जग, कुटुंब, नोकरी, मुले, स्त्री-पुरुष आणि इतरही विषयांसहित साहित्य हे परिवर्तनाचे माध्यम बनावे, मराठी साहित्य हे परिवर्तनाचे शस्त्र व शास्त्र बनावे अशा दृष्टिकोनाने लिहावयाचे म्हणजे ते प्रचारांती असावे असे नाही. स्वांतसुखाय या दृष्टीने ते लिहिले जाऊ शकते. 'दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो', असा वैश्विक मानवतावादी दृष्टिकोन घेतला तर जगाला कवेत घेऊन सकल विश्व चराचर! हे विश्वची माझे घर हा ज्ञानदेवाचा विचार सार्थ होऊ शकेल.
साहित्याची नवीन गरज भरून काढणारा नव्या युगाचा सहित्यिक सध्या महाराष्ट्रात नवयुगाची वाट पाहत आहे. लिहितोय तेही उत्तमच लिहितोय, त्याच्यात काही बदल व्हावेत, हटके निर्मिती व्हावी, साहित्यात जागतिकीकरण शोधता यावे, असे कधी तरी तासावर जाणार्या प्राध्यापकाला आणि मिपाच्या टेंपरवारी संपादकाला वाटते पण त्यांचे ऐकणार कोण?
पाहुणा संपादक : प्राध्यापक डॉ दिलीप बिरुटे.
वाचन
15945
प्रतिक्रिया
29
सुंदर विचार...
उत्तम विचार | तक्रार | प्रश्न
माझी भुमिका
बादरायण संबंध
संपादकीय आवडले.
मूळ विषय
जोमाने साहित्यनिर्मिती व्हावी हा विचार समयोचित
स्वांत सुखाय
सहमत आहे
उत्तम अग्रलेख..
आवडला!
अगदी
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आंतरजाल व लोकसाहित्य
असेच म्हणतो....
छान
ह्म्म
चिंतनीय लेख....
प्रा. डॉ.
अभिनंदन
वा! अग्रलेख आवडला
विचारप्रवर्तक लेख!
सपादकिय लेख आवडला.
दुसरा संपादकीय लेख आवडला.
कुठेतरी गल्लत होतेय
दुसर्या
उपरोधिक
आभार !!!
अफाट विषय